गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)

Submitted by रसप on 29 June, 2017 - 02:50

'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो. पहिल्या बैठकीत ३, दुसऱ्या बैठकीत ४ आणि तिसऱ्या बैठकीत उरलेले तीन, असा पहिल्या सीजनचा फडशा पाडत असतानाच माझ्या लक्षात आलं की हे अद्भुत आहे.

आता सहाच्या सहा सीजन पाहून झाले आहेत. त्यांवर बराच विचारही करून झाला आहे. आता काही तरी लिहिणं भाग आहे !
game-of-thrones-800x445.jpg
------------------------------------------------------------------------------------

सात प्रांत. त्यांचे सात मांडलिक राजे आणि सगळ्यांचा मिळून एक राजा. ह्या सगळ्या ठिकाणी एक-एक करून माजत गेलेली अनागोंदी, अराजक.
सत्तापालट, बंड, गद्दारी, मुत्सद्देगिरी सगळं एकाच वेळी सुरु आहे.
युद्धखोर आहेत, कट्टरवादी आहेत, धर्मांध आहेत, समाजकंटकही आहेत.
कुणी समजूतदार आहेत, कुणी कपटी, कुणी तत्वनिष्ठ, कुणी दांभिक, कुणी नीच, कुणी निष्पाप, कुणी शूर, कुणी पुचाट.
मेहनती, ऐतखाऊ, हुशार, मूर्ख, कर्तबगार, नालायक, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, निष्ठावंत, विश्वासघातकी असे सगळे आहेत.
युद्धखोर आहेत. शांतताप्रिय मुत्सद्दी आहेत. महत्वाकांक्षी आहेत. अल्पसंतुष्टही आहेत.
ह्या सगळ्याच्या जोडीने चमत्कार, अद्भुत, अमानवी, अवास्तव घटना व व्यक्तीसुद्धा आहेत.

हा एक प्रचंड मोठा पसारा आहे. दूरवर पसरलेला. बर्फापासून समुद्रापर्यंत आणि पर्वतरांगांपासून वाळवंटांपर्यंत. ज्यात माणसाच्या जोडीने कावळे, कुत्रे, लांडगे, घोडे, हत्ती, ड्रॅगन्स, भूतं, राक्षस हे सगळेच आहेत.
माणसंसुद्धा हर तऱ्हेची आहेत. उच्च जातीची, कनिष्ठ जातीची, गरीब, श्रीमंत, विकसित, रानटी, औरस आणि अनौरस !

हा एक शोषक वि. शोषित असा अनादीकाळापासूनचा संघर्षही आहे. एका मोठ्या प्रतलावर. भरपूर उपकथानकांचं मिळून एक कथानक बनत आहे.
कथानक बदल्याचं, संघर्षाचं, जीवन-मरणाचं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्तित्वाच्या लढाईचं.
भरमसाट व्यक्तिरेखा आहेत. त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:ची एक शैली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक आलेख आहे. चढता-उतरता. कुणाचं महत्व वाढत जातं, कुणाचं घटत जातं, तर कुणी सगळ्या गदारोळात आपलं स्थान व महत्व शिताफीने टिकवूनही आहे. ह्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाला छटा आहेत. पांढऱ्यापासून काळ्यापर्यंत जाणाऱ्या रेषेवर वेगवेगळ्या जागांवर ह्या व्यक्तिरेखा उभ्या आहेत. त्या अधूनमधून आपली जागा बदलतातही !
नितीमत्ता, माणुसकी वगैरे काहींच्या ठायी आहेत. मात्र अस्तित्वाचा संघर्ष असा काही पेटला आहे की स्वत:च्या नकळत किंवा मनाविरुद्ध त्यांना दाबून ठेवायला लागत आहे. इतक्या विविध व्यक्तिरेखा असूनही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित उभी राहते. ह्यासाठी लागणारा वेळ त्यांनी घेतला आहे. कुठलीही घिसाडघाई केलेली नाही.

