STY - ये विल है मुश्किल (ढूँढना)

Submitted by संयोजक on 21 August, 2017 - 13:52

ये विल है मुश्किल (ढूँढना)

सुंदरनगर… समुद्रसपाटीपासून ० फूट उंचीवर वसलेले गाव जे एक सफरचंदाच्या बागा असलेले हिल स्टेशनसुद्धा होते, तिथे बीजी राहत होती. हो आता ‘होती’च म्हणायला हवे कारण बीजी अब इस दुनियामें नही है.. दहा दिवसांपूर्वीच बीजी देवाघरी गेली. पण आता हयात नसलेल्या या बीजीबद्दल आपण का बोलतोय?

थोडं भूतकाळात जाऊ. सुंदरनगरात सगळ्यांत मोठी टी-शेप हवेली असलेले रुद्रप्रताप सिंह ठाकूर म्हणजे बीजीचे सासरे.. टी फॉर ठाकूर. म्हणून हवेली पण टी शेप होती शिवाय त्यांच्या टी इस्टेट्स पण होत्या. या सर्व बिझनेसमुळे ते चांगलेच खानदानी रईस झाले होते. त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलासाठी अवघ्या सोळा वर्षांच्या बीजीला पसंत केले व वयाच्या अठराव्या वर्षी बीजी लग्न होऊन सुंदरनगरात आली. अर्थात बीजी तेव्हा वेगळ्या नावाने ओळखली जात असे पण बीजीचे खरे नाव तिलासुद्धा चटकन आठवले नसते, इतके ‘बीजी’पण आता तिच्यात भिनले होते. बीजीची तरुणपणाची वर्षे मेकअप, वेणीफणी, घरसंसार, रसोई, करवाचौथ, मुलेबाळे यात बीजी आपलं… बिझी गेली होती. बीजीला सात मुले होती. चार मुलगे आणि तीन मुली! त्यांचीही लग्ने होऊन भरपूर नातवंडे आणि एका नातवंडाने लग्नाची व नंतरही भलतीच घाई केल्याने एक पणतू एवढा प्रचंड परिवार बीजीला लाभला होता. खेरीज जवळपास पन्नासेक वर्षे सुंदरनगरातच काढल्याने बीजीच्या पंचक्रोशीतही ओळखी खूप होत्या. हिवाळा ऋतू येताच ठाकुरांच्या सफरचंदाच्या बागेतून टोपली टोपली सफरचंदे शेजारपाजाऱ्यांकडे ऍपल पाय करण्यासाठी धाडली जात. चहासाठी दूध हवे, म्हणून रिकामा कप घेऊन कुणी शेजारीण आल्यास बीजी थेट आपली गाय तिच्या अंगणात नेऊन बांधत असे. (गायीचा चारा खायचा अफाट वेग पाहून शेजारीण अर्ध्या तासात गायीला बीजीकडे पुन्हा आणून सोडत असे, हा भाग वेगळा.) एकदा ‘साखर देता का थोडी?’ असे विचारत आलेल्या शेजारणीला बीजीने डायरेक्ट उसाच्या मळ्यात धाडले होते. अशा विधायक कामांमुळे बीजी पंचक्रोशीत ‘परोपकारी बीजी’ म्हणून प्रसिद्ध होती.

बीजीचा नवरा रुद्रप्रताप सिंह ठाकुरांचा धाकटा मुलगा हे आपण पाहिलंच. मग ठाकुरांचा मोठा मुलगा व त्याचं कुटुंब कुठे होतं? तर बीजीच्या लग्नाआधीच ठाकुरांचा थोरला मुलगा बॅगेत कपडे आणि डोक्यात राख घालून घेऊन त्याच्या बायकोसकट बाहेर पडला होता. कुणी म्हणे तो कॅनडाला स्थायिक झालाय, कुणी म्हणायचे लंडनला राहतो, कुणी म्हणायचे तो मादागास्करमध्ये राहतो. तात्पुरत्या भांडणामुळे घर सोडून गेला तरी त्याचे कुटुंबावर खूप प्रेम होते म्हणे! जाताना तो माँ बाऊजींचा एक मोठा फोटो घेऊन गेला होता. त्या फोटोपुढे त्याची बायको रोज भक्तिभावाने धूप जाळत असावी, कारण रोज एका विशिष्ट वेळेला रुद्रप्रताप सिंह ठाकूर आणि मिसेस रुद्रप्रताप यांना जोरदार ठसका लागत असे. दोघांनाही धुपाची ऍलर्जी होती. दहाएक वर्षे तो ठसका सहन करून अखेर त्या दोघांनी डोळे मिटले. मोठ्या मुलाच्या कुटुंबाचा काहीच कॉन्टॅक्ट नसल्याने त्यांनी सगळी इस्टेट आपली मनोभावे सेवा करणाऱ्या बीजीच्या नावे केली.

