दरवाजा [ पूर्ण ]

Submitted by अविनाश जोशी on 30 October, 2017 - 10:21

दरवाजा [ पूर्ण ]
शेवटचा भाग २७ नंतर वाचावा
-१-
समीर. वय २x.
समीर पटेल हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते.
लहानपणीच आईवडिलांचा इस्ट आफ्रिकेत अपघाती मृत्यु झाल्यामुळे समीर मुंबईत काकांकडेच वाढला होता.
त्याचे काका म्हणजे मुंबई शेअरबाजार आणी मेटलंमार्केट मधे एक मोठे प्रस्थ होते. लग्नाशिवायच होते आणी समीरचे पालन त्यांनी मुलासारखे केले होते.
मलबारहील वर बंगला असल्याने उच्च्भ्रु आणी उच्चपदस्थ लोकात उठबस होत
पुणे, अलीबाग, सुरत अशा प्रॉपर्टीज होत्या. बऱ्याच कंपन्यात गुंतवणूक होती.

समीर तर हीरोच होता. गोरापान आणी राजबींडा तर होताच पण त्याचे डोके अफ़लातुन होते. IIT मधुन बी टेक झाल्यावर त्याने लॉ ची डिग्री पण घेतली होती.
काका गेल्यावर प्रॉपर्टी संभाळणे, फास्ट गाड्या व मोटरबाईकस फीरवणे आणी उचापती करणे एवढाच त्याचा उद्योग होता. मेंदुला झीणझीण्या आणणारी कोडी त्याला फार आवडत. बरेच अवघड आणी नाजुक प्रसंग त्याने सोडवले होते.
पोरींच्या बाबतीत तो एकदम विरुद्ध होता. म्हणजे पोरी त्याच्याभोवती फीरायच्या पण हा त्यांना कटवायचा.

कुणाल कोहली.
खबर वर्तमानपत्र व चैनेलचा वार्ताहर. सुंदर पण अघळ पघळ, अफाट मित्रमंडळ.
बोगोर बुदूर केस नंतर एकदम फेमस.
समीर बद्दल आदर आणि प्रेमही. त्याच्या व्यवसायामुळे त्याचे भरपूर फिरणे होत असे आणि गावागावातून दोस्त बनत असत. काही घडले की कुणालला निमंत्रण यायचे. बहुतेक वेळेला समारंभ बातमी करता फार जवळची ओळख नसली तर तो टाळायचा.
समीरकडे जायला आणि आळसात वेळ घालवायला त्याला फार आवडायचे. दोघेही मलबार हिल वर राहायचे. कुणाल दर्यासारंग नावाच्या बिल्डिंगमध्ये तर समीरचा जवळच लालमहाल हा आलिशान बंगला होता.
समीरच्या बंगल्यावर लोक खुष असत. दोन अवाढव्य जर्मन शेफर्ड्स, स्वीमींग पुल, मोठी बाग आणी खायचे लाड पुरवणारा तानाजी. पिकनीकला आल्यासारखेच वाटायचे. अर्थात बंगल्यात प्रवेश मर्यादित लोकांनाच होता. त्यात एक कुणालचेही नाव होते.

अशाच एका आळसलेल्या सकाळी दोघेही लॉनवर समुद्राकडे टक लावून रिक्लायनरवर बसले होते. जोडीला तानाजीची वाफाळलेली कॉफी आणि स्विस ऑम्लेट असा भरभक्कम मेनू होता. दोघेजणही शांत होते. बोलण्यापेक्षा शांततेतच वेळ घालवत होते.
अचानक कुणालचा मोबाईल वाजला. फोन वर नाव बघून कुणालने बंद केला.
दोन मिनिटांतच परत तोच फोन आला. कुणालने परत बंद केला.
"कुणाल फोन घे तरी किंवा स्विच ऑफ कर " समीर
"अरे वार्ताहराला फोन स्विच ऑफ करून चालत नाही. आणि तो नंबरही ओळखीचा नव्हता. "
"आणि न घेतलेला चालतो?.
"बरं घेतो आता आला तर "
दोघांनाही कल्पना नव्हती कीफोनमुळे ते कशात गुंतणार आहेत.
परत दोन मिनिटांत त्याच नंबर वरून फोन आला ..

-२-

कुणालने फोन उचलला
"हैलो "
"कोण कुणाल का?"
"बोलतोय"
"मी रमेश बोलतोय. रमेश शेटे,"
"माझ्या लक्षात नाही आले"
“खबर मध्ये काम करणाऱ्या मोनाचा मी मावसभाऊ"
“मग?"
"तिनेच मला तुमचा नंबर दिला"
"का?"
"मी फार अडचणीत आहे हो”
“पैसे हवेत का? “
“नाही नाही. तुम्ही प्लीज इकडे याला का?”
“हे बघ रमेश, मला काहीही कळले नाही . जरा नीट आणि सविस्तर सांगाल का?”
“मी रमेश शेटे. कणकवलीला माझा हॉटेल व्यवसाय आहे. खरेदी करण्याकरिता मी आसपासच्या गावातून फिरत असतो. कुडाळला माझे मामा असतात.”
“तू आता मला तुझी सगळी वंशावळ सांगणार आहेस का?”
“नाही या मामांबद्दलच मला सांगायचे आहे आणि त्याकरताच तुमची मदत मला हवी आहे”
“अरे मी तर वार्ताहर मी कसली मदत करणार?”
“तुम्हालाही बातमीसाठी खाद्यमिळणारी गोष्ट आहे”
“काय ?”
“बातमी अशी आहे कीयेथून लोक बेपत्ता होत आहेत. गेल्याच महिन्यात येथून ७ ते १० लोक नाहीशी झाली आणि कालपासून माझा मामेभाऊ सुहास हि बेपत्ता आहे”
“हे बघ रमेश कोणत्याही पुराव्याशिवाय मी बातमी देऊ शकत नाही , आणि मी काय मदत करणार ? तुला पोलिसांकडे जायला हवं”
“पोलीसपण काही मदत करत नाहीत फारतर ते प्राथमिक अहवाल लिहून घेतात आणि थांबतात त्याचे कारण म्हणजे येथील भॊगोलिक परिस्थिती
स्पीकरवर फोन असल्यामुळे समीर हि सर्व ऐकत होता तो म्हणाला”
“रमेश तू गोंधळून गेलेला आहेस. मी समीर. कुणालचा मित्र. तू जरा पहिल्यापासून व्यवस्थित सांगशील?”
“मामा मूळचे झाराप या गावाचे तिथे त्यांची शेती वाडी व घराण्यात चालत आलेला मोठा जुना गढीसारखा वाडा आहे. त्यांचे पूर्वज शिवकालीन सरदार होते. अफाट शेती, गडी माणसं असा मोठा राबता होता.”
“मग कुडाळचे काय ?”
“मुलं मोठी झाल्यावर ती शहरात येऊन पांगली आणि त्यानंतर ते कुडाळला स्थायिक झाले. झाराप गाव येथून अर्ध्या तासाच्या अंतरावर असल्यामुळे जाणेयेणेही सोयीचे होते. त्यात झाराप हे कोकण रेल्वेचे स्टेशन असल्यामुळे माल मुंबईला पाठवणे सोयीस्कर होते “
“ते कुडाळला एकटेच राहत होते का? “
“हो. त्यांचा एक जुना गडी तुका हा त्यांच्याबरोबर राहतो आणि त्यांचीच एक बालविधवा बहीण मंदा घराची देखभाल करते . दोघेही त्यांच्याबरोबर झाराप पासून आहेत”
“मग हा सुहास कुठून मध्येच उपटला.?”
“तो मुंबईला नोकरीला होता त्याची अचानक नोकरी गेली त्यामुळे तो एकटाच मुंबईत राहत होता आणि त्याची बायको आणि मुलगा काही दिवसांकरिता कुडाळला आले होते. त्याला दुसरी नोकरी पालघरला लागणार होती त्यामुळे त्याने स्वतःचे राहण्याचे ठिकाणही पालघरला हलवायचे ठरविले “
“ मग काय झाले ?”
“ नशीब त्याच. पालघरला निघालेली बायको आणि मुलगा , जी बस पूल तुटून सावित्री नदीत पडली त्यात होते. त्यांची प्रेते सुद्धा हाताला लागली नाहीत.”
“अरेरे !
“सुहास सर्व सोडून कुडाळला आला होता. त्याने बायको आणि मुलाला शोधण्याकरिता जंग जंग पछाडले पण काही उपयोग झाला नाही”
“मग त्याला वेडच लागले असेल ?”
“हो ना तो भ्रमिष्ठासारखा वागायला लागला. सहा महिने असेच गेले देवदेवळे उपासतापास व्रतवैकल्ये सर्वकाही त्याने केले. शेवटी त्याने झारापच्या वाड्यात जायचे ठरविले.”
“एकटाच?”
“हो घरातल्या सर्वानी त्याला बरेच समजाविले पण तो कोणाचे ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता.”

“मग काय झाले? “
“सहा महिन्यापूर्वी वाड्याची तात्पुरती साफसफाई करून तो राहायला गेला. तीन चार महिने शांततेत गेले मग हळूहळू अफवा पसरू लागल्या. “
“कसल्या?”
“हळूहळू गडी माणसं बेपत्ता होऊ लागली. त्यांच्या बेपत्ता होण्यास घरगुती किंवा आर्थिक करणे नव्हती आणि मग एकेदिवशी महिन्याभरापूर्वी सर्व गडी काम सोडून निघून गेले.”
“मग सुहास परत आला का?”
“नाही. छोटे मालक तर आनंदात दिसत होते”
“आनंदी राहण्याचे कारण
“काही कल्पना नाही पण त्यानंतर गावातील माणसं बेपत्ता होऊ लागली.”
“अरे बापरे !”
“गाव तस छोटं त्यामुळे अफवा पसरायला वेळ लागला नाही. “ गावाच्या मताने ते बेपत्ता होणे छोट्या मालकांमुळेच होत होते. आणि आता तीन दिवसापूर्वी सुहास मालक हि बेपत्ता झाले.
“मग काही शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही ?”
“केले ना. पोलीस कंप्लेंट केली आम्ही तिघांनी जाऊन गढीवर शोधला. ते एकटेच राहत असल्यामुळे बराचसा भाग बंदच होता. त्यांचे सर्व कपडे वस्तूही जागच्या जागीच होते. हे प्रकरण आमच्या आकलनाबाहेर गेले आहे म्हणून तुम्हाला फोन केला
“अरे मी तर वार्ताहर आहे”
“रमेश, मी समीर बोलतोय मी कुणालबरोबर आलो तर चालेल का?“
“पण आपण कोण ?”
“अरे रमेश माझ्या बरोबर समीर आला तर निश्चितच या कोड्याचा उलगडा होईल. तुला थोड्यावेळाने फोन करून कार्यक्रम कळवतो.”
“असे म्हणून कुणाल ने फोन बंद केला”

-३-
समीरच्या चेहऱ्यावर आळस जाऊन पूर्ण उत्साह पसरला होता. बऱ्याच दिवसांनी त्याच्या योग्य काही कामगिरी मिळेल याची खात्री होती. त्याच्या बऱ्याचशा भानगडी व उचापती अशा छोट्या गोष्टीतच सुरु झाल्या होत्या आणि प्रत्येक गोष्टीतच त्याच्या बॅंकबॅलन्स वाढत होता.
“अरे कुणाल, कुडाळ हे गोव्याजवळच आहे”
“मग तुझा काय विचार आहे ?”
“सोप्पं आहे आपण विमानाने गोव्याला जाऊ. एअरपोर्ट वरच एखाद्या महिन्याकरिता कार ठरवू किंवा रमेश ला एखादी स्थानिक कार अरेन्ज करायला सांगू.”
“तानाजीला बोलावूकी”
“नको लोकल गाडी असली कीलोकांना संशय येत नाही आणि बातम्या काढणे ही सोपे होऊन जाते.”
“हो आणि त्याला तिथले रस्ते ही माहित असतात.”
“चल मग वेळ न घालवता संद्याकाळच्या फ्लाईटच बुकिंग कर. तुझे म्हणणेही बरोबर आहे आपण तानाजीलाही बरोबर घेऊ.”
“म्हणजे तीन बुकिंग करायची का? “
“हो तुझे सामान आवरून तू इकडे ये आपण एअरपोर्टला जाऊ.“
“बरं पण संध्याकाळी का ? दुपारच्या फ्लाईट चे का नको?”
“अरे मला तयारी करायला वेळ लागेल आणि शक्यतो आपण तिघे जातोय हे लोकांना न कळलेले बरे “
“ठीक आहे.”
“कुणालने तेथूनच समीर, तानाजी आणि स्वतःचे बुकिंग केले.”
जेट एअरवे चे विमान संध्याकाळी ७ वाजता होते त्यामुळे ते दाबोलीमला आठ साडेआठ पर्यंत पोहचले असते. तिथून कुडाळ अंदाजे पंचाहत्तर किलोमीटर वर आहे त्यामुळे चांगला ड्राइव्हर असेल तर ते दहा पर्यंत रमेशकडे पोहचले असते.
एका दृष्टीने कुणाच्या नकळत रमेश च्या मामाकडे जायला ती सोयीस्कर वेळ होती.
बुकिंग झालयावर त्यांनी रमेशला फ्लाईट नंबर कळविला आणि साडेआठला गाडी एअरपोर्टला पाठवायला सांगितले. शक्यतो मामाची गाडी नको असे समीर ने त्यांना सांगायला सांगितले. कारण सरळ होते. ती गाडी ओळखीची असल्यामुळे लोक तोंड उघडणार नाहीत.
रमेशच्या ओळखीचे बरेच टुरिस्ट ऑपरेटर्स होते त्यामुळे त्याने कणकवलीच्या हॉटेलमध्ये फोन करून गाडी पाठवायला सांगितले.
त्यानंतर त्याने कुणालला फोन केला
“कुणाल दाबोलिंम एअरपोर्टला साडेआठ वाजता बीएमडब्लू किंवा मर्सडीज तयार असेल "रमेश
“अरे एवढ्या महागड्या गाड्या कशाला” कुणाल
“अरे कुणाल येथे या सामान्य गाड्या आहेत बहुतेक टॅक्सी इंपोर्टेड असतात” रमेश
“ठीक आहे तुझी मर्जी” कुणाल
“आणि हे बघ कुणाल मी स्वतःच एअरपोर्टवर तुम्हाला घ्यायला येईन” रमेश
“अरे तू कशाला त्रास घेतोयस” कुणाल
“अरे आपल्याला एअरपोर्ट ते कुडाळ जाईपर्यंत दीड दोन तास सविस्तर बोलता येईल कीजे मामाच्या घरी बोलणे अवघड जाईल.” रमेश
फोन झाल्यावर समीर ला सांगून तो दर्यासारंग मध्ये गेला. फ्रेश होऊन आटपेपर्यंत तीन वाजलेच होते. समीरकडे तो चार वाजता पोहचला. त्याची स्वतःची एक कॅरीबॅगच होती. पण समीरच्या अवाढव्य बॅगा, सॅक असे सामान बघून ती हादरलाच. समीर अरे एवढे सामान ?” कुणाल
अरे किती दिवस राहायला लागेल याचा भरवसा नाही आणि कोणकोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल याचाही भरवसा नाही त्यामुळे सर्व तयारीनिशी गेलेले बरे आणि खर सांगायचं तर एवढं तरी सामान पुरणार आहे कीनाही याबद्दल शंकाच आहे” समीर
अरे तुला काय वाटते आहे ?” कुणाल
“एखादा माणूस बेपत्ता होणे किंवा दोन तीन दिवस न सापडणे हे समजू शकतो पण एकाच गावातील पंधरा वीस माणसे बेपत्ता होणे, दोन तीन महिन्यानंतर ही त्यांचा तपास न लागने किंवा त्यांची प्रेते हि न सापडणे हे सर्व संशयास्पद आहे” समीर
“तुझा काय अंदाज आहे ? कुणाल”
“कुणाल मी वस्तुस्थिती पाहिल्याशिवाय कसलेच अंदाज बांधत नाही. तेथे गेल्यावर परिस्थिती पाहू आणि मग ठरवू. तिथे जाईपर्यंत हा विषय बंद.
“दोघेही सांताक्रूझ टर्मिनल २ ला गेले. नशिबानी विमान वेळेवर होते.
“विमान सुरूहोताच समीर झोपी गेला. मिळेल तेव्हा विश्रांती घेणे आणि हवे तेव्हा तीन तीन दिवस जागणे हे त्याच्या हातात होते त्याची झोप हुकमी होती.

-४-

विमान वेळेवर दाबोलिंमला पोहोचले सामानाचा थोडाफार गोंधळ सोडल्यास सर्व व्यवस्थित होते.
रमेश बाहेर कुणाल कोहली अशी पाटी घेऊन उभाच होता त्यांन एक मोठी लँडरोव्हरआणली होती. गाडी पाहून समीर खुश झाला.
गाडीत तानाजीने सामान टाकले आणि ड्राइव्हर शेजारी जाऊन बसला. गाडी लंडन टॅक्सी सारखी दोन कंपार्टमेंटमध्ये होती.
मागच्या कम्पार्टमेन्टमध्ये समोरा समोर सीट्स होत्या. ड्राइव्हर कम्पार्टमेन्ट आणि पॅसेंजर कम्पार्टमेन्ट मध्ये एक सरकणारी काच होती त्यामुळे मागचे संभाषण ड्रायव्हरला ऐकू जाणे शक्यच नव्हते . गाडीत छोटा फ्रीज, बार आणि ओव्हन सुद्धा होता. तिघे गाडीत बसल्यावर रमेशने माईकवरून ड्रायव्हरला पत्ता सांगितला.
“बर तुम्ही दोघे काही थोडेफार खाणार आहात का??” रमेश
“काहीतरी थोडेसेच दे” कुणाल
“मी तुच्यासाठी सावंतवाडीवरून खास पफ आणि पेस्ट्री आणल्या आहेत” रमेश
“अरे मलबार हिलवर राहणाऱ्या लोकांना सावंतवाडीच्या पदार्थाचे काय कौतुक” कुणाल
“सावंतवाडीत तीन हजारहून जास्त बेकरी आहेत आणि इतकी व्हरायटी कुठेच सापडणार नाही. पूर्वीपासूनच गोवा हे त्याचे मुख्य विक्री केंद्र आहे.” समीर
“पफ आणि पेस्ट्री चा समाचार घेतल्यानंतर खास अरेबियन कॉफी चे मग्स घेऊन तिघांनी बोलायला सुरवात केली.
“रमेश काय भानगड आहे ते सांगशील का ?” कुणाल
कुणाल अरे मामांचे सुखी कुटुंब होते
“मामा -मामी दोन मुलं सुहास आणि सुभाष आणि एक मुलगी सुरेखा. मामांची बिचारी बहीण काही कळायच्या आताच विधवा झाली आणि ती मामांकडे राहत होती. माझी आई ही दुसरी बहीण. प्रशस्त घर, नारळ, पोफळी, आंबा, आणि काजूच्या बागा. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं हे कुटूंब” रमेश
“मग ?” समीर
“मुलं हळूहळू मोठी होत होती. शिक्षणाची सोय सावंतवाडीला चांगलीच आहे. तिन्ही मुलं हुशार होती आणि अभ्यासात, खेळात नेहमीच पुढे असायची. सुभाष इंजिनियर करण्यासाठी पुण्याला गेला तर सुरेखा मेडिकल करिता गोव्याला गेली. सुहास सगळ्यात लहान त्यामुळे शिक्षणाकरिता बाहेर पाठवायला घरच्यांचे मन तयार नव्हते.
सावंतवाडीवरूनच त्याने बी. एस सी. केलं आणि वेंगुर्ल्याहून एम. एस. सी. ऍग्रो केलं. त्याला संशोधनाची प्रचंड आवड होती. कुठलेही कुतूहल त्याला स्वस्थ बसू द्यायचे नाही.” रमेश
“आत्ता पर्यंततर सगळे व्यवस्थित दिसतंय मग फाटाफूट कशी झाली?” समीर
“त्याच्या तीन वेगवेगळ्या कथा आहेत. सुभाष बी.ई झाल्यानंतर अमेरिकेला निघून गेला तो कायमचाच. त्याला शेती-वाडी मध्ये काहीही रुची नव्हती. सुरेखा एम. बी. बी. एस. झाल्यानंतर तिने मुंबईत एम. डी. केलं आणि तिथल्याच एका डॉक्टर बरोबर लग्नही केलं. तिला दोन गोंडस मुलं आहेत व अधून मधून ती चक्कर टाकते. “ रमेश
“सुहासच काय झालं ?” समीर
“त्याची कथा वेगळीच आहे. एम एस सी केल्यानंतर त्याला शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे होते त्याकरिता तो नैनिताल ला गेला. त्याच्या सांगण्याप्रमाणे फक्त नैनिताल मध्येच ऍग्रीकल्चर इंजिनियर चे शिक्षण मिळत होते. दोन तीन वर्ष नैनिताल मध्येच तो राहिला. इकडे मामींचे निधन झाले आणि त्यामुळे मामा एकटेच पडले. एवढ्या मोठ्या गढीतल्या खोल्या कित्येक वर्ष बंदच होत्या त्यात आणखी काही खोल्यांची भर पडली.
शेवटी मामांनी कुडाळला एक छोटासा बंगला बांधला आणि मंदा मावशीसोबत ते तिकडे राहायला गेले.” रमेश
“अरे मग वाडीचे काय ?” समीर
वाडीबद्दल अनेक लोकांनी त्यांना विकण्याची गळ घातली. भरपूर पैशाचे अमिष दाखविले पण मामाची आशा होती कीसुहास परत येऊन त्या सगळ्याची व्यवस्था बघेल.” रमेश
“पण तो येईपर्यंत काय ? "समीर
“एकतर दोन तीन वर्षांचाच प्रश्न होता आणि सर्व गडीमाणस विश्वासू होती. पाच ते दहा टक्के चोऱ्या व्हायच्या पण नव्वद टक्के तरी हाती लागायचं. त्यातून मामांची दिवसाआड चक्कर असायचीच त्यामुळे गडी पण दबून होते.
“पण मग सुहास केंव्हा परत आला?? “समीर
“सुहास दोन तीन वर्षांनी परत आला पण आला तो बायकोला घेऊनच. ती मुलगी नैनिताललाच शिकायला होती आणि डेहराडून ची होती. तिचे वडील सैन्यात मोठे अधिकारी होते आणि एकूलती एकच होती. साहजिकच ती अत्यंत लाडात वाढलेली होती.” रमेश
“तिच्या घरच्यांचा काही विरोध झाला नाही का ?” समीर
“नाही कारण विरोध करायला घरी कोणीच नव्हते. आई वडील एका अपघातात गेले आणि ती काकांकडे राहत होती.” रमेश
“मामांची काय प्रतिक्रिया ??” समीर
“मामानी अत्यंत समंजसपणे घेतले. नवीन सुनेचे स्वागत केले आणि आठ दहा दिवसातच सुहास ने आणि त्याच्या बायकोने झाराप च्या घरात प्रवेश केला. घर परत एकदा गजबजले.” रमेश
“पण सुहास तर मुंबईत होता ना ?” समीर
“झाराप ला गेल्यावर तीन चार महिने ठीक गेले पण नंतर शहरी वातावरणात वाढलेली सुहासिनी म्हणजे सुहासची बायको तिच्या शेतीबद्द्लच्या कल्पनेत भरमसाठ पाऊस, वेळीअवेळी कुठेही निघणारे साप, विंचू, घिरट्या घालणारा बिबट्या अशा कशाचाच समावेश नव्हता त्यामुळे ती नेहमी दुखी राहू लागली. शेवटी मामांनी सुहासला सांगितले कीत्याने वाडीचा विचार सोडून द्यावा आणि तिला हवी असेल ती नोकरी पत्करावी.” रमेश
“त्याचवेळी नवी मुंबईत एक अत्याधुनिक शेतीचा प्रकल्प उभा राहत होता आणि अशा प्रकारची शेती भारतात प्रथमच होत होती. साहजिकच सुहासने अर्ज पाठिवला त्याची ताबडतोब निवड झाली. कंपनीने त्याला खारघरला राहायला प्रशस्त फ्लॅट दिला.” रमेश
“शेतीचा प्रकल्प म्हणजे काय? “कुणाल
“मलाही काही कल्पना नाही पण सुहास जे सांगत असे त्यावरून हि शेती व्हर्टिकल फार्मिंग टाईप होती आणि त्यात जमिनीशिवाय पिके निघत होती. सुहास ला फारच आवडलेला प्रोजेक्ट होता. त्यातच त्याच्या मुलाचा जन्म झाला त्यामुळे ते त्रिकोणी कुटुंब फारच सुखी होते. अधून -मधून मामा तिकडे जायचे किंवा सुट्टी घेऊन ती तिघे इकडे यायचे. एक दिवस अचानक ती जागा नव्या होणाऱ्या एअरपोर्ट साठी संरक्षित झाली आणि कारखाना बंद झाला. सुहासने बायको आणि मुलाला काही दिवसांकरिता कुडाळला पाठविले आणि तो नवीन नोकरीच्या शोधकार्यास मुंबईतच राहिला. मुंबईचा प्लॅट हि त्याला आता कंपनीला परत द्यायचा होता. आता कंपनीचं बंद झाली होती त्यामुळे तो चांगल्याच पेचात सापडला होता.” रमेश
“मग त्याने सरळ कुडाळ ला किंवा झाराप ला जायचे ?
“त्यात मुख्य अडचण बायकोची होती कुठल्याही परिस्थितीत तिची खेडवळ गावात राहायची तयारी नव्हती.” रमेश
“मग हे कोडे कसे सुटले ??” समीर
“एक दिवशी सकाळीच कंपनीच्या संचालकांचा फोन आला.
“सर मी नोकरी शोधतो आहेच आणि प्लॅट हि दोन तीन दिवसात परत करेन.
“सुहास नोकरी शोधत बसूच नकोस आम्ही हा प्लांट उचलून पालघर ला नेतोय त्यामुळे तू पालघरला यावे अशी आमची इच्छा आहे.”संचालक
“सुहासच्या मनात एकच होत कीबायको पालघरलाही खेड म्हणाली तर काय करायचं?
“आणि हे बघ सुहास पालघरला तुला आम्ही कारखान्याजवळच एक प्रशस्त बंगला देत आहोत आणि फॅक्टरी इथून हलेपर्यंत पुढचे दोन तीन महिने आत्ताचा प्लॅटही तुझ्याकडेच राहुदेत.” संचालक
“कंपनीला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता एवढे आवडते काम व सोयी त्याला दुसरीकडे मिळणे कठीण होते. त्याच रात्री त्याने बायकोला फोन करून ही बातमी सांगितली आणि ताबडतोब मुंबईला येणास सांगितले.” रमेश
“ठीक आहे. असं झाल तर “समीर
“आपण नंतर बोलूया. मामांचा बंगला आला.

-५-
मामांचा बंगला छोटा पण टुमदार व अत्याधुनिक होता. गाडी बंगल्याच्या पोर्चमध्ये गेल्यावर मामा स्वतःच स्वागतासाठी बाहेर आले. रमेशने यांचे सर्व सामान दोन खोल्यात लावायला सांगून तानाजी व ड्रायव्हरला आउटहाऊस मध्ये राहायला व अगोदर जेवायला सांगितले.
“रमेश हे कोण पाहुणे म्हणायचे ? "मामा
“मामा, हा कुणाल आपल्या मोनाच्या ऑफिस मध्ये वार्ताहर आहे. घरचा गडगंज श्रीमंत आहे. मलबार हिल ला राहतो” रमेश
“आणि हे दुसरे कोण?” मामा
“हे कुणालचे मित्र समीर आणि तो त्यांचा नोकर तानाजी. त्यांच्याबद्दलची माहिती कुणाल च सांगू शकेल.” रमेश”

मी कुणाल चा मित्र समीर पटेल. एका प्रकरणात माझी आणि कुणालची ओळख झाली आणि मैत्रीही झाली. तानाजी हा माझा नोकर नाही तर जीवास जीव देणारा मित्र आहे.” समीर
“मामा समीरने सांगितलेले खरे आहे पण सर्व खरे नाही याचा मलबार हिलवार आलिशान बांगला आहे. संपत्ती म्हणाल तर अब्जाधीश आहे. शिक्षणानं बी टेक आणि एम बी ए आहे. अतिशय तल्लख बुद्धिमत्ते मुळेअसंख्य कोडी सोडविण्यात आणि गुन्हे उजेडात आणण्यात मुंबई पोलिससुद्धा याची मदत घेतात. रमेशचा फोन आला आणि तोच म्हणाला कीआपण दोघेही जाऊ.” कुणाल
“अरे बापरे ! एवढ्या मोठ्या पाहुण्यांची गरिबांच्या झोपडीत कशी काय सोय लागणार?” मामा
“मामा. घराच्या भिंती, दार, आणि फर्निचर म्ह्नणजे घर नव्हे, त्यातली माणसं म्हणजे घर” समीर
“खर रे पोरा” मामा
“चला मामा आम्ही जरा फ्रेश होतो “कुणाल
“चटकन आवरा आणि जेवायला चला फार उशीर झाला आहे. मी व मंदा तुमच्यासाठी थांबलो आहे. बाकीचं उद्या सकाळी बोलू.” मामा”
“नाही नाही जेवून घेऊ. पण जेवणानंतर या विषयावर बोलायला लागू कारण उद्या सकाळी आम्ही झाराप ला जायचा विचार करतोय.” समीर
“अरे दमलाअसाल प्रवास करून “मामा
“नाही हो विमानाने तर आलो आणि वेळ जेवढा कमी वाया जाईल तेवढे बरे.” समीर
“दोघांनी फ्रेश होऊन जेवण केले. जेवणात छानपैकी ताज्या माशाची करी आणि कालव घातलेल्या बिरड्या होत्या. त्यामुळे समीर खुश होता. जेवणानंतर तिघेही व्हरांड्यात खुर्ची टाकून गप्पा मारायला बसले. बाहेर मोकळी हवा असल्यामुळे गारवा वाटत होता.

-६-
मामा मी यांना थोडक्यात तिन्ही मुलाच्या पुर्व आयुष्याची कल्पना दिली आहे. सुहास ने बायको आणि मुलाला मुंबईला बोलावून घेतले हेही सांगितले आहे. पुढचे तुम्हीच सांगितलर तर बरे होईल.” रमेश
“मी शामराव देसाई, रमेश ने तुम्हाला झाराप आणि मुलांबद्दल तसेच शेतीवाडी बद्दल सांगितले असेलच त्यामुळे ते मी परत सांगत नाही. एकच सांगायचं म्हणजे सुहास जेव्हा झाराप ला एकटाच राहायला गेला तेव्हा आम्ही त्याला चार पाच खोल्या साफ करून दिल्या. वाडा तीनशे वर्षाहून जास्त जुना आहे पण सुस्थितीत राखला आहे. खरं सांगायचं तर सर्व वाडा आम्ही सुद्धा नीट फिरून बघितला नाही. कित्येक खोल्या वर्षनुवर्षे बंदच असतात. पन्नास साठ वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या वेळेला वाडा बऱ्यापैकी उघडला होता. तेव्हा काका होते, वडील होते आणि पाहुण्या रावळ्यांनी वाडा गजबजून गेला होता. त्यावेळी वाड्याच्या बऱ्याच खोल्या उघडून साफ झाल्या होत्या. माझ्या काकांनी कधी लग्नच केले नाही व मरतांना सगळी संपत्ती वडिलांना देऊन टाकली. माझ्या तीन मुलांपैकी सुभाष ने अमेरिकेतच लग्न केलं. सुरेखा ने तर कोर्ट मॅरेज केलं आणि सुहासच लग्न कुडाळला झालं. म्हणजे लग्ननानंतर चे रिसेप्शन झाल. थोडक्यात पन्नास वर्षात तो वाडा पुन्हा गजबजलाच नाही. आठ दहा वर्षांपूर्वी मी कुडाळला राहायला आल्यापासून तर त्याची अवस्था झाली होती. नाही म्हणायला दिवाळीच्या अगोदर साफ-सफाई बरीचशी व्हायची आणि आवश्यक ती डागडुजी व रंगकाम व्हायचे. काकांचा देवावर फार विश्वास होता. ते सतत पूजा-अर्चेत गढलेले असायचे. काका गेल्यावर काही मोठ्या पूजा झाल्याचं मला आठवत नाही.” मामा
“मामा तुम्ही थोडक्यात सर्व चित्र आमच्या डोळ्यासमोर उभे केले “समीर
“पण सुहासने बोलाविलेल्या दिवशी काय झाले ?” कुणाल
“सुहासचा सकाळी साडे दहा ला फोन आला त्याने त्याच्या बायकोआणि मुलाला लगेच येणास सांगितले. तीन चार दिवस पाऊस लागून राहिला होता व घरात बसून सगळेच कंटाळले होते. कोणतीही बस त्यादिवशी जाणार नव्हती. गोव्यावरून बस जातात पण थोडी रिस्क होती. त्यादिवशी नेमकी आवस हि होती. मी सुनेला बरेच समजावून सांगितले पण तिची थांबायची तयारी नव्हती. लग्झरी नाहीतर सावंतवाडीवरून सुटणाऱ्या एस टी बस ने जाईन असं ती म्हणाली. समजावून सांगून काहीच उपयोग नव्हता. मी गड्याला पाठवून एस टी रिझर्वेशन आणले आणि संध्याकाळी मुंबईच्या गाडीत बसविले. घरी आलो तर झोप लागतच नव्हती.
मनात अशुभ शंकांनी घर केल होत. पण पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती.
पहाटे साडेतीनला कधीतरी डोळा लागला आणि जाग आली ती गडी व समोरचा चंदुलाल यांनी हलवल्यामुळेच. चंदुलाल ला पाहताच मंदानं चहा टाकलाच होता चहा पिऊन होताच चंदुलाल मला म्हणाले आपल्याला महाडला निघायला पाहिजे. काय झालं ते सांगायची त्यांची तयारी नव्हती. थोडेसे आवरून मी, चंदुलाल आणि एक नोकर महाडकडे निघालो. महाडला पोहचायला दुपारचे तीन वाजले होते. तुफान पाऊस कोसळत होता. महाडच्या ब्रिज च्या अलीकडेच पोलीसांनी गाडी वळवून दुसऱ्या बाजूने जायला सांगितले. पुलावर व नदीच्या दोन्ही काठावर भरपूर गर्दी जमली होती. सावित्री नदीने रौद्र रूप धारण केले होते. मला वाटले पूर पाहायला लोकं जमली असावीत. भरपूर पोलिसांचाही बंदोबस्त होता. वार्ताहर आणि टीव्हीकॅमेरामनही फिरत होते. पुलाच्या मध्यभागी जाऊन बघितले तर शेजारचा पूल नदीत कोसळला होता. चंदुलाल मला म्हणाले शामराव आपली माणसं ज्या गाडी ने गेली आहेत ती बस नदीत कोसळून वाहून गेली आहेत. मन घट्ट करा. जेथे सर्व नातेवाईक जमली आहेत तेथे जाऊ. माझे मन इतके बधिर झाले होते की माझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता” मामा
चंदुलाल बरोबर मी नातेवाईक जमले होते त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यावर कळले की दोन तीन बस आणि सात आठ गाड्या वाहून गेल्या होत्या. त्या दिवशी ज्या लोकांचे नातेवाईक प्रवास करत होते अशा लोकांचा मोठा समुदाय जमला होता प्रत्येकाला अशा होती की त्यांचे नातलग कुठेतरी सुखरूप असतील आणि सापडतील. पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी त्यांच्या प्रयत्नांची शर्थ करत होते. नदीत पडलेल्या बस व गाड्या यांचा पत्ता लागला नव्हता. नदीचे पाणी इतक्या जोरात वाहत होते की शोध घेणे अवघड होते. संध्याकाळपर्यंत आपत्ती कालीन व्यवस्थापनाच्या तुकड्याही येऊन पोहचल्या, वाऱ्यात, पावसात आणि अंधुक प्रकाशात त्यांनी काम सुरूच ठेवले होते “मामा

“मग सुहास ला केव्हा कळवलं ?” कुणाल
येथे पोहचल्यावरच खरी बातमी कळल्यामुळे त्याला फोन केला. त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे त्याला संध्याकाळीच कळाले. तो तातडीने टॅक्सी घेऊन निघाला आणि पहाटे पाच च्या सुमारास पोहचला. आल्या आल्या आम्हाला पाहताच त्याला रडू कोसळले. त्याचा बायकोवर फार जीव होता. ती अशी जाऊ शकते हि कल्पनाच त्याला सहन होत नव्हती.
-७-
दुसऱ्या दिवशी शोध कार्य पुन्हा सुरु झाले. आत्तापर्यंत एकही प्रेत अथवा जिवंत व्यक्ती सापडली नव्हती. शोध कार्याकरिता नौदल व वायुदलानीही मदत करायला सुरवात केली होती. दुसरा दिवस गेला तरीसुद्धा कुठलाही थांगपत्ता लागला नव्हता. अफवा तर बऱ्याच पसरत होत्या. बस समुद्रात वाहून गेल्या, रत्नागिरीमध्ये काही प्रेते आढळली. महाडच्या एका रिसार्टच्या पाठीमागे प्रेते आढळली अश्या वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. अखेर तिसऱ्या दिवशी दहा प्रेते बाहेर आली. नदीचे पाणीही ओसरू लागले होते त्या दहा मध्ये आमची सुहासिनी नव्हती” मामा
हो आम्हाही त्या सर्व भीषण बातम्या दूरदर्शन वर पाहत होतो” कुणाल
चौथ्या दिवशी आता कोणीही जिवंत असण्याची शक्यता नाही असेच अधिकारी सांगत होते. दोन बस मध्ये तीस - पस्तीस प्रवासी होते त्यात आमच्या घरचेही होते. प्रत्येक प्रेत नदीतून काढल्यानंतर ते आपल्या कोणाचे नाही ना हे पाहण्यासाठी नातेवाईक धावत होते. खाण्यापिण्याची तर कोणालाच शुद्ध नव्हती. आजूबाजूच्या गावातील लोकांनी नातेवाईकांसाठी चहा आणि पुरी भाजीची सोय केली. त्यात कोणताही व्यापारी हेतू नव्हता. कार्यकर्ते लोकांना समजावत होते, धीर देत होते, खायला लावत होते.” मामा
“किती दिवस तुम्ही तेथे थांबला होता??” कुणाल”
“पाच - सहा दिवस. नंतर शोध कार्य पण थांबलं आणि आंम्ही दुखी अंतःकरणांनी कुडाळ ला परतलो. आल्यावर मंदाला सांगताना इतका वेळ थांबवून ठेवलेलं रडू कोसळलं. मंदाला अंदाज आला होता त्यामुळे तिने धीर धरून आम्हाला जेवायला आणि विश्रांती घ्यायला भाग पाडले.” मामा
“फारच विदारक प्रसंग होता” कुणाल
“हो ना आणि तेव्हापासून सुहास च्या जीवनातील स्वारस्य संपलं. तो अबोल राहू लागला त्याला जेवणाखाण्याची शुद्ध नव्हती. आंम्हाला ही काही कळेनासे झाले होते. त्याला कसे समजवावे हे आमच्या बुद्धी पलीकडचे होते. त्याला बोलते करण्याचा बराच प्रयत्न मी आणि कुडाळ मधील त्याच्या मित्रांनी केला पण त्याची मनोवृत्ती बदलायला तयार नव्हती. सतत हसत खेळत राहणारा, भरपूर गप्पा मारणारा सुहास एकदम तुटक वागू लागला होता. सतत शुन्याकडे नजर लावून बसलेला असायचा. “मामा
मग तो झारापला राहायला कसा गेला?” कुणाल
“सुनेचं आणि नातवाच शरीर तर सापडलच नव्हतं. पण धार्मिक विधी केले. त्यावेळेला बरीच मित्रमंडळी आणि वाडीवरची लोक आली होती. त्या सर्वानाच सुहासमधील वागण्याचा फरक कळत होता.

