मायबोली गणेशोत्सव २०१७ - समारोप

Submitted by संयोजक on 29 September, 2017 - 12:26

मायबोली गणेशोत्सव २०१७ - समारोप

मराठी माणसाच्या मनात गणेशोत्सवाचं एक खास स्थान आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी माणसांमधला हा कॉमन फ्याक्टर! मराठीच्या वेगवेगळ्या भागातील स्थानिक फरक, रीती रिवाजांमधले वैविध्य, स्थळाप्रमाणे बदलणारा काळ , पूजा आणि नैवेद्याच्या सामानाची (अन) उपलब्धता ... कशा कशाला न जुमानता मराठी मंडळी गणपती उत्सवात सहभागी होतात.
गोंगाटाचा त्रास , गर्दीमुळे होणारी अडचण , चित्रपटातील गाणी वाजवण्याला आक्षेप, विसर्जनाच्या मिरवणुकीत घडणारे गैर प्रकार, विसर्जनानंतरची विसर्जन स्थळांची दयनीय अवस्था या सगळ्या पलिकडे गणपती उत्सवातून एक चैतन्य, उत्साह आणि सामूहिक आनंद मिळतो.

मायबोलीवरचा गणेशोत्सव या सगळ्याला अपवाद कसा असेल ? ह्या उत्सवाचे यंदाचे आठरावे वर्ष ! ऑनलाइन असला तरी आरत्या झाल्या, श्लोक झाले, प्रसादाची तर रेलचेल झाली. प्राइम मेरिडियन पासून इंटरनॅशनल डेड लाइन गाठून परत प्राइम मेरिडियन पर्यंत सर्वत्र राहणारऱ्या मायबोलीकरांचा सहभाग असल्याने दिवसाच्या कुठल्याही प्रहरी गणेशोत्सव गजबजलेला होता.
शब्द खेळ या उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद पाहता मराठीच्या भविष्याची चिंता थोडी तरी कमी झाली. अतरंगी उत्पादनांच्या जाहिरातींनाही उदंड प्रतिसाद मिळाला. १९६०-७० च्या दशकात गणेशोत्सवात एकदा तरी प्रॉजेक्टर आणून सिनेमा दाखवायचा कार्यक्रम होत असे. व्ही सी आर, डी व्ही डी, केबल आणि आता यू ट्युबच्या जमान्यात ती प्रथा जवळपास बंद पडली.
पाककृतींना यावर्षी जास्त प्रतिसाद मिळाला नाही. नेहमीच्या यशस्वी झब्बूला देखिल कमी प्रतिसाद होता. पुढच्या वर्षी हे उपक्रम घ्यावे की नाही हा विचार पुढच्या वर्षीच्या संयोजकांना करता यावा म्हणून ही नोंद फक्त.
कविकल्पना उपक्रमालाही ह्यावेळी मायबोलीकरांनी उदंड प्रतिसाद मिळाला. कविमनाच्या मायबोलीकरांची अजूनही मायबोलीवर कमी नाही तर!
अचानक उद्भवलेल्या आपत्तींचा , संकटाचा सामना तुम्ही कसा केलात? त्यातून निभावल्यावर अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून किंवा आलीच तर परत पहिल्यासारखा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना केली आहे ? काय सावधगिरी बाळगली आहे ? ह्याबद्दल सगळ्यांनी निर्विघ्नं कुरु मे देव!' ह्या धाग्या अंतर्गत मांडलेली मते मायबोलीकरांना पुढे नक्कीच फायदेशीर ठरतील.
या गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर आपण सेवाभावी संस्थाना एक अजून सुविधा उपलब्ध करून देत आहोत. आता ज्या अधिकृत नोंदणी झालेल्या सेवाभावी संस्था आहेत त्याना मायबोलीवर त्यांचा एक स्वतंत्र ग्रूप असेल. हा गृप संस्थेच्या च्या ताब्यात असेल आणि त्याना योग्य वाटेल तेंव्हा त्या ग्रूपमधे त्यांना संस्थेच्या उपक्रमांबद्दल घोषणा करता येतील. ज्या मायबोलीकरांना त्या त्या संस्थांबद्दल विशेष आस्था आहे त्यांच्या ग्रूपचे सभासद होऊन संपर्कात राहणे जास्त सोपे होईल. ह्या उपक्रमासाठी शुभेच्छा आणि आभार!
मुलांच्या उपक्रमांना नेहमी प्रमाणे उदंड प्रतिसाद मिळाला. इथून पुढे मुलांसाठी अजून वेग वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवता येतील.
मायबोली ही सर्वांची myबोली आहे याचा प्रत्यय संपादक मंडळात तर आलाच पण इतर मायबोलीकरांनीही जी मदत केली त्याबद्दल संयोजक मंडळ ऋणी आहे.
थोडक्या वेळात एस्टीवाय लिहिल्याबद्दल श्रद्धा, हायझेनबर्ग आणि फारेंड यांचे आभार .
गणेश प्रतिष्ठापनेवरील श्र्लोक गायन :- स्वाती आंबोळे, आमच्या घरचा बाप्पा साठी रचना :- नरेंद्र कुलकर्णी (हिमस्कूल यांच्या विनंती वरून), स्वरचित आरतीसाठी बासरी वादन :- चैतन्य दीक्षित आणि आमच्या घरचा बाप्पा व तुमच्या गावाचा गणपती प्रकाशचित्र :- जिप्सी यांना धन्यवाद .
मुलांच्या कल्पनाशक्तीला पुरेसा वाव देणारे गणपतीचे चित्र मॅगी यांनी दिले त्याबद्दल त्यांचेही आभार.
सर्वात शेवटी - नेहमीप्रमाणेच , अ‍ॅडमिन आणि वेबमास्तरांचेही सर्व प्रकारच्या सहाय्याबद्दल आणि उत्तेजनाबद्दल आभार!
नजरचुकीने कुणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर माफी असावी.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि भाग घेतलेल्या सर्वांचे अनेक आभार!
आणि हो, स्पर्धेचे निकाल, प्रशस्तीपत्रके आणि समारोप करण्यात काही कारणांनी झालेल्या उशीराबद्दल संयोजक मंडळ दिलगीर आहे.
एवढे बोलून आपली रजा घेतो! भेटत राहू इथेच!!

