हंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा?

Submitted by सचिन काळे on 1 August, 2017 - 10:31

हा! हा!! हा!!! मला माहितेय! वरील शीर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. तुम्हाला वाटलं असेल, काय लिहिलंय हे!!? आफ्रिकेच्या जंगलातील कोण्या आदिवासी लोकांची भाषा दिसतेय ही. वाचताना असं वाटतं की, सर्व आदिवासींनी मिळून एक मोठी शिकार केलीय. मैदानात उघडेबंब, अंगावर चट्टेपट्टे ओढलेले आणि हातात भाले वगैरे घेतलेले लहानथोर सर्व आदिवासी जमलेत. मधोमध मोठ्या शेकोटीवर शिकार भाजायला लावलीय. आणि त्याभोवती सर्व फेर धरून नाचतायत आणि गातायत. "झिंगालाला! होsss!! टुंबक्टू! टुंबक्टू!! टुंबक्टू!!!"

हा! हा!! हा!!! अहो असं काही नाहीए. ही उटपटांग भाषा कोणतीए, सांगतो! सांगतो! एकदा काय झालं, माझ्या लहानपणी मी माझ्या मित्राच्या घरी अभ्यासाकरिता गेलो होतो. त्यावेळीे त्याचे आईवडिल आणि बहीणभाऊसुद्धा घरात होते. मी आणि माझा मित्र बेडरूममध्ये अभ्यास करत बसलो होतो. अधेमधे मित्राचे आईवडिल आणि बहीणभाऊ काही कामानिमित्त बेडरूममध्ये आले, की त्यांचे माझ्या मित्राबरोबर वरील 'टन् टना टन्' भाषेत बोलणे चाले. मला काही समजेच ना! की ते कोणत्या भाषेत बोलतायत ते! ती मला काही साऊथच्या भाषेसारखी 'अंडूगुंडू', गुज्जूसारखी 'केम छो',  बंगांल्यांसारखी 'की खाबो' किंवा चायनीजसारखी 'च्यांव म्यांव' वगैरे वाटेना. त्यांचे आपसातील बोलणे ऐकताना मला कुठल्यातरी देवळातील घंटा बडवल्यासारखे त्यांच्या तोंडून फक्त 'टन् टन्' ऐकू येत होते. एक अक्षर कळेल तर शपथ!

त्यांचे 'टन् टना टन्' भाषेतले बोलणे ऐकून मी हैराण झालो होतो. दुसऱ्या दिवशी मित्र शाळेत भेटल्यावर मी त्याला त्याविषयी विचारले. त्याबरोबर तो पोट धरून जोरजोरात हसू लागला. मला म्हटला "अरे वेड्या! आम्ही आपसात बोलत होतो ती काही कुठल्या जातीधर्म किंवा प्रांत वगैरेची भाषा नव्हती. ती आमच्या घरात पूर्वीपासून चालत आलेली एक प्रकारची 'सांकेतिक भाषा' आहे, जी फक्त आमच्या घराणातल्या लोकांनाच माहीत आहे. काय होतं, की जेव्हा आपल्या आजूबाजूला बरीच इतर माणसं असतात आणि आपल्याला आपल्या माणसांबरोबर काही खाजगी बोलायचं असतं, तेव्हा ही 'सांकेतिक भाषा' आपल्याला उपयोगी पडते. इतर लोकांना काहीच कळत नाही आपण काय बोलतोय ते! आहे की नाही गंमत!"

मला ही कल्पना फारच आवडली. मी माझ्या मित्राला ती सांकेतिक भाषा मला शिकविण्याबद्दल फारच गळ घातली. बरेच आढेवेढे घेतल्यावर त्याने मला ती भाषा शिकवली. आणि मग काय!!? वर्गात आम्ही दोघे त्याच 'टन् टना टन्' भाषेत एकमेकांशी बोलू लागलो. इतर मित्रांना न कळता आमची गुपितं चारचौघात एकमेकांना सांगू लागलो. आता तुम्हालाही ती भाषा शिकण्याची उत्सुकता लागून राहिली असेल ना? हो! ती भाषा मी तुम्हालाही शिकवणार आहे, पण लेखाच्या शेवटी.