मुले मोठी होऊन मार्गाला लागल्यावर बीजीने घरची इस्टेट वाढवण्यात लक्ष घातले. गावात असलेल्या एकुलत्या एक बँकेत पैसे मावेनात, इतकं प्रचंड उत्पन्न बीजीने सफरचंदाच्या एका बागेतून मिळवून दाखवलं. हे सारं होईपर्यंत बीजी पन्नाशीपलिकडे पोचली होती. तेव्हाच धाकट्या ठाकुरांचंही निधन झाल्याने बीजीच्या आयुष्यात मिड लाईफ क्रायसिस सुरू झाला. आणि सुरू झाली तिची कुणाच्याही नावे मृत्युपत्र उर्फ विल करायची सवय! दर दहा पंधरा दिवसांनी विल बदलायचा तिला छंद लागला. सुंदरनगरातल्या एकमेव वकिलाने बीजीने दर विलबदलाच्या वेळी दिलेल्या फीमधून प्रशस्त बंगला बांधला. नंतर गाडीसुद्धा घेतली.

… आता बीजी सत्तरी पार करून पंचाहत्तरीकडे निघाली होती. सगळ्या कामातून आता तिने निवृत्ती घेतली असली तरी विल बनवण्याचा छंद तसाच होता. दर दहा पंधरा दिवसांनी बीजी तिला आवडेल त्या व्यक्तीच्या नावे सारी इस्टेट करून ठेवत असे. बाकीच्या नातेवाईकांना आधी विलाबद्दल बरीच उत्सुकता असायची, पण ते रुटीन झाल्यावर त्यांनी त्याकडे लक्ष देणं सोडून दिलं होतं.

जानेवारीतली अशीच एक निवांत संध्याकाळ होती. बीजी अंगणात टीव्ही पाहत बसली होती. बंगल्यासमोरच्या प्रशस्त हिरवळीवर नुकतीच एक बंजाऱ्यांची टोळी येऊन उतरली होती. संध्याकाळी ते ‘बंजारा नॉनस्टॉप २४ धमाका गीते’ ही कॅसेट लावून त्यावर नाचाचा कार्यक्रम करत असत. तोच आत्ताही चालू होता. नाचता नाचता मुख्य बंजारा जोडीतल्या त्या हिरव्या डोळ्यांच्या मुलाने बीजीकडे कटाक्ष टाकला आणि योगायोगाने बीजीचेही लक्ष त्याच्याकडे गेले. बीजीला जबरदस्त धक्का बसला व तिने जग सोडले. बीजीच्या नातलगांना मात्र मुख्य धक्का त्यानंतर काही तासांनी बसला. जेव्हा त्यांना कळले की, बीजीचे लेटेस्ट विल आणि ते बनवणारा वकील दोघेही गायब आहेत. बीजीच्या नातलगांच्या पायाखालची वाळूच सरकली त्या बातमीने आणि सुरू झाला शोध..

बीजीच्या लेटेस्ट विलाचा!