हे एक महानाट्य आहे. त्याच्यासाठी मोठा पडदा हवा.
ह्याची तांत्रिक सफाई अतुलनीय आहे. अविश्वसनीय घटना खऱ्याखुऱ्या वाटतात. व्हीएफएक्सचं ओझं पडद्यावरची प्रत्येक व्यक्ती लीलया वागवते. हे त्यांचं एकमेकांशी एकरूप होणंसुद्धा एक अद्वैतच आहे !
पार्श्वसंगीतात स्वत:चा एक आत्मा आहे. खासकरून शीर्षक संगीत तर काळजाचं ठाव घेणारं आहे.

ह्या सगळ्याला दोन गालबोटं आहेत -
१. 'अतिरंजन' - अनावश्यक हिंसा व नग्न दृश्यांची भरमार केली आहे. इतकी जास्त की त्याचं अप्रूपही वाटेनासं व्हावं. हा भडकपणा म्हणजेच प्रभावी चित्रण, असा एकंदरच आजच्या फिल्ममेकिंगचा प्रामाणिक समज असल्याने कंठशोष वृथाच आहे, तरी !
२. शीर्षक - 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव. मला स्वत:ला हे एखाद्या व्हिडियो गेमचं थिल्लर नाव वाटतं. कथानकातली काव्यात्मक भव्यता ह्या नावात औषधापुरतीसुद्धा जाणवत नाही. लेखक जॉर्ज रेमंड मार्टिनच्या ज्या पुस्तक-मालिकेवर ही मालिका आधारलेली आहे, त्या 'अ सॉंग ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर' मधल्या सगळ्या पुस्तकांची नावं खूपच आकर्षक आहेत. (इच्छुकांनी गुगलावे.)

असो.
अजूनही काही उणीवा आहेत. कथानकात अगदी सोयीस्करपणे काही सुटे धागे आहेत, काही खड्डे किंवा भगदाडंसुद्धा आहेत. पण उणीवा आहेत म्हणून आवडू नये, असं असलं, तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी ! आपल्याला स्वत:सकट अखिल विश्वातलं काही म्हणता काहीच आवडायला नको, नाही का ? उणीवा सहजपणे स्वीकारल्या जातील इतकी ताकद उर्वरित भागात असली पाहिजे. ती असली, तर ती निर्मिती यशस्वी म्हणायला हरकत नसावी.
हा 'गेम ऑफ थ्रोन्स' त्याच्यातल्या उणीवांसह आवडतो. त्यातले चांगले-वाईट सगळे लोक आपल्याला आवडतात. त्यांचे जय-पराजय, त्यांचे अंत हे सगळं आपण एकाच उत्सुकतेने पाहतो. त्याची भव्यता थक्क करते. हे एक अद्भुत सांघिक कार्य आहे, हे पदोपदी जाणवत राहतं.

१६ जुलैपासून पुढचा सीजन सुरु होतो आहे. आत्तापर्यंत सहा सीजन झाले आहेत. प्रत्येक सीजनमध्ये १० भाग. प्रत्येकी साधारण ५०-५५ मिनिटांचे. सुट्टीच्या दिवसांचा योग्य उपयोग व उर्वरित दिवसांत थोडंसं जागरण करून हा बॅकलॉग भरून काढता येऊ शकेल. मेहनतीचं काम आहे. पण एकदा लिंक लागली की आपोआप होत जाईल आणि पूर्ण झालं की दिलेल्या वेळेचं चीजच झालं आहे, हीच भावना असेल. प्रयत्न करून पहा. जरी जमलं नाही, तरी हरकत नाही. जसे सहा बाकी आहेत, तसेच सात बाकी राहतील. आठवा सीजन सुरु होईपर्यंत तरी हे नक्कीच पाहून होऊ शकेल. आत्ता फक्त सुरुवात तरी कराच !

दिग्दर्शन, लेखन, निर्मिती, अभिनय, तंत्रज्ञान, संगीत वगैरे सर्व बाबतींतली फौज भली मोठी आहे. मी कुणाचंच नाव घेणार नाही कारण कुणाचंही नाव न घेणं अन्याय असेल आणि सगळ्यांचा उल्लेख करायचा तर पाल्हाळ संपणार नाही !
मुद्दामच कथानकाविषयीही काहीही नेमकं लिहिणं टाळतो आहे ह्याची दोन कारणं -
१. साथ भागांचं कथानक एका लेखात लिहिणं अशक्य आहे आणि लेख-मालिका लिहिण्यासाठी सध्या वेळ नाही.
२. बऱ्याच लोकांनी अजून पाहिलेलं नाहीय, त्यांनी पाहावं अशी इच्छा आहे.

