‘खारदुंग ला’ अल्ट्रा मॅरेथॉनचे आव्हान - भाग २

Submitted by हर्पेन on 3 October, 2017 - 12:55

भाग दुसरा – वातावरणाच्या सरावाकरता केलेला स्टोक कांगरी ट्रेक

(भाळटीप - मध्यंतरीच्या काळातील, ‘मैत्री कडून आलेले आवाहन’, ‘धावण्याचे ट्रेनिंग’ याबद्दल आधीच लिहिले असल्याने त्याबद्दल परत काही लिहित नाही. फक्त एक मात्र नमूद करतो एकूणातच त्यावेळी मिळालेल्या सगळ्याच प्रतिसाद /प्रोत्साहनामुळे केवळ ट्रेनिंग चालू ठेवायलाच नव्हे तर प्रत्यक्ष खारदुंग ला धावताना देखील मला फार मोठी मदत झाली.)

धावण्याचा सोळा आठवड्याचा सराव संपत आला तेव्हा स्टोक बद्दल नीट विचार करायला सुरुवात केली आणि अचानक जाणवले की आधी असलेली wildcraft कंपनीची पाठपिशवी आता जुनी झाली असल्याने मला एक नवीन पाठपिशवी विकत घ्यावी लागणार आहे. त्याच दरम्यान GST वगैरे प्रकरणामुळे ही साधी खरेदी देखील एक 'प्रकरण' झाले; पण झाली एकदाची खरेदी. दरम्यान ट्रेक द हिमालय संस्थेकडून ‘ट्रेक करता लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींची यादीच पाठवण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असणारे काही साहित्य माझ्याकडे नव्हते. पण माझ्याकडे नसलेले जवळजवळ सगळे साहित्य ( फ्लीस जेकेट, स्नो/रेन जेकेट, गेटर्स) शॅननकडून मिळाले (त्याने दोन वर्षामागे चादर ट्रेक केला होता) आणि लहान आकाराची पाठपिशवी आणि पाणपिशवी स्मृतीकडून (हिने आणि अखिलने याच वर्षी 'गोयचा ला' ट्रेक केला होता.) त्यामुळे मला फारशी वाढीव अशी नवीन खरेदी करायला लागली नाही.

मग ऑगस्ट संपताना गणपती आले आणि आमचे दीड दिवसाचे असल्याने लगेचच गेले देखील. त्या विकांतानंतर दोन दिवस ऑफिसला जायचे होते आणि मग माझी रजा सुरु होणार होती. ते दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही. आणि २९ तारखेला रात्री पुणे विमानतळावर डेरेदाखल झालो. निखीलने त्याचे विमानाचे बुकिंग देखील माझ्याच विमानात केले होते. तिकडे आम्हाला शुभेच्छा पूर्वक पाठवणी करायला बरेच मित्र आले होते. केक आणला होता. आम्ही म्हणजे जणू मोठ्या लढाईवर जाणारे सैनिक असल्यासारखे वाटत होते.

IMG_20170830_000203.jpg

आमचे विमान मुंबईतील जोरदार अतीवृष्टीमुळे तीन तास उशीरा म्हणजे पहाटे तीन वाजता सुटले. त्यामुळे झोपेचे खोबरे झाले. हे इंडिगोचे विमान दिल्ली पर्यंत होते; पुढचे दिल्ली ते लेह विमान ‘विस्तारा’चे सात वाजून २० मिनिटानी होते. दिल्लीला टर्मिनल बदलून व्यवस्थित लेहच्या विमानात बसलो. अमनदीप, प्रदीप आणि प्राची हे देखील आमच्या अगोदर दिल्लीला पोचलेले होते, पण दिल्लीहून लेहच्या प्रवासात ते आमच्याच विमानात असणार होते. अशा रीतीने ३० तारखेला सकाळी साडेनऊ च्या सुमारास आम्ही सगळे लेहला उतरलो. उतरल्यावर पाहतो तर काय माझे आयडिया चे नेटवर्क कामच करत नव्हते शिवाय का कोण जाणे बीएसएनएलचे नेटवर्क पण त्यावेळी चालले नाही. बाकीचे ज्या हॉटेलात (जुनेद गेस्ट हाउस) राहणार होते तिथला माणूस गाडी घेउन आणायला आलेला होता. मी देखील त्यांच्याबरोबरच गेलो. मला जायचे होते ते हॉटेल ( पॅलेस व्यू) सुदैवाने त्यांच्या अगदी जवळच होते. माझा ६ तारखे पर्यंतचा पत्कर ‘ट्रेक द हिमालय’ संस्थेने घेतला होता. त्या ट्रेकहून आल्यावर मी निखील, अमन आणि प्रदीप यांच्यासोबत जुनेद गेस्ट हाउस मध्ये राहणार होतो.

