दृष्ट

Submitted by फूल on 27 July, 2016 - 20:46

“थांब हं आता हा पदर हिकडनं असा.“ इति आज्जी. माझी चुळबूळ चालू असतानाच आज्जी नौवारीचा पदर सारखा करत होती. माझ्या अंगावर आज्जीची नौवारी. तिच्या तारूणपणी तिने २५ रूपायाला विकत घेतलेली. तिची ठेवणीतली नौवारी. मला मज्जाच येत होती. आयुष्यात पहिल्यांदाच साडी नेसत होते आणि तीही नौवारी. आज्जीचा सराईत हात माझ्या अंगावर हलकेच फिरत होता. पोटापाशी घट्ट बांधलेलं केळ, तिथपासून खाली रुळणाऱ्या एकसारख्या निर्या, मांडीवर, पायावरून गेलेल्या चुण्या, कंबरेवरून वर आलेला पदर; या सगळ्या सगळ्यावरून आज्जी एक शेवटचा हात फिरवत होती. कुठे हलका झटका देत होती, कुठे हळूच खेचत होती, कुठे एखादी चुणी खोचत होती. सोहळाच होता तो. मी आठवी नववीतच असेन.

माझ्या मामाच्या घरी आमच्या सगळ्यांचाच एक अलिखित नियम होता. वर्षभरात कुणाचीही कधीही पन्नाशी, साठी झालेली असू देत. मे महिन्यात सगळे एकत्र जमले की वाढदिवस साजरा करायचा. घरातलीच म्हटली तर १५-२० माणसं. सगळे घरातच तयार होणार. घरंही तसं ऐसपैस, मोठ्ठ्सं. घरातच फोटो काढायचे. खायचं, प्यायचं आणि धम्माल.

त्यादिवशीहि मामाची ५० वर्ष आणि आज्जीची ७५ असला भारी सोहळा होता. आम्हा आज्जी आणि नातीचं होतंच गूळपीठ. तिची एकुलती एक नातच होते मी. तिच्या कवतीकाला आणि माझ्या उत्साहाला उत आला होता.

“आज्जीssss आरशात बघायचंय” मी सतराशेपंधराव्या वेळेला तीच भूणभूण पुन्हा केली. “येवढा हूडपणा बरां नव्हे मुलीच्या जातीला. दम जरा. बघू पाठीमागनं बरं झालंय काय. हाsss आता ह्ये घाल सगळं.” आज्जीने तिचे ठेवणीतले दागिने मला घालायला दिले. काय नव्हतं त्यात? सगळ्यात आधी एक चिंच पेटी, मग मोहनमाळ, दंडात वाकी, हातात एक एक गोठ, एक एक पाटली, दोन दोन बिलवर आणि भरपूर हिरव्या बांगड्या, कमरेला मेखला, पायात तोरड्या, कानात कुड्या आणि बोटात एक खड्याची अंगठी. मग आज्जीचीच शाल खांद्यावरनं घेतली. “आता बघ बरं कसं दिसतंय ते.” मला आरश्यासमोर उभं करत आज्जीने माझ्या अंबाडयात तिनेच केलेल्या बागेतल्या अबोलीच्या फुलांची वेणी चढवली. “आज्जी सॉलिड दिसतेय नं मी.? बाहेर जाउ सगळ्यांना दाखवायला.” तो सगळा साज शृंगार अंगी वागवत मी मला जमतील तश्या उड्या मारत म्हणाले.

“बाहेर जाउ सगळ्यांना दाखवायला. आज्जीssssss सांग नं” आज्जी बघतंच राहिली माझ्याकडे. तिच्या पाणीदार डोळ्यातून कौतुक सांडत होतं. मलाही थोडं लाजल्यासारखं झालं. साडी नेसण्याबरोबरच हाही अनुभव तसा पहिलाच. “जा जा, सांभाळून. “ मी तशीच बागडत बाहेर निघाले. तर आज्जी हसायलाच लागली. ”खुळी कि काय, नौवारीत उड्या मारायलीस? पदर घट धर हा आणि ही शाल, दोन्ही आवळून धरायचं. आणि टेचात चालायचं. अक्का नं तू? घरातली मोठी? जा देवापुढे नमस्कार कर आणि मग बाहेर पळा”

मी मला जमेल तशी आदब आणली चालण्यात आणि खोलीच्या दरवाजाशी पोचले तोवर आई लगबगीने आत शिरली; “आटपतंय काय आज्जी नातीचं? आम्हाला पण आवरायचंय.”असं म्हणतानाच आईचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि पुन्हा तेच! तीही आज्जीसारखीच बघतंच राहिली. डोळ्यात टचकन पाणीच आलं तिच्या.

बाहेर गेले तर मामा, मामे भाउ, मावश्या, बाबा सगळेच वेगळ्याच नजरेने बघत होते माझ्याकडे. आई पाठोपाठ आली आणि मीठ मोहरीने माझी दृष्ट काढायला लागली.

