दरवाजा ३

Submitted by अविनाश जोशी on 28 October, 2017 - 04:02

-१८-
मामा पुढे सांगू लागले “पूजाअर्चेतील व्यक्तिमत्व व दिवाणखान्यातील व्यक्तिमत्व हे अगदीच वेगळे होते. दिवाणखान्यात ते आले कि आमच्या सोबत खेळायचे, आम्हाला फिरायला घेऊन जायचे. बाहेर गेल्यावर असंख्य झाडांची, औषधाची माहिती करून द्यायचे. त्यांना सर्व विषयात रुची होती. एकदा एका पाड्यातून एक बालू आला त्याला म्हणे एक वाघाचे भूत फिरताना दिसले होते. त्याच्याच गोठ्यात एकदा दुपारचा वाघ शिरला त्याने दारं लावून घेतली पण संद्याकाळी बघतो तर वाघ गोठयात नव्हता. बाहेर जायला कुठेही फट सुद्धा नव्हती. हाच प्रकार आजूबाजूला झाल्याचं त्याने सांगितलं. मग कधीतरी त्या वाघांनी खुऱ्याड्यातील कोंबड्या आणि गोठ्यातील काही वासरं नाहीशी केली. कोकणात असे प्रकार नेहमीच होत असतात पण एक वेगळी गोष्ट होती म्हणजे खाल्लेल्या प्राण्यांचा कुठेही मागमूस नव्हता, पण बालू जे सांगत होता ते वेगळंच होत. दोन दिवस तो म्हणे वाघ पाहत होता तो मोठ्ठा होता. मोठ्ठा म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे हत्ती एवढा होता. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने पाहिलेल्या वाघाचा रंग निराळा होता. वाघ हा पिवळसर, काळे ठिपके किवां पट्टे असलेला असतो पण काहींना हा वाघ पिवळा, हिरवा आणि जांभळा दिसला होता. काहीतर शपथेवर सांगत होते त्यांनी वाघाला दोन शेपट्या पहिल्या किंवा दोन डोकी पाहिलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीती पसरली आहे आणि लोक वाडी सोडून जाण्याचा विचार करत आहेत. आज ही तो घाईघाईने आला कारण पाडावरचा एक दहा वर्षाचा मुलगाच बेपत्ता झाला होता. त्याची हाड सुद्धा सापडली नव्हती. वाघांनी जर मुलाला ओढून नेलं असत तर रक्ताच्या खुणा राहिल्या असत्या कुठेतरी जंगलात त्याचा अर्धवट मृतदेह सापडला असता किंवा गिधाड घिरट्या घालायला लागले असते पण यापैकी काहीच झालं नव्हतं. तो मुलगा जणू काही आकाशने गिळल्यासारखा अदृश्य झाला होता.”

- काका-
मी शंकरराव देसाई राहणार झाराप, सरदार देसाईंचा वंशज पण शेती वाडीचे, व्यवहाराची सगळी कामं माझा मोठा भाऊच पाहतो. आता छोटा रामरावही त्याच्याकडे लक्ष द्यायला लागला आहे. मी माझ्या साधनेसाठी स्वतःला मोकळा ठेवला आहे.
आपल्याला दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या जगापलीकडलं विश्व् शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी अशी खात्री आहे कि आपल्याला निसर्ग आणि वैश्विक घटना एक टक्का सुद्धा कळल्या नाहीत. ह्या विचारात आपण किती क्षुद्र असतो त्याची जाणीव होते.
विश्वाच्या ह्या पसाऱ्यात आपण मुंगीहून ही लहान आहोत आणि आपली किंमत ही तेवढीच आहे याची जाणीव होते. आणि त्यामुळेच मानवाचे जीवन पृथ्वीबाहेरूनच आले असावे असे माझे ठाम मत आहे. त्यांनी मांडलेल्या कल्पना, गणितावरच प्रभुत्व, खगोलशास्त्री विज्ञान हे आजच्यापेक्षा शेकडो पटीने पुढारलेले होत. त्यामुळेच मी या विषयाला वाहून घ्यायचं ठरवलं होत.
माझ्या साधना चालू असताना, मला हळूहळू काही जागृत होणाऱ्या शक्तीची जाणीव होणे भाग होते. अशा रीतीने प्राप्त झालेले ज्ञान हे फक्त लोकांवर आलेली संकटे दूर करण्यासाठीच वापरणे योग्य होते. थोडक्यात मला तंत्रापेक्षा मंत्रावर जास्त विश्वास होता.