गेलो तो दिवस (३० ऑगस्ट) फक्त रिपोर्टिंगचा होता त्यामुळे तो दिवसभर एकेक ट्रेकमेट्स येत राहिले. काहींची विमाने अजून उशीरा पोचणारी होती तर काही श्रीनगर कडून खुश्कीच्या मार्गाने आले. सगळ्यात उशीर मुंबईहून विमानाने येणाऱ्या लोकांना झाला. मुम्बईत पाऊसच इतका जास्त होता की विमाने उडाली हेच विशेष. त्या दिवशी बाकी तसे काही कामही नसल्याने तो पूर्ण दिवस आराम करण्यातच गेला. माझा रुमी होता सौरभ भल्ला जो ‘आय टी बी पी’ मध्ये कार्यरत आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या वेळी आय टी बी पी च्या माणसांनी आम्हा यात्रेकरूंची घेतलेली काळजी, आमचे केलेले लाड अविस्मरणीयच आहेत. त्याची माझी गट्टी जमायला अजिबात वेळ लागला नाही. त्याच्या ओळखीची (स्कुबा डायविंगचा कोर्स करताना ओळख झालेली) रिधीका खन्ना देखील या ट्रेक करता आलेली होती आणि तिच्या बरोबर माउंटेनियरिंग कोर्स केलेले अजून दोघेही (विवेक सेमवाल आणि नितीन लुम्बा) त्यांचे असे टोळकेच होते म्हणा ना. सौरभमुळे मी ही त्यांना सामील झालो आणि त्यांनीही मला त्यांच्यात अलगद सामावून घेतले. आमचे सूर इतके सुंदर जुळून आले की ट्रेक करता दिवसभरात नंतर आलेल्या इतर लोकांना मी ही त्या सगळ्यांना आधीपासूनच ओळखतो असे वाटत होते.

अमन प्राची आणि निखील यांचा प्रदीप नेईल तिकडे जवळपासच्या ठिकाणी बाईकवर फिरायला जायचा बेत होता. प्रदीप या आधी लेहला भरपूर वेळा येउन गेला होता त्यामुळे तो त्या गृपचा म्होरक्या होता. आमच्यातला विवेकही मागच्याच हिवाळ्यात लेहला येउन राहून गेलेला असल्यामुळे आमचा म्होरक्या तो झाला. आम्हाला वेगवेगळ्या खाण्याच्या ठिकाणी घेउन जाण्याची जबाबदारी त्याच्यावरच पडली. दुपारचे आणि रात्रीचे जेवण मी ह्या लोकांसोबतच घेतले. एकंदरीतच आम्ही लेह मध्ये जिथे कुठे जे काही खाल्ले ते चविष्ट होते.

३१ ऑगस्ट २०१७

सकाळी सकाळी बायकोचा मेसेज. ३१ तारखेला माझा वाढदिवस असतो त्याच्या शुभेच्छा देण्याकरता. माझा आयडिया नेटवर्क असलेला फोन बंदच होता मग नेटचे तर नावच नको. आणि BSNL चा फोन नंबर देखिल खूप कमी लोकांना माहित होता. त्यामुळे फोन नाही, मेसेज नाही ,
व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुक तर अजिबातच नाही. माझ्या वाढदिवसाची सुरुवात अनेक अनेक वर्षानी अत्यंत शांत प्रकारे झाली. निखील अमन ही मंडळी बाईकवर फिरायला जाणार होते त्यामुळे ते ही दिवसभर मला भेटणार नव्हते. BSNL च्या फोनला रेंज नीट नव्हती. वाऱ्यावर च्या वरातीवर ती कधी येई कधी नाही. मग मला अचानक असे जाणवले की मी सांगितले नाही तर कोणाला कळणारही नाही की माझा वाढदिवस आज आहे. त्यामुळे मी सौरभला आणि माझ्या नव्या गँगला सांगितले की आज माझा वाढदिवस आहे आणि शुभेच्छा वसूल केल्या. Happy

नंतर सकाळचे आवरून बाहेर पडलो आणि सगळ्यात आधी जर्मन बेकरीमध्ये पोटभर न्याहारी केली. मग आम्ही शांतीस्तूप बघायला गेलो. हे लेह गावातच एका टेकडीवर आहे. तिकडे वरती जाताना सगळ्यांनाच दम लागत होता. त्यामुळे आराम-टप्पे घेतघेत वर चढलो. वरतून दिसणारा नजारा एकदम मस्त आहे. गोल आकाराच्या स्तूपाभोवती भरपूर मोकळी जागा आहे आणि भोवतीच्या कठड्यावर त्या त्या दिशेला स्टोक गाव, सिंधू नदी पात्र, खारदुंग ला, असे नामोल्ल्ख आणि अगदी थोडी माहिती असे लिहिलेले बोर्ड होते. आधी करायच्या स्टोक ट्रेक आणि नंतर करायच्या खार्दुंग ला ह्या दोन्ही ठिकाणाचे दर्शन दुरून का होईना झाले. आणि ते दुरून असल्यामुळे दोन्ही डोंगर अत्यंत साजरे दिसत होते हे सांगणे न लगे.

