निंदा : एक धंदा

Submitted by कुमार१ on 28 May, 2017 - 21:45

काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात भारतातील एका आघाडीच्या उद्योगपतींचा परिचय वाचण्यात आला. हे गृहस्थ त्या आधीच्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जाहीर झाले होते. त्यांच्यावरील या लेखात त्यांच्या साध्या राहणीसंबंधीचे काही उल्लेख होते. ते एवढे धनाढ्य असूनही विमानप्रवास मात्र नेहेमी ‘इकॉनॉमी क्लास’ नेच करतात, त्यांच्या घरी आणि कंपनीत वीज व पाणी यांचा काटकसरीने वापर होण्याबाबत ते खूप काटेकोर असतात, इत्यादी.

हे सर्व वाचून मी प्रभावित झालो आणि माझ्या एका परिचिताला हे सगळे कौतुकाने सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया मला काहीशी खचवणारी होती. तो मला म्हणाला, ‘अहो, या वलयांकित लोकांसंबंधी हे जे काही प्रसिद्ध होते ना, त्यावर माझा काही विश्वास नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांचा जो अवाढव्य उद्योग असतो, तो ते पूर्णतः प्रामाणिकपणे आणि सर्व कायदेकानू पाळून करतात का? प्रथम त्यांनी शपथेवर सांगावे की ते त्यांचा उद्योग कुठल्याही प्रकारची लबाडी न करता चालवत आहेत आणि मग या इतर साधी राहणी वगैरेच्या गप्पा माराव्यात’’.

प्रत्येक माणूस हा गुणदोषयुक्त असतो. व्यवहारात तर प्रत्येक जण काही ना काही लबाडी करत असतोच. काही वेळेस तर आपली इच्छा नसतानाही आपल्याला नाईलाजाने लबाडीत सामील व्हावे लागते. पण तरीसुद्धा एखाद्याजवळ काही चांगले गुण नक्कीच असतात. त्याची दखल घ्यायला हरकत नसावी. पण नाही, एखाद्याविषयी बोलताना त्याचे चांगले गुण दुर्लक्षित करून त्याचे दोष मात्र आवडीने चघळणारी भरपूर मंडळी आपल्याला दिसतात. किंबहुना, आपल्याजवळ एखाद्याच्या लबाडीचे कोणतेही पुरावे नसले, तरी त्याच्यावर आगपाखड करीतच राहायची आणि त्याचे काही चांगले गुण हे नजरेत भरण्याइतके असले तरी त्याची दाखलसुद्धा घ्यायची नाही, हा आपला खाक्या असतो.

समाजातील कुठल्याही गोष्टीकडे पाहताना सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही दृष्टीकोन ठेवता येतात. या संदर्भात एक साधे उदाहरण नेहमी दिले जाते. समजा, एक पेला पाण्याने अर्धा भरून टेबलावर ठेवलेला आहे. त्याकडे बघताना सकारात्मक माणूस म्हणेल की हा पेला अर्धा भरलेला आहे. तर नकारात्मक माणूस मात्र तो पेला अर्धा रिकामाच आहे हे ठसवू पाहील. अशा प्रकारची ‘पेल्यातले रिकामेपण’च सतत बघत राहणारी अनेक माणसे माझ्या संपर्कात येतात आणि त्यांची ही वृत्ती बघून मी खिन्न होतो.

काही वर्षांपूर्वी ‘जागतिक लोकसंख्या दिना’च्या दिवशी एका दैनिकात भारतातील एका थोर शास्त्रज्ञांचा आपल्या लोकसंख्येविषयी माहितीपूर्ण लेख आला होता. साधारणपणे आपण सामान्य जन भारताच्या वाढत्या लोकसंख्येबाबत सतत चिंताच व्यक्त करीत असतो. परंतु, सदर लेखात त्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या संख्याशास्त्रीय अहवालांचे दाखले देऊन असा निष्कर्ष काढला होता, की गेल्या काही वर्षांत आपल्या लोकसंख्यावाढीचा दर कमी होतोय. तेव्हा भविष्यात हा प्रश्न अगदी अक्राळविक्राळ स्वरूप धारण करणार नाही, अशी चिन्हे आहेत. तो लेख मला पटला होता.