-८-
मामा -
या प्रसंगानंतर माझी उमेदच हरवली होती. मंदा मला सारखी सुहासशी बोलायला सांगत होती. घरात आम्ही तिघेजण पण दिवसभरात एकमेकांशी साधी तीन वाक्ये हि बोलत नव्हतो. एकेदिवशी सुहासच्या संचालकांचा फोन आला. त्यांना अर्थातच सर्व कळाले होते.
“सुहास आहे का ? मी कारखान्याचा संचालक बोलतोय.
“मी सुहासकडे फोन दिला
“सुहास मी कारखान्यातून बोलतोय. आता बांधकामाची बरीच प्रगती झाली आहे. तुमच्यासाठी बंगला पण बघून ठेवला आहे. केव्हा येताय पालघरला? “संचालक
“मी आपला आभारी आहे. पण मला पालघरला येता येईल असे वाटत नाही.” सुहास
“का हो ? काही सोयीसुविधा कमी वाटतात का ?” संचालक
“नाही तसे नाही पण सर्वस्व गेल्यामुळे आता मला कशातच रुची राहिली नाही. क्षमस्व. “सुहास
“ठीक आहे आम्ही अजून महिनाभर वाट पाहू “संचालक
“नाही. नका वाट पाहू. आणि हो खारघरच्या माझ्या फ्लॅट मधील सामान अगदी कपड्या सकट कोणाही गरजू कुटुंबाला देऊन टाका. त्या सगळ्यामध्ये माझ्या फार आठवणी गुंतल्या आहेत. आणि त्या परत पाहणं किंवा वापरणं मला अशक्य आहे.” सुहास
“ठीक आहे तुमची मर्जी.” संचालक
“सुहासने फोन ठेवला आणि परत शून्यात नजर लावण्याचा कार्यक्रम सुरु केला. मी आणि मंदाने संभाषण ऐकले होते. आणि साधारण काय झाले याची कल्पना आली होती. मंदा मला सतत सुहासशी बोलण्याबद्दल खुणावत होती. शेवटी मी ही सुहासशी बोलायचे ठरविले.
“सुहास पालघरला तू जात नाहीस का?
“नाही बाबा” सुहास
“पुढे काय करायचे ठरविले आहेस? दुसऱ्या शहरात नोकरी करणार आहेस का?
“नाही आता माझे कशातच लक्ष लागत नाही. मी अजून काहीच ठरविलं नाही. काही ठरवायला मला वेळ लागेल” सुहास
“सुहास तू वेळ घे पण आत्ता तू तिशीत आहेस. अजून सर्व आयुष्य तुझ्यासमोर आहे. मलाही तुझ्याशिवाय कोणीच उरलेले नाही. सुभाष अमेरिकेला आणि सुरेखा मुंबईत त्यामुळे तू काय करणार आहेस ते ठरवून सांग.
“काही दिवस तसेच गेले.
सुहासच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. देह धर्म म्हणून तो जेवायचा.
खायचा पण ते सुद्धा खायचं म्हणून. पानात कारल्याची भाजी आहे की आमरस आहे याची त्याला शुद्ध नसायची. मंदा त्याला त्याचा आवडीचे पदार्थ खायला घालायची. पण त्याचे लक्षच नव्हते.
अशातच त्याला काकांच्या अध्यात्मिक पुस्तकांचा ठेवा सापडला. आणि त्या ग्रंथाचा अभ्यास करण्यात तो गुंतला. पतंजली योगशास्त्र, रावणसंहिता, योगवशिष्ठ, भृगुसंहिता असे योगावर व भविष्यावर असंख्य ग्रंथ कपाटात होते. काकांचं वाचन दांडग होत. आणि ते सिद्धवाणीचे जोतिषीही गणले जायचे. ते गेल्यावर अर्थातच ग्रंथावर धूळ साठली होती. पण सुहासला ती कपाटं सापडली आणि तो त्याच्यातच हरवून गेला.
सुहासने दुसरे लग्न करावे की काय अशा चर्चा मंदा आणि माझ्यात होत असत. खर म्हणजे त्याला नात्यातल्या मुलीही सांगून यायला सुरवात झाली होती. पण त्याच्याकडे हा विषय कसा काढायचा हे कळत नव्हते.
शेवटी एका सणाच्या दिवशी मंदाने दोन मुलींना जेवायला बोलावलं. स्वंयंपाक ही साग्र संगीत झाला होता. जेवायला आम्ही पाचही जण एकत्रच बसलॊ. मंदा त्या मुलीचे गुणवर्णन करीत होती. पण सुहासच तिच्याकडे लक्षच नव्हतं. दोन्ही मुली सुंदर, सुशिक्षित, व चांगल्या घराण्यातील होत्या. शेवटी मंदा सुहासला म्हणाली” सुहास मी या दोघीना त्यांच्या लहानपणापासून ओळखते. ही डावीकडची लीना म्हणजे खर नाव नलिनी पण सगळे तिला लीना म्हणतात. ती एम. एस. सी. झाली आहे आणि कॉलेज मध्ये शिकवते. आणि ही उजवीकडची नीता तिचेही खरे नाव सुनीता आहे. पण सगळे तिला नीता म्हणतात. ती बी.ई. झाली आहे आणि स्वतःचा व्यवसाय करण्याकडे तिचा कल आहे.” मंदा
“हो का छान छान. आपल्या तालुक्यातील मुलीही शिकतायेत हे छानच आहे.” सुहास
आणि मुख्य म्हणजे दोघीचीही अजून लग्न व्हायची आहेत. सुहास मी काय म्हणतेय हे तुला कळतंय का?” मंदा
“हो हो त्यांची लग्न व्हायची आहेत मग काय त्यांच्या पत्रिका मांडून हव्या आहेत का ?” सुहास वेड पांघरुन म्हणाला.
“मांड मांड त्या दोघींच्या पत्रिका आणि तुझी कोणाशी जुळते का ते बघ. मंदा ही काही कमी नव्हती
“हे बघा नीता आणि लीना तुम्ही सुंदर आहात, सुविद्य आहात पण मला वाटत नाही की मी कधी सुहासिनीला विसरू शकेन त्यामुळे तुम्ही दुसरीकडे वरसंशोधन करा. असे म्हणून सुहास उठून त्याच्या खोलीत गेला. त्याच्या सडेतोड पणामुळे त्या दोन मुली आणि आम्ही दोघेही हादरलो होतो. नीता आणि लीना कश्याबश्या जेवण उरकून गेल्या. मंदा आणि मला पुढे काय वाढून ठेवले आहे हे कळेनासे झाले होते.

-९-
“एक मात्र झाले की त्या दिवसापासून सुहास ला मुली सांगून यायच्या बंद झाल्या.”
अजून काही दिवस गेले आणि एक दिवस वाडीवरचा बजाबा कुडाळला आला. वाडीवर सर्व कळलेच होते आणि प्रत्येकजण आम्हाला कशी मदत करता येईल ते पाहत होता. तो आल्यावर म्हणाला
“ मालक तुम्ही तिघेही झारापला येऊन का राहत नाही. परिसरही बदलेल आणि तिथे दिवसागतीची कामेही बरीच असतात त्यामुळे तुमचा आणि छोट्या मालकांचा वेळ कसा जाईल हे कळणार सुद्धा नाही. आणि छोटे मालक भरपूर शेतीतील शिकून आले आहेत त्यांची प्रयोग करण्याची इच्छाही पूर्ण होईल.” बजाबा
“ कल्पना काही वाईट नाही” मी
सुहास आमच्याकडे लक्ष नाही असे दाखवत होता पण त्याचे कान मात्र आमच्याकडेच लागले होते.
“ काय रे सुहास जायचं का झाराप ला ?” मी
“ जाऊया पण तिघे नाही मी एकटाच” सुहास
“ हे बघा बाबा तुम्ही दोघेही थकलेले आहात. तुमचे वय आता स्वस्थ बसण्याचे आहे. मी अजून तरुण आहे, मानसिक व शारीरिकरित्या सक्षम आहे आणि सर्व गडी माणसं आपलीच आहेत ती तर केव्हाही मदतीला धावून येतील. माझे काहीही हाल होणार नाहीत” सुहास
“ ठीक आहे आपण तिघे झारापला जाऊ. दोन तीन दिवसात तुझी सर्व सोय लावल्यावर आम्ही परत येऊ.”
” ठीक आहे” सुहास

- मामा -
दुसऱ्या दिवशी मी, मंदा आणि सुहास दोन गाड्या घेऊन झारापला निघालो. एक गाडी तिथेच ठेवायचा विचार होता.
आम्ही येणार ही वार्ता वाडीवर कळल्यामुळे पंधरा-वीस गडी माणसं वाड्यावर येऊन साफ- सफाई करू लागली.
बऱ्याच दिवसात कोणाचेच वास्तव्य नसल्याने गढीवर धुळीचे साम्राज्य होते.
गढीच्या दहा - पंधरा खोल्या कायमच्याच बंद होत्या. उरलेल्या सात -आठ खोल्यामध्ये किचन, डायनींग हॉल, दोन मोठे सीटिंग हॉल व बेडरूम अश्या लख्ख स्वछ करून घेतल्या.
त्या दिवशी सकाळी व संध्याकाळी वाडीवरूनच जेवण आलं होत. मंदानं किचनचा ताबा घेतला. सुहासला लागणाऱ्या वस्तूची यादी झाली. फ्रीझ स्वछ करून सुरु केला आणि ड्रायव्हरकडे सामानाची यादी देऊन त्याला कुडाळला सामान आणायला पाठवलं.
गड्याच्या मदतीने शौचालय, न्हाणीघर तपासून सर्व चालू आहे याची खात्री केली.
किचन मध्ये आणि गॅस गिझरला सिलेंडर आहे हे बघितलं. बेड कव्हर्स, सोफा कव्हर्स, बेडशीट सगळं कस लख्ख केलं.
सुहास ला कसलीही कमतरता भासू नये याची आम्ही काळजी घेत होतो. एक -एक सामान आल्यामुळे किचन आणि इतर खोल्या राहण्यायोग्य झाल्या.
वाड्यावरचा फोन चालू करून घेतला. घरकामाकरिता आणि वाड्यातच राहण्यासाठी दोन गड्यांची आणि स्वंयपाक व धुण्याभांड्यासाठी एका बाईची नेमणूक केली. एवढे होऊनही मनात शंका येत होत्या.
माझी फेरी आठवड्यातून एक -दोनदा असणारच होती आणि कुडाळ अर्ध्यातासावरच असल्यामुळे गडीमाणूस कधीही येऊ शकत होता. एक गाडी वाड्यावरच ठेवायची हे आधीपासूनच ठरलं होत. स्टेशनजवळ पेट्रोल पंप ही होता. तसेच नवीन स्टेट बँक ही सुरु झाली होती. त्यात सुहासचे खाते उघडून पैशाची व्यवस्था केली. अडचणीच्या वेळी मी कुडाळवरुन केव्हाही पैसे पाठवू शकत होतो. दोन तीन दिवस थांबून सर्व व्यवस्थित आहे हे पाहून आंम्ही कुडाळला परत निघालो.
“ सुहास अजून कसलीही गरज असेल तर मनमोकळेपणाने सांग” बाबा
“ नाही बाबा जे आहे तेच भरपूर आहे आणि आता मला एकट्यानेच राहायची सवय करायला पाहिजे.” सुहास
“ बरं आम्ही निघतो अजूनकाही लागलं तर फोन कर” बाबा
“ बाबा अजून एक विचारायचे होते. मी लहानपणापासून बघतो आहे बऱ्याच खोल्याना कुलपं आहेत. असे काय आहे की ती बंद ठेवली आहेत.” सुहास
“ खास असं काही कारण नाही पण आता तू बघशीलाच ह्या पाच -सहा खोल्याच नीट ठेवता ठेवता तुला दोन -तीन गडीमाणस पुरणार नाहीत. चाळीस -पन्नास वर्षांपूर्वी आई बाबा होते, तुझे काका तसेच आईच्या माहेरची माणसं ये-जा करत असायचे. मे मध्ये तर घर भरलेलं असायचं. मग हळूहळू सर्व कमी झालं आणि खोल्या बंद झाल्या.” बाबा
“ बाबा मला वाटत आता मला भरपूर वेळ आहे तर एक एक खोली उघडून साफ -सफाई करून घावी म्हणजे माझा ही वेळ जाईल आणि स्वच्छता ही होईल” सुहास
“काहीच हरकत नाही” बाबा
“पण बाबा किल्ल्या कुठे आहेत ?” सुहास
“ तुला शोधाव्याच लागतील. त्या दोन खोल्यातील दहा - बारा कपाट आहेत त्यातल्या एका कपाटात पितळेच्या डब्यात किल्ल्या असतील. प्रत्येक किल्लीच्या मागे कुलुपाचा नंबर चिटकवाला आहे त्यामुळे तुला किल्ल्या शोधाव्या लागणार नाहीत आणि हो त्यापूर्वी सगळ्या कुलुपांना, कड्याना एकदा तेल घालून घे. सगळंच जुन्याकाळच पितळेच असल्यामुळे गंजण्याची शक्यता नाही” बाबा
“ ठीक आहे बाबा तुम्ही निघा” सुहास
सुहास आम्हाला पोचवायला गाडीपर्यंत आला होता. काहीतरी करावे असे त्याला प्रथमच वाटू लागले होते. मी देवाचे आभार मानून तेथून निघालो.

-१०-
-सुहास-
झाराप ला आल्यावर माझ्या मनावरची मरगळ दूर झाली होती.
वाडी वरचा प्रत्येकजण येऊन कामासंबंधी माहिती देत होता आणि काय काय करायचे विचारात होता. त्यामध्ये दिवस कसा गेला हेच कळले नाही.
घरकामासाठी ठेवलेल्या काशीने धुणीभांडी आटोपली होती आणि ती संध्याकाळी परत जेवण करायला आली.
“ अग काशी दोनदा कशाला हेलपाटे मारतेस, संध्याकाळचे जेवण सकाळीच करून ठेवत जा” मी
“ असंकस दादानूं. सायचं काय गारढोण खाणार का? असं काय बी खाऊन तुमची तब्येत खराब झाली तर वरचा बाप्पा आणि कुडाळचाआप्पा दोघही मलाच बोल लावतील. ते काय नाय सकाळ संध्याकाळ तुम्हाला गरम गरम जेवणच वाढणार, सकाळी न्याहारी सुद्धा करून देणार” काशी
काशी मोठी बोलघेवडी होती आणि कोकणातील कुणबी बायका स्वछ आणि चटपटीत असतात. त्यांना भोंगळपणा खपतच नाही. आणि एकूणच जगणं कष्टाचं त्यामुळे कष्ट करायला ही त्या मागे पुढे पाहत नाही.
काशीच्या हातच्या जेवणाला चवही छान होती. त्यामुळे तब्येत खालावण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त होती.
संध्याकाळचे जेवण झाले आणि काशी सगळी कामं उरकून निघून गेली. वाड्यावरचे दोन्ही गडी सर्व खिडक्या दारे लावून घेऊन ओसरीत झोपले. नऊच वाजले होते त्यामुळे मला झोप आली नव्हती.
हॉलमध्ये जाऊन मी टी व्ही पाहत बसलो. अर्थातच कार्यक्रमात माझे लक्ष लागत नव्हते. आणि दिवसभर विसर पडलेल्या नी च्या आठवणीने मनात कल्लोळ उठला होता. लाडाने मी सुहासिनीला नी”म्हणत होतो. आणि ती मला “स”म्हणत होती. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचे नाव सनी ठेवले होते.
पूर्ण दिवस कामाच्या गडबडीत गेला होता तिच्याच आठवणीत मी टी व्ही समोरच झोपून गेलो.
जाग आली ती गड्याच्या उठवण्याने. उठल्या उठल्या चहाचा कप घेऊन काशी उभीच होती.
“ दादानूं उठा, मला मावशींनी सांगितलंय तुम्हाला उठल्या उठल्या चहा लागतो म्हणून. चहा घ्या, आवरा तोपर्यंत मी न्याहरी करते” काशी

तिला नकार द्यायच्या अगोदर ती निघून गेली होती. मग मुकाट्याने चहा प्यायला आणि अंघोळीला गेलो. अंघोळ करून कपडे घालेपर्यंत काशीने गरमागरम पोहे आणि भाजणीचे वडे केले होते. त्यावर ताव मारला आणि बाहेर येऊन बसलो.
दोन्ही गडी पण आवरून आले होते. त्यांना कुलपं लावलेली सर्व दारं बघायला सांगितली आणि त्या कुलपांना, कडीला, बिजागरीला तेल घालायला सांगितले. काशीही सगळं आवरून आली.
आणि मला म्हणाली “जेवायला काय करायचं?”
“काशे सकाळीच एवढं झालाय की अजून दोन तीन दिवस मी जेवणार नाही”
“असंकस वाडीवर जाऊन या आपसूकच भूक लागेल. काय करायचं तेवढं सांगा.” काशी
“तुला काय हवं असेल ते कर.”
“मग सकाळच्या वड्याचं पीठ आहे, छान झणझणीत कोंबडीचा रस्सा करते” काशी
काशी निघून गेली आणि मी एका गड्याला बरोबर घेऊन वाडीवर चक्कर मारायला गेलो.
वाडीवर फिरताना असं लक्षात आलं की अडाणीपणा मुळे उत्त्पन्न कमी येत आहे. आणि ते थोड्याशा प्रयत्नांनी दुप्पट तिप्पट करता येईल. त्यामध्ये त्या गड्यांचा काही दोष नव्हता. त्यांना कोणी शिकवलंच नव्हतं.
माझ्या मनाशी मी कार्यक्रम आखून ठेवला. रोज सकाळी आठच्या आत न्याहारी उरकून गड्यांबरोबर वाडीचा आढावा घ्यायचा. एक वाजता गढीवर गेल्यावर अंघोळ करायची, जेवायचं आणि थोडी विश्रांती घ्यायची.
त्यानंतर संध्याकाळपर्यंत वाचन आणि गढीवरची कामं करायची. त्यादिवशी एक वाजता गढीवर पोहचलो तेव्हा चांगलीच भूक लागली होती. किचनमधून रश्याचा घमघमाट येत होता. जेवताना भुरके मारत कोंबडीवडा आणि रस्सा भात खाल्ला. साहजिकच जेवणानंतर डोळ्यावर पेंग येऊ लागला. छान पैकी एक दीड तास झोप काढली. चहा घेतला आणि गड्याना बोलाविले. सकाळीच गड्यानी सर्व दाराच्या कड्या कुलुपांना तेल घातले होते.
“मालक एकंदर सोळा दरवाज्यांना कुलपं आहेत पण त्याच्या किल्ल्या कुठे आहेत.” गडी
कपाटातून किल्ल्या शोधायच्या म्हणजे दिव्यच होत. दोन्ही हॉल मिळून दहा बारा तरी कपाटं होती. त्यात काय भरलं होत हे सांगणं अवघडच होत.
दोन्ही गड्याना मदतीला घेऊन एक एक कपाटं शोधायला सुरवात केली. जुनी मासिकं, पंचांग, कॅलेंडर, कपडे, मुलांची खेळणी अशा विविध वस्तुंनी कपाटं भरली होती. आता या सामानात टाकून देणं आणि ठेवणं असे दोन भाग करणे आवश्यक होते. दोन तीन कपाटं आवरण्यातच तीन तास कसे गेले हे कळलंच नाही. बराच कचरा जमा झाला होता. गड्याना सांगून तो ज्याला हवा असेल त्याला देऊन टाकायला सांगितलं.
त्या दिवशी मात्र छान झोप लागली. म्हणजे मी 'नी”ला विसरायला लागलो होतो का?
तिसऱ्या दिवशीही अशीच पुनरावृत्ती झाली. तीन चार कपाटं सोडली तर सर्व कपाटं बघून झाली होती. एक कपाटं मात्र विचित्रच होत. म्हणजे कपाटाला दारं होत पण आत कपाटं नव्हतं. कपाटच कोणीतरी विटा लावून बंद केलं होत. आणि छानपैकी प्लास्टर लावून त्यावर गणपतीचे अतिशय सुंदर असं भव्य चित्र बसवलं होत. पुढच्या दिवशी बाबा आले. मला कामात व्यस्त पाहून आणि माझ्या मनोवृत्तीत झालेला बदल पाहून त्यांना आनंद झाला.
“काय सुहास कस काय काम चालू आहे ?” बाबा
“छान चाललंय मी स्वतःला बिझी ठेवत असतो” सुहास
“हो बजाबा सांगत होता की, तू रोज चार पाच तास बागायतीत घालवतोस. बऱ्याच सुधारणा हाती घेतल्या आहेत.” बाबा
“हो बाबा, हे काशी आणि गडी एवढी काळजी घेतात की मला वाटते माझे वजन महिन्याभरात दहा किलोंनी तरी वाढेल.” सुहास
“बरं तुझं ते खोल्या साफ करणं कुठं पर्यंत आलय?” बाबा
“अजून किल्ल्याच सापडल्या नाहीत. नाही म्हणायला दहा कपाटं मात्र साफ झाली. एका कपाटात तर मला अतिशय सुंदर चित्र सापडले.” सुहास
“किल्ल्या सापडल्या नाहीत?” बाबा
“नाही ना. अजून तीन चार कपाटं बघायची आहेत. पण दुसरीच एक गंमत सापडली” सुहास
“काय? बाबा
“हे गणपतीचे सुंदर चित्र. कुणी काढलं असेल?” सुहास
“अरे हे चित्र तर तुझ्या काकांनी गावातल्याच गणपतीच्या मूर्तिकाराकडून रेखाटून घेतले आणि इथे बसवलं. अर्थातच चित्र खराब होऊनये म्हणून दाराच्या मागे बसवलं. बरं आज मी इथेच राहणार आहे. बघू काशी कसा स्वयंपाक करते.”बाबा
त्या दिवशी बाबाना मी वाडीवर घेऊन गेलो आणि संध्याकाळी काशीच्या हातचे सुरेख जेवण जेवत्यानंतर गप्पा मारत बसलो. गप्पाचे विषय अर्थातच शेतीविषयक, गड्यांचे प्रश्न, पैशाची व्यवस्था या बद्दलच होते.
राजकारणात किंवा एकंदरच समाजकारणात मला किंवा बाबांना फारसा रस कधीच नव्हता. आठवड्याभरात माझ्यात झालेले बदल पाहून बाबांना फारच आश्यर्य वाटले. आणि घरात गडगंज श्रीमंती असताना मी बाहेर कुठेतरी नोकरी करणं हे ही त्यांना पसंत नव्हते. दोघांनी कटाक्षाने ते विषय टाळले.
सकाळी न्याहरी करून बाबा परत कुडाळ ला गेले आणि माझा दिनक्रम सुरु झाला. दुसऱ्याच दिवशी एका कपाटात बाबानी सांगितलेला किल्ल्यांचा डबा सापडला. कुलपं जरी सोळाच असली तरी किल्ल्या मात्र बावीस होत्या. किल्ल्या सापडल्यावर उरलेली कपाटं ही आम्ही साफ सफाई करून घेतली.
किल्ल्या सोडल्यास कुठल्याच कपाटात महत्वाचे असे काहीही नव्हते. अपघात होऊन आता महिना उलटून गेला होता. पण नी च्या आठवणी मात्र मनात ठाण मांडून बसल्या होत्या.
नैनिताल, रानीखेत, डेहराडून ला घालविलेले दिवस, केलेली भटकंती, आणि डेहराडून मध्येच केलेले लग्न हे मला कधीच विसरता येणं शक्य नव्हतं. लोक लग्नानंतर हनिमूनला नैनिताल, रानीखेत, अलमोडा ला जातात तर आम्ही नैनिताल वरून मुंबईच्या उकाड्यात आणि कुडाळच्या खाऱ्या हवेत आलो होंतो.
दुसऱ्या दिवशी दोन्ही गड्याना घरातच थांबवलं. दोन प्रश्न सोडवायचे होते. या सोळा खोल्यांमध्ये काय आहे आणि उरलेल्या सहा किल्ल्या कसल्या आहेत. दुपारची विश्रांती झाल्यावर रोज खोल्या बघायचे ठरले.
पहिली खोली उघडली ती बहुतेक पाहुण्याकरिता असावी. पलंग, ड्रेसिंग टेबल आणि छोटीशी बाथरूम अशी ती छोटीखानी खोली होती. खोलीत कुबट वास होता कारण कित्येक वर्ष ती खोली उघडलीच नव्हती. आत गेल्यावर सर्व खिडक्या उघडल्या आणि गड्याला साफ साफई करायला सांगितलं.
पुढच्या दोन तीन खोल्याही अशाच प्रकारच्या होत्या. सध्या तरी या चार खोल्यांचा काहीच उपयोग नव्हता. कारण हॉल शेजारील दोन बेडरूम पाहुण्यांसाठी सुसज्ज होत्या. गणपतीच्या चित्रांच्या मागे ह्या दोन खोल्या होत्या. त्याची दारे हॉल मधूनच होती. समोरच्या भिंतीच्या मागे माझी बेडरूम होती. हेच करता करता संध्याकाळ केव्हा झाली कळलंच नाही.
उत्सुकता तर भरपूर होती पण सगळ्याच खोल्या उघडण्यापेक्षा उघडलेल्या खोल्याची आधी साफ सफाई करून घ्यावी व नंतर पुढच्या खोल्या उघडावे असं ठरवलं.
पण माझे जास्त लक्ष इमारतीच्या दुरुस्तीकडे आणि व्यवस्थेकडे होते. पुढच्या दोन खोल्यात वीस पंचवीस गाद्या, तेवढीच जाजम, सतरंज्या आणि उश्या होत्या. इतक्या वर्षात कापड जीर्ण होऊन उश्यांचे नुसते कापसाचे गोळे राहिल होते. नशिबाने त्या तिन्ही खोल्या सर्व बाजूने बंद असल्यामुळे उंदीर, घुशींनी धुमाकूळ घातला नव्हता.
अशारितीने सोळापैकी सहा खोल्यांचा तपास झाला. मी गड्याना सांगून त्या तीन खोल्यातील सर्व सामान काढून ते भंगारात विकून टाकायला सांगितलं.
ह्या पहिल्या सहा खोल्यात आठ दहा दिवस गेले. पण त्या खोल्या चकचकीत झाल्या. त्याचवेळी खोल्यातील वायरिंग व प्लम्बिंग नीट आहे का ते पाहिलं व साधा पांढरा रंग देऊन टाकला आता त्या खोल्या आनंदी व उत्साही वाटू लागल्या.
गड्याना एक एक काम नेमून दिले, की त्यातील रोज एका खोलीची दारंखिडक्या उघडायची व संध्याकाळी बंद करायची त्यामुळे त्या सहा खोल्यातील वातावरण स्वछ राहील.
माझ्या डोक्यात एक फ्रुट प्रोसेसिंग युनिट ची कल्पना घोळत होती त्या करिता ह्या खोल्यांचा उपयोग झाला असता.
खर म्हणजे खोल्या उघडताना माझा वेळ जाईल तसेच त्यांचा उपयोग करता येईल अशी मला कल्पना होतीआणि उत्सुकता होती की या खोल्यांमध्ये काही रहस्य दडलेले नाही ना.
सातवी खोली मात्र वेगळीच होती एकतर त्या खोलीला आत जायचा दरवाजा सोडल्यास बाकी खिडक्या दारे काही नव्हते. खोली बंदिस्त होती. ती खोली बहुतेक कोठ्याची खोली म्हणून वापरत असावेत. आठव्या खोलीत वेताची आणि मातीची तीन मोठी बळद होती. गड्याना ती बळद काढून दोन्ही खोल्या साफ करून घ्यायला सांगितल्या.
मध्ये एक दोनदा बाबा येऊन गेले. त्यांनाही या खोल्या दाखविल्या. त्यातील पाहुण्यांसाठी असणाऱ्या खोल्या त्यांना आठवत होत्या. मी माझ्या फ्रुट प्रोसेसिंग प्रकल्पाबद्दल ही त्यांच्याशी बोललॊ आणि त्यांनी उत्साहाने संमती दर्शवली व लागेल ती मदत देण्याचे कबुल केले.
दिवस जातच होते. बारा खोल्या बघून झाल्या होत्या. कशातच काही विशेष असे नव्हते.
तेरावी खोली मात्र वेगळीच होती. एकतर ती कोपऱ्यावरची होती. अतिशय मोठी व सुस्थितीत होती. तसेच त्या खोलीतून पुढच्या खोलीत जायला एक दार होते.
तेरा चौदा ह्या जोड खोल्या होत्या. तेराव्या खोलीत जमिनीवर एक मोठे जाजम व त्याच्यावर सुंदर कार्पेट होते. भिंतीच्या तिन्ही बाजूला पुस्तकांनी भरलेली कपाटं होती.
एका कोपऱ्यात रायटिंग टेबल होत. मध्ये एक सुंदर सोफा व टी पॉय होता. पुस्तकं काचेच्या कपाटात होती. त्याला वाळवी लागू नये म्हणून मारलेला औषधांचा वास खोलीभर पसरला होता.
चौदाव्या खोलीत गेल्यावर कळले की पंधरावी खोली पण त्याला जोडलेली आहे. थोडक्यात तेरा, चौदा, पंधरा ह्या खोल्या एकमेकांना जोडलेल्या होत्या.
चौदाव्या खोलीत फोरपोस्ट बेड होत. दुसऱ्या भिंतीशी चेस्ट ऑफ ड्रावर होते. दोन्ही अस्सल शिसवी लाकडाचे आणि व्हिक्टोरियन टाइप फर्निचर होते. खोलीतच एक डुलणारी खुर्ची होती. भिंतीवर सुरेख पेंटिंग लावली होती. त्यातील एक पेंटिंग गणपतीचे होते.
तिसरी खोलीपण कपाटांनी भरून गेली होती. पण त्यातील वस्तू वेगळ्याच होत्या. या तिन्ही प्रशस्त खोल्यांचा उपयोग निश्चितच काका करत असावेत. चौदाव्या खोलीतून पंधराव्या खोलीत जायला एक दार होते. बावीस पैकी एक किल्ली त्या दाराची होती.
तिसऱ्या खोलीत एक प्रशस्त देवघर होते. देवाच्या पूजेचे सर्व साहित्य एका मांडणीत होत. तर दुसऱ्या मांडणीत रुद्राक्ष, शंख, शिंपले अशा तांत्रिक गोष्टी होत्या. पुस्तकही वेगळ्याच विषयाची म्हणजे तांत्रिक विषयावरची होती.
पहिल्या खोलीतील पुस्तक मंत्रांनी भारलेली तर पंधराव्या खोलीत कृष्णगणपती व काल भैरवाच्या मूर्ती होत्या. या दोन्ही मूर्ती तांत्रिक विदयेसाठी वापरल्या जातात.
पण बाबांच्या बोलण्यातून कधी काकांच्या तांत्रिक विद्येबद्दल काही ऐकले नव्हते. त्यामुळे मला खोल्या पाहून आश्चर्यच वाटले. वर्षानुवर्षे दारे खिडक्या जरी बंद असल्या तरी सुवासिक वस्तूचा साठा असल्यामुळे खोलीत सुगंध दरवळत होता.
सोळावी खोली खोली नसून ती दक्षिण पूर्वेकडे असलेली एक यज्ञवेदीच होती.
चार फूट बाय चार फूटचा यज्ञ कुंड खोलीच्या मध्यभागी होता. चारी बाजूनी मोझॅक टाइल्स बसवल्या होत्या. यज्ञकुंडाच्या वर धूर जाण्यासाठी एक धुराडे बसवलं होत आणि हवनाला लागणाऱ्या वस्तूंचा साठा ही होता.
वेगवेगळ्या प्रकारची लाकडे, तूप, तीळ, असे सामान होते. गंमत म्हणजे चाळीस वर्षानंतरही न वापरता ह्या खोल्या स्वच्छ होत्या. सावकाश कधीतरी त्या खोल्या बघायचे ठरवलं.
पुढच्याच आठवड्यात बाबा आले मी त्यांना या खोल्यांबद्दल विचारलं. “हो. काका त्या खोल्या वापरत होते.” बाबा
पण त्यांच्यात व काकांच्यात बरेच अंतर असल्यामुळे त्यांना काका हे निश्चितच आठवत नव्हते. ते सदैव वाचनात व पूजा अर्चनेत मग्न असायचे आणि बोलविल्याशिवाय लहान मुलांना तेथे जाण्यास बंदी घातली होती.
यज्ञवेदीच्या दक्षिण दिशेला एक मोठे दार होते. आजही तो परिसर वृक्षराज व फुलांच्या बागांनी संपंन्न होता लहानपणी त्या बागेत आई गवती चहा, तुळस, आले, पुदिना, दुर्वा अशा घरगुती वस्तूंचे वाफे लावायची.
अरे काका गेले तेव्हा आम्ही फारच लहान होतो. कोणी म्हणाले ते अपघातात गेले, कोणी म्हणाले ते हिमालयात तपसाधनेला गेले, कोणी म्हणाले ते बेपत्ता झाले. आम्हाला खरं कारण कधी समजलंच नाही आणि काकांविषयी घरात बोलायलाही बंदी होती.
“तू एक काम कर उद्या बजाबाला वाड्यावर बोलवून घे. काकांचा तो त्यावेळी मदतनीस होता. आता जरी त्याचे वय सत्तर असले तरी त्याची स्मरणशक्ती आणि अंगकाठी शाबूत आहे.” बाबा