बोला फुलाला गाठ पडावी तश्या काही गोष्टी घडत गेल्या व आजूबाजूचे बरेच लोक त्यांच्या अडी-अडचणी, व्यथा मला सांगायला लागली. मला शक्य होते तोपर्यंत मी ती दूर करत होतो.
आज सकाळचं प्रकरण त्यातलंच. बालू अचानक आला आणि वाघाच्या भुताबद्दल सांगायला लागला. तो घाबरलेला दिसत होता.
“बालू तू शांत हो. तू स्वतः त्या भुताला पाहिलंस का?” काका
“काका अहो ते भूत मला कस दिसणार?” बालू
“अरे मग एवढा का घाबरलास? लोकं काहीही सांगत असतील तू त्यांच्याकडे कशाला लक्ष देतोस. आजपर्यंत एवढे बिबटे पहिले आहेस त्यात कधीही हिरव्या, जांभळ्या रंगाचे पाहिलेस का तरी? त्यातून आपले बिबटे लहान वाघ सुद्धा नाहीत.” काका
“मी नाही पहिले. पण वाडीचे बरेच सांगतात त्यातूनच शेजारचा पोरगा गेला. आता आमच्या मुलाचा नंबर लागू शकतो. म्हणून घाबरलो एवढच.”
“बिबट्या तुम्हाला हत्ती एवढा दिसायला लागला म्हणजे वस्तीवर भट्टी लावलीय.” काका
“नाही काका तस काही नाही.” बालू
“आणि समजा वाघ असला तर मी काय करणार ? मी काही शिकार करत नाही. त्या पेक्षा तुम्ही शिकाऱ्याला बोलवा.” काका
-१९-
बालूची कशीबशी समजूत काढून मी त्याला परत पाठवून दिल. वस्तीवरची लोकही अफवा पसरवण्यात तरबेज होती. एक दोन दिवसातच लोकांनी कोल्हापूरवरून एका शिकाऱ्याला बोलावलं. तो बिचारा दोन चार दिवस फिरून परत गेला. त्याला वाघ काय त्याच शेपूटपण दिसलं नाही.
नाही म्हणता एक चमत्कारीक गोष्ट म्हणजे त्याला जंगलात एक अस्वल दिसल्याच तो सांगत होता. कोकणात अस्वल असणं ही अशक्य गोष्ट होती. शिकारी निघून गेल्यावर आठवडाभर शांततेत गेला. आणि मी जुने ग्रंथ, हस्तलिखितं तपासत होतो पण मला काही कोड्याचे उत्तर मिळेना.
एकदा असं वाटलं कि सगळी लोकं खोटं बोलत असावीत. पण प्राणी नाहीसे होणे, मुलगा नाहीसा होणे या तर सत्य घटना होत्या. म्हणजेच या गोष्टीना कुठेतरी पाया होता. वाघांचा वेगवेगळा रंग आणि आकार या कल्पना कपोल कल्पित असल्या तरी त्याला काहीतरी पाया हा असणारच.
आपलं मन फार विचित्र असत. मग ते सापाला दोरी समजतं नाहीतर दोरीला साप समजत. दोन्ही असतात मनाचे खेळच. पण या मनाच्या खेळात दोरी ही दोरीचा राहते आणि साप हा सापच राहतो. वास्तव वास्तवच राहत आणि या वास्तवा पलीकडे कसे जायचं हे मला कळत नव्हतं.
आठ दिवसानंतर सकाळीच वाडीवरची लोकं आली. आणि त्यांनी सांगितलेली हकीकत विचित्रच होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काल तो वाघ परत आला होता आणि एका मुलाला घेऊन गेला. पण या वेळेला तो मागच्या दोन पायावर चालत होता आणि पुढच्या दोन पायावर मुलाला धरले होते. काही मंडळी धीर करून त्याच्या मागे गेली तर तो एका गुहेत शिरताना दिसला.
उजाडल्यावर पंधरा वीस लोकं पहारी, कुदळी आणि दोन तीन ठासणीच्या बंदुका घेऊन गुहेकडे गेले. गुहेत काहीच नव्हते. वाघ ही नव्हता आणि तो मुलगा ही नव्हता. गुहा तशी लहानच होती पण त्यात कुठेही वाघाचे अस्तित्व नव्हते.
एका कोपऱ्यात एक काळसर चिकट पदार्थ पडला होता. त्याला वास, गधं काहीच नव्हता. वाघ आणि मुलगा पूर्णपणे अदृश्य झाले होते.
वाडीवरची लोकं फारच घाबरली होती. मी काहीतरी उपाय करावा म्हणून मला विनवत होती. पण मला काहीच सुचत नव्हते. मी काय उपाय करावा हेच कळत नव्हते.
शेवटी मी त्या लोकांच्या विनंतीला मान देऊन वस्तीवर दोन तीन दिवस राहायला जायचं ठरवलं. दोन दिवसांनी मी वस्तीवर येईन असे त्यांना सांगितले. मला ही तयारी करायला दोन दिवस हवेच होते. अशा वेळेला केव्हा, कुठे, कशाशी गाठ पडेल याचा काहीही भरवसा नसतो. त्यामुळे मला माझ्या संरक्षणाची तयारी करूनच जायला हवे होते. दोन दिवस मी साधनेत मग्न होतो आणि अशा वेळेला मला जेवायचीही शुद्ध राहत नसे. घरच्यांना हे माहित झाले होते. त्यामुळे मला कोणीही बोलवत नसे.
दोन दिवसानंतर मी वस्तीवर पोहोचलो. सगळी लोकं जमा झाली होती त्यातल्या ज्या लोकांना अनुभव होता अशा काही लोकांशी मी एक एकटे बोलायचं ठरवलं. त्या करता मी एका खोलीत बसून त्या चार पाच जणांना आत बोलावलं. नंतर संमोहन शास्त्राचा उपयोग करून प्रत्येकाशी बोललो.
त्यांचे अनुभव खरे होते अर्थात जाणवलेल्या गोष्टी आणि सांगितलेल्या गोष्टी यांच्यात तफावत होती आणि ती तशी असणे स्वाभाविक होते. दुपारी जेवुन मी मस्त ताणून दिली कदाचित रात्रीच जागरण झाल असत.

अंधार पडायला लागल्यावर मी वस्तीभोवती मंतरलेले तीळ टाकायला सांगितले आणि माझ्या खोलीतही काही बंदोबस्त केला. तो प्राणीच असण्याची शक्यता होती. जर काही अतिमानवी असले तर तयारीची गरज होती. रात्री माझ्या भोवती गराडा पडला. त्यातील मोजकेच चार पाच जणांना सोडून इतरांना मी घरी पिटाळलं. मध्यरात्र होऊन गेली होती. आज तरी काही घडले नव्हते. पहाटे दोन नंतर कोणाची तरी चाहूल लागली होती पण कुठल्याच प्राण्याचा किंवा श्वापदांचा कुठेही मागमूस नव्हता. उजाडल्यावर आजूबाजूला फिरून पाहिलं तर संशयास्पद असे काहीच आढळले नाही.

सूर्य वर आल्यावर चार पाच जणांना घेऊन गुहेकडे जायचे ठरवले. अर्थात मी सांगितल्या शिवाय कोणीही गुहेत प्रवेश करायचा नाही असे बजावले.
वाडी पासून तीन चार किलोमीटर अंतरावर ती गुहा होती. गुहा कसली एक दरड कोसळून झालेला मोठा खळगा होता. गुहेच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साठले होते. त्यात काही वस्तू पर्यटकांच्याही दिसत होत्या.
कचरा केव्हापासून होता कुणाला माहित पण जुन्या काळचा असावा कारण त्यात लाकडाच्या वस्तू, भंगलेल्या मूर्ती, काचांचे तुकडे असे पसरले होते पण प्लास्टिकचा अवशेषही नव्हता.
सगळं फिरून काहीच कळलं नाही. पण माझ्या अंतर्मनाला तिथे काहीतरी असल्याचा भास होत होता. सामान्यतः काही शक्तीचा मनाला स्पर्श झाला कि माझ्या सारख्या तयार मनाला त्या शक्तीचे गुणधर्म त्याचे दोष याची थोडीफार जाणीव व्हायला लागते. पण इथे काहीतरी असावं एवढीच गोष्ट मनाला स्पर्श करत होती.
बराच वेळ तिथे आजूबाजूला फिरण्यात गेला. दुसऱ्यादिवशी परत येऊन गुहेत जायचे ठरवले. वस्तीवर परत आलो. कालसारखीच काळजी घेतली. त्या दिवशी रात्रीचे भास जास्त स्पष्ट होते. वाघ किंवा अस्वल यांच्यासारखं काही दिसलं नाही तरीही मनावर दडपण आले होते. सकाळ झाल्यावर दडपण कमी झाले. काल सारखेच परत पाच सहा जणांना घेऊन गुहेत शिरलो गुहा दोन तीन खणाची असावी. आम्ही आज पेट्रोमॅक्स दिवे, कुदळी, फावडी अशा तयारीनेच आलो होतो. बरोबरच्या पाच सहा जणांना मी संरक्षक गंडे दिलेच होते. अर्थात कशाचा सामना करायचा आहे हे माहिती असल्याशिवाय अशा गंड्याना फारसा अर्थ नसतो पण ते घातल्यावर मानसिक धैर्य मात्र नक्कीच येते.
गुहेत पेट्रोमॅक्स दिवे लावले आणि लख्ख प्रकाश पडला. गुहा स्वछ होती. गुहेच्या भिंतीसमोरच एक मोठी फरशी उभी होती. जुन्या काळच्या ब्रिटिश वाड्यात अश्या मोठ्या फरश्या भिंतीवर लावायची पद्धत होती. त्याच्यावर असलेले नक्षीकाम क्लिष्ट होते.
ती फरशी तेथे कशी आली कळायला मार्ग नव्हता. खरं सांगायचं झालं तर ती फरशी तांत्रिक वाटत होती. त्यावरची नक्षी ही आजपर्यंत न पाहिलेल्या परंतु साधर्म्य असलेल्या यंत्रासारखी होती. त्यादिवशी आम्ही परत आलो आणि वाडीवरच्या काही वृद्ध लोकांशी बोलत बसलो.
“खाशाबा तुका काय आठवत का?” मी
“काय मालक कशाबद्दल म्हणताय?” खाशाबा
“अरे त्या गुहेत एक मोठी फरशी होती ती आपल्याकडची वाटत नव्हती.” मी
“तिथला राडारोडा बऱ्याच वर्षपासून पडलेला आहे. चाळीस पन्नास वर्षपूर्वी ती गुहा नव्हतीच. दरड कोसळल्यामुळे ती तयार झाली एवढच. त्या घळीच्या वरती एक पोर्तुगीज चर्च आणि त्या लोकांची छोटी स्मशान भूमी होती. त्या धडपडीत ते चर्च दुभंगल आणि बऱ्याच वस्तू ती लोकं घेऊन गेली पण काही वस्तू आणि राडारोडा तसाच टाकून गेले. आमच्यापैकी तिकडे कोणी सहसा जात नाही. पोर कधीकधी जनावर चरायला घेऊन जातात. तुम्ही म्हणता ती फरशी त्या काळातील असावी.” खाशाबा