तर मी काय सांगत होतो? सांकेतिक भाषा!!! आमच्या लहानपणी आपली गुपिते चारचौघात उघडपणे बोलता यावीत म्हणून खास बनवलेली अजून एक भाषा होती, ती म्हणजे 'च' ची भाषा. नमुना सांगतो. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर आम्ही हे कसं म्हणायचो पहा! "चजआ चमी चझ्यामा चब्यातड चकए चमतगं चणलीयआ" आहे की नाही मज्जा!!? पण ही भाषा त्यावेळी बहुतेक मुलांमुलींना येत होती. त्यामुळे त्यात एवढं गुपित आणि नावीन्य राहिलं नव्हतं. मग कधी कधी एक गंमतसुद्धा व्हायची. इतरांना ही भाषा माहीत नसेल हे गृहीत धरून आम्ही चारचौघात ती भाषा एकमेकांत मोठ्याने बोलायचो, आणि समोरचा म्हणायचा "मला समजलं!! तुम्ही लोकं काय म्हणतायत ते!" अस्सा पोपट व्हायचा ना आमचा!!!

त्यावेळी अजून एक सांकेतिक भाषा मी ऐकून होतो, पण बोलणारा कोणी सापडला नाही. त्याविषयी थोडक्यात. त्या भाषेचं नांव होतं. 'राम कृष्ण हरी'. याकरिता आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय" तर ह्या भाषेत आपण कसं म्हणू? ऐका "आजराम मीकृष्ण माझ्याहरी डब्यातराम एककृष्ण गंमतहरी आणलीयराम" ही भाषा बोलताना आपोआप देवाचा जप होई, म्हणून ती आध्यत्मिक लोकांमध्ये बोलली जात असावी.

चला तर मग मी तुम्हाला मघाची 'टन् टना टन्' भाषा शिकवतो. शिकायला थोडी कठीण आहे. पण एकदा भाषेचं तंत्र समजलं, की बोलायला एकदम सोप्पी आहे. कसं आहे, की ही भाषा प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या स्वरावर अवलंबून आहे. तो स्वर लक्षात ठेऊन त्या अक्षराचा स्वर काढून घ्यायचा. मग स्वर काढून राहिलेल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा. नंतर पहिल्या अक्षराचा काढलेला जो स्वर आहे तो 'ट'ला लावून तो 'ट' स्वर काढलेल्या अक्षराच्या पुढे ठेवायचा. मग बाकी राहिलेला शब्द आहे तसाच 'ट'ला जोडायचा. नाही समजलं? उदाहरण सांगतो. आपण 'कुठे' हा शब्द घेऊ. तर आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. 'कुठे' शब्दाचे पहिले अक्षर आहे 'कु'. 'कु'चा स्वर आहे 'उ'. तो स्वर बाजूला केल्यावर रहातो 'क'. आता 'क'वर अनुस्वार दिल्यावर त्याचा होतो 'कं'. आता काढलेला स्वर जो 'उ' आहे तो 'ट'ला जोडल्यावर त्याचा होतो 'टु'. आता हा 'टु' अगोदरच्या 'कं'च्या पुढे ठेवल्यावर शब्द होईल 'कंटु'. ह्या 'कंटु'च्या पुढे राहिलेला 'ठे' जोडला की शब्द होईल 'कंटुठे'. संपलं! 'कुठे'ला आपण 'टन् टना टन्' भाषेत बोलू 'कंटुठे'. आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर हे वाक्य आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. "अंटाज मंटी मंटाझ्या डंटब्यात एंटेक गंटंमत अंटाणलीय" अगदी सोप्पय!! अहो, आम्हाला असं बोलायची एवढी सवय झाली होती की आम्ही धडाधड ही भाषा बोलत असू. ऐकणाऱ्याला फक्त 'टन् टना टन्' आवाज ऐकू येत असे. आहे की नाही सगळी गंमत!