curtain call.png
-संयोजक मंडळ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर्षी गणेशोत्सवाच्या संयोजन मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेमांचे आभार. काही नेहमीचे यशस्वी सह संयोजक तर अक्षय, सिंबा, नानाकळा यांसारखे नव्या दमाचे कलाकार यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली, बरेच काही शिकायलाही मिळाले.
उत्सवाच्या काळात माबो वरचे वातावरण पण किती सकारात्मक असते हे पुन्हा अनुभवायला मिळाले.
माबोकरांना पण मजा आली असेल अशी आशा!

>>> उत्सवाच्या काळात माबोवरचे वातावरणपण किती सकारात्मक असते हे पुन्हा अनुभवायला मिळाले.
अगदी अगदी! Happy

यावर्षी गणेशोत्सवाच्या संयोजन मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेमांचे आभार. संयोजन मंडळात काम करायला भरपूर मजा आली. हा एक वेगळाच अनुभव होता. भरपूर काही शिकायला मिळालं ह्यातून. यापुढेही जशी संधी मिळेल तसं काम करायला आवडेल. इथून पुढेही अनेकानेक नविन लोकं संयोजक मंडळात सामील होतील अशी आशा आहे. सर्व मायबोलीकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मंडळ आभारी आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन Happy
गणपती बाप्पा मोरया!!

धमाल आली गणेशोत्सवात. मायबोली स्पिरिटचा प्रत्यय आला.
शब्दांच्या खेळात बरेच नवे शब्द कळले. काहींची उजळणी झाली. स्फुर्तिदेवता रुसल्याने किंवा प्रतिभा आटल्याने Wink कवितांच्या खेळात भाग घेता आला नाही.
जाहिराती लिहिताना आणि वाचतानाही मजा आली. बाकीच्या एन्ट्रीज लोळत लोळत फोनवरून वाचल्याने प्रतिसाद द्यायचे राहून गेलेत. तो इथेच देतो.

संयोजकांच्या जाहिरातीं आवडल्याचीही पावती इथे देतो. त्या दिसल्या मात्र जरा कमी.