मनाला काही संवेदना होऊ लागल्या होत्या. गुप्ततेचा एक एक पापुद्रा उलगडू लागला होता. त्या रात्री संरक्षककडे अधिकच कडक करून आम्ही झोपलो. मला आता अंधुकशी जाणीव झाली होती.
वस्तीवरच्या लोकांना त्या बाजूला न फिरकण्याबद्दल सांगून मी गढीवर आलो. पुढचे दोन तीन दिवस गढीत बरीच तयारी केली. काही बांधकाम करायचे होते. गणपतीची चित्र करून घ्यायची होती. बजाबाला सविस्तर सूचना द्यायच्या होत्या.
बजाबाचं एक बरं असत सांगितलेली कामं तो मुकाट्यानं करतो. का? कशाला? असे प्रश्न त्याच्या डोक्यात नसतात. आणि जरी असले तरी तो विचारत नाही.
परत एकदा मी वस्तीवर गेलो. बजाबा लोकांशी बोलला आणि त्याने परिस्थितीच गांभीर्य सगळ्यांना समजावून सांगितलं. त्यांच्या करीता काकांनी जीव पणाला लावला आहे आणि त्यामुळे काका जे काही सांगतायेत ते पूर्णतः ऐकावं असं ही त्याने ठासून सांगितलं. दुसऱ्यादिवशी सकाळी आम्ही जय्यत तयारीनिशी चार पाच जण परत गुहेकडे गेलो. तिथला राडारोडा तपासायला सुरवात केली त्यामध्ये एक संगमरवरी पेटी सापडली त्याची कडी मोडलेलीच होती. ती पेटी छोट्याश्या धक्क्याने उघडत होती.
जरी ती पेटी संगमरवराची असली तरी कसली कसली चिकट थर चढून ती गलिच्छ झाली होती. पेटीचा आकार साधारण आठ बाय सहा इंच आणि उंची तीन इंच एवढा होता. लोकांना बाजूला जायला सांगून मी ती पेटी उघडली आणि....

-२0-
-मामा -
त्या दिवसापासून काका स्वतःच्या तंद्रीत राहू लागले. दोन तीनदा ते वस्तीवर राहायला गेले. त्यांच्या साधना जोरात सुरु होत्या. मध्येच त्यांनी गणपतीची चित्रं करून घेतली. काही बांधकाम साहित्य आणलं. हे कशासाठी असं विचारण्याची हिम्मत कोणालाच होत नव्हती. थोडीफार माहिती असलेला बजाबा होता. पण त्याला विचारणं म्हणजे लाकडी ठोकळ्याला विचारण्यासारखं होत

बजाबा सतत त्यांच्याबरोबर असायचा. एक दिवस काका वस्तीवरून आल्यावर त्यांच्या पूजाघरात गेले. त्यावेळी फक्त बजाबा त्यांच्याबरोबर होता. आणि त्यानंतर ते कुणालाच कुठे दिसले नाहीत. पण दुसऱ्यादिवशी बजाबानी दिवाणखान्यातील एका कपाटात विटांचे बांधकाम केलं आणि त्यावर गणपतीचे चित्र लावले आणि तो कांही न बोलता निघून गेला.
नंतर त्याला कितीही खोदून विचारलं तरी तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.
“असं आहे तर. या बेपत्ता होण्याच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत आणि आत्ताच त्या गोष्टी परत व्हायला लागल्या आहेत. दोन्हीमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे असं मला वाटत. आता बघूया तिथे काही सापडतंय का?”
“आम्हाला प्रत्यक्ष अनुभव नाही पण काकांनी मदत केल्याचं बरेच लोक सांगतात. एवढ्या वर्षानंतरच ह्या गोष्टी परत सुरु का व्हाव्यात?”
“काही कल्पना नाही बुआ.” मामा
“मामा प्रत्येक गोष्टीतला काही कार्यकारणभाव लागतो. एखादी गोष्ट एवढ्या वर्षांपूर्वी झाली, परत झाली नाही आणि परत सुरु झाली. तर तुम्हाला काही आठवतंय का?”
“काही आठवत नाही. एकच गोष्ट असू शकते की काकांची खोली बऱ्याच वर्षांनी उघडली गेली.
“म्हणजे काकांच्या खोलीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का?”
“काहीच माहित नाही. पण खोल्या साफ केल्यानंतर एक दीड महिन्यांनी या प्रकरणाची सुरवात झाली असावी. जर खोलीशी काही संबंध असता तर खोली उघडून साफ केल्यावरच व्हायला हवे होते. म्हणजे आता झारापला जाऊनच बघायला पाहिजे. कदाचित मला अजूनही काहींची मदत लागेल. त्यातल्या एकाची सोय आपल्याला या बंगल्यात करावी लागेल. बाकीचे हॉटेल शोधतील. जर काही अडचण असली तर एखादा बंगला भाड्याने मिळतो का ते बघायला लागेल. तशी काही जरूर नाही. बघूया आपण काहीतरी तडजोड करू.” समीर