त्यानंतर आम्ही दोघे कमाविषयीच बोलत होतो.
फ्रुट प्रोसेसिंग साठी लागणाऱ्या मशिनरीचा अभ्यास करून मी हव्या असलेल्या मशीनची एक यादी केली होती. कोकम, काजू, आंबा, नारळ अशा वेगवेगळ्या फळांचे मला प्रोसेसिंग करायचे होते.
त्याचप्रमाणे वाडीत व्हॅनिला, वेलदोडे, लवंग याचेही वेल लावायचे होते. केरळप्रमाणेच हवामान असल्यामुळे आमच्या वाडीतही हे वेल चांगले येतील असा माझा अंदाज होता त्यातून हे वेल नारळ फोफळीच्या झाडावर वाढत असल्यामुळे वेगळ्या जमिनीची गरज नव्हती.
त्याचप्रमाणे मँगोस्टीन सारखी एक्झॉटिक फळांची झाडे लावायची. या सर्वाचा खर्चाचा अंदाज साधारणपणे चाळीस लाखाच्या घरात जात होता. त्याशिवाय जागेसाठी वेगळा खर्च आला असता, मी बाबांच्या समोर हे सर्व अंदाजपत्रक ठेवलं.
“अरे ही रक्कम काही फार नाही. आपल्या एका वर्षाच्या उत्त्पन्नापेक्षा थोडी अधिक आहे एवढेच. पण काही नवीन करायला काही हरकत नाही. आता जागेचे म्हणशील तर वाड्याचा काही भाग पाडून आपण तो वापरू शकतो किंवा जमत असेल तर सोळा पैकी हव्या असंतील तेवढ्या खोल्याही तू वापरू शकतो. जरा एकदा नीट आराखडा तयार कर म्हणजे तो फायनल करू.” बाबा
“ठीक आहे. मी सर्व यंत्रसामग्रीची कोटेशन मागवतो तसेच वीज, पाणी इत्यादी खर्चाचा अंदाज तयार करतो. कामगारवर्ग तर आपल्याकडे आनंदाने येतील साधारण चार पाच आठवड्यात माझे सर्व तयार असेल.” सुहास

-११-
बाबा निघून गेल्यावर मी याच विचारात गुंतलो होतो आणि काका व बजाबा यांचा विचार माझ्या डोक्यातून गेला होता.
तीन चार दिवसांनी अचानक मला बजाबाची आठवण झाली. व दुपारी मी त्याला बोलावून घेतले. तो आल्यावर त्याला घेऊन मी काकांच्या खोलीमध्ये गेलो. तो मोठ्या नाखुशीनेच माझ्या बरोबर आला. त्या खोलीतील स्वच्छता आणि सर्व आवरलेले पाहून त्याला बरे वाटले.
“काय बजाबा काकांच्या वेळेस तू त्यांचा मदतनीस होता म्हणे.” सुहास
“होय मालक तुमचा काका म्हणजे भला देवमाणूस होता. अडीअडचणीला बाई बापड्याना मदत करायचा. म्हणजे पैशाची नाही तर इतर बऱ्याच गोष्टीची मदत करायचे.” बजाबा
बोलत बोलत आम्ही देवघरात आलो. देवघरात आल्यावर तो गप्प झाला. तेथील मूर्ती व यज्ञकुंड पाहून तो गप्पच बसला.
थोडावेळ शांततेत गेल्यावर मी त्याला मूर्तीबद्दल विचारले.
“काय रे बजाबा? ह्या मूर्ती कसल्या? काका मांत्रिक होते का?” सुहास
“मालक तीस चाळीस वर्षांपूर्वीचा हा भाग लक्षात घ्या. प्रवासाची अपुरी साधन, अपुरा पैसा, गरिबी तर पाचवीला पुजलेली. तसेच टीव्ही, वर्तमानपत्र या पासून सर्वात दूर असलेला हा भाग. कोकण कितीही गरीब असला तरी जमिनीवरून भांडण चालू असायची त्यात मग भानामती, मूठ मारणे, बाहुल्यात खिळे ठोकणे असे प्रकार चालायचे. त्यातून भुताखेतांबद्दल गैरसमजुती वर लोकांचा चटकन विश्वास बसायचा” बजाबा
“मग काका काय करायचे?” सुहास
“अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करायचे. ते मला नेहमी म्हणायचे ह्या सगळ्या मनाच्या समजुती असतात. आपलं मन खंबीर ठेवलं तर तुम्हाला कशाचाच त्रास होऊ शकत नाही. पण जर का एकदा मन ढासळल तर ते स्वतःच्याच कल्पनांना घाबरायला लागत. मग त्याला साधा दोर सुद्धा सापासारखा वाटतो. किंवा विहिरीतून चेटकिणी बाहेर येतात असं वाटत” बजाबा
“पण बजाबा काका ह्या मूर्ती आणि कुंडाचं काय करायचे?” सुहास
“मी एकदा काकांना विचारलं भूत, चेटकीण याच्यावर तुमचा विश्वास आहे का ? ” बजाबा
“मग ते काय म्हणाले?” सुहास
“तुम्ही ज्या अर्थी समजता, त्या कल्पनांवर माझा विश्वास नाही पण जगात काही जशा सुष्ट शक्ती आहेत तश्याच दुष्ट शक्ती पण आहेत. कित्येक वेळा एखादी शक्तीचा आपण उपयोग किंवा दुरुपयोग करू शकतो. जसा विजेचा वापर पंखे चालवायला होतो तसाच तो शॉक द्यायला ही होतो. त्यामुळे ह्या शक्ती कोणी कस वापरत आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. थोडक्यात म्हणजे शक्ती सुष्ट किंवा दुष्ट नसून वापरणारे सज्जन किंवा दुर्जन आहेत त्याच्यावर ठरत.” बजाबा
“पण या मूर्तीच आणि कुंडाचं काय?” सुहास
“ते हि मला काकांनी समजावून सांगितलं होत. आजूबाजूच्या गावातून तुम्हाला माहित नसल एकशे पन्नासहून अधिक खेडी आहेत, आपल्यासारख्या वाड्या अजून वेगळ्याच. तालुक्याबाहेरून अनेक गांजलेले, पिडलेले लोकं त्यांचा सल्ला मागायला यायचे. अशा लोकांना यायला जायला हा मागचा दरवाजा होता. काका म्हणायचे कोण कुठल्या हेतूने आपल्या घरात येईल हे माहित नाही तर त्यांना मुख्य घरात कशाला घ्यायचं. त्यांनी आपलं बाहेरच्या बाहेर आलं गेलेलं बर” बजाबा
“अच्छा म्हणजे मागचा दरवाजा त्याच्यासाठीच होता तर.” सुहास
“काका म्हणायचे या शक्तीचा परिणाम मनावर होत असतो त्या मनावर आघात करतात. एखादी मानसिक दुबळेपणा त्यांना सापडला की ते तुमचा फायदा घेऊ शकतात. याकरिता तुमचं मन तुम्हाला ताब्यात ठेवणं भाग असत. या पूजा, मंत्रउच्चार, हवंन त्याची मानसिक स्थिती उंचावण्यासाठी असतात. जस पावसामुळे आपण ओले होऊ नये म्हणून रेनकोट घालतो तसेच हे उपाय म्हणजे सुरक्षा असते. काका इतकं छान समजावून सांगायचे की लगेच मनाचे समाधान व्हायचे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही विद्या वाईट कामाकरिता वापरली नाही. त्यांचं लोकांच्या भल्याकडेच लक्ष असायचं आणि या कामासाठी ते जे पैसे घ्यायचे ते सर्व गावातील शाळेला दान करायचे.” बजाबा
“मग पैसे कशाला घ्यायचे? अगोदरच तो माणूस पिडलेला असतो” सुहास
“त्यांनी लोकांना अडवून कधीच पैसे घेतले नाहीत आणि लोक त्यांना पैशा ऐवजी जे काही देतील ते सर्व ते गरिबांना वाटून टाकायचे त्यातला एकही पैसा किंवा एकही कण त्यांनी स्वतःकरता किंवा घरासाठी वापरला नाही.” बजाबा
“अरे पण घ्यायचेच कशाला?” सुहास
“लोकांना प्रत्येक गोष्टीचा मोबदला देण्याची सवय लागायला पाहिजे, एखादी गोष्ट फुकट मिळत्येय म्हंटल्यावर त्याची किंमत लोकांच्या दृष्टीने कमी असते.” बजाबा
तेही बरोबरच आहे. मलाही असा अनुभव आहेच.
“काकांचा जोतिषाचा व मंत्रांचा अनुभव व ज्ञान फारच दांडगे होते. कुठल्या कुठल्या जुन्या पोथ्या आणून ते संदर्भ लिहत बसायचे. लांबलांबून लोकं त्यांच्याकडे पत्रिका पाहायला, मुहूर्त काढायला किंवा प्रश्न सोडवायला यायची” बजाबा
“अरे पण त्या मूर्तीचे आणि कुंडाचे काय? आपला विषय भलतीकडेच चाललाय.” सुहास
“कुणाकरताही उपाय करताना ते देवापुढे मंत्रोच्चार करून अभिषेक घालायचे आणि यज्ञ कुंडात हवन करायचे. यात वेगवेगळ्या फुलांचे, पानांचे, मुळांचे, लाकडाचे तसेच वेगवेगळे हविष्य गोळा करणे, निवडणे, तयार ठेवणे माझे काम असायचे.” बजाबा

“अरे बजाबा तुझी भाषा फारच चांगली आहे. तुझ्या बोलण्यातले कित्येक शब्द मलाही कळत नाहीत.” सुहास
बजाबा हसून म्हणाला “ही सगळी काकांची देणगी. नाहीतर माझ्यासारख्या अडाण्याला कुठल काय माहित असणार. हविष्य म्हणजे हवनाकरिता लागणाऱ्या वस्तू उदा. तीळ, तूप, बेलफळ, दहीभात, मोदक, उसाचे कांड. ज्या प्रकारचा यज्ञ असेल त्या प्रमाणे पदार्थ बदलायचे.” बजाबा
“म्हणजे देव देवतांना सुद्धा आवडीनिवडी असतात का?” सुहास
“नाही तस नाही आपल्याला जस फळ अपेक्षित आहे तसे पदार्थ हवन करावे लागतात. आपण कधी श्रीखंडात तिखट घालतो का? तसेच हे वेगवेगळे पदार्थ” बजाबा
“अरे वा तुला बरीच माहिती आहे की.”
“इथे आल्यावर सगळ्या आठवणी जागृत झाल्या, हा या जागेचा परिणाम आहे. ही सर्व जागाच एका शक्तीने भारलेली आहे. दुष्ट शक्तींना इथे प्रवेश मिळणं अवघडच आहे.” बजाबा
“असं आहे तर”
“कधी कधी काका एकटेच हवन करत बसायचे. त्यांना विचारल्यावर एकदा ते म्हणाले 'अरे रेनकोट नाही का वापरून वापरून खराब होतो आणि दुसरा घ्यावाच लागतो तसेच आहे हे . लोकांना मदत करता करता माझ्याही शक्तीवर आघात होतच असतात. त्या क्षीण होऊ लागतात. त्याच शक्ती परत आणण्यासाठी मला असे हवन व तप करावेच लागते. त्यामुळेच कोणत्याही शक्तीला तोंड द्यायचे धैर्य माझ्यात येते.” बजाबा
“अरे या शास्त्राचा एवढा खोलवर अर्थ असेल असे कधी मला वाटलंच नाही. याला मी भंकसपणा समजत होतो. काका खरच तपस्वी व सिद्ध पुरुष होते.”
“हो ना” बजाबा
“अजूनही जुनी लोकं त्यांची आठवण काढली की हात जोडतात.” बजाबा
“बजाबा या खोलीमध्ये आले की असे वाटते की काका नुकतेच बाहेर गेले आहेत आणि केव्हाही परत येतील.”
बजाबा यावर काहीच बोलला नाही. त्याची या विषयावर बोलायची तयारी नव्हती. मग मी विषय बदलला.
“बजाबा इथे जे गणपतीचे चित्र आहे तसेच चित्र मागच्या हॉल मध्ये एका कपाटात आहे. खरं म्हणजे ते कपाट नाहीच आहे चित्रालाच कोणीतरी दार बसवले आहे असं वाटत.”
“मला काही माहिती नाही बुआ. पण काका नेहमी म्हणायचे की ज्या गोष्टीचे आपल्याला पूर्ण ज्ञान नसेल तर त्यात आपण शिरू नये. आणि मालक, खरं म्हणजे या खोल्या तुम्ही बंदच करून ठेवा कारण चाळीस वर्षानंतर ही कशाचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही.” बजाबा
“अरे मी सर्वच खोल्या साफ करायला घेतल्या आहेत एवढंच आणि खरं म्हणशील तर या गोष्टीत मला रस हि नाही, आणि गती ही नाही.”
“तेच बर आहे मालक, जातो आता जपून राहा.” बजाबा
“अरे बजाबा मुख्य विचारायचेच राहीले?”
“काय?” बजाबा
“अरे काकांचा शेवट कसा झाला? ते आत्ता जिवंत आहेत का?”
बजाबा गप्पच बसला त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीतीची छाया उमटून गेली.
“काय रे बजाबा? काय झालं? कसली भीती वाटते का?”
“नाही साहेब. काकांनी मला भरपूर मानसिक धीर दिला आहे आणि मला कशाचाही त्रास होऊ नये म्हणून गळ्यात घालायला हा ताईत पण दिला आहे.” बजाबा
“अरे पण काकांचे काय झाले?”
“मालक मी एकदाच सांगतो मला परत काहीही विचारू नका. काकांचं काय झालं हे सांगणं कठीण आहे. काका अजून जिवंत आहेत का मेले आहेत हे सांगणं त्याहून कठीण आहे. आणि असतील तर त्यांचं वय किती असेल आणि कशा अवस्थेत असतील हे मी सांगू शकत नाही. एक मात्र सांगेन ज्या दिवशी किंवा ज्या रात्री काका नाहीसे झाले, त्या रात्री त्यांनी सांगितलेले एक काम मी केले.” बजाबा
“याचा अर्थ काय?”
“थोडक्यात काकांना ते नाहीसे होतील हे माहित होत आणि जर तसे झाले तर मी काय करायचे हे हि त्यांनी सांगून ठेवलं होत. मी त्यांचे काम केले या सर्व खोल्या बंद केल्या आणि गेलो” बजाबा
“मग तुला कोणी विचारलं नाही?”
“विचारलं. प्रत्येकजण विचारात होतो पण मलाच माहित नव्हते तर मी काय सांगणार. खरं म्हणजे मला अंधुक कल्पना आली होती. पण ठाम पणे काही सांगता येत नव्हते. काकांना बायका मुलं नसल्यामुळे त्यांचा विषय मागे पडला आणि काही दिवसांनी लोक त्यांना विसरून गेले. नव्या पिढीला असे कोणी आहे हेच माहित नाही” बजाबा
“असे आहे तर बरीच माहिती दिलीस काही लागलं तर मी तुला बोलवेन.”

-१२-
एकूणच काय तर काकांची जास्त माहिती बाबांपेक्षा बजाबालाच होती. आणि त्याच बरोबर तो बऱ्याच गोष्टी लपवत आहे हे ही जाणवत होते. पण त्याला आत्ताच छेडण्यात काही अर्थ नव्हता. तसेच बावीस पैकी अठरा किल्ल्यांची कुलुपं सापडली होती. मात्र चार किल्ल्या कसल्या आहेत हे कळले नव्हते.
सगळ्या खोल्या आवरून तर झाल्या होत्या आणि काकांच्या खोल्या सोडल्या तर बाकीच्या रिकाम्या होत्या. काकांच्याच खोलीचे निरीक्षण करण्याचे मी ठरवले. पहिली खोली म्हणजे त्यांची अभ्यासिकाचं होती. त्यातील बहुतेक पुस्तक आध्यात्माची आणि तत्वज्ञानाची होती. काकांना सर्व धर्म सारखेच दिसत होते. कुराण, बायबल, गीता, ग्रंथसाहेब, झेंद अवेस्ता असे सर्वच एकमेकांच्या गळ्यातगळे घालून कपाटात होते. ती पुस्तक चाळण्यापलीकडे मला विशेष रस नव्हता. मला वाचायला आवडेल असे काहीच त्या कपाटात नव्हते.
पूजेच्या खोलीत मात्र वेगळ्याच विषयांवरच्या पुस्तकांनी कपाटं भरून गेली होती जसे जोतिष, मंत्रसाधना, तंत्रसाधना, ब्लॅक मॅजिक, रमलशास्त्र इत्यादी..
त्यांच्या शेजारच्या कपाटात पूर्वी म्हंटल्याप्रमाणे पूजेचे विविध साहित्य ठेवले होते. भविष्यावरचीच एक दोन पुस्तक वाचावीत म्हणून मी ती बाहेर काढली. त्या पुस्तकांच्या मागे मला एक चोर कप्पा असावा असे वाटले. त्यात किल्ली जाईल असे एक छिद्र ही होत.
दिवाणखान्यात जाऊन मी उरलेल्या चार किल्ल्या आणल्या त्यातली एक किल्ली त्या चोर कप्प्याला चालली. आत एक मखमली पेटी होती त्याला ही राहिलेल्या किल्लीतील एक किल्ली चालली. पेटी उघडल्यावर आत एक जुने भूर्ज पत्र होते. ते मोडी लिपीत लिहलेले होते. लहानपणी मोडी शिकलेली असल्यामुळे मी क ला काना का करत तो कागद वाचला. अर्थातच मला अर्थ कळला नाही. मग तो कागद पेटीत ठेऊन ती पेटी आणि चोर कप्पा बंद केला. ती पेटी इतक्या बंदोबस्तात का ठेवली होती? आणि त्यात फक्त भूर्जपत्रच का ठेवले होते? हे एक कोडेच होते. शेवटी काहीतरी विचार करून ते पत्र बजाबाला दाखवण्यासाठी बाहेर काढले. संध्याकाळी बजाबा आलाच.
“बजाबा हे पत्र तू कधी पहिले आहेस का?”
“नाय बा आणि मला कुठे वाचायला येणार” बजाबा
“अरे हे पत्र मला देवघरात सापडले. तिथल्या कपाटात एक चोर कप्पा होता आणि त्यातील एका मखमली पेटीत हे पत्र होते.”
बजाबाच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरलेली माझ्या लक्षात आली.
“मालक त्या देवघरात जाऊ नका. तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. काकांचे कुठं काय असेल ते सांगता येत नाही.” बजाबा
“म्हणजे बजाबा तुला त्या पत्राबद्दल माहिती आहे”
“नाही पण ती पेटी मीच चोर कप्प्यात ठेवली होती. अर्थात आत काय आहे याची मला कल्पना नव्हती. काकांच्या आज्ञेप्रमाणे त्यानीं सांगितलेल्या अनेक गोष्टीं पैकी ही एक गोष्ट होती.” बजाबा
“अजून तुला काकांनी काय काय सांगितले होते?”
“नाही मालक मला तेवढ विचारू नका. कारण काकांनी मला गुप्ततेची शपथ दिली आहे. मी जर काही बोलायला लागलो तर माझाच जीव जाईल. असं ते म्हणाले होते” बजाबा
त्या दिवशी बजाबाला मी फारसे ताणले नाही. पण त्या रात्री माझे विचार त्या पत्राभोवतीच घुटमळत होते. रात्री झोपल्यावर मला कोणीतरी दार वाजवल्याचा आवाज आला पण बाहेर कोणीच नव्हते.
परत झोप लागल्यावर ओळखीच्या आवाजात हाक ऐकू आली.
“अरे स उठ मी केव्हाची वाट पाहत दाराबाहेर उभी आहे.”
आवाज तर नी चाच वाटत होता. म्हणून मी दारापाशी धावलो व बाहेरच दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं. मला भास झाला असावा हे निश्चित नंतर मात्र गाढ झोप लागली.

-१३-
दुसऱ्यादिवशी दुपारी मी सहज हॉलमध्ये बसलो असताना मला कपाट नसलेल्या दाराच्या खाली भिंतीचे पोपडे पडलेले दिसले. हातात घेऊन पहिले तर ते रंगाचे पोपडे होते मग माझ्या लक्षात आले की तिथे भिंत नाहीच. गणपतीचे नीट निरीक्षण केले तर सोंडेच्या इथला भाग पडला होता आणि तिथे एक की होल दिसत होते पण माझ्याकडे उरलेल्या किल्ल्यांपैकी एक ही किल्ली त्याला बसत नव्हती.
माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. काकांच्या खोलीतपण असेच एक चित्र होते. तिथे ही एक चोरकप्पा आहे की काय हे बघायचे ठरविले.
दुसऱ्यादिवशी दुपारी त्या चित्राचे बारीक निरीक्षण केल्यावर त्याच ठिकाणी एक किल्ली करिता की होल दिसत होते तो कप्पा उघडल्यावर आत अजून एक किल्ली होतीआणि पेटीतल्यासारखेच भूर्जपत्र होते. तेही वाचून मला काही पत्ता लागला नाही.
संध्याकाळी वाडीवरून तातडीचा निरोप आला की बजाबा अतिशय आजारी पडला आहे आणि मला तो बोलावतोय.
रात्र फार झाली होती त्यामुळे दुसऱ्यादिवशी वाडीवर गेल्यावर त्याच्या घरी जायचे ठरवले व तसा निरोपही पाठवला. रात्री जेवण झाल्यावर हॉलमधील गणपतीच्या चित्राला त्या चोर कप्प्यातील किल्ली लावून बघितली तर ती लागली आणि गणपतीचे चित्र दारासारखं उघडलं. पण आत भिंत होती. पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या चित्राच्या मागे दोन खोल्या होत्या. शेवटी दुसऱ्यादिवशी दोन-तीन गडी आणून शोध घ्यायचे ठरवले.
उत्तर रात्रीपर्यंत व्यवस्थित झोप होती पण नंतर मला कोणीतरी उठवतंय अशी जाणीव झाली. बघतो तर माझ्या बेड शेजारी नी उभी होती. आणि ती मला हलवून उठवत होती.
“अरे उठ ना, मी केव्हाची तुला उठवतेय” नी
शेजारचा पाण्याचा तांब्या घेऊन मी पाणी प्यायलो आणि तोंडावर शिंपडले.
“अरे तू स्वप्नात नाहीस. खरंच मी आले आहे” नी
“अग पण तू त्या अपघातात वाहून गेली होतीस ना? तुझे प्रेतसुद्धा सापडलं नाही”
“स, इतके हिंदी चित्रपट तू पाहिलेत त्यात कितीतरी जण वाहून जातात कोणालातरी सापडतात आणि बरे झाल्यावर परत येतात” नी
“पण तुला कोणी सांगितलं की मी झाराप ला आहे.”
“त्यात सांगायला कशाला पाहिजे तू कुडाळ किंवा झाराप ला असणार अशी माझी खात्री होती. त्यातून मी खारघरला फोन केला होता पण कोणीच उचलला नाही.” नी
“मग तू कुडाळला जाऊन आलीस का?”
“नाही रे मी सरळ तुझ्याकडेच आले.”
माझी बुद्धी बधिर झाली होती. एक मन म्हणत होत हे शक्य नाही. पण नी चा सहवास ही हवाहवासा वाटत होता. त्यात सकाळ केव्हा उजाडली हे कळलेच नाही. काही दिवस तरी नी च अस्तित्व जाहीर करायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं होत. काही दिवसांनी बाबा आले की त्यांना भेटल्यावर पुढचे ठरवू असे वाटत होते.
दुसऱ्या दिवशी वाडीवर गेल्यावर बजाबाच्या घरी गेलो तर बजाबा निधन पावल्याचे कळाले. म्हणजे माझा भूतकाळाचा शेवटचा दुवा ही निखळला होता. त्याचा मुलगा फारच प्रेमळ होता. त्याने बजाबाचा एक निरोप सांगितला
“मालक बजाबा जाताना तुम्हाला निरोप ठेऊन गेला आहे.”
“काय ? "
“तुम्ही ते गणपतीचे चित्र उघडायला नको होत. ते उघडून तुम्ही अमानवी शक्तींना आमंत्रण दिल आहे. मला तर आता जायला पाहिजे.पण जाताना तो हा ताईत तुमच्यासाठी देऊन गेला आहे. तो सतत तुम्ही दंडात बांधावा अशी त्याची इच्छा होती. मालक हा ताईत दंडात किंवा गळ्यात बांधा आणि कधीही काढू नका. काकांचं मला बोलावणं आलं आहे आणि मला जायलाच पाहिजे.”

-१४-
तो दिवस दुःखात गेला. पण नी च्या अस्तित्वाची ओढ ही कायम होती. संध्याकाळी जेवताना काशी गेल्यावर नी आली आणि थातुर मातुरच जेवली.
“काय ग? जेवत का नाहीस?”
“काही नाही. जरा भूक मंदावली आहे आणि गेल्या दोन महिन्यात आपल्या पद्धतीच्या अन्नाची चवही कमी झाली आहे.”
“अग पण तू कोणाकडे, कुठल्या गावात होतीस?”
“खरं तर मला नक्की आठवत नाही पण आठ-दहा दिवसांनी आपण हिंडून शोध घेऊ.”
ती रात्र सुखात गेली. सकाळी मात्र मला दमल्यासारखं वाटत होत. त्यातून पहाटे नी म्हणाली
“स दिवसभर मी एकटी घरात असते आणि जाम कंटाळते. तू आजूबाजूच्या वाडीतून कुठल्यातरी बाई ला सोबत म्हणून पाठव ना.”
“अग तूच चल ना वाडीवर. बघ तरी काय काय नवीन प्रयोग चालू आहेत ते.”
“नको, नको इतक्यात नको.”
शेवटी मी शेजारच्या गावातील एका चटपटीत बाईला सोबतीण म्हणून दिवसा घरी बोलवले. दोन-तीन दिवस शांततेत गेले पण चौथ्या दिवशी नी ची परत भुणभुण सुरु झाली
“अरे ती बाई आज येणार नाही काल जातानाच तिने सांगितले”
“का ? काय झाले?”
“इथलं काम फारच कंटाळवाणं आहे असं ती म्हणाली”
“नी मात्र उत्साही आणि तजेलदार दिसत होती.”
दुसऱ्याच दिवशी सकाळी त्या बाईचा भाऊ घरी आला आणि त्याने बहिणी बद्दल विचारले.
“काल ती घरी आलीच नाही.”
“अरे मी तर दिवसा घरी नसतो आणि कामावर येणार नाही असं तीन सांगितलं होते.”
“ती घरी आली नाही का? इथून तर संध्यकाळीच घरी गेली.” नी
“बरं. मी बघतो आजूबाजूच्या नातेवाइकांकडे.”
नंतर हा जणू नियमच झाला होता. कुठलीही बाई तीन-चार दिवस राहायची नंतर नाही म्हणायची आणि बेपत्ताच व्हायची.
एका सकाळी वाडीवरची लोकं मला भेटायला आले.
“मालक तुमच्याकडे कोणी बाई टिकतच नाही. तुम्ही घरी नसता तेव्हा काय होते हे तुम्हालापण माहित नसते.
पण चार-पाच दिवसातच तुमच्या इथली बाई पळून जाते आणि ती बेपत्ताच होते. घरी पण जात नाही, कुठल्या नातेवाईकाकडे ही नसते मग तिचे काय होते काहीच कळायला मार्ग नाही. काही घातपात असावा तर तिचे प्रेत ही कुठे सापडत नाही. थोडक्यात ती पूर्णतः नाहीशी होते. त्यामुळे गढीवर भुताटकी असावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं.” सरपंच
“अरे बाबांनो!भूतबीत काही नसत.”
“आम्ही पोलिसात ही तक्रार देणार आहे. पण आम्हाला असे वाटते की एकदा मांत्रिकाला ही बोलवावे” सरपंच
“हे बघा मला यातील काहीही माहित नाही. तुम्ही मांत्रिकाला किंवा पोलिसांना सांगा. माझ्या बाजूने हवी असेल ती मदत मी करेन.”
बाबा ना मी बोलावून घेतलं तसेच त्यांच्या कानावरही ह्या बातम्या गेल्याच होत्या. रात्री नी ने ही काही दिवस बाहेर गावी जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बाबा आणि पोलिसही आले.
पोलिसांनी गढीच्या खोल्या व कोपरा न कोपरा तपासला. पण त्याना काहीच आढळले नाही. पोलीस गेल्यानंतर बाबांनी मला विचारलं
“काय रे सुहास तू सकाळ ते संध्याकाळ वाडीवर कामात असताना घरी बाया कशाला येत होत्या?” बाबा
मला ज्या प्रश्नांची भीती वाटत होती तोच प्रश्न बाबांनी विचारला आणि नी परत येईपर्यंत तिच्या विषयी मी काहीच सांगू शकत नव्हतो. त्यांनी व इतर लोकांनी मला वेड्यात काढलं असत. नी ला परत यायला पाच ते सहा दिवस अवकाश होता.
“बाबा तुम्ही पाहताच, मी सर्व खोल्या साफ केल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हल्ली वाडीवरची कामे ही वाढली आहेत त्यामुळे मी सकाळीच वाडीवर जातो. काशी तिचे काम झाल्यावर डबा घेऊन वाडीवर येते. अशा वेळी गढी रिकामी ठेवणे मला योग्य वाटतं नाही म्हणून मी वाडीवर गेल्यावर संघ्याकाळपर्यंत बायकांना घरी पाठवत होतो. मला परत यायला आठ नऊ व्हायचे. काशी सात सव्वासात ला यायची त्या अगोदरच बाया जायच्या. आत्ता त्या कुठे आहेत आणि कशा गेल्या मला काहीही कल्पना नाही.”
“अरे असं म्हणून चालत नाही आपल्याकडे जो कामाला येतो त्याची जबाबदारी आपल्यावरच असते. मी पोलिसांशी आणि सिंधुदुर्गच्या डी एस पी यांच्याशी बोलून घेतो. बघतो काही शोध लागतो का.”

दुसऱ्यादिवशी गावातील लोक मांत्रिकाला घेऊन आले. मांत्रिकाने गढीची पाहणी केली आणि एवढ्या सगळ्या भुतांना काढायला दोन -तीन दिवस लागतील आणि बरेच पैसे खर्च होतील असे सांगितले. बहुतेक त्याला वर्षभराचे काम आणि पैसा एकाच ठिकाणी मिळवायचा होता.
बाबांच्या संमतीने मी त्या मांत्रिकाला संमती दिली. अर्थातच माझा याच्यावर विश्वास नव्हता त्यामुळे बाबांनी आणि गावातील लोकांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करायचे ठरवले. याच्या नंतर गढीतच गावजेवण द्यायचे ठरले
तीन दिवस गढीत नुसता धुमाकूळ चालू होता. भूत परवडली पण मांत्रिक नको असे मला वाटतं होते. शेवटी गाव जेवण झाल्यावर गढी परत एकदा शांत झाली.
गाव जेवणाच्या दुसऱ्या दिवशी मी नी ची वाट पाहत होतो. ती आली ती मुळात घाईत असल्यासारखी.
“काय ग काय झालं? असं वाघ पाठीमागे लागल्यासारखं का पळतेयस?”
“काही नाही रे सहा-सात दिवसात आपण भेटलो नाही त्यामुळे थोडी अस्वस्थ आहे. आणि काय रे कसले कसले वास येतायेत गढीत, चल आपण बाहेर जाऊ.”
मलाही ते पटलं आणि मी तिच्या मागे मागे गेलो.

