धपाटा

Submitted by विद्या भुतकर on 18 September, 2017 - 21:56

ती घरी आली. दमलेली, वैतागलेली.

तो: काय गं? काय झालं?

ती: तेच नाटक रे पुन्हा. कितीही काम केलं तरी पुरे होत नाहीच.

तो: जाऊ दे तू नको विचार करुस. जे काही आहे ते सरळ सांगून टाकायचं.

ती: ह्म्म्म... पण मग उगाच बाऊ होतो त्याचा. त्यापेक्षा सोडून देते.

तो: मी काय म्हणतो, तू मेलच कर मॅनेजरला सरळ. सगळं ऑफिशियल असलेलं बरं असतं. म्हणजे उद्या कुणी
विचारलं तरी तुझ्याकडे पुरावा राहील.

ती: बघते. काहीतरी करायलाच लागेल पण. नाहीतर हे असं घरावरही परिणाम होतो त्याचा. उगाच चिडचिड होते मग.

तो: हो. तुला ना ब्लॉक करायला जमत नाही. बाहेरचं काम बाहेरच सोडून यायचं. डोक्यात, मनात ठेवून यायचं नाही बघ.

ती: करते अरे प्रयत्न पण नाही जमत. जाऊ दे चल जरा स्वयंपाकाचं बघू.

तो: काय करायचं?

ती: करू रे काहीतरी....

तो: मी कांदा चिरायला घेतो.

ती: हम्म घे.

तो: किती घेऊ?

तो: काय?

ती: अगं कुठे लक्ष आहे? कांदे किती चिरायचे आहेत?

ती: अरे बघ ना तू. चार लोकांच्या भाजीला किती लागतात?

तो: बरं, दोन घेतोय. कसा चिरू?

ती:....

तो: टोमॅटो हवेत का? दोन चालतील?

ती: घे रे किती पाहिजे तितके. मला नको विचारूस. इथे एकतर वैताग आलाय त्यात तुझे प्रश्न. काही नको विचारूस.

तो: हे बघ हे असं असतं. तुला जरा ऑफिसात त्रास झाला की हे असे वाद सुरु होतात.

ती: अरे नाहीये माझं लक्ष तर तू बघ ना जरा. सगळं मीच पाहिलं का? एक दिवस तू स्वतः ठरव ना काय करायचं ?

तो: तुला ना काही बोलण्यात अर्थच नाहीये.

मना: बाबा, हे गणित सांगा ना कसं करायचं?
बाबा SSSSS बाबा SSSSS सांगा ना?

तो: (ओरडून) काय आहे? कालच सांगितलंय तुला? किती वेळा तेच तेच गणित सांगायचं? तुझं तू कर ना जरा? आणि हे काय? पेन्सिल नीट धर. किती वेळा तेच तेच सांगू?

ती: काय गं? डबा तसाच आणलास परत? काही अर्थ नाहीये या पोरांसाठी खपण्यात. सकाळ-सकाळी मी उठून डबा करून देते आणि ही पोरं असं सगळं न खाता आणतात.
(त्याला उद्देशून) अरे बघ ना जरा ती काय विचारतेय. आता त्यालाही मीच उत्तर देऊ का?

तो: दिलंय उत्तर मी तिला. तू कशाला आता माझ्यावर चिडतेयस?

मना: आई, मी टीव्ही लावू का?

ती आणि तो: ना SSSSSS ही !!

तरीही मनीने टीव्ही लावला आणि तिला धपाटा बसला ........

हिरमुसून ती निघून गेली....रडत रडत..

तिला अजूनही कळत नव्हतं, ऑफिस असो की घर, कशावरूनही आई-बाबा भांडतात तेंव्हा आपल्याला धपाटा कसा बसतो?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Same here Lol

छान!

छान लिहीलंय, नेहेमीप्रमाणेच! आणि धपाटा वास्तव आहे. Lol
ताई एक टायपो आहे,
>>>
तो: किती घेऊ?
*तो: काय?
*ती: अगं कुठे लक्ष आहे? कांदे किती चिरायचे आहेत?
ती: अरे बघ ना तू. चार लोकांच्या भाजीला किती लागतात? >>>
(*) चिन्हांकित संवादकर्त्याचा क्रम बदल

"तिला अजूनही कळत नव्हतं, ऑफिस असो की घर, कशावरूनही आई-बाबा भांडतात तेंव्हा आपल्याला धपाटा कसा बसतो? "
नेहमीप्रमानेच मस्त.

कोणताही राग मुलांवर काढणे अयोग्यच हे समजत असूनही कधी कधी रागाने इतका ताबा घेतलेला असतो की तो राग हमखास मुलांवरच निघतो. नंतर प्रचंड वाइट वाटते पण त्याचा काहीच उपयोग नसतो Sad

आवडला लेख. पण हे वास्तव नाही आवडले. लॉग ईन लॉग आऊट व्हायला जमायलाच हवे. लोकं फेसबूक व्हॉटसपवर भांडतात आणि त्याचा रागही घरी काढतात असेही पाहिलेत. नकारात्मक गोष्टी तरी तिथल्या तिथेच ठेवता यायला हव्यात. पोरांवर राग काढणे हे तर ते सॉफ्ट टारगेट असल्याने जमते. तेच मुलाच्या जागी सासूबाई असत्या तर तसाच राग निघाला असता का, तर नाही. तर तेच पोरांच्या बाबतीतही जमाल हवे. निदान प्रयत्न तरी तसा व्हायला हवा. अर्थात हे कधीतरी घडत असेल तिथे ठिक आहे, पण जिथे वरचेवर घडत असेल तिथे बालमनावर विपरीत परीणाम होणे सहज शक्य असते. लेख हलकाफुलका असला तरी विषय मला हा गंभीर वाटतो. चूकभूलदेणेघेणे !