-२1-

- झाराप -
दुसऱ्यादिवशी परत झाराप ला गेलो. आजमात्र वाडीवरील वस्त्यांवरच जायचं ठरलं होत. समीर, कुणाल, रमेश, तानाजी, सरपंच आणि शिवा एवढ्याची वाडीला जाण्याकरिता एक टीम तयार झाली होती. रमेश, कुणाल, आणि सरपंच व समीर, शिवा, तानाजी असे दोन भाग पाडून दोन्ही टीमने वेगवेगळ्या चौकश्या करायचे ठरवले.
कुणाल चांगला बातमीदार होता आणि शोधक पत्रकारितेचं सर्व गुण त्याच्यामध्ये होते. सरपंच त्याच्याबरोबर जायचं कारण म्हणजे लोकांनी बोलत व्हावं हा हेतू होता. कुणीही सरकारी अधिकारी आला कि लोकांच्या खऱ्या खोट्या तक्रारी सुरु होतात. त्याचाच खरे खोटे पणा बघण्यासाठी कुणाल हा चांगला होता.
तर लोकांच्या पोटात आणि मनात शिरून आतली माहिती बाहेर काढण्यात समीर आणि तानाजी तरबेज होते. समीर काय बोलतोय पण खर त्याला काय म्हणायचं आहे. हे तानाजीला लगेच कळायचे.
कुणाल च्या टीमने आत्ता बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती काढावी आणि समीर ने काका आणि काही वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाची माहिती घ्यावी असं ठरलं.
संध्याकाळी मामांच्या बंगल्यात त्याच्यावर ओहापोह झालाच असता.
कुणाल व सरपंचानी वस्तीवरच्याच कुणालातरी बरोबर घेऊन ज्यांच्या घरच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यांच्याकडे जायचं ठरवलं. या सगळ्या मुली कामासाठी वाड्यावर जात होत्या आणि तीन चार दिवस झाल्यावर बेपत्ता होत होत्या.
कुणाल चा दिवस ही सगळी माहिती गोळा करण्यात गेला होता. माहिती तर बरीच माहिती पण ठोस उत्तर काही हाती लागले नाही. वस्तीवरील बऱ्याच लोकांना सुहासचा संशय येत होता. सुहासनेच या मुलींना आमिष दाखवून गायब केले असावे असे त्यांना वाटत असावे. सुहास दिसायला राजबिंडा होता. हातात भरपूर पैसा खेळत होता आणि शहरात वावरलेला होता.
या मुलींना भूल पडायला लागणारे सर्वगुण त्याच्यात निश्चितच होते. कुणीतरी अशी शंका काढली कि सुहासने या मुलींना गायब करून मुंबईला विकले असावे. अशा मुलींचा व्यापार होतो हे लोकांना कळाले होते. पण सुहास गायब झाल्यावर तो मजा मारायला मुंबईला गेला असावा अशी अनेकांनी समजूत करून घेतली.

समीर, तानाजी आणि शिवा यांनी खाशाबाची वस्ती गाठली. शिवाला माहिती असलेला तोच सगळ्यात वृद्ध होता.
मामानी काही जुन्या हकीकतीत पूर्वी काही वाघांनी प्राणी व काही मुलांना नेल्याचं सांगितलं होता त्याच्याबद्दल समीर ला खात्री करून घ्यायची होती.
“काय खाशाबा आज बाहेर नाय पडला?” शिवा
“नाही आता कमी दिसत म्हणून घरात बसूनच देव देव करत असतो. पोर मोठी झाली आहेत लेकीसुना काळजी घेतात. छान चाललय.” खाशाबा
“खाशाबा तुला काका आठवतात का?” शिवा
“न आठवायला काय झालं, इतका काय मी म्हातारा नाही झालो अजून.” खाशाबा
मग समीरकडे वळून तो म्हणाला “काका म्हणजे देव माणूस, अडलेल्या नाडलेल्याना मदत करायचा. इथे त्यावेळा वैद्य नव्हता त्यामुळे कोणी आजारी पडला कि त्याच्याकडे जायचे. झाडपाल्याच्या औषधांची त्यांना बरीच माहिती होती. अगदी देव माणूस होता तो”. “नेहमीच ते वस्तीवर यायचे का?” समीर
“नाही. कुणाला अडचण असली किंवा कुणी बोलावलं तर मात्र हमखास यायचे.” खाशाबा
“खाशाबा, मी आता येताना सुपारीच्या बागा पाहिल्या. त्यात राखणीकरिता कुत्रे ठेवले होते पण कुत्रे पिंजऱ्यात होते. पिंजऱ्यात राहून ते राखण कशी करणार ?” समीर
“त्याच काय आहे साहेब सुपारी म्हणजे नगदी पैसा. चोऱ्या भरपूर होतात. आणि चोरांची चाहूल लागली कि कुत्री भुंकायला लागतात मग सगळी वस्तीच धावून जाते.” खाशाबा
“अरे पण त्यांना पिंजऱ्यात का ठेवता मोकळे का सोडत नाही?” समीर
खाशाबा हसून म्हणाला
“त्याच काय आहे साहेब कुत्र मोकळं असलं तर एखाद्यावेळेस बिबट्या त्याला घेऊन जातो आणि एक कुत्रा मारला कि तो चटावतो.”
“काय रे खाशाबा कोकणात बिबटे तर नेहमीचेच आहेत. काही वर्षांपूर्वी एक मोठ्ठा वाघ आला होता असं मी ऐकलं.” समीर
“हो. त्यावेळेला बरीच गडबड झाली होती खरं. काही चरणारी गुर आणि दोन तीन पोरांना पण त्यांनी उचलून नेलं. वस्तीवरचे सगळेच फार भेदरलेले होते. घराबाहेर पडायची कोणाची तयारी नव्हती.” खाशाबा
“मग हे सर्व थांबलं कस?” समीर
“अहो आमचा देव होता ना. काही झालं कि काकांकडे धाव घ्यायची ठरलेलं होत. त्या वेळेस ही लोकं त्यांच्या घरी गेली आणि सर्व हकीकत सांगितली. काकांनी त्या सर्वाना धीर दिला आणि आम्हाला धीर द्यायला ते चार -पाच दिवस वस्तीवर राहिले.” खाशाबा
“मग काय झालं?” समीर
“त्यांनी सगळीकडं शोध घेतला, दोन तीन किलो मीटरवर रानात एक पडीक चर्च आणि त्याच्या खाली असलेली घळी सारखी गुहा. तिथं पडलेला राडारोडा याचा त्यांनी बारीक तपास केला. काकांचं वाचन फार दांडग होत. तसेच त्यांना मंत्रविद्याही येत होती. अडी-अडचणीला तेच धावून यायचे.” खाशाबा
“मग त्यांनी काय केले” समीर
“त्यांनी वाड्यातून मोठ्या दोन तीन पेट्या आणल्या. पेटीत कायबाय वस्तू होत्या. एका पेटीत गुहेतील संगमरवरी फरशी आणि दुसऱ्या पेटीत तिथेच असलेल्या दोन लहान पेट्या ठेवल्या. पेट्याना जाडजूड कुलुपं लावली आणि सर्व बाजूला कसलेतरी शिक्के मारले.” खाशाबा
“मग कुठे आहेत त्या पेट्या.” समीर
“आमच्या लोकांनी त्या वाड्यावर पोहचवल्या आणि बजाबानी त्या ताब्यात घेतल्या. पुढं काय झालं माहित नाही. पण काकांनी जाताना आम्हाला वाड्यातून आणलेलं पाणी दिल ते विहरीत ओतायला सांगितलं. आमच्या सर्व वस्तीवर सडा घालायला सांगितला. तसेच पाणी नेऊन त्या राडारोड्यावर आणि गुहेत शिंपडायला सांगितलं.” खाशाबा
“मग ती गुहा अजून आहे का?” समीर
“काकांनी तो राडारोडा त्यात टाकून ती गुहा पक्क्या बांधकामाने बंद करायला सांगितली आणि बांधकामावर एका देवीची मूर्ती चौकटीत ठेवायला सांगितली. त्यामुळे ती गुहा तेथे नाही.” खाशाबा
“मला तेथे जाऊन बघायला पाहिजे.” समीर
“गुहा तर नाही पण पडीक चर्च व त्याच्याखाली आम्ही केलेलं बांधकाम एवढे मात्र अवशेष आहेत.” खाशाबा
“आम्हाला तिकडे कोणी घेऊन जाईल का?” समीर
“हो. पूर्वी तिथं जायला भीती वाटायची. आता पोर पण खेळायला जातात आणि गुरं चरायला पण जातात. गेल्या कित्येक वर्षात तसा काही प्रकार घडला नाही. हा तुमच्या बरोबरचा शिवा पण घेऊन जाईल की, पण तुम्हाला एक मुलगा पण देतो. तो दाखवील वाट.’ खाशाबा
खाशाबांनी एका पोराला हाक मारली आणि आमच्या बरोबर गुहेकडे जायला सांगितले.