-१५-
-मामा -
अगोदरच चौदा -पंधरा लोक बेपत्ता झाली होती. पोलीस तपासही झाला, मांत्रिक आले पण कोणीच सापडले नाही.
गाव जेवणाच्या दुसऱ्या दिवशी सुहास ही बेपत्ता झाला. तो कुठे, कसा आणि का गेला या विषयी आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यामुळेच रमेश ने तुम्हाला फोन केला.
सुहास बेपत्ता झाल्यावर आम्ही त्याची पोलीस केस नोंदवली. त्यातून अजूनतरी काही निष्पन्न झाले नाही.
“ठीक आहे. आता झाराप ला जाऊन काय ते बघू. उद्या सकाळी आम्ही लवकरच बाहेर पडतो.” समीर
“पण तुम्ही काय म्हणून तिकडे जाणार ?”
“सोप्प आहे. आम्हाला गढी आणि वाडी विकत घ्याची आहे म्हणून आम्ही जाणार” समीर
“ठीक आहे. मी तुम्हाला तिथल्या सरपंचांकरिता पत्र देतो. नाहीतर लोक तुमच्याशी या विषयावर बोलायचे नाहीत.”
“आणि त्या खोल्यांच्या किल्ल्या कुठे आहेत?” समीर
“सुहास बेपत्ता होऊन दोन तीन दिवसच झाले आहेत त्यामुळे दिवसा काशी तिथे असते आणि रात्री दोन गडी असतात त्यामुळे तिघांचा वावर आहे तिथं.”
पहिल्यांदा आमचा विचार होता की गढीतच जाऊन राहायचं पण कुडाळवरुन अर्ध्या तासाचे अंतर असल्यामुळे तशी काही गरज नव्हती.
“फारतर तानाजीला लोकांमध्ये मिसळून बोलण्यासाठी तेथे ठेऊ. समीर

-१६-
- झाराप-
दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळं आवरून, न्याहारी करून, गाडीत बरच सामान भरून ही चौकडी झाराप ला निघाली.
“जाताना जेवणाचा डबा तरी घेऊन जा” मंदा
“काही जरूर नाही तिथे काशी आहेच ती करेल आमच्यासाठी जेवण” समीर
“बरं पण यायला फार उशीर करू नका. रात्रीचे जेवायला आम्ही वाट पाहतोय.” मंदा
झाराप ला पोहचायला सकाळचे साडेआठ वाजले. गाव छोटं पण निसर्गरम्य होत. लोकांची रहदारी जवळ जवळ नव्हतीच. सावंतवाडी ते कुडाळ रहदारी बऱ्यापैकी होती. समीरने पहिल्यांदा गढीवर जायचे ठरवले. गढी दिसायला सुबक आणि शांतता पूर्ण होती. महाद्वार उघडच होत. दारातच दोघेजण गप्पा मारत उभे होते. बहुतेक ते गडी असावेत. गाडी गढीजवळ जाताच त्या दोघांनी आमच्या गाडीजवळ येऊन विचारलं
“कोण पाहिजे?”
“रामरावांची गढी हीच का?” समीर
“होय पण आपण कोण?” गडी
“इथले सरपंच कोण आहेत? त्यांना जरा बोलावणं पाठवा आणि आपण आत गढीत जाऊनच बोलू.” समीर
“अहो पण तुम्ही कॊण ? असं कसं कोणालाही गढीत घुसू देऊ आम्ही?” गडी
“हे बघा तुम्हाला सांगितलेली काम करा. उगाचच नसत्या चौकश्या करू नका. मुकाट्यानं सरपंचांना घेऊन या नाही तर आमचा तानाजीचं तुमच्यासारख्या वीस जणांना भारी आहे.”
समीर जरबीन बोलला. समीरची खास शैली होती. उगाचच वाद घालत बसायला त्याला आवडत नसे. त्यातला एक गडी सरपंचांना बोलवायला गेला. नाहीतर समीरने दोघांनाही गाडीत कोंबून वाड्यात प्रवेश केला असता.
ड्राइव्हर गाडीतच थांबला आणि तिघेहि आत शिरले. सुहास नाहीसा होऊन दोन तीन दिवसच झालं असल्यामुळे सगळीकडे स्वच्छता होती.

समीर आणि कुणाल दिवाणखान्यात बसले आणि तानाजी आजूबाजूला फिरू लागला. दिवाणखान्यातच गणपतीचे मोठे चित्र होते. तानाजी त्याला नमस्कार करूनच बाहेर गेला गड्याने पाणी आणून ठेवले तेवढ्यात सरपंच आले.
“मी गणेश खोत, या गावचा सरपंच. बोला माझ्याकडे काय काम आहे?” सरपंच
“आम्ही कुडाळच्या रामराव देसाई कडून आलो आहोत. त्यांचे पाहुणे आहोत. त्यांनी तुम्हाला हे पत्र दिले आहे.” समीर
सरपंचानी दोनदा पत्र वाचले.
“म्हणजे रामरावांनी सुहास परत येण्याची आशा सोडून दिली वाटतं?” सरपंच
“नाही. असं काही नाही” कुणाल
“तसेच वाटतंय हो. नाहीतर त्यांनी हे सर्व विकायला काढलंच नसत आणि तुम्ही हे पत्र आणलं हे बरं केल. कारण आपली ओळख नाही. तसा मी या रमेशला पाहिलेला आहे पण या पत्रामुळे मला सर्व लोकांना नीट सांगता येईल. नाहीतर इथे किंवा वाडीत कोणीच तुम्हाला काही माहिती दिली नसती” सरपंच
सरपंचानी दोन्ही गड्याना बोलावलं.
“हे बघा हे रावसाहेबांचे पाहुणे आहेत. सात आठ दिवस तरी त्यांचा आपल्या भागात मुक्काम आहे अर्थात ते गढीत राहणार नाहीत कारण ते रावसाहेबांच्या कुडाळच्या बंगल्यावर उतरले आहेत.” सरपंच
“काही काळजी करू नका आम्ही सगळी व्यवस्था बघतो” गडी
“आणि हे बघा यांच्यापैकी एकाला वाडीत घेऊन जा तिथल्या लोकांशी भेटी गाठी घालून द्या आणि सर्वाना सांगा की यांच्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या. तसेच काशीला सांगून त्यांच्या चहा-पाणी, जेवण या कडेही लक्ष द्या.” सरपंच
“धन्यवाद!!” समीर
“हे बघा तुम्ही आम्हाला परके मानू नका. रावसाहेबाचे पाहुणे ते गावाचे पाहुणे. केव्हांही, कुठल्याही मदतीसाठी बोलवा.” सरपंच
सरपंच निघून गेले आणि तेवढयात काशी आली. गड्यानी तिला या चौघांची माहिती करून दिली. काशीने लगेच सगळ्यांसाठी चहा ठेवला. समीर गड्यांशी बोलू लागला.
“काय रे नाव तुमची ?” समीर
“मी शिवा आणि हा बाळू” गडी
“बरं. किती वर्षे आहात इथे?” समीर
“तस काय सांगवत नाही. आता काय आम्ही इथेच लहानाचं मोठं झालो. आई वडील, काका सगळेच गडीवर किंवा वाडीवर काम करतात. आम्ही पण कळायला लागल्या पासून इथं काम करतो.” गडी
“बरं मग तुमचे छोटे मालक कुठं आहेत ? कारण सरपंच म्हणत होते की ते परत येणार नाहीत.” समीर
“ही मोठी माणसं कवा जातात, कवा येतात आपुन काय सांगणार.?” गडी
शिवाने प्रश्नच टाळला.
“जाऊन किती दिवस झाले?” समीर
“बघा आज गुरुवार. सोमवारी तर मालक इथे होते. रात्रीपण घरातच होते. आम्ही बाहेर ओसरीतच झोपलो होतो. दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे काशीने न्याहारी तयार केली तर मालकांचा त्यांच्या खोलीत पत्ताच नाही. आम्ही सगळीकडे शोधलं. वाडीवरही निरोप पाठवून विचारलं पण छोटे मालक कुठे गेले हे कुणालाच माहित नव्हतं.” शिवा
“काय रे ते अधून मधून असे कुठे जायचे का?” समीर
“नाही. आत्ता लग्न झाल्यानंतर वाहिनीबाई सोबत इथे ते दोन -तीन महिने राहिले आणि वाडी सोडून ते मुंबईला गेले. त्यांनी मुबंईला नोकरी धरली असं ऐकलं होत.” शिवा
“नंतर परत कधी आले?” समीर
“तसे अधून मधून सुट्टीला यायचे पण राहायला कधीच आले नाहीत. आणि आले असले तरी कुडाळलाच राहायचे.” शिवा
“तू तर आत्ता म्हणालास की ते इथे राहायचे” समीर
“ती खरं म्हणजे दुःखद घटनाच होती. मुंबईला जाताना वाहिनीबाई आणि त्यांचा मुलगा सावित्री नदीत वाहून गेले. आजवर त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.” शिवा
“हो रावसाहेब काहीतरी सांगत होते खरं” समीर
“नंतर छोट्या मालकांनी मुंबई सोडली. एक दीड महिना कुडाळलाच होते नंतर तीन चार महिन्यापूर्वी इथे राहायला आले. वाडीवर नवीन पद्धतीची शेती करायची त्यांच्या डोक्यात होत.” शिवा
“अरे पण कुडाळवरुन ये जा का करत नव्हते. इथेच का राहायचं होत?” समीर
“ते काय सांगता येणार नाही. त्यांना एकट्यालाच इथं राहून काम करायची होती.” शिवा
“मग ते या गढीत एकटेच राहत होते?” समीर
“तस नाय हो हा वाडा मोठा दिसत असला तरी ते आल्यावर चार पाच खोल्या उघडून साफ केल्या होत्या. आम्ही दोघेही गढीवर राहायचो, त्यांच्या बरोबर वाडीवर जायचो. आणि दिवसभर स्वयंपाकासाठी आणि घरकामासाठी काशी असायची” शिवा
तेवढ्यात तानाजी फिरून परत आला. काशीने सगळ्यांना चहा दिला.
“साहेब या गढीवर पंधरा -वीस तरी खोल्या आहेत पण बहुतेकाला तर कुलपच आहेत.” तानाजी
“अरे तुम्ही तर म्हणत होता पाच सहा खोल्या साफ केल्या म्हणून.” समीर
“व्हय साहेब पण इथं आल्यावर आम्ही दिवाणखान्यातील कपाटं आवरायला घेतली. त्याच्यातच आमचे दोन तीन आठवडे गेले. त्यातल्या एका कपाटात आम्हाला बाकीच्या खोल्यांच्या दाराच्या किल्ल्या मिळाल्या.” शिवा
“मग काय बघितलं का उघडून लगेच?” समीर
“चार पाच खोल्या पाहुण्यांसाठीच होत्या. तीन चार खोल्या सगळ्या सामानानी भरल्या होत्या म्हणजे गाद्या गिरद्या इत्यादी.. आणि तीन चार खोल्या काकांच्या होत्या.” शिवा
“हे कोण काका? ते इथेच राहायचे का?” समीर
“नाही नाही साधारण वीस वर्षांपूर्वीच ते गेले. आणि त्यानंतर ह्या खोल्या बंदच होत्या.” शिवा
“पण ते काय करायचे? कुठे असायचे?”
“आम्हाला त्याविषयी फारशी माहिती नाही. कारण ते गेले तेव्हा आम्ही फारच लहान होतो. पण वस्तीवरची जुनी लोक सांगतात त्यावरून ते उत्तम जोतिषी होते. पत्रिका पाहणे हा त्यांचा छंद होता, त्याचप्रमाणे काही विपरीत घडले तर त्याच्यावर उपाय पण करायचे. शिवा
“विपरीत म्हणजे काय?” समीर
“म्हणजे कुणाला भूतानी धरलं, भानामती झाली किंवा चेटूक झालं तर अशी लोक काकांकडे यायची व काकाही त्यांना मदत करायचे.” शिवा

-१७-
चौकशी सुरु असतानाच एक दीड कधी वाजला हे कळलंच नाही. काशीने साधं पण रुचकर जेवण तयार ठेवलंच होत. जेवण उरकून पाचही जण वाडीवर जायला निघाले. शिवानी त्यांना सर्व वाडी फिरून दाखवली. वाडीचा पसारा अवाढव्य होता. वाडीतच अधून मधून पाडे होते.
प्रत्येक ठिकाणी लोकं कुतूहलाने आम्हा चौघांकडे पाहत होते. समीरने आज फक्त निरीक्षण करायचे असेच ठरवले होते. वाडी फिरून पाहता पाहता संध्याकाळ केव्हा झाली हे कळलंच नव्हतं. मग परत गढीवर जाऊन चहा व फराळ केला.
समीर शिवाला म्हणाला “शिवा हा आमचा तानाजी इथेच राहणार आहे पाच सहा दिवस. त्याला काय हवं नको ते बघ.”
शिवा तयारी करायला निघून गेल्यावर समीरने तानाजीला बोलाविले . “तानाजी तू तुझे सामान गाडीतून काढ. तुला इथे पाच सहा दिवस राहायचं आहे. इथे राहून तू गढीवर लक्ष ठेऊ शकतोस. गढी तर तू फिरून बघितली आहेसच पण रात्रभर तुझी जाग असूदेत.”
तानाजी म्हणाला “ठीक आहे समीर सर. मी बघतो काय करायचं ते.”
“जरा या गड्यांबरोबर व काशीबाईंशी बोलून जरा लोकांचा अंदाज घे.” समीर
रमेशलाही तिथे राहण्याची इच्छा होती पण समीरने त्याला विरोध केला.
“हे बघ रमेश जोपर्यंत आपल्याला निश्चित अनुमान लागत नाही तोपर्यंत इथे थांबायचं नाही.” समीर
तानाजीला तिथेच सोडून तिघेही कुडाळला पोहचले. जेवण तयारच होते.
“काय रमेश काय म्हणतायेत पाहुणे?” मामा
“मामा खूप भूक लागली आहे. अगोदर जेवण करू आणि नंतर गप्पा मारत बसू”
त्याला मंदाच्या समोर विषय वाढवायचा नव्हता.
जेवण झाल्यावर सगळे बाहेर येऊन गप्पा मारत बसले.
“मामा आज फक्त परिसराची टेहळणी केली” समीर
“मग काय सुगावा लागतोय का?” मामा
“अजूनतरी नाही. आजचा दिवस तरी जास्त चौकशी करण्याचा नव्हता त्यामुळे शिवा आणि काशी यांच्याशी जुजबी बोलणी झाली. दोघेही सरळ दिसतायेत.” समीर
“हो त्यांच्या वाडवडिलांपासून ते आमच्याकडेच काम करत आहेत.” मामा
“तसेच तानाजीने ही संपूर्ण गढी फिरून पाहीली त्यालाही काही संशयास्पद आढळल नाही. आज आम्ही कुठल्याही खोल्यांचे फारस निरीक्षण केलं नाही.” समीर
“तस काही असेल असं मला वाटत नाही. कारण त्या सर्व खोल्या साफ सफाई करून झाल्या होत्या.” मामा
“वाडीवरूनही फिरून आलो लोकांशी ओळखी करून घेतल्या. ती सगळी लोकं नाकासमोर जाणारी वाटली.” समीर
“आणि सरपंच काय म्हणत होते ?” मामा
“साधा माणूस वाटला आणि तुमच्या बद्दल तर त्याला फारच आदर होता.” समीर
“अहो देसाई कुटुंब इथे दहा बारा पिढ्या इथे आहे त्यामुळे सगळेच जण ओळखतात. गेली काही वर्षे संपर्क तुटला आहे तरी जुन्या लोकांना अजून जाणीव आहे.” मामा
“मामा तुमच्याकडे एक गोष्ट बोलायची आहे.” समीर
“काय ?”
“आम्हाला काकांविषयी काही माहिती सांगाल का ?”
“हो. तुम्ही ज्याला काका म्हणता तो माझा मोठा भाऊ. आमच्या दोघात पंधरा सोळा वर्षाचं अंतर होत. आम्ही त्याला शंकर दादा म्हणत होतो. शंकर दादा लहानपणापासूनच अतिशय हुशार होता. त्यावेळी इथे शाळा नव्हत्या पण नाही म्हणायला एक शिक्षकी प्राथमिक शाळा होती. माध्यमिक शिक्षणासाठी सावंतवाडीलाच जायला लागत होत. आणि सावंतवाडीला बैलगाडीने प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात तर फारच हाल व्हायचे. त्यामुळे त्याला एका नातेवाईकाकडेच राहायला पाठवले. सात वर्षे तो तिथंच होता ज्यांच्याकडे तो राहायचा ते दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांचे संस्कृत, पाली, मोडीअशा प्राचीन भाषांवर प्रभुत्व होते. शंकर दादा हा आधीपासूनच तल्लख आणि त्यातून घरचा शिक्षक त्यामुळे तो ही बऱ्याच भाषा शिकला. त्याचप्रमाणे मंत्रतंत्रातही त्याची बरीच प्रगती झाली. त्यांच्या मागे लागून तो जोतिषशास्त्र पण शिकला मॅट्रिक नंतर त्याने शाळा सोडली आणि तो झाराप ला आला. परत आल्यावरही त्याने स्वतःची साधना सुरूच ठेवली आणि त्यातूनच त्याची पुस्तक वाढत गेली.
घरची गडगंज श्रीमंती असल्यामुळे त्याला कधी कोणी अडवलं नाही.” मामा
“मग पुढे?” समीर
“त्याच्या साधनेत कोणीही वत्यय आणत नव्हतं आणि घरची काम सांगण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्याने मंत्रसाधना, यज्ञ उपासना सुरु केली. हळूहळू त्याला मुली सांगून यायला लागल्या. पण लग्न केलं तर आपल्या साधनेत व्यत्यय येईल त्यामुळे त्याने लग्न न करण्याचा निश्चय केला. मग त्याची ख्याती आजूबाजूच्या गावातून पसरू लागली. लोकं त्याच्याकडे मदतीसाठी येऊ लागली आणि तेही त्यांना जमेल तेवढी मदत करू लागले. नंतर तर त्यांच्याकडे येणाऱ्यांची रहदारी एवढी वाढली की आजोबानी एक वेगळे दारच करून घेतलं. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता हा मागच्या दारानेच होत होता. एव्हाना काकांनी एक यज्ञकुंड बांधले होते. आजोबांनी त्यांच्या करिता शेवटच्या चार पाच खोल्या वेगळ्याच काढल्या होत्या. आणि त्या भागात जायला बाकीच्यांना बंदी होती. क्वचितच आम्ही सणासुदीला काकांना पाहायचो आणि त्यांच्याबद्दल आम्हाला भीतीयुक्त आदर वाटायचा.” मामा
“काका एकटेच राहायचे का? त्यांना कोणी मदत करायचे का?” समीर
“वाडीवरचा बजाबा नावाचा गडी वाड्यावर राहायचा आणि तो काकांची सर्व सेवा करायचा. त्यालाही बऱ्याच प्राथमिक माहिती झाल्या होत्या. आपण आत्ता जो दिवाणखाना वापरात आहोत तो त्या वेळी फक्त काकाच वापरायचे.” मामा
“म्हणजे गणपतीचं चित्र लावलेलं का?” समीर
हो तेच ते. काकांना देव देवतांच्या चित्रांचा आणि मूर्तीचा फार नाद होता. कुठेही काही विशेष आढळले की ते लगेच घेऊन यायचे.” मामा

-१८-
मामा पुढे सांगू लागले “पूजाअर्चेतील व्यक्तिमत्व व दिवाणखान्यातील व्यक्तिमत्व हे अगदीच वेगळे होते. दिवाणखान्यात ते आले की आमच्या सोबत खेळायचे, आम्हाला फिरायला घेऊन जायचे. बाहेर गेल्यावर असंख्य झाडांची, औषधाची माहिती करून द्यायचे. त्यांना सर्व विषयात रुची होती. एकदा एका पाड्यातून एक बालू आला त्याला म्हणे एक वाघाचे भूत फिरताना दिसले होते. त्याच्याच गोठ्यात एकदा दुपारचा वाघ शिरला त्याने दारं लावून घेतली पण संद्याकाळी बघतो तर वाघ गोठयात नव्हता. बाहेर जायला कुठेही फट सुद्धा नव्हती. हाच प्रकार आजूबाजूला झाल्याचं त्याने सांगितलं. मग कधीतरी त्या वाघांनी खुऱ्याड्यातील कोंबड्या आणि गोठ्यातील काही वासरं नाहीशी केली. कोकणात असे प्रकार नेहमीच होत असतात पण एक वेगळी गोष्ट होती म्हणजे खाल्लेल्या प्राण्यांचा कुठेही मागमूस नव्हता, पण बालू जे सांगत होता ते वेगळंच होत. दोन दिवस तो म्हणे वाघ पाहत होता तो मोठ्ठा होता. मोठ्ठा म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे हत्ती एवढा होता. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने पाहिलेल्या वाघाचा रंग निराळा होता. वाघ हा पिवळसर, काळे ठिपके किवां पट्टे असलेला असतो पण काहींना हा वाघ पिवळा, हिरवा आणि जांभळा दिसला होता. काहीतर शपथेवर सांगत होते त्यांनी वाघाला दोन शेपट्या पहिल्या किंवा दोन डोकी पाहिलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीती पसरली आहे आणि लोक वाडी सोडून जाण्याचा विचार करत आहेत. आज ही तो घाईघाईने आला कारण पाडावरचा एक दहा वर्षाचा मुलगाच बेपत्ता झाला होता. त्याची हाड सुद्धा सापडली नव्हती. वाघांनी जर मुलाला ओढून नेलं असत तर रक्ताच्या खुणा राहिल्या असत्या कुठेतरी जंगलात त्याचा अर्धवट मृतदेह सापडला असता किंवा गिधाड घिरट्या घालायला लागले असते पण यापैकी काहीच झालं नव्हतं. तो मुलगा जणू काही आकाशने गिळल्यासारखा अदृश्य झाला होता.”

- काका-
मी शंकरराव देसाई राहणार झाराप, सरदार देसाईंचा वंशज पण शेती वाडीचे, व्यवहाराची सगळी कामं माझा मोठा भाऊच पाहतो. आता छोटा रामरावही त्याच्याकडे लक्ष द्यायला लागला आहे. मी माझ्या साधनेसाठी स्वतःला मोकळा ठेवला आहे.
आपल्याला दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या जगापलीकडलं विश्व् शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी अशी खात्री आहे की आपल्याला निसर्ग आणि वैश्विक घटना एक टक्का सुद्धा कळल्या नाहीत. ह्या विचारात आपण किती क्षुद्र असतो त्याची जाणीव होते.
विश्वाच्या ह्या पसाऱ्यात आपण मुंगीहून ही लहान आहोत आणि आपली किंमत ही तेवढीच आहे याची जाणीव होते. आणि त्यामुळेच मानवाचे जीवन पृथ्वीबाहेरूनच आले असावे असे माझे ठाम मत आहे. त्यांनी मांडलेल्या कल्पना, गणितावरच प्रभुत्व, खगोलशास्त्री विज्ञान हे आजच्यापेक्षा शेकडो पटीने पुढारलेले होत. त्यामुळेच मी या विषयाला वाहून घ्यायचं ठरवलं होत.
माझ्या साधना चालू असताना, मला हळूहळू काही जागृत होणाऱ्या शक्तीची जाणीव होणे भाग होते. अशा रीतीने प्राप्त झालेले ज्ञान हे फक्त लोकांवर आलेली संकटे दूर करण्यासाठीच वापरणे योग्य होते. थोडक्यात मला तंत्रापेक्षा मंत्रावर जास्त विश्वास होता.

बोला फुलाला गाठ पडावी तश्या काही गोष्टी घडत गेल्या व आजूबाजूचे बरेच लोक त्यांच्या अडी-अडचणी, व्यथा मला सांगायला लागली. मला शक्य होते तोपर्यंत मी ती दूर करत होतो.
आज सकाळचं प्रकरण त्यातलंच. बालू अचानक आला आणि वाघाच्या भुताबद्दल सांगायला लागला. तो घाबरलेला दिसत होता.
“बालू तू शांत हो. तू स्वतः त्या भुताला पाहिलंस का?” काका
“काका अहो ते भूत मला कस दिसणार?” बालू
“अरे मग एवढा का घाबरलास? लोकं काहीही सांगत असतील तू त्यांच्याकडे कशाला लक्ष देतोस. आजपर्यंत एवढे बिबटे पहिले आहेस त्यात कधीही हिरव्या, जांभळ्या रंगाचे पाहिलेस का तरी? त्यातून आपले बिबटे लहान वाघ सुद्धा नाहीत.” काका
“मी नाही पहिले. पण वाडीचे बरेच सांगतात त्यातूनच शेजारचा पोरगा गेला. आता आमच्या मुलाचा नंबर लागू शकतो. म्हणून घाबरलो एवढच.”
“बिबट्या तुम्हाला हत्ती एवढा दिसायला लागला म्हणजे वस्तीवर भट्टी लावलीय.” काका
“नाही काका तस काही नाही.” बालू
“आणि समजा वाघ असला तर मी काय करणार ? मी काही शिकार करत नाही. त्या पेक्षा तुम्ही शिकाऱ्याला बोलवा.” काका
-१९-
बालूची कशीबशी समजूत काढून मी त्याला परत पाठवून दिल. वस्तीवरची लोकही अफवा पसरवण्यात तरबेज होती. एक दोन दिवसातच लोकांनी कोल्हापूरवरून एका शिकाऱ्याला बोलावलं. तो बिचारा दोन चार दिवस फिरून परत गेला. त्याला वाघ काय त्याच शेपूटपण दिसलं नाही.
नाही म्हणता एक चमत्कारीक गोष्ट म्हणजे त्याला जंगलात एक अस्वल दिसल्याच तो सांगत होता. कोकणात अस्वल असणं ही अशक्य गोष्ट होती. शिकारी निघून गेल्यावर आठवडाभर शांततेत गेला. आणि मी जुने ग्रंथ, हस्तलिखितं तपासत होतो पण मला काही कोड्याचे उत्तर मिळेना.
एकदा असं वाटलं की सगळी लोकं खोटं बोलत असावीत. पण प्राणी नाहीसे होणे, मुलगा नाहीसा होणे या तर सत्य घटना होत्या. म्हणजेच या गोष्टीना कुठेतरी पाया होता. वाघांचा वेगवेगळा रंग आणि आकार या कल्पना कपोल कल्पित असल्या तरी त्याला काहीतरी पाया हा असणारच.
आपलं मन फार विचित्र असत. मग ते सापाला दोरी समजतं नाहीतर दोरीला साप समजत. दोन्ही असतात मनाचे खेळच. पण या मनाच्या खेळात दोरी ही दोरीचा राहते आणि साप हा सापच राहतो. वास्तव वास्तवच राहत आणि या वास्तवा पलीकडे कसे जायचं हे मला कळत नव्हतं.
आठ दिवसानंतर सकाळीच वाडीवरची लोकं आली. आणि त्यांनी सांगितलेली हकीकत विचित्रच होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काल तो वाघ परत आला होता आणि एका मुलाला घेऊन गेला. पण या वेळेला तो मागच्या दोन पायावर चालत होता आणि पुढच्या दोन पायावर मुलाला धरले होते. काही मंडळी धीर करून त्याच्या मागे गेली तर तो एका गुहेत शिरताना दिसला.
उजाडल्यावर पंधरा वीस लोकं पहारी, कुदळी आणि दोन तीन ठासणीच्या बंदुका घेऊन गुहेकडे गेले. गुहेत काहीच नव्हते. वाघ ही नव्हता आणि तो मुलगा ही नव्हता. गुहा तशी लहानच होती पण त्यात कुठेही वाघाचे अस्तित्व नव्हते.
एका कोपऱ्यात एक काळसर चिकट पदार्थ पडला होता. त्याला वास, गधं काहीच नव्हता. वाघ आणि मुलगा पूर्णपणे अदृश्य झाले होते.
वाडीवरची लोकं फारच घाबरली होती. मी काहीतरी उपाय करावा म्हणून मला विनवत होती. पण मला काहीच सुचत नव्हते. मी काय उपाय करावा हेच कळत नव्हते.
शेवटी मी त्या लोकांच्या विनंतीला मान देऊन वस्तीवर दोन तीन दिवस राहायला जायचं ठरवलं. दोन दिवसांनी मी वस्तीवर येईन असे त्यांना सांगितले. मला ही तयारी करायला दोन दिवस हवेच होते. अशा वेळेला केव्हा, कुठे, कशाशी गाठ पडेल याचा काहीही भरवसा नसतो. त्यामुळे मला माझ्या संरक्षणाची तयारी करूनच जायला हवे होते. दोन दिवस मी साधनेत मग्न होतो आणि अशा वेळेला मला जेवायचीही शुद्ध राहत नसे. घरच्यांना हे माहित झाले होते. त्यामुळे मला कोणीही बोलवत नसे.
दोन दिवसानंतर मी वस्तीवर पोहोचलो. सगळी लोकं जमा झाली होती त्यातल्या ज्या लोकांना अनुभव होता अशा काही लोकांशी मी एक एकटे बोलायचं ठरवलं. त्या करता मी एका खोलीत बसून त्या चार पाच जणांना आत बोलावलं. नंतर संमोहन शास्त्राचा उपयोग करून प्रत्येकाशी बोललो.
त्यांचे अनुभव खरे होते अर्थात जाणवलेल्या गोष्टी आणि सांगितलेल्या गोष्टी यांच्यात तफावत होती आणि ती तशी असणे स्वाभाविक होते. दुपारी जेवुन मी मस्त ताणून दिली कदाचित रात्रीच जागरण झाल असत.

अंधार पडायला लागल्यावर मी वस्तीभोवती मंतरलेले तीळ टाकायला सांगितले आणि माझ्या खोलीतही काही बंदोबस्त केला. तो प्राणीच असण्याची शक्यता होती. जर काही अतिमानवी असले तर तयारीची गरज होती. रात्री माझ्या भोवती गराडा पडला. त्यातील मोजकेच चार पाच जणांना सोडून इतरांना मी घरी पिटाळलं. मध्यरात्र होऊन गेली होती. आज तरी काही घडले नव्हते. पहाटे दोन नंतर कोणाची तरी चाहूल लागली होती पण कुठल्याच प्राण्याचा किंवा श्वापदांचा कुठेही मागमूस नव्हता. उजाडल्यावर आजूबाजूला फिरून पाहिलं तर संशयास्पद असे काहीच आढळले नाही.

सूर्य वर आल्यावर चार पाच जणांना घेऊन गुहेकडे जायचे ठरवले. अर्थात मी सांगितल्या शिवाय कोणीही गुहेत प्रवेश करायचा नाही असे बजावले.
वाडी पासून तीन चार किलोमीटर अंतरावर ती गुहा होती. गुहा कसली एक दरड कोसळून झालेला मोठा खळगा होता. गुहेच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साठले होते. त्यात काही वस्तू पर्यटकांच्याही दिसत होत्या.
कचरा केव्हापासून होता कुणाला माहित पण जुन्या काळचा असावा कारण त्यात लाकडाच्या वस्तू, भंगलेल्या मूर्ती, काचांचे तुकडे असे पसरले होते पण प्लास्टिकचा अवशेषही नव्हता.
सगळं फिरून काहीच कळलं नाही. पण माझ्या अंतर्मनाला तिथे काहीतरी असल्याचा भास होत होता. सामान्यतः काही शक्तीचा मनाला स्पर्श झाला की माझ्या सारख्या तयार मनाला त्या शक्तीचे गुणधर्म त्याचे दोष याची थोडीफार जाणीव व्हायला लागते. पण इथे काहीतरी असावं एवढीच गोष्ट मनाला स्पर्श करत होती.
बराच वेळ तिथे आजूबाजूला फिरण्यात गेला. दुसऱ्यादिवशी परत येऊन गुहेत जायचे ठरवले. वस्तीवर परत आलो. कालसारखीच काळजी घेतली. त्या दिवशी रात्रीचे भास जास्त स्पष्ट होते. वाघ किंवा अस्वल यांच्यासारखं काही दिसलं नाही तरीही मनावर दडपण आले होते. सकाळ झाल्यावर दडपण कमी झाले. काल सारखेच परत पाच सहा जणांना घेऊन गुहेत शिरलो गुहा दोन तीन खणाची असावी. आम्ही आज पेट्रोमॅक्स दिवे, कुदळी, फावडी अशा तयारीनेच आलो होतो. बरोबरच्या पाच सहा जणांना मी संरक्षक गंडे दिलेच होते. अर्थात कशाचा सामना करायचा आहे हे माहिती असल्याशिवाय अशा गंड्याना फारसा अर्थ नसतो पण ते घातल्यावर मानसिक धैर्य मात्र नक्कीच येते.
गुहेत पेट्रोमॅक्स दिवे लावले आणि लख्ख प्रकाश पडला. गुहा स्वछ होती. गुहेच्या भिंतीसमोरच एक मोठी फरशी उभी होती. जुन्या काळच्या ब्रिटिश वाड्यात अश्या मोठ्या फरश्या भिंतीवर लावायची पद्धत होती. त्याच्यावर असलेले नक्षीकाम क्लिष्ट होते.
ती फरशी तेथे कशी आली कळायला मार्ग नव्हता. खरं सांगायचं झालं तर ती फरशी तांत्रिक वाटत होती. त्यावरची नक्षी ही आजपर्यंत न पाहिलेल्या परंतु साधर्म्य असलेल्या यंत्रासारखी होती. त्यादिवशी आम्ही परत आलो आणि वाडीवरच्या काही वृद्ध लोकांशी बोलत बसलो.
“खाशाबा तुका काय आठवत का?” मी
“काय मालक कशाबद्दल म्हणताय?” खाशाबा
“अरे त्या गुहेत एक मोठी फरशी होती ती आपल्याकडची वाटत नव्हती.” मी
“तिथला राडारोडा बऱ्याच वर्षपासून पडलेला आहे. चाळीस पन्नास वर्षपूर्वी ती गुहा नव्हतीच. दरड कोसळल्यामुळे ती तयार झाली एवढच. त्या घळीच्या वरती एक पोर्तुगीज चर्च आणि त्या लोकांची छोटी स्मशान भूमी होती. त्या धडपडीत ते चर्च दुभंगल आणि बऱ्याच वस्तू ती लोकं घेऊन गेली पण काही वस्तू आणि राडारोडा तसाच टाकून गेले. आमच्यापैकी तिकडे कोणी सहसा जात नाही. पोर कधीकधी जनावर चरायला घेऊन जातात. तुम्ही म्हणता ती फरशी त्या काळातील असावी.” खाशाबा

मनाला काही संवेदना होऊ लागल्या होत्या. गुप्ततेचा एक एक पापुद्रा उलगडू लागला होता. त्या रात्री संरक्षककडे अधिकच कडक करून आम्ही झोपलो. मला आता अंधुकशी जाणीव झाली होती.
वस्तीवरच्या लोकांना त्या बाजूला न फिरकण्याबद्दल सांगून मी गढीवर आलो. पुढचे दोन तीन दिवस गढीत बरीच तयारी केली. काही बांधकाम करायचे होते. गणपतीची चित्र करून घ्यायची होती. बजाबाला सविस्तर सूचना द्यायच्या होत्या.
बजाबाचं एक बरं असत सांगितलेली कामं तो मुकाट्यानं करतो. का? कशाला? असे प्रश्न त्याच्या डोक्यात नसतात. आणि जरी असले तरी तो विचारत नाही.
परत एकदा मी वस्तीवर गेलो. बजाबा लोकांशी बोलला आणि त्याने परिस्थितीच गांभीर्य सगळ्यांना समजावून सांगितलं. त्यांच्या करीता काकांनी जीव पणाला लावला आहे आणि त्यामुळे काका जे काही सांगतायेत ते पूर्णतः ऐकावं असं ही त्याने ठासून सांगितलं. दुसऱ्यादिवशी सकाळी आम्ही जय्यत तयारीनिशी चार पाच जण परत गुहेकडे गेलो. तिथला राडारोडा तपासायला सुरवात केली त्यामध्ये एक संगमरवरी पेटी सापडली त्याची कडी मोडलेलीच होती. ती पेटी छोट्याश्या धक्क्याने उघडत होती.
जरी ती पेटी संगमरवराची असली तरी कसली कसली चिकट थर चढून ती गलिच्छ झाली होती. पेटीचा आकार साधारण आठ बाय सहा इंच आणि उंची तीन इंच एवढा होता. लोकांना बाजूला जायला सांगून मी ती पेटी उघडली आणि....

