संघर्ष : भाग ०२

Submitted by दिपक ०५ on 13 September, 2017 - 12:25

भाग ०१
https://www.maayboli.com/node/63852

भाग०१ पासून पुढे.

राधा घाईघाईने खाली उतरून लगेच घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षात बसली तिने रिक्षा चालकाला पत्ता सांगितला तिचे डोळे अजूनही डबडबलेले होते. तोच राधाचं लक्ष आपल्या मोबाईलकडे गेलं अनिकेतचा फोन होता. खरंतर राधा त्यावेळी कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नव्हती तरी तिने एक मोठ्ठा श्वास घेऊन फोन कानाला लावला.
‘हॅलो.’ दबक्या आवाजात राधा म्हणाली.
‘हॅलो राधा. अगं न्युज वरती हे काय दाखवतायेतं आनंदची कार..’
अनिकेतचं वाक्य तोडत भरून आलेल्या गळ्याने राधा बोलली.
‘आनंद गेले अनिकेत, आनंद गेले..’ इतकं बोलून राधा रडू लागली इन्स्पेकटरच्या आलेल्या फोन नंतर राधा पहिल्यांदाच इतकं मनमोकळ करून रडली होती. तीनं झालेला सगळा प्रकार अनिकेतच्या कानी घातला. अनिकेतला पुढे काय बोलावं काहीच सुचत नव्हतं अडखळत्या शब्दाने तो म्हणाला.
‘ राधा, तू आधी शांत हो.. मी येतोय.. काही काळजी करू नकोस मी., मी येतोय’ इतकं बोलून अनिकेतने फोन कट केला आणि लगेच सागरला फोन लावला व सगळी स्थिती समजावली. सागर प्रीतीला घेऊन पुलिस स्टेशनकडे निघाला.
( सागर, प्रीती, अनिकेत, आनंद आणि राधा सगळे एकत्र वाढलेले होते. शाळेत ओळख झाली हायस्कूलमध्ये मैत्री आणि कॉलेजमधे पक्की मैत्री. कॉलेजमधे या पाच जणांचा ग्रुप खूपच गाजला त्यांच्याबद्दल संपूर्ण कॉलेजभर चर्चा होत. अशात आनंद आणि राधा एकमेकांच्या प्रेमात पडले आधी घरच्यांनी विरोध केला पण शेवटी ‘मिया बिवी राजी, तो क्या करेगा काजी’ अशातली गत झाली. घरच्यांनी दोघांचं लग्न लावून दिलं त्या ग्रुप मधील तसं हे पहिलंच लग्न होतं. आणि हळूहळू सागर आणि प्रितीचे धागे जुळत होते. राहिला अनिकेत. अनिकेत हा खूप प्रेमळ व शांत स्वभावाचा अगदी सगळ्यांवर जीव लावणारा. ग्रुप मधील सगळी भांडणं मिटवायचं व सगळ्यांना शांत करून त्यांची समजूत काढायचं काम अनिकेतचं होतं सगळ्यांचा एकमेकांवर अतूट विश्वास व कोणत्याही परस्थितीमधे साथ देण्याची जिद्द होती. आनंद व राधाच्या लग्नात सर्वांनी खूप धमाल केली. लग्नाच्या दोनच महिन्यांत आनंदचा असा अचानक मृत्यू बघून सर्वांना एक मोठ्ठा धक्का बसला होता यातून वर येणं सर्वांसाठीच एक मोठं आवाहन होतं. आणि त्याहूनही जास्त ही एक सुरुवात होती..
‘संघर्षाची’ )

(वेळ : दुपारी ०१ वा.)