तर मित्रांनो! ही 'टन् टना टन्' भाषा शिकून घ्या. सराव करा. आणि आपल्या मित्राबरोबर चारचौघात उघडपणे आपली गुपिते शेअर करा. कोणाला काहीच कळणार नाही, याची फुल्ल गॅरंटी! आणि हो! तुम्हालाही ह्या प्रकारची दुसरी कुठली एखादी सांकेतिक भाषा येत असेल तर येथे आमच्याबरोबर शेअर करा. तेवढीच एक गंमत!

माझा ब्लॉग  :  http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मण्टला पण्टण हीण्टी भाण्टाशा येण्टेते
Happy
णिआ, वही णप षाभा म्हीआ लतोबो. पिसो हेआ. राज वघडआ तेजा हिल्यांदाप, तरनं मतेज.

जुंटन्या आंटठवणी जांटग्या झांटल्या Wink मंटजा यांटयची शांटळेत ज्यांटयांना यांटयची नांटही हींट भांटषा त्यांटच्या संटमोर बोंटलायला.......

माझा मामा म्हणायचा कसल्या शिव्या देत बोलल्यासारखे वाटते Proud

ओहो सचिनजी....
चुक केलीत! चुsssssssssssssssssक!!!!! :
लंटेख कंटशाला लंटिहायचा? मंटाला मंटेल कंटारायचा नंटा....अंटाता यंटेथे संटंगळ्याला हंटी भंटाषा यंटेणार.. Sad

नंटेमेही पंट्रम्हाणे भंटारी लंटेख. कंटाहितरी नंटविन शंटिकायला मंटिळालं... Happy

चचीच चषाभा चहितमा चतीहो..
अनपजून ननपपची भानपषा मानपहित होनपती...
जगभरात अशा भरपूर भाषा असतील. पण तरी अशा भाषांचं डिकोडिंग होऊन आपलं गुपित फुटणारच...
पंटुढील लंटेखाच्या पंट्रतिक्षेत...

Rofl
सगळे गंमत जंमत करतायत येथे.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार.
माझ्या लेखामुळे सर्वांना करमणुकीचे दोन क्षण उपभोगता आले याचा मला आनंद आहे. धन्यवाद.

अरे ती बाळाराम मार्केटची जाहिरात लागायची ना रेडिओवर त्यात तो टारझन असंच काहीसं बोलायचा.

अरे ती बाळाराम मार्केटची जाहिरात लागायची ना रेडिओवर त्यात तो टारझन असंच काहीसं बोलायचा.>>>>> सुटाकाना सटाकाना सफारी तागा... असं काहीतरी होतं बहुतेक Happy

देवा.... आमच्याकडेही असे नग होते. अशी भाषा बोलणारे माझ्या तर नेहमी डोक्यात जायचे.... का तर मला हे असे कधीच जमायचे नाही Happy

मार्फाला वार्फाचता येर्फेते हिर्फी भार्फाषा Proud मार्फाझा एर्फेक मिर्फित्र हिर्फिच भार्फाषा हिर्फिंदीत बोर्फोलायचा.

उंटुस्का एंटेक आंटलगही कंटमाल थांटा. Happy

मक्मला पक्मण बक्मर्‍याच भाक्माषा येक्मेतात... उर्फूल्टी, सुर्फूल्टी, कांठाय पंठण शोलू बकतो... के हळालं ठर तिक, ताही नर दाऊ ज्या...

ह्या भाषेबरोबर अजून बर्‍याच भाषा पण बोलतो. त्यातली आवडती 'रफ' ची. मजा यायची बोलताना.
" वरफरची टंरफची भारफाषा आरफीम्ही परफण बोरफोलतोरफो."

