स्वतःच्या शोधाची कथा: कासव

Submitted by अमेय२८०८०७ on 30 September, 2017 - 14:18

जूनमध्ये कोल्हापूरला गेलो असताना 'कासव' चित्रपटाचा खास आयोजित खेळ बघता आला, एरवी - महाराष्ट्राबाहेर असल्याने- नेटवर उपलब्ध नसतील तर बरेच अव्यावसायिक अथवा कलात्मक वळणाचे चित्रपट बघायचे राहून जातात.

कासव हा तसा विलक्षण प्राणी. ससा आणि कासव शर्यतीच्या आणि बडबड्या कासवाच्या गोष्टीमुळे लहानपणीपासून कासवाबद्दल ऐकले असते. तसे हे दिसाय वागायला गंभीर प्रवृत्तीचे. त्याचे कवच, संथ गती, दीर्घायुष्य सर्वच विलक्षण.

कासवांच्या दीर्घायुष्यातील सर्वात परीक्षेचा काळ कदाचित जन्मापासूनच्या पहिल्या काही दिवसांचा. आई अंडी घालून निघून गेली असते, किनाऱ्यावरून समुद्राच्या लाटांशी सामना करत इवली कासवे जन्माच्या संघर्षाची सुरुवात करतात.

याच रुपकाची मदत घेऊन 'मानव' नावाच्या अडनिड्या वयातील मुलाच्या आणि वैवाहिक नात्यातील अपयशामुळे आयुष्य नव्याने सुरू करणाऱ्या 'जानकी' नावाच्या मध्यमवयीन स्त्रीच्या अंतर्गत कल्लोळाची कथा सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने 'कासव' चित्रपटातून कमालीच्या संवेदनशीलतेने मांडली आहे.

मानव (आलोक राजवाडे) आणि जानकी (इरावती हर्षे) ही दोन्ही प्रमुख पात्रे आपापल्या आयुष्याचे अर्थ समजून घ्यायला झगडणारी. मानवचे वय लहान, अनुभव कमी तर जानकी मध्यमवयात आलेल्या स्थित्यंतराने बावरलेली. तिच्यात निदान मानसोपचार करवून सावरण्याचा शहाणपणा तरी आहे पण परिस्थिती हताश मानवला जीवन-मरणाच्या कड्यावर आणून सोडते.

कोकणात व्यवसायाचा भाग म्हणून कासवांच्या पालनाविषयी माहिती मिळवण्यासाठी निघालेल्या जानकीला भरकटकलेला मानव अचानक सापडतो. त्याची समस्या जाणून नसली तरीही निदान त्याला स्वत्व सापडेल, उभारी मिळेल इतपत मदत करावी या हेतूने ड्रायव्हर यदु (किशोर कदम) शंकित असतानाही जानकी त्याला सोबत घेऊन कोकणात येते. पुढचा चित्रपट म्हणजे या दोघांना आपापले मर्म उमगण्याच्या संघर्षाचा प्रवास आहे.

कथा प्रामुख्याने घडते ते देवगडजवळील समुद्रकिनाऱ्यावरचे घर ही एक आगळी वास्तू आहे. कोल्हापूरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी साकारलेली ही इमारत चित्रपटातील पात्र असावे अशा तऱ्हेने दिग्दर्शकाने तिचा वापर केला आहे. वेगवेगळ्या लेव्हल्सवर भाग असणाऱ्या या घराच्या, त्याच्या समुद्राभिमुख अंगणाचा संवाद आणि दृश्यात केलेला प्रभावी उपयोग चित्रपटाची उंची कमाल वाढवतो.

काही तोडलेले, दुखावलेले जुळून यायचे तर वेळ हवा, आत्मपरीक्षण हवे, सल्लाही हवा आणि सभोवती सकारात्मकता हवी. मानव आणि जानकी दोघांनाही या गोष्टी कशा मिळतात आणि मानवला पुन्हा सक्षम करण्याचे जानकीचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात हे बघताना गुंगून जायला होते. चित्रणाचे कोन, दृश्यमिश्रण, कथेच्या पार्श्वभूमीवरील कासव संवर्धनाची कथा विचारांना चालना देतात.

आलोक राजवाडे आणि इरावती हर्षेच्या अभिनयाला किशोर कदम, कासव संवर्धक 'दत्ताभाऊ' झालेले मोहन आगाशे आणि इतर सहकलाकारांनी समर्थ साथ दिली आहे. इरावती हर्षे फार पूर्वी शांती की स्वाभिमान सीरियलमध्ये ओझरती बघितली होती. आलोक राजवाडे मात्र पहिल्यांदाच पाहिला.

संकट आले की कवचात जाणे, मिटून घेणे हाही कासवाचा गुण, पण माणसे असे करून यशस्वी होऊ शकत नाहीत. संवाद एक मूलभूत गरज आहे, हेसुद्धा दिग्दर्शकांना सांगायचे असावे. चित्रपटाचा डोलारा पटकथेवर उभा असतो. गाजलेल्या कथा कादंबऱ्यांवरचे चित्रपट फसतात आणि मजबूत पटकथा असेल तर एका परिच्छेदाची गोष्टही प्रभाव पाडते. सुमित्रा भावेंनी घेतलेली मेहेनत समीक्षकांच्या पसंतीस उतरली आहेच, आता व्यावसायिक यशही लाभावे म्हणजे असे अर्थपूर्ण चित्रपट बनवू पाहणाऱ्यांना उभारी मिळेल.

लवकरच व्यावसायिकरित्या प्रदर्शित होत असल्याने कथेतील बारकावे आणि इतर गोष्टी अर्थातच विस्ताराने लिहिता येत नाहीत. मात्र सशक्त पटकथा, अभिनय आणि चित्रीकरण या तिन्ही गोष्टींचा दर्जा भारतीय नव्हे तर जागतिक स्तरावरही उठून दिसेल इतका चांगला आहे, हा विश्वास ठेवून चित्रपट पाहायला जा, निराशा होणार नाही, इतके नक्की सांगतो.

-- अमेय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांचे, खूप जणांनी लिहिलंय आता या चित्रपटाविषयी. मला वाटतं एका चित्रपटाविषयक इतके वेगवेगळे लेख प्रथमच आले असतील.

अरे वा मस्त लिहिलंय, (मी आत्ता वाचलं)

कथा प्रामुख्याने घडते ते देवगडजवळील समुद्रकिनाऱ्यावरचे घर ही एक आगळी वास्तू आहे. कोल्हापूरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी साकारलेली ही इमारत चित्रपटातील पात्र असावे अशा तऱ्हेने दिग्दर्शकाने तिचा वापर केला आहे. वेगवेगळ्या लेव्हल्सवर भाग असणाऱ्या या घराच्या, त्याच्या समुद्राभिमुख अंगणाचा संवाद आणि दृश्यात केलेला प्रभावी उपयोग चित्रपटाची उंची कमाल वाढवतो.
+१

मला वाटतं एका चित्रपटाविषयक इतके वेगवेगळे लेख प्रथमच आले असतील. +१

आणि असे लिहावेसे वाटणे हे ही चित्रपट चांगला असल्याचे निदर्शकच