आणि अर्थात, सातव्या भागापासून मालिका सुरु करता येईलच !

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/06/blog-post.html

got-fi-1.jpggot-fi-1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. शीर्षक - 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव. मला स्वत:ला हे एखाद्या व्हिडियो गेमचं थिल्लर नाव वाटतं. <<<<<<<
लेखक जॉर्ज रेमंड मार्टिनच्या ज्या पुस्तक-मालिकेवर ही मालिका आधारलेली आहे, त्या 'अ सॉंग ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर' मधल्या सगळ्या पुस्तकांची नावं खूपच आकर्षक आहेत. (इच्छुकांनी गुगलावे.)<<<<<<
Uhoh
पहिल्याच पुस्तकाचं नाव 'अ गेम ऑफ थ्रोन्स' हेच आहे.

>> कथानकात अगदी सोयीस्करपणे काही सुटे धागे आहेत, काही खड्डे किंवा भगदाडंसुद्धा आहेत .
यूट्यूबवर फर्स्ट मॅन -अँडल्स - वलेरीया - टारगेरीयन - यांची पूर्ण हिस्टरी आहे.
टीव्ही मालिकेमधे सगळे वगळ्ण्यात आले आहे. बरीच कॅरेक्टर सुधा मालिकेमधे नाहीत. मूळ पुस्तके अफाट आहेत.त्यांचा कॅन्व्हास सीरीयल मधे कव्हर करणे शक्य नाही.
यूट्यूबवर "कंपायलेशन ऑफ गेम ऑफ थ्रोन हिस्टरी " असे शोधून पाहिले तर अजून मनोरन्जक गोष्ती कळतील

प्रचंड आवाका असलेली मालिका, माझा खूप वेळ तर नेमकं कोण कुणाचं काय आहे हे समजण्यातच गेला
पण गारुड असं कि सामान्य प्रेक्षकही त्यात गुंफून जातो, समग्र मानवतेचा हे एक चिरंतन महाकाव्य आहे
खासकरून शीर्षक संगीत तर काळजाचं ठाव घेणारं आहे. >> खरंच
सातव्या सिझन ची वाट बघतोय Happy

सबटायटल्स सकट कुठे मिळेल ही सिरीज. मला मिळालेले पहिले दोन सिझन without subtitles आहेत, त्यामुळे बघण्याचे धाडस केले नाही.

मस्त रसग्रहण रसप!
सिजन वाईस धागा येऊ द्या ना. तुमच्या शैलीत वाचायला आवडेल.

वेलकम टू द क्लब!

मी पुस्तकं वाचली /ऐकली आहेत. अफाट आहे गेम ऑफ थ्रोन्स.
गम्मत म्हणजे medieval काळातली ही कथा पण आजच्या काळात कुठे कुठे relevance दाखवून जाते.

चांगले लिहिले आहे.

'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. >>> पाहून झाल्यानंतर काय झालं ह्या भावनेचं, असे वाटण्यामध्ये काही बदल झाला का? तेही वाचायला आवडेल.

१. 'अतिरंजन' - अनावश्यक हिंसा व नग्न दृश्यांची भरमार केली आहे. इतकी जास्त की त्याचं अप्रूपही वाटेनासं व्हावं. हा भडकपणा म्हणजेच प्रभावी चित्रण, असा एकंदरच आजच्या फिल्ममेकिंगचा प्रामाणिक समज असल्याने कंठशोष वृथाच आहे, तरी ! >>> ही फँटसी सिरिज आहे ज्याचेच दुसरे नाव अतिरंजन मग अतिरंजनच नसावे असे का वाटते?
'फिल्ममेकिंगचा प्रामाणिक समज असल्याने' >>हे वाक्य चुकीचे आहे... जेवढा भडकपणा तेवढा व्ह्युवर बेस लिमिटेड असेच व्यायसायिक समीकरण आहे, ऊलट प्रोड्यूसर्स सर्वसमावेषक सिनेमा/सिरिज बनवायला धडपडतात. एवढ्या स्ट्राँग कंटेंट आणि सादरीकरणाला धरून जर भडकपणा येत असेल तर तो लेखक/निर्मात्यांच्या दृष्टीने वाजवी असावा असे वाटत नाही का?

