चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग २)

Submitted by पद्म on 24 July, 2017 - 02:41

भाग १

आजचा प्रवास संपूच नये असं वाटतंय, खरंच खूप नर्व्हस झालोय. पण अंतर जास्त नसल्यामुळे आम्ही तासाभरातच पोहोचलो. पोहोचताच सर्वात आधी आजीबाबांकडे गेलो, बाबांनी तर फक्त पप्पा सोबत होते म्हणून ओळखलं.

आम्ही गेलो तेव्हा बाबा अंगणातच बसलेले होते, पप्पांनी अंगणात गाडी लावली आणि आम्ही उतरलो. बाबांनी पप्पांना पाहिलं नंतर माझ्याकडे पाहिलं आणि २, ३, ४ कितीतरी क्षण माझ्याकडे पाहत राहिले. लगेच भानावर येत ते मोठ्याने ओरडत घरात पळत सुटले, "ए, दादा बघ कित्ती मोठ्ठा झालाय....."

त्यांचे शंकरपाळे बनवणं चालू होतं, पण सर्व तसंच सोडून आजी पळतच बाहेर आल्या आणि माझं सर्वात नावडतं वाक्य बोलल्या, "कित्ती बारीक झालास रे!!!"

मला या वाक्याची इतकी चिड आहे की, हे वाक्य ऐकायला मिळू नये म्हणून मी वर्षातून एकदाच आणि तेही फक्त दिवाळीलाच घरी जातो. आणि इथे इतक्या वर्षानंतर संभाषणाची सुरुवात याच वाक्याने झाली. पण आजीच्या प्रेमामुळे मी काही जास्त मनावर घेतलं नाही आणि फक्त हसून घरात गेलो.

इथून पुढे माझी खरी परीक्षा चालू होणार आहे, कारण आधीपासूनच मला जास्त बोलायची सवय नाहीये आणि आता काय बोलावं तेही कळत नाहीये.मी फक्त घरात जाऊन एका पाहुण्यासारखा बसलो. एकेकाळी मी हे संपूर्ण घर डोक्यावर घेत असे पण आज इतक्या वर्षानंतर परक्यासारखं वाटत होतं. माझ्याकडे आता इकडे तिकडे बघण्याशिवाय पर्याय नव्हता. घर जसं १५ वर्षांपूर्वी होतं, आजही तसंच आहे, काहीच फरक नव्हता, टीव्ही सुद्धा तोच होता. आजीबाबा जॉब वगैरेबद्दल विचारपूस करत बसले आणि मी फक्त एखाद्या मुलाखतीप्रमाणे जेवढ्यास तेवढे उत्तर देत गेलो. थोड्या वेळाने तेच मला कंटाळले आणि मग पप्पांशी गप्पा मारू लागले. आणि मी फक्त एक श्रोता झालो, अजून काय करणार?

मला आता खरंच टेन्शन आलं की, इथे आजीबाबांशी जास्त बोलता येत नाहीये, सृष्टीशी कसा बोलेल?आणि मी मागच्या १५ वर्षात माझी चुलत बहिण सोडली तर प्रॅक्टिकली कोणत्याच मुलीशी बोललो नाहीये. आता "कुठून हा प्लॅन बनवायची बुद्धी सुचली?", असं वाटायला लागलंय.

बाबांनी बोलताना सांगितलं कि, मुग्धानेपण इथेच एक ब्युटी पार्लर चालू केलाय. मुग्धा बाबांची एकुलती एक मुलगी आणि लग्न करून तिथेच स्थायिक झालीये. बाबा सांगत होते कि, सृष्टीपण आता मुग्धासोबतच काम करते म्हणून. म्हणजे या दोन्ही आता तिथेच भेटतील तर... पण बाबा म्हणाले की, "तिथे तुम्ही काही जाऊ नका सध्या दिवाळीची गर्दी असते, कामात त्यांना नीट बोलताही येणार नाही". हे ऐकून तर मला वाटलं कि, सृष्टीला न भेटताच जावं लागतंय की काय! कारण पप्पांनी सांगितलं असतं, "तिथे जायची काय गरज, आजीबाबांशी भेट झाली ना?" आता सगळं नशिबाच्या हातात.

काही वेळ बसून आम्ही उठलो आणि पप्पांच्या मित्राच्या घरी जायला निघालो. आधीच आम्ही येणार हे कळवल्यामुळे काका आज घरीच होते. ईथेपण तसंच जेवढ्यापुरतं तेवढं बोललो. काकू किचनमध्ये चिवडा करत होत्या; म्हणून त्यांनी मला तिथेच बोलावलं. मला तिथे सृष्टीबद्दल बोलू कि नको, काहीच कळत नव्हतं. त्यांनीच मग मला बोलतं केलं!
"कुठे असतोस सध्या?" काकुंनीच सुरुवात केली.