आपली गाडी पार्क करून अनिकेत गडबडीने पोलीस स्टेशनच्या आत शिरला. राधा एका कोपऱ्यातील बाकावर डोळ्यातून पाणी गाळत बसली होती सागर आणि प्रीती तिच्या शेजारी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते अनिकेत तिच्या समोर जाऊन थांबला तशी राधाने नजर वर करून पाहिलं अनिकेतचे डोळे पाणावले होते राधाने उठून अनिकेतला मिठी घातली व ती अनिकेतचा खांदा ओला करू लागली.. रडताना हुंदके देत राधा बोलत होती
‘माझ्या आनंदला मारलं अनिकेत.. काय दोष होता त्यांचा?’ राधाच्या या प्रश्नाचं कोणाकडेच उत्तर नव्हतं. डोक्याला हात लावून बसलेला सागर उठून उभा झाला आल्यापासून तो कोणाशीही एक शब्दही बोलला नव्हता त्याने राधाच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलला
‘राधा जे घडलंय त्यात चुकी कोणाचीही नाहीये. तुला असं धीर सोडून चालणार नाही. शेवटी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण जे गमावलंय ते परत मिळण शक्य नाही’.. सागरच्या बोलण्यात आपुलकीचा रस तर होता पण त्यातील गोडवा मिसिंग आहे हे अनिकेतच्या लक्षात आलं.
प्रितीने राधाला पाण्याची बॉटल दिली राधाने पाण्याचे दोनच घोट पिले असतील इतक्यात इन्स्पेकटर राने तेथे आले त्यांना बघून चौघेही सावध झाले इन्स्पेकटर रानेंनी आता पर्यंत झालेली कारवाई सविस्तर सांगितली
‘बॉडी पोस्ट मोेर्टम साठी पाठवली आहे आम्ही केलेल्या छानबिनेवरून इतकं सांगता येईल की आनंद घाटगे यांची गळ्यावर चाकूने वार करून हत्या करण्यात आली व त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आरोपी कुणी परिचीतचं असावा असा आम्हाला संशय आहे कारण गाडीमध्ये हातापाई किंवा जबरदस्तीचे काहीच पुरावे नाहीत.’
इन्स्पेकटरचं बोलणं ऐकून राधाची अवस्था आणखीनच बिघडत चालली होती इन्स्पेकटरने प्रितीला राधाला बाहेर घेऊन जाण्यास सांगितलं आणि सागर व अनिकेतशी त्यांच बोलणं चालू होतं..
काहीवेळाने दोघंही बाहेर आले प्रिती राधाला धरून बसली होती सागर आणि अनिकेत राधा जवळ आले काही क्षण शांततेत गेले शेवटी राधा बोलली
‘काय बोलतायेत इन्स्पेकटर?. कुणी मारलं आनंदला’ इतकं बोलून राधा पुन्हा रडू लागली अनिकेतच्या लक्षात आलं राधाला सगळं सांगण्याची ही योग्य वेळ नाहीये तो काही क्षण मौन राहिला आणि बोलला
‘काही नाही, ते पोस्ट मोर्टमची रिपोर्ट आल्यावरच काय आहे ते पक्क सांगता येईल म्हणतायेत. आता आपण निघुया..’ प्रिती राधाला घेऊन अनिकेतच्या कारमधे बसली अनिकेतने गाडी स्टार्ट केली तसा सागर आत येऊन बसला. गाडीत एक विचित्रशी शांतता पसरली होती कोणीही कोणाशी एकही शब्द बोलत नव्हतं. चौघांच्याही डोक्यात फक्त एकच विचार खटकत होता.
आनंद सारख्या माणसाची कोण हत्या करेल? आणि का? इन्स्पेकटरचे शब्द सर्वांच्या मनामधे फिरत होते डायरेक्टली किंवा इन् डायरेक्टली चौघही संशयाच्या घेऱ्यात होते.

क्रमशः.......

Group content visibility: 
Use group defaults

‘माझ्या आनंदला मारलं अनिकेत.. काय दोष होता त्यांचा?’ >>>>>> पण इन्स्पेक्टरने तर फक्त बॉडी सापडलीय अस सांगितलेल ना.
तिला कस कळालं कुणीतरी मारलयं ते !

छान फ्लो आहे.
लेखनात चुका आहेत,