नियमावली:
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हहपुवा गोष्ट आहे.
कोणी लिहीत असाल तर इथे रुमाल ठेवा. (माझा रुमाल असे लिहा)

जेव्हा त्यांना कळले की, बीजीचे लेटेस्ट विल आणि ते बनवणारा वकील दोघेही गायब आहेत. बीजीच्या नातलगांच्या पायाखालची वाळूच सरकली त्या बातमीने आणि सुरू झाला शोध..
बीजीच्या लेटेस्ट विलाचा! >>
अर्थात हा शोध नातलगांना काही नवीन न्हवता. पण याच वेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला दोन महत्त्वाची कारणं होती. पाहिलं म्हणजे यावेळी ते विल बनवणारा वकील आणि ते विल या दोनच गोष्टी गायब झाल्या होत्या. बीजी त्या प्रशस्त अंगणातल्या प्रशस्त रॉकिंग चेअर मध्ये याची देही याची डोळा उपस्थित होती. याची डोळा म्हणजे ती अनेकदा डोळा लागला की मरायचं नाटक करायची तर यावेळी तिचे डोळे चांगले टक्क उघडे होते. बीजी काही हालचाल करत नाहीये म्हणजे काही तरी झालंय याचं गांभीर्य आचरणात आणायच्या आधी ज्या आजूबाजूच्या लोकांना बिजीच्या धाकामुळे तिच्या डोळ्यात डोळे घालून बघता आलं न्हवते त्यांनी ते घालून घेतले. मग कोणीतरी बीजीच्या डोळ्यात डोळे घातलेला सेल्फीची टूम काढली, मग ते सुरु झालं.
तर ते सेल्फी पुराण होतंय तो पर्यंत पायाखालची वाळू सरकण्याचं दुसरं कारण सांगतो. ते म्हणजे बीजीचे जवळचे नातलग आज संध्याकाळी त्या समुद्रसपाटीवरच्या हिलस्टेशनच्या बीच वर गेले होते. तिच्या चार मुलांना वाळूचा किल्ला बनवायचा छंद होता आणि उरलेल्या तीन मुलीना समुद्रावर भेळ खायचा. बीजीचे नातेवाईक त्या समुद्रसपाटीवरच्या हिल स्टेशनवरील बीच वर फक्त संध्याकाळीचा जात, सकाळी बीच वर कधीच कोणी जात नसे. बीजी मरायचं नाटक नेहेमी सकाळी करायची. त्यामुळे सकाळी बीच वर गेलं आणि बीजी मेली ऐकलं की पायाखालची वाळू सरकवणं आलं. अशाने त्या समुद्रसपाटीवरच्या हिल स्टेशनवरची वाळू सरकून सरकून अगदीच समुद्र खपाटीला... आपलं सपाटीला आली होती. त्यामुळे समुद्र किल्ले आणि समुद्र स्नान आणि भेळपान संध्याकाळीच उरकावं लागायचं त्यांना. तर आज संध्याकाळी 'बातमी' आली आणि पायाखालची वाळू घळा घळा आणि डोळ्यातले अश्रू पण घळा घळा अनुक्रमे सरकली आणि घसरले.

जरा सावरल्यावर सगळ्यांनाच प्रसंगाचे गांभीर्य कळले. मग आउटपोस्टावरून डॉक्टरला बोलवायला अर्जुनाला पाठवला... अर्जुनाला कशाला पाठवला? कंडम माणूस असा डायलॉग मारलाच प्रथेप्रमाणे कोणीतरी. डॉक्टरनी टाईम ऑफ डेथ सेव्हन पीएम म्हणून बीजीला मृत घोषित केले. बीजी जरी वारंवार मृत्युपत्र बदलत असायची तरी प्रत्येक मृत्युपत्रात पहिली कंडीशन कायम असायची की माझ्या मृत्युपत्राचे वाचन केल्याशिवाय माझे अंत्यसंस्कार करू नका. त्यामुळे विल शोधण्याची पळापळ सुरु झाली. एक विल घरात आणि एक वकिलाकडे असणार असं वाटल्याने आधी वकिलाला गाठावे असा विचार करून मंडळी वकिलाच्या ऑफिस मध्ये आली.

गावातले हे वकील महाशय म्हणजे बडं प्रस्थ होतं पूर्वी म्हणजे भाड्याच्या घरात रहात असताना त्याचं गावात एक बारीकस ऑफिस होतं पण आता चांगला टोलेजंग बंगला झाल्याने होम ऑफिस थाटून बसले होते ते. पण ऑफिसला ही टाळे आणि बंगल्यात ही शुकशुकाट. बरं बंगला गावा बाहेर असल्याने कोणाला विचारावं तर आजू बाजूला किर्र झाडी. नाही म्हणायला वकील साहेबांची एकुलती एक गाडी बंगल्याच्या आवारात होती आणि आता वकील साहेबांचा कुत्रा ऑफिस मधून माणसांचे आवाज आल्याने जोर जोरात भुंकू लागला होता. हा नेहेमी मेल्यासारखा पडलेला कुत्रा भूकुही शकतो बघून परत लोकांनी फक्त सेल्फीच नाही तर ते भुंकणे रेकॉर्ड करायलाही सुरुवात केली. ऑफिस आणि घर वाजवून वाजवून कोणी उत्तर देईना बघून मंडळी आता घरातलं विल शोधुया म्हणून घरी निघाली.

