मोबाइल फोनमुळे कर्करोग ?

Submitted by कुमार१ on 30 September, 2016 - 21:58

मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे.
उत्तर समजण्यासाठी जगात आजपावेतो झालेल्या संबंधित संशोधनाचा थोडक्यात आढावा घेतो. या लेखातील माहिती ही अधिकृत वैद्यकीय संस्थळावरून घेतलेली आहे, वृत्तपत्रातील बातम्यांवरून नाही. लेखासाठी वापरलेला शेवटचा संदर्भ ऑगस्ट २०१६ चा आहे.

या विषयावर १९९० पासून आजपर्यंत अनेक देशांत ३० मान्यताप्राप्त संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष अगदी टोकाचे उलट सुलट आहेत. त्यामुळे आपणच काय पण शास्त्रज्ञ सुद्धा अगदी गोंधळात पडले आहेत, हे नक्की. वाचकांचा कमीत कमी गोंधळ व्हावा असा प्रयत्न करत या विषयाचे थोडक्यात खालील मुद्दे मांडतो.

१) मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी या ‘ RF रेडिएशन’ प्रकारच्या असतात.

२) या लहरींमुळे होऊ शकणाऱ्या कर्करोगाच्या संशोधनाचा मुख्य झोत आपला मेंदू व लाळग्रंथी यांवर आहे.

३) मोबाईल प्रचंड प्रमाणात वापरणाऱ्या लोकात मेंदूचा ‘ glioma’ हा रोग होण्याची शक्यता खूप आहे.

४) बरेचसे अभ्यास हे 2G फोन लहरींच्या संदर्भातले आहेत. काही अभ्यासामध्ये प्रयोगशाळेत ‘सेल कल्चर’ चा वापर झाला तर काहींमध्ये प्राण्यांवर प्रयोग झाले.

५) या फोनलहरी कर्करोगकारक (carcinogenic) आहेत की कर्करोगसहाय्यक (cocarcinogenic) या बाबतीत संशोधकांमध्ये खूप मतभेद आहेत. दोन्ही गट आपापल्या मतावर ठाम आहेत. अगदी आस्तिक व नास्तिक याप्रमाणे !

६) मोबाईलच्या शोधापूर्वी कर्करोग होण्याची जी कारणे प्रस्थापित झाली आहेत त्यामध्ये जनुकीय बदल (mutations) व अनेक प्रकारच्या रसायनांशी जवळचा व दीर्घकालीन संपर्क आणि विविध प्रकारची रेडीएशन ही महत्वाची आहेत. तंबाकूचे सेवन हे त्यापैकी एक उदाहरण.

७) त्यामुळे, शरीरात अयोग्य जनुकीय बदल झालेल्या एखादा माणूस जर दीर्घकाळ तंबाकूचे सेवन करीत असेल( किंवा अन्य रेडीएशन च्या संपर्कात असेल) आणि जोडीला त्याला मोबाईलचेही व्यसन जडले असेल तर त्याला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे यावर बऱ्याच संशोधकांचे एकमत दिसते.

८) ‘मोबाईल मुळे कर्करोग होतो’ या विधानापेक्षा ‘ शरीरात अगोदरच असलेली कर्करोगपूरक परिस्थिती मोबाईलमुळे अधिक रोगपूरक होते’ हे विधान अधिक मान्य होण्यासारखे आहे.

९) असे संशोधन प्राण्यांपेक्षा अधिकाधिक प्रमाणात थेट माणसांवर होणे आवश्यक आहे. परंतु, सध्या त्याला एका कारणाने मर्यादा येत आहेत.

संशोधन करताना माणसांचे २ गट करावे लागतात. एक गट अति मोबाइलचा वापर करणाऱ्यांचा तर दुसरा अजिबात मोबाईल न वापरणाऱ्यांचा. आता बघा, पहिला गट मिळणे अगदी सोपे आहे कारण सध्या ‘मोबाईल-अतिरेकी’ अगदी पोत्याने सापडतील. पण, अजिबात मोबाईल न वापरणारी माणसे खरेच दुर्मिळ आहेत ! प्रयोगापुरती तयार करायची म्हटली तरी त्याना दीर्घकाळ ( १०-२० वर्षे !) मोबाईलविना जगावे लागेल.
अहो, माणूस एकवेळ दारू-सिगरेट सोडेल हो, पण मोबाईल, छे काहीतरीच काय !

१०) तेव्हा सध्या एवढे करता येईल की ज्या व्यक्ती कर्करोगजन्य घटकांच्या संपर्कात आहेत (उदा. तंबाकू किंवा अन्य रेडीएशन) आणि मोबाईलचा अतिरेकी वापर करीत आहेत त्यांच्यावर दीर्घकाळ देखरेख व संशोधन करावे लागेल कारण गाठी तयार करणाऱ्या कर्करोगाची (solid tumors) वाढ ही संथ असते.