IMG_20170831_113434_HDR.jpg

त्यानंतर आम्ही लेहच्या राजवाड्याकडे कूच केले. राजरस्त्याने न जाता आम्ही विवेकच्या मागे मागे गल्ली बोळातल्या रस्त्याने गेलो त्यामुळे स्थानिक घरांचे जवळून दर्शन झाले. तिथल्या उन्हाळ्यामुळे हा मोसम वेगवेगळ्या फुलांचा होता. लोकांनी अतिशय हौसेने लावलेली वेगवेगळी फुलझाडे त्या परिसराचे सौंदर्य वाढवत होती. राजवाडा देखील उंच अशा टेकाडावरच आहे आणि खालून सहा मजली भासला तरी डोंगर उतारावर असल्याने एकूण नऊ पातळ्यांवर आहे. जसजसे वर जावे तसतसे लेह चे दृश्य अधिकाधिक मनोहारी होत जात होते. त्या राजवाड्यातले अंधारे मार्ग दौलताबाद किल्ल्यातल्या भुयाराची आठवण करून देत होते. बाकी तसे इथे बघण्यासारखे फार काही नव्हते. एक शाही मंदीर आणि फोटो दालन हेच काय ते पहायाचे. राजवाड्यात पुरेसा वेळ घालवल्यावर नंतर आम्ही राजवाड्यामागेच असलेल्या ‘त्सेमो नामग्याल गोम्पा’ (गोम्पा म्हणजे मठ) (मोनेस्टरी) कडे गेलो. तिकडे जातानाही चढ असल्याने विरळ हवा जाणवत होती, लगेच दम लागत होता. पण पहिलाच दिवस असल्याने असे होतेच हे माहित असल्याने आम्ही सगळे उत्साहात होतो. त्या गोम्पा संकुलात देखील पाहण्याजोगे फार काही नव्हते लेहाचे दृश्य अजून उंचावरून बघायला मिळाले. खारदुंग ला कडून येणारा रस्ता अजून नीटपणे पहायला मिळाला.

IMG_20170831_145047.jpg

हे सर्व बघेतोवर साधारण दोन वाजून गेले होते सगळ्यांनाच आता कडकडून भूक लागली होती मग माघारी फिरलो आणि लेह गावात येऊन एका रूफ टॉप रेस्टॉरंट मध्ये जेवलो. जेवण उत्कृष्ठ होते. जेवण झाल्यावर आमच्या हॉटेलवर जावून थोडावेळ विश्रांती घेऊन अमन निखीलला भेटायला गेलो. ते नुकतेच बाईकवरून फिरून गारठून आले होते. त्यांच्याशी गप्पा मारून परत आलो. संध्याकाळी आम्हाला ब्रीफिंग मीटिंग करता जमायचे होते. आम्ही लेहला पोचायच्या अगोदरच ज्यांनी ट्रेक करता नावनोंदणी केली होती त्यांचा एक व्हॉटसॅप गृप आणि गुगल डॉकवर यादी बनवली होती त्यामुळे नावाने ओळख होती. त्या सगळ्या नावांना चेहरा मिळाला. अर्थात बाकीच्या मंडळीशी ओळख झाली. दिल्ली, बंगलोर, मुंबई, डेहराडून, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले एकूण १७ जण मिळून आम्ही ट्रेकमधे पुढचे सहा दिवस पहाडात सोबत असणार होतो. पहिल्या काही प्रश्नोत्तरांवरून कोण कसे असेल ह्याचा साधारण अंदाज बांधता आला. त्यावरून काढलेले निष्कर्ष काही बरोबर तर काही चूक ठरले. पण ही प्रोसेस मात्र मजेशीर होती.

प्रत्येकाने आपापली ओळख करून द्यायची होती ओळख करून देतानाच हिमालयातील पुर्वानुभावाबद्दल सांगायचे होते. १७ पैकी ९ जण लडाख मेरेथोन मधे भाग घेणार होते मी धरून दोन जन अल्ट्रा मध्ये तर बाकीचे सर्वच्या सर्व हाफ मध्ये भाग घेणार होते. त्या दिवशी ब्रीफिंग अतिशय व्यवस्थित देण्यात आले. शंका समाधान देखील करण्यात आले. बरोबर काय घ्यायचे काय नाही, कसे वागायचे कसे नाही. अशा सर्व गोष्टींची उजळणी झाली. त्या सगळ्यांमध्ये प्रोपर ट्रेक न केलेला मीच एकटा होतो सगळ्यांना त्यांचा ट्रेक-अनुभव सांगायला सांगण्यात आले. अर्थात मी कैलास मानसरोवर ला जावून आलो असल्याकारणाने १८००० फुटावरच्या दोन खिंडी पार केल्यामुळे मला ह्या ट्रेकला यायची परवानगी मिळाली होती. अन्यथा नुकत्याच झालेल्या एका अपघाताच्या पार्श्वभूमीवर हिमालयाकरता नवख्या असणाऱ्या माणसांना परवानगी नाकारण्यात येत होती. लागणाऱ्या सर्व गोष्टी घेतल्या जातानाच सामानाचे वजन फार वाढून आपल्याला न झेपणारे होणार नाही याची काळजी घेणे ही एक कसरतच होती. जास्तीचे सामान त्याच हॉटेलात ठेवायची सोय होती. सौरभ ने दिलेल्या सल्ल्यानुसार माझे सामान आश्चर्यकारकरित्या एका Day Pack मध्ये मावले.