-२0-
-मामा -
त्या दिवसापासून काका स्वतःच्या तंद्रीत राहू लागले. दोन तीनदा ते वस्तीवर राहायला गेले. त्यांच्या साधना जोरात सुरु होत्या. मध्येच त्यांनी गणपतीची चित्रं करून घेतली. काही बांधकाम साहित्य आणलं. हे कशासाठी असं विचारण्याची हिम्मत कोणालाच होत नव्हती. थोडीफार माहिती असलेला बजाबा होता. पण त्याला विचारणं म्हणजे लाकडी ठोकळ्याला विचारण्यासारखं होत

बजाबा सतत त्यांच्याबरोबर असायचा. एक दिवस काका वस्तीवरून आल्यावर त्यांच्या पूजाघरात गेले. त्यावेळी फक्त बजाबा त्यांच्याबरोबर होता. आणि त्यानंतर ते कुणालाच कुठे दिसले नाहीत. पण दुसऱ्यादिवशी बजाबानी दिवाणखान्यातील एका कपाटात विटांचे बांधकाम केलं आणि त्यावर गणपतीचे चित्र लावले आणि तो कांही न बोलता निघून गेला.
नंतर त्याला कितीही खोदून विचारलं तरी तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.
“असं आहे तर. या बेपत्ता होण्याच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत आणि आत्ताच त्या गोष्टी परत व्हायला लागल्या आहेत. दोन्हीमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे असं मला वाटत. आता बघूया तिथे काही सापडतंय का?”
“आम्हाला प्रत्यक्ष अनुभव नाही पण काकांनी मदत केल्याचं बरेच लोक सांगतात. एवढ्या वर्षानंतरच ह्या गोष्टी परत सुरु का व्हाव्यात?”
“काही कल्पना नाही बुआ.” मामा
“मामा प्रत्येक गोष्टीतला काही कार्यकारणभाव लागतो. एखादी गोष्ट एवढ्या वर्षांपूर्वी झाली, परत झाली नाही आणि परत सुरु झाली. तर तुम्हाला काही आठवतंय का?”
“काही आठवत नाही. एकच गोष्ट असू शकते की काकांची खोली बऱ्याच वर्षांनी उघडली गेली.
“म्हणजे काकांच्या खोलीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का?”
“काहीच माहित नाही. पण खोल्या साफ केल्यानंतर एक दीड महिन्यांनी या प्रकरणाची सुरवात झाली असावी. जर खोलीशी काही संबंध असता तर खोली उघडून साफ केल्यावरच व्हायला हवे होते. म्हणजे आता झारापला जाऊनच बघायला पाहिजे. कदाचित मला अजूनही काहींची मदत लागेल. त्यातल्या एकाची सोय आपल्याला या बंगल्यात करावी लागेल. बाकीचे हॉटेल शोधतील. जर काही अडचण असली तर एखादा बंगला भाड्याने मिळतो का ते बघायला लागेल. तशी काही जरूर नाही. बघूया आपण काहीतरी तडजोड करू.” समीर

-२1-

- झाराप -
दुसऱ्यादिवशी परत झाराप ला गेलो. आजमात्र वाडीवरील वस्त्यांवरच जायचं ठरलं होत. समीर, कुणाल, रमेश, तानाजी, सरपंच आणि शिवा एवढ्याची वाडीला जाण्याकरिता एक टीम तयार झाली होती. रमेश, कुणाल, आणि सरपंच व समीर, शिवा, तानाजी असे दोन भाग पाडून दोन्ही टीमने वेगवेगळ्या चौकश्या करायचे ठरवले.
कुणाल चांगला बातमीदार होता आणि शोधक पत्रकारितेचं सर्व गुण त्याच्यामध्ये होते. सरपंच त्याच्याबरोबर जायचं कारण म्हणजे लोकांनी बोलत व्हावं हा हेतू होता. कुणीही सरकारी अधिकारी आला की लोकांच्या खऱ्या खोट्या तक्रारी सुरु होतात. त्याचाच खरे खोटे पणा बघण्यासाठी कुणाल हा चांगला होता.
तर लोकांच्या पोटात आणि मनात शिरून आतली माहिती बाहेर काढण्यात समीर आणि तानाजी तरबेज होते. समीर काय बोलतोय पण खर त्याला काय म्हणायचं आहे. हे तानाजीला लगेच कळायचे.
कुणाल च्या टीमने आत्ता बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती काढावी आणि समीर ने काका आणि काही वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाची माहिती घ्यावी असं ठरलं.
संध्याकाळी मामांच्या बंगल्यात त्याच्यावर ओहापोह झालाच असता.
कुणाल व सरपंचानी वस्तीवरच्याच कुणालातरी बरोबर घेऊन ज्यांच्या घरच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यांच्याकडे जायचं ठरवलं. या सगळ्या मुली कामासाठी वाड्यावर जात होत्या आणि तीन चार दिवस झाल्यावर बेपत्ता होत होत्या.
कुणाल चा दिवस ही सगळी माहिती गोळा करण्यात गेला होता. माहिती तर बरीच माहिती पण ठोस उत्तर काही हाती लागले नाही. वस्तीवरील बऱ्याच लोकांना सुहासचा संशय येत होता. सुहासनेच या मुलींना आमिष दाखवून गायब केले असावे असे त्यांना वाटत असावे. सुहास दिसायला राजबिंडा होता. हातात भरपूर पैसा खेळत होता आणि शहरात वावरलेला होता.
या मुलींना भूल पडायला लागणारे सर्वगुण त्याच्यात निश्चितच होते. कुणीतरी अशी शंका काढली की सुहासने या मुलींना गायब करून मुंबईला विकले असावे. अशा मुलींचा व्यापार होतो हे लोकांना कळाले होते. पण सुहास गायब झाल्यावर तो मजा मारायला मुंबईला गेला असावा अशी अनेकांनी समजूत करून घेतली.

समीर, तानाजी आणि शिवा यांनी खाशाबाची वस्ती गाठली. शिवाला माहिती असलेला तोच सगळ्यात वृद्ध होता.
मामानी काही जुन्या हकीकतीत पूर्वी काही वाघांनी प्राणी व काही मुलांना नेल्याचं सांगितलं होता त्याच्याबद्दल समीर ला खात्री करून घ्यायची होती.
“काय खाशाबा आज बाहेर नाय पडला?” शिवा
“नाही आता कमी दिसत म्हणून घरात बसूनच देव देव करत असतो. पोर मोठी झाली आहेत लेकीसुना काळजी घेतात. छान चाललय.” खाशाबा
“खाशाबा तुला काका आठवतात का?” शिवा
“न आठवायला काय झालं, इतका काय मी म्हातारा नाही झालो अजून.” खाशाबा
मग समीरकडे वळून तो म्हणाला “काका म्हणजे देव माणूस, अडलेल्या नाडलेल्याना मदत करायचा. इथे त्यावेळा वैद्य नव्हता त्यामुळे कोणी आजारी पडला की त्याच्याकडे जायचे. झाडपाल्याच्या औषधांची त्यांना बरीच माहिती होती. अगदी देव माणूस होता तो”. “नेहमीच ते वस्तीवर यायचे का?” समीर
“नाही. कुणाला अडचण असली किंवा कुणी बोलावलं तर मात्र हमखास यायचे.” खाशाबा
“खाशाबा, मी आता येताना सुपारीच्या बागा पाहिल्या. त्यात राखणीकरिता कुत्रे ठेवले होते पण कुत्रे पिंजऱ्यात होते. पिंजऱ्यात राहून ते राखण कशी करणार ?” समीर
“त्याच काय आहे साहेब सुपारी म्हणजे नगदी पैसा. चोऱ्या भरपूर होतात. आणि चोरांची चाहूल लागली की कुत्री भुंकायला लागतात मग सगळी वस्तीच धावून जाते.” खाशाबा
“अरे पण त्यांना पिंजऱ्यात का ठेवता मोकळे का सोडत नाही?” समीर
खाशाबा हसून म्हणाला
“त्याच काय आहे साहेब कुत्र मोकळं असलं तर एखाद्यावेळेस बिबट्या त्याला घेऊन जातो आणि एक कुत्रा मारला की तो चटावतो.”
“काय रे खाशाबा कोकणात बिबटे तर नेहमीचेच आहेत. काही वर्षांपूर्वी एक मोठ्ठा वाघ आला होता असं मी ऐकलं.” समीर
“हो. त्यावेळेला बरीच गडबड झाली होती खरं. काही चरणारी गुर आणि दोन तीन पोरांना पण त्यांनी उचलून नेलं. वस्तीवरचे सगळेच फार भेदरलेले होते. घराबाहेर पडायची कोणाची तयारी नव्हती.” खाशाबा
“मग हे सर्व थांबलं कस?” समीर
“अहो आमचा देव होता ना. काही झालं की काकांकडे धाव घ्यायची ठरलेलं होत. त्या वेळेस ही लोकं त्यांच्या घरी गेली आणि सर्व हकीकत सांगितली. काकांनी त्या सर्वाना धीर दिला आणि आम्हाला धीर द्यायला ते चार -पाच दिवस वस्तीवर राहिले.” खाशाबा
“मग काय झालं?” समीर
“त्यांनी सगळीकडं शोध घेतला, दोन तीन किलो मीटरवर रानात एक पडीक चर्च आणि त्याच्या खाली असलेली घळी सारखी गुहा. तिथं पडलेला राडारोडा याचा त्यांनी बारीक तपास केला. काकांचं वाचन फार दांडग होत. तसेच त्यांना मंत्रविद्याही येत होती. अडी-अडचणीला तेच धावून यायचे.” खाशाबा
“मग त्यांनी काय केले” समीर
“त्यांनी वाड्यातून मोठ्या दोन तीन पेट्या आणल्या. पेटीत कायबाय वस्तू होत्या. एका पेटीत गुहेतील संगमरवरी फरशी आणि दुसऱ्या पेटीत तिथेच असलेल्या दोन लहान पेट्या ठेवल्या. पेट्याना जाडजूड कुलुपं लावली आणि सर्व बाजूला कसलेतरी शिक्के मारले.” खाशाबा
“मग कुठे आहेत त्या पेट्या.” समीर
“आमच्या लोकांनी त्या वाड्यावर पोहचवल्या आणि बजाबानी त्या ताब्यात घेतल्या. पुढं काय झालं माहित नाही. पण काकांनी जाताना आम्हाला वाड्यातून आणलेलं पाणी दिल ते विहरीत ओतायला सांगितलं. आमच्या सर्व वस्तीवर सडा घालायला सांगितला. तसेच पाणी नेऊन त्या राडारोड्यावर आणि गुहेत शिंपडायला सांगितलं.” खाशाबा
“मग ती गुहा अजून आहे का?” समीर
“काकांनी तो राडारोडा त्यात टाकून ती गुहा पक्क्या बांधकामाने बंद करायला सांगितली आणि बांधकामावर एका देवीची मूर्ती चौकटीत ठेवायला सांगितली. त्यामुळे ती गुहा तेथे नाही.” खाशाबा
“मला तेथे जाऊन बघायला पाहिजे.” समीर
“गुहा तर नाही पण पडीक चर्च व त्याच्याखाली आम्ही केलेलं बांधकाम एवढे मात्र अवशेष आहेत.” खाशाबा
“आम्हाला तिकडे कोणी घेऊन जाईल का?” समीर
“हो. पूर्वी तिथं जायला भीती वाटायची. आता पोर पण खेळायला जातात आणि गुरं चरायला पण जातात. गेल्या कित्येक वर्षात तसा काही प्रकार घडला नाही. हा तुमच्या बरोबरचा शिवा पण घेऊन जाईल की, पण तुम्हाला एक मुलगा पण देतो. तो दाखवील वाट.” खाशाबा
खाशाबांनी एका पोराला हाक मारली आणि आमच्या बरोबर गुहेकडे जायला सांगितले.

-२2-
रस्ता अतिशय कच्चा होता. गेली कित्येक वर्ष वापरात नसल्यामुळे रस्ता असून नसल्यासारखाच होता. शेवटी त्या मुलाला घेऊन हे त्रिकुट चालतच गेले.
बांधकामात बघण्यासारखं असं काहीच नव्हतं. जांभ्या दगडात केलेलं पक्क बांधकाम होत. त्यातल्या एका कोनाड्यात मूर्ती होती. कसली होती कोण जाणे. समीरने त्या मूर्तीचा फोटो काढला आणि नंतर नेटवर बघायचं ठरवलं.
थोडेसे चालून ते मोडक्या चर्च जवळ गेले. चर्च पडीक अवस्थेत होते. सगळीकडे झाडी वाढलेली होती. तिथेही बघण्यासारखं काहीच नव्हतं.
चर्च मध्ये असताना समीर ला एका गोष्ट कळून चुकली की जी गुहा होती ते चर्च च तळघर होत. आणि पूर्वीपासून महत्वाच्या व्यक्तीची प्रेतं, जवळ जर दफन भूमी नसेल तर अशाच तळघरात ठेवली जायची. तस तिथंही असावं त्यामुळेच तिथं वेगवेगळ्या वस्तू आणि संगमरवरी फरशी लोकांना सापडल्या असाव्यात.
म्हणजे नक्की काय झालं असावं हे तिघानाही कळलं नाही. एका दोन तास फिरून ते वस्तीवर परत आले आणि गाडी घेऊन गढीवर आले.

दुसरी टीम तिथं पोहचलीच होती. त्यांचे निम्मेच काम पूर्ण झाले होते. त्यामुळे दुसऱ्यादिवशी झाराप ला येऊन पुढील माहिती काढणे भाग होते.सगळेजण शेवटी कुडाळला परतले. तानाजी मात्र गढीवरच राहिला. त्याच्या सोबतीला ते दोन गडी होतेच. जेवण खाण्याचं बघायला काशीही होतीच.

कुडाळच्या बंगल्यात जेवण झाल्यावर परत एकदा मिटिंग बसली. समीर ने पडके चर्च, पडझडीत तयार झालेली गुहा त्याला कळलेल्या गोष्टी आणि त्याचा अंदाज असे सविस्तर माहिती मामांना सांगितली. दुसरी टीम अकरा बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन आली होती. सर्व बेपत्ता व्यक्तीच्या घरच्यांची एकच कथा होती.
सर्व बेपत्ता व्यक्ती मुली किंवा बायकाच होत्या. वय वर्ष वीस ते तीस. गढीवर कामाला जायच्या. चांगला पगार मिळायचा, चांगलंचुंगलं खायला मिळायचं असं घरी आल्यावर भरभरून बोलायच्याआणि संध्याकाळी काशी आली की परत यायच्या.
आणि मग चार पाच दिवसांनी बेपत्ता व्हायच्या. दर वेळेला काशी आरडाओरडा करायची, की या पोरी ती यायच्या आधीच निघून जायच्या म्हणून. नंतर काहीच पत्ता लागायचा नाही.

सर्व जणी अश्याच बेपत्ता झाल्या होत्या. भुमीने गिळलं का वाऱ्यात विरून गेल्या काहीच कळायला मार्ग नव्हता. अतिशय गूढ रित्या सर्व हकीकती होत्या.
“कुणाल तुम्ही उरलेल्या पाच सहा व्यक्तींच्या घरी जा. पण त्यांच्याही अश्याच हकीकती असणार. पण आपल्याला तर केस पूर्णतः तयार केलीच पाहिजे. कधी, कुठे, कसला धागा हाती लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपण बारकाईने सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत.” समीर
“हो. तू म्हणतो आहेस ते खरं आहे.” कुणाल
“मामा एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का ? पूर्वी वस्त्यावरची काही मुलं बेपत्ता झाली. नंतर काका बेपत्ता झाले ते शेवटचं मध्ये कित्येक वर्ष काही घडलंच नाही. आता परत ही मालिका सुरु झाली आहे ती सुहास गढीवर राहायला गेल्यावर.” समीर
“अरे पण काका गेल्यावरही आम्ही कित्येक वर्ष गढीवरच होतो तेव्हा काहीच झाले नाही.” मामा
हो. ना. सुहास राहायला गेल्यावर तीन चार महिने कुठं काय झालं? त्याने कुलुपं लावलेल्या खोल्या साफ केल्यावर आणि खास करून काकांच्या खोल्या साफ केल्यावर काहीतरी घडले.” समीर
“पण असे काय घडले?” मामा
“मामा, अहो काही शक्ती जाणवायला काहीतरी साधन तरी लागते किंवा अतींद्रिय ज्ञान तरी प्राप्त झालेले असावे लागते. आता आपल्याला वीज कडाडलेली दिसते, ऐकू पण येते, पण घरच्या वायर मधून वाहणारी वीज दिसते का? तसेच काहीसे या शक्तीबद्दल असते. काही विशिष्ठ परिस्थितीत त्यांची जाणीव होते. बाकी वेळेला आपल्याला त्यांचे अस्तित्वही जाणवत नाही. माझे त्यातले ज्ञान फारच तोटके आहे. पण मनोदेवता मला असं सांगते की या कामात आपल्याला माझ्या अजून एका परिचिताची मदत लागेल.” समीर
“म्हणजे हा भुताटकीचा प्रकार आहे असं तुला वाटत का?” मामा
“मामा, आपण एक फार मोठी चूक करतो. आपण सगळ्याच दुष्ट शक्तींना म्हणजेच आपल्याला अपायकारक शक्तींना भूत म्हणतो तर चांगल्याना देव म्हणतो.” समीर
“म्हणजे काय?” मामा
“म्हणजे बघा, तापमान, वेग, एखाद्या वस्तूची उंची, प्रकाश, आवाज या व अशा अनेक न दिसणाऱ्या शक्ती आहेत ही प्रत्येक शक्ती माणसाला मदत करू शकते किंवा त्रासही देऊ शकते. गुलाबाचा वास आणि गटारीचा वास दोन्ही आपण आनंदाने घेतो का? चित्राकडे किंवा टीव्ही कडे आपण तासंतास बघू शकतो तसे सूर्याकडे पाहणे आपल्याला जमेल का? सूर्य झाडांना जीवन देतो तसे वणवे ही लावतो. थोडक्यात शक्ती ह्या सुष्ट किंवा दुष्ट ही नसतात तर आपल्यावर होणाऱ्या परिणामामुळे आपण त्यांना सुष्ट किंवा दुष्ट म्हणतो.” समीर
“खरं आहे रे समीर.” मामा
“या बाबतीतही अशीच काही शक्ती असावी असे वाटते आणि त्याचे उत्तर काकांच्या खोलीतच दडलेले आहे.”
“बघा काय करायचं ते पण जरा जपून करा.” मामा
सर्वानी ती रात्र अस्वस्थेतच घालवली. समीरने दुसऱ्या दिवशी झारापला जाण्याऐवजी घरातच राहणे पसंत केले. त्याच्या लॅपटॉपवरून त्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या.
सरपंच आल्यावर, सरपंच, रमेश आणि कुणाल झारापकडे रवाना झाले.

-२3-
समीरने त्या मूर्तीचा फोटो नेटवर अपलोड केला व त्या मूर्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. लवकरच त्याला ती मूर्ती मध्ययुगातील पण सुमेरियन संस्कृतीची असावी असं कळलं.
काही ख्रिश्चन पंथात ती मूर्ती मंत्र तंत्रासाठी वापरली जायची. ती त्यांची संरक्षक देवता होती. पण हा प्रश्न पुढे कसा सोडवायचा हे त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने शेवटी आदित्यनाथांना फोन करायचं ठरवलं. आदित्यनाथ फोन वापरत नसत. त्यांच्या साधनेत फोनचा व्यत्यय त्यांना नको असे. त्यामुळे ते जिथे राहत असतील तिथल्या लॅण्डलाइनचा नंबर त्यांच्या बरोबरच्या माधवला माहित असायचा. त्यांचा मुक्काम बहुतेकवेळेला सज्जन गडावर असायचा. तिथले उत्तम हवामान त्यांचा साधनेसाठी अनुकूल असायचे.
साधी राहणी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या साधनेत व्यत्यय न
आणण्याची पूर्ण खबरदारी इतर लोक घ्यायचे. अर्थातच त्यांचे भ्रमण हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही असायचे त्यांचं ठिकाण व तिथला फोन नंबर फक्त माधवलाच माहित असायचा.
समीरने फोन केला. फोन अपेक्षेप्रमाणे माधवनेच घेतला.
“हा बोला समीरभाऊ काय म्हणताय?” माधव
“कुठे आहेत ते ?” समीर
“दोन दिवसापूर्वी ते ऋषिकेश मध्ये होते. उद्यापर्यंत फारतर परवापर्यंत गडावर येतील. आल्यावर मी तुमचा निरोप देतो.” माधव
“माधव त्याच असं आहे. मला त्यांच्याशीच जरा बोलायचं होत.” समीर
“ठीक आहे. मग तुम्ही परवा फोन करा” माधव
दोन दिवस समीर तसा रिकामाच होता. या दोन दिवसात त्यांनी गोव्याला जायचं ठरवलं. त्याला तेथील जुन्या पोर्तुगीज चर्चचा अभ्यास करायचा होता.
संध्याकाळी कुणाल, रमेश आल्यावर परत गप्पा मारत बसले .नवीन असे काहीच हाती लागले नव्हते. नाही म्हणायला बजाबाच्या घरी त्याच्या मुलाने रमेशला एक ताईत दिला.
“रमेशभाऊ तुम्ही जर गढीवर राहणार असलात किंवा वारंवार जाणार असाल तर हा ताईत मात्र बांधा.”
“हे काय आहे” रमेश
“बजाबाने मरताना हा ताईत मला देऊन तो सुहासला द्यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी त्याला दिला. त्यानंतर मुली बेपत्ता झाल्यावर त्यांचा शोध वाड्यावर घेताना हा ताईत मला टेबलावर सापडला.
छोट्या मालकांना विचारला असता त्यांनी त्याची काही जरूर नाही असं सांगितलं. मग मी ताईत घेऊन आलो. त्यानंतर आठवड्याभरातच छोटे मालक बेपत्ता झाले. रमेशभाऊ हा ताईत तुम्ही वापरावा असं मला वाटत.”
काकांनी काही निश्चित हेतूनेच तो बजाबाला दिला असणार असं सांगितलं.
पुढच्या दिवशी फक्त गढीचा शोध घ्यायचं ठरले. मामाही बरोबर जायला तयार झाले आणि शेवटी सर्वजणच झारापला गेले.
रमेशनी मनोभावे काकांच्या खोलीतील देवळासमोर प्रार्थना करून ताईत दंडात बांधला. मामा बरेच दिवस झारापला किंवा वाडीवर आले नव्हते म्हणून दुसऱ्या गड्याला घेऊन ते वाडीवर गेले आणि जेवणापर्यंत येतो असं ते जाताना सांगून गेले.
काशीने सर्वाना चहा दिला आणि ती स्वंयपाकाच्या तयारीला लागली. या चौघांना गढीचा काही भागच बघायचा होता म्हणून त्यांनी दोन टीम करायचे ठरवले. समीर व कुणाल यांनी काकांच्या खोल्या बघायच्या तर रमेश, तानाजी आणि शिवा यांना दोन्ही दिवाणखान्यातील कपाटं बघायला सांगितली.
समीरने काकांच्या देवघरात जाऊन देवांना नमस्कार केला आणि सगळं सुखरूप होऊ दे म्हणून प्रार्थना केली. कपाटं बघता बघता त्यांना बरेच ग्रंथ, पूजेचे साहित्य दिसले.
पुस्तके बघता बघता काही पुस्तकांच्या मागे समीर ला एक चोर कप्पा दिसला. तो उघडाच होता. आत एक मखमली पेटी होती तिला मात्र कुलूप होत. समीरने ती पेटी बाहेर काढून ठेवली.
इकडे बाहेर दिवाणखान्यातील कपाटं उघडून बघण्याचं काम सुरु झालं होत. कपाटं बघता बघता एका कपाटात त्यांना पितळेच्या डब्यात बऱ्याच किल्ल्या सापडल्या. त्या त्यांनी बाहेर काढून ठेवल्या.

समीरने आत जाऊन यज्ञकुंड तपासले. यज्ञकुंडच्या खोलीतून अजून एक दार होते ते बहुतेक गढीच्या बाहेर पडत होते. त्याला आतून भक्कम कुलूप होते. याचा अर्थ आतून दार उघडल्याशिवाय त्या दारातून बाहेरून कुणीही आत येणे शक्य नव्हते. तो परत देवघरातून अलिकडल्या खोलीत आला. ही काकांची झोपायची खोली असावी. काकांना पेंटिंगची बरीच आवड दिसत होती.
तिथे नेहमीच्या वापरातील काकांचे सामान होते. कपडे, पायताण इत्यादी.. सगळं काही जागच्या जागी होते. म्हणजे काका स्वतःहून बेपत्ता झाले नव्हते.
प्रत्येक दिवशी बेपत्ता होण्याचे कोडे अधिकच वाढत होते. समीर आता पेटी घेऊन दिवाणखान्यात आला. रमेश ची बहुतेक सगळी कपाटं बघून झालीच होती.
समीरच्या हातात ती पेटी पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. देवघरातील पेटी असल्यामुळे आत काय असावे अशी सगळ्यांनाच उत्सुकता होती. रमेशनी त्यांना प्रचंड किल्ल्या सापडल्याचं सांगितलं.

एका पाठोपाठ सर्व किल्ल्या त्या पेटीला लावून बघितल्या. शेवटी त्यातली एक किल्ली त्या पेटीला लागली. पेटीच्या आत एक भूर्ज पत्र होते. त्याच्यावर प्राचीन मोडी लिपीत काहीतरी लिहलेलं होत. पेटी बंद करून ते नंतर वाचावं असं ठरलं व पेटीला कुलूप लावून ती बाजूला ठेऊन दिली.
“समीर ही सगळी कपाटं पाहताना या दिवाणखान्यातील एक कपाट जरा वेगळच आहे. कपाटाला दार तर आहे पण आत कपाटं नाही.” रमेश
“तू काय म्हणतोयस?” समीर
“त्या कपाटाच दार उघडलं की आत गणपतीचं मोठं चित्र आहे. काही कळत नाही. चल तुला दाखवतो.” रमेश
सगळेजण त्या कपाटाकडे गेले. कपाटाचे दार उघडल्यावर आत गणपतीचे मोठे चित्र दिसले. हे चित्र असे का आहे आणि ते कपाटात का ठेवले आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता.
चित्राच्या खालच्या भागातील पोपडे पडले होते. याचा अर्थ चित्राच्या मागे काहीतरी असावे. चित्र ओढून तर निघत नव्हते. बारकाईने निरीक्षण केल्यावर त्यांना एक छोटे की होल दिसले. किल्ल्यांचा जुडगा तयार होताच. सगळ्या किल्ल्या लावून पहिल्या पण कुठलीच किल्ली लागत नव्हती. तेवढ्यत समीरला तसेच चित्र काकांच्या बेडरूम मध्ये दिसल्याच लक्षात आलं.

“अरे रमेश असेच चित्र काकांच्या खोलीत पण आहे. आणि त्या चित्राचा ह्या चित्राशी काहीतरी संबंध असावा का? चला पाहू या.” समीर

-२4-
सर्वांचा मोर्चा काकांच्या खोलीकडे वळला. तिथे तसेच चित्र होते. ते ठोकून पाहिल्यावर मागे पोकळ आवाज आला. ते चित्र लगेच बाजूला सरकवता आले. आत अजून एक पेटी पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. ती ही पेटी दिवाणखान्यात आणण्यात आली. आणि किल्ल्यांच्या जुडग्यातील एक किल्ली तिला लागली. पेटीत एक किल्ली व भूर्जपत्र होत.
“रमेश मला वाटते ही त्या गणपतीच्या चित्राच्या कुलुपाची किल्ली असावी. पण आपण उघडायची घाई करायला नको. आपण फक्त किल्ली लागते का बघू?” समीर
“असं का? किल्ली लागत असली तर उघडून पण बघू की?” रमेश
“नको. ज्या अर्थी काकांनी एवढी सुरक्षा बाळगली आहे म्हणजे त्या अर्थी ते दार सहजासहजी उघडले जाऊ नये असे त्यांना निश्चितच वाटत असणार. आपण जरा काही इतर पाहणी करू. बाकीच्या कपाटं सारखं हे फक्त भिंतीतलंच आहे की अजून काही आहे हे प्रथम बघू.” समीर
वाडा जुना असल्यामुळे भिंती चांगल्याच जाडजूड होत्या. त्यामुळे सगळी कपाटं भिंतीतलीच होती.
“शिवा आपल्याकडे मोठा टेप आहे का?” समीर
“म्हणजे काय?” शिवा
“अरे अंतर मोजायला असतो. पन्नास फूट, साठ फूट. त्याची अशी गुंडाळी करता येते.” समीर
“नाही. असं काही पहिल्याच आठवत नाही.” शिवा
तसा टेप झारापला मिळणं अवघडच होत. शेवटी कुडाळ वरून टेप घेऊन दुसऱ्यादिवशी यायचं ठरलं.
मामा अजून वाडीवरून आले नव्हते. पण दोन गाड्या असल्याने एक गाडी मामांकरिता मागे ठेवणे शक्य होते. काशीने जेवण तयारच ठेवले होते. सर्वानी जेवून घेतले. कुणाल, तानाजी आणि समीर कुडाळला परत जाण्यासाठी निघाले. रमेशने तेथेच थांबून मामांसोबत कुडाळला परत यायचं ठरवलं.

-२5-
- रमेश -
समीर आणि कुणाल कुडाळला गेले. आणि मी इथे थांबण्यात चूक तर केली नाही ना असे मला वाटू लागले. काशी आवरून निघून गेली होती. एवढ्या मोठ्या गढीत मी आणि शिवा दोघेच होतो.
“काय रे शिवा एवढी लोकं बेपत्ता झाली. ती कशी झाली असावीत?” रमेश
“काय की बुआ काहीच कळत नाही हो. म्हणजे ह्या पोरी संध्याकाळपर्यंत असायच्या व नंतर बेपत्ता व्हायच्या.” शिवा
त्या गढीतून बेपत्ता व्हायच्या? का घरी जाताना बेपत्ता व्हायच्या? का घरी पोहचल्यावर बेपत्ता व्हायच्या?” रमेश
“त्या घरी पोहचायच्याच नाहीत म्हणजे त्या घरी जाताना किंवा गढीतूनच बेपत्ता होत असल्या पाहिजेत.” शिवा
“पण गढीत बेपत्ता होणार कुठे?”
“हो ना. काहीच कळत नाही बघा. गढीत बेपत्ता होऊ शकेल असं कुठेच काही दिसत नाही. गढीचा कोपरा न कोपरा शोधला काही सापडत नाही” शिवा
“पण काय रे असं झाल्यावर तुम्हाला रात्री बेरात्री गढीत राहायची भीती वाटत नाही का?”
“भीती कसली वाटणार? लहानपण सगळं इथंच गेलं.” शिवा
तेवढ्यात माझे लक्ष पहिल्या पेटीकडे गेले. पेटी उघडून आतलं भूर्जपत्र मी वाचू लागलो. लहानपणी शिकलेली मोडी लिपी थोडीफार लक्षात होतीच. वाचत होतो म्हणजे नुसतं अक्षर वाचत होतो. त्या अक्षरांचा अर्थ काय आहे ते कळत नव्हतं. शेवटी ते भूर्ज पत्र पेटीत ठेऊन पेटी बंद केली.
माझ्या मनाला त्या गणपतीच्या चित्राची उत्सुकता शांत बसू देत नव्हती. शेवटी मनाचा धीर करून चित्राला किल्ली लावली. किल्ली लावल्यावर चित्र बाहेरच्या बाजूला उघडले गेले.
अंगावर शहारे आल्याची जाणीव झाली पण चित्राच्या मागे तर विटांनी बांधलेली पक्की भिंतच होती. आपण उगीचच घाबरत होतो असे वाटले. कधी कधी आपलंच मन कल्पना करत असत.
डोंगर पोखरून उंदीर निघावा तसे झाले होते. ते तसेच ठेऊन मी पाणी प्यायला किचन मध्ये गेलो. पाणी पीत असतानाच मला दिवाणखान्यातून कोणीतरी बोलल्याचा आवाज येऊ लागला. मला वाटले वाडीवरून मामा परत आले असावेत.
मी पाणी पिऊन झाल्यावर तोंडात गुळाचा खडा टाकून दिवाणखान्यात आलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मामा अजून आलेच नव्हते पण शिवाशी चक्क सुहास बोलत उभा होता. मला पाहताच तो आनंदाने म्हणाला
“अरे रमेश तू केव्हा आलास? कधीपासून मी तुझी वाट बघतोय.” सुहास
“अरे सुहास तू होतास तरी कुठं? सगळेजण तुला शोधत आहेत. पोलीस चौकीत तुझी मिसिंग पर्सन म्हणून नोंद झाली आहे.”
“अरे मी इथून गेलो त्या दूरच्या वस्तीवर. एका मित्राच्या वाडीतील वस्ती होती आणि तिथं आजारीच पडलो. मग काय तिथंच झोपून होतो. तिथे फोनचीही काही सोय नव्हती. त्यामुळे निरोपही पाठवता आला नाही. तसेही माझी वाट पाहणार कोण होत इथे?” सुहास
“धन्य आहे तुझी. बरं जेवण करतोस का?”
“नाही रे धुळीने माखलो आहे.” सुहास
मला तर तो स्वछ वाटत होता म्हणून मी त्याच्या जवळ जाताच तो मागे सरकला. आणि म्हणाला
“रमेश मी पहिल्यांदा स्वछ होऊन येतो कारण मला कुठला आजार झाला होता. तो संसर्गजन्य होता की नाही याची कल्पना नाही त्यामुळे स्वछ अंघोळ करतो मग बसू गप्पा मारत. आणि हा शिवा आहेच की मदतीला.” सुहास
“ठीक आहे. मी आता कंटाळलो आहे जरा झोपतो तुझ आवरलं की मला उठव.”
असे म्हणून मी तिथल्याच एका आराम खुर्चीत बसलो आणि चटकन झोपी गेलो. जेवण भरपूर झालं होत आणि काही काम करावं तर असं काही काम ही नव्हतं त्यामुळे गाढ झोप लागली.

-२6-
मला जाग आली ती कोणीतरी हलवल्यामुळे. मला वाटलं सुहासच. त्याच आवरून मला उठवत आहे. पण डोळे उघडून बघितलं तर मामा मला उठवत होते.
“अरे मामा तुम्ही बराच उशीर केलात.?”
“हो ना. वाडीवरची मंडळी जेवल्याशिवाय सोडत नव्हते म्हणून जेवूनच आलो.” मामा
“मी चांगला दोन तीन तास तरी झोपलो होतो.”
“मामा तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे.”
“काय?” मामा
“अहो आपला सुहास परत आलाय.”
“काय थापा मारतोयस. हे कस शक्य आहे?” मामा
“अहो मामा खरंच. तो कुठल्यातरी वस्ती वर गेला होता. आपल्या वाडीच्या बाहेरच्या वस्तीवर गेला होता आणि तिथं आजारी पडला तिथं कोणी येण्यासारखे नव्हतं आणि फोन ची सोय नव्हती त्यामुळे तो आपल्याला निरोप पाठवू शकला नाही.”
“खरं सांगतोयस तू?” मामा
“मामा मी त्याच्याशी बोललो, शिवा पण बोलला नंतर मला गाढ झोप लागली.”
“मग तो आता कुठं आहे?” मामा
“मी झोपण्यापूर्वी तो अंघोळ करायला गेला होता. आत्त्ता पर्यंत त्याची अंघोळ झाली असेल. तो त्याच्या खोलीतच असेल.”
मामांनी दुसऱ्या गड्याला सांगितले, छोटे मालक आणि शिवाला बोलावून आण. छोटे मालक म्हंटल्यावर गडी चमकला आणि तो त्या दोघांना आणायला सुहासच्या खोलीकडे गेला. पंधरा -वीस मिनिटांनी तो परत आला.
“मालक, छोटे मालक आणि शिवा कुठेही नाहीत. सगळीकडे शोधून आलो.” गडी
“चल रे रमेश सुहासच्या खोलीत जाऊन पाहू.” मामा
तिघेही सुहासच्या खोलीकडे गेले. खोली नीटनेटकी व आवरलेली होती. पण सुहास व शिवा कुठेच दिसत नव्हते. किंबहुना तो तिथे आल्याचा किंवा अंघोळ केल्याच्या काहीच खुणा दिसत नव्हत्या.
“रमेश तू स्वप्नात तर नाहीस ना?” मामा
“नाही हो. मी चांगला पाच दहा मिनिटे त्याच्याशी बोलत होतो. मी त्याच्या पाठीवर थाप मारणार इतक्यात तो म्हणाला, मी आत्ताच आजारातून उठलो आहे. हा आजार संसर्गजन्य आहे की नाही माहित नाही. मी आधी अंघोळ करून येतो असे म्हणून तो अंघोळीला गेला.”
“अरे पण तो कुठेच सापडत नाही. अंघोळीच्या काही खुणाही दिसत नाहीत. चल आपण कुडाळला निघूया. तिकडे पोहचल्यावर बोलू.” मामा
दुसऱ्या गड्याला त्यांनी संध्याकाळच्या आत गढी लावून घ्यायला सांगितली. मी आणि मामा गाडी घेऊन कुडाळच्या दिशेने निघालो.