वेगळंच काही तरी निघालं हे..
मी कांदा टोमॅटो चिरुन झाले आता पीठ घालून टोमॅटो ऑमलेट/ धपाटा कसं नवरा बायको मिळून केला आणि कांदा म्हणजे बायकोचा राग आणि टोमॅटो म्हणजे समजुतदार नवरा एकमेकांत मिसळले की कसे चविष्ट होतात असलं काही तरी गोडगुलाबी असेल असं समजून वाचत होतो. Biggrin

अमितव>> :))
पोरांवर राग काढणे हे तर ते सॉफ्ट टारगेट असल्याने जमते. >> Exactly.
कोणताही राग मुलांवर काढणे अयोग्यच हे समजत असूनही कधी कधी रागाने इतका ताबा घेतलेला असतो की तो राग हमखास मुलांवरच निघतो. नंतर प्रचंड वाइट वाटते पण त्याचा काहीच उपयोग नसतो >>
म्हणून्च हा लेख लिहिला. हे असे होतय कळल्यावर काल घरी येतनाच ठरवून आले होते की ते होऊ द्याय्चे नाही. त्यामुळे थोडावेळ रंगकाम करत बसले. मुलांना सांगितलेही की आज बरे वाटत नाहीये प्लिज त्रास देऊ नका. Happy That helped. Happy जे ठरवले आहे ते जमल्यावरच ही पोस्ट इथे टाकली. माझ्यासारख्या अनेकांना जाणिव झाली तरी त्यावर प्रयत्न केली जातईल म्हणुन. Happy

सर्वांचे आभार.
विद्या.

लोक फेसबूक व्हॉटसपवर भांडतात >>>>>> Rofl त्यापेक्षा मायबोलीवर तुफान भांडतात, अगदी एकमेकांच्या अकला काढुन भांडतात.

लेख आवडला. वास्तव आहे हे. लहान मुलांवर राग काढु नये पण बिचारे तेच तावडीत सापडतात असहाय असल्याने.

मस्त लेख नेहमीप्रमाणे

बाकी मी खुप नशिबी आहे या बाबतीत कधीच एकही धपाटा नाही खाल्ला.

ऊलट कधि कधी माझ्यामुळेच वाद व्हायचे मम्मी पप्पांचे

लॉग ईन लॉग आऊट व्हायला जमायलाच हवे. >> हे खरेय
मी जेव्हा रागावलेले असते, तेव्हा मुलांच्या बाबतीत जास्त सावध होते. चुकूनही अनाठायी राग त्यांच्यावर किंवा कोणा दुसर्‍यावर निघू नये याची काळजी घेते. अशा वेळी काही काम काढून करत बसणे जास्त चांगले!

पोरांवर राग काढणे हे तर ते सॉफ्ट टारगेट असल्याने जमते.
पण बिचारे तेच तावडीत सापडतात असहाय असल्याने. >>>> अगदीच पटले. तसे होऊ नये म्हणून प्रयत्न करणे जरूरी आहे.

मुलांना सांगितलेही की आज बरे वाटत नाहीये प्लिज त्रास देऊ नका. - विद्या
अशा वेळी काही काम काढून करत बसणे जास्त चांगले! - विनिता
>>>>
हे दोन्ही उपाय चांगले आहेत. प्रयत्नपूर्वक वापरले तर कामात येतील. लक्षात ठेवतो.

तसेच माझे मुलांना मारण्याबाबत वा त्यांनी घाबरावे असे मोठ्याने ओरडण्याबाबत बेसिक कन्सेप्ट क्लीअर आहेत. मी याच्या टोटली ओपोजिट आहे. अस काही मी ईतरवेळीही कधीच करत नसणार त्यामुळे रागाच्या भरातही पटकन व्ह्यायची शक्यता त्याच तुलनेत कमी असेल. स्पेशली मारणे, मुलांवर हात चुकूनही उगारू नये, तशी वेळ आल्यास ते आपलेच अपयश समजावे.. असो पण हा जरा वेगळाच विषय झाला.. आधीही चर्चा झालीय यावर बरीच, पुन्हा नको Happy

तसेच माझे मुलांना मारण्याबाबत वा त्यांनी घाबरावे असे मोठ्याने ओरडण्याबाबत बेसिक कन्सेप्ट क्लीअर आहेत. मी याच्या टोटली ओपोजिट आहे. अस काही मी ईतरवेळीही कधीच करत नसणार त्यामुळे रागाच्या भरातही पटकन व्ह्यायची शक्यता त्याच तुलनेत कमी असेल. स्पेशली मारणे, मुलांवर हात चुकूनही उगारू नये, तशी वेळ आल्यास ते आपलेच अपयश समजावे.. असो पण हा जरा वेगळाच विषय झाला.. आधीही चर्चा झालीय यावर बरीच, पुन्हा नको Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 20 September, 2017 - 22:03
ऋ भाऊ तुमच्या गफ्रेचे लग्न व्हायचे आहे ना? Lol
पण चांगले आहे तुमचे बेसिक फंडा क्लिअर आहेत.

वेगळंच काही तरी निघालं हे..
मी कांदा टोमॅटो चिरुन झाले आता पीठ घालून टोमॅटो ऑमलेट/ धपाटा कसं नवरा बायको मिळून केला आणि कांदा म्हणजे बायकोचा राग आणि टोमॅटो म्हणजे समजुतदार नवरा एकमेकांत मिसळले की कसे चविष्ट होतात असलं काही तरी गोडगुलाबी असेल असं समजून वाचत होतो. Biggrin >> मीपण Happy