मग आम्ही रात्रीच्या जेवणाकरता बाहेर पडलो जेवण ब्लू लोटस मधे घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता निघायचे होते. लवकर जेऊन परत यावे आणि मग पॅकिंग करून लवकर निजावे हा विचार होता. पण परत येत असताना अमन आणि निखील भेटले आणि आम्हा सगळ्यांनाच त्यांच्या हॉटेलवर घेऊन गेले. वाढदिवस साजरा व्हायचाच होता. केक न आणता त्यानी गुलाबजाम आणि त्यावर ड्रायफ्रूटची सजावट करून आणली होती. मला गुलाबजाम भरवून सगळ्यांनी कोरस मधे हैप्पी बर्थडे म्हणून दिवसाच्या अखेरीस वाढदिवस साजरा केलाच.

१ सप्टेंबर २०१७

आम्ही आजही सकाळी लवकर आटोपून जर्मन बेकरीत जावून न्याहारी करून आलो. ठीक ९ वाजता आमची गँग तयार होती. स्टोक गावाकडे जाण्याकरता मारुती ओमनी गाड्या होत्या त्यामुळे ५-६ जण एकेका गाडीतून जायचे होते. आम्ही सगळे तयार असल्याने रिधिका सौरभ विवेक नितीन आणि मी असे आम्ही सर्वात आधी निघालो आणि पोचलो देखील. वाटेत आम्हाला सिंधू नदी वरील पुलावरून जावे लागले. बहुतेक सर्वानी आपापल्या घरी शेवटचा फोन करून घेतला. निसर्गरम्य परिसरातल्या रस्त्यांवरून जाताना कधी स्टोक गावात पोचलो तेच कळले नाही. बाकी सगळे पोहोचेपर्यंत इकडे तिकडे करत वेळ घालवला. मग सगळे आल्यावर ट्रेक लिडरने परत एकदा काय करावे काय करू नये याची उजळणी
करून घेतली. ट्रेक लीडर, गाईड कूक त्यांचे मदतनीस असे मिळून TTH ची १२ तरी माणसे होती आम्हा १७ जणांच्या तैनातीला. ज्या कोणाला आपले अतिरिक्त किंवा सगळे सामान स्वत: न्यायचे नसेल तर त्यांच्याकरता खेचरांची सोय होती. आमच्यातले ३-४ जण ह्या सुविधेचा अतिरिक्त पैसे भरून लाभ घेणारे होते. त्यांचे आणि किचनचे सामान खेचरांवर लादण्याचे काम पूर्ण व्हायला जरा वेळच लागला. बहुतेक ते पूर्ण व्हायच्या आधीच आम्ही निघालो. आम्ही सुरुवात केली ते ठिकाण (स्टोक गाव) समुद्रसपाटीपासून ३५०० मी उंचीवर आहे तर पहिला मुक्काम जिथे करायचा होता ते 'चांग मा' साधारण ४००० मी उंचीवर आहे. तिथे पोहोचण्याकरता आम्हाला साडेपाच अंतर किमी पार करायचे होते. पहिलाच दिवस असल्याने सगळे उत्साहात होते. ट्रेक लीडर जरा नाही चालले की थांबतोय, थांबे जरा जास्तच होताहेत असे आमचे मत पडले. पण मग कळले की किचन आणि डायनिंगचे तंबू पुढे जाउन ते उभारले जाउन जेवण तयार व्हायला वेळ लागणार. त्यामुळे मुद्दामच असा वेळ लावणे चालू आहे. तसेही पहिलाच दिवस असल्याने एखादवेळी आम्ही सगळे जोरात होतो. पण मग लागू दे पोचायला वेळ असे म्हणून आम्हीही रमतगमत मार्गक्रमणा करू लागलो. पण मग जेव्हा आम्ही आमच्या काम्प सिएट साईटवर पोचलो तेव्हा आभाळ भरून येवून पाउस पडायला सुरु होत होता. चालणे थांबल्यामुळे अचानक थंडी वाजायला लागली होती. तंबू आपापला उभारायचा आवरायचा होता आणि दोघात एक असा मिळणार होता. मी आणि सौरभ दोघांनी तंबूतही बरोबर राहायचे असे लेह मधेच ठरवले होते. आम्हाला तंबू उभारायचा होता.