२. 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव - ह्यातला 'गेम' हा शब्दं केवळ 'खेळ' ह्या अर्थाने नाही तर त्यापेक्षाही व्यापक अर्थाने आहे. खेळाला नियम असतात,स्पिरिट असते, पंच असतात, तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतात. ईथे ना नियम आहेत, ना पंच आहेत आणि प्रतिस्पर्धी तर साम्राज्य, व्यक्ती किंवा विचार असे काहीही असू शकते. खेळातल्या सारखी फक्तं हार-जीत आहे पण सरतेशेवटी जिंकणंही सगळं निरर्थक आहे.
ईंग्लिश मधला 'ऑफ' शब्दं जी अँबिग्विटी ऑफर करतो ती ईतर भाषात सहजासहजी येत नाही. तुम्ही सिंहासनांचा (by), सिंहासनासाठींचा (for, plural), सिंहासनांमधला(among), सिंहासनाबद्दलचा (about, singular) असे काहीही समजू शकता.

Valar Dohaeris!

You know nothing Jon Snow!

बर्ग ला शीर्षकाबद्दल अनुमोदन. मूळ पुस्तकामधे अजून बरेच धागे अर्धवट ठेवलेले आहेत नि ते नीट बांधले जातील असे वाटत नाही.

अनावश्यक हिंसा व नग्न दृश्यांची भरमार केली आहे. >> ह्याबद्दल मी पुस्तकाच्या परीक्षणामधे असे लिहिले होते
"तुम्ही जर HBO वरील भाग बघितले असतील तर पटकन जाणवणार्‍या दोन गोष्टी म्हणजे - Sexuality and powerful collective violence. पुस्तकामधे त्यांची तीव्रता कमी जाणवते. ह्यातले Sexuality हा सिरीजचा एक अविभाज्य घटक आहे. सुरूवातीला तो चटकन जाणवतो नि अंगावर येतो. हि वर्णने चटकदार नक्कीच नाहित. हि जरुरी आहेत कि नाही ह्यावर नेटवर प्रचंड चर्चा सापडेल. पण एक मात्र नक्की कि तुम्हाला लवकरच त्यांची सवय होते. (काही जणांच्या मते ही वर्णने मार्टीनच्या सेक्सुअल fantasies आहेत.) पूर्ण कथानक हे एक socio-political saga ह्या प्रकारातले आहे त्यामूळे ह्या दोन primal instincts पात्रांमधला संघर्ष (conflict) ठळक करण्यासाठी सढळपणे मार्टीन वापरतो असे मला वाटले. जगातल्या बहुतांशी युद्धांचा इतिहास ह्या दोन उर्मींशिवाय पूर्ण होत नाही (युद्धांची कारणे/मूळ म्हणून नाही तर युद्धाचे गुणधर्म म्हणून). "

बर्ग आणि असामीला अनुमोदन..
वेलकम अबोर्ड रसप..
मला बहोत आवडलीए ही मालिका..
सुरु केली तेव्हा अंगावर आली म्हणुन बाजुला झाली पण मग काही दिवसांनी अगदी चॅलेंज स्वतःला म्हणुन मन लावुन पाहिली आणि मग त्यात गुंतत गेली.. एक एक पात्र काय खतरनाक उभं केलय वाह...
रच्याकने,पुढील सिझन हा शेवटचा सिझन असणार आहे. Happy

पुस्तक अफाट आहेत, मी रात्र दिवस करून वाचून काढले, त्याच्या निम्म्यानेही मालिकेत उतरले नाहीये.
असेही ट्रॅक वेगवेगळे आहेत तयामुळे नंतर मालिका बघायला फार बोर झालं.

