मी वाचलेले पुस्तक: ओपन (आंद्रे आगासी)

Submitted by अनया on 28 July, 2017 - 18:22

ओपन : आंद्रे आगासी

नव्वदीच्या दशकात ज्यांनी टेनिस बघितलं असेल, त्यांना १९९२ मध्ये विम्बल्डन जिंकणारा आंद्रे आगासी नक्कीच आठवत असेल. 'ग्रँड स्लॅम' स्पर्धेतील त्याचे ते पहिले विजेतेपद होते. क्रीडा समीक्षकांचे, टीकाकारांचे मत 'आगासी कधीच 'ग्रँड स्लॅम जिंकू शकणार नाही',असे होते. ह्या पार्श्वभूमीवर त्याने मिळवलेल्या ह्या विजयाचे महत्त्व त्याच्या दृष्टीने मोठे होते. डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रूंनी त्याच्या त्या भावना सगळ्या जगापर्यंत पोचवल्या.

एकवीस वर्षे व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळल्यावर आगासी २००६ साली निवृत्त झाला. त्याचे 'ओपन' हे २०१० साली प्रसिद्ध झालेले आत्मचरित्र त्याच्या लहानपणापासून ते निवृत्त आयुष्यात तो करत असलेल्या समाजोपयोगी कामांपर्यंत खुलेपणाने सांगते.

आंद्रे चार भावंडात सगळ्यात लहान. अमेरिकेतील 'ला व्हेगास' ह्या गावात राहणारा. आगासीच्या वडिलांनी तो लहान असतानाच तो टेनिस चॅम्पियन होणार. जगातला एक नंबरचा खेळाडू होणार, हे ठरवून टाकलं होतं. ते क्रूर नव्हते, पण ठाम नक्की होते. त्यांनी आगासी लहान असतानाच घराच्या मागच्या दारी टेनिस कोर्ट तयार केलं होतं. एक बॉल मशीन स्वतः तयार केलं होतं. जवळपास पाळण्यात असल्यापासूनच आगासीच ट्रेनिंग त्यांनी सुरू केलं. दिवसातले ठराविक तास हे टेनिस कोर्टवर प्रॅक्टिस झाली'चं' पाहिजे, हा कडक नियम होता. सातव्या-आठव्या वर्षापासून तो त्याच्यापेक्षा मोठ्या खेळाडूंशी खेळायला लागला आणि जिंकायलाही लागला.

तो तेरा-चौदा वर्षांचा असताना वडिलांनी त्याला फ्लोरिडाला एका टेनिस अॅकॅडमीमध्ये रवाना केलं. दिवसा शाळा आणि बाकीचा वेळ टेनिस. आगासी ह्या अॅकॅडमीचं वर्णन चक्क 'तुरुंग' असं करतो! नवव्या इयत्तेत शाळा सोडून पंधराव्या वर्षीच तो व्यावसायिक खेळाडू झाला आणि सगळ्यांचं लक्ष त्याने आपल्या चमकदार खेळाने आणि पठडीबाहेरच्या वागण्याने वेधून घेतलं.

त्याला टेनिस अगदी मनापासून आवडायचं नाही. इतक्या लहान वयात आपल्या कुटुंबापासून तुटल्यामुळे तो मनाने सैरभैर झाला होता. पण शिक्षणाची हेळसांड झाली होती आणि टेनिस सोडून बाकी काही कौशल्य अंगी नव्हतं. त्यामुळे टेनिस खेळण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्यायही डोळ्यासमोर नव्हता. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे, हे उमजत नव्हतं. मग ती तगमग, ती ओढाताण, बंड करायची अनिवार इच्छा, त्याचे चित्रविचित्र केस, कपडे आणि टेनिस कोर्टवरची आणि बाहेरची अनिर्बध वागणूक ह्यातून प्रकट होऊ लागली.

आपण ह्या खेळाडूंना एकतर टी. व्ही. च्या पडद्यावर हरताना, जिंकताना, आनंदाने नाहीतर दुःखाने रडताना बघतो. वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल येणाऱ्या चांगल्या- वाईट बातम्या वाचतो. पण त्यापलीकडे असणारा खडतर प्रवास आपल्याला कधी फार कळत नाही. बहुतेक खेळाडू अगदी लहान, नकळत्या वयात खेळायला सुरवात करतात. दिवसातला मोठा भाग प्रॅक्टिस, ट्रेनिंग मध्ये जातो. त्यामुळे अपरिहार्यपणे शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. सतत प्रवास, सतत स्पर्धा, हार-जीत आणि त्यासोबत आशा निराशेचा जीवघेणा खेळ. कुटुंबाच्या उबदार चौकटीतून ही पाखरं वेळेआधीच पंख फुटून उडून जातात.