माझी तंबू उभारायची पहिलीच खेप. व्यवस्थित चुका करत करत आम्ही तंबू उभारला आणि मग आमचे सामान आत आणून ठेवले. अजूनही कोणाकोणाचे तंबू उभारण्याचे काम चालूच होते. त्यांना जमेल तशी मदत केली. सगळे तंबू व्यवस्थित वाटरप्रूफ होते. आता सगळ्यांचेच तंबू उभारून झाले. कितीही वाटले, काहीही झाले तरी दिवसा झोप घेउ नये अशी सक्त ताकीद मिळाली असल्याकारणाने डायनिंग तंबूत टंगळमंगळ करत बसलो असतानाच जरा वेळाने जेवण लावले गेले. जेवण मस्त होते. जेवण झाल्यावर सुस्ती आली होती तरी झोपायचे नाही म्हणून सगळे डायनिंग तंबूतच बसून राहिलो. पाउस पडतच होता असेच वातावरण राहिले तर पुढे किती जड जाईल असा विचार करून नाही म्हटले तरी जरा घाबरायला झाले. तीन थर चढवूनही मला गार वाटत होतं. पण नंतर सगळे जेवणाच्या तंबूत एकत्र जमून अंताक्षरी खेळायला सुरुवात केल्यावर वेळ चांगला गेला. नंतर एका परिस्थितीजन्य विनोद निर्मिती मुळे आम्ही सगळे जे काही हसत सुटलो की किचन तंबूतून ट्रेक लीडर बघायला आले काय झाले आम्हालाही सांगा म्हणून. ट्रेक लीडर च्या म्हणण्यानुसार असे हसणे किमान तिसऱ्या चौथ्या दिवशी ऐकायला मिळते म्हणजे ३-४ दिवस गेले की गृप जमून येतो आम्ही ते काम पहिल्याच दिवशी केले. त्या पहिल्याच दिवशी आम्ही सगळेच्या सगळे असे मिक्स झालो होतो आणि हसत खिदळत होतो की बरसोकी पेहेचान हो. असा हास्यविनोदाचा माहौल जमून आल्यावर थंडी पळालीच. काही वेळाने पाउसही थांबला. बराच वेळ तंबूत बसल्यावर कंटाळाही आला होता. मग आम्हाला आमच्या ट्रेक लीडरने वातावरणा चा सराव व्हावा म्हणून walk वर नेले. पायवाटही नसलेल्या डोंगरावर उभा चढ चढून जाताना वाट लागली पण ह्यामागे भूमिका अशी असते की ज्या उंचीवर रात्र काढायची त्यापेक्षा अजून उंचावर (जिथे हवा अजून विरळ असते) जावून आले की मुक्कामाच्या ठिकाणी रहाण्याकरता आपण अधिक सक्षम /तयार होतो. त्यामुळे दररोज आमच्याकडून असं सराव चालणे करवून घेतले गेले. तो उभा चढ संपल्यावर एक उतार होता आणि जरा सपाट अशी जागा होती इथूनच पुढे जायचा रस्ता देखील होता. तिकडे एक दगडांचा ढीग आणि त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या तिबेटी पताका असलेली जागा होती. लडाख मध्ये बरेच ठिकाणी अशा जागा पहायला मिळतात. त्या पताकांवर प्रार्थना लिहिलेल्या असतात आणि एका उडत्या घोड्याचे चित्र असते, तो घोडा आपल्या प्रार्थना स्वर्गातील देवांपर्यंत पोहोचवतो अशी धारणा आहे. तिकडे कोणत्याशा प्राण्याची शिंगे देखील असतात. का ते माहित नाही. आमच्या पैकी काही जणांनी ती शिंगे स्वतच्या डोक्यावर ठेउन फोटो काढून घेतले. तो परिसरच एकदम मस्त होता आणि कुठे जायची घाई नव्हती त्यामुळे इतरही अनेक फोटो तिकडे काढले. तिकडची अजून एक गंमत म्हणजे तिकडच्या डोंगरावर फोनला रेंज होती त्यामुळे आमचे काही ट्रेक लीडर आणि गाईड्स झरझर वर चढून फोनवर बोलत बसले होते. मग आमच्यापैकी काही जणांनी पण घरी फोन करून घेतला.

परत आल्यावर गरमागरम चहा मिळाला. चहा झाल्यावर आमची सगळ्यांची वैद्यकीय तपासणी होणार होती. पहिलाच दिवस असल्याने सगळ्यांना उत्सुकता होती की नक्की काय असणार. तर ती वैद्यकीय तपासणी म्हणजे प्रत्येकाचे पल्स आणि ऑक्सिजन चे प्रमाण मोजणे. त्याच्यातही कोणाचे प्रमाण जास्त निघाले ते सुटले आणि कोणाचे कमी निघाले त्यांना घरी पाठवले असे काही झाले नाही. ऑक्सिजन कमी निघालेल्यांना जरा फेरी मारून, हातावर हात चोळून हात गरम करून या असे सांगण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे त्यांचे नंतरचे रीडिंग मापात बसले. माझे रीडिंग व्यवस्थित निघाले असले तरी एकंदरीतच त्या मोजणी बाबत मला फार विश्वासार्ह वाटले नाही. त्यानंतर तंबूत न जाता असेच टंगळमंगळ करून वेळ घालवला. रात्रीचे जेवण करून मगच तंबूत शिरलो आणि झोपी गेलो.

