दादाकडून पत्र..

Submitted by पद्म on 7 August, 2017 - 06:30

प्रिय चिमणी,
आज इतक्या दिवसांनी पत्र लिहिण्यास कारण कि, आज रक्षाबंधन असूनही तुझी राखी मात्र आली नाही. तरीही तू उदास होऊ नकोस, कारण या वर्षीही मी तुझ्यावर रागावलो नाहीये. मी माझ्या चिमणीवर रागावलो, तर मीसुद्धा मला माफ करू शकणार नाही. मलाही माहितीये कि, तुझी राखी का नाही आली, म्हणून तू मला त्याचं कारण सांगण्याचीही गरज नाहीये. पण मी तुझ्या राखीची वाट पहिली, हे मात्र नक्की.........

ते सोड, मीपण काहीतरीच विषय घेऊन बसलो, आणि तुझ्याबद्दल विचारायचं विसरलो. तू कशी आहेस? अभ्यास करतेस ना? तुझा दादा शाळेत असताना नेहमी पहिला यायचा, आणि ते स्थान टिकवणं आता तुझी जबाबदारी आहे, बरोबर ना? आणि माझी तायडी माझी ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, याची मला खात्री आहे. आणि खरं सांगायचं तर माई आणि आप्पांचीही तुझ्याकडून तीच अपेक्षा आहे. म्हणून माझ्यासाठी नाही, तरी त्यांच्यासाठी तू नक्कीच प्रयत्न करायला हवा. मग करशील ना हा प्रयत्न, माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी?

अगं, मी विसरलोच. माईची तब्येत कशीये आता? २ दिवसांपूर्वी फोन केला तेव्हा आप्पा सांगत होते, तिला ताप आहे म्हणून. मी तर आता तिथे नाहीये, पण प्लिज तू तिची व्यवस्थित काळजी घे. हे सगळं तुला सांगायची गरज नाहीये, पण तरीही....... मनाची एक समजूत! माईला घरकामातही मदत करत जा, स्वयंपाक करताना, भांडे आणि कपडे धुताना, साफसफाईतही मदत करत जा. मी असताना करायचोच ना? मग आता हि तुझी जबाबदारी आहे, नाही का? अगं, आजकाल ती खरंच खूप एकटी झालीये. मी तिथे असताना बरं होतं पण मी इकडे बाहेर आलो आणि ती मात्र तिकडे एकटी झाली, म्हणून तिला प्रत्येक प्रकारे आधार द्यायची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. आणि मला माझ्या बच्चीवर पूर्ण विश्वास आहे, तू तिची नक्कीच चांगली काळजी घेशील.

तुला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटतेय, आप्पांची खूप आठवण येते गं! त्यांचा स्वभाव खूप तापट आहे, आणि त्यांच्या या स्वभावामुळेच ते मला नेहमी दबावात ठेवायचे, आणि आता ही सवयच झालीये, की आजही मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. चिमणे, मला माहितीये, त्यांच्या याच स्वभावामुळे तू त्यांच्या जवळही जात नाहीस. पण चिमणे, ते हे सर्व त्यांच्या स्वार्थासाठी करत नव्हते, त्यांना नेहमी भीती वाटायची कि, त्यांचा मुलगा वाईट मार्गाला जाऊ नये. त्यांच्या त्या शिस्तीमुळेच तर तुझा दादा इतका मोठा झाला ना? अगं, त्यांनाही आता पश्चाताप होतो कि, ते त्यांच्या मुलाशी खूप वाईट वागले, आणि याच पश्चातापापोटी ते रडतातसुद्धा पण कोणाला दिसू देत नाहीत. माझी त्यांच्याशी बोलायची खूप इच्छा होते, पण आता सवय झालीये, त्यांच्याशी कमी बोलायची.पण तू मात्र त्यांना अंतर देऊ नकोस, त्यांच्या मनात साचलेलं दुःख तूच दूर करू शकतेस. माझ्यासाठी करशील ना हे सर्व?

हे पत्र लिहायला घेतलं तेव्हा भरपूर गोष्टी होत्या मनात, पण लिहायला उत्साह मात्र येत नाहीये. कारण मला माहितीये, कितीही लिहिलं तरी तू हे पत्र वाचणार नाहीयेस. मला पूर्ण वर्षात फक्त आजच्या दिवशी आप्पांचा खूप राग येतो, कारण ते विसरले होते कि, "गुरुचं अनुसरण करावं, पण अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये." ते ज्या व्यक्तीला त्यांचा आदर्श मानत राहिले, त्या व्यक्तीला एकच अपत्य होतं आणि याचं अनुकरण करून त्यांनी मला तुझ्यापासून वंचित ठेवलं, नाहीतर आज तुझं अस्तित्व नक्कीच राहिलं असतं. असो.........

मी दर वर्षी आवर्जून तुला पत्र लिहितो, आणि त्यामागे एकच वेडा उद्देश असतो कि, जरी तुझं भौतिक अस्तित्व नाहीये तरी हे पत्र लिहिताना माझ्या मनात मात्र तुझं अस्तित्व निर्माण होतं. आणि तुझ्या या तात्पुरत्या सूक्ष्म सहवासासाठी मी हा खटाटोप करतो. हे वाचून काही लोक मला मूर्खही समजतील, कारण मी काय गमावलंय हे त्यांना थोडीच कळणार?

पण कधी कधी असंही वाटतं कि, तू नाहीये हे एका अर्थाने बरंच झालंय, कारण जर मला बहीण असती, तर आज मी तुला जितकं महत्त्व देतो, तिला देऊ शकलो नसतो. कारण जी वस्तू आपल्याकडे नसते, त्याच वस्तूची योग्य किंमत कळते. आणि हेच आपल्या नात्यांच्या बाबतीतही लागू पडतं. जाऊदे, अजून जास्त काही लिहीत नाहीये, कारण स्क्रीन नीट दिसत नाहीये..

तुझा दादा,
दादा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्र्दयस्पर्शी.....
जास्त काही लिहू शकत नाही यावर...
एक उपाय आहे कि यावर्,जिला भाऊ नाही तीला बहिण माना...