पाककृती स्पर्धेत भाग घ्यायचा होता. एक पाककृती फोटोसकट तयार होती. दुसरीवर प्रयोग सुरू होते. पण नेमकं अनंतचतुर्दशीच्या दिवशी आजारपण पाहुणचाराला आल्याने एंट्री देता आली नाही. पण त्यानिमित्ताने काहीतरी करून बघता आले.
यंदाच पाककृती स्पर्धेला कमी प्रतिसाद मिळालाय. उपकरणांचा अंतर्भाव असलेली कल्पना खरंच कठीण होती, तर साखर, गूळ इ. न पावरता करायचा गोड पदार्थ ही कल्पना अन्यत्र बरीच राबवली गेलेली होती.
समारोपाचा धागा जास्तच घाईगडबडीत लिहिलाय. एके ठिकाणी संयोजक ऐवजी संपादक म्हटलंय (की संयोजक मंडळींच्या अंगात संपादक मंडळ घुसू पाहतंय? बघा हो वेबमास्तर. विचार करा, पुढल्या वर्षी तरी.
धमाल गणेशोत्सवासाठी संयोजकांचे अभिनंदन आणि आभार.

अप्रतिम झाली स्पर्धा. आयुष्यातले इतर व्याप सांभाळून घरचे कार्य असल्या सारखे हे सगळे जमवून आणण्याच्या तुमच्या मेहनतीला सलाम.
लिहिण्याची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळाचे आभार.

आभार धन्यवाद शुक्रिया...
माझ्यासारख्या घरी गणपती नसलेल्या मंडळींना मायबोली मुळेच गणपती उत्सव असल्यासारखे वाटते..
कधी संयोजक मंडळात यायची मी उत्सुकता दाखवली नाही कारण ती माझी पात्रता नाही. पण ज्यात ती आहे त्या स्पर्धात भाग आवर्जून घेतो आणि स्पर्धक, प्रेक्षक, वाचक म्हणून या सोहळ्यास हातभार लावतो. संयोजक मंडळासोबत अश्या सर्वच मायबोलीकरांचेही आभार जे या उपक्रमांमध्ये भाग घेत याला यशस्वी करतात. तसेच विशेष आभार त्यांचे जे आपल्या पाल्यांसह भाग घेत या उपक्रमाला एक कौटुंबिक टच देतात ज्यामुळे मायबोलीबद्दल आपलेपणा टिकून राहतो, दर गणेशोत्सवानंतर तो वाढतोच Happy

कारण ती माझी पात्रता नाही. >> बस का, संयोजक मंडळात काम करायला खालील पात्रता लागते फक्त :
माबोवर देण्याइतका थोडाफार वेळ असणे.
धागे उघडणे, पोस्ट टाकणे याची माहिती असणे Proud
या दोन्हीतली तुझी पात्रता तूच नाकारतोस ? आता कामात सहभाग घेण्याची इच्छा नसेल तर गोष्ट वेगळी Happy उगीच पात्रता नाही वगैरे कशाला!
Happy

मैत्रेयी, माझी कुठल्याही प्रकारच्या संयोजनात भाग घ्यायची खरेच जराही पात्रता नाही. मला ते नाही जमत. किंवा कधी फारसे केले नाही म्हणू शकता. किंवा जे केले ते फसलेच वा कोणाच्या तरी कुबड्या घेऊन केले म्हणू शकता.

याऊपर भाग घेतल्यास लाज जाईल, लोकं हसतील. किंवा निव्वळ सांगकाम्या गडी बनून राहील. अर्थात यात मला काही कमीपणा नाही वाटणार. जर ते चालत असेल तर पुढच्यावेळी साठी आताच नाव देतो Happy

अवांतर - आजवर संयोजनाच्या नावाखाली जे केले फसले वगैरे हे वरची पोस्ट लिहिताना जे आठवलेय त्याचा एक लेख लवकरच पडेल. तो तेवढा आता झेला Happy

याऊपर भाग घेतल्यास लाज जाईल, लोकं हसतील. किंवा निव्वळ सांगकाम्या गडी बनून राहील. अर्थात यात मला काही कमीपणा नाही वाटणार. जर ते चालत असेल तर पुढच्यावेळी साठी आताच नाव देतो
>>>
असं काहीच होत नाही... पुढच्या वर्षी साठी नाव देऊन ठेव. अनुभव येइल तुलाच.

>>मायबोली गणेशोत्सवाची परंपरा जपत सण धामधुमीने साजरा करण्यासाठी झटलेल्या सर्वांचे आभार! >>+१. अत्यंत कमी वेळात हे राहिलं.

ह्या वर्षी संयोजक मंडळात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल. मंडळात काम करताना मजा आली.

मायबोली गणेशोत्सवाची परंपरा जपत सण धामधुमीने साजरा करण्यासाठी झटलेल्या सर्वांचे आभार! +१

यावेळी नीट भाग घेता आला नाही त्याची हळहळ वाटते आहे.
पण तरी केलेल्या पयल्या नमनाने गणपती बाप्पा पावला मला Happy