वकिलाकडे जाताना बीजीला त्या प्रशस्त बागेतील त्या प्रशस्त रॉकिंग चेअरवरून तिच्या खोलीत हलवले होते आणि तिच्या खोलीचे दारही बंद करून घेतले होते. त्या दाराच्या जे कुलुप लावले होते ते खानदानी ठाकूर घराण्याचे कुलूप होते आणि अर्थात टी शेप मध्ये होते. त्याची एक किल्ली बीजीच्या कमरेला आणि दुसरी मोठ्या मुलाकडे असणे ही खानदान की इज्जत होती. घरात मोजून दोन नोकर आणि धाकटी बहिण थांबले होते. बाकी सगळे वकिलाकडे गेले होते. परत आल्यावर मोठा भाऊ जो तालुक्याच्या गावी पुलिस इन्स्पेक्टर होता तो एकदा खोलीत जाऊन बीजीला बघून आला. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं, एक जड भेसूर शांतता.. पण खोलीत कुणीच न्हवते. बीजीचे डोळे मात्र आता बंद झाले होते. कसे बंद झाले? कोणी केले का? असं त्या भावाने त्या दोन नोकरांना विचारले पण कुणीच केले नाहीत म्हणाले. आज रात्रीत विल सापडलं नाही तर बीजीचा मृतदेह मॉर्ग मध्ये हलवणे आवश्यक होते, पण तशी सुविधा त्या गावात न्हवती.

आता एवढ्या मोठ्या हवेलीत सगळ्यात शेवटच्या विलचा शोध घायचा कसा? आणि सुरुवात कुठून करायची हे ठरवायला सगळे एकत्र जमले. बीजीच्या खोली पासून शोध सुरु करावा असं ठरलं. सुरुवातिचा शोध सर्वांनी मिळून करू.. मग मिळत नसेल तर मग कामं वाटून घेऊ असं ठरलं आणि चार भाऊ आणि तीन बहिणी त्या खोलीकडे निघाले. मोठ्याभावाने दार उघडले आणि दिवा लावला. आज का कोण जाणे दिवा फ्लिकर करत होता, मधल्या भावाला एकदम आठवले बीजी खोलीतला दिवा बदल म्हणून मागे लागली होती पण आपण तिची ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही.... तेव्हा नाही तर आत्ता तरी करूम्हणून त्याने बाहेरून एक नवा दिवा लावला. तो एक दोन मिनिटे नीट चालला असेल तर पुन्हा फ्लिकर करू लागला...
आणि त्याच वेळेला बाहेरच्या हिरावळी वरून गाणं ऐकू येऊ लागलं....
कोई मुझको यु मिलादे ... जैसे बंजारे को घर... जैसे बंजारे को घर.

संयोजक, हहपुवा आहे बीजीची स्टोरी.
आज सगळे बीजी आयमीन बिझी असणार बाप्पामधे म्हणुन इथे विल शोधायला येत नाहीयेत. उद्यापासुन धमाल येइल.

सगळ्यांनी खिडकीकडे धाव घेतली,
हवेलीच्या प्रशस्त हिरवळीवर धुके दाटले होते,
आणि एक सावली त्या धुक्यावर फिरताना दिसली,
आता काय अघटित घडणार याची सगळ्यांनाच भिती वाटली,
मोठ्या भावाने आपणे सर्विस रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि खिडकीतून उडी मारून तो हिरवळीवर आला,
बाकीची जनता दरवाज्याकडे धावली,
हवेलीच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना गोळीबाराचा आवाज आणि एक दीर्घ किंचाळी ऐकू आली,
ती रहस्यमय व्यक्ती मेली असे समजून अर्धी जनता खुश झाली, तर आपला भाऊ गचकला आता इस्टेटीत एक वाटा कमी असे वाटून उरलेली अर्धी जनता खुश झाली,