शेवटचा भाग

-२७-
---कुडाळ----
कुडाळ मध्ये रात्री परत आमची बैठक बसली. विषय अर्थातच झाराप होता.
“काय म्हणतोय तुमचा आजचा दिवस?” मामा
“मी आणि तानाजी काकांच्या खोल्या बघत होतो. त्यांचं देवघर, तिथली असंख्य पुस्तक, यज्ञकुंड हे सगळं बघताना पुस्तकांच्या मागे एक चोरकप्पा दिसला. तो उघडाच होता. त्यामध्ये एक सुबक, नक्षीदार मखमली पेटी होती आणि त्यात एक भूर्जपत्र होते. बाहेरच्या सर्व कपाटांपैकी, एका कपाटाच्या मागे एक गणपतीचं चित्र होत.” समीर
“मी पण ते चित्र पाहिलं आहे पण ते चित्र असं का लावलं आहे ते कळत नाही.” मामा
“खरं तर गंमत पुढेच आहे, तसेच चित्र काकांच्या बेडरूम मध्ये ही आहे. त्या चित्राच्या मागे एक चोरकप्पा होता. त्यात एक पेटी होती आणि त्यात एक किल्ली व भूर्जपत्र होते. त्या किल्लीचा, भूर्जपत्राचा आणि गणपतीच्या चित्राचा काहीतरी घनिष्ट संबंध असावा.” समीर
“बरं मग त्या गणपतीच्या चित्रांच्या मागे काय होत?” मामा
“मी काही दार उघडले नाही. सर्व काळजीपूर्वक केलेलं बरं. त्यामुळे माहित नाही काय असावं.” समीर
“मला एक कबुली द्यायची आहे. तुम्ही सगळे कुडाळला निघून आल्यावर मी त्या पेटीतील भूर्जपत्र वाचायचा प्रयत्न केला पण काही जमले नाही. शिवासोबत तरी किती वेळ गप्पा मारणार मला कंटाळा आला होता. म्हणून मी गणपती असलेलं कपाटाचं दार उघडलं आणि किल्ली लावून गणपती असलेलं दार पण उघडलं.” रमेश
“मग काय होत तिथे?” मामा
“दार उघडताना काळीज लकाकत होत पण डोंगर पोखरून उंदीरच निघाला. त्या चित्राच्या मागे पक्क्या विटांनी बांधलेली एक भिंतच होती. मी त्या भिंतीच निरीक्षण केले पण काहीच हाती लागलं नाही. मला तहान लागली होती म्हणून मी ते सगळं तसेच ठेऊन किचनमध्ये पाणी प्यायला गेलो. परत आलो तर सुहास, शिवाशी बोलत उभा होता.” रमेश
“हे प्रकरण काही कळत नाही. तू सुहासशी बोलला शिवाही बोलला, नंतर दोघेही बेपत्ता झाले. काय करायचं कळत नाही.” मामा
“मला असं वाटत प्रथम गढीवर जाऊन त्या पेट्या आणि कपाट बंद करून गढी बंद करून घ्यावी.” समीर
“असं का?” मामा
“मी अगोदर म्हंटल्याप्रमाणे त्या पेट्या, भूर्जपत्र आणि गणपतीच चित्र यांचा एकमेकांशी संबंध असावा. आणि माझा असा अंदाज आहे या सर्व गोष्टींचा माणसं बेपत्ता होण्याशी सबंध आहे.” समीर
“असं असेल तर पुढे काय करायचं ?” कुणाल
“कुणाल खरं सांगू का हे सगळं प्रकरण काही वेगळच आहे. आणि तो कळण्यासाठी आणि आवरण्यासाठी आपल्याला आदित्यनाथांची मदत लागेल.” समीर
“हे कोण आदित्यनाथ?”
“आदित्यनाथ सज्जन गडावर वास्तव्याला असतात. तिथे त्यांची बरीच शक्ती साधना सुरु असते. ते अशा विनाशक शक्तीशी नेहमीच लढत असतात”.समीर
“पण त्यांना कसं बोलवायचं?” मामा
“ते माझ्या चांगलेच परिचयाचे आहेत. आत्ता ते सज्जनगडावर नाहीत एक दोन दिवसात येतील असं मला कळलं आहे. उद्या त्यांना फोन लावून खात्री करून घेऊ. त्यांनी मला बऱ्याच वेळेला मदत केली आहे.” समीर
“ठीक आहे. चला झोपू या. नाहीतरी आत्ता आपल्याला काही कळणारच नाही.” मामा
दुसऱ्यादिवशी सकाळी कुणाल व रमेश झाराप ला जाऊन गढीला कडी कुलुप लावून आले. त्या दिवशी कोणालाच काही काम नव्हतं. समीर ने कुडाळ पोलीस चौकीत जाऊन चौकशी करण्याचे ठरवले.
“मामा कुडाळ पोलीस ठाण्यात कोण सिनियर अधिकारी आहेत?”
“हा भाग सिंधुदुर्ग तालुक्यात येतो त्यामुळे एस पी ओरोसला असतो आणि सावंतवाडीत डी एस पी असतो. पण मला वाटत कुडाळला इन्स्पेक्टर पाटील आहेत.” मामा
“तुमची कितपत ओळख आहे?” समीर
“तशी विशेष नाही. या बेपत्ता लोकांकरिता तपास झाले तेव्हा ओळख झाली तेवढीच.” मामा
“बरं म्हणजे बोट वाकड करायलाच पाहिजे तर. बघतो आता.” समीर
“म्हणजे काय?” मामा
-२८-
“आपण डायरेक्ट चौकीत गेलो तर आपल्याला उडवाउडवीची उत्तर मिळतील त्यामुळे वेगळाच मार्ग अवलंबला पाहिजे.” समीर
समीर ने मुंबई क्राइम शाखेच्या डी एस पी ना फोन लावला.
“राणे साहेब जरा काम होत तुमच्याकडे” समीर
“नवीन काय भानगड करून ठेवली आहेस?” राणे
समीर ने कुडाळ मध्ये घडलेला सर्व वृत्तांत थोडक्यात सांगितला तसेच त्याच्या मित्राचा भाऊ बेपत्ता होणे आणि कालच एक गडी बेपत्ता झाल्याचं सांगितलं.
“राणे मी आत्ता इथे कुडाळच्या पोलीस स्टेशन मध्ये जातोय. तुमचं खात काय करत हे तुम्हाला चांगलं माहित आहे. मला जरा सहकार्य मिळेल असं बघा.” समीर
“तू भानगडी करायच्या आणि आम्ही त्या निस्तरायच्या असच ना ? कुडाळला इन्स्पेक्टर पाटील म्हणून आहेत. पण बघू सिंधुदुर्गचा एस पी माझा चांगला ओळखीचा आहे. त्याच्याशी मी बोलतो. आणि हो आल्यावर लालमहाल मध्ये पार्टीची तयारी ठेव.“ राणे
समीर, कुणाल आणि मामांना घेऊन पोलीस चौकीकडे गेला. तस पोलीस ठाणे मोठं होत. कारण कुडाळ तालुक्याचं ठिकाण होत. आतल्या एका टेबलावर एक हवालदार पेंगत बसला होता. बाकीचे टेबल रिकामीच होती. पाच सहा स्टाफ बाहेर गप्पा मारत उभा होता. बाहेरच आठ दहा मोटारसायकली उभ्या होत्या. पण एकंदरीत शांतता होती. हे तिघे आत जाताच हवालदाराच्या झोपेत व्यत्यय आला.” काय कटकट आहे” असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला.
“पाटील साहेब आहेत का?”.
.

“तुम्ही कोण सीएम की पीएम. एकदम पाटील साहेबांनाच विचारताय?” हवालदार
“मी कोणी सीएम किंवा पीएम नाही आणि तू तर साधा हवालदार आहेस. नीट कसं बोलायचं ते शिकवलं नाही का?” समीर
“हे बघ पावट्या आम्हाला शिकऊ नकोस.” हवालदार
“मी तुम्हाला पाटील साहेब आहेत का? एवढाच प्रश्न विचारला आणि तुम्ही काय बडबड लावली आहे. पाटील साहेब आहेत का नाही तेवढंच सांगा.” समीर
हवालदाराच्या बोलण्यावरूनच समीर ला पोलीस चौकीचा अंदाज आला होता. आता त्याने हवालदाराला चिडवायचेच ठरवले.
“कुणाल जरा व्हिडीओ कढतोयस ना ? उद्याच तुझ्या चॅनेलला बातमी देऊन टाक” समीर
“कुणाल ने आज्ञाधारकपाने कॅमेरा काढून शूटिंग सुरु केले. तसा हवालदार चिडून उठला आणि त्याने कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण समीरने त्याचा हात अडवला होता.
“हे बघा तुम्ही सरकारी कामात अडथळा आणताय.” हवालदार
“कसलं सरकारी काम. तुम्ही तर फोन चोरत होतात” समीर
बाहेरचे गप्पा मारणारे पण आता चौकीत आले होते आणि काय नाटक चाललंय ते बघू लागले. त्यात एक पी एस आय दर्जाचा ऑफिसर समीर ला दिसला. त्याला बोलावून तो म्हणाला हे बघा या हवालदाराला मी चोरी करताना पकडलं आहे. तुम्ही त्याला आधी आत घ्या. हे ऐकल्यावर सगळे थक्कच झाले. तोपर्यंत समीरने त्या हवलदाराचा हात चांगलाच पिरघळलाहोता. हे सर्व समीर, पुढील काही दिवस खात्याने बिनतक्रार मदत करावी म्हणून करत होता. तिथल्या पाच सहा पोलिसांना लोळवण्याइतकी ताकत त्याच्यात व तानाजीत निश्चितच होती. तेवढ्यत बाहेर मोटरसायकल थांबल्याचा आवाज आला. इन्स्पेक्टर पाटील आत आले.
“काय रे काय गडबड चालू आहे?” पाटील
“काही नाही तुमच्या या हवालदाराला मी फोन चोरताना पकडलं आहे. तसा पुरावा माझ्याकडे आहे. मी त्याला सिटीझन अरेस्ट केली आहे. त्याला आत घ्या आणि कोर्टात पाठवा” समीर
“नाही साहेब हा खोटं बोलतोय.”
वाक्य संपायच्या आतच समीरची पाच बोटं हवालदाराच्या थोबाडावर उठली. बाकीचे समीरकडे येणार तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला आणि डी एस पी वाळिंबे आत आले.
“हे काय चाललंय? हे पोलीस स्टेशन आहे की मासळी बाजार.”
त्यांना पाहताच पाटील आणि इतर पोलिसांनी त्यांना सॅल्यूट मारला. फक्त एक हवालदार सोडून. त्या हवालदाराचा एक हात गालावर आणि दुसरा हात समीरच्या हातात होता.
“सर हा भडवा पोलीस स्टेशनमध्ये घुसून मारामारी करतोय.” पाटील
“हे बघा पाटील मी चौकीत घुसलो ही नाही आणि भडवा ही नाही. तुम्हाला मी मराठी शिकवायला पाहिजे असं मला वाटत. माझं नाव समीर पटेल मुंबई वरून आलो आहे. आणि वाळींबे माझ्याबद्दल राणेंनी तुम्हाला फोन केलाच असेल” समीर
“अरे तुम्ही का समीर पटेल? राण्यांचा फोन आला होता म्हणूनच तर मी इथं आलो. पण हे काय चाललं आहे?” वाळींबे
“काही नाही सर. याने फोन चोरायचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही त्याला अडवलं आणि सिटीझन अरेस्ट केली.”
“मग काय करायचं?” वाळिंबे
“सर या पोलीस ठाण्यातील सगळ्यांनाच शिस्त आणि नम्रता शिकवायची वेळ आली आहे” समीर
“आलं लक्षात. जरा याला रिमांड मध्ये घ्या आणि उद्या कोर्टात उभे करा आणि पाटील चला तुमच्या केबिन मध्ये जाऊन बोलू. चला समीर तुम्हीही चला.” वाळिंबे
हा झालेला बदल पाहून पोलीस स्टेशन मध्ये शांतता पसरली. पाटील, कुणाल, मामा, वाळिंबे केबिनमध्ये गेले.
“काय पाटील, तुमची आणि समीरची काही झकाझकी झाली नाही ना?” वाळिंबे
“नाही सर ते आत्ताच आले.”
समीर ने त्यांना वाचविले पाटलांचा मूडही त्यामुळे बदलला.
“पण तुम्ही इथं का आलात? राणेंनी मला तुमच्याबद्दल बरच सांगितलं पण कामाबद्दल काही बोलले नाहीत. आणि पाटील तुम्ही समीरशी भांडला नाहीत हे एक बरं केलंत. नाहीतर माझं काम वाढवून ठेवलं असत.” वाळिंबे
“कसलं काम साहेब?” पाटील
तुमच्या बदलीचे. गडचिरोलीला.” वाळींबे
हे ऐकल्यावर पाटील हादरलेच.
“जाऊ द्या सर आपण कामाकडे बघू. मी समीर, हा कुणाल कोहली आणि हे रावसाहेब देसाई हे कुडाळलाच राहतात आणि त्यांची भली मोठी इस्टेट आहे झारापला.“ समीर
मध्यंतरी काही केसेस फाइल झाल्या आहेत.“ वाळींबे
“कित्येक तरुण स्त्रिया बेपत्ता झाल्या. काही दिवसापूर्वी आलेला ह्यांचा मुलगा ही बेपत्ता झाला आणि यांचा एक गडी ही बेपत्ता झाला आहे.” समीर
“पाटील झाराप च्या सगळ्या फाइल्स मागावा.” वाळिंबे
“पाटील खाली मान घालून बसले होते.
“नाही साहेब फाइल्स उघडल्याच नाहीत” पाटील
अरे पंधरा सोळा एफ आय आर फाइल होतात आणि एक ही फाइल उघडली जात नाही. तुम्ही करता तरी काय इथं बसून.
पाटलांनी फोन करून त्याच्याकडच्या इन्सपेक्टर गोरे ना लगेच चौकीत यायला सांगितलं.
“बरं पाटील सगळे एफ आय आर तरी आणायला सांगा.” वाळिंबे
कुणाल कडे बेपत्ता झालेल्या सतरा जणांची यादी होतीच. सुहास अठरावा आणि शिवा एकोणिसावा. शोधून शोधून रजिस्टरमध्ये दहाच एफ आय आर सापडले. आता मात्र वाळिंबे फारच संतप्त झाले होते. त्यात एका वार्ताहरपुढे आणि राणेंच्या मित्रापुढे असे व्हावे याचे तर त्यांना जास्तच दुःख झाले होते.
“पाटील तुम्ही हा काय खेळ खंडोबा लावला आहे? तुम्ही तर याला जबाबदार आहातच पण एफ आय आर न करण्यात बाकीचे कोण कोण जबाबदार आहेत? इतके होऊन ह्या फाइल का उघडल्या नाहीत? तपास का चालू केला नाही?” वाळिंबे
तेवढ्यात इन्स्पेक्टर गोरे आलेच.
“गोरे इथे एक सिरिअस केस आहे आणि रेकॉर्डचा पत्ताच नाही. आज पासून तुम्ही या चौकीचा आणि या प्रकरणाचा चार्ज घ्या. आणि यात कोण कोण जबाबदार आहे ते मला दुपारपर्यंत कळवा.
पाटील तुम्ही तुमचं सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आणि बॅच काढून ठेवा. तुमच्या निलंबनाची ऑर्डर तुम्हाला दुपारी मिळेल. कुणाल तुम्ही इन्स्पेक्टर बरोबर बाहेर बसा आणि सर्व केसची हिस्टरी शीट तयार करा. मी, देसाई व समीर झारापला जाऊन येतो.” वाळिंबे

-२९-
समीर, मामा आणि वाळींबे गढीवर पोहचले. आत्तापर्यंत सुहास परत दिसल्याचा उल्लेख कोणीच केला नव्हता. मामानी रमेशलाही गढीवर बोलावून घेतले. आणि गढीवर जायच्या अगोदर एक गडी व काशीलाही गढीवर जाण्यासाठी निरोप सांगितला.
मामा व वाळींबे यांनी सर्व गढी फिरून बघितली. गणपतीचं दार असलेलं कपाट आणि त्या दोन पेट्या बंदच केल्या होत्या.

समीरला अजूनही मोजायचा टेप मिळाला नव्हता पण त्याने पावलांनी खोल्याचं अंतर मोजायचं ठरवलं. त्याप्रमाणे तो दिवाणखान्यात आणि त्याच्या मागच्या दोन खोल्यात पावलं मोजत आला. तोपर्यंत रमेश गढीवर आला होता.
“रमेश हॉल हा चाळीस पावलं मोजला गेला आणि मागच्या दोन खोल्या अठरा अठरा पावलंच आहेत. यांचा अर्थ हॉल च्या समोरच्या भिंती एकाच रांगेत आहेत. म्हणजे मधली भिंत तीन फूट जाड असली पाहिजे. म्हणजे त्या खोल्यांच्या खाली तळघर असू शकते आणि भिंतीच्या मध्ये तळघरात जाणारा जिना हि असू शकतो. असे असेल तर आपल्याला तळघरात जाऊन शोध घेतला पाहिजे.” समीर
“सुहास इथं दिसल्यापासून आणि शिवा बेपत्ता झाल्या पासून मला तर या खोलीत बसायचीही भीती वाटत आहे.” रमेश
तेवढ्यात मामा आणि वाळिंबे गढी फिरून आले. काशीने चहा आणि पोहे तयारच ठेवले होते.
“देसाई तुमची गढी खरोखरच स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवली आहे. इथे काही दगा फटका झाला असेल असं काही मला वाटत नाही. खरोखरच गूढ आहे! “ वाळिंबे
“सर तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली ती सगळ्यांसमोर नको म्हणून आम्ही चौकीत काही बोललो नाही. तुम्हाला हे पोलीस स्टेशन चांगलेच घाबरले आहे. ”समीर
“मी त्या पाटीलला निलंबित करून भरच टाकली आहे. फारच अंधाधुंध कारभार चालला होता. पण तुम्हाला काय सांगायचं आहे?” वाळिंबे
“ रमेश तूच सांगितलंस तर बरं होईल.” समीर
“सर मी आणि शिवा इथं गप्पा मारत बसलो होतो खरं म्हणजे मामांची वाट बघत मी थांबलो होतो. तेवढ्यात मला तहान लागली म्हणून मी किचनमध्ये गेलो. पाणी पीत असताना मला शिवा आणि सुहास बोलत असल्याचं ऐकू आलं. मग मी दिवाणखान्यात आलो तर खरोखरच तिथं शिवा आणि सुहास गप्पा मारत उभे होते.” रमेश
“शिवा तुमचा गढी आणि हा सुहास कोण?” वाळिंबे
“सुहास माझा मावस भाऊ सहा दिवसापूर्वीच बेपत्ता झाला” रमेश
“बेपत्ता झाला पण आणि तुम्हाला दिसला पण म्हणताय यातलं खरं काय?” वाळिंबे
“ काही समजत नाही हो. सुहास म्हणाला की तो कोणत्यातरी वस्तीवर होता आणि आजारी पडला होता. काही निरोप देता आला नाही. आणि तो झारापला आला. मग तो अंघोळीला गेला. माझी तिथल्या खुर्चीत झोप लागली. मामांनी मला उठवले. मी मामांना सगळं सांगितलं आणि आम्ही त्याचा गढीवर शोधही घेतला पण सुहास आणि शिवा सापडलेच नाहीत. दोघेही बेपत्ता झाले होते.” रमेश
“फारच कॉम्प्लिकेटेड केस दिसतीय. गोरे हुशार आणि कामसू आहेत त्यांच्याकडे केस देऊ आणि बघू काय होतंय ते.” वाळिंबे
तिघेही कुडाळला परत फिरले. चौकीच स्वरूप आता पूर्णपणे बदललं होत. गोरे, समीर, वाळिंबे आणि कुणाल असे केबिन मध्ये बसले.

-३०-
गोऱ्यांच्या रिपोर्ट प्रमाणे असलेल्या एकवीस स्टाफ पैकी पाटलांसह सहा स्टाफ ने हलगर्जीपणा केला होता.
“मग आता उरलेल्या पाचांच काय करायचं?” वाळिंबे
“त्यांना निलंबित करण फार सोप्प आहे पण त्यामुळं प्रश्न थोडेच सुटणार आहेत. पाटलांचं निलंबन बरोबर आहे कारण ते जबाबदार अधिकारी होते. पण या बाकीच्यांची स्थिती राजा हले प्रजा चाले अशी आहे.” गोरे
“गोरे ठीक आहे पण त्यांना जरा भुताची भीती दाखवली पाहिजे बोलवा त्यांना आत” वाळिंबे
पाचही जण आत आले ते मुळी घाम फुटूनच.
”गोरे यांनी इतक्या महत्वाच्या केस मध्ये इतका हलगर्जीपणा केला आहे. मला तर वाटत याना कुठलीतरी कलम लावून आत सहज टाकता येईल. “वाळिंबे
ते पाच जण बेशुद्ध पडायच्या पाळीला आले होते. आणि तसे झाले तर त्यांच्या कामाचा व सर्विस रेकॉर्ड चा पार भुगा होणार होता. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आई वडील, बायका पोर सगळी तरळून गेली. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे तो कसा व्यवस्थित वागला आहे हे पटवून देऊ लागला.
“गपारे भडव्यांनो. आधी हागुन ठेवायचं आणि नंतर बोंबलत बसायचं आणि ती घाण काढायला आहोतच आम्ही. गोरे नाहीतर असं करा या पाच जणांची बदली चंद्रपूर किंवा गडचिरोलीला करून टाका. जाऊदेत तिकडं. कधी शहीद झाले तर मानवंदना तरी देऊ.” वाळिंबे
हे ऐकल्यावर ते जास्तच घाबरून गेले.
“साहेब त्यांना माझ्याकरता एक चान्स द्या. या प्रकरणाची सर्व तपासणी त्यांच्याकडूनच करून घेतो. बघा कसे सुतासारखे सरळ वागतील ते” गोरे
“आणि नाही वागले तर?” वाळिंबे
“तर गडचरोली आणि चंद्रपूर आहेच.” गोरे
“ठीक आहे तुमच्यासाठी मान्य करतो पण मला एका आठवड्यात प्राथमिक अहवाल पाहिजे.” वाळिंबे
“एस सर” गोरे
“आणि या समीर पटेलना हवी ती मदत करा त्यांचे कुठलेही बोलणे कानाआड करू नका. त्यांनी आपल्या डिपार्टमेंटला भरपूर मदत केली आहे. गुंता गुंतीची प्रकरण सोडवली आहेत आणि त्यांना खरेपणा आवडतो.” वाळिंबे
“एस सर” गोरे
वाळिंबे ओरोस ला निघून गेले. चौकीत भीतीयुक्त शांतता पसरली होती. गोऱ्यांनी सगळ्या स्टाफ ला हॉल मध्ये गोळा केलं.
“मित्रानो आपण झालं गेलं ते विसरून जाऊ. त्या रिमांड होम मधल्या हवालदारालाही बाहेर काढा. त्याला दिली तेवढी शिक्षा बास झाली. हे बघा आपल्याला जोमाने काम करायचे आहे. आपल्या हद्दीतून पंधरा वीस लोक बेपत्ता होतात आणि त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. हे आपल्याला बदलायला पाहिजे. कोणाच्या काही अडचणी असतील तर माझ्याकडे यायला घाबरू नका. मी आता येथेच ठाण मांडून बसणार आहे.” गोरे
“दुसऱ्यादिवशीपासून कुणाल आणि गोरेंनी स्टाफला बरोबर घेऊन सर्व बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबियांना भेट द्यायचे ठरवले. तर काही स्टाफला आजूबाजूच्या वस्तीवर पाठवून सुहासचा काही थांगपत्ता लागतो का ते बघायचं ठरलं. त्यामुळं चौकीत मोजकाच स्टाफ राहणार होता. पण गरज भासल्यास वाळिंब्यांनी अधिक कुमक पाठविली असती. समीर आणि कुणाल बंगल्यावर परतले.

-३१-
आज जेवणानंतरच्या मीटिंगमध्ये फारसे काही बोलण्यासारखे नव्हते. एकच विशेष म्हणजे समीरला आदित्यनाथांचा फोन आला
“काय रे समीर मला का शोधात होतास? मी आत्ताच आलो तर मला तुझ्या फोनबद्दल सांगितलं. तू उगाचच फोन करणार नाहीस अशी माझी खात्री आहे.” आदित्यनाथ
“देवा, समीर आदित्यनाथांना देवा म्हणत असे गुरुदेव हा शब्द त्याला फारच फॉर्मल वाटायचा. देवा तुमची इथे अत्यंत जरुरी आहे
“कारे? काय झाले?” आदित्यनाथ
“समीरने त्यांना थोडक्यात सगळी हकीकत सांगितली.” समीर
“समीर मी तुला नेहमीच म्हणत असतो हे सगळं भासमय असत. तुला इतरांनी सांगितलेलं सगळं खरचं असेल असं नाही. तू एक काम कर तो जो रमेश ने ताईत बांधला आहे त्याच्याकडे रमेशला बघायला सांग आणि त्याला जो काही अनुभव आला तो मनात आणायला सांग.” आदित्यनाथ
“आत्ता लगेच ?” समीर
“हो लगेच. कारण माझा अनुमान खरे असेल तर प्रसंग फार गंभीर आहे. आपल्याला अजिबात वेळ घालवून चालणार नाही. कृपया रमेशला तातडीने ताईत कडे लक्ष केन्द्रित करून घडलेला प्रसंगाबद्दल विचार करायला सांग. हे बघ समीर त्याने जर ताईत दंडात बांधला असेल तर त्याला तो गळ्यात घालायला सांग आणि लक्ष केंद्रित करायला सांग.“ आदित्यनाथ
रमेशने ताईत गळ्यात बांधला आणि तो आदित्यनाथनी सांगितल्या प्रमाणे त्याच्यावर लक्ष केंद्रित करू लागला. घडलेल्या प्रसंगाची उजळणी करू लागला. ह्या प्रसंगात त्याला सुहास दिसताच त्याला कोणीतरी जोरात थोबाडीत दिल्याची जाणीव झाली आणि तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोरील सर्व दृश्ये नाहीशी झाली. तेवढ्यात आदित्यनाथांचा फोन आलाच.
“हे प्रकरण फारच गंभीर आहे. मी तिथे उद्या सकाळपर्यंत पोहचतोच. अजून लोकं नाहीशी होण्यापूर्वी आपल्याला हालचाल करावी लागेल. तुला माझ्या राहण्याची व्यवस्था कशी करायची आहे ती माहीतच आहे. त्याप्रमाणे जरा काळजी घे. आणि समीर त्या रमेशबरोबर आज कुणीतरी झोपा आणि त्याला झोपेचं औषध द्या. कुठल्याही परिस्थितीत त्याला स्वप्न पडता कामा नये.” आदित्यनाथ
कुणाल आणि रमेश गेले. मामा, तानाजी आणि समीर आदित्यनाथांकरिता खोली तयार करायच्या मागे लागले. नाथांना हवी असणारी खोली नेहमी घराबाहेर दार उघडे अशी हवी असायची. दार शक्यतो दक्षिण दिशेला लागायचे. खोली पूर्णतः रिकामी करणे आवश्यक असायचे. म्हणजे खोलीत कुठले ही फर्निचर, शोभेच्या वस्तू, कार्पेट अश्या कोणत्याही वस्तू नको असायच्या.
ते आल्यावर बंगला तर संरक्षित करणारच होते आणि खोलीतही काही महत्वाची संरक्षक साधनं असणार होती. प्रवेश केल्याबरोबरचा हॉल त्या दृष्टीने सोईस्कर होता. बराच वेळ घालवून तिघांनी ती खोली पूर्ण रिकामी केली.

-३२-
दुसऱ्या दिवशी सकाळीच आदित्यनाथ एक भली मोठी व्हॅनिटी व्हॅन सारखी गाडी घेऊन आले. ज्याअर्थी छोटी गाडी न आणता हे भले मोठे धूड घेऊन आल्याचं समीरने पाहिलं त्याच वेळेला त्याला प्रकरण फारच गंभीर असल्याचं कळून चुकलं.
आल्या आल्या त्यांच्या सहकार्यांनी गाडीतून चार खुर्च्या काढून त्या रिकाम्या खोलीत ठेवल्या. आदित्यनाथ आले आणि रिकामी खोली पाहून प्रसन्न झाले. समीर आणि मामांनी त्याचे स्वागत केले. आदित्यनाथांचे वय सांगणे अवघड होते पण चेहऱ्यावर एक प्रकारची लकाकी होती. ऋषी मुनी प्रमाणे त्यांनी दाढी मिश्या तर अजिबातच ठेवल्या नव्हत्या. झब्बा आणि सुरवार अशा साध्या पोशाखात ते होते.

“समीर काय झालं? एवढ्या तातडीने का बोलावलं? अर्थात मला रमेश वर केलेल्या प्रयोगांनी बरीच माहिती मिळाली आहे. ती माहिती तुम्हाला पण नसेल. रमेश ला आहे पण त्याला झालेल्या जाणिवा तो त्याला माहित असलेल्या अनुभूतीमधूनच व्यक्त करतोय. त्याच्या बाहेर तो जाऊच शकत नाही.”आदित्यनाथ
“देवा आपण काय बोलता ते मला काही कळत नाही. पुढे काय करायचं ते सांगा.” समीर
“हे बघ समीर पहिल्यांदा आपल्याला हा बंगला संरक्षित करायचा आहे. त्यानंतर ही खोली जास्त संरक्षित करायची आहे. या घरातील माणसं बाहेर जाणार आहेत त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी संरक्षण असणे गरजेचे आहे. अर्थात हे संरक्षण व्यवस्था तात्पुरती असेल” आदित्यनाथ
“म्हणजे काय?” समीर
“समीर आपला कुठल्या शक्तीशी लढा आहे आणि आपल्याला कशापासून संरक्षण करून घ्यायचं आहे याचा मला अंधुक अंदाज आहे पण जोपर्यंत माझा आणि त्या शक्तींचा एकमेकांना स्पर्श होत नाही, तोपर्यंत त्यांच्या स्वरुपाविषयी, शक्तीविषयी आणि कार्याविषयी काहीच माहिती मिळू शकत नाही त्यामुळेच त्याच्यापासून हव्या असलेल्या संरक्षण व्यवस्थे विषयी निश्चित असे काहीच मत देता येणार नाही.” आदित्यनाथ
“तुम्ही काय म्हणता ते काही समजले नाही” मामा
“हे बघा आपली संरक्षण व्यवस्था हि आपला कशापासून बचाव करायचा आहे यावर अवलंबुन असते. उदा. युद्धावर जाताना पोलादाचे चिलखत हवं तेच चिलखत घालून आपण आग विझवायला जाऊ का? आग विझवायला जाताना आपल्याला अग्नी प्रतिरोधक असाच पोशाख पाहिजे. पावसात रेनकोट किंवा छत्रीच पाहिजे. थोडक्यात ज्या पासून आपल्याला बचाव करायचा आहे त्यापासून बचाव करणारी यंत्रणा आपल्याकडे पाहिजे. आणि मामा आता आपण बोललो ते सर्व शरीरावर आघात असतात. हे सर्व शरीरातील ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या जाणीवे पलीकडले आहे. ह्या आघातांमुळे ज्ञानेंद्रिये जागृत होऊ शकतात. पण ती जाणीव, ती भावना खरी असेलच असे नाही” आदित्यनाथ
“म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे?” मामा
“रमेशला सुहास दिसला म्हणजे त्याला सुहास दिसल्याचा भास झाला. त्याच्या मनाला तसे पटवून देण्यात आले होते की तेथे जे काही आहे ते सुहासच आहे. माझे इथले काम दुपारपर्यंत आटपेल. मग आपण एकदा गढीवर जाऊन येऊ आणि माझी साधना चालू असताना मी फार कमी खातो. बहुतेकदा फक्त दुधावरच राहतो.” आदित्यनाथ
“देवा तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या बरोबर अशा बऱ्याच प्रसंगातून मी गेलो आहे आणि मला तुमच्या बऱ्याच सवयी माहित आहेत.” समीर
त्यानंतर आदित्यनाथनी साधनांची तयारी करण्यातच सकाळ घालवली. विविध देवतांच्या मूर्ती, पूजेसाठी व हवनासाठी लागणारे सामान, बऱ्याच प्रकारची यंत्रे यांचा या साधनेत भरणा होता. ते चालू असतानाच त्यांनी मामांना सांगून गुग्गळं धूप आणायला सांगितला. एवढी मोठी गढी म्हंटल्यावर दीड दोन किलो धूप लागणार होता तसेच भरपूर कोळसा व छोट्या कुंड्या असे सर्व साहित्य मागविले. गढीतच यज्ञकुंड आहे म्हणल्यावर त्यांना आनंद झाला.
“तुम्ही जेवून घ्या. मी, समीर, तानाजी आणि रमेश गढीवर जातो. मामांनी यायची गरज नाही. मदतीला त्या गड्याला बोलाविले तर बरे. आज तरी मी फक्त पहाणी करणार आहे आणि कसा बचाव करायचा हे मला ठरवायचे आहे. आज काही विशेष घडेल असे मानू नका. मामा व मंदा यांनी बंगला सोडून बाहेर कुठे जाऊ नये. काही लागले तर नोकराला सांगा. किंवा मला फोन करा पण प्रत्यक्ष बाहेर जाऊ नका. यांचा अर्थ तुम्हाला काही धोका आहे असे मुळीच नाही. आत्ता पर्यंत तरी त्या शक्तीचे अस्तित्व गढीपुरते मर्यादित आहे. “आदित्यनाथ
“पण त्या बेपत्ता झालेल्या लोकांचं काय?” मामा
“माझी अशी खात्री झाली आहे की बेपत्ता झालेल्या व्यक्ती या वाड्यातूनच बेपत्ता झाल्या आहेत त्या बाहेर पडल्याचं नाहीत.” आदित्यनाथ
मागवलेल्या सर्व वस्तू घेऊन आम्ही चौघे दुपारी गढीकडे गेलो. आम्हा तिघांना त्यांनी गढीच्या बाहेरच उभे केले आणि कोणत्याही परिस्थितीत काही दिसले, झाले किंवा काहीही ऐकू आले तरी गढीत न शिरण्याचा आदेश दिला.

