व्हेज फिंगर,चीज के टुकडे आणि कसूरी कबाब !

Submitted by उदे on 20 July, 2017 - 04:15

बाहेर धुंवाधार पाऊस पडत असताना बटरमधे हलकेच शॅलो फ्राय केलेला साधा पाव जरी खाल्ला तरीदेखील मजा येते. मग अशा बहारदार वातावरणात तुम्हाला जर का व्हेज फिंगर,चीज के टुकडे खायला मिळाले तर काय मजा येईल ते बघायलाच नको. आणि वर कसूरी कबाब देखील 'उडवायला' मिळाले म्हंजे तर चक्क 'सोने पे सुहागा!'

गेल्या ३ दिवसात २ वेळा आम्ही दादरच्या ग्रेट पंजाब (जीपी ) मधे वरील पदार्थ खायची संधी साधली. तुम्ही म्हणाल हे हे जीपी प्रकरण काय आहे?
IMG-0077.JPEG
जेंव्हा आम्ही वडे,उसळ,मिसळपाव यातून अंशतः बाहेर आलो, तेंव्हा आमची पावले हळूच जीपीकडे सरकली. साल नक्की आठवतं. १९८३. कारण मी बँकेत लागल्याची पार्टी तेंव्हा मित्रांना दिली होती जीपीमधे. ग्रेट पंजाब हे आम्हाला 'तसं' जवळ आणि खायला काहीतरी वेगळं असं देणारं रेस्टॉरंट होतं . तसं ते आजही आहे म्हणा!

१९९० नंतर स्वातीच्या माझ्या फेऱ्या जीपीत वाढायला लागल्यावर एक दिवस वेटरला आम्ही म्हटलं,आपल्याकडे पावाचा कोणता छान पदार्थ मिळतो?
त्यावर त्या वेटरने चांगलाच उशीर लावत 'व्हेज फिंगर' हि एरवी बाहेर कुठेही न मिळणारी छानशी डिश आणून दिली होती! पावाची लांबसडक १० बोटं एका डिशमधे ठेवली तर कसं दिसेल? तशी ती डिश केवळ लांबूनच्या दर्शनानेच छान दिसत होती! त्यावर पसरलेलं लाहोरी सॉस लिंबू पिळल्यावर चमकून छान दिसत होतं. दोन बटरभिजल्या पावाच्या चिमटीत कोबी,गाजर,बटाटा,सिमला मिरची, नूडल्स यांचं चायनीज पद्धतीने झालेलं मिश्रण तोंडात जाताच,अगोदरच सुटलेल्या तोंडातल्या पाण्यात विरघळून जात असे. तो आनंद अहाहा उद्गारांच्याहि पुढचा ठरावा या योग्यतेचा होता. या वरील वर्णात अजूनही बदल झालेला नाही. फक्त काळानुसार डिशमध्ये फरक झालाय. (फोटो पहा.)

चीज के टुकडे हा देखील व्हेज फिन्गरचा आतेभाऊ म्हणावा असा दुसरा थोडासा वेगळा पदार्थ. दोन पावांच्यामधे चीज घालून तळलेले हे टुकडे देखील आमच्यासारख्या पावाचे पदार्थ आवडणाऱ्यांना खुश करून टाकतात.

परंतु कसूरीकबाब हि जीपीची खासियत ठरावी. चिकनटिक्का काय सर्वत्रच मिळतो. बहुतेक ठिकाणचा बऱ्याच जणांना बरा ही वाटतो. जीपीतला देखील बरा या कॅटेगरीतलाच आहे.चिकनटिक्का भन्नाट मिळायचा कुलाब्याच्या ' गोल्डन गेट' या आता बंद झालेल्या अप्रतिम हॉटेलमधे. लुसलुशीत, राजेशाही, छान मसाला मुरलेला चिकनटिक्का तेथे मिळायचा. असो. कबाब देखील बऱ्याच हॉटेलमधे मिळतात. परंतु 'कसुरीकबाब' हि जीपीत मिळणारी डिश 'खास' कॅटेगरीत मोडणारी आहे.

कसुरी (मेथी) चा अप्रतिम मोहक असा सुवास, चिकनमध्ये भरलेला खास असा मसाला जेंव्हा तुम्ही तोंडात टाकता, तेंव्हा निर्माण झालेल्या चवीची उसळी निमिषार्धात तुम्हाला भारून टाकते.आणि तुम्ही 'कसुरीकबाब' खाण्यात रंगून जाता.

खरं तर या वर्णन करायच्या नाही तर प्रत्यक्ष्य खाण्याच्या गोष्टी आहेत. तेंव्हा जर का कधी दादरच्या पूर्व भागात फिरत असाल, तर जरूर वाट वाकडी करून हे नेहेमीपेक्षा वेगळे मिळणारे पदार्थ जीपीत टेस्ट करून या.

एवढी वर्ष खाऊन आम्ही कंटाळलो नाही यावरून काय ते समजा.

------------उदय ठाकूरदेसाई.
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
ग्रेट पंजाब मधे जेवायला जातो पण ह्या डीशेस कधी मागवल्या नाहीत आम्ही. पुढल्या वेळी मागवु. Happy
व्हेज फिंगर्सचा फोटो यम्म्मी. चीज के टुकडे आणि कसुरी कबाब चा फोटो पण द्यायला हवा होता.

होत असे कधी कधी की खायला सुरवात केल्यावर आठवते, अरे फोटो काढायचा राहूनच गेला की....

मीसुद्धा १९८२ च्या दरम्यान ग्रेट पंजाबमध्ये जात होतो. आता बऱ्याच वर्षात तिकडे गेलो नाही. तुमच्या लेखाने आठवण आली.

डिशेसचं वर्णन छान केलंय. चीज माझे आवडते. चीज के टुकडे खाऊन पहायला पाहिजे.

सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे बोलक्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
उठादेसाई .कॉम या माझ्या वेबसाइटवर सर्व फोटो टाकले आहेत.
इथे अपलोड का होत नाही ते बघतो.

वाह मस्त... मजा आली वाचून.. असं वाटलं की लिहिताना हे पदार्थ आठवल्याने तुमच्या तोण्डाला सुटलेल्या पाण्याची शाई करून लिहीलंय.. असं ते पोहोचलंय Happy

आता आपल्या भरवश्यावर तिथे जाऊन हेच खाणार.. (Y)