असेच एकदा गप्पाटप्पामध्ये मी त्या लेखातील हा मुद्दा माझ्या सहकाऱ्यांना सांगितला. लगेचच एक ‘रिकामा पेलाप्रेमी’ त्याच्या विरोधात तावातावाने बोलू लागले, “अहो, हे लेखबिख विसरा. आपल्या झोपडपट्ट्या बघा, भिकाऱ्यांच्या पोरांची लाईन बघा. तुम्ही-आम्ही मूठभर सुशिक्षित आपापले कुटुंब मर्यादित ठेवतो. पण, हे असले लोक लोकसंख्या सतत वाढती ठेऊन आपल्या देशाची वाट लावतात.”
त्यावर मी म्हणालो, “अहो, आपण सामान्य लोक पुरेशा माहिती व अभ्यासाशिवाय सतत उथळ विधाने करीत असतो. पण, या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे, तेव्हा त्यात नक्कीच तथ्य असणार.” परंतु, नकारात्मकता अंगी भिनलेले हे गृहस्थ पुढे म्हणाले, “हे संख्याशास्त्रीय अहवाल, आकडेवारी ही सगळी धूळफेक असते. तुम्हाला माहित असेलच की ‘Statistics can prove anything except the truth”.

तो लेख वाचल्यावर मला तरी भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत आशावादी राहावेसे वाटत होते; परंतु या गृहस्थांनी मात्र त्यांच्या बोलण्याने मला काहीसे निराश केले. नुकताच माझ्या वाचनात अजून एका दिग्गज शास्त्रज्ञाचा असाच एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी म्हटले आहे की भारतच काय, पण चीनच्या लोकसंख्यावाढीचा आलेख सुद्धा आता चढता राहिलेला नसून तो स्थिर होत आहे. तेव्हा याबाबत आता फार चिंता करत बसू नये. आता हे वाचून माझे पुरते समाधान झालेले आहे. हे इतर कोणाला सांगण्याच्या फंदात न पडलेले बरे !

सक्रीय राजकारणापासून स्वतःला कायम दूर ठेवणारे पण येता जाता प्रत्येक राजकारणी व्यक्तीसंबंधी वाईट बोलणारे असंख्य लोक आपल्याला आढळतात. हे लोक राजकारणातील वाईट गोष्टी अथवा दोष दूर करण्यासाठी स्वतः काहीही करीत नाहीत. मात्र त्यावर सतत टीका करून गप्पांचे अड्डे फक्त रंगवतात. एकदा एक परिचित म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चांगले सर्वोच्च नेतृत्व हे मिळालेलेच नाही बघा”. मग त्यांनी आपल्या देशाच्या पहिल्या ते आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांवर सडकून टीका केली. मी त्यांना म्हणालो, “तुमच्या म्हणण्यात तथ्य असू शकेल; पण मला असे वाटते की कुठल्याही पंतप्रधानाला आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा राजकारणातले अधिक कळते, एवढे तर नक्की. म्हणून तर तो त्या उच्च पदावर पोचतो आणि आपण फक्त क्रियाहीन टीकाकार राहतो”.

कोणत्याही राजवटीत देशाचा संथ का होईना पण काहीतरी विकास हा होतच असतो. परिपूर्ण असा नेता (किंवा माणूस) कोणीच नसतो. तेव्हा आपणच बहुमताने निवडून दिलेल्या नेत्यांना सतत दूषणे देणे कितपत बरोबर आहे? पण होतय काय, की आपण जो चष्मा आपल्या डोळ्यांवर चढवलेला असतो त्यातून आपल्याला फक्त ‘रिकामा पेलाच’ नेहमी ठळकपणे दिसतो. पेल्याचा भरलेला भाग आपण जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतो.

एकदा अशीच दूध उद्योगावर चर्चा चालू होती. आता दुधाचा दर्जा हा त्यामध्ये पाणी मिसळले आहे की नाही यावर ठरतो.( पाणी सोडून इतर जे काही मिसळले जाते ते तूर्तास बाजूला ठेवूयात !). काही मोजके दूध उद्योग ग्राहकांना शुद्ध दूध देण्याबाबत प्रसिद्ध आहेत. या चर्चेत एकजण कौतुकाने म्हणाले, की ‘क्ष’ उद्योगाचे दूध खरोखरच शुद्ध असते. त्या गृहस्थांना याची मनापासून खातरी होती व म्हणून त्यांनी हे मोठ्या उत्साहाने सांगितले .झाले, त्यांच्या उत्साहावर पाणी टाकायला दुसरे महाशय टपलेलेच होते. ते म्हणाले, “काय घेऊन बसलायत राव, सगळे दूधवाले सारखेच. अहो, दुधात पाणी न मिसळणारा गवळी अद्याप जन्माला यायचाय!” एखाद्या गोष्टीबाबत आपल्यात नकारात्मकता किती टोकाची असते, याचे हे उदाहरण. किमान एखादा तरी उद्योग सचोटीने चालला असेल हे मानायला आपण तयार नसतो.