या तिघांचा पुढचा अर्धातास फारच कंटाळवाणा गेला साधारणतः तीस चाळीस मिनिटांनी आदित्यनाथ बाहेर आले व त्यांना घेऊन आत गेले. त्यांनी या सगळ्यांना देवघरातच बसवले आणि बरोबर आणलेले ताईत सगळ्यांच्या गळ्यात बांधले.
गडी आणि तानाजी यांना स्वयंपाक घरात जाऊन कोळसे पेटवायला सांगितले व ते पेटल्यावर ते पंचवीस तीस कुंड्यात घालायला सांगितले. त्याच बरोबर गढीतल्या सर्व बंद खोल्या पूर्णपणे उघडायला सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कुठले ही कपाट व पेटी उघडू नये असे बजावले.
ते दोघे कामाला गेल्यावर आदित्यनाथ समीर व रमेश यांच्याशी बोलू लागले.
“मगाशी मी अर्धातास या देवघरात बसून सूक्ष्म रूपाने सर्व गढी पाहून आलो. काही शक्ती इथं आहेत ही निश्चित पण कोणीतरी अत्यंत कुशलपणे त्यांना बंधनात जखडले आहे. आणि ती बंधन निघाल्याशिवाय त्यांना येथे येणं अवघड आहे.” आदित्यनाथ
“काका अशा मंत्र -तंत्रात कुशल होते आणि त्यांनीच ही बंधन तयार केली असावीत पण काही वर्षांपूर्वी तेही बेपत्ता झाले.” रमेश
“ते बेपत्ता झाले की कुठेतरी आहेत या विषयी मला शंका आहे” आदित्यनाथ
“देवा, मी जेव्हा हॉल आणि मागच्या दोन खोल्या मोजल्या तेव्हा मला असे आढळले की गणपतीचे चित्र असलेली भिंत तीन फूट जाड आहे तेव्हा तेथून जायला भुयार किंवा तळघर असू शकते.” समीर
“समीर तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण काही असेल असे मानायला काहीच पुरावा नाही. ही गढी देसाईंच्या पूर्वजांनी बांधली आहे आणि ती त्यांच्याच ताब्यात आहे. इथे जर काही असत तर मामांना ते निश्चितच माहिती झालं असत. तसेच काकांनाही त्याची माहिती असणार. पण माझ्या सूक्ष्म रूपात मला असे काही आढळले नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेले दोनशे वर्षे गढीवर शांतता होती. वस्तीवरच काही प्रकार घडले होते पण काकांनी ते बंद केले आणि त्याच वेळेला त्यांनी त्या शक्तींना बंधनात टाकले. त्या शक्तींना बंधनात टाकताना त्यांना अत्यंत त्रास झाला असणार आणि कदाचित त्यांनी आपला प्राण देऊन ती बंधन घट्ट केली असणार.
समीर आत्ता तरी काहीच निश्चित सांगता येणार नाही पण जिना, भुयार, तळघर असे विचार मनातून काढून टाक.” आदित्यनाथ
समीरला आदित्यनाथांची कारणं पटली.
“समीर, काका बेपत्ता झाल्यावरही गेली कित्येक वर्षे काहीच घडले नव्हते. ज्याअर्थी हे आत्ताच घडते आहे त्या अर्थी ती बंधन कोणीतरी अनावधानाने सैल केली असणार किंवा काढून टाकली असणार. त्याचच फळ म्हणजे अजून लोकं बेपत्ता होणं.” आदित्यनाथ
थोड्याच वेळात तानाजी आणि नोकराने येऊन सर्व तयारी झाल्याचे सांगितले. आदित्यनाथांनी जवळचीच एक पिशवी उचलली आणि त्या दोघांबरोबर चालू लागले. आम्ही ही त्यांच्या बरोबर बाहेर पडलो.
एक एक करत सर्व खोल्यांच्या मध्यभागी कोळसे पेटलेली कुंडी ठेवली गेली. खोली मोठी असेल तर दोन कुंड्या ठेवल्या गेल्या. आणि प्रत्येक ठिकाणी त्या निखाऱ्यावर नोकर धूप टाकत होता.
एक तास हे सर्व चालू होतं. परत आम्ही देवघरात आलो. तेव्हा आदित्यनाथांनी आम्हाला शांत राहण्याची सूचना केली आणि स्वतः ध्यानाला बसले.
आदित्यनाथ ध्यान करत असताना त्यांना पाहणे फार अवर्णनीय होते. मुळातच असलेला त्यांचा तेजपुंज चेहरा. त्यांच्या शरीरातून ऊर्जेच्या लहरी बाहेर पडताना जाणवायच्या आणि त्या लहरीत अगदी शांत वाटायचे. अशा वेळी ते सूक्ष्म देहांनी कुठे असतील, काय पाहत असतील, कुणाची मदत करत असतील किंवा कुणाशी सामना करत असतील हे सांगणे अवघड होते.
तासाभराने त्यांची समाधी उतरली. गढीभर धूपाने धूर झाला होता पण नाकाला एक अनामिक सुगंध येत होता. सगळीकडे कस शांत शांत वाटत होत.
आता आदित्यनाथांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खेळत होत.
“चला मित्रांनो आता कुडाळ ला परत जाऊ. सर्व परिस्थितीचा मी अंदाज घेतला आहे. आणि वाटत त्याच्यापेक्षा शत्रू फार प्रबळ आहे. त्यामुळे वेळ तर लागणारच आहे पण हे सर्व चक्र थांबेल असं मला निश्चितच वाटते. गढी आता उघडीच राहू द्या.“ आदित्यनाथ”
गड्याकडे वळून ते म्हणाले
“तू अजून कोणालातरी सोबतीला घेऊन गढीत थांबायला काहीच हरकत नाही. फक्त कशाला हात लावू नकोस म्हणजे झालं.” आदित्यनाथ
गढीत राहायला नोकर घाबरत होता. आदित्यनाथ हसून म्हणाले
“काही हरकत नाही राहू दे गढी उघडी कोणी येणार नाही. समीर तुझी कुत्री आणली आहेस का?” आदित्यनाथ
“नाही देवा.” समीर
“समीर तुझी कुत्री आणली असती तर बरे झाले असते. बर ठीक आहे” आदित्यनाथ

-३३-
सर्वजण कुडाळला परतले. रात्रीच्या जेवणानंतर मिटिंग सुरु झाली. आज त्यात आदित्यनाथांची भर पडली होती.
“काय देवा काय वाटतंय तुम्हाला?” समीर
“आम्हाला समजेल अशा शब्दात सांगा. आम्ही तर फार घाबरून गेलो आहोत.” मामा
“आपण या गोष्टींचा बारकाईने विचार करू. शेकडो वर्षांपूर्वीच चर्च, त्याच तळघर, त्यातील प्रेतं, आजूबाजूच्या वस्त्या, सभोवतालचे रान, आणि त्यात असणारी श्वापद हे सर्व गुण्यागोविंदाने राहत होती. कुणालाच कसल्या प्रकारचा त्रास नव्हता. हा त्रास सुरु झाला ते जमीन खचून चर्च आणि आजूबाजूच्या भागाची पडझड झाल्यावरच. आत पुढचे सर्व माझे तर्क आहेत. निश्चित काही कळेपर्यंत, तेच आपल्याला सत्य मानणे भाग आहे.
या शक्तीचे वास्तव्य त्या चर्चच्या गर्भगृहात असावे. त्याचे आगमन कुठून झाले सांगणे अवघड आहे. चर्च मधल्या पुजाऱ्यांना हे अस्तित्व नक्कीच जाणवलं असणार. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दृष्टीने त्या शक्तीला बंधनात टाकले. आता येथे हे लक्षात घ्या आपण समजतो तशा भूत किंवा मरणोत्तर जीवनाच्या ह्या कल्पना नाहीत. हे सगळे जीवनाच्या पलीकडले आहे. आपल्या जीवनात अशा असंख्य शक्ती भरलेल्या असतात. त्या जन्म मरणाच्या पलीकडे असतात.” आदित्यनाथ
“जरा नीट समजावून सांगाल का?” मामा
“हो. आता हेच बघा वीज हि शक्ती म्हणून नेहमी वापरतो. पण आपण तिचा वापर करण्यापूर्वी ती अस्तित्वात होती का नव्हती? निश्चितच होती. फक्त आपल्याला त्या शक्तीबद्दल त्यांच्या वापराबद्दल माहिती नव्हती. जसा वीज निर्मितीचा शोध लागला त्याचे उपयोग लक्षात आले तसे ती आपल्याला माहित नसलेली शक्ती आहे हे आपण विसरलो आणि त्याचा वापर करू लागलो.

प्राचीन माणसांनी वाऱ्याच्या शक्तीवर जहाज हाकली तर अर्वाचीन माणसांनी वाफेच्या शक्तीवर गाडी चालवली. आता या सर्व शक्तीचे अस्तित्व अगोदरपासूनच होते. अशा शक्तींना जन्म ही नाही आणि मृत्यू ही नाही.” आदित्यनाथ
“अरे खरंच की!! आपण कितीतरी गोष्टी सहजरित्या वापरतो. पण त्यांच्या मागचा तर्क आपण विसरून जातो.” कुणाल
“अशाच एखाद्या शक्तीच निर्मिती रहस्य कोणाच्यातरी हाती लागलं असावं पण त्या शक्तीला नियंत्रणात ठेवणं त्यांना जमलं नसावं. आता नियंत्रित विजेचे कितीतरी उपयोग आपण पाहतो पण आकाशातून कोसळणारी वीज अनियंत्रित असते त्यामुळे त्याचा परिणाम हा विनाशच असतो. तसेच काहीसे या शक्तीबद्दल झाले असावे. ज्याला या शक्तीच्या निर्मितीचे रहस्य कळले त्याला ह्या शक्तीच्या नियंत्रणाचे गुपित कळले नसावे. आणि त्यातूनच उद्भवला असेल हा विनाश.
चर्च मधल्या पुजाऱ्यांना या गोष्टीची जाणीव निश्चितच झाली असावी आणि त्यांना जो निर्णय योग्य वाटला असा निर्णय त्यांनी घेतला असावा. शक्तीची निर्मितीच त्यांनी बंद करून टाकली.
त्यानंतर काही पिढ्या गेल्या असाव्या पुढचे पुजारी या गोष्टी विसरलेही असावेत. कालांतराने चर्च सोडून जाताना आपण येथे धगधगता निखारा ठेऊन जात आहे याची जाणीवही कोणाला झाली नसावी.” आदित्यनाथ
“पण मग हे सुरु कसे झाले असावे?” कुणाल
“मी मघाशीच म्हंटल त्याप्रमाणे पडझड झाल्यावर काही बंधन निकामी झाली असावीत काही सैल पडली असावीत आणि मग एखाद्या दबा धरून बसलेल्या वाघासारखी ती शक्ती वाट पाहत थांबली असावी.
आपण ज्याला काळ, काम, वेग म्हणतो ती परिमाण त्याच मितीत तिच्याकडे नसतीलही. आपण ज्याला शंभर वर्ष म्हणतो ते कदाचित तिच्याकरिता एक मिनिटही असू शकेल. विनाशाची पूर्व तयारी झाली होती. फक्त उरलेली बंधन कधी दूर होतात याचीच ती वाट पाहत होती.
आणि ती संधी मिळालीच गुरांनी चरताना असे बंधन दूर केले असेल, कदाचित मुलांनी खेळताना वस्तू इकडे तिकडे सरकवल्या असतील. काय झाले हे कळणे खरोखरंच अवघड आहे.” आदित्यनाथ
“यावर काय उपाय आहे का?” मामा
“पहिल्यांदा मला त्या शक्तीची कार्यपद्धत, क्षमता आणि गुणदोष जाणून घ्यायची आहेत. ते झाल्यावर त्या शक्तीला नियंत्रित ठेवण्याचा मी प्रयत्न करणार. नाहीतर सगळ्यात शेवटी अतूट बंधनात बांधून टाकणार. चला आता उद्या आपल्याला भरपूर काम आहेत. झोपूया.” आदित्यनाथ

-३४-
दुसऱ्यादिवशी सकाळीच कुणाल आणि गोरे इन्स्पेक्टर पोलिसस्टेशनवर गेले. गोऱ्यांनी दोन दोन पोलिसांची तीन पथके आजूबाजूच्या वस्तीवर चौकशीसाठी पाठवली होती.
आदित्यनाथ, समीर, रमेश व तानाजी हे झारापच्या गढीवर पोहचले. गड्यालाही त्यांनी बोलावून ठेवलेच होते. परत एकदा काल प्रमाणेच धुपाचा कार्यक्रम झाला. त्या एक दोन तासात आदित्यनाथांनी यज्ञकुंड व आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. त्या तिघांना समोर बसवून ते म्हणाले
“शक्तीच स्वरूप आपल्याला माहित नाही. मला काहीतरी संकेत मिळतील पण तुम्ही पूर्णतः अनभिज्ञ असाल. त्यामुळे माझ्या सूचनांचं शब्दशः पालन करणे आवश्यक आहे. आज दिवसभर माझे हवन आणि मंत्रउच्चारण चालणार आहे. तुम्ही सर्वानी माझ्या समोरच बसायचं आहे. या मंत्र उच्चारामुळे तुम्हाला आणि मला संरक्षक कवच मिळणार आहे. त्यामुळे सर्वानी शांतपणे बसून माझे मंत्रउच्चारण एकावेत.” आदित्यनाथ
त्यांचे हवन व मंत्रउच्चारण सुरु झाले सर्व खोली धुरांनी व हविष्याच्या वासानं आणि मंत्रउच्चाराने भरून गेली होती. काही सूत्रे ऋग्वेदातील लक्षात येत होती पण बाकीचे बरेच मंत्रउच्चार हे तर्काच्या पलीकडील होते.
आदित्यनाथांनी तिथल्या देवघरातील मूर्तींनाच प्रमुख मूर्ती केले होते. जवळ जवळ चार तास हा कार्यक्रम चालला होता. त्यानंतर परत एकदा धुपाचा कार्यक्रम झाला आणि सर्व गढी बंद करून आम्ही कुडाळला आलो. कुडाळला आल्यावर ते काही न खातापिताच ध्यान मग्न झाले होते.
संध्याकाळी त्यांनी दूध आणि फळे एवढ्यावरच आहार सीमित केला. जेवायला कुणाल बरोबर इन्स्पेक्टर गोरे आले होते. जेवणानंतरच्या मीटिंगला पहिल्यांदा गोऱ्यांनी सुरवात केली.
“देसाई आम्ही आज आठ दहा वस्त्यांवर जाऊन आलो या ठिकाणहूनच काही मुली व बायका बेपत्ता झाल्या आहेत. सगळ्यांची माहिती गोळा केली पण फारसे काही हाताला लागले नाही. आता उद्या सकाळी उरलेल्या वस्त्यांवर जाऊ आणि काही छडा लागतो का ते पाहू. काही तुकड्या आजूबाजूच्या वस्त्यांवर गेल्या आहेत त्यांचा रिपोर्ट मला उद्या सकाळी कळेल. आता मी निघतो. उद्या सकाळी येईनच.” गोरे
असे म्हणून गोरे निघून गेले. गोरे निघून गेल्यावर खऱ्या मीटिंगला सुरवात झाली.
“मला काही मिळेल असे वाटत नव्हते कारण त्या सगळ्यांची माहिती पूर्वी घेतली होती, आज मात्र पोलिसांनी ती परत गोळा केली.” समीर
“आदित्यनाथ तुमचं काय संशोधन झालं?” मामा”
“काही नाही. युद्धाची प्राथमिक तयारी करतोय. संरक्षक भिंती उभारण्याचं काम सुरु आहे. काकांनी काही बंधन निश्चितच घातली आहेत पण ती बंधन माहिती करून घ्यायच्या आधी तुमच्या संरक्षणाची तयारी झाली पाहिजे. नाहीतर अनोळखी शक्तीपुढे तुम्ही चिरडले जाऊन बेपत्ता लोकांमध्ये अधिक भर पडेल.” आदित्यनाथ
“देवा उद्याचा कार्यक्रम काय आहे?” समीर
“कुठलीही घाई करणे आपल्याला अनुकूल नाही. आत्ता पर्यंतच्या आपण केलेल्या प्रयोगात कुठेही अडथळा आला नाही व काही विपरीतही घडले नाही. त्याअर्थी काकांनी घातलेली बंधन जागेवर आहेत. मला त्या बंधनांचा अंदाज आला आहे पण ती शोधायची घाई आपल्याला करायची नाही. उद्यासुद्धा माझे हवन चालेल. पण बरेच मंत्रउच्चार हे दिवाणखाण्यातील गणपतीसमोर असतील. माझ्या अंदाजाप्रमाणे तेच शक्तीचे वस्ती स्थान आहे. उद्या माझ्या बरोबर रमेश सतत असला पाहिजे. पण तू आणि तानाजी तसे मोकळे आहेत.” आदित्यनाथ
दुसरा दिवस पहिल्या दिवशीसारखाच समीरच्या दृष्टीने कंटाळवाणाच गेला. त्याला काहीतरी घडणे अपेक्षित होते आणि काहीच घडले नव्हते.

-३५-

आदित्यनाथ मात्र काही विशिष्ट हेतूने त्याचें कार्य चालू ठेवत होते. रात्री मीटिंगमध्ये काही बोलण्यासारखे नव्हतेच. फक्त गोऱ्यांचा रिपोर्ट होता. त्यांनी सर्व बेपत्ता व्यक्ती कव्हर केल्या होत्या. पण काहीच थांगपत्ता लागला नव्हता. त्यांच्या बरोबरच्या पथकांनी आजूबाजूच्या वस्त्या पिंजून काढल्या होत्या. पण कुठल्याच वस्तीत साथीचे आजार पसरले नव्हते. किंवा सुहासचा फोटोही कुणी ओळखला नव्हता. यांचा अर्थ सुहासने रमेशला खोटे सांगितले होते. सर्व वस्त्यांवर शोध घेण्यात काहीच अर्थ नव्हता. बहुतेक वाळिंबेंच्या संमतीने हि केस फाइलच होणार होती.
पुढच्या दिवशी आदित्यनाथ व रमेश झाराप ला गेले. समीर व कुणाल कुडाळ पोलीस स्टेशनला गेले. पोलीस चौकीचे वातावरण पूर्ण बदलले होते. स्वच्छता आणि अदबशीरपणा सगळीकडे दिसून येत होता. समीर व कुणाल गोऱ्यांच्या केबिन मध्ये गेले.
“काय गोरे हवालदार अजून रिमांड मध्येच आहेत का? बोलवा पाहू जरा त्याला. :
हवालदाराला नुसतेच रिमांडमध्ये घेलते होते. चार्ज लावून कोर्टात उभे केले नव्हते. हवालदार केबिन मधे आला व समीर ला पाहून मान खाली घालून उभा राहिला.
“मग काय हवालदार ढवळे? चला, कोर्टात जायची तयारी करा.” गोरे
“साहेब माझं रेकॉर्ड खराब होईल.” ढवळे
“हे बघा ढवळे, चौकीत येणारा प्रत्येक नागरिक हा गांजलेला असतो. काहीतरी अडचणीत सापडलेला असतो. त्यांना मदत करणं तुमचं कर्तव्य असत. पण ते सोडून तुम्ही जेव्हा अरेरावीची भाषा करता, तेव्हा तुम्हाला कुणीतरी समज द्यावीच लागते.” समीर
“चुकलं साहेब आता जन्माची अद्दल घडली.“ ढवळे
“गोरे जाऊ द्या त्याला. काढा रिमांडच्या बाहेर. झाली तेवढी शिक्षा बास झाली. ढवळे आता तरी नीट वागा.” समीर
ढवळेंनी वाकून समीरचे पाय धरले. गोरे हा सर्व तमाशा बघत होते. समीरचा उद्देश त्यांच्या लक्षात आला होता. ढवळे केबिनच्या बाहेर पडताच चौकीतले टेन्शन एकदम कमी झाले.
“हे बघा समीर ही केस तर आता निकालात निघतीच आहे. पण केव्हाही कसलीही मदत लागली तर अर्ध्यारात्री फोन करा.” गोरे
गोरेंचे आभार मानून समीर व कुणाल तेथून निघाले. जरा इकडे तिकडे भटकून बंगल्यावर परतले. संध्याकाळी आदित्यनाथ व रमेश परत आले. नाथांचा चेहरा गंभीर दिसत होता. संध्याकाळी सर्व जमल्यावर त्यांनी प्रारंभ केला.
“माझी प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. मी आज मुद्दामच रमेशला फक्त नेले. माझे संरक्षण करायला मी समर्थ होतो. या रमेशला त्या शक्ती पासून संरक्षण तर आहेच. तस तुमच्याबद्दल कुणाच म्हणता येणार नाही.” आदित्यनाथ
“आज काही विशेष घडलं का?” कुणाल
“विशेष असं नाही. पण आज मी शक्तीची बंधन तपासून पाहिली. आता मी सांगू शकतो की नव्वद टक्के बंधन कुठे आहेत.” आदित्यनाथ
“आता पुढचा प्लॅन काय आहे?” समीर
“प्लॅन म्हणजे उद्या ती बंधन दूर करायची. असं झालं म्हणजे ती शक्ती आपला प्रभाव दाखवायला सुरवात करेल. आपल्याला वेगवेगळ्या तह्रेची दृश्ये दिसतील. ज्याचा मोह पडावा अशा गोष्टी आपल्या समोर येतील. पण हे सगळं फसवं असेल. काहीही करून ती शक्ती आपल्यावर प्रहार करायला टपली असेल. त्यांच्या पासून प्रत्येकाचं संरक्षण मी करेनच, पण एखादी अशी वेळ येईल की तुम्हाला मोह, भीती अनावर होईल आणि या क्षणापासूनच तुम्हाला स्वःताला वाचवायला लागेल. अर्थात तुम्ही तेथे यावे असा माझा आग्रह नाही.” आदित्यनाथ
“ठीक आहे. उद्या सकाळी विचार करू.” मामा
दुसऱ्या दिवशी रमेश, समीर व तानाजी एवढ्यानीच आदित्यनाथ यांच्या बरोबर जावे असे ठरले. अर्थात त्या दिवशी न जात दुसऱ्या दिवशी जायचे ठरले.

-३६-
सकाळी सगळ्यांना एकत्र बसवून आदित्यनाथांनी काही गोष्टी समजवायला सुरवात केली.
“हे बघा कोणीही माणूस आपल्या घरात शिरू नये म्हणून आपण घराला दार बसवतो आणि बाहेर कोण आलं आहे हे खात्री करूनच दार उघडतो. याचा अर्थ आपण दरवाजा उघडल्याशिवाय कोणीही आता येऊ शकत नाही. सगळ्या शक्तींचे असेच आहे. आपण बटन दाबल्या शिवाय दिवा लागत नाही. पंखा फिरत नाही. याचाच अर्थ कुठल्याही शक्तीला काम करण्यासाठी किंवा आपल्यावर आघात करण्यासाठी आपल्या संमतीची गरज असते. आपल्या संमतीशिवाय काहीही होऊ शकत नाही.” आदित्यनाथ
“बरोबर पण शॉर्ट सर्किट होते आणि दिवे लागायला लागतात किंवा जायला लागतात. पाण्याचा पाइप फुटतो तसे पाणी धो धो वहायला लागते. त्याच काय?” समीर
“आपण शक्तीवर बंधनं घातलेली असतात. पाईपलाइन, फ्युज ही सगळी बंधनं आहेत. काहीतरी कारणांनी ही बंधनं तुटली किंवा नष्ट पावली तर शक्तीचा उद्रेक होतो. आता तुझ्याच म्हणण्या प्रमाणे पाईप फुटला किंवा शॉर्ट सर्किट झाले याचाच अर्थ काही कारणांनी ही बंधनं सुटली आहेत.” आदित्यनाथ
“हो पण या सगळ्याचा आत्ताच्या प्रकरणाशी काय सबंध?” मामा
“ज्या शक्ती जाणवतात त्यांना भौतिक प्रकारची बंधनं घालता येतात. जसे कपडे खराब होऊ नये म्हणून ऍप्रन वापरतो, पावसाळ्यात रेनकोट वापरतो ही सगळी भौतिक बंधनं आहेत.” आदित्यनाथ
“तुम्ही आत्ता ज्ञानेंद्रियांना जाणवणारी शक्ती म्हणालात म्हणजे त्यांच्या बाहेर काही शक्ती आहेत का?” मामा
“हो आहेत. समीरनेही त्याचा अनुभव घेतला आहे. त्यांना आपण अतींद्रिये म्हणूयात. जसे त्रिमितीतले जग आपल्याला लक्षात येते. समय ही चौथी मितीही जाणू शकतो. पण जेव्हा शास्त्र किंवा गणित असंख्य मिती आहेत असे म्हणते आणि सिद्धही करते. तेव्हा त्या मिती आपल्या कल्पनेच्या बाहेर असतात. आणि त्या आपल्याला जाणवू शकत नाहीत. तसेच काहीसे अतींद्रिये शक्तीबद्दल असते. त्या ही असंख्य आहेत. अर्थातच त्यांचे अस्तित्व गणित किंवा शास्त्रांनी सिद्ध करता आले नाही.” आदित्यनाथ
“जर या शक्तींचा अस्तित्व सिद्ध झालेले नाही. त्या शक्ती आपल्या ज्ञानेंद्रियांच्या बाहेर असतात.तर त्या आहेतच कशावरून?” कुणाल
“मी ज्ञानेंद्रियांना शक्ती जाणवत नाही असे म्हणालो पण त्या शक्तींनी केलेला परिणाम मात्र जाणवतो. जसे वीज आपल्याला दिसत नाही पण तिचा परिणाम मात्र जाणवतो. तसेच या शक्तीनंबाबत आहे. काही जणांना या शक्ती इंद्रियातील ज्ञानामुळे जाणवू शकतात. त्यालाच आपल्या योगात कुंडलिनी जागृत होते असे म्हणतात. आणि जस जसे कुंडली चक्र जागृत होतात तसे काही सिद्धी पण मिळतात.” आदित्यनाथ
“मग हे मंत्र तंत्र कशाकरिता?” कुणाल
“मी आत्ताच सांगितले की तुमच्या मनाचे दरवाजे उघडल्याशिवाय ह्या शक्ती तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत. पतंजली योगशास्त्र प्रमाणे आपले मन हे शरीराला नियंत्रित ठेवते.
बुद्ध काळातील एक सुरेख गोष्ट आहे.
त्यावेळेला लोकं प्रवासाला जाताना धर्मशाळेत किंवा सरायीत मध्ये उतरायचे. अशाच एका सरायीत मध्ये वीस पंचवीस जण उतरले होते. दूसऱ्यादिवशी त्यातला एक सकाळी लवकरच न्याहारी करून बाहेर पडला. सरायीतल्या सकाळच्या न्याहारीमध्ये काहीतरी विषारी पदार्थ पडला होता. कदाचित पाल असावी.
न्याहारी संपल्यावर खाली दोन तीन पाली मेलेल्या अढळल्या. थोड्याच वेळात सगळ्यांना उलट्या सुरु झाल्या व सर्व प्रवासी मेले. सरायीतवाल्याला बाहेर गेलेल्या माणसाची काळजी होती. त्याचे काय झाले असावे हे त्याला कळत नव्हते. पण संध्याकाळी तो प्रवासी परत आल्यावर कोणीच प्रवासी दिसेना म्हणून त्याने विचारले असता त्याला सकाळची हकीकत कळली आणि हकीकत ऐकताच त्याला उलट्या सुरु झाल्या व तो प्रवासीही तेथेच मेला. त्याला कळेपर्यंत त्याची प्रकृती ठीक होती. पण ज्या क्षणी मनानी धास्ती घेतली त्या क्षणी त्याच्या शरीरावर परिणाम झाला.
थोडक्यात तुमचे मन खंबीर असणे हे अत्यंत महत्वाचे असते. यालाच आपल्या पूर्वजांनी मन:शक्ती असे नाव दिले आहे. आपण केलेल्या मंत्र उच्चारामुळे ही मन:शक्ती वाढायला मदत होते.
“मंत्रामुळे मन:शक्ती कशी वाढते ?” मामा
“कार्यकारणभाव सांगणे अवघड आहे पण ज्या तऱ्हेनी चिलखतामुळे आपला शस्त्रापासून बचाव होतो तसेच काही स्वर ठराविक लयीत आणि ठराविक पद्धतीने म्हंटल्यामुळे मनावर परिणाम होत असावा. एक लक्षात ठेवा. बहुतेक मंत्रात शब्दांच्या अर्थापेक्षाही त्याच्या उच्चाराला, त्याच्या आरोह अवरोहाला महत्व असते आणि त्याचमुळे आपली विद्या ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संहिता म्हणून जाते.” आदित्यनाथ
“आत्तापर्यंत मी या सगळ्याला भाकडचं समजत होतो. या मागे इतके शास्त्र दडले असेल याची मला खरच कल्पना नव्हती.” मामा”
दुसऱ्यादिवशी सकाळी उजाडायच्या आतच चौघे गढीवर पोहचले. लगेच धुपाचा कार्यक्रम झाला. यज्ञकुंडात हवन करून काही गोष्टी गोळा केल्या आणि सर्व दिवाणखान्यात आले. दिवाणखाण्यात तीन खुर्च्या मांडून ठेवल्याच होत्या. आज आदित्यनाथांना त्या चौघांशिवाय कोणीही वाड्यावर नको होते. खुर्चीवर बसल्यावर आदित्यनाथांनी बोलायला सुरवात केली.
“काकांनी या शक्तीवर दोन तह्रेची बंधनं घातली होती. एक म्हणजे भूर्ज पत्र वाचन आणि ते सहजासहजी कोणी वाचू नये म्हणून ते बंदोबस्तात ठेवले. दुसरे म्हणजे गणपतीचं चित्र. ते उघडल्याशिवाय आतील भिंत उघडी होत नव्हती.” आदित्यनाथ
“आपण जरा इतिहास बघू. त्या पडक्या चर्चजवळ जेव्हा काही गोष्टी बंधनाच्या बाहेर पडल्या तेव्हापासूनच तिथले प्राणी आणि मुलं बेपत्ता झाली. त्यानंतर काकांनी नवीन बंधनं तयार केली आणि काकाही बेपत्ता झाले. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी बजाबाला काही सूचना दिल्या होत्या. नंतर हे सत्र पूर्णतः थांबलं. त्यानंतर कित्येक वर्ष काही घडलं नाही. सुरवात झाली ती सुहास इथे राहायला आल्यावरच.
सुहासने सर्व गढी साफ केली तेव्हा त्याच्या हाताला त्या पेट्या आणि भूर्जपत्र लागली असणार आणि कुतूहलापोटी त्याने ते भूर्जपत्र वाचायचा प्रयत्न केला असणार आणि गणपतीचं चित्र असलेलं दार उघडलं असणार.
आता आपण त्या शक्तीला तेष असे नाव देऊ. तेषच्या प्रभावाखाली सुहास गेल्यावर माणसं बेपत्ता होण्याची प्रक्रिया सुरु झाली. पण त्या वेळेला सुहास कुठे होता व माणसं कुठे गेली हे आत्ताच सांगणं कठीण आहे. “आदित्यनाथ
“मग मला सुहास का दिसला? आणि शिवा का नाहीसा झाला?” रमेश
“हे बघ रमेश तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू पेटी उघडून भूर्जपत्र वाचायचा प्रयत्न केला होतास आणि गणपतीचं चित्र असलेले कपाट ही उघडलं होतस. अशा रीतीने तेष वरची बंधनं तू थोड्यावेळा साठी दूर केली होतीस.” आदित्यनाथ
“तू पाणी पिऊन येईपर्यंत तेष ची जादू सुरु झाली होती आणि तो शिवाशी बोलू लागला होताआणि शिवाही नाहीसा झाला. पण तू थोडक्यात वाचलास ते तुझ्या हातातील ताइतामुळेच. हे संरक्षण किती काळ टिकले असते हे सांगणे अवघड आहे. कारण तेष ची शक्ती वाढत असल्याचं मला जाणवत आहे. यावरून हे निश्चित होते की भूर्जपत्रे व गणपतीचं चित्र हि दोन बंधनं असावीत आणि दोन्ही बंधनं काढल्यावरच तेष जागृत होत आहे.
पहिल्यांदा आपल्याला भूर्जपत्राच्या दोन्ही पेट्या पूर्णतः बंद करून ठेवायच्या आहेत.” आदित्यनाथ
असे म्हणून आदित्यनाथांनी त्या दोन्ही पेट्या बंद असल्याची खात्री केली त्याच्यावर एक लाल वस्त्र टाकले आणि हवनाची विधीहि टाकली. त्यानंतर त्यांनी खुर्च्यांभोवती उदीचे रिंगण तयार केले. त्यांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत त्या रिंगणाच्या बाहेर येऊ नये असे बजावले. प्रत्येकाला त्यांनी उदीच्या पुड्याही दिल्या. काही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू त्यांना दिसली तर त्या वस्तू किंवा व्यक्तीवर ही उदी टाका.
“समीर, रमेश व तानाजी हा सर्वच प्रयोग धोकादायक आहे. अशाच प्रयोगात काका बेपत्ता झाले होते. आपल्यावरही ती वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला मागे फिरायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता.” आदित्यनाथ
अर्थातच कोणीही मागे फिरणे शक्यच नव्हते. आदित्यनाथ त्यांच्या खास कपड्यांमध्ये होते. गळ्यात व मनगटात रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर त्रिपुंड रेखलेला आणि काहीतरी लावले होते की ज्याचा मंद सुगंध पसरला होता.
तानाजीला त्यांनी बाहेर बोलाविले त्याच्या मस्तकावर हात ठेवून काही मंत्र म्हणाले. अंगावर अक्षदा टाकल्या व त्याला घेऊन ते गणपतीच्या चित्राकडे गेले. आपल्या जवळच्या किल्लीने त्यांनी गणपतीचे चित्र उघडले. आत विटांनी बांधलेली भिंत होती.
आदित्यनाथांनी तसवीर काढून या लोकांजवळ दिली व तानाजीला खूण केली. तानाजीने कुडाळवरुन येताना कुदळ आणि पहार आणली होती. आदित्यनाथांनी तानाजीच्या पाठीवर हात ठेवला व म्हणाले “चल दोस्ता लाग कामाला.”
भिंतीवर कुदळीचे चे घाव बसू लागले आणि थोड्याच वेळात विटांची भिंत साफ झाली.

