सायकलविषयी सर्व काही ३ (सायकल घेण्यापूर्वी)

Submitted by आशुचँप on 10 May, 2013 - 14:47

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919

गेल्या भागात आपण कुठले फिचर्स अनावश्यक असतात ते पाहिले. आता आपण पाहुया सायकल विकत घेताना नक्की कुठल्या गोष्टी पहायच्या ते.

१. फ्रेम आणि फ्रेम साईज -

अतिशय महत्वाची बाब. आपल्या उंचीनुसार सोयीची ठरणारी फ्रेम निवडणे खूप आवश्यक आहे. फ्रेम साईज कसा ठरवायचा हे खाली दिलेल्या तक्त्यात पाहता येईल.

आता फ्रेम या स्टील, अॅल्युमिनियम आणि कार्बन अशा प्रकारात येतात. बहुतांशी देशी बनावटीच्या सायकली या स्टीलमध्ये असतात आणि त्याचे वजनही जास्त असते. तर अल्युमिनियमच्या सायकली वजनाने हलक्या असतात आणि त्याची किंमत जास्त असते. अर्थात आता काही सायकलींमध्ये दर्जेदार स्टीलचा वापर केला जातो आणि दुय्यम प्रतीच्या अॅल्युमिनियमपेक्षा त्या कधीही उजव्या ठरतात. जर जास्त पैसे (साधारणपणे ३५ हजारांपासून पुढे) खर्च करण्याची तयारी असेल तर कार्बन फायबर प्रकारही उपलब्ध आहे, जो अतियश हलका आणि दणकट प्रकार आहे. पण बहुतांशी प्रोफेशनलच या सायकली वापरतात. त्यामुळे दुकानात गेल्यावर फ्रेम साईज पाहणे आणि दुकानदाराला फ्रेम कसली आहे ते विचारणे. त्याला सांगता आले नाही तर पुलंच्या भाषेत आपला पहिला पॉइंट सर..

२. गियर्स - गियर्सवाली सायकल घेणार असू तर त्याचा प्रकार कुठला आहे ते पाहणे. सध्या जवळपास सगळ्याच सायकलींमध्ये शिमानो गियर्स वापरले जातात. आणि त्याची क्रमवारी ही अशी आहे.
शिमानो (अगदी बेसीक),
शिमानो टर्नी (बहुतांशी देशी बनावटीच्या आणि काही एन्ट्री लेवलच्या परदेशी सायकलींमध्ये),
शिमानो अल्टूस (टर्नीची सुधारित आवृत्ती, गियर शिफ्टींग स्मूद),
शिमानो एसेरा (अजुन सुधारित, गियर अजून स्मूद, व्हॅल्यू फॉर मनी प्रकार)
शिमानो अलिवियो (एकदम स्लीक आणि उत्तम दर्जाचे)
आता याही वरती काही प्रकार आहेत. रोड बाईकमध्ये एसआरएएम म्हणून आहेत. पण या गोंधळात आपण पडायचे नाही कारण आपल्या बजेटमध्ये बसणार्या सायकलींमध्ये हे वरचे चार प्रकारच वापरलेले असतात.
आता मला विचाराल तर तसा अगदी प्रचंड वगैरे फरक नाहीये या चार प्रकारात. सोपे उदाहारण द्यायचे झाले तर अँड्राईड जिंजरब्रेड, आयस्क्रीम सँडविच आणि जेलीबीन्स यात जितका फरक असेल तसाच. आणि जसे आपण जिंजरब्रेडवरून अपग्रेड होऊ शकतो तसे यात पण कालांतराने अल्टूसवरून थोडे पैसे खर्च करून एसेरावर जाऊ शकतो. त्यामुळे घेताना बजेट तपासा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या.
सायकलवाल्याला विचारण्याची गरज नाही. मागच्या चाकापाशी इथे हे असे लिहीलेले असते.

ते आपण पाहतो आहोत म्हणजे आपण जाणकार असल्याची दुकानदाराला जाणीव होते.

३. टायर्स - हायब्रीड सायकलमध्येही तीन चार प्रकारच्या जाडीचे टायर्स असतात. त्यापैकी आपले वजन आणि वापर लक्षात घेऊन निवड करावी.
टायर्सची रुंदी टायरवरच लिहीलेली असते ७००-३५सी वगैरे..

यातला ७०० हा चाकाचा परिघ जो बहुतांश सायकलचा सारखाच असतो. बदल होतो तो रुंदीत. हायब्रीड सायकल्सचे टायर ३२ ते ४५ या दरम्यान असतात. जितका आकडा कमी तितके टायर स्लीक आणि कमी श्रमात जास्त वेग. माझ्या हर्क्युलीसचे टायर ३२ चे होते आणि नंतर स्कॉटचे ३५. त्यामुळे सुरुवातीला जड गेले आणि निर्णय चुकला का काय असे वाटले पण जेव्हा सवय झाली तेव्हा जाणवले की माझ्या वजनाला (७३) हे टायर जास्त योग्य आहेत. अर्थात याला काही नियम वगैरे नाहीत. आपल्याला सुखकारक वाटतील असे कुठलेही टायर निवडू शकता.

या व्यतिरिक्तपण पॅडल्स, सॅडल (सीट), क्रँकशाफ्ट, स्टेम रायजर आदी हजार गोष्टी असतात सायकलची किंमत ठरवणार्या..पण तितक्या खोलात जाण्याची गरज नाही. आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी एकाच सायकलमध्ये मिळतील याचीही खात्री नाही. (मोबाईलचाच नियम इथे लावावा) त्यामुळे आपली प्रायोरिटी ठरवून बाकी गोष्टींमध्ये तडजोड करावी.

आपल्याला हवी तशी सायकल मिळाल्यावर त्याची एक ट्रायल राईड घेणे अत्यावश्यक आहे. हँडलची रुंदी, फ्रेम, टायर आदी गोष्टी तांत्रिक म्हणून सोडून दिल्या तरी चालवल्यानंतर आपल्याला किती आरामदायक वाटते हे पाहणे गरजेचे आहे. आणि दुकानादाराने खरेदीपूर्वी राईड देणे मस्ट आहे. जर त्याने नकार दिला तर खुशाल तिथून बाहेर पडा कारण तो तुमचा हक्क आहे.
मी माझ्या दोन्ही सायकली घेण्यापूर्वी चांगली गल्लीच्या टोकापर्यंत राईड मारून आलो होतो.
राईड घेण्यापूर्वी सीटची उंची आपल्याला हवी तशी अँडजेस्ट करून घ्यावी. कारण योग्य मापाची सायकल असूनही जर सीट कमीजास्त उंच असेल तर ती तितकी आरामदायक वाटणार नाही आणि तुमची निराशा होईल. अर्थात दुकानदार जर मुरलेला असेल तर तो न सांगताच ते करून देतो.

आता सायकलींचे ब्रँड...खाली काही भारतीय बनावटींच्या सायकल्सच्या वेबसाईट दिल्या आहेत.

http://www.avoncycles.com
http://www.myatlascycle.com
http://www.herocycles.com
http://www.bsaindia.com
http://www.ticyclesindia.com
http://www.la-sovereign.com
http://www.suncrossbikes.com

सायकलच्या तुलना करण्यासाठी आणि अन्य परदेशी बाईक्स पाहण्यासाठी

http://www.choosemybicycle.com/in/en/bicycles

अर्थात या साईटवर दिलेल्या किंमती २०११-१२ च्या आहेत. आणि त्यानंतर इंपोर्ट ड्युटी लागल्यामुळे साधारणपणे २-३ हजारांनी किंमत वाढलेली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवावा. पण डिलरशी घासाघीस करून जुन्या स्टॉकमधली एखादी सायकल चांगल्या किंमतीत मिळू शकते.

http://www.firefoxbikes.com/ आणि http://www.btwin.com/en/home हे पण दोन चांगले ब्रँड आहेत आणि भारतात सगळीकडे यांच्या सायकली उबलब्ध आहेत.

आता सायकल तर घेतली पण हे एवढ्यावरच थांबत नाही. याच्याबरोबर थोडी एक्सेसरीज पण आलीच.

बहुतांशी परदेशी बनावटीच्या सायकलींना साईड स्टॅंड, घंटी, कॅरीयर आणि अगदी मडगार्डपण नसते. ते थोडके पैसे टाकून बसवून घ्यावे लागते. (कॅरीयर आणि मडगार्ड ऑप्शनल आहे...मी तरी अजून बसवले नाहीये आणि आवश्यकता पण वाटली नाही. पावसाळ्यात थोडे वाटते पण ठिकाय)

याव्यतिरिक्त महत्वाचे म्हणजे हेल्मेट
हे थोडे कचकड्यासारखे वाटले तर आवश्यक आहे. सायकलवरून पडण्याचा वेग कमी असल्याने हे हेल्मेट पुरेसे ठरते. याची किंमत ८०० पासून पुढे आहे.
पंप - काही सायकलींना प्रेस्टा वॉल्व असतात जे रस्त्यावरच्या पंक्चरवाल्यांकडे हवा भरायला उपयोगी नाहीत. त्यामुळे एक फ्लोअर पंप घेतलेला केव्हाही चांगला. साधारण ७००-८०० पर्यंत मिळतो. त्यात प्रेशर मिटर असतो त्यामुळे योग्य तितकीच हवा भरली जाते.
यानंतर मग ग्लोव्ज, पॅडेड शॉर्टस, सनग्लासेस अशी ही यादी वाढतच जाते. आपला वापर, हौस आणि बजेट पाहून प्रायोरिटी ठरवावी.
सायक्लोकॉम्पुटर हा एक छान प्रकार आहे. आपला वेग, एकंदर किमी, एवरेज स्पीड, असे सगळे दाखवणारा हा कॉम्प आपल्याला आपला ट्रॅक रेकॉर्ड ठेवायला मदत करतो. परंतु मागच्या धाग्यात केदारने सांगितल्याप्रमाणे मोबाईलवरच्या अॅपची मदतही घेता येते.

आता पुढच्या भागात सायकल वापराच्या काही टीप्स, घरगुती मेंटेनन्स आणि अन्य..
http://www.maayboli.com/node/43034

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती आहे Happy रेफरन्स साठी अगदी उपयुक्त!

अ‍ॅडमिन ला याची सिरीज करायला सांगा Happy सगळे भाग एकत्र रहातिल.

मी एम्.आय्.डी.सी. , डोंबिवलीला राहतो.आणि तिथून डोंबिवली ३ ते ४ कि.मी. आहे. तर

मला रोज ३ ते ४ कि.मी. चालवायला योग्य सायकल कुठली?

आजच सायकली पाहील्या. हायब्रीड घ्यायचा विचार आहे. एवढं वाचुनसुद्धा किंमतीचा मुद्दाच मुख्य उरतोय. साधारण सारख्याच सायकली $५० + किंमतीच्या फरकाने आहेत. अजुन दोन चार दुकानं हिंडुन बघणार.

शिल्पा - कुठल्या कुठल्या पाहिल्यात सायकली...मी त्याच्यात काही प्रोज कॉन्स सांगू शकेन...
तुमची प्रायोरिटी आणि बजेट पण कळवा

नमस्कार अशुजी,
मी पुण्यातील डेकॅथलॉन येथे एक सायकल बघितली आहे. १०,००० ची आहे
तुम्ही सांगितलेलया बहुतेक टिप्स लक्षात ठेऊन चेक केली आहे. तरी एकदा तुम्ही तुमचा अभिप्राय द्यावा अशी विनन्ति . मी लिंक हि देत आहे.
https://www.decathlon.in/p/8284495_rockrider-300-mtb-black.html#/1137-45...

मी पण Hercules Act110 वापरलि बरेच दिवस पण सडपातळ टायर्सला वैतागुन आता Schnell Fang 29" घेतलिये मागच्या महिण्यात (फडके हौद, सरदार सायकल). १०० किमी चालवलिये फक्त पण चांगली आणि आरामदायक वाटत आहे. स्लिम टायर्स ला वैतगण्याचं कारण, मला तरी त्रास झाला, रोडवर फुटां मध्ये मोजता येणार्या खोलिचे खड्डे, आडदांड स्पिड ब्रेकर, शिवाय मागे गाड्या आल्या की रस्त्यावरुन खाली चालवावी लागते. हे सगळं मिळुन खुपदा पंक्चर होन हा प्रकार अनुभवला. ह्यावेळेस सगळ्या अस्सेसरिज घेतल्या, पंक्चर किट (act110 पंक्चर झाल्यावर १५ किमि चालत जावं लागलं होतं), लाइटस वगैरे.

अग्निपंख
रायडर ११० चा असा अनुभव अगदीच आश्चर्यकारक, मी स्वतः दीड वर्षे वापरली आहे,एकदाही पंक्चर नाही की त्रास नाही, १०० किमी च्या राईड्स केल्या आहेत, सिंहगड क्लाइम्बिंग केलं आहे, माझी सगळ्यात आवडती सायकल, दुर्देवाने कंपनीने ते मॉडेल बँड केले.

पंतश्री - रॉक रायडर मस्त सायकल आहे, माझ्या काही मित्रांकडे आहे, चांगला फीडबॅक आहे. आवडली असेल तर घ्या नक्की,

कुठली हर्क्युलस रायडर ऍक्ट ११०???

लिंक देणार का?
कारण रायडर निओ आहे उपलब्ध ऍक्ट बंद झालीये असं कळलं होतं