पुस्तक मात्र परत एकदा वाचेन, जबरदस्त आहेत

शीर्षक - 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव. मला स्वत:ला हे एखाद्या व्हिडियो गेमचं थिल्लर नाव वाटतं. कथानकातली काव्यात्मक भव्यता ह्या नावात औषधापुरतीसुद्धा जाणवत नाही.
>>>
हे काय झेपलं नाही. एक तर ते पहिल्या पुस्तकाचे नाव आहे. मालिका सुरू केली तेव्हा ज्या प्रेक्षकांनी पुस्तके वाचली नाही त्यांना साँग ऑफ आइस अँड फायरचा संदर्भ लागला नसता. दुसरे म्हणजे सत्तेचा सामना किंवा फक्त "सामना" अश्या अर्थानेदेखील हे नाव चपखल बसते.

ह्याचे संगीत तर उत्क्रुष्ठ्च आहे, रसप तुम्ही त्या बद्दल काहिच लिहिले नाहिये. रामिन जवादि Hans Zimmer चa पक्का शिष्य वाटतोय.
https://www.youtube.com/watch?v=0ZWLQQfIEA0

त्या बाफावर नव्या सीझन बद्दल ची प्रेडिक्शन्स लिही की हाब. नंतर वाचायला मजा येते. >>निर्मात्यांनी मार्टिनवर प्रेडिक्शन्स चा दबाव टाकला होता की एक्झे. प्रोड्यूसर असलेल्या मार्टिनने फॅनफिक्शन मधून काहीतरी ऊचलले अश्या अर्थाचे वाचनात आले होते. (बहूतेक दुसरे खरे नसावे)
आता मार्टिन काही ईथे येवून आपले प्रेडिक्शन/ आयडीआ ऊचलणार नाही पण कश्याला चान्स घ्या Lol समजा त्याने ऊचलली आणि आपल्याला रॉयल्टी नाही दिली तर किती वाईट वाटेल Lol

अजुन २ सिज़न्स आहेत, या वर्षी ७ वा आणि पुढच्या वर्षी ८ वा!..>> मला तर सगळे हाच शेवटचा आ।ए अश्या बातम्या दिसल्या..

भंपक लेख.
रसपचे असे लेख वाचले की मला पुलंच्या लखू रिसबूडची फार आठवण येते. त्याच्याप्रमाणेच रसपही जे थोडेफार कळते त्याला ट्रॅश आणि जे अजिबात कळत नाही त्याला ग्रेट समजतो.

शक्य असल्यास पुस्तक सीरिज जरूर वाचावी. ती टीव्ही मालिके पेक्षा सरस आहे.

हे पुस्तकांवर बेतलेल्या जवळपास सगळ्याच मालिका/सिनेमांच्या बाबतीत खरं आहे. (एक अपवाद आठवतो - गोडफादर - पुस्तक आणि सिनेमा तोडीसतोड आहे.)

अवांतर - इथं चंद्रकोर कशी लिहायची? गोडफादर झालंय.

GOT वर धागा काढला याबद्दल अभिनंदन आणि आभार. उत्तम परीक्षण केलं आहे.

मी मूळ पुस्तकं वाचली आहेत. त्यांच्यावर यापेक्षा उत्तम मालिका बनूच शकली नसती.

पहिल्या पुस्तकाचेच नाव त्यांनी कंटिन्यू केले आहे, मला तरी catchy नाव वाटतं. जगभरातल्या प्रेक्षकांचा विचार करून ते ठेवलं असावं (universal appeal आहे.)
नग्नतेबद्दल म्हणाल तर ती दुसऱ्या सिझन नंतर भरपूर कमी केली आहे.
हिंसा ही रानटी टोळ्यांचा अविभाज्य भाग होती, ती हवीच. मुख्य कलाकारांना अचानक मारून टाकणे GOT ची खासियत आहे. Are you watching closely ही त्यांची tagline च आहे.

ही दृश्य ज्यांच्या अंगावर येत असल्यास भारतातील sensored मालिका पहावी ( Star World वर सुरू आहे )