एस. एस. रामदास, समुद्राच्या गर्तेतील ७० वर्ष.

Submitted by कल्पतरू on 15 July, 2017 - 02:12

एस. एस. रामदास बोटीला या १७ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा. तूनळीवर याच घटनेवर मी एक लहान बायोग्राफी बनवले त्याची लिंक खाली देत आहे.

https://youtu.be/rGC2r-RawQU

हा लेख लिहिण्याचं प्रमुख कारण म्हणजे एस. एस. रामदास बोटीच्या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हडी फारशी माहिती नाही खास करून नव्या पिढीला. मीडिया सुद्धा थोड्या फार प्रमाणात याला कारणीभूत आहे. फालतू TRP घेणारे विडिओ तासंतास TV चॅनेलवर दाखवायला याना वेळ आहे, आजकाल मराठी चॅनेलसुद्धा हिंदी चॅनेलच्या पावलावर पाऊल ठेवायला लागले. असो, तर आपण वळू आपल्या एस एस रामदासकडे. लवकरच एक चित्रपट या घटनेवर येणार आहे असं ऐकलंय.
१७जुलै १९४७ आषाढी अमावासेचा तो दिवस होता. म्हणजेच आपली गटारी. गटारी म्हणजे या सणाला आपले लोक किती उत्साही असतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. तर अशा या उत्साही १००० प्रवाशांना घेऊन एस एस रामदास मुंबई ते रेवस अशा प्रवासाला निघाली होती. कोणीतरी शेख सुलेमान नावाचा इसम बोटीचा कॅप्टन होता. सिंदिया स्टीमशिप कंपनी मुंबई ते गोवा असा समुद्रप्रवास प्रवाशांना घडवून आणत असे. त्यासाठी त्यांच्याकडे ७-८ जहाजांचा ताफा होता. ही जहाजं त्यांनी इंडियन नेव्हीकडून दुसरं महायुद्ध संपल्यावर घेतली होती. मुळातच आकाराने ही जहाजं प्रचंड होती. त्यामुळे ही जहाजं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ होती. एस एस रामदास ही त्यापैकीच एक. १९३६ साली बांधल्या गेलेल्या या अजस्त्र जहाजाचं वजन ४०६ टन होतं. कोकण किनारपट्ट्यावर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या तीन मजली जहाजामध्ये साधारण १२००-१५०० प्रवाशी वाहून नेण्याची प्रचंड क्षमता होती. रामदास बोटीच्या अवाढव्य आकारामुळे पाऊस असो व वादळी वारा, प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करत असत.
१७ जुलै १९४७ हा दिवस भारतीय जलवातुकीच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस ठरला. पावसाने सलग दोन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीला झोडपून काढलं होतं. त्या तसल्या वादळी वातावरणात रामदास भाऊंच्या धक्क्यावर रेवसला जाण्यासाठी उभी होती. रामदास बोटीची त्या वर्षीच नाविक अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली होती आणि बोट सुस्थित असण्याचे प्रमाणपत्रही तिला देण्यात आले होते. प्रचंड पाऊस आणि वादळ यामुळे बोट सोडावी कि नाही या विचार कप्तान विचार करत उभा होतं. बोटीवरचा झेंडा जोरजोराने पडफडात सांगत होता, आज जाऊ नका दिवस वैऱ्याच्या आहे. तसं पाहायला गेलं तर वातावरणाचा एकंदर रूप रंग पाहून बऱ्याच प्रवाशांनी आपला प्रवास रद्ध केला होता. पण काही नेहमीचे सराईत प्रवासी घरी जाण्यास आतुर झाले होते. त्यांनी कप्तानची समजूत काढली आणि अखेर १०.३०ला बोटीने नांगर उचलला आणि दीड तासाच्या प्रवासासाठी रेवसकडे मार्गस्थ झाली. साधारण पाऊण तास झाला असेल पावसाचा जोर अचानक वाढला, सोबतीला वारा वादळ धावून आले, रामदास हेलकावे खात लाटांना कपात काशाच्या खडकाजवळ आली. रेवसजवळ खोल समुद्रात एक बेट नैसर्गिकरित्या वर आलंय. चोहोबाजूनी अकळविक्राळ समुद्र आणि मधेच एखाद्या नववधूच्या कपाळावर टिकली शोभावी एवढं लहानसं हे बेट गल आयलंड म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. तर अशा या खडकाला डाव्या बाजूने ओलांडलं की १५-२० मिनिटात रेवस येणार होतं. परंतु एव्हाना अमावसेची उधाणाची भरती सुरु झाली होती आणि लाटांचे उंच तडाखे बोटीवर आदळू लागले होते. एका अजस्त्र लाटेच्या धडकेने बोट डाव्या बाजूला कलंडली. आता मात्र प्रवासी घाबरले. खालच्या डेकवरील प्रवासी वर आले आणि ज्याबाजूने लाटांचे तडाखे आदळत होते त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उभे राहिले. सगळा भार एका बाजूला आल्यानं बोट एका बाजूला कलंडली. घाबरलेल्या कप्तानने बोट वळवली तेव्हड्यात एका महाकाय लाटेच्या तडाख्यात आदळून बोट उलटीपालटी झाली, बोटीवर हाहाकार उडाला.
याच दिवशी सकाळी ८.३० वाजता कोळ्यांची पाच गलबतं २,००० रुपयांची मासोळी घेऊन मुंबईकडून रेवसला येण्यास निघाले होते. रेवसवरून निघाल्यावर साधारण १५-२० मिनिटांनी त्यांना वातावरणात फरक दिसला. दर्या तुफान झाला होता. आकाशात एकाएकी काळेकुट्ट ढग येऊन अंधार पसरला होता. वादळाची चिन्हे दिसू लागली होती, त्यामुळे त्यांनी आपली गलबते पुन्हा रेवस बंदरात आणली, परंतु थोड्या वेळाने पुन्हा वातावरणात चमत्कारिकरित्या बदल झाला. सृष्टीने सौम्य रूप धारण केले. आता मुंबईस जाण्यास हरकत नाही असे समजून त्यांनी आपली गलबते पुन्हा समुद्रात हाकली. साधारण ३-४ मैल आले असतील नसतील तोच त्यांना एक भीषण दृश्य दिसलं. असंख्य माणसं पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असून अनेक प्रेत इकडे तिकडे विखरलेत असं विचित्र दृश्य त्यांना दिसलं. आपल्या जहाजावरची २,००० रुपयांची मासोळी समुद्रात फेकून त्यांनी ७५ जणांचा जीव वाचवला. या ७५ जणांना घेऊन ते पुन्हा रेवस बंदरात आले. रेवसच्या कस्टम अधिकाऱ्यांनी हि बातमी तारेने संबंधितांना कळवण्यासाठी अलिबागला धाव घेतली. लाईफ जॅकेट घेण्याचीही सवड न देता सागराने रामदास गिळंकृत केली होती. १००० प्रवाशांपैकी साधारण ६५० जणांना जलसमाधी मिळाली. २५० सुदैवी लोक या दुर्घटनेतून वाचले.काही पोहत तर काही फळकुटांचा आधार घेत. या बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक कोकणातील असल्याने सगळी कोकणकिनारपट्टी हवालदिल झाली होती. येत्या १७जुलैला या दुर्घटनेस ७० वर्ष पूर्ण होतील. कशाचा खडक आजही समुद्राच्या तळाशी असलेल्या रामदास बोटींसाठी अश्रू ढाळत उभा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या घटनेशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. माझं गाव मांडवा पासून 10 मिन वर कोप्रोली. त्या दिवशी माझ्या चुलत आजोबांचं ही तिकीट होतं रामदास चं. काही कारणाने त्यांची बोट मिस झाली. ते तसेच मग घरी गेले.
त्याकाळात फोन वगैरे चं इतकं प्रस्थ नव्हतं.
काय झालं वगैरे आजोबांना काहीच कल्पना नव्हती.
पण कोप्रोली मध्ये मात्र आज नारायण रामदास बोटीतून येणार होता पण बोट बुडाली म्हणून दुःख सुरू झाले.
योगायोगाने त्या बोटीवर आमच्याच गावातले अजून एक गृहस्थ होते. ते पोहत पोहत पहाटे 3 वाजता गावात दाखल झाले. मग जेव्हा त्यांनी सांगितलं की नारायणाची बोट चुकली तेव्हा सर्वाना धीर आला.
याच बोटीवर मांडवा गव्हर्नर ची गरोदर मुलगी ही प्रवास करत होती. ती जीव वाचवून पोहत पोहत येत असताना आलेल्या मोठ्या लाटेने तिचं डोकं काश्याच्या खडकाला आपटून ती गतप्राण झाली.
ही गोष्ट जेव्हा मांडवा गव्हर्नर ला कळली तेव्हा त्याने तिचं प्रेत मिळेपर्यंत या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही कारण ती त्या काळातली नंबर वन स्वीमर होती.
ती मांडवा वरून गेट वे पर्यंत पोहत जायची.
रामदास मधली प्रेतं दिवस , मुरुड , हर्णे , दापोली किनाऱ्याला सापडत होती.
माझे sakkhe आजोबा कोप्रोली आणि मांडवा च्या मध्ये असणारया बोडणी या गावात मेंढरं चरायला घेऊन गेलेले तिथपर्यंत रामदास चा आवाज आला होता त्यांना.
माझे चुलत आजोबा तेव्हा 25 वर्षाचे होते आणि माझे आजोबा 9 वर्षाचे होते.

नमस्कार, मी मायबोलीवर नवीन आहे. येथील लेखन खूप वेळा वाचले आहे ते मला आवडले आहे.

रामदास बोटीला झालेल्या अपघाताबद्दल बरेच काही ऐकले होते. पण ते सर्व अपूर्ण होते. परंतू येथे त्या घटनेचे पूर्ण वर्णन वाचून निशब्द झाले आहे.

खरण्च या घटनेवर त्रोटकच वाचण्यात आलेय. हा लेख माहितीपुर्ण. अजूनही जाणून घ्यायची ईच्छा आहे. कोकणामुळेही एक सॉफ्ट कॉर्नर आहेच. तुम्ही दिलेली लिण्क नंतर चेक करतो. चित्रपट खरेच बनायला हवा आणि तो चांगल्या दिग्दर्शकाने अभ्यासून बनवायला हवा..

एका भयंकर आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊनही फारसे कुणाला माहित नसलेल्या घटनेविषयी या लेखातून आपण सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद. यावर एक मराठी चित्रपट पण येऊ घातला होता असे वाचले. त्याचे पुढे काय झाले माहित नाही. असो.

या घटनेविषयी विकिपीडिया व अन्यत्र पण माहिती आहे. या घटनेतून प्रत्यक्ष वाचलेले विश्वनाथ शांताराम मुकादम उर्फ बारक्या शेठ मुकादम यांची एक मुलाखत यू ट्यूब वर आहे:

https://www.youtube.com/watch?v=Pze9Eg5cFI0

या मुलाखतीतून खालील माहिती मिळते.

बोट सकाळी साडेसात वाजता निघाली. सातशे प्रवासी होते. वादळ असे नव्हते. थोडा पाउस होता. पण लाटा होत्या. साडेआठ वाजता काश्याच्या खडकाजवळ मोठ्या लाटा होत्या. अशाच लाटेमुळे प्रवासी घाबरून एका बाजूला आले. त्यामुळे बोट पलटी झाली. जीवाच्या आकांताने आरडाओरडा झाला. अनेकजण बुडाले. सत्तर ऐशी लोक वाचले. बारक्या शेठ मुकादम हे तेंव्हा १२ वर्षाचे वर्षाचे होते. लाईफ जाकेट घालून त्यांनी समुद्रात उडी मारली. जवळ जवळ बारा तास ते समुद्रात तरंगत होते.

>याच दिवशी सकाळी ८.३० वाजता कोळ्यांची पाच गलबतं २,००० रुपयांची मासोळी घेऊन मुंबईकडून रेवसला येण्यास निघाले होते.
तुम्हाला हे "याच दिवशी सकाळी ८.३० वाजता कोळ्यांची पाच गलबतं २,००० रुपयांची मासोळी घेऊन रेवसकडून मुंबईला येण्यास निघाले होते." असे म्हणायचे आहे का?
ही घटना मला तुमच्या लेखामुळे कळाली. इथे मायबोलीवर लिहल्याबद्दल धन्यवाद.

अत्यंत दुर्दैवी घटना होती ही... एकूण आणि आमच्या घरासाठी देखिल. माझ्या आजीचे वडील म्हणजे माझे पणजोबा ह्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले Sad

जिज्ञासा ओह..
मी कालच ईथे विचारणार होतो की मायबोलीवर कोणी आहे का त्या आसपासच्या गावातले आणि तेथील जुन्या स्थानिक लोकांकडून काही ऐकलेले किस्से कोणाला माहीत आहेत का..

माझे आजोबा ह्या बोटीवर होते. त्यांनी बोट बुडायच्या आत उडी मारली आणि पोहत राहिले, एका होडीने त्यांना वाचवले.

त्यांची बहीण सुद्धा असणार होती बरोबर, ऐन वेळी तिचं कँसल झालं, नाहीतर तिला सोडून त्यांना उडी मारता आली नसती.

या घटने बद्दल मी जे ऐकले त्या प्रमाणे,
बोट बुडून दिवस झाला तरी मुंबई आणि रेवस सोडून इतर ठिकाणी माहिती मिळाली नव्हती,
दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर प्रेते येऊ लागली तेव्हा किनार पट्टी वरील इतर गावात काहीतरी दुर्घटना झाली आहे हे कळले,
In all भयानक घटना

बापरे, फारचं विदारक सत्य घटना आहे ही. Sad

इथे वाचल्यामुळेच कळली नाहीतर आजपर्यंत हे एवढे मोठे सत्य माझ्यासाठी तरी अंधारातच होते.

दुर्देवी, मन विषण्ण करुन टाकणारी घटना. आधी वाचलं होतं बरंच पण या लेखातून आणि प्रतिसादातील दुव्यांमधून अधिक माहिती मिळाली.

अत्यंत दुर्दैवी घटना होती ही...मन विषण्ण करुन टाकणारी ..
रामदास बोटीला झालेल्या अपघाताबद्दल बरेच काही ऐकले होते. पण ते सर्व अपूर्ण होते. परंतू येथे त्या घटनेचे पूर्ण वर्णन वाचून निशब्द.....

भारताच्या नाविक इतिहासातील आणि आमच्या कुटुंबियांच्या दृष्टीने देखिल एक अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशकारक आठवण.

माझ्या आईचे आजोबा (वडिलांचे वडील) या बोटीतून रेवसला येण्यासाठी निघाले होते आणि जीव गमावलेल्या लोकांपैकी एक होते.

हा प्रतिसाद अमानवीय धाग्यावर टाकलाय पण धागा वर आलाय आणि आज 71 वर्ष पण पूर्ण होत आहेत म्हणून परत इथे पण टाकतो

१२वीच्या सुट्टीत माझ्या मावशीच्या सासरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या शेजारी घर होतं त्या घरातील आजोबा या अपघातातील वाचलेल्यांपैकी एक होते. तेव्हा ते लहान होते आणि आपल्या बाबांबरोबर घरी यायला निघाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी फक्त पाऊस पडत होता वादळ वगैरे न्हवतं. निघाल्यावर थोड्याच वेळात वादळी वारे वाहू लागले. काशाच्या खडकाजवळ बोट आली आणि चित्रच पलटलं. एका बाजूने लाटा बोटीवर आदळायला सुरवात झाली त्यांचा तडाखा एव्हडा होता कि बोटीतली माणसं जी घाबरलेली होती त्यांचा धीर सुटला आणि बायका मुलांची रडारड सुरु झाली. ज्या बाजूने लाटा बोटीवर आदळत होत्या त्याच्या विरुद्ध दिशेला सगळे जमा झाले आणि कलंडलेली बोट एका लाटेने पलटी झाली. आजोबांचे बाबा या अपघातातून वाचले नाहीत पण आजोबाना एका फळकुटाचा आधार मिळाला, त्या फळकुटाला पकडून ते किनाऱ्याला लागले.अनेक लहान मोठया माशांनी त्यांच्या हातापायाला चावे घेतले, त्याच्या खुणा पण त्यांनी दाखवल्या, नंतरचे बरेच दिवस त्यांची परिस्थिती वाईट होती, म्हणजे झोपल्यावर या अपघाताची स्वप्न पडायची, कधी रामदास बोट बुडालेली दिसायची तर कधी त्या वादळातून रामदास वाचली आणि बोटीवरचे सगळे जल्लोष करताना दिसायचे तर कधी फळकुटाचा आधार त्यांनी घेतलाय आणि बाजूला बाबाही आहेत असं स्वप्न पडायचं.

खूपच दुर्दैवी घटना... अमानवीय वर वाचली... धन्यवाद कल्पतरु लिहिल्याबद्दल...कारण ह्याची इतकी मोठी घटना असून खूपजणांना माहिती नव्हती

आमच्या शेजारचे आजोबा ह्या बोटीने यायला निघाले होते. पण त्यांना उशीर झाल्याने बोट चुकली. नंतर ह्या दुर्घटनेबद्दल समजले. तेव्हा आजोबांचे नुकतेच लग्न झाले होते. आजोबांना दीर्घायुष्य लाभले .