मन दु:खावाचुन कुठेच नाही रमले

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 October, 2017 - 10:27

स्वप्नांचे बांधत इमल्यांवरती इमले
हे सताड़ उघडे डोळेे पुरते दमले

जो हवा हवा तो तुटून गेला तारा
बाकीचे सारे नभांगणी चमचमले

देशांतर केले अन वेषांतरसुध्दा
परतवू न शकले अस्तित्वाचे हमले

आकड़ा तुझ्याशी छत्तिसचा सौभाग्या
पण दुर्भाग्याशी गणित बरोबर जमले

चंद्रावर गेले अन् स्वर्गात भटकले
मन दुःखावाचुन कुठेच नाही रमले

काळाचा बोळा प्रसंगांवरी फिरला
हृदयातिल अत्तर पुन्हा पुन्हा घमघमले

मंदोदरी कधी झाले लोपामुद्रा
ना शल्य स्वतःशी प्रतारणेचे शमले

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख,
जो हवा हवा तो तुटून गेला तारा
बाकीचे सारे नभांगणी चमचमले

हा खास!

छान.

>>>जो हवा हवा तो तुटून गेला तारा
बाकीचे सारे नभांगणी चमचमले

देशांतर केले अन वेषांतरसुध्दा
परतवू न शकले अस्तित्वाचे हमले>>>सुरेख शेर!