-२2-
रस्ता अतिशय कच्चा होता. गेली कित्येक वर्ष वापरात नसल्यामुळे रस्ता असून नसल्यासारखाच होता. शेवटी त्या मुलाला घेऊन हे त्रिकुट चालतच गेले.
बांधकामात बघण्यासारखं असं काहीच नव्हतं. जांभ्या दगडात केलेलं पक्क बांधकाम होत. त्यातल्या एका कोनाड्यात मूर्ती होती. कसली होती कोण जाणे. समीरने त्या मूर्तीचा फोटो काढला आणि नंतर नेटवर बघायचं ठरवलं.
थोडेसे चालून ते मोडक्या चर्च जवळ गेले. चर्च पडीक अवस्थेत होते. सगळीकडे झाडी वाढलेली होती. तिथेही बघण्यासारखं काहीच नव्हतं.
चर्च मध्ये असताना समीर ला एका गोष्ट कळून चुकली की जी गुहा होती ते चर्च च तळघर होत. आणि पूर्वीपासून महत्वाच्या व्यक्तीची प्रेतं, जवळ जर दफन भूमी नसेल तर अशाच तळघरात ठेवली जायची. तस तिथंही असावं त्यामुळेच तिथं वेगवेगळ्या वस्तू आणि संगमरवरी फरशी लोकांना सापडल्या असाव्यात.
म्हणजे नक्की काय झालं असावं हे तिघानाही कळलं नाही. एका दोन तास फिरून ते वस्तीवर परत आले आणि गाडी घेऊन गढीवर आले.

दुसरी टीम तिथं पोहचलीच होती. त्यांचे निम्मेच काम पूर्ण झाले होते. त्यामुळे दुसऱ्यादिवशी झाराप ला येऊन पुढील माहिती काढणे भाग होते.सगळेजण शेवटी कुडाळला परतले. तानाजी मात्र गढीवरच राहिला. त्याच्या सोबतीला ते दोन गडी होतेच. जेवण खाण्याचं बघायला काशीही होतीच.

कुडाळच्या बंगल्यात जेवण झाल्यावर परत एकदा मिटिंग बसली. समीर ने पडके चर्च, पडझडीत तयार झालेली गुहा त्याला कळलेल्या गोष्टी आणि त्याचा अंदाज असे सविस्तर माहिती मामांना सांगितली. दुसरी टीम अकरा बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन आली होती. सर्व बेपत्ता व्यक्तीच्या घरच्यांची एकच कथा होती.
सर्व बेपत्ता व्यक्ती मुली किंवा बायकाच होत्या. वय वर्ष वीस ते तीस. गढीवर कामाला जायच्या. चांगला पगार मिळायचा, चांगलंचुंगलं खायला मिळायचं असं घरी आल्यावर भरभरून बोलायच्याआणि संध्याकाळी काशी आली की परत यायच्या.
आणि मग चार पाच दिवसांनी बेपत्ता व्हायच्या. दर वेळेला काशी आरडाओरडा करायची, की या पोरी ती यायच्या आधीच निघून जायच्या म्हणून. नंतर काहीच पत्ता लागायचा नाही.

सर्व जणी अश्याच बेपत्ता झाल्या होत्या. भुमीने गिळलं का वाऱ्यात विरून गेल्या काहीच कळायला मार्ग नव्हता. अतिशय गूढ रित्या सर्व हकीकती होत्या.
“कुणाल तुम्ही उरलेल्या पाच सहा व्यक्तींच्या घरी जा. पण त्यांच्याही अश्याच हकीकती असणार. पण आपल्याला तर केस पूर्णतः तयार केलीच पाहिजे. कधी, कुठे, कसला धागा हाती लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपण बारकाईने सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत.” समीर
“हो. तू म्हणतो आहेस ते खरं आहे.” कुणाल
“मामा एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का ? पूर्वी वस्त्यावरची काही मुलं बेपत्ता झाली. नंतर काका बेपत्ता झाले ते शेवटचं मध्ये कित्येक वर्ष काही घडलंच नाही. आता परत ही मालिका सुरु झाली आहे ती सुहास गढीवर राहायला गेल्यावर.” समीर
“अरे पण काका गेल्यावरही आम्ही कित्येक वर्ष गढीवरच होतो तेव्हा काहीच झाले नाही.” मामा
हो. ना. सुहास राहायला गेल्यावर तीन चार महिने कुठं काय झालं? त्याने कुलुपं लावलेल्या खोल्या साफ केल्यावर आणि खास करून काकांच्या खोल्या साफ केल्यावर काहीतरी घडले.” समीर
“पण असे काय घडले?” मामा
“मामा, अहो काही शक्ती जाणवायला काहीतरी साधन तरी लागते किंवा अतींद्रिय ज्ञान तरी प्राप्त झालेले असावे लागते. आता आपल्याला वीज कडाडलेली दिसते, ऐकू पण येते, पण घरच्या वायर मधून वाहणारी वीज दिसते का? तसेच काहीसे या शक्तीबद्दल असते. काही विशिष्ठ परिस्थितीत त्यांची जाणीव होते. बाकी वेळेला आपल्याला त्यांचे अस्तित्वही जाणवत नाही. माझे त्यातले ज्ञान फारच तोटके आहे. पण मनोदेवता मला असं सांगते कि या कामात आपल्याला माझ्या अजून एका परिचिताची मदत लागेल.” समीर
“म्हणजे हा भुताटकीचा प्रकार आहे असं तुला वाटत का?” मामा
“मामा, आपण एक फार मोठी चूक करतो. आपण सगळ्याच दुष्ट शक्तींना म्हणजेच आपल्याला अपायकारक शक्तींना भूत म्हणतो तर चांगल्याना देव म्हणतो.” समीर
“म्हणजे काय?” मामा
“म्हणजे बघा, तापमान, वेग, एखाद्या वस्तूची उंची, प्रकाश, आवाज या व अशा अनेक न दिसणाऱ्या शक्ती आहेत ही प्रत्येक शक्ती माणसाला मदत करू शकते किंवा त्रासही देऊ शकते. गुलाबाचा वास आणि गटारीचा वास दोन्ही आपण आनंदाने घेतो का? चित्राकडे किंवा टीव्ही कडे आपण तासंतास बघू शकतो तसे सूर्याकडे पाहणे आपल्याला जमेल का? सूर्य झाडांना जीवन देतो तसे वणवे ही लावतो. थोडक्यात शक्ती ह्या सुष्ट किंवा दुष्ट ही नसतात तर आपल्यावर होणाऱ्या परिणामामुळे आपण त्यांना सुष्ट किंवा दुष्ट म्हणतो.” समीर
“खरं आहे रे समीर.” मामा
“या बाबतीतही अशीच काही शक्ती असावी असे वाटते आणि त्याचे उत्तर काकांच्या खोलीतच दडलेले आहे.”
“बघा काय करायचं ते पण जरा जपून करा.” मामा
सर्वानी ती रात्र अस्वस्थेतच घालवली. समीरने दुसऱ्या दिवशी झारापला जाण्याऐवजी घरातच राहणे पसंत केले. त्याच्या लॅपटॉपवरून त्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या.
सरपंच आल्यावर, सरपंच, रमेश आणि कुणाल झारापकडे रवाना झाले.

