चकवा - रहस्यकथा - भाग १

Submitted by उपेक्षित on 7 November, 2017 - 10:00

चकवा

खरे तर वाचन म्हणजे माझा जीव कि प्राण, अगदी लहानपणापासून मला हे वेड आहे जे आजपर्यंत टिकून आहे. साधा भेळीचा कागद सुद्धा पुरतो मला वेळप्रसंगी...

‘त्या’ विलक्षण घटनाक्रमाला पण अशीच वरवर पाहता साध्या गोष्टीने सुरवात झाली होती. आपल्या आयुष्यातपण अशा बर्याच चांगल्या-वाईट गोष्टी असतात ज्या वर-वर पाहता साध्या, शुल्लक वाटत असतात पण त्याच शुल्लक गोष्टी वेळ आली कि किती महत्वाच्या होऊन जातात नाही का ?

‘त्या’ दिवशी घरी कोजागिरीनिमित्त मसाला दुध आणि भेळ असा साधासा बेत ठरला. पार्सल आणलेली भेळ मी कागद फाटणार नाही अशा बेताने उघडत होतो जेणेकरून मला तो निट वाचता यावा. त्या २/४ कागदांपैकी १ कागद थोडा वेगळा होता तो वर्तमानपत्राचा नव्हता मी तो कागद काळजीपूर्वक बाजूला काढून माझ्या टेबल वर ठेवून दिला.

साधारण २/३ दिवसांनी रात्री मी टेबल आवरत असताना मला तो कागद परत दिसला, तो खूपच जुनाट, जीर्ण झाल्यासारखा वाटत होता आणि त्यावर कोणीतरी खूप घाईने आणि गचाळपणे काहीतरी खरडले होते. त्या कागदाची अवस्था पाहून मी तो फेकुनच द्यायला निघालो होतो पण....

आयुष्यात परत हा पण आलाच, उत्सुकता म्हणून मी तो कागद घेऊन आराम खुर्चीत विसावलो बसल्यावर त्यावरची अक्षरे वाचायचा मी प्रयत्न्न करू लागलो पण त्यावरचे काही निट वाचता येत नव्हते कारण कदाचित लिहिणार्याकडे कागदाची कमतरता असावी म्हणून त्याने खूप छोट्या अक्षरात आणि गिचमीडित लिहिले होते सगळे.

काय करावे ? थोडावेळ विचारात गढून गेलो आणि एकदम डोक्यात आले भिंगाने वाचायचा प्रयत्न करूयात ? येस माझ्या ड्रोवर मध्ये अथर्वचे (माझा लहान मुलगा) १ खेळण्यातले कामचलाऊ भिंग होते.

भिंग घेऊन मी आता तो कागद वाचू लागलो आणि पहिल्याच ओळीला मी हादरून गेलो. हे नक्की काय होते आणि ते मलाच कसे मिळाले ? त्या जीर्ण झालेल्या कागदावर एक विलक्षण सत्य घटना होती ती लिहिणार्याच्या शब्दातच आपण पुढे बघू.
-----------------------------------------
‘तो’ – कुणाच्या हाताला हा कागद लागेल कि नाही ? लागला तर कधी लागेल ? हे मला माहित नाही कारण तोवर आम्ही सर्वजण जिवंत असू कि नाही हे नियतिलाच माहित आणि तीने आमच्यासमोर काय वाढून ठेवले आहे हे मला काय कुणालाच ठाऊक नाहीये.

अवघे थोड्या वेळा पुर्वी आम्ही सगळे किती आनंदात होतो पुण्याहून – औरंगाबादला रजतच्या लग्नाला बस मधून निघताना कुणी विचारसुद्धा केला नव्हता कि आपण असल्या चक्रामध्ये अडकून पडू,

या खेळाला सुरवात रजतच्या लग्नाला आम्ही बस मधून निघालो तेव्हा झाली. रात्री साधारण १० ला निघणारे आम्ही कसेबसे १ ला पुण्यातून निघालो, बसमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती आणि अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी त्यावर ताल धरला होता.
रजतच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते कि तो किती आनंदात होता ते नव्या आयुष्याची स्वप्ने त्याच्या डोळ्यात सहज दिसत होती. नाचून नाचून दमल्यावर सगळे आता डुलक्या घेत होते. काहीवेळाने सर्वाना काहीश्या गडबडीने जाग आली.