मनाने खंबीर असलेले, विचारांचं-संस्कारांचं पाठबळ असलेले खेळाडू ह्या परिस्थितीतही आपलं ध्येयावरचं लक्ष अढळ ठेवतात. काहीजण मात्र रस्ता चुकतात. हातात पैसा असतो, तारुण्याची रग असते, लहान वयात मिळालेली भरपूर प्रसिद्धीही असते. ह्यांतलं एक कारणही पाय घसरायला पुरेसं असत. मग सगळी एकत्र आल्यावर तर काय?

आगासीचही काही वेगळं झालं नाही. मोठ्या स्पर्धा जिंकताना वारंवार येणारं अपयश, लग्नाचा फसलेला डाव ह्यातून तो नैराश्याकडे,व्यसनाधीनतेकडे ओढला गेला. 'आता हा संपला, मुळात तो तेवढा चांगला खेळाडू नव्हताच' ह्या आवया उठू लागल्या. पण राखेतून जिवंत होणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तो पुन्हा कोर्टवर उतरला. जिंकू लागला. पूर्ण कारकीर्दीत सगळ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि त्यासोबत ऑलिंपिक सुवर्णपदकही जिंकून तो करीयर गोल्डन स्लॅमचा मानकरी झाला.

ज्या आंद्रेला शिक्षण आवडत नव्हत, शाळा म्हणजे तुरुंग वाटायचा. त्यानेच आता व्हेगासमधल्या वंचित मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेता यावे, म्हणून शाळा सुरू केली. आगासीला आता खेळताना 'जिंकण्यासाठी जिंकणे' ह्यापेक्षा महत्त्वाचे ध्येय मिळाले. त्याच्या शाळेसाठी तो टेनिस खेळून निधी जमा करू लागला. त्याच्या बरोबरचे खेळाडू निवृत्त झाले, तरी तो आपल्या कुटुंबासाठी,शाळेतल्या मुलांसाठी खेळत राहिला.

त्याच्या वडिलांनी काहीशी जबरदस्ती करून त्याला सराव करायला लावला, ह्याबद्दलची तीव्र नाराजी ह्या पुस्तकाच्या पानापानातून जाणवते. काहीशा हट्टी, एककल्ली बापाने लहानग्या आंद्रेचं लहानपण 'टेनिस' ह्या वेठीला गच्च बांधून ठेवलं.

हे बरोबर की चूक, ह्या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीप्रमाणे बदलेल. काही दिवसांपूर्वी एका हिंदी सिनेमा संदर्भात अशीच चर्चा झाली होती. कुठल्याही कारणाने का असेना, आगासी टेनिस खेळला. त्याने त्यात उल्लेखनीय यश मिळवलं. म्हणजेच त्याच्याकडे टेनिस खेळण्यासाठीचं कौशल्य, शारीरिक क्षमता नैसर्गिकरीत्या होती. अथक अशा सरावाने ह्या कौशल्याला पैलू पडले. वडिलांचा रस्ता कदाचित चुकलाही असेल. पण त्यांनी जबरदस्ती नसती केली, तर तो टेनिसपटू झाला असता का? काय माहीत?

थोडीशीच मुलं अशी असतात, की ज्यांना आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे फार लहानपणी लख्ख दिसतं. बाकी मंडळी चाचपडत असतात. आई वडील स्वतःच्या वकुबाप्रमाणे निरनिराळ्या गोष्टींची ओळख करून देतात, थोडं ढकलतातही. ओळख करून देणे आणि ढकलणे, ह्यामध्ये अतिशय धूसर अशी सीमारेषा आहे. आपण नक्की कुठल्या भागात आहोत, हा विचार व्यक्तिसापेक्ष आहे. मुलांच्या कोवळ्या शरीरावर आणि मनावर अत्याचार होणे, हे चूकच. त्याबद्दल दुमत नाही. ते होत नाही ना, ही काळजी मोठ्यांनी घेणे आणि आपले आई-वडील ही देखील माणसे आहेत. त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात, ही जाणीव मुलांनी जाणत्या वयात ठेवणे, हा मध्यममार्ग होऊ शकतो.

आपण सगळेच चरितार्थासाठी काम करतो. ती आपल्या आवडीचं असतच, असं नाही. 'ह्या' कामाऐवजी 'ते' काम मला आवडलं असत,असं शंभरातल्या नव्वद लोकांना तरी वाटत असेल. पण आपल्या चित्राची चौकट कशी असावी, हे आपल्या हातात नसलं, तरी त्या चौकटीमधील अवकाशात चित्र कसं आणि कोणतं काढायचं, हे मात्र आपल्याच हातात असतं. आंद्रे आगासीने नावडती चौकट वाट्याला आली, तरी त्याच्या शैलीदार फटकाऱ्यांनी चित्रात अप्रतिम रंग भरले, ह्याबद्दलची खात्री हे पुस्तक वाचून पटते.