२ सप्टेंबर २०१७

आमच्या ट्रेकमधे इथून पुढच्या दिवसात ज्याचे पालन नियमितपणे होणार होते तो ७, ८, ९ चा नियम आजपासून चालू झाला. हा नियम म्हणजे ७ वाजता चहा, ८ वाजता नाष्टा आणि ९ वाजता पुढच्या वाटचालीला सुरुवात करायची प्रवासाला निघायचे. खरेतर सातला चहा आल्यावर उठलो असतो तरी चालले असते पण नेहेमीच्या सवयीने लवकरच जाग आली. सौरभ देखील उठला होता मग मी बघत होतो की तोंड धुवायला /दात घासायला गरम पाणी वगैरे मिळतंय का तर ते फक्त बेस कॅम्प वर पोचल्यावरच मिळेल असे सांगण्यात आले. सौरभ म्हणाला गार पाणीच वापरायचे आहे तर भरून ठेवलेले पाणी कशाला वापरतोस, इतका भरभरून ओढा वाहतोय तो कोणासाठी मग म्हटले होउन जाउद्या. त्याच्या सांगण्यानुसार त्या बर्फाळ थंडगार वाहत्या पाण्याचा वापर करून तोंड धुतले दात घासले आणि खोटे वाटेल पण थंडी पळून गेली. नाही म्हणायला पहिल्यांदा हात गारठले पण ते तितकेच. मला थंडी सोबत / वातावरणाशी कसे जुळवून घ्यायचे त्याचे अजूनही काही धडे मिळाले. एकदम फ्रेश वाटू लागले त्यामुळे मग आन्हिके आटोपून परत तंबूत जायच्या ऐवजी इकडे तिकडे फिरत होतो. मग चहा प्यायला आणि अजून तरतरी आली. मी एरवी अजिबात चहा पीत नाही पण ट्रेकमधे मात्र आवर्जून पितो. मग आपापले सामान आवरणे, स्लीपिंग bag तिच्या कव्हर मधे कोंबणे, तंबूची घडी घालणे ई सगळे कामी करून जायला सज्ज झालो. हे सर्व नीटपणे कसे करावे हे सौरभ कडून चांगल्या प्रकारे शिकायला मिळाले. मग रोजच असे आटोपण्यात, सगळ्यात आघाडीवर आम्हीच असू. त्यादिवशी केवळ साडेतीन किमी चालत जावून मनकोरमा येथे पुढचा मुक्काम ठोकायचा होता. मुक्काम ‘ठोकतात’ हे तंबूत रहात असल्याने चांगलेच समजले. सगळी वाट पाण्याच्या कडेकडेने होती. वाटेत एक मस्त मोठा दगड होता जिकडे आम्ही सर्वानीच फोटोसेशन केले.

IMG_20170902_101455.jpg

आम्ही मनकोरमा येथे पोहोचते झालो. आज पार केलेले अंतर होते साडेतीन किमी आणि गाठलेली उंची होती ४३२८ मी. त्याही दिवशी थोडा पाउस पडलाच. त्याही दिवशी पाउस थांबल्यावर आम्हाला वातावरणाच्या सरावाकरता चालवून आणलेच. आमच्यातल्या शैल नावाच्या मुलाला विरळ हवेचा त्रास होउ लागल्याने त्याने माघारी जायचे ठरवले ते वगळता फारशा लक्षणीय घडामोडी न घडता हा दिवस पार पडला.

३ ४, ५ सप्टेंबर २०१७

आज सकाळी ७ ८ ९ नुसार तयार होउन आम्ही बेसकॅम्पकडे चालू पडलो. त्याआधी आमच्यातल्या विनयसरांनी पण परत जायचे ठरवले त्यांना थंडीचा सर्दीचा बराच त्रास होत होता. आज चालायचे अंतर होते ४ किमी आणि उंची गाठणार होतो ४९०० मी. तिकडे पोचल्यावर मात्र आरामच आराम होता. अर्थात वातावरणाच्या सरावाकरता एक डोंगर चढून उतरणे झाल्यावर. तीन ची रात्र आणि चार तारखेचा दिवस घालवल्यावर चार तारखेच्या रात्री समिट करता निघायचे होते जेणेकरून पाच तारखेच्या पहाटे सूर्योदयाच्या सुमारास शिखर सर होईल आणि दुपारी परत. बेस काम्प ते बेस काम्प हे अंतर १४ किमी असणार होते तर शिखर सर केले असता गाठली जाणारी उंची होती ६१२० मी. म्हणजे ५ ला दुपारपर्यंत बेस काम्प वर परतल्यावर रात्रभर राहून ६ तारखेला सकाळी परतिचा प्रवास थेट खाली स्टोक गाव आणि लेह असा असणार होता.