पण हिरवळीवर जाऊन पाहतात तर काय
थोरला भाऊ डोक्यावर मोठ्ठे टेंगुळ घेऊन सुन्न बसला होता,
त्याच्या हातात ठाकूर परिवाराचे परंपरागत चिन्ह असलेला एक फोल्डर होते,
खूप प्रयत्नानन्तर त्याला बोलते केले तेव्हा समजलेली गोष्ट अशी,....
त्याने सावली पाहून अंदाजाने गोळी चालवली, सावली गायब झाली, आणि एका क्षणात त्याच्या डोक्यावर जबरदस्त फटका पडला, बंजारा वेशातील एक तरुण हातात फोल्डर आणि एक फाईल घेऊन त्याच्या मागे उभा होता,
त्याचा पूर्ण चेहरा झाकला होता, मात्र त्याचे डोळे......काळजाचा ठाव घेत होते.... हे हिरवे कंच डोळे कुठेतरी पाहिल्याची जाणीव भावाच्या मनात जागी झाली,
पुढे होऊन त्याने फोल्डर आणि फाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला,
पण तो 25 शीचा तरुण फारच चपळ आणि बळकट होता,
फाईल घेऊन तो निसटला, मात्र फोल्डर हिरवळीवर पडले.

त्या फोल्डर मध्ये काय आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती,
ते फोल्डर उघडले आणि सगळ्यांना धक्का बसला.....
त्या फोल्डर मध्ये बाबा आणि एका बंजारा बाईंचा फोटो होता.
ती बंजारन बाबांकडे बघत हिरव्या डोळ्यातून हसत होती.

जनू फाईल घेऊन पळाला तो सरळ टी हवेलीच्या कंपाउंड वॉलवर चढून पलीकडे उडी टाकून उत्तरेकडे निघाला. त्याच्या डोळ्यासमोर काही जुन्या गोष्टी सिनेमाप्रमाणे दिसू लागल्या.

भिंतीबाहेर बंजाऱ्यांचे एक वेगळेच गरीब जग होते. तंबू थाटून छावणी असल्याप्रमाणे बरेच लोक तिथे रहात होते. तिथले धोके, तिथले व्यवहारच वेगळे होते. जनू लहानपणीच बाहेरून येऊन त्या टोळीचा आता म्होरक्या झाला होता. तो मिश्किल डोळ्यांचा, कोरलेली दाढी ठेवणारा तरणाबांड तरुण पाहून टोळीतल्या आणि टोळीबाहेरच्या लहानथोर बायका त्याच्यावर जीव टाकत होत्या.

जनूला आपला मुलगा मानणारा टोळीचा जुना म्होरक्या नेडू सातारे आता या जगात राहिला नव्हता. पण त्याचा एक पोलिओ झालेला पण डोक्याने हुशार मुलगा बंडू, भोळी पण शिवण टिपण करण्यात हुशार असणारी मोठी मुलगी सारजा आणि धाकटी जनूची लाडकी असणारी मारामाऱ्या करणारी, भांडखोर आलिया ह्या मुलांना जनू जणू आपली सख्खी भावंडंच मानायचा. काही दिवसांपूर्वीच जनूबरोबर सूत जुळलेली यमाई बिचारी स्वाइन फ्लूच्या हल्ल्यात मरून गेली होती. जनू तिच्या दुःखात सैरभैर होऊन "लगी आज सावन की फिर वो झडी है, वही आग सीने मे फिर जल पडी हैss" गात गात चाकूला धार लावत बसला होता.

त्याचवेळी..

टी हवेलीमध्ये बिजींची सगळ्यात धाकटी मुलगी, तरुण वयातच विधवा होऊन दुःखाने केस पांढरे झालेली दिपशिखा, आपल्या तीन पाळीव पोपटाना पेरूचे घास भरवत टी हवेलीवर राज्य करण्याचे मनसुबे आखत होती. पण तेव्हाच खालच्या मजल्यावर तिची भावजय म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर महेश याची पत्नी शाकिनी हीदेखील एका कुटील कारस्थानात मग्न होती. तिने फोन करून आपला जुळा भाऊ जयराम याला तात्काळ टी हवेलीवर बोलावले होते. दोघे मिळून काय खेळी खेळणार, दिपशिखा काय चाल चालणार याचा अजून कुणालाच पत्ता नव्हता..

