चूक भयंकर

Submitted by निशिकांत on 11 August, 2017 - 00:48

आक्रोशाला तळातल्यांच्या कमी लेखणे चूक भयंकर
त्यातच असते महान शक्ती समूळ करण्याची सत्तांतर

आम जनांचे बजेट आहे असे सांगती जरी निरंतर
विकास संधी श्रीमंताना, गरिबांवर असते गंडांतर

सभोवताली कुठे दिसेना कुणीच नेता असा धुरंदर
स्वप्नांसाठी रयतेच्या जो झटेल आणाया स्थित्त्यंतर

खूप ऐकले प्रजाजनांनी भाषणातुनी नेतृत्वाला
आस मनाला, वचनपूर्तिचे कधी तरी यावे प्रत्त्यंतर

काम कमी अन् सदैव गोंधळ घालाया नेत्यांना संसद
आमजनांचे प्रश्न घेउनी धरणे द्याया जंतर मंतर

जरी नायिका, नायक यांचे महत्व असते कथानकाला
रंग भराया लागतात ना! छोट्याशा भूमिका अवांतर

चालत होतो बरोबरीने, मनमुटाव ना कधीच झाला
रेल्वेपटरीसमान सोबत, भेटीविन चाललो समांतर

सुशिक्षितांची मूळ समस्या, व्यवहाराविन हुशार सारे
आपसातल्या प्रश्नांसाठी नसे तोडगा फक्त मतांतर

हार कशी "निशिकांत" मानली? लढता लढता वेदनांसवे
प्राक्तनातल्या चित्रपटाचे अजून झाले ना मध्यंतर

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users