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख... आंद्रे माझा पण one ऑफ the फेव आहे..
संप्रस vs अगसी 1995 यु एस ओपन जबरच... शाळेत असताना पाहिलेली

मस्त ओळख.
>>पण आपल्या चित्राची चौकट कशी असावी, हे आपल्या हातात नसलं, तरी त्या चौकटीमधील अवकाशात चित्र कसं आणि कोणतं काढायचं, हे मात्र आपल्याच हातात असतं.>> Happy छान वाक्य आहे.

छान लिहिलंय.
अगासीला टेनिस नको होतं, वडिलांची जबरदस्ती - हे तपशील मला माहिती नव्हते.

चांगलं लिहिलेय

अगासीला टेनिस नको होतं, वडिलांची जबरदस्ती - हे तपशील मला माहिती नव्हते.>>>>> +१

लहानपणी बर्‍याचदा ' ढकलावेच' लागते. पण त्यासाठीही मिनिमम स्पार्क असायला लागतोच. दंगल चित्रपटाची थीम अशीच नाही का? आमीर खानने फोर्सिबली मुलींना कुस्तीत ढकलले नसते तर त्या प्रथितयश पैलवान झाल्या असत्या का? ही ही सत्यकथाच आहे. उस्ताद अल्लरखा हे उसताद झाकीर हुसेन यांना बालपणी रियाज न केल्यास मारायचे. या 'कडक' ट्रीट मेंटचा नतीजा आपण पाहतोच आहोत . अर्थात झाकीरजींनी वडलांचे ऋण कधी नाकारले नाही. व्यवस्थित विचार्पूर्वक ग्रूमिंग सचिनचे च झाले असावे.
आगासी आणि स्टेफी अगदी मेड फॉर इच अदर आहेत....

अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. अगासीची सुरुवातीची बंडखोर वृत्ती बघता टेनिसमध्ये गुंतून राहिला हे ठीकच अन्यथा कुठल्या मार्गाला गेला असता, असे आता वाटते. पांढरे कपडे घालायला लागतात म्हणून आधी विम्बल्डनला चक्क दांडी मारायचा. तिथेच 1992 मध्ये अकल्पितपणे जिंकल्यावर त्याची खरी दखल घेणे सुरू झाले.

स्टेफीचा सहवास ही त्याच्यासाठी सर्वात मोलाची गोष्ट असावी. 1986 ते 99 या तेरा वर्षांत फक्त 3 ग्रँडस्लॅम जिंकल्या आणि स्टेफीशी नाते जुळल्यापासून म्हणजे 1999 ते 2003 अशा चारच वर्षात 5 जिंकल्या आणि 5 वेळा फायनलपर्यंत गेला. स्टेफी भेटण्याआधी दोन वर्षे खूप वाईट गेली त्याला, दुखापती आणि नैराश्य इत्यादीमुळे करियर संपते की काय असे झाले होते.

मुख्य म्हणजे पुस्तकाची मांडणी खूप सुरेख आहे. एका खेळाडूचा प्रवास अगदी समरसून अनुभवता येतो. 'ओपन' आणि स्टीव्ह वॉचे 'आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन' ही खेळाडूंच्या बाबतची दोन सर्वोत्कृष्ट पुस्तके असावीत.

सर्व प्रतिक्रिया देणाऱ्यांचे मनापासून आभार.
मॅगी, तुमची उत्सुकता वाढावी, आणि तुम्ही पूर्ण पुस्तक वाचावं, म्हणून नाही लिहिलं!! (दिवे घ्या!)
स्वामी, मुलांना थोडं ढकलावं तर लागतच. माझ्या मुलाला आग्रहाने शाळेत पाठवलं नसतं, तर तो बहुधा आनंदाने घरी राहिला असता. अक्षरओळख सुद्धा करून घेतली नसती..
फोटो जालावर बरेच आहेत. पण प्रताधिकार मुक्त आहेत, किंवा नाही ह्याची खात्री नव्हती, म्हणून दिले नाहीत. मायबोलीच्या धोरणात बसतील की नाही, अशी शंका वाटली.
अमेय, आता स्टीव्ह वॉने लिहिलेलं पुस्तक मिळवून वाचते.

अप्रतिम पुस्तक आहे हे. आणि परिचयही छानच लिहीला आहे.
पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात आपल्याला एका चँपियन खेळाडूच्या अंतरंगात खेळ चालू असताना काय चालले असते याची झलक मिळते. असेच काहीतरी सचिनच्या आत्मचरित्रात वाचायला मिळावे अशी माझी तरी अपेक्षा होती (उदा. डेझर्ट स्टॉर्म इनिंग्जच्या वेळेसची त्याची थॉट प्रोसेस), पण निराशाच झाली.