तेव्हाच..
बंदूकीची गोळी चुकवून एक माणूस बिजीच्या खोलीतून पळाला. माणसे बिजीचे बंद डोळे पाहून चक्रावून खोलीबाहेर पडली आणि..

बिजीने आपल्या जडावलेल्या पापण्या हळूहळू उघडल्या तेव्हा तिचे डोळे निळेभोर झाले होते.

तिचे डोळे निळेभोर झाले होते. >> काळ्याभोर डोळ्यांच्या बीजीचे डोळे आता निळेभोर झाले होते. ती हळूच तिच्या पलंगावरून उठली. दरवाजाकडे चालत चालत यायला लागली. तिचे डोके ठणकत होते आणि चक्रावल्यासारखे झालेले होते. तिला काही कळत नव्हते की काय घडते आहे. इकडे दिवाणखान्यात सगळे कुटुंबिय चिंता करत बसले होते. त्यांची आपापसात खुसरफुसर चालू होती. हळूहळू आवाज वाढायला लागला होता. आणि तेवढ्यात बिजीचे दरवाजा उघडला. तो आवाज ऐकून सगळ्यांचे लक्ष दरवाज्याकडे गेले. आणि सर्व बडबड बंद झाली. पण दरवाज्यात निळ्या डोळ्यांची बिजी पाहून दिपशिखाने एक हंबरडा फोडला आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली.

बिजी सगळ्यांकडे पाहून भेसूर हसली. तिला तसं हसताना पाहूनच सगळ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. बिजी शांतपणे एका विचित्रच आवाजात म्हणाली, 'वकीलांना बोलवा, मला नवीन विल करायचं आहे'. हे ऐकून लोकांचा मगाशी झाला नसेल तेवढा थरकाप उडाला. आता बिजी नेमकं कोणाच्या नावानं विल करणार या कल्पनेनं. एक मुलगा हळूच पुटपुटला "पण वकील तर गायब आहे. ते ही विलसकट'. पण हे पुटपुटणं काही बिजीने कानावर घेतलं नाही. ती तशीच एकटक सगळ्यांकडे बघत उभी राहिली आणि म्हणाली, "वकील कुठे आहे? त्याला ताबडतोब बोलवा, नाहीतर एकेकाला बेदखलच करून टाकेन". तेवढ्यात आतून पोपटांचे बोल ऐकू आले -

माणसं गायब होण्याचं सुरू झालं सत्र
आता कशी म्हातारे, करशील मृत्युपत्र
रंग ज्याच्या डोळ्यांचा आमच्यासारखा हिरवा
हे कोडं सोडवायला आता त्यालाच बोलवा

आता काय करायचे ह्याचा विचार करायच्या आधीच बिजी शांतपणे दीपशिखा च्या तीन पोपटांकडे गेली नि खूर्चीवर शांत बसून तिने आपले डोळे बंद करून घेतले. तीला शांत बसलेले पाहून लोकांनी हुश्श केले. (काही पब्लिक ने एक दोन सेल्फी with डोळे मिटलेल्या बिजी बरोबर काढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले. )

लोकांनी तोवर बेशुद्ध पडलेल्या दीपशिखा कडे मोर्चा वळवला. दीपशिखा ला शुद्ध आणण्यासाठी सगळ्यांची एक धांदल उडाली. कोणी पाणी मारतय, कोणी वहाण लावतय, कोणी डॉक्टरला फोन लावला.कोणी गूगल करून उपाय शोधायला लागले. (मधल्या मधे कोणी तरी एक दोन सेल्फी with बेशुद्ध दीपशिखा काढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले.)

सगळे ह्या धांदलीत असताना बिजीने दीपशिखा च्या तीन पैकी एका पोपटाचा ताबा घेतला होता. इथे सगळ्यांच्या परीश्र्माला यश येऊन दीपशिखा शुद्धीवर आली. आल्यावर तिने पहिला प्रश्न विचारला "मै कहां हू ? " (उत्तर द्यायच्या आधी लगेच पब्लिक ने एक दोन सेल्फी with शुद्धीवर आलेल्या दीपशिखा बरोबर काढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले.)