"मुंबईला!" एका शब्दात उत्तर.

मग पुढचा प्रश्न त्यांनी स्पेसिफिक विचारला, "सृष्टीची आठवण वगैरे येते कि नाही?", त्यांनी स्वतःबद्दल न विचाराता सृष्टीसाठी हा प्रश्न विचारला, मी पुरता गोंधळून गेलो..

मीपण काहीतरी शब्द जुळवून उत्तर दिलं, "हो येते ना! शेवटी ती माझी पहिली मैत्रीण होती.."

"जाताना तिला भेटून जा. तू भेटलास तर खरंच खूप बरं वाटेल तिला."

"हो नक्कीच, तिला न भेटता कसा जाईल?" आता मीपण काकुंशी मोकळेपणाने बोलत होतो.

थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग तिथून निघालो. आता प्रश्न असा होता, पप्पांना कसं सांगायचं की चला सृष्टीला भेटायला जाऊ म्हणून? कारण बाबांनी नाही सांगितलं होतं. पण पप्पाच बोलले, "तुझी इच्छा असेल तर मुग्धाला भेटायला जायचं का? तूला पाहून खरंच आनंद होईल तिला."

मी बाळ असतांना मुग्धा मावशी आमच्याच घरी असायची, मला खेळवताना तिला खूप मजा वाटायची; म्हणून मला भेटून ती खरंच खुश झाली असती. मग काय नॉन स्टॉप पार्लर गाठलं. पार्लरला बाहेर एक मावशी बसल्या होत्या, पप्पाच त्यांना बोलले कि, मुग्धा ताईंना बाहेर बोलावता का? त्या मावशी आत गेल्या आणि मुग्धा मावशी बाहेर आली. तीसुद्धा १५ वर्षांपूर्वी लग्नाआधी जशी दिसायची, आजपण तशीच दिसत होती. तिनेपण बाबांसारखं आधी पप्पांकडे पहिलं आणि नंतर माझ्याकडे कितीतरी वेळ पाहात राहिली आणि जोरात आतल्या दिशेला तोंड करून हाक मारली, "ए सृष्टी, बाहेर ये! शेंड्या आला बघ...."

मला ती या नावाने हाक मारेल, याचा मी विचारही केला नव्हता. शेंड्या नाव ऐकून थोडं वेगळंच वाटलं, पण लहानपणी मला शेंडी असल्यामुळे ती मला शेंड्याच म्हणायची. पण आता मोठा झाल्यावर आणि तेही सृष्टीसमोर ह्या नावाने हाक मारली म्हणून जास्तच विचित्र वाटलं.

आता मी फक्त सृष्टी येणार त्या दिशेला पाहत होतो आणि ती एकदाची बाहेर आली! मी तिच्याकडे पाहतच राहिलो, माझा विश्वासच बसत नव्हता की, हि तीच सृष्टी आहे म्हणून. खरंच खूप सुंदर दिसत होती. पण ती आली आणि एका कोपऱ्यात उभी राहिली, काहीच बोलली नाही. आणि मीपण पप्पा आणि मावशीसमोर तिच्याशी काहीच बोललो नाही. मावशी फक्त सध्या काय करतो वगैरे विचारात होती. थोडा वेळ बोलून झाल्यावर मी आणि मावशीने एकमेकांचे नंबर्स घेतले आणि आम्ही तेथून निघालो.

२-३ महिन्यापासून बनवलेला प्लॅन फेल झाला होता. तिच्याशी काहीच बोलता आलं नाही म्हणून स्वतःवरच संताप येत होता. पण करणार काय यात कुणाची काहीच चुकी नव्हती, माझाच मितभाषी स्वभाव नडला होता. आता जाताना फक्त तिचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत होतो, तोही व्यवस्थित आठवत नव्हता; कारण तिचा चेहराही नीट पाहू शकलो नव्हतो. आता माझी खरंच खूप चिडचिड होत होती.

आता घरी येऊन दुसऱ्या काहीतरी कामात मन रमवण्याचा प्रयत्न करत होतो. पण इतक्या लवकर शांत होईल ते मन कसलं? रात्री झोपताना पण तेच विचार येत होते, म्हणून झोपही लागत नव्हती...

असाच डोळे बंद करून पडलो होतो, तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सऍप वर मेसेज आला, "nice dp".

मी विचारलं, "may i know, who's this?"

"सृष्टी!"

भाग ३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मितभाषी मुलांची मुलीशी बोलतेवळी सुरूवातीला अशीच स्थिती असते..समोरची मुलगी दिलदार असेल तर पुढे जाऊन छान मैत्री फुलते पण तसं नसेल तर सगळंच थांबतं.
मस्त चाललीये..पुभाप्र