स्टोक गाव सोडल्यापासून आम्हाला भेटलेल्या वरतून परत येणाऱ्या जवळ जवळ प्रत्येकाला आमच्यातल्या कोणी ना कोणी प्रश्न विचारले होते आणि मिळालेल्या उत्तरांचे सार होते की समिट होण्याचे प्रमाण हवामानामुळे फार कमी होते आणि ज्यांचे झाले त्या भारतीयांना लागलेला कमीतकमी वेळ १४ तास वगैरे होता १९ तास लावून समिट करून आलेले लोकही भेटले. बेस कॅम्प ते बेस कॅम्प हे अंतर १४ किमी ऐकताना कमी वाटू शकते पण त्या उंचीवर त्या वातावरणात १५० मी अंतर पार करायला देखील २ तास लागल्याची उदाहरणे ऐकायला मिळाली होती. खरेतर पहिला दिवस एकत्र घालवल्यानंतर सौरभ मला समिट करण्याकरता पटवण्यात यशस्वी झाला होता म्हणजे निदान प्रयत्न करावा, अजिबात करणार नाही असे म्हणू नये वगैरे. त्यामुळे मधे चार-पाच दिवस मलाही वाटत होते की शिखर सर करायचा प्रयत्न तरी करूया. माझे ते वाटणे जाउन आलेल्यांच्या कहाण्या ऐकताना डळमळीत व्हायला लागले. मुळात मुद्दा हा होता की परत आल्यावर रिकव्हरी करता वेळ अजिबातच नव्हता. लेह मधे ६ ला पोचले की मधे फक्त ७ तारीख होती आणि नंतर ८ ला खारदुंग गावाकडे रवाना व्हायचे होते. जेणेकरून ९ ला पहाटे ३ वाजता स्पर्धा चालू. आमच्या ट्रेक गृप मधे बंगलोर ची दीपा म्हणून होती ती देखील खारदुंग ला करणार होती, आम्ही दोघांनी बराच विचारविनिमय केला आणि ठरवले की आपण बेस कॅम्प वरच राहायचे. त्यामुळे समीट साठी जाणारी मंडळी उरली १३. त्यात ३ तारखेला सरावा करता डोंगर चढ-उतरून आल्यावर बर्फ पडायला सुरुवात झाली. ४ च्या सकाळी उठलो तेव्हा देखील सगळा परिसर पांढरा झाला होता. रिधिकाला देखील थोडा डोकेदुखीचा त्रास होत असल्याने तिनेही बेस कॅम्प वर राहण्याचा निर्णय घेतला. ५ तारखेला संध्याकाळी परत एकदा ब्रीफिंग देण्यात आले. गरज पडली असता कोणकोणती सुरक्षा साधने आणि उपकरणे आपल्याकडे उपलब्ध आहेत, ती कशी हाताळायची ई. माहिती देण्यात आली. मग रात्रीचे जेवण लवकरच झाले आणि त्यानंतर दीडतासा नंतर साधारण साडेनऊच्या सुमारास आम्ही तिघांनी त्या सगळ्यांना निरोप दिला. आम्ही तंबूत जाउन गप्पागोष्टी करत पडलोच होतो तोच प्राची परत आली. तिला उलटी झाली त्यामुळे अचानक तिला वाटायला लागले आपल्यामुळे सगळ्यांचा खोळंबा व्हायला नको म्हणून ती अगदी लगेचच परत आली. पण एकंदरीतच त्या रात्री ‘एकेक पान गळावया’ प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून एकेक मंडळी परत आली. कोणाला डोकेदुखी सुरु झाली, कोणाला उलटी झाली, कोणाला थंडी वाजून आली, कोणाचे पोट बिघडले. सरते शेवटी सकाळी उठल्यावर कळले की रितम आणि नितीन हे दोघे जण अजून परत आलेले नाहीत म्हणजे निदान त्यांचे तरी समीट होतंय असे दिसतंय.

ती दोघे परत यायची वाट न पाहता सौरभ, दीपा, ज्यू. विनय, सचिन ई. काही जणांनी खाली जाण्याचा निर्णय घेतला आणि ते ५ ता. च्या सकाळीच खाली निघून गेले. मी मात्र तिथेच राहायचं निर्णय कायम ठेवला. आणि खाली जाणाऱ्या लोकांना टाटा केल्यावर आम्ही तिथल्या कॅफे मधे जायचे ठरवले तोच आमच्या ट्रेक लीडरने मला Advanced बेस कॅम्प पर्यंत जायचे आहे का विचारले आणि सोबत म्हणून एक माणूस दिला. Advanced बेस कॅम्प म्हणे काल जो डोंगर चढून गेलो होतो त्याच्या पुढे ३-४ किमी वर होता. काही झाले तरी हिमनदीच्या आधीच थांबायचे अशी सक्त ताकीद देउनच मला सोडण्यात आले. पण पुढे असे झाले की तो डोंगर चढताच आमचे दोघेही वीर परत येताना दिसले. व्यवस्थित होते दोघेही अर्थात दमले होते पण तब्येतीकडून चांगले होते. मला तर असा आनंद झाला की जणू मीच समिट केले त्यांच्या तोंडून सगळी हकीकत ऐकली आणि मी देखील खाली यायचे ठरवले. मी जोरात पुढे येउन कॅफेत बसलेल्या आमच्या मित्रांना त्या दोघांच्या आगमनाची बातमी कळवली. दोघे सुखरूप परत आल्यामुळे अर्थातच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. आमच्या मागच्या बॅच मधल्या एकाही माणसाला शिखर सर करता आले नव्हते. आमच्यातल्या निदान दोघांनी तरी शिखर सर केले. मग पुढचे दोन तास त्यांच्या गोष्टी ऐकण्यात घालवला दोघेही रात्र भर झोपले नव्हते आणि प्रचंड दमले होते त्यामुळे त्यांना खायला घालून तंबूत झोपायला पाठवले.