तेव्हढ्यात दीपशिखा चे लक्ष बिजी च्या हातातल्या पोपटाकडे गेले. पोपटाने आपल्या जडावलेल्या पापण्या हळूहळू उघडल्या तेव्हा त्याचे डोळे पण निळेभोर झाले होते. ते पाहून दिपशिखाने एक हंबरडा फोडला आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली.

(मधे पब्लिक ने एक दोन सेल्फी with निळे डोळे झालेल्या पोपटाबरोबरकाढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले.)

वकील सापडत नाही, बीजी निळे डोळे वटारून धमक्या देत आहे. अशा बाबतीत पेचप्रसंग निर्माण झाल्याने गावातील थोर लोकांकडे तो सोडवायला जायचे ठरले. नुकतेच निवृत्त होउन गावात राहायला आलेले जस्टिस चौधरी तेथे होते. त्यांच्या घरात गांधी, नेहरू व इतर अनेकांचे फोटो होते. तसेच शेल्फ मधे ती एकसारखी कव्हरे असलेली एकाच ग्रंथाचे खंड लावून ठेवल्यासारखी पुस्तके होती. किंवा तसे डेकोरेशन होते. टी फॅमिलीतले लोक व गावकरी तेथे गेले. तेव्हा पहिल्यांदा जस्टिस चौधरींनी "ये मेरा नही, इन्साफ का फैसला है. इन्साSSSSSफ का फैसला. भगवाSSSSSन का फैसला" गाणे म्हंटले.

ते झाल्यावर त्यांनी कायदेशीर मार्ग सांगितला. बीजी उपस्थित असेल तर आधीचे विल ओव्हरराइड करून टाकता येइल, त्यामुळे पुन्हा विल करायला तोच वकील शोधायची गरज नाही. मग गावात नवीन वकीलाची शोधाशोध सुरू झाली. दीपशिखाचा एक जुना मित्र (तिच्या लग्नात रडके गाणे म्ह्ण्टलेला, तोच तो) नुकताच सनद घेउन गावात आला होता. त्याच्याकडे हे काम दिले गेले. या विल मधे बीजी ने ज्यांचे डोळे निळे आहेत अशांनाच माझी इस्टेट मिळेल अशी तजवीज केली. मग तोपर्यंत निळे डोळे झालेले सगळे जण हवेली वर हिस्सा मागायला जमा झाले. तेव्हा दीपशिखा ने त्यांना बीजी मेल्यावर या म्हणून हाकलून लावले.

आता दीपशिखा विचार करू लागली की पुढे काय करायचे. तेवढ्यात मूळचा वकील त्यावेळची विल घेउन अचानक आला. त्यांनी सर्व कुटुंबाला मोठ्या डायनिंग टेबलावर बसवून विल वाचून दाखवली. त्यात अर्धी इस्टेट दीपशिखाला स्थायी रीतीने होती व बाकी अर्धी बीजीचा तात्कालिक फेवर ज्यांना असेल त्यांना. जुन्या वकीलांना बीजीच्या सवयी माहिती असल्याने त्यांनीच ही तजवीज तिला सुचवली होती. ते विल घेउन ते जस्टिस चौधरींकडे गेले. तिकडे निळे डोळे गँग प्रतिपक्ष म्हणून आणखी एक वकील घेउन गेले. यांच्या बाजूने तो नवीन वकील.

प्रतिपक्षाने बीजीचे नवीन विल दाखवले. त्यावरची तारीख व "हे विल आधीच्या सर्व विल्स ना ओव्हरराइड करते..." हा क्लॉज ही. त्यापेक्षा यांचे विल जुने होते. यावर जस्टिसजींनी एक मानवतापूर्ण संवाद म्हणून दाखवला. मला कळते आहे दीपशिखा च लायक आहे पण मी कायद्याबाहेर जाउ शकत नाही. इथे इन्साफ का फैसला गाणे सॅड रूपात परत वाजते. तोपर्यंत सगळे जण थांबले.

आता कठीण हृदयाने जस्टिसजी निकाल देणार.....

इतक्यात. "थांबा" म्हणून एक आवाज आला. पब्लिक पाह्ते तर कोर्टाच्या दारातून निळ्या डोळ्यांच्या बीजीला घेउन काही गायवाले येत होते. पूर्वी त्यांचे गवत बीजीच्या गायीने खाल्ल्याने ते या निकालाच्या बाबतीत फार उत्सुक होते. त्यांनी बीजीला कोर्टापुढे उभे केले व सांगितले की बघा हिचे डोळे निळे आहेत. म्हणजे ही ऑलरेडी मेलेली आहे. एकदा मेल्यानंतर पुन्हा विल बदलायची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे हे नवीन विल रद्द व्हायला हवे. जस्टिसजींनी यावर हनुवटीवर हात ठेवून भिंतीवरच्या थोर लोकांच्या तस्वीरींकडे एकदा बघितले. सगळ्या तस्वीरी बघून होईपर्यंत पडद्यावर तो डोळे बांधलेला व तराजू घेतलेला पुतळा दाखवला गेला. आणि त्यानंतर सारे काही उलगडल्याच्या आनंदात जस्टिस चौधरींनी निकाल दिला की हे नवीन विल लागू होउ शकत नाही. आणि अशा तर्‍हेने दीपशिखाला न्याय मिळाला.

मग बीजी "मी यावर हायकोर्टात जाईन" अशी धमकी देउन इतर निळ्या लोकांबरोबर निघून गेली "ये विल है... - २" ची तयारी करायला.

इकडे सगळे फायनल सीन ला घरी आल्यावर माफक हास्यविनोद सुरू असताना दीपशिखाने वकीलांना विचारले की तुम्ही कोठे गायब होतात व आत्ता कसे आलात? तर ते म्हंटले बीजी निळ्या डोळ्यांची झाल्यावर तिने मला विल सकट एका खोलीत बंदिस्त करून ठेवले होते. दार बाहेरून बंद करून टाकले होते. पण एक दोन दिवस विचार केल्यावर मला अचानक काहीतरी आठवले. मी विल जेथे ठेवले होते तेथे गेलो. विल हातात घेउन एका भिंतीला हात लावला, तर तेथून रस्ता तयार झाला.

आता उपस्थित सर्वांच्या चेहर्‍यावर एकापाठोपाठ एक प्रश्नचिन्हे. मग शेवटी दीपशिखाने विचारले. अहो पण हे कसे झाले?

"कारण, where there is a will, there is a way!"

फा Lol
मला वाटलं आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुटणार आणि तिचेही डोळे निळे आहेत असं लक्षात येणार Proud

मला वाटलं आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुटणार आणि तिचेही डोळे निळे आहेत असं लक्षात येणार >>> हे सही होते Happy अ‍ॅड करायला हवे कोणीतरी याभोवती रचून.

धमाल चालली आहे. यावरुन रियल लाईफ मधला किस्सा आठवला. सिंगापुर चे फाऊडिंग फादर लि कॉन यु यानी पण सात विल रजिस्ट्र्रर केल्या होत्या, आठवी विल करुन ठेवली होती पण ती रजिस्ट्र्रर करायचा आधीच दोन वर्षापुर्वी त्याचा म्रुत्यु झाला. आणि मग त्यांचा तीन मुला मध्ये (ज्यातिल एक विद्यमान पंतप्रधान आहेत) भरपुर भांडण झाली. मेन मुद्दा होता की सातवी विल लिगल आहे की आठवी. सगळ्यानी एकमेकावर फेसबुक, ट्विटर वर एकमेकावर बरिच चिखलफेक केली. त्यात एक मुलगा पंतप्रधान असल्याने सगळे मंत्री पण एकमेकावर सोशल मिडियावर तुटुन पडले होते. त्याबाबत पार्लिमेंट मध्ये एक खास सेशन पण आयोजित केले होते. मग तीन्ही मुलानी हा खाजगी प्रश्न आहे हे agree करुन पब्लिक डोमेन मधले भांडण थांबवले .. न्यायालयात बहुतेक केस चालु असेल. पण त्याबद्दल काही तपशिल बाहेर येत नाही.

Pages