दरवर्षी आपला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होतो. त्यानंतर लगेच त्यावर विविध लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागतात. अर्थसंकल्प तयार होण्याआधी देशातील अनेक अर्थतज्ज्ञ त्यासाठी राबत असतात व त्यांच्या सखोल अभ्यासातूनच तो तयार होतो. परंतु, एकदा का तो सत्ताधारी पक्षाच्या अर्थमंत्र्याने सादर केला, की सर्व विरोधी पक्षांचे नेते त्यावर कडाडून टीका करत राहतात. आतापर्यंत एकाही विरोधी पक्षनेत्याने, सत्ताधाऱ्यांनी मांडलेला अर्थसंकल्प अंशतः तरी चांगला आहे, असे म्हटल्याचे मला काही आठवत नाही. ही सर्व मंडळी आपले ‘विरोधीपण’ दाखवण्यासाठी अर्थसंकल्पातील चांगल्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यातील दोष काढण्यातच मग्न असतात. आणि मग, ‘’हा अर्थसंकल्प श्रीमंतांची पाठराखण करणारा व गरिबांना मात्र अधिक गरीब करणारा आहे’’ अशी ठरलेली हाकाटी पिटत राहतात. आपल्या नकारात्मक वृत्तीचे सार्वजनिक पातळीवरील हे एक मोठे उदाहरण ठरेल.

आपले परिचित, मित्रपरिवार आणि एखाद्या कार्यालयातील सहकारी यांसारख्या संबंधांमध्येही गप्पांमधली नकारात्मकता सतत उफाळून येत असते. माझ्या माहितीतील एक महाराष्ट्रस्थित गृहस्थ येता जाता दुसऱ्यांना दूषणे देत असतात. त्यांचे बरेचसे समकालीन मित्र अमेरिकादी प्रगत देशांत स्थायिक झालेले आहेत व तेथे उच्च पदांवर कार्यरत आहेत. या गोष्टीचा न्यूनगंड या गृहस्थांच्या मनात आहे. एकदा अशीच परदेशस्थ भारतीयांबाबत चर्चा चालू होती. तेव्हा ते मला म्हणाले, “NRI म्हणजे काय, माहिती आहे ना?” मी हसून म्हणालो, “हो, अर्थातच Non Resident Indians”. त्यावर ते उपहासाने हसून म्हणाले, “ हँ, NRI म्हणजे Non Required Indians !”
त्यांनी या व्याख्येने सर्व एन आर आयना अगदी निकालातच काढले. पुढे गमतीचा भाग असा, की या बोलण्यानंतर पाच वर्षांनी त्याच गृहस्थांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना झाला. आता ते स्वतःच्या मुलाला ‘Non resident” समजतात की तो ही ‘Non required’ ठरलाय, हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे!

नात्यागोत्यातील गप्पांमध्येही नकारात्मकता खूप जाणवते. विशेषतः दुसऱ्याचे दोष हे ठळकपणे दाखवले जातात. सासू-सून संबंध हे या संदर्भातील चपखल उदाहरण आहे. या दोघी लोकांसमोर दाखवताना सामंजस्याचा कितीही आव आणू शकतात. परंतु, एकमेकींच्या गैरहजेरीत मात्र एक दुसरीच्या तक्रारींचाच पाढा वाचते; एकमेकींच्या चांगल्या गुणांबद्दल बोलायचे शक्यतो टाळले जाते.

ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वा यंत्रणा ही गुण व दोषांनी युक्त असते. दोषांची चर्चा जरूर व्हावी, जेणेकरून त्या व्यक्तीस सुधारण्यास प्रेरणा मिळेल. परंतु, एखाद्याची चांगली बाजू अथवा गुण पूर्णपणे दुर्लक्षून त्याची वाईट बाजू अथवा दोषच उगाळत राहणे हा मानवी स्वभाव असतो. आणि बऱ्याच जणांचा तो लाडका उद्योग असतो. त्यामुळेच समाजात दोष गाणारी तोंडे उदंड दिसतात, पण शाबासकीचा सूर मात्र शोधावा लागतो.
**************************************************************************************************************** ( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक साधा नियम मागे ऐकला - तो आचरणात आणण्याचा गेली वीस वर्षे प्रयत्न करतो आहे.
- कुणाबद्दल चांगले बोलता येत नसेल तर वाईटहि बोलू नये - कटाक्षाने. म्हणजे कुणि एखाद्याच्या बद्दल मत विचारले तरी ते सांगण्याचे टाळावे.
दुसरा नियम हल्लीच जास्त लागू पडतो - तो म्हणजे लेबलिंग.
प्रत्येक व्यक्ति वेगळी असते, त्यांचे गुण दोष वेगळे असतात, त्या व्यक्तीला तुम्ही काहीहि लेबल दिले तरी.
जगात दोनच प्रकारची माणसे असतात हे विनोदी उदाहरण सत्य मानून ताबडतोब लोकांची दोन भागांत विभागणी करायची.
सगळेच मुस्लिम वाईट, सगळेच ब्राह्मण वाईट, सगळेच काँग्रेसवाले भ्रष्टाचारी, असे बाहेरच्या लेबलवरून माणसाबद्दल बोलायचे.
कधी कधी लोक समजतात की जर बरेच लोक एखाद्याची स्तुति करत असतील, तर आपण शहाणे, आपल्याला जास्त "आतली" माहिती आहे असे दाखवण्यासाठी त्या व्यक्तीची निंदा करायची!! मग प्रत्यक्षात त्या व्यक्तीबद्दल काहीहि माहिती नसेल तरी.
मुळात वादविवादच करायची इच्छा असेल तर कुठल्याहि मुद्द्याविरुद्ध बोलायचे - अक्कल, माहिती असो वा नसो.
(त्यामुळे मी आ़जकाल कुठेहि गेलो तरी गप्प गप्पच असतो.
अपवाद मायबोली, इथले एकूण बघता इथे काय वाट्टेल ते चालते! नुसती मज्जा. कितीहि गंभीर लिहीले तरी ते गोळा करून साठवून ठेवण्याचे कष्ट कुणीच करत नाहीत. म्हणजे चांगल्याबरोबर वाईटहि आंतर्जालाच्या नरकात जाऊन पडते)

खरे तर ज्यांना अक्कल, माहिती असते ते वादात पडतच नाहीत, नि आपले शहाणपण विचारल्याशिवाय सांगत नाहीत!!

एक साधा नियम मागे ऐकला - तो आचरणात आणण्याचा गेली वीस वर्षे प्रयत्न करतो आहे.
- कुणाबद्दल चांगले बोलता येत नसेल तर वाईटहि बोलू नये - कटाक्षाने.
>>>> +१०००.
मीही असा जास्तीत जास्त प्रयत्न करतो.
दुसरा नियम हल्लीच जास्त लागू पडतो - तो म्हणजे लेबलिंग. >> हेही पटले. फार खोड असते याची लोकांना.

या लेखात ‘एन आर आय’ चा उल्लेख आहे. त्या संदर्भात थोडे अवांतर:

प्रसंग होता आमच्या कॉलेजचा महोत्सव. तेव्हा अनेक एनाराय सुद्धा त्यासाठी उपस्थित होते. त्यांपैकी एकाने भाषण केले. तो म्हणाला, “ आम्हाला मायदेशाबद्दल खूप प्रेम आहे. आम्ही दर ३ वर्षांनी येथे ओढीने येत असतोच. आमचा उल्लेख ‘एनाराय’ असा वारंवार केला जातो तेव्हा त्यातील ‘non’ हा शब्द आम्हाला खटकतो. त्यात काहीशी परकेपणाची भावना दिसते. तेव्हा आम्हाला ‘एनाराय’ ऐवजी ‘येणाराय, येणाराय’ असे म्हणत चला! म्हणजे आमची इकडे वाट पाहिली जातेय हे बघून आम्ही अधिक लवकर येत राहू !!”

@ कुमार१, लेख पूर्णपणे पटला. सर्व उदाहरणे अगदी बरोबर लिहिलीयत.

तुमच्या लेखांत मुद्दा पटवण्याकरिता भरपूर आणि योग्य उदाहरणे दिलेली असतात. हा आपल्या लिखाणातील विशेष मला जाणवतो. छान!!!

आम्हाला ‘एनाराय’ ऐवजी ‘येणाराय, येणाराय’ असे म्हणत चला!>>>सही में, यह बात दिलको छु ली।

उत्तम लेख!
ह्यालाच छिद्रान्वेशी प्रवृत्ती म्हणतात!

आपण जर त्या योग्यतेचे असू तर योग्य ती टीका आवश्य करावी आणि ती करीत असताना आपल्यापाशी त्यावर योग्य ती उपाययोजना असावी!

निंदा करणे हा अर्थातच वाईट गुण आहे.पण तरीही अशी लोक आजु बाजुला थोड्या फार प्रमाणात असणे ही मला गरजेचे वाटते.त्यांचे तु.क किंवा वाईट बोलण ही अजुन जिद्द वाढवणