विज्ञान - वाद नव्हे फक्त संवाद

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

प्रथम विज्ञानवादी ह्या संकेत-नामा खाली लिहिणार्‍या मायबोली-मित्रांना धन्यवाद व एक मोठा शाउट-आऊट विज्ञान विषय मायबोलीवर पुन्हा झोतात आणल्याबद्दल व वैयक्तिक, माझ्या विज्ञानविषयक विचारांची धूळ झटकायला उद्युक्त केल्याबद्दल. जिथे शक्य आहे तिथे संदर्भ (बाळबोध) दिलेले आहेत. बाकी ....

विज्ञान - तडक्या शिवाय

विज्ञाना संदर्भातील मूलभूत गृहीतके [] अशी आहेत

  • आपल्या सभोवतालचे भौतिक जग हे केवळ मनुष्य इंद्रिय-अनुभवा पलीकडे प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. म्हणजे ते 'माया' नाही.
  • जगात घडणाऱ्या भौतिक घटनांमागे इतर भौतिक/नैसर्गिक कारणेच आहेत आणि ती कारणे घडणार्‍या घटना समजून घ्यायला पुरेशी आहेत.
  • भौतिक जगत/निसर्ग हे अंतरीक्ष आणि काळ ह्या दोन्ही मितींमध्ये सारखेच काम करते.
  • मनुष्यप्राणी हे भौतिक जगत तंतोतंत बघू शकतात व समजू शकतात.

ह्या गृहीतकांच्या आधारावर हे भौतिक जग समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान. विज्ञानाचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे एका प्रकाराचे ज्ञान आहे ज्याला सोयी करता 'विज्ञान-शास्त्र' म्हणूयात आणि दुसरा भाग म्हणजे ते ज्ञान मिळवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे जिला 'विज्ञान-प्रक्रिया' म्हणूयात. विज्ञान-शास्त्र व विज्ञान-प्रक्रिया ह्या दोघांनाही काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत.

विज्ञान-शास्त्र लक्षणे

  1. सगळ्या विज्ञान-शास्त्राचे घटक हे स्वतः एक विज्ञान-शास्त्रच असतात.
  2. कोणतेही विज्ञान-शास्त्र त्याच्या घटक विज्ञान-शास्त्रा पासून दिलेल्या विज्ञान-प्रकियेने पुन्हा पुन्हा निर्माण करता येते.
  3. विज्ञान-प्रक्रिया व विज्ञान-शास्त्र-घटक हे त्यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या विज्ञान-शास्त्राची पूर्णपणे व्याख्या करतात.

विज्ञान-प्रक्रिया लक्षणे

  1. विज्ञान-शास्त्र-ध्येय, विज्ञान-शास्त्र प्रेरित प्रतिकृती, विज्ञान-शास्त्र-घटक, विज्ञान-शास्त्र प्रेरित अनुमान चाचण्या हे विज्ञान-प्रक्रियेचे घटक आहेत.
  2. विज्ञान प्रक्रिया ही साधारण तीन टप्प्यांची असते निरीक्षण-प्रतिकृती-अनुमान
  3. विज्ञान-प्रक्रिया ही जे कोणी ती प्रकिया करणार आहे तिच्या पासून अलिप्त असते. म्हणजेच प्रक्रिया करणारीचा त्या प्रक्रियेवर वा तिच्या घटकांवर कोणताही प्रभाव नसतो.
  4. दिलेल्या विज्ञान-प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता नसते.
  5. दिलेली विज्ञान-प्रक्रिया दिलेल्या विज्ञान-शास्त्र-घटकांवर पुन्हा पुन्हा व एकसारखीच राबवता येते व निघणारे अनुमान हे प्रत्येक वेळेस सारखेच असते.

वैज्ञानिक व विज्ञान जगत

वैज्ञानिक म्हणजे जो एकानेक विषया संदर्भात विज्ञान-शास्त्र निर्माण करण्यात काम करतो तो. विज्ञान-जगत हे अशा अनेक वैज्ञानिकांचा समूह आहे. निर्माण होत असलेले विज्ञान-शास्त्र संकलित करणे , त्याचे योग्य प्रकारे वितरण करणे, त्याचा प्रचार करणे व ते विज्ञान-शास्त्र निर्माण होताना ते अधिकाधिक अचूक असावे ह्या करिता सजग असणे हे ह्या समूहाचे महत्त्वाचे उद्देश आहेत. त्या अनुषंगाने वैज्ञानिक असण्यासाठीचे व ह्या समूहाचा भाग असण्याचे काही शैक्षणिक व इतर निकष निर्माण करण्यात आले आहेत.

मूलभूत विज्ञानवाद व विज्ञानवादी

मूलभूत विज्ञानवाद हा केवळ आणि केवळ निर्माण होणाऱ्या विज्ञान-शास्त्राच्या व विज्ञान-प्रक्रियेच्या संदर्भातच अपेक्षित आहे. निर्माण होणारे विज्ञान-शास्त्र व विज्ञान-प्रक्रिया ह्या दोनोच्या अचूकता, विकास व संकलनाशीच तो जोडलेला आहे. निर्माण झालेले विज्ञान हे स्वयंभू असावे हा एकमेव उद्देश ह्या विज्ञानवादा मागे आहे. मूलभूत विज्ञान मानवकेंद्रित वा इतर कोणत्याही प्रजाती-केंद्रित नसावे ही ह्या मागची धारणा आहे. त्यामुळे मूलभूत विज्ञानवाद वैज्ञानिकावर वा विज्ञानाचा वापर करणाऱ्यावर इतर कुठलेही म्हणजे विज्ञान-शास्त्र व विज्ञान-प्रक्रिये संदर्भात सोडता बंधन घालत नाही. विज्ञानाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने निर्माण झालेल्या ज्ञानाच्या गुणवत्तेची वा उपयुक्ततेची हमी देता येऊ शकत नाही इतकेच हा वाद मानतो. हा मूलभूत विज्ञानवाद मानणारी प्रत्येक एन्टिटी ही विज्ञानवादी असते.

विज्ञान मनुष्यवादाच्या चष्म्यातून

मूलभूत विज्ञान हे जरी प्रजाती-केंद्रित नसावे अशी अपेक्षा असली तरी सद्यस्थितीत ते विज्ञान मानव निर्माण करत असल्याने आपोआपच ते मानव-केंद्रित झालेले आहे. मानवाच्यात उत्क्रांतीने निर्माण झालेल्या जैविक वैषिष्ठांनमुळे, मानवाच्या आकलन व व्यक्त होण्याच्या सीमांमुळे त्याने निर्माण केलेल्या विज्ञानाला त्या अनुषंगाने मर्यादा आलेल्या आहेत. तयार झालेले विज्ञान हे प्रामुख्याने मानव प्रजातीच वापरणार आहे हे त्या मागचे अध्याहृत आहे. त्या अनुषंगाने निर्माणा होणारे विज्ञान हे मानवाचे जगातील अस्तित्व सुखकर व्हावे ह्या उद्देशानेच चाललेले आहे. मानवता प्रथम, तिचे फायदे व विकास प्रथम हा ह्या विज्ञाना मागचा ऊर्जा-स्रोत आहे.

मानव-केंद्रित विज्ञानवाद हा मुख्यता दोन विचारधारेत विभागता येतो. (१) मानव हाच महत्त्वाचा केंद्र बिंदू आहे आणि विज्ञान हे केवळ आणि केवळ मानवाचे हे केंद्रस्थान अजून बळकट करण्यासाठीच आहे आणि (२) मानव हा केंद्र बिंदू असला तरी तो निसर्गाशिवाय जगू शकत नाही म्हणून मानवी जीवन शक्य करणाऱ्या नैसर्गिक चौकटी सुधा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मानव व मानवी जीवन शक्य करणाऱ्या चौकटी ह्या दोन्हीच्यासाठी विज्ञान आहे.

मनुष्यवादाचा अंतःप्रवाह असला तरी निर्माण झालेल्या विज्ञानात असे बरेचसे आहे जे मानव-केंद्रितता भेदून निखळ विज्ञान स्वरूपात निर्माण झालेले/केलेले आहे.

विज्ञान सामाजिक चौकटीतून

माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्यामुळे एकसंध मानवता जरी तात्त्विक स्तरावर मान्य असली तरी ज्या समाजाचा माणूस भाग आहे त्या समाजाच्या चौकटींचा विज्ञान निर्मतीवर प्रभाव आहे. असंख्य विषयांबाबत विज्ञान निर्माण करण्याची गरज आहे. अशा वेळेस कोणत्या विषयांना प्राधान्य मिळेल हे एकतर त्या त्या समाजाच्या आचार-विचार-मूल्य-गरजा, सामाजिक संरचना ह्या व अशा इतर कारणाने जाणीवपूर्वक अथवा नकळत बनलेल्या कलामुळे ठरते. त्याच प्रमाणे प्रत्येक समाजात निर्माणा होणारे विज्ञान हे दुसऱ्या समाजापर्यंत पोहोचेलच ह्याची शाष्वती नसते. ते पोहोचले तरी त्या समाजाच्या संदर्भात त्याचे काही महत्त्व असेल असेही नसते. ह्याचा निर्माण झालेल्या विज्ञानावर जरी परिणाम होत नसला तरी उपलब्ध विज्ञान किती व कुठले असेल ह्यावर नक्कीच होतो.

जसा विज्ञान निर्मितीवर समाज आचार-विचार-मूल्य-गरजा-संरचनेचा प्रभाव पडतो तसेच विज्ञान वापरण्यावरही होतो. जे वैज्ञानिक नाहीत व जे केवळ विज्ञान वापरतात ह्यांचा विज्ञानविषयक दृष्टिकोन हा महत्त्वाने ह्याच चौकटीत ठरतो. दैनंदिन राहणीमान सुलभ करणारे व समाज चौकटीत सामावणारे विज्ञान वापरले जाते. तर थेट आयुष्यावर परिणाम न करणारे पण सामाजिक चौकटीला छेद देणारे विज्ञान सहसा स्वीकारले जात नाही अथवा ते स्वीकारायला वेळ लागतो.

समाजाला लागणाऱ्या सर्व विषया संदर्भात विज्ञान उपलब्ध असणे अपेक्षीत असेल तर त्यासाठी त्या समाजातील महत्तम जनसमुदाय विज्ञान निर्मिती प्रक्रियेशी जोडला गेलेला असणे आवश्यक आहे. पण प्रत्येक समाज त्या संदर्भाने लागणारी किंमत मोजायला तयार असतोच असे नाही. मग ही किंमत सामाजिक स्थित्यंतराची असेल अथवा इतर भौतिक, वैचारिक स्वरूपाची असेल.

त्यापुढे जाऊन विज्ञान भौतिक आयुष्यात सुधारणा करेलही पण आयुष्य विषयक भावना विश्वाचे काय, सौदर्यदृष्टीचे काय, सामाजिक मूल्यांचे काय जिथे सध्या विज्ञान पोहचू शकत नाही. अश्या वेळेस पारंपरिक अवैज्ञानिक ज्ञान स्रोत वापरण्याशिवाय पर्याय काय?

विज्ञान आणि धर्म

विज्ञानाला आजचे काटेकोर नियम लागायच्या आधीपासून माणूस विज्ञानाची निर्मिती करत आला आहे. ही निर्मिती प्रक्रिया एकसारखी, एकसंध व अचूक नसली तरी तीच्या पासून झालेली ज्ञान निर्मिती (विज्ञान १.०) पूर्णतः टाकवू नाहीच. एका प्रकारे विज्ञानाची उत्क्रांती झाली आहे व पुढे होणार आहे. आज पासून १००० एक वर्षाने मागे बघताना आज जे विज्ञानाचे नियम असतील तेच असतील का? आज जे विज्ञानासंदर्भात स्वीकृत अचूकतेचे मापदंड आहेत ते स्विकार्य असतील का? आजचे विज्ञान उद्याचे अवैज्ञानिक ज्ञान असेल का? विज्ञान हे नेहमीच सांदर्भिक ज्ञान आहे ते अंतिम सत्य नाही. त्यामुळे त्यात कायमच अपूर्णता असणार आहे. असे असताना विज्ञान रोजच्या जीवनात हाताळायचे कसे?

तर धर्म हे मानवी जीवनाची रिपोझिटोरी आहेत. वर्षानुवर्षाच्या मानवी अनुभवांतून, आकांक्षांतून, जय-पराजयातून, जीवनाच्या धबडग्यातून आलेलं भौतिक व भावनिक ज्ञान त्यात आहे. जरी त्या रिपोझिटोरीत काय जाणार काय नाही हे ठरवणारे द्वार-रक्षक होते आणि काळानुसार ती रिपोसिटोरी अफाट झाली असली तरी किती अचूक आहे ह्या विषयी काही अनुमान काढता येत नाही. त्यात दिसणारी ज्ञान निर्मती प्रक्रिया कमकुवत आहे किंवा अस्तित्वातच नाही. त्यांतून त्यात साठवलेले ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीत आहे. कधी तो विचार आहे तर कधी ते कृती आहे तर कधी दाखले तर कधी काल्पनिक कथा. धर्मात असणारी काल्पनिकता, भय, सुरक्षिततेची विवंचना व अज्ञाताची ओढ हे मानवी अंतरंगाचे गुंतागुंतीचे, प्रसंगी विसंवादी असे परावर्तन आहे. जे नाकारता येत नाही.

विज्ञान हे नेहमीच मानवी प्रगतीच्या आघाडीवर राहिले आहे. तर धर्म-ज्ञान हे पिछाडीवर. विज्ञान नवीनं बदल आणते आणि कालांतराने समाज त्याचे धर्म नियमात रूपांतर करतो अथवा तो जीवन संस्कृतीचा अविभाज्य भाग होऊन जातो ज्याच्या पायावर नवीन धर्म उदयाला येतात आणि त्यांच्या उदयाच्या काळात असलेला विज्ञानाचा अवतार जो भौतिकतेशी जोडलेला आहे तो त्या धर्माचा गाभा होऊन जातो. विज्ञान व धर्म-ज्ञान ह्यांचा हा संवाद अनंत काळापासून चालू आहे. ह्यात धर्म स्वरूप बदलत गेले आहे. आजचे विज्ञान ते धर्म स्वरूप कसे व किती बदलेले? आजचे विज्ञान मानवी ज्ञानाची एकादी नवी रिपोझिटोरी जी हजारो वर्ष चालत राहिला अशी करू शकेल का? आज ती वैज्ञानीकांची/समाजाची प्रायोरिटी आहे का?

विज्ञान आणि देव

विज्ञानाची व्याप्ती अजूनही फार नाही सारे विश्वा कवेत घेण्या इतकी नाहीच नाही. त्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही. मानवी जीवनांतील काल्पनिक सीमा व त्याच्या मानवी जीवनावर परिणाम हे सुद्धा विज्ञानाने अजून पूर्णतः उलगडलेले नाही. पण तेही यथावकाश होईल ह्यात मला शंका नाही.

विषय: 
प्रकार: 

सुंदर लेख. विज्ञान, धर्म, आस्तिक्/नास्तिक याच्या समजण्यात्/आकलनात गोंधळ असणार्‍यांनी आवर्जुन वाचावा...

त्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही.
>>>
विश्व बनवणारा कोणी देव होता हे कशावरून? संपूर्ण लेख वाचल्यावर हे एक वाक्य दाताखाली आले

उत्तम लेख पेशवे! Happy

मला फक्त इथे मांडलेला मुद्दा लक्षात नाही आला.
"विज्ञान नवीनं बदल आणते आणि कालांतराने समाज त्याचे धर्म नियमात रूपांतर करतो अथवा तो जीवन संस्कृतीचा अविभाज्य भाग होऊन जातो ज्याच्या पायावर नवीन धर्म उदयाला येतात आणि त्यांच्या उदयाच्या काळात असलेला विज्ञानाचा अवतार जो भौतिकतेशी जोडलेला आहे तो त्या धर्माचा गाभा होऊन जातो. ">>>>>>> माझी तर समजूत होती की धर्मांवर विद्नानाचा फार कमी प्रभाव आहे. If you consider western science and Christianity, there might be some examples in Christianity where changes were made based on science but not many. Why I chose to include western society is because we all can agree that science in the west has progressed/changed at a far more rapid pace than the east and if you would have to find any examples of science driving changes in religion or religious beliefs, it would be Christianity (being the religion of the majority of the western population).
तुम्ही वर मांडलेल्या मुद्द्याला अनुसरुन तुम्हाला काही उदाहरणं देता येऊ शकतील का, ज्यात विज्ञानानी आणलेल्या बदलांचे कालांतरानी धर्म नियमांत रुपांतर झाले? माहिती करता म्हणून विचारत आहे. Happy

लेख फार चांगला आहे.

<<<त्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही. >>>
काल्पनिकता, भय, सुरक्षिततेची विवंचना व अज्ञाताची ओढ हे मानवी अंतरंगाचे गुंतागुंतीचे, प्रसंगी विसंवादी असे परावर्तन आहे ते आज सत्यस्थितीत आहे. त्यातूनच देव, धर्म इ. संकल्पना मनाने तयार झाल्या. त्याच मनाने मग, <<<<विज्ञानाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने निर्माण झालेल्या ज्ञानाच्या गुणवत्तेची वा उपयुक्ततेची हमी देता येऊ शकत नाही >>>> हे मान्य असूनहि, धर्माच्या नावाखाली निरनिराळे चाळे सुरु केले.
पण <<<विज्ञान हे नेहमीच सांदर्भिक ज्ञान आहे ते अंतिम सत्य नाही. >>>
जेंव्हा मन कसे चालते हे विज्ञानाला कळेल तेंव्हा ठरेल की विज्ञान पुरे की धर्माला काही स्थान आहे जीवनात. नि असले तर ते कसे असावे?

<<<ज्यात विज्ञानानी आणलेल्या बदलांचे कालांतरानी धर्म नियमांत रुपांतर झाले>>>

पूर्वी नियम असत की शाडूच्या मातीची गणपतीची मूर्ती बनवावी, घरी आणून नाना परिमळद्र्व्ये अर्पण करून पूजा करावी, नैवैद्य दाखवावा, आरती म्हणावी नमस्कार करावा व प्रसाद खावा.
आजकाल विज्ञानाची प्रगति झाल्याने त्यात बदल झाला. आता इंटरनेट वापरून स्क्रीनवर वर गणप्तीची मूर्ती आणावी, इंटरनेटवरूनच पूजा आरती करावी नि प्रसाद खायला भारतीय उपाहार गृहात जाऊन मस्तपैकी बीअर, चिकन, लँबवर ताव मारावा.

विज्ञानामुळे धर्मपण आघाडीवर!

<कुत्सित हास्य इमोजी>

मस्त रे..
काही काही वाक्ये व मुद्दे गुंतागुंतीचे झालेत. पण विज्ञान, धर्म असे 'स्फोटक' विषय हाताळायचे तर हे अपेक्षित आहे.. असो.

नमस्कार वैद्यबुवा,

जुलिअन कॅलेंडर हे क्रिस्तिअनिटी सुरू व्हायच्य आधी जुलिअस सिजरने लागू केले. त्याने लुनार कॅलेंडर जे मेंटेन करणे अवघड होते त्याला कंटाळून हे कॅलेंडार अलेक्षन्ड्रिया येथील एक अ‍ॅस्ट्रोनोमर कडुन घेतले. तेच कॅलेंडार क्रिशिअनिटी ने आपलेसे केले. पुढे १५ व्या शतकात त्यातल्या चुका काढून ग्रेगोरिअन कॅलेंडर पोप ग्रेगोरिने लागू केले. ह्याच केलेंडरच्या संधर्भाने आज क्रिस्तिअन सण साजरे होतात. त्यातही काही देशात १९०० व्या शतका पर्यंत जुलिअन कॅलेंडर चर्च मधे वापरले जायचे सणवार बघण्यासाठी.

भारतात सौर्य केलेंडर ज्ञात होते पण भारतीय धर्मानी लुनार कॅलेंडर्शी इमान तोडले नाही तर ते अधिकाधिक अचुक व स्थीर करण्यावर भर दिला. ज्याल आज आपण पंचांग म्हणतो. भारतीय धर्मातील सगळे सणवार ह्या लुनार कॅलेंडर्शी जोडलेले आहेत.

इस्लाम जेंव्हा उदयास आला तेंव्हा जुलिअन केलेंडर त्या भागत ज्ञात होते. पण इस्लाम ने लुनार कॅलेंडरच आपलेसे केले. पण त्यांनी ते स्थिर (वा अचुक ?) करण्यावर भर नाही दिला. त्यामुळे त्यांचे सण सौर्य केलेंडारच्या अनुशंगाने अजिबातच फिक्स्ड नसतात.

कोस्मोलोजी आणि दैवाद ह्यांना खरा चॅलेंज हा साधारण १५ व्या शतकानंतर (चु.भू.ध्या.घ्या.) मिळण्यास सुरवात झाली.

धन्यवाद पेशवे. आलं लक्षात आता.
मला तरी वाटतं इथून पुढे प्रगत देशांमध्ये तरी धर्मात विज्ञानाला अनुसरुन बदल असे न होता हळू हळू धर्माचा पगडाच कमी होत जाणार आहे समाजावर. लोकं धर्मापेक्षा सेक्युलर स्पिरिचुअ‍ॅलिटी कडे जास्त वळतील कारण १) एकंदरितच धर्मात लिहिलेले बरेच सिद्धांत नवीन पिढीला आत्मसात करण्याची इच्छा राहणार नाही (त्यातले लूप होल्स बघून) आणि २) सेक्युलर स्पिरिचुअ‍ॅलिटी ही विज्ञानाच्या चौकटीत अगदी सहज बसून धर्म्/अध्यायत्मातून जे काही लोकांना मिळतं (आनंद असो, इक्विअ‍ॅनिमिटी असो.) ते सगळं इथेही उपलब्ध आहे.
अर्थात हा बदल व्हायला पुष्कळ काळ जावा लागेल ती वेगळी गोष्ट. Happy

बुवा मान्य. पण मला असे वाटते की धर्म हे फोस्सिलाइड रेमेन्स ओफ वैज्ञानिक ज्ञान ओफ सर्टेन हिस्तोरिकल पेरिअड्स आणि सिव्हिलाइझेशन्स आहेत. हे ज्ञान रेगुलर बेसीस वर अपडॅट होतच असे नाही. अर्थातच ह्याला भरपूर इतर कारणे आहेत. पण त्यातले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे विश्वास. नवीन विचार हे कुठुन आले आहे आहे त्या सोर्स विशयी विश्वास नसेल व ते ज्ञान लाइफ डिस्टर्बींग असेल तर चटकन स्विकारले जातच नाही.

उदा. आपली काँस्टीट्युशन आपले क्रिमिनल लॉज ह्यात बरेच रेलिक्स आहेत जे ब्रिटिशांन्च्या वर्ल्डव्हिव मुळे आहेत. पण ते आजही चटकन बदलता येत नाही. बदलाची कितीही ओरड केली वैज्ञानिक दाखले दिले तरी सुधा. हे जर आजच्या लोकशाहीत होत असेल तर धर्मा बाबत किती अवगढ असेल...

बरोबर पेशवे. क्रिश्चॅनिटीचे उदाहरण घ्याल तर ज्या भागात हा धर्म पाळला जातो ते तर सायंटिफिक प्रोग्रेस मध्ये सरवात पुढे आहेत आणि तसं असून सुद्धा त्या धर्मात हार्डली काही अपडेट्स झाल्यात. त्यावरुन म्हणत होतो की पुढे मॉडिफाईड क्रिश्चन धर्म किंवा पुर्ण्पणे नवीन आणि सायन्स ला धरुन कॅनन्स असलेला धर्म येणे ह्याची शक्यता कमी वाटते. Happy
अजून एक मुद्दा लिहायचा राहिला तो म्हणजे, धर्मांची स्वतःला अपडेट करत राहण्या विषयीची अनास्था. आता धर्म म्हणजे काय विज्ञान आहे का स्वतःला अपडेट करत राहायला? जिथे विज्ञान संपतं आणि काही मार्ग उरत नाही तिथे धर्म, त्यावरचा असलेला गाढ विश्वास ह्या गोष्टी सुरु होतात असं लोकं म्हणतील. तर तेही बरोबर आहे! Lol
(तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला बोलू नका पण हीच सवय धर्माला एक दिवशी महाग पडणार आहे Proud )

लेख वाचताना आजचा सुधारक वाचत असल्यासारखे वाटले. सुलभीकरणाच्या प्रक्रियेत आशयहानी होण्याचा मोठा धोका अनेक प्रज्ञावंतांना वाटतो.त्याला इलाज नाही. माणसाला सर्वसुखी बनण्यासाठी आयुष्याच्या सर्व टप्प्यात विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन पुरेसा आहे का? याचे उत्तर सुख हे व्यक्तिसापेक्ष असल्याने देता येत नाही असे आपण म्हणू . तरी पण हा प्रश्न एक सर्वसामान्य माणसाला ते पुरेस वाटत नाही असे आपण म्हणु शकतो.
त्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही. या वाक्यामुळे विश्व बनवणारा कुणीतरी आहे असे ध्वनीत होते. समजा सोयीसाठी त्याला आपण देव म्हणले तरी विश्वाचा निर्माता कुणीतरी असणे हेच विज्ञानाला मान्य नाही असे कठोर विज्ञानवादी लोक म्हणतील. विश्व हे स्वयंसिद्ध आहे. म्हणजे स्वयंकार्यकारणभावाने सिद्ध आहे. असे म्हटले की मग याचे कारण काय मग त्या कारणाचे कारण काय..... अशी कापूसकोंड्याची गोष्ट संपते. आपले समाधान होते की नाही हा भाग वेगळा. अज्ञाताचा शोध विज्ञानातही चालू आहे व अध्यात्मातही. तो अनादि अनंत आहे चालूच राहणार आहे. आपले आयुष्य त्यात केव्हाच संपून जाईल. ढोबळ मानाने आपण विज्ञानवादी अश्रद्ध व अध्यात्मवादी सश्रद्ध अशी सोयीसाठी विभागणी करु पण शोध चालूच रहाणार आहे व अंतिम असे काही नाही. आजच्या ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत असलेली गोश्ट उद्या अवैज्ञानिक असू शकतेच.पण अध्यात्माला कधी कवेत घेउन तर कधी बायपास करुन विज्ञान पुढे जात राहणार आहे असे आमचे भाकीत आहे