-२3-
समीरने त्या मूर्तीचा फोटो नेटवर अपलोड केला व त्या मूर्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. लवकरच त्याला ती मूर्ती मध्ययुगातील पण सुमेरियन संस्कृतीची असावी असं कळलं.
काही ख्रिश्चन पंथात ती मूर्ती मंत्र तंत्रासाठी वापरली जायची. ती त्यांची संरक्षक देवता होती. पण हा प्रश्न पुढे कसा सोडवायचा हे त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने शेवटी आदित्यनाथांना फोन करायचं ठरवलं. आदित्यनाथ फोन वापरत नसत. त्यांच्या साधनेत फोनचा व्यत्यय त्यांना नको असे. त्यामुळे ते जिथे राहत असतील तिथल्या लॅण्डलाइनचा नंबर त्यांच्या बरोबरच्या माधवला माहित असायचा. त्यांचा मुक्काम बहुतेकवेळेला सज्जन गडावर असायचा. तिथले उत्तम हवामान त्यांचा साधनेसाठी अनुकूल असायचे.
साधी राहणी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या साधनेत व्यत्यय न
आणण्याची पूर्ण खबरदारी इतर लोक घ्यायचे. अर्थातच त्यांचे भ्रमण हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही असायचे त्यांचं ठिकाण व तिथला फोन नंबर फक्त माधवलाच माहित असायचा.
समीरने फोन केला. फोन अपेक्षेप्रमाणे माधवनेच घेतला.
“हा बोला समीरभाऊ काय म्हणताय?” माधव
“कुठे आहेत ते ?” समीर
“दोन दिवसापूर्वी ते ऋषिकेश मध्ये होते. उद्यापर्यंत फारतर परवापर्यंत गडावर येतील. आल्यावर मी तुमचा निरोप देतो.” माधव
“माधव त्याच असं आहे. मला त्यांच्याशीच जरा बोलायचं होत.” समीर
“ठीक आहे. मग तुम्ही परवा फोन करा” माधव
दोन दिवस समीर तसा रिकामाच होता. या दोन दिवसात त्यांनी गोव्याला जायचं ठरवलं. त्याला तेथील जुन्या पोर्तुगीज चर्चचा अभ्यास करायचा होता.
संध्याकाळी कुणाल, रमेश आल्यावर परत गप्पा मारत बसले .नवीन असे काहीच हाती लागले नव्हते. नाही म्हणायला बजाबाच्या घरी त्याच्या मुलाने रमेशला एक ताईत दिला.
“रमेशभाऊ तुम्ही जर गढीवर राहणार असलात किंवा वारंवार जाणार असाल तर हा ताईत मात्र बांधा.”
“हे काय आहे” रमेश
“बजाबाने मरताना हा ताईत मला देऊन तो सुहासला द्यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी त्याला दिला. त्यानंतर मुली बेपत्ता झाल्यावर त्यांचा शोध वाड्यावर घेताना हा ताईत मला टेबलावर सापडला.
छोट्या मालकांना विचारला असता त्यांनी त्याची काही जरूर नाही असं सांगितलं. मग मी ताईत घेऊन आलो. त्यानंतर आठवड्याभरातच छोटे मालक बेपत्ता झाले. रमेशभाऊ हा ताईत तुम्ही वापरावा असं मला वाटत.”
काकांनी काही निश्चित हेतूनेच तो बजाबाला दिला असणार असं सांगितलं.
पुढच्या दिवशी फक्त गढीचा शोध घ्यायचं ठरले. मामाही बरोबर जायला तयार झाले आणि शेवटी सर्वजणच झारापला गेले.
रमेशनी मनोभावे काकांच्या खोलीतील देवळासमोर प्रार्थना करून ताईत दंडात बांधला. मामा बरेच दिवस झारापला किंवा वाडीवर आले नव्हते म्हणून दुसऱ्या गड्याला घेऊन ते वाडीवर गेले आणि जेवणापर्यंत येतो असं ते जाताना सांगून गेले.
काशीने सर्वाना चहा दिला आणि ती स्वंयपाकाच्या तयारीला लागली. या चौघांना गढीचा काही भागच बघायचा होता म्हणून त्यांनी दोन टीम करायचे ठरवले. समीर व कुणाल यांनी काकांच्या खोल्या बघायच्या तर रमेश, तानाजी आणि शिवा यांना दोन्ही दिवाणखान्यातील कपाटं बघायला सांगितली.
समीरने काकांच्या देवघरात जाऊन देवांना नमस्कार केला आणि सगळं सुखरूप होऊ दे म्हणून प्रार्थना केली. कपाटं बघता बघता त्यांना बरेच ग्रंथ, पूजेचे साहित्य दिसले.
पुस्तके बघता बघता काही पुस्तकांच्या मागे समीर ला एक चोर कप्पा दिसला. तो उघडाच होता. आत एक मखमली पेटी होती तिला मात्र कुलूप होत. समीरने ती पेटी बाहेर काढून ठेवली.
इकडे बाहेर दिवाणखान्यातील कपाटं उघडून बघण्याचं काम सुरु झालं होत. कपाटं बघता बघता एका कपाटात त्यांना पितळेच्या डब्यात बऱ्याच किल्ल्या सापडल्या. त्या त्यांनी बाहेर काढून ठेवल्या.

समीरने आत जाऊन यज्ञकुंड तपासले. यज्ञकुंडच्या खोलीतून अजून एक दार होते ते बहुतेक गढीच्या बाहेर पडत होते. त्याला आतून भक्कम कुलूप होते. याचा अर्थ आतून दार उघडल्याशिवाय त्या दारातून बाहेरून कुणीही आत येणे शक्य नव्हते. तो परत देवघरातून अलिकडल्या खोलीत आला. ही काकांची झोपायची खोली असावी. काकांना पेंटिंगची बरीच आवड दिसत होती.
तिथे नेहमीच्या वापरातील काकांचे सामान होते. कपडे, पायताण इत्यादी.. सगळं काही जागच्या जागी होते. म्हणजे काका स्वतःहून बेपत्ता झाले नव्हते.
प्रत्येक दिवशी बेपत्ता होण्याचे कोडे अधिकच वाढत होते. समीर आता पेटी घेऊन दिवाणखान्यात आला. रमेश ची बहुतेक सगळी कपाटं बघून झालीच होती.
समीरच्या हातात ती पेटी पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. देवघरातील पेटी असल्यामुळे आत काय असावे अशी सगळ्यांनाच उत्सुकता होती. रमेशनी त्यांना प्रचंड किल्ल्या सापडल्याचं सांगितलं.