चांग मा, मनकोरमा आणि बेस कॅम्प तीनही ठिकाणी कॅफे चालवण्याचा ठेका मित्रा नावाच्या माणसाला दिलेला होता. तीनही ठिकाणी हे कॅफे म्हणजे वेगवेगळ्या लोकांना भेटायचा अड्डाच होता. कोणकोण कुठून कुठून कसे कसे त्याठिकाणी जमले होते ते पाहून मौज वाटत होती. काही गृपने आले होते, काही दुकडी-तिकडीने तर काही अगदी एकटेच आले होते.

स्टोक गावातून आमच्याच बरोबर निघून तसेच वेळापत्रक असलेली एक तिकडी होती दोन मुले आणि एक मुलगी. जी आम्हाला रोज दिसत होती. त्यातल्या एका मुलाला आमच्या प्राचीने ओळखले. तो मुलगा होता अर्जुन वाजपेयी. एव्हरेस्ट शिखर सर करणारा सगळ्यात लहान वयाचा मुलगा म्हणून त्याच्या नावावर रेकोर्ड आहे. त्याने सतरावे लागायच्या आत हा पराक्रम केला आहे. त्यानंतरही त्याने अनेक शिखरे सर केली आहेत. मला त्याचे नाव ऐकून हो हे आधी ऐकल्यासारखे वाटतेय असे झाले. पण ते प्राचीने त्याला चेहऱ्याने ओळखून झाल्यावर. पण ती स्वत: मात्र त्याच्याशी भिडेखातर बोलली नाही. मग आम्ही तिला त्यावरून खूप चिडवून घेतले. तर बेस कॅम्प वरच्या कॅफेत एकदा तो ही भेटला आणि सहजपणे संभाषणात सामील झाला. मी पुण्याचा हे कळताच काय त्याचा चेहरा खुललाय म्हणून सांगू. त्याची आई पुण्याची आहे. त्याचे नाना नानी अजूनही पुण्यातच रहातात. त्याने फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला होता आणि बहुतेक जेमतेम एक वर्ष काढले. मग त्याला पहाडाचे बोलावणे आल्यावर हा पूर्ण वेळ गिर्यारोहक बनलाय. तो गृप ना वेगवेगळ्या मोहिमांवर घेउन जातो. असे सगळे कळले. तो माझ्याशी मोडके-तोडके का होईना मराठीतून बोलला. आणि त्या सगळ्यावर कडी म्हणजे पुण्यापासून हजारो मैल दूर, १६००० फुटावर हिमालयाच्या कुशीत त्या मुलाने पुण्यातल्या आवडत्या गोष्टी म्हणून कोणत्या गोष्टी आठवाव्या, चितळेंची बाकरवडी, आंबा बर्फी, लक्ष्मी-नारायण चिवडा, कयानीची श्रुसबेरी बिस्किटे... देवा नारायणा त्या क्षणी मला जे काही वाटलंय ते शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे.

असो.

तर अशा रीतीने आमचा हिमालयातला मुक्काम संपायची रात्र आलीच. सौरभ गेला असल्याने मी तंबूतही एकटाच होतो. जेवताना गप्पा मारताना नाही म्हटले तरी एक उदास लहर जाणवत होती. निम्मी मंडळी आधीच खाली गेली होती. ट्रेक संपायचा दिवस जवळ आला होता.

IMG_20170906_075633.jpg
त्यातल्या त्यात दिलासादायक एक गोष्ट होती की ७-८ जण हाफ मॅरेथॉनमधे धावणार असल्याने आम्ही लेहमधे अजूनही भेटणार होतो.
एकदम जाणीव झाली अरे हो आपल्यालाही खारदुंग ला धावायचे आहे की Happy

भाग तिसरा – मुक्काम लेह, अल्ट्रा मॅरेथॉनची पुर्वतयारी
https://www.maayboli.com/node/64109

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद पराग, maitreyee आणि मित

पराग, मित
फोटो पण टाकायचे होय, लिखाण पुर्ण झाले की मग नंतर टाकतो आता. खटाटोप आहे तो मोठाच.

फोटो न टाकने हा फाऊल धरण्यात येत आहे.. पुढच्या लेखात लेखा बरोबरच फोटो आले पाहिजेत.. लिहिलंय एकदम मस्त.. स्वतःच तिथे जाऊन आल्यासारखं वाटतय.. आणि अतिशय नॉस्टॅलजिक होतय... शांतीस्तूप, राजवाडा आम्ही पण असेच बाईक वरुन फिरुन केले होते.

कॅमेरा नेला नव्हता, फोटो मोबाईलवरून काढलेत.
ते इकडे टाकायकरता बरेच सव्यापसव्य करावे लागत असल्याने वेळ लागत आहे.