अरे ती बाळाराम मार्केटची जाहिरात लागायची ना रेडिओवर त्यात तो टारझन असंच काहीसं बोलायचा.>>>>> सुटाकाना सटाकाना सफारी तागा... असं काहीतरी होतं बहुतेक >>>>>>>

हो आणि शेवटी "अय्या गेला पण?" Lol

ह्या 'टं'च्या भाषेवरून माझ्या बहीणींची एकदा गम्मत झाली होती. माझ लग्न ठरल्यावर एक दिवस माझा होणारा नवरा मला भेटायला आला. माझ्या बहीणींना माझ्याशी बोलायच होत . त्याच्या समोर काही त्यांना बोलता येईना. मग एकीने 'टं'च्या भाषेत मला सांगीतले. त्या वेळी नवर्‍याने त्याला काही समजले नाही असे दाखवले.
काही दिवसांनी तो माझ्याशी या 'टं'च्या भाषेत बोलला. त्या वेळी माझ्या बहीणी तिथेच होत्या. मी आणि बहीणी आ वासून ऐकत होतो. त्या वेळी आम्हाला कळाले की नवर्‍याला ही भाषा आधीपासून येत होती. त्या वेळी माझ्या बहीणींना ओशाळल्यासारखे झाले.

मस्तच धागा
अश्या भाषांना slang म्हणतात.
कॉलेजात आम्ही नॉर्मल च बोलत होतो, पण समझदार को इशारा काफी असायचे.

म्हणजे पहा
अबे अकल के अंधे = हे बोल्ल्या वर समझायचे आजुबाजुला बघण्यासारखे काहीतरी आहे

एक मजेशीर भाषा आम्ही मित्र बोलयचो. त्यात नेहमीच्या मराठी शब्दांना इंग्लिश लघुरुपांत बोलत असू.
उदा. : हकनाक ला HKNK, तुझे तू माझे मी ला TTMM इ.
बाकी वर्गातल्या मुलींची 'वर्णने' करायची जी सांकेतिक भाषा होती, त्याची उजळणी सर्व पुरुषांनी मनातल्या मनात करायला हरकत नाही ! Bw

मस्त मजेशीर आठवणी.
भाषा मात्र जरा मला अवघड वाटतेय.प्रॅक्टीस लागेल जरा.

मस्त लेख!! लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या Happy

आम्ही पण रफ ची भाषा बोलायचो. तसे आजुनही मित्रमैत्रिणी जमलो कि अशी भाषा बोलतो Lol

अरे ती बाळाराम मार्केटची जाहिरात लागायची ना रेडिओवर त्यात तो टारझन असंच काहीसं बोलायचा.>>>>> सुटाकाना सटाकाना सफारी तागा... असं काहीतरी होतं बहुतेक >>>>>>>

हो आणि शेवटी "अय्या गेला पण?" Lol>>> हो. आणि ती बाई ते भाषांतरीत करायची, 'अग तो म्हणतोय....."
आम्ही म्हणायचो कि या बाईला बरी टारझनची भाषा कळते Lol

मस्त लेख सचिनजि
भाषा थोडि अवघड आहे बोलायचा प्रयत्न करतोय...
लहान मुलांच्यासमोर काहि सिक्रेट बोलायचे असेल तर अशी भाषा खुप उपयोगि पडते

देवा.... आमच्याकडेही असे नग होते. अशी भाषा बोलणारे माझ्या तर नेहमी डोक्यात जायचे.... का तर मला हे असे कधीच जमायचे नाही>>>>> अगदीच खरे रे ऋन्मेष!

आंटाम्ही हेंटे कंटरायचो. आपमाई बापमाबा अपमगदी ईपमिरिटेट व्हापमायचे. यारफा वरफरुन फरफटके हीरफी खारफाल्ले आरफाहेत. हा हा

@ राया, आपमाई बापमाबा अपमगदी ईपमिरिटेट व्हापमायचे >>> ह्याच सांकेतिक भाषेची मी वाट पहात होतो. चाळीस वर्षांपूर्वी ही भाषा माझ्या मित्राच्या घरी बोलली जायची. त्यानंतर आज प्रथमच ऐकायला मिळाली. मला कोण आनंद झालाय म्हणून सांगू!! धन्यवाद!

Pages