एका पाठोपाठ सर्व किल्ल्या त्या पेटीला लावून बघितल्या. शेवटी त्यातली एक किल्ली त्या पेटीला लागली. पेटीच्या आत एक भूर्ज पत्र होते. त्याच्यावर प्राचीन मोडी लिपीत काहीतरी लिहलेलं होत. पेटी बंद करून ते नंतर वाचावं असं ठरलं व पेटीला कुलूप लावून ती बाजूला ठेऊन दिली.
“समीर ही सगळी कपाटं पाहताना या दिवाणखान्यातील एक कपाट जरा वेगळच आहे. कपाटाला दार तर आहे पण आत कपाटं नाही.” रमेश
“तू काय म्हणतोयस?” समीर
“त्या कपाटाच दार उघडलं की आत गणपतीचं मोठं चित्र आहे. काही कळत नाही. चल तुला दाखवतो.” रमेश
सगळेजण त्या कपाटाकडे गेले. कपाटाचे दार उघडल्यावर आत गणपतीचे मोठे चित्र दिसले. हे चित्र असे का आहे आणि ते कपाटात का ठेवले आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता.
चित्राच्या खालच्या भागातील पोपडे पडले होते. याचा अर्थ चित्राच्या मागे काहीतरी असावे. चित्र ओढून तर निघत नव्हते. बारकाईने निरीक्षण केल्यावर त्यांना एक छोटे कि होल दिसले. किल्ल्यांचा जुडगा तयार होताच. सगळ्या किल्ल्या लावून पहिल्या पण कुठलीच किल्ली लागत नव्हती. तेवढ्यत समीरला तसेच चित्र काकांच्या बेडरूम मध्ये दिसल्याच लक्षात आलं.

“अरे रमेश असेच चित्र काकांच्या खोलीत पण आहे. आणि त्या चित्राचा ह्या चित्राशी काहीतरी संबंध असावा का? चला पाहू या.” समीर

-२4-
सर्वांचा मोर्चा काकांच्या खोलीकडे वळला. तिथे तसेच चित्र होते. ते ठोकून पाहिल्यावर मागे पोकळ आवाज आला. ते चित्र लगेच बाजूला सरकवता आले. आत अजून एक पेटी पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. ती ही पेटी दिवाणखान्यात आणण्यात आली. आणि किल्ल्यांच्या जुडग्यातील एक किल्ली तिला लागली. पेटीत एक किल्ली व भूर्जपत्र होत.
“रमेश मला वाटते ही त्या गणपतीच्या चित्राच्या कुलुपाची किल्ली असावी. पण आपण उघडायची घाई करायला नको. आपण फक्त किल्ली लागते का बघू?” समीर
“असं का? किल्ली लागत असली तर उघडून पण बघू की?” रमेश
“नको. ज्या अर्थी काकांनी एवढी सुरक्षा बाळगली आहे म्हणजे त्या अर्थी ते दार सहजासहजी उघडले जाऊ नये असे त्यांना निश्चितच वाटत असणार. आपण जरा काही इतर पाहणी करू. बाकीच्या कपाटं सारखं हे फक्त भिंतीतलंच आहे कि अजून काही आहे हे प्रथम बघू.” समीर
वाडा जुना असल्यामुळे भिंती चांगल्याच जाडजूड होत्या. त्यामुळे सगळी कपाटं भिंतीतलीच होती.
“शिवा आपल्याकडे मोठा टेप आहे का?” समीर
“म्हणजे काय?” शिवा
“अरे अंतर मोजायला असतो. पन्नास फूट, साठ फूट. त्याची अशी गुंडाळी करता येते.” समीर
“नाही. असं काही पहिल्याच आठवत नाही.” शिवा
तसा टेप झारापला मिळणं अवघडच होत. शेवटी कुडाळ वरून टेप घेऊन दुसऱ्यादिवशी यायचं ठरलं.
मामा अजून वाडीवरून आले नव्हते. पण दोन गाड्या असल्याने एक गाडी मामांकरिता मागे ठेवणे शक्य होते. काशीने जेवण तयारच ठेवले होते. सर्वानी जेवून घेतले. कुणाल, तानाजी आणि समीर कुडाळला परत जाण्यासाठी निघाले. रमेशने तेथेच थांबून मामांसोबत कुडाळला परत यायचं ठरवलं.

-२5-
- रमेश -
समीर आणि कुणाल कुडाळला गेले. आणि मी इथे थांबण्यात चूक तर केली नाही ना असे मला वाटू लागले. काशी आवरून निघून गेली होती. एवढ्या मोठ्या गढीत मी आणि शिवा दोघेच होतो.
“काय रे शिवा एवढी लोकं बेपत्ता झाली. ती कशी झाली असावीत?” रमेश
“काय कि बुआ काहीच कळत नाही हो. म्हणजे ह्या पोरी संध्याकाळपर्यंत असायच्या व नंतर बेपत्ता व्हायच्या.” शिवा
त्या गढीतून बेपत्ता व्हायच्या? का घरी जाताना बेपत्ता व्हायच्या? का घरी पोहचल्यावर बेपत्ता व्हायच्या?” रमेश
“त्या घरी पोहचायच्याच नाहीत म्हणजे त्या घरी जाताना किंवा गढीतूनच बेपत्ता होत असल्या पाहिजेत.” शिवा
“पण गढीत बेपत्ता होणार कुठे?”
“हो ना. काहीच कळत नाही बघा. गढीत बेपत्ता होऊ शकेल असं कुठेच काही दिसत नाही. गढीचा कोपरा न कोपरा शोधला काही सापडत नाही” शिवा
“पण काय रे असं झाल्यावर तुम्हाला रात्री बेरात्री गढीत राहायची भीती वाटत नाही का?”
“भीती कसली वाटणार? लहानपण सगळं इथंच गेलं.” शिवा
तेवढ्यात माझे लक्ष पहिल्या पेटीकडे गेले. पेटी उघडून आतलं भूर्जपत्र मी वाचू लागलो. लहानपणी शिकलेली मोडी लिपी थोडीफार लक्षात होतीच. वाचत होतो म्हणजे नुसतं अक्षर वाचत होतो. त्या अक्षरांचा अर्थ काय आहे ते कळत नव्हतं. शेवटी ते भूर्ज पत्र पेटीत ठेऊन पेटी बंद केली.
माझ्या मनाला त्या गणपतीच्या चित्राची उत्सुकता शांत बसू देत नव्हती. शेवटी मनाचा धीर करून चित्राला किल्ली लावली. किल्ली लावल्यावर चित्र बाहेरच्या बाजूला उघडले गेले.
अंगावर शहारे आल्याची जाणीव झाली पण चित्राच्या मागे तर विटांनी बांधलेली पक्की भिंतच होती. आपण उगीचच घाबरत होतो असे वाटले. कधी कधी आपलंच मन कल्पना करत असत.
डोंगर पोखरून उंदीर निघावा तसे झाले होते. ते तसेच ठेऊन मी पाणी प्यायला किचन मध्ये गेलो. पाणी पीत असतानाच मला दिवाणखान्यातून कोणीतरी बोलल्याचा आवाज येऊ लागला. मला वाटले वाडीवरून मामा परत आले असावेत.
मी पाणी पिऊन झाल्यावर तोंडात गुळाचा खडा टाकून दिवाणखान्यात आलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मामा अजून आलेच नव्हते पण शिवाशी चक्क सुहास बोलत उभा होता. मला पाहताच तो आनंदाने म्हणाला
“अरे रमेश तू केव्हा आलास? कधीपासून मी तुझी वाट बघतोय.” सुहास
“अरे सुहास तू होतास तरी कुठं? सगळेजण तुला शोधत आहेत. पोलीस चौकीत तुझी मिसिंग पर्सन म्हणून नोंद झाली आहे.”
“अरे मी इथून गेलो त्या दूरच्या वस्तीवर. एका मित्राच्या वाडीतील वस्ती होती आणि तिथं आजारीच पडलो. मग काय तिथंच झोपून होतो. तिथे फोनचीही काही सोय नव्हती. त्यामुळे निरोपही पाठवता आला नाही. तसेही माझी वाट पाहणार कोण होत इथे?” सुहास
“धन्य आहे तुझी. बरं जेवण करतोस का?”
“नाही रे धुळीने माखलो आहे.” सुहास
मला तर तो स्वछ वाटत होता म्हणून मी त्याच्या जवळ जाताच तो मागे सरकला. आणि म्हणाला
“रमेश मी पहिल्यांदा स्वछ होऊन येतो कारण मला कुठला आजार झाला होता. तो संसर्गजन्य होता कि नाही याची कल्पना नाही त्यामुळे स्वछ अंघोळ करतो मग बसू गप्पा मारत. आणि हा शिवा आहेच की मदतीला.” सुहास
“ठीक आहे. मी आता कंटाळलो आहे जरा झोपतो तुझ आवरलं की मला उठव.”
असे म्हणून मी तिथल्याच एका आराम खुर्चीत बसलो आणि चटकन झोपी गेलो. जेवण भरपूर झालं होत आणि काही काम करावं तर असं काही काम ही नव्हतं त्यामुळे गाढ झोप लागली.