आम्ही बाहेर पहिले तर नगरच्या अलीकडे हि मोठ्ठी रांग लागली होती गाड्यांची. घड्याळात पाहिले तेव्हा साधारण ४ वाजत आले होते, मग समोरच्या टपरीवर चहा मारायला आम्ही ८/१० जण गेलो रजतसुद्धा अर्थात आमच्यासोबत होताच. चहा घेताना सहज चौकशी म्हणून अमितने (रजतचा मित्र) तिथल्या माणसाला ट्रॅफिक बद्दल विचारले तर त्याने सांगितले पुढे एक अपघात झालाय त्यामुळे हे ट्रॅफिक झाले आहे अपघात झालेली गाडी हटवायचे काम चालू आहे आणि अजून साधारण २/४ तास यात जातील. हे ऐकताच रजतचा चेहरा पडला, अमितने त्याचा चेहरा पाहून त्या माणसाला काही पर्यायी मार्ग आहे का ते विचारले. त्यावर त्या माणसाने दिलेले उत्तर पुढील घटनेची नांदीच म्हणता येऊ शकते.
टपरीवाला माणूस – साहेब दिवसा मी तुम्हाला बोललो असतो कि त्या रस्त्याने जा पण या रातच्या वक्ताला आणि त्यात बी लग्नाचे वऱ्हाड नगो नगो सायब त्यापरीस २/३ तास इथ थांबा.

पण रजतचा पडलेला चेहरा पाहून अमितने हट्टाने त्या माणसाकडून पर्यायी रस्त्याची माहिती करून घेतली ती माहिती सांगत असताना तो माणूस वारंवार अमितला सांगत होता त्या रस्त्याने न जाण्याबद्दल.

चहा पिऊन विचारमग्न अवस्थेत प्रत्येकजण बसमध्ये येऊन बसला शेवटी शांततेचा भंग करत रजत बोलला “काय हरकत आहे त्या रोडने गेलो तर” ?
मग प्रत्येकजण आपले म्हणणे मांडत बसला आणि सरतेशेवटी पर्यायी रोडने जायचे नक्की झाले. नक्की झाले? पण ते ठरवणारे आम्ही कोण होतो ? नियतीच सर्व ठरवत नव्हती काय हे सगळे ? रात्री उशिरा निघणे मग रोडवरचा तो अपघात त्यात ट्रॅफिक मध्ये अडकणे हि घटनांची साखळी बघता नक्कीच कोणीतरी तगडा दिग्दर्शक या मागे असावा हे आत्ता जाणवत आहे.
शेवटी असे ठरले कि आमची बस नवरदेवाला घेऊन पुढे पर्यायी मार्गाने जाणार आणि बाकी २ बस रस्ता मोकळा झाला कि आहे त्या ठरलेल्या मार्गाने येणार.

सर्व सुरळीत झाले असते तर पुढील ३ तासात आम्ही लग्नाच्या हॉल वर असतो...

चहावाल्याकडून परत एकदा रस्त्याची खात्री करून आम्ही सगळे ‘त्या’ रस्त्याला वळालो. थोड्यावेळात सगळे झोपेच्या अधीन झाले. मी झोपायच्या आधी माझ्या रेडियम वॉचने ४.५५ ची वेळ दाखवली होती.

मी झोपेत होतो कि ग्लानीत ? कारण डोळे उघडल्यावर आजूबाजूला पहिले तर सगळीकडे मिट्ट काळोख दाटलेला होता. आजूबाजूला पहिले तर अमित, रजत आणि बाकीची माणसे गाढ झोपेत होती. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर असे वाटत होते कि एखाद्या झाडांच्या बोगद्यातून आपण जात आहोत इतकी गच्च झाडी आजूबाजूला दिसत होती पण त्या झाडांच्या गर्दीत लांब १ मोठे डेरेदार झाड दिसत होते कदाचित वड नाहीतर पिंपळ असावे मी मनातल्या मनात नोंद केली, मला परत झोप यायला लागली होती पण सवयीने परत वॉच मध्ये पहिले यावेळी त्याने ०५.२०.४३ वेळ दाखविली. साला मनातल्यामनात मी हवालदिल झालो कि साधारण 25 मिनिटामध्ये इतकी गाढ झोप कशी लागू शकते ? ते पण सगळ्यांना ? विचार करता करता झोपेने परत मला वेढले होते.....

अचानक झटका लागावा तसा मी जागा झालो.
यावेळी डोळे टक्क उघडे होते माझे, कसलातरी प्रभाव आपल्याला व्यापून टाकत आहे असे जाणवू लागले होते, जीव गुदमरत असताना जशी भावना होते तसे काहीसे होत होते जे शब्दात सांगणे अशक्य आहे. या वेळी मी परत खिडकी बाहेर नजर टाकली आणि पुरता हादरून गेलो. काही वेळा पुर्वी जिथून बस जात होती तिथूनच परत जात आहे असे मला जाणवले तीच गच्च झाडी आणि तेच लांब उभे असलेले डेरेदार झाड. मी झटक्यात माझ्या वॉच कडे पहिले ०५.२०.४३ तीच वेळ जी मी मगाशी पाहिलेली. असे कसे ? मला वेड तर नाही न लागले ? कि मी स्वप्नात आहे ?

मी परत खिडकीबाहेर सावकाश नजर टाकली ते लांब असलेले झाड तसेच लांब वाटत होते आजूबाजूला एकही दुसरे वाहन दिसत नव्हते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मी रजत आणि अमितला उठवण्यासाठी उठलो.

त्यांना उठवून आणि थोडक्यात परिस्थिती समजावून सांगायचा प्रयत्न केला पण दोघेही मी हे काय सांगत आहे असे तोंड करून ऐकत होते साहजिकच होते त्यांचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता पण मी ठाम होतो माझ्या मतावर शेवटी आम्ही वाद घालत बसचालकाकडे निघालो चालकाच्या केबिन पाशी गेल्यावर आम्ही दारावर वाजवायला सुरवात केली. पण काहीच प्रतिसाद नव्हता पलीकडून
एव्हाना बसमधले सगळे लोक जागे झाले होते आणि त्यांना काही कल्पना नसल्या कारणाने सगळेजण निवांत बसले होते गप्पा-गोष्टी करत.

खूपवेळ केबिनचा दरवाजा वाजवून देखील चालकाकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. मी दरवाजा वाजवत असताना रजत आणि अमित दोघे काहीतरी मागे कुजबुजत होते काहीतरी वाद घालत होते “मी तुला बोललो होतो नको जायला “ असे काहीसे पुसटसे ऐकू येत होते पण मला त्यावेळी नीट काही समजले नाही.

बराचवेळ प्रयत्न करून देखील चालकाने केबिन न-उघडल्याने आम्ही आमच्या जागेवर येऊन बसलो. आम्ही आमच्या वॉच वर परत नजर टाकली आणि ... परत तीच वेळ ? ०५.२०.४३ आता मात्र आम्ही मनातून पुरते खचून गेलो होतो.
डोके पुरते भंजाळून गेले होते हे जे काही घडत होते ते खरच घडत होते कि माझे स्वप्न आहे हे सुद्धा मला समजत नव्हते.

मगापासून कुणाला भूक लागली नव्हती कि तहान लागत नव्हती, हे काय होते ? आपण एखाद्या वेगळ्या मितीमध्ये तर नाही न अडकलो गेलो ? आणि जर असे असेल तर तर इथून बाहेर पडू शकू? कि या भयानक मितीच्या कालचक्रात असेच फिरत राहू ? या मितीमध्ये मृत्यू असेल कि हजारो वर्ष सारखे असेच तिथल्या तिथे भटकत राहावे लागेल ?

काही समजत नव्हते, बस मध्ये सर्वांना समजले होते काय होते आहे ते पण सगळे शांत होते एक प्रकारची अ-नैसर्गिक शांतता होती ती आणि एकदम मला जाणवले कि मी पण असाच शांत बसून आहे मगापासून जे काही वादळ होते ज्या काही भावना होत्या त्या सर्व आत जाणवत आहे पण बाहेर मी पण शांत आहे. मग मगाशी मी, रजत आणि अमित चालकाच्या केबिनपाशी जाऊन आलो ते कसे जमले ? मनावर परत झोपेचा अंमल चढत होता एक अ-नैसर्गिक झोप आणि ती टाळायचा मी अतोनात प्रयत्न करत होतो....

मला माझ्या जगात परत जायचे होते माझा मुलगा, माझी बायको माझे आई-वडील, मित्र सर्वांमध्ये मला परत जायचे होते मनातून एक उर्मी दाटून आली आणि ती आसवांच्या रूपाने बाहेर पडू लागली अभावितपणे मी डोळे पुसायला हात नेला आणि हाताला काही लागलेच नाही, आता हळू हळू काही गोष्टी स्पष्ट होत होत्या मला. आता जे काही करायचे असेल ते मनोबलाच्या सहाय्यानेच तरच शरीर आपल्याला साथ देणार हे स्वच्छ झाले होते.

तरीही मगाशी आम्ही तिघे त्या केबिन च्या दारापाशी कसे जाऊन आलो ते मला समजत नव्हते. कदाचित ‘ते’ जे काही आहे ते काही काळापुरते थोडे क्षीण होत असावे ?
बस्स आपण लढायचे आपण अशी हार मानायची नाही मनाशी मी निर्णय घेऊन टाकला होता अर्थात मी काय करणार होतो हे मला सुद्धा माहित नव्हते कारण आपल्याला नक्की कशाशी लढायचे हेच मुळात समजत नव्हते.

परत ठरवून वॉच कडे नजर टाकली ०५.२०.४४ काय .४४ ? १ सेकंद आपण पुढे गेलो आहोत ? कदाचित या मितीतील वेळ संथ गतीने पुढे जात असावी पण मग या हिशेबाने आपण आपल्या जगात परतायला किती काळ लोटेल? काही कळायला मार्ग नव्हता.

आता मी परत “त्या” ची क्षीण व्हायची वाट पाहू लागलो. कारण त्या थोड्या वेळात आम्हाला काहीतरी हालचाल करता आली असती काय ती माहित नव्हते पण परत एकदा झोपहि मला वेढू लागली होती आणि आता तिला टाळणे मला शक्य नव्हते आणि मला ते करायचे हि नव्हते.
--------------------------------------------------------------------------

गंभीरपणे रहस्यकथा लिहायचा पहिलाच प्रयत्न केलाय कसा वाटला आवर्जून सांगा मंडळी आणि काही खटकले असेल तर हक्काने कान धरा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दमदार सुरुवात झालीय. पुढील भाग लवकर लवकर येऊ दया म्हणजे लिंक तुटणार नाही ; तसेच उत्सुकता टिकून राहील.

पुलेशु

शिर्षकात भाग नंबर लिहा ना प्लिज म्हणजे पुर्ण नाहीये हे आधीच कळेल.
सुरुवात मस्त झाली आहे. पुढचा भाग टाका लवकर..

सुरुवातच एवढी छान केली आहे तर पुढील भाग किती छान असतील ?
उत्सुकता खूप वाढली, पुढचा भाग लवकरात लवकर येऊद्यात..!
पुढील भागांसाठी शुभेच्छा…

मस्तच... दर्जा...एक नंबर.

खाली क्रमशः बघितल्यावर थोडासा हिरमोड झाला खरा पण
लवकरात लवकर पुढचे भाग टाकाण्याचा प्रयत्न करा ..

जबरी....
पण काय हे.. वर त्या मिसळीच्या लिंकवर पाहिले. मे महिन्यातील भाग आहे हा.. आशा करतो पुढचा भाग शेवटपर्यंत तयार असेल Happy

पण तुम्ही त्या मिती मध्ये बसून लेखन नका करू ..>> त्यांनी त्या मितीत बसून लिखान केलं, तर तासाभरात सर्व भाग येतील..

Pages