तर वाचकहो, अशी आहे ‘मोबाईल व कर्करोग’ या वादग्रस्त गृहीतकाबाबतची आजची परिस्थिती. समाजात यावर मतांतरे असणारच. शास्त्रीय वादविवादही झडत राहणार. कुठलाही ठोस निष्कर्ष काढणे सोपे नसणार. पण, मोबाईलचे व्यसन लागू न देता त्याचा मर्यादित वापर करणे आपल्या सगळ्यांच्याच हिताचे आहे यात शंका नाही.
********************************************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@कुमार१, लेख एकदम व्यवस्थित आणि माहितीपूर्ण लिहिलाय. प्रथम त्याबद्दल तुमचे अभिनंदन!!! मोबाइल फोनमुळे कर्करोग होतो कि नाही ह्या वादात आपण न पडता आणि<<<मोबाईलचे व्यसन लागू न देता त्याचा मर्यादित वापर करणे आपल्या सगळ्यांच्याच हिताचे आहे >>> हा जो उपाय आपण सुचवलाय, तो मनापासून पटला. पण मर्यादित वापर म्हणजे वैज्ञानिक दृष्टया किती आणि कसा ह्यावरही अधिक माहिती हवी होती. कृपया त्याबद्दलहि लिहावे.

सचिन, धन्यवाद.
मर्यादित वापर म्हणजे वैज्ञानिक दृष्टया किती >> हा प्रश्न अपेक्षित होता ! त्यासाठी मला जरा अधिक वाचावे लागेल. आतापर्यन्त च्या सन्दर्भात सापडले नाही. थोडेसे तारतम्य आपण आपलेच ठरवूयात . आप्ल्या फोनचा वापर बोलण्यापेक्षा संदेशासाठी अधिक वापरणे, करमणूक म्हणून कमी वापरणे, सुटीच्या दिवशी 'स्वीच ऑफ' करणे इ. उपाय मला सुचतात व मी ते करतो. मी अजून 'स्मार्ट फोन' च्या नादी लागलेलो नाही, अर्थात हे सर्वांना जमणार नाही याची कल्पना आहे.
जेवढे फोन 'स्थिरभाष (landline) वरून शक्य अस्तील तेवढे करावेत. रात्री ९ ते सकाळी ७ BSNL landline दणकून वापराकी , चकटफू आहे सरकारच्या कृपेने !

प्रत्येक मोबाईलची SAR value दिलेली असते.बहुतांश मोबाइल कंपणी या मर्यादा पाळतात ,त्यामुळे धोका कमी होतो.पुर्णपणे नाहीसा होतो की नाही माहीत नाही.
माझं निरीक्षण असे आहे की मोबाईलच्या विस्तृत वापराला आता १५ वर्ष होऊन गेली,जर खरचं कर्करोग होत असता तर कर्करोगाच्या केसेसमध्ये प्रचंड वाढ झाली असती ,पण तसे होताना दिसत नाही.

@कुमार१, अधिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपण सांगितलेले उपाय नक्कीच करून पाहण्याजोगे आहेत.

अवांतर: @ प्रकाश घाटपांडे, मायक्रोव्हेवच्या वापरामुळे असे काहीतरी होते हेही मी ऐकले आहे>> हो! हो!! मी हि वाचले होते. म्हणून मायक्रोवेव्ह न घेता हट्टाने बजाज OTG (ओव्हन) घेतला आणि नवीन जमान्याबरोबर न राहिल्याने घरच्यांचा रोष ओढवून घेतलाय. Rofl

गेल्या २० वर्षात आपला टीव्ही, संगणक आणि मोबाइल यांचा वापर खूप वाढला. त्यातून जे 'प्रदूषण' होते त्याला आता वैज्ञानिकानी "electropollution" असे नाव दिले आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम हे संवेदनशील व्यक्तींमध्ये होउ शकतात. त्यामध्ये २ प्रमुख आजारांचा समावेश आहे:
१. आपली आकलनशक्ती (cognition) कमी होणे आणि
२. अल्झायमर आजार
भविष्यात या संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडेल.

जसे आपण गणितात eqation सोडवत तसे तंबाखू दारू , मोबाईल, एक्स ray कसे dna मध्ये बिघाड करतात स्टेप wise सांगा

रोगकारक घटक आणि कर्करोगाची कारणमीमांसा:

कर्करोगकारक घटक आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. त्या घटकाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो
(multifactorial disease)

महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना करणारे आणि ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखक मिलिंद बेंबळकर यांचं ‘5G वायरलेस तंत्रज्ञान - दुष्परिणाम आणि उपाय’ हे नवं पुस्तक लवकरच ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे.
या पुस्तकातील दोन प्रकरणांचा हा संपादित अंश इथे:

https://www.aksharnama.com/client/article_detail/5688