-२6-
मला जाग आली ती कोणीतरी हलवल्यामुळे. मला वाटलं सुहासच. त्याच आवरून मला उठवत आहे. पण डोळे उघडून बघितलं तर मामा मला उठवत होते.
“अरे मामा तुम्ही बराच उशीर केलात.?”
“हो ना. वाडीवरची मंडळी जेवल्याशिवाय सोडत नव्हते म्हणून जेवूनच आलो.” मामा
“मी चांगला दोन तीन तास तरी झोपलो होतो.”
“मामा तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे.”
“काय?” मामा
“अहो आपला सुहास परत आलाय.”
“काय थापा मारतोयस. हे कस शक्य आहे?” मामा
“अहो मामा खरंच. तो कुठल्यातरी वस्ती वर गेला होता. आपल्या वाडीच्या बाहेरच्या वस्तीवर गेला होता आणि तिथं आजारी पडला तिथं कोणी येण्यासारखे नव्हतं आणि फोन ची सोय नव्हती त्यामुळे तो आपल्याला निरोप पाठवू शकला नाही.”
“खरं सांगतोयस तू?” मामा
“मामा मी त्याच्याशी बोललो, शिवा पण बोलला नंतर मला गाढ झोप लागली.”
“मग तो आता कुठं आहे?” मामा
“मी झोपण्यापूर्वी तो अंघोळ करायला गेला होता. आत्त्ता पर्यंत त्याची अंघोळ झाली असेल. तो त्याच्या खोलीतच असेल.”
मामांनी दुसऱ्या गड्याला सांगितले, 'छोटे मालक आणि शिवाला बोलावून आण. छोटे मालक म्हंटल्यावर गडी चमकला आणि तो त्या दोघांना आणायला सुहासच्या खोलीकडे गेला. पंधरा -वीस मिनिटांनी तो परत आला.
“मालक, छोटे मालक आणि शिवा कुठेही नाहीत. सगळीकडे शोधून आलो.” गडी
“चल रे रमेश सुहासच्या खोलीत जाऊन पाहू.” मामा
तिघेही सुहासच्या खोलीकडे गेले. खोली नीटनेटकी व आवरलेली होती. पण सुहास व शिवा कुठेच दिसत नव्हते. किंबहुना तो तिथे आल्याचा किंवा अंघोळ केल्याच्या काहीच खुणा दिसत नव्हत्या.
“रमेश तू स्वप्नात तर नाहीस ना?” मामा
“नाही हो. मी चांगला पाच दहा मिनिटे त्याच्याशी बोलत होतो. मी त्याच्या पाठीवर थाप मारणार इतक्यात तो म्हणाला, मी आत्ताच आजारातून उठलो आहे. हा आजार संसर्गजन्य आहे की नाही माहित नाही. मी आधी अंघोळ करून येतो असे म्हणून तो अंघोळीला गेला.”
“अरे पण तो कुठेच सापडत नाही. अंघोळीच्या काही खुणाही दिसत नाहीत. चल आपण कुडाळला निघूया. तिकडे पोहचल्यावर बोलू.” मामा
दुसऱ्या गड्याला त्यांनी संध्याकाळच्या आत गढी लावून घ्यायला सांगितली. मी आणि मामा गाडी घेऊन कुडाळच्या दिशेने निघालो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायब झालेली माणसं स्वतः येउन आमच्याशी बोलताहेत Uhoh
अशाने इंट्रेस्ट जातोय. मागच्या भागात सुहास. इथे चाळीस वर्षापुर्वी गायब झालेले काका आलेत.
काही वेगळी ट्रीटमेंट चालली असती कथा मांडण्यासाठी.
गायब झालेल्यांचं गुढ उकलण्यासाठी समीर आणि कुणाल आलेत ना? मग स्वतः गायब झालेले येउन काय झालं ते सांगताहेत?

व्वा..छान..
शिवा पण गायब झाला.रमेश ताईत असल्यामुळे वाचला म्हणजे.
त्या भुज्पत्रावर काय लिहले असेल ह्याची उत्सुकता लागली आहे.

छान चालली आहे कथा.

गायब झालेली माणसं स्वतः येउन आमच्याशी बोलताहेत >>> मला वाटतं हा फ्लॅशबॅकसारखा प्रकार केला आहे. पण अजूनही रहस्य पूर्ण उलगडलं नसल्यामुळे इंटरेस्ट कायम आहे.

छान शैली वापरलीय
आवडलं लिखाण
आणि सॉलिड वेगवान कथानक
त्यामुळे अधिक मजा येतेय

जे लोक गायब आहेत ते आता परत दिसताहेत व त्यांच्याशी बोलणारे गायब होताहेत, आता सुहास दिसला व त्याच्यासोबस्ट शिवा होता तो आता गायब. म्हणजे सुहासचे दिसणे हे नी च्या दिसण्यासारझे फसवे होते.

छानच आहे स्टोरी. पण कोकणात कुडाळ सारख्या ठिकाणी खाशाबा बजाबा अशी नावे नसतात. असो त्याकडे दुर्लक्ष करु.