आत एक संगमरवरी चौकोनी फरशी होती. आदित्यनाथांना असे काही सापडेल याची कल्पना होती.
“मित्रांनो जर तेषला तुमच्यावर प्रभाव पडायचा असेल तर हे लक्षात ठेवा, तुम्ही प्रवेश दिल्याशिवाय तो हे करू शकत नाही. तो तुमच्या ज्ञानेंद्रियांना भास निर्मिती करण्याचे बरेच प्रयत्न करेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्ती दिसतील किंवा बरेच दिवसांपूर्वी हरवलेली एखादी गोष्ट दिसेल किंवा तुम्हाला एखादा ओळखीचा आवाज ऐकू येईल. याचा अर्थ एवढाच समजायचा की तुमच्या मनात त्याचा प्रवेश झाला आहे त्यामुळे तुमच्या मनात दडलेल्या वस्तू तो दाखवत आहे. तेष चे रंग रूप कसे असेल या विषयी आपण आत्ताच कल्पना करू शकत नाही. पण तुमच्या मनातल्या प्रवेशाला तुमच्या बुद्धीने आवरून ठेवा. कुठल्याही परिस्थितीत त्याच्या खोटारडेपणाला फसू नका. जर तुम्ही त्याचा बुद्धीने स्वीकार केला तर तो तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायला सिद्ध होईल. मग पुढे काय होईल ते सांगता येणं फ़ार अवघड आहे. आता आपण जसजसे खोलात जाऊ तसतसे आपल्यावरचा तेष चा प्रभाव वाढत जाणार आहे. मी या गोष्टींना लगेच प्रतिबंध घालू शकतो पण त्यांनी आपले काम साध्य होणार नाही. कारण मला शक्य झालं तर तेष वर नियंत्रण मिळवायचे आहे.” आदित्यनाथ
सगळे जण शांत बसून बघत होते. त्या फरशीवरच्या नक्षीमध्ये अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत होते. काकांनी गुहेतून आणलेली फरशी हीच असावी अशी सगळ्यांची खात्री होती.
काकांनी त्या शक्तीला रोखण्यासाठी किती धोके पत्करले होते हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले होते. आदित्यनाथांनी तानाजीला परत रिंगणात जायला सांगितलं. ज्याला कुणाला तेष पहिल्यांदा सापडला किंवा तेषला जागृत करता आले त्याने तेषला बोलाविण्याकरिता हि फरशीवरची आकृती तयार केली होती. मध्ययुगीन यूरोप मध्ये कुठेतरी हे घडले असावे. आपण ही आपल्या पूजेत काही देवतांना आवाहन करण्यासाठी विशिष्ट रचनेची यंत्रणा वापरतो. आपण ही श्री यंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र अशी असंख्य यंत्र कागदावर किंवा धातूतून कोरून वापरतो. तेष चे अस्तित्व विश्वात कुठे असेल हे माहित नाही.
त्यांनी तेष ला हवे तेव्हा आवाहन करण्यासाठी ही फरशी तयार झाली आहे. हे एक तह्रेचे माध्यम असते की ज्यामुळे ती शक्ती आपल्या विश्वात येऊ शकते
“मग आपण ती फरशी फोडून टाकली आणि ती भूर्जपत्रे जाळून टाकली तर तेष संपल्यातच जमा होईल.” समीर”
“हो तू म्हणतोस ते काहीस खरं आहे पण त्यामुळे तेष चा नाश होणार नाही तर त्याची ह्या विश्वात येणाची वाट तात्पुरती रोखली जाईल. नंतर तेष ह्या विश्वात येणाचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्याला आपले भक्ष माहिती झाले आहे. रक्ताला चटावलेल्या जनावराला जसे पिंजऱ्यात बंद तरी करावे लागते किंवा मारून टाकावे लागते तसेच आपल्याला तेष च्या बाबतीत करावे लागेल.” बर, आता काय करायचं ते मी बघतो. तुम्ही सगळे शांत बसा. कुठलाही जप करा पण एकमेकांशी बोलू नका.” आदित्यनाथ
आदित्यनाथांनी त्या फरशीसमोर आसन घातले. आणि भूर्जपत्राच्या पेट्या घेऊन ते आसनावर बसले. त्यांच्या आजू बाजूला असंख्य वस्तू होत्या. रुद्राक्ष, तीळ, उदी, कुंकू इत्यादी... बाकीचे तिघेजण श्वास रोखून पाहत होते.
नाथांनी एक भूर्जपत्र काढून वाचायला सुरवात केली.आता नक्षी धुरकट दिसायला लागली होती. दुसरे भूर्जपत्र वाचायला सुरवात केल्यानंतर त्या धुराचा रंग काळाकुट्ट झाला आणि त्या ठिकाणी चिकट पदार्थाचा एक मोठा गोळा तयार झाला. तो गोळा घरंगळत नाथांपाशी आला. नाथांनी काही मंत्र म्हणत पाणी शिंपडलं. त्या गोळ्याच अस्तित्व अचानक नाहीस झालं. डाव्या दारातून अचानक DCP राणे आत आले.
“काय समीर तुझ्या कामाचं काय झालं? त्या गोरे ऐवजी मीच तुझं काम केलं आहे. इथं येता येता रस्त्याने एका तरुणाने लिफ़्ट मागितली आणि तो येथेच येत होता. गप्पा मारताना कळले की तो सुहास देसाई आहे. त्याच्या बरोबर त्याचा गडी शिवा पण आहे.” राणे
समीर बधिर झाला होता. नको त्या वेळेला DCP राणे का आले होते हे त्याला कळत नव्हते. सगळे जण शांतच होते. नाथांचा जप सुरूच होता.
सुहास, शिवा आत या इथं लोक तुमची वाट पाहतायेत. त्याच दारातून ते दोघे ही आत आले. समीरला नाथांचे शब्द आठवत होते. हे खरे आहेत की भास आहेत. हे कळण्याच्या पलीकडील होते. पण आत्ता शांत बसलेले बरे.
तानाजी खुर्चीवरून उठला आणि राणेंना म्हणाला “या साहेब इथं बसा. “
“नकोरे बसून बसून कंटाळा आला आहे. सुहास दमला आहे त्याला बसू देत.” राणे
समीर राणेंना म्हणाला या हो जरा बोलू या. तानाजीचा डाव समीरच्या लक्षात आला होता. खर आणि खोटं यात आता धूसर रेषाच राहिली होती.
“नको. बोलायचंच असेल तर आपण बाहेर जाऊ. इथे धुराचा फार त्रास होतोय.” राणे
समीर उठून बाहेर जाणार एवढ्यात तानाजीने त्याला खुर्चीला जखडून ठेवले.
“काय मालक, तुम्हालाही” यांना पाहिलत का ?”या सदरात फोटो द्यायचा आहे का?” तानाजी
समीरला पटकन नाथांच्या बोलण्याची जाणीव झाली आणि त्याने राणे, सुहास व शिवा यांच्या दिशेने उदी टाकली. उदी अंगावर पडताच त्या तिघांचे विरघळून तीन काळ्या गोळ्यात रूपांतर झाले.
बघता बघता त्याचे दहा गोळे झाले आणि रिंगणाच्या बाहेरून त्या तिघांभोवती फिरू लागले. हळू हळू त्यांचा आकार वाढतच गेला. त्यातल्या पाच गोळ्यांनी आदित्यनाथां भोवती फेर धरला.
एखाद्या हिंस्र श्वापदांनी लचके तोडण्याकरिता धावावे तसे त्यांचे वर्तन सुरु झाले. अर्थातच आदित्यनाथांच्या शरीराला स्पर्श होताच चटका बसावा असे ते मागे येऊ लागले. नाथांचे पठण चालूच होते. हळू हळू त्या गोळ्यातून हरवलेल्या पैकी दहा तरुणी विवस्त्र अवस्थेत त्या तिघांभोवती फिरू लागल्या. फेर धरता धरता त्या लाडिक हावभावाने तिघांना खुणावत होत्या. तिघांनाही मनावर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. हळू हळू नाथांचा स्वर वाढला व अचानक त्या तरुणी नाहीशा झाल्या त्यांच्या जागी आता मोठाले हत्ती एवढे वाघ आले. एवढे मोठे वाघ बघून आम्ही घाबरलो होतो आणि आदित्यनाथांची काळजी वाटत होती.
एखाद्या हत्तीने जर नाथांच्या डोक्यावर पाय ठेवला असता तर नाथ सपाट झाले असते. समीर दोघांना सांगत होता की त्यांनी कुठल्याही देवावर लक्ष केंद्रित करावे. मगाचच्या तरुणी काय किंवा आत्ताचे हत्ती काय दोन्हीही भास मात्रच आहेत. तेषच वेगवेगळे आकार घेऊन कधी आपल्याला मोहात पाडण्याचा तर कधी घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यत ते हत्ती हवेतच विरघळले.
आता मात्र तेष जास्तच वखवखलेला दिसत होता. नाथांचे मंत्रउच्चारण सुरूच होते. नाथ व तेष एकमेकांवर हमला करायच्या प्रतीक्षेत तर होते पण दोघांनाही एकमेकांच्या शक्तीचा अजून अंदाज आला नव्हता. साम, दाम, दंड, भेद या चारीचा उपयोग तेष त्या तिघांना मोहात पाडण्यासाठी करत होता.
अचानक नाथानी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यातून स्फुलिंग बाहेर पडत होते. त्या अग्निकणांसमोर तेष थोडासा मलूल पडल्यासारखा वाटला पण काही क्षणच.
थोड्या वेळात माणसांच्या प्रेताचे कुजलेले वास येऊ लागले. त्याचा दुर्गंधीने खोली भरून गेली. त्यातच त्या काळ्या आकाराने सुहास ला रमेश समोर उभे केले. तिघेही भीतीने थिजून त्या दृश्याकडे पाहात होते. बघता बघता तेष ने सुहासच्या गालाचा लचका तोडला व विचित्र आवाज करत खाऊ लागला. सुहासचा जबडा उघडा दिसत होता. सुहास जिवाच्या आकांताने ओरडत होता “रमेश मला वाचव येथून बाहेर काढ” सुहास ला वाचवण्यासाठी रमेश पुढे जाऊ नये म्हणून तानाजी व समीर ने त्याला घट्ट धरून ठेवले होते.
तेवढ्यात त्या काळ्या पदार्थाने सुहास चा कोथळाच बाहेर काढला आणि हक्का नूडल्स खावे तसे तो सुहासची आतडी खाऊ लागला. सुहास गुरासारखा ओरडत होता. रमेश त्याला वाचवण्यासाठी धडपडत होता. शेवटी तानाजीच्या लक्षात येऊन तानाजीने नाथांनी दिलेली उदी तेष च्या दिशेने टाकली. उदीचा स्पर्श होताच अग्निपुढे लोणी विरघळावे तसे तेष आणि सुहासचे झाले. त्यांचे विरघळून जमिनीवर काळ्या रंगाचे डबके साठले होते आणि थोड्यावेळाने तेही नाहीसे झाले.
तेष ला आता संरक्षण यंत्रणेचा सुगावा लागला होता. तेष च्या मनात काय आले माहित नाही पण खोली एकदम स्वछ झाली. आदित्यनाथांचे मंत्रउच्चारण सुरूच होते. हळू हळू नाथांचा आवाज खर्जात जाऊन पोहचला आणि नाथांनी चटकन उठून गणपतीचे चित्र लावून टाकले. त्या दोन्ही पेट्यांचा बंदोबस्त करून टाकला आणि या तिघांकडे वळून ते म्हणाले
“नाटकाचा पहिला अंक तरी संपला तेष अतिशय बलाढ्य आहे यात शंकाच नाही. त्या शिवाय तो मनोरुपी आहे म्हणजेच तो तुमच्या मनातले खोलवर दडलेले विचार समजावून घेऊन त्या प्रमाणे रूप घेतो” आदित्यनाथ”
“हो खरे आहे मला राणे दिसले” समीर
“मला सुहास दिसला व आम्हा सगळ्यांना विवस्त्र स्त्रिया पण दिसल्या “ रमेश
“थोडक्यात तेष तुम्हाला विविध रूपे दाखवून भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत होता. तुम्हाला तुमच्या परिचित व्यक्तीच दिसल्या. त्याचे खरे रूप फक्त मला दिसले. एखाद्या मोठ्या अमिबासारखा त्याचा आकार आहे. त्याला त्याच्या जगण्याकरिता आणि शरीर वाढवण्याकरिता सतत जीवन घटकांची गरज असते. ते मिळवण्याच्या मागे त्याचे सर्व प्रयत्न असतात. सुरवातीला त्याने प्राण्यांपासून घटक मिळवले. अर्थातच त्याच्या अंगभूत शक्तीमुळे त्याने गिळलेल्या प्राण्यांचे रूप तो घेऊ शकत होता. त्याची शक्ती अफाट आहे. त्याचा मेंदू ही त्याच्या सर्व शरीरभर पसरला आहे. आणि त्याचे असंख्य आकार असले आणि त्याने एकाच वेळेला वेगवेगळी रूपे धारण केली तरी त्याचा मेंदू, संवेदन यंत्रणा आणि आज्ञाचक्र हे एकाच केंद्रात असते. त्यामुळे तो कुठल्याही आकारात जाऊ शकतो. माझ्या समोर अशी नाटकं करू नयेत एवढे ज्ञान व बुद्धी त्याला निश्चितच होती.”
“एक तर मला तुम्ही भीती खाली, मोहापुढे किती टिकाव धरता आहात याची खात्री करून घ्यायची होती. तशीच वेळ पडली असती तर मी निश्चितच मध्ये पडलो असतो. पण तुमचे सर्वांचेच वागणे धैर्यशील होते.” आदित्यनाथ
“मग आता पुढे काय?
“एक म्हणजे तो जेव्हा एवढी रूपे घेतो तेव्हा त्याची शक्ती क्षीण होते. आणि मला तेच हवे आहे. आजपर्यंत त्याने एक एक माणसालाच गिळंकृत केले आहे त्याची भूख निश्चितच प्रज्वलित झाली असणार. आता तो सावज मिळत नाही म्हंटल्यावर निश्चितच चिडला असणार. तुम्ही तुमचे धैर्य असेच ठेवा योग्य क्षण येताच तो अतिशय रागावलेला असतानाच मी त्याच्यावर हल्ला करेन. आजचा आपला कार्यक्रम थांबवू व उद्या परत सुरु करू.” आदित्यनाथ
नाथांनी त्या पेट्यांवर परत वस्त्र ओढून ठेवले आणि गणपतीचे चित्र व्यवस्थित बसल्याची खात्री करून घेतली.गढीचा पुरेपूर बंदोबत करून चौघेही कुडाळला परतले.
मामा त्यांची वाटच पाहत होते. रमेश नी त्यांना झालेल्या घटना थोडक्यात सांगितल्या. आज सगळे दमल्यामुळे विश्रांती घेऊ लागले. सगळ्यांची खात्री पटली होती की सुहास सकट बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे काय झाले आहे. काकांचे मात्र अजून काहीच कळले नव्हते.

-३८-
दुसऱ्या दिवशी काय होणार याच टेन्शन सगळ्यांनाच होत.
आदित्यनाथ मात्र त्यांच्या साधनेत मग्न होते. आता त्यांना कोणाशी लढा द्यायचा आहे याची जाणीव झालेली होती. त्यामुळे काही निश्चित साधना त्यांना करता येणार होती. आता सोपा उपाय म्हणजे ती फरशी व भूर्जपत्र नष्ट करणे हा निश्चितच होता पण तेष त्यामुळे दडून बसला असता. त्याने आपल्या सृष्टीत येण्याचे नवीन मार्ग शोधून काढले असते आणि त्या वेळेला काय झाले असते हे कुणीच सांगू शकत नव्हतं. त्यामुळे तेष ला नष्ट करून त्याला ब्रह्मत्वात विलीन करणे हेच फायद्याचे होते. याच्यातही धोका होताच. काकांनी हा धोका पत्करून काही काळासाठी तेष ला बंधनात बांधून ठेवलेच होते. पण त्या वेळेला त्यांनी तेष चा पूर्ण नाश का केला नाही? हे कळले नव्हते. त्या वेळेला मात्र आदित्यनाथांना असा कुठलाही चान्स घ्यायचा नव्हता. तेष नियंत्रणाच्या पलीकडला आहे आणि काही कारणांमुळे त्याच्यात वाईट गुणधर्म मिसळलेले आहेत हे त्यांना कळून चुकलं होत. त्यामुळे आजच्या साधना ह्या जास्त प्रहारक आणि निर्णायक अशा होणार होत्या.

मामांना या सर्व प्रकारची उत्सुकता होती पण भीतीही वाटत होती. नाथांनी मामा व कुणाल यांना येऊ नका असे सांगितले. रमेश, समीर व तानाजी हे प्राथमिक अनुभवातून गेले होते. दुसऱ्यादिवशी तेष निकराचा प्रयत्न करणार हे निश्चितच होते. त्यामुळे आता नवीन कुणाला घेऊन जाण्याची नाथांची इच्छा नव्हती.
दुसऱ्यादिवशी सकाळी सर्वजण लवकरच उठले चहा, नाश्ता करून सगळेच झारापला निघाले. जायच्या अगोदर नाथांनी तिघांनाही काही भस्म पाण्यातून प्यायला दिले. त्यामुळे मनशांती वाढेल असे सांगितले. झारापला गेल्यावर आज कामाची जागा बदलली होती. आजचे काम यज्ञकुंडाच्या खोलीत होणार होते.
भूर्जपत्र व गणपतीचे चित्र काढल्याशिवाय तेष ला या जगात प्रवेश नव्हता हे निश्चित झाले होते. नाथांना एक वेगळीच भीती होती की जर काही चुका झाल्या तर तेष बाहेत राहील किंवा त्यांच्या दृष्टीने सर्व जगच त्याला मोकळे असेल. आणि मग प्रत्येक तासाबरोबर, प्रत्येक घासाबरोबर त्याची संहारक शक्ती वाढत जाईल.
पहिल्यांदा झाराप मग कुडाळ, मग तालुका, मग सिंधुदुर्ग असे करत करत त्याने जगच व्यापले असते. सर्व पृथ्वीवर अति संहारक असा तेष च व्यापून राहिला असता. कल्पना अवघड होती पण अत्यंत सत्य होती. त्याच्यावर काही उपाय सापडण्या अगोदरच सर्व काही संपले असते. त्या पेक्षा त्याचे या सृष्टीत येणाचे दारच मोडणे हा फार सोपा उपाय होता.
नाथांनी तिघांनाही हे समजावून सांगितले आणि मत विचारले. त्यांना उद्देशून ते म्हणाले तुम्ही पूर्वी ही सांगितले आहे की ती फरशी फोडणे किंवा भूर्जपत्र जाळणे हा फार सोपा उपाय आहे. त्यामुळे झाराप मध्ये यायचे त्याचे दार निश्चितच बंद होईल. पण याची सुरवात कुठेतरी यूरोपात झाली आहे. तिथे किंवा इतर कुठेही तशी सुरवात परत ही होऊ शकते. आणि कुणीतरी नवीन दार ही करू शकते.
आज आपल्याला त्याचे ज्ञान तरी झाले आहे. उद्या त्याचे आगमन दुसरीकडे कुठे झाले तर त्याला कसे अडवायचे हे कळेपर्यंत तेष हाताबाहेर गेला असता.
सर्वांच्या मताने त्याचा नायनाट करणे हाच उपाय होता. अत्यंत धैर्यानी चौघेही झारापला पोहचले. कदाचित आज कोणीच परत जाणार नाही हे त्यांना माहित होत. कालच्या सारखेच खुर्च्या ठेऊन त्याच्या भोवती उदीच रिंगण घातलं.
आदित्यनाथ तानाजीला घेऊन दिवाणखान्यात गेले आणि तानाजीला त्या दोन पेट्या यज्ञकुंडाच्या खोलीत नेऊन ठेवायला सांगितल्या. तो गेल्यावर त्यांनी गणपतीचे चित्र काढून बाजूला ठेवले. त्यानंतर त्याच्याकडून ती फरशीही काढून घेतली व दिवाणखान्यात ठेवली. अतिशय धीर गंभीर चेहऱ्यांनी ते यज्ञकुंडाच्या खोलीत आले आणि त्या तिघांभोवती अजून एक रिंगण घातले. कुठल्याही परिस्थितीत त्या तिघांनी रिंगणाच्या बाहेर येऊ नये असे बजावले

-39-
“आता काही शक्यता आहेत.
पाहिलं म्हणजे माझा प्रयत्न फसेल आणि ते मला घेऊन जातील. हा सगळ्यात वाईट पर्याय असेल कारण त्यांचा दरवाजा बंद करण्याचा कुठलाही उपाय तुमच्याकडे नसेल.
दुसरी शक्यता म्हणजे माझी सर्व शक्ती पणाला लावून मी त्याला दरवाजापलीकडे घेऊन जाईन त्या क्षणी तुम्ही भूर्जपत्र व फरशीचा नाश केला पाहिजे. इथे दरवाजा हा एक प्रतीक आहे ही फरशी त्या दरवाज्याचे प्रतीक आहे किंवा त्याचे जग व आपले जग साधणारा दुवा आहे.
तिसरी शक्यता म्हणजे मी तेष चा नाश करेन. नाश केल्यावर आपल्या जगात येणाचे त्याला कारणच उरणार नाही. तेष चा नाश म्हणजे ती शक्ती परमशक्तीत मिसळून जाणे. जगातील सर्व शक्ती ह्या त्याच परमशक्तीचा भाग आहे. शक्ती कधीही उत्पन्न हॊत नाही किंवा विनाशही पावत नाही.

चला आपण सुखाकरिता प्रार्थना करू या. “
असे म्हणून आदित्यनाथ यज्ञकुंडाकडे वळले. यंज्ञकुंडाच्या समोरच ती फरशी उभी ठेवली होती.
थोडक्यात त्या फरशी आणि आदित्यनाथ यांच्यामध्ये हवन होणार होते. हवनाला सुरवात झाली. जरी वरून छपरं उघड असलं तरी हवनाचा धूर सगळीकडे पसरत होता. अशाच एका वासामुळे तिघांचेही मन शांत झाल्यासारखे झाले होते. त्यांच्या संवेदना बोथट करण्याचा आदित्यनाथांचा प्रयत्न असावा.
अशाच एका क्षणी नाथांनी भूर्जपत्र काढून वाचायला सुरवात करताच त्या फरशीतून एक काळा चिकट पदार्थ बाहेर येऊ लागला. बघता बघता त्याचा एक मोठा गोळा तयार झाला. आज तेष च लक्ष नाथांकडेच केंद्रित होत. हवन बंद पाडण्यासाठी तेष त्यात काही वस्तू टाकू लागला पण हवन इतके प्रखर होते की तो अग्नी जास्तच प्रखर झाला. हे पाहून तेष चिडून म्हणाला
“ए भिकारड्या तू काय मला हरवणार? पूर्वी पण एकाने प्रयत्न केले त्याचे काय झाले हे काय तुला माहित नाही का ? आम्हाला संपवण्याकरिता तो दारातून आमच्या विश्वात आला. आमच्या विश्वात आमचीच शक्ती अगणित असते. आमच्या पुढे त्याचे काही चालले नाही शेवटी आम्ही त्याला बंधनात टाकून ठेवले आहे. त्याला खाऊन टाकणं आम्हाला जमलं नाही त्याचे तप सामर्थ्य त्याचा आड आलं. आता तो गेल्यातच जमा आहे. काही दिवसातच त्याची शक्ती क्षीण होईल. मग आम्ही त्याला खाऊन टाकू. पण त्याने आत येण्यापूर्वी आमचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद केला होता. अर्थात त्याच्यामुळेच तो आमच्या हातात सापडला. त्याने हे कसे केले? का केले ? हे आम्हाला माहित नाही असे म्हणून तेष विविध घाणेरडे आवाज काढू लागला. मेलेल्या प्रेतांची दुर्गंधी सगळीकडे पसरली.
आदित्यनाथांचा शांततेत हवन चालूच होता. तेष परत ओरडून म्हणाला
“अरे मुर्खा त्या माणसाने थोडीतरी हुशारी दाखविली होती. तू तर आम्हाला तुझ्या विश्वात बोलविले आहेस. आता आम्ही तर तुझा नाश करूच आणि हळूहळू सगळी पृथ्वीचं आमची होईल. माझा आकार सर्व पृथ्वीवर पसरेल. सगळीकडे माझा सुंदर काळा रंगच दिसेल. माझाच दुर्गंध सगळीकडे पसरेल. सर्व प्राणी, मानव माझ्यात सामावून जातील. जलचर काही दिवस टिकतील. एकदा का आम्हाला पाण्यात शिरता आले की सर्व जलचरही आमचाच भाग बनतील. पृथ्वी म्हणजे एक मोठा काळा लिबलिबीत गोळा होईल असे म्हणून तेष विविध रूपे घेऊन सगळ्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. खुर्चीतल्या तिघांची संवेदना इतकी बोथट झाली होती की त्यांना काही कळतच नव्हतं.
नाथांची संरक्षक शक्ती एवढी काहीं होती की तेष त्यांना त्रास देऊ शकत नव्हता. तेष स्वतःच बोलून गेला होता की त्याला पाण्याची भीती वाटते. नाथांना हा मुद्दा अभिप्रेत होताच त्यामुळेच त्यांनी हवनाबरोबर पाण्याचीही पाईपलाइनजवळ ठेवली होती.
नाथांची तेष बद्दलची शंका अगदी खरी होती. तेष ची सर्व शक्ती एकत्र येण्यात आणि वेगवेगळे आकार घेण्यातच होती.
कदाचित पाण्यात ही शक्ती नाहीशी होणं संभव होत. पाणी हा नाथांचा शेवटचा उपाय होता. बराच वेळ तेष बडबड करत होता. हवन ओलांडून येणाचा किंवा बाजूने येण्याचा त्याने तीन चार वेळा अयशस्वी प्रयत्न केला. काहीच चालत नाही हे बघितल्यावर तो चवताळला आणि अतिशय घाणेरड्या शब्दात आदित्यनाथांना शिव्या देऊ लागला.
नाथांना एक कळून चुकले होते की त्याच्या विश्वातील व आपल्या जगातील वेळा पत्रक वेगळेच होते. समजा तेष चा नाश झाला आणि काकांवरची बंधन दूर झाली तरी त्यांना आपल्या जगात आणणे अवघड होते किंबहुना अशक्यच होते. तेष ला त्याच्या विश्वासकट नष्ट करणेच आवश्यक होते.
नाथांनी मंतरलेले पाणी तेष वर टाकायला सुरवात केली आणि तेष ची अंगावर पाणी पडू नये म्हणून धडपड सुरु झाली. पाणी आपल्यासाठी जरी जीवन असले तरी तेष साठी ते मरणच होते. आणि त्याचे कारण नाथांच्या लवकरच लक्षात आले. पाणी लागताच त्याचा काही भाग विरघळून जात होता आणि जमिनीवर काळे पाणी साठत होते. आता काही निर्णय घ्यायची वेळ आली होती. तेष ने ही आता त्याने गिळंकृत केलेल्या विविध प्राण्यांची, माणसांची रूपे घ्यायला सुरवात केली.
-40-

तेष ला जर पाण्यात विरघळवले तरी त्याची शक्ती तात्पुरती नाहीशी होईल. पाणी वाळल्यावर तो इतरत्र जायला मोकळाच होईल. नाथांच्या अभ्यासावरून व अनुभवावरून ते वेगवेगळी शस्त्रे पारखून पाहत होते. साठलेले पाणी ड्रेनेजमध्ये सोडून देणे ही योग्य नव्हते. कारण तेष चे अनु-रेणू नदी नाल्यांमधून पार समुद्रापर्यंत पोहचले असते.
तेष नष्ट झाला नसता पण सगळीकडे पसरला असता. त्यामुळे त्याला नाहीसे करणे हेच योग्य होते. हवन चालू असेपर्यंत तेष आक्रमण करू शकणार नव्हता. त्याला विरघळवला तर त्याच पुढं काय करायचं हे नाथांना अजून कळलं नव्हतं. विचार करून करून नाथांची बुद्धीही कुंठित झाली होती. आपण कसले विघ्न ओढून घेतले असे त्यांना वाटून गेले.
आपल्या चुकीच्या पर्यायामुळे पृथ्वीचा नाश होणार ही बाबच त्यांना अस्वस्थ करत होती. त्या तंद्रीतच मंत्रउच्चार करत असताना त्यांनी तिर्थाऐवजी चुकून गोमूत्र तेष वर शिंपडले. कानठळ्या बसवणारा आवाज करत तेष वायू रूपात विलीन झाला. तरीही त्यांनी मंत्रोउच्चार सुरूच ठेवले. थोड्या वेळात परत एकदा आवाज होऊन त्या फरशीच्या ठिकऱ्या पडल्या. आता भूर्जपत्रे उरली होती ती पण नाथांनी हवनात टाकून दिली.
एका बलाढ्य शत्रूचा अचानक नाश झाला होता. पृथ्वीवरचे संकट टळले होते. नाथांनी हवनाची उत्तरपूजा केली व काही मंत्रांनी त्या तिघांना भानावर आणले. तेथे काय प्रसंग घडला आणि आपण विनाशाच्या किती जवळ आलो होतो याची त्या तिघांनाही कल्पना नव्हती.
नाथांनी त्या तिघांना गावात पिटाळून गावातील लोकांना गोळा करून जास्तीत जास्त गोमूत्र गोळा करून सर्व गढी धुवून काढण्याची आज्ञा केली. नाथ व समीर कुडाळला परतले. नाथ अत्यंत दामले होते त्यामुळे ते लगेच झोपी गेले.
मामांना प्रचंड उत्सुकता होती पण समीर ला काहीच आठवत नव्हते. रमेश व तानाजी संध्याकाळी परत आले. त्या दिवशी रात्री नाथ प्रथमच भरपूर जेवले. जेवणानंतर ची मिटिंग तर नेहमीचीच झाली होती.
“चला आता उद्या आम्ही परत जातो म्हणजे नाथ जातील सज्जनगडावर, मी, तानाजी व कुणाल मुंबईला.” समीर
“हो पण इथल्या प्रकरणाचं काय?” मामा
“आता ते सर्व प्रकरण संपल्यातच जमा आहे. आता त्या गढीत किंवा आजूबाजूच्या परिसरात लोकं बेपत्ता होण्याचा काहीच धोका नाही” नाथ
“म्हणजे काय झाले पुढे?” मामा
“त्या विषयी न बोललेलंच बरं. संमोहनाखाली असल्यामुळे समीर, तानाजी आणि रमेश यांना काही आठवणार नाही. माझी काही सांगायची तयारी नाही. थोडक्यात मेलेले मुडदे मेलेलेच असूदेत. “नाथ तीव्रेतेने बोलले.
“पण सुहास आणि इथले बरेच लोकं बेपत्ता झाले आहेत त्याच काय?” मामा
“त्यावर मला नाही वाटत काही उपाय असेल. तो विषय सोडूनच दिलेला बरा. पण मामा मला असे वाटते की आता तुम्हीसुद्धा मुलाकडे किंवा मुलीकडे जाऊन राहावे किंवा कुडाळलाच राहावे.” समीर
“वाडीचे आणि गढीचे काय करणार?” मामा
“मामा असं बघा, तुमच्या मुलाला किंवा मुलीला या दोन्हीतही स्वारस्य नाही. आणि बेपत्ता झालेल्या स्त्रियांना अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार आहे. त्यामुळे मला असे वाटते की सर्व मालमत्ता ही त्या कुटूंबात, बजाबाच्या कुटूंबात वाटून टाकावी. त्या रक्तलांच्छित वास्तूचा आपण लोभ ठेऊ नये.” समीर
“तू म्हणतोस ते खरं आहे. त्यांच्याच श्रमाने ती मालमत्ता उभी राहिलेली आहे तेव्हा ती त्यांनाच वाटणे योग्य आहे. पण गढीचे काय ? ती तर वाटता येणार नाही.” मामा
“गढीत एवढ्या खोल्या आहेत. आजूबाजूच्या कित्येक वस्त्यात शिक्षणाची सोय नाही. गढीत शाळा सुरु करूया. शिक्षक व सेवकवर्ग तिथे राहू ही शकेल. अर्थात गढीत काही बदल करावे लागतील. पण तुम्ही सर्व वाडी वाटून टाकल्यावर स्थानिक जनता आनंदाने ते काम करेल.” समीर
“वा !! छान कल्पना आहे.” मामा
“आणि हो तुम्ही त्या शाळेला सुहासचेच नाव द्या.” रमेश
“बिचारा त्याचे काय झाले माहित नाही. पण निदान शाळेच्या रूपाने तरी तो झाराप मध्ये राहील.
दुसऱ्यादिवशी निरोप घेऊन सगळेच परत निघाले.
मामांना परत एकटे राहायचे म्हणून वाईट वाटत होते.
कुणाल ला ही गोष्ट काय लिहावी ते कळत नव्हते.
समीरला या प्रकरणात काहीच लाभ झाला नाही याचे वाईट वाटत होते.
तानाजी मस्त घोरत पडला होता.
आणि नाथांना एक शंका चुटपुट होती की…..

“वायुरूप झालेला तेष पावसाबरोबर जर परत पृथ्वीवर आला तर ?”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Coming soon
another novel
KALIM

पण तेषने नी ला मारले नव्हते, तर तो तीचं रूप कसं घेऊ शकला?
शेवटचा भाग नाही आवडला, ती एक अनामिक शक्ती होती तीला सहज संबोधन्यासाठी तेष नाव दिलं, आणि शेवटी तो माणसासारखा वागू/बोलु लागला.
तो वेगळ्या मितीच्या जगातला होता, पण शेवटच्या भागात त्याचा वावर आपल्या जगातील मितीसारखाच होता.... (HP 7.2 सारखा हिरमोड झाला.)

छान वेगवान कथा,
शेवट थोडा खेचल्या सारखा वाटला, (पहाणी आणि पूर्व तयारी थोडी रिपीटेटीव्ह झाली,
पण बाकी छान.

कथेचा फ्लो वेगवान होता त्यामुळे कथा आवडली .
पण शेवटचा भाग फिल्मी वाटला. उगागच ताणल्यासारखा वाटला. ते हवालदारला थोबाडीत देणं वगैरे अति वाटलं पण चलता है . सगळ्यात महत्त्वाचं वेळेवर कथा पूर्ण केलीत .
पुढच्या कथेच्या प्रतिक्षेत

वेगवान मांडणी आणि विश्लेषणात्मक भुमिकेमुळे कथा आवडली. पोलिस स्टेशनमधील प्रसंग तद्दन फिल्मी वाटला.
आदित्यनाथ शेवटी गोंधळातच राहिले हे मात्र आजिबात पटलं नाही. त्या तंत्रमंत्रांच्या जगतात समोरच्याशी पंगा घेताना त्याचा आधीच पुर्ण अभ्यास करून मैदानात उतरलं जातं. लढाईत ऐन मोक्याच्या वेळी संदिग्ध झाल्यानंतर तत्क्षणी आदित्यनाथांचा विनाश अटळ होता. कारण चुकीला माफी नसते. यज्ञकुण्डासमोर दोघं बसलेले असताना आदित्यनाथांनी, 'तेषला ब्रह्मतत्त्वात विलीन कसं करावं' अशा शंकेत पडणं म्हणजे त्या व्यक्तिरेखेचं भलं मोठं अज्ञानच ठरतं. अग्निद्वारे तेषला वैश्विक उर्जेत रूपांतरीत करणं सहज शक्य होतं. शेवटी कथा आहे हे मान्य केलं तरीही मला आदित्यनाथांचं अतिसावध भुमिका घेणं, तेष किती सामर्थ्यवान आहे हे जाणून घेण्यासाठी भला मोठा वेळ घेणं आणि शेवटी संदिग्ध असताना निव्वळ अपघाताने विजय मिळवणं हे आवडलं नाही.
पुढील कथेच्या प्रतिक्षेत.
शुभेच्छा!

बजाबा आणि खाशाबा मधे गल्लत झाली आहे. सुहास गायब होण्या आधी बजबा चा मृत्यू होतो. मग समीर आणि company ला खाशाबा माहिती देतो. पण काकांचा खास माणूस तर बाजाबा असतो मग खाशाबा ला कशी काय काकांची माहिती?

समीरला या प्रकरणात काहीच लाभ झाला नाही याचे वाईट वाटत होते.>>>
खरं सांगायचं तर कथा संपूर्ण वाचून काढल्यावर माझीही अवस्था समीर सारखीच झाली, असो...

एका बैठकीत वाचून काढली कथा. आवडली.
पण फरशीच्या ठिकर्‍या झाल्या आणि भूर्जपत्रं जळाली म्हणजे तेषचं आपल्या जगात यायचं दार बंद झालं ना? मग तो वायूरूपात असला तरी पावसाबरोबर किंवा कसाही परत कसा काय येईल?