नुकतेच अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्यकर्ते शाळेत येउन गेलेले. त्यात डोक्याला नवीनच फुटलेली कोवळी शिंगं. मी जराश्या नाराजीनेच म्हटलं. “कशाला दृष्ट वगैरे? असं काही नसतंच गं” पण माझ्या कुरबुरीला न जुमानता आई दृष्ट काढतंच होती. मीही नाकं मुरडत, त्यातल्या त्यात नाराजी व्यक्त करत काढून घेतली दृष्ट. पण अर्थात तोही कौतुकाचाच भाग होता. सगळे माझ्याकडे कौतुकाने बघत होते. मग मलाही गंमत वाटायला लागली.

त्यानंतर कधीही साडी नेसली की हे दृष्ट काढणं असायाचंच त्या मागोमाग. आईच्या, आज्जीच्या समाधानासाठी म्हणून मी काढून घ्यायचे पण दरवेळी वाटायचं काय गरज आहे? कुणाची नजर लागणार मला? मग आई म्हणायची, ”तू आई झालीस की कळेल.” आयांची उत्तरं बिनतोड असतात. असं म्हटलं की डिबेट संपलंच.

किशोरवयातले दिवस ते. आले तसे भुर्रकन उडूनही गेले. मागे फक्त आठवणी उरल्या. आज्जीही गेली. तिची ती साडी मात्र हौसेने जपून ठेवलीये. माझंही लग्न झालं आणि आताच काही महिन्यांपूर्वी गोंडस पिल्लूहि झालं. एक छानशी गोड गोड परी.

तिचा जन्म झाल्याच्या सात-आठ दिवसांनंतरची गोष्ट. तिला मांडीवर घेउन बसले होते. मोठ्या मोठ्या डोळ्यांनी एकटक. एकदाही पापणी लवू न देता. माझ्याकडे टकामका बघत होती. नवरा उत्साहाने वेगवेगळ्या angle ने तो क्षण कॅमेऱ्यात टिपत होता.

पण मी मात्र तिच्या डोळ्यात हरवून गेलेले. दोन काळ्याभोर डोहात आकंठ बुडालेले. गुंतलेले. कुणीही मला त्यातून बाहेर काढू नये. एक पुसटसा तरंगही त्या डोहात उमटू नये. इतका तो क्षण एकाग्र होता. फक्त तिचा आणि माझा होता. बाकी कुण्णी कुण्णी नव्हतं तिथे. माझं अवघं जग तिच्या डोळ्यात आणि तिचं अवघं जग तर मी होतेच.

इतक्यात नवरा जवळ आला आणि कॅमेऱ्यातले फोटो मला दाखवायला लागला. “सांग नं यातला कुठला पाठवू सगळ्यांना.?” मी पुन्हा एकदा माझ्या कुशीतल्या चिमणीकडे बघितलं. ते वेडं अजूनही माझ्याचकडे बघत होतं. मगाशी गच्च गुंडाळलेलं. तरी एक मुठ कशी काय बाहेर आलीच होती. तीच बाळमूठ आता तोंडात गेली होती. पण नजर तश्शीच अटळ, नितळ आणि स्वच्छ. थेट माझ्या डोळ्यात बघत होती. “सांग नं” नवऱ्याने पुन्हा विचारलं. मी गप्पंच. डोळ्यातून पाण्याचा एक थेंब ओघळला आणि चिमणीच्या गालावर सांडला. डोळे पाणावलेले माझं मलाही कळलं नाही. त्याच वेड्या अवस्थेत तोंडातून नकळतच शब्द निसटले. “नको रे, कुठलाच नको. उगाच कुणाची....”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!

>>
फक्त ते "मी आठवी नववीतच असेन. (१४/१५ वयाची)" व आज्जिचे वय ७५ हे गणित जुळत नाहीसे वाटतय..
>>
लिंबूटिंबू, त्यात कसलं आलयं गणित? माझ्या १५ व्या वर्षी माझी आजीही पंचाहत्तरीची होती माझे मामे भावंड जेमतेम दिड वर्षाचे!

बरोबर आहे अगदी स्वाती. अजिबातच अनैसर्गिक नाहिये ते वयाचे गणित.

आणि कथेचा आस्वाद घेणं महत्वाच आहे ना !!

लेख वाचताना मी जणू स्वतालाच त्या लेखात पहात होते. आज्जीची मी लाडकी होते. अगदी वर वर्णन केल्याप्रमाणे माझ्या ही बाबतित असच घडल आहे. आज्जीची आवडती आणि माझिही आवडती नऊवारी साडी अजुनही माझ्याकडे आहे, जपुन ठेवलेली.
आज्जीच्या आठवणीने डोळ्यात पाणि आले.

लिंबुटिंबु : >>(फक्त ते "मी आठवी नववीतच असेन. (१४/१५ वयाची)" व आज्जिचे वय ७५ हे गणित जुळत नाहीसे वाटतय.. अरेरे )<< ( भावनांना समजुन घ्या :स्मित:)
मी आठवी नववीत असताना माझी आज्जी सत्तरीच्या पुढे होती.

कंबरेला बांधलेलं केळ... >>> हे वाचताना आजी आठवली नकळत

आणि...

"मोठ्या मोठ्या डोळ्यांनी एकटक." >>> हे वाचताना... माझ्या मांडीवरची माझी मुलगी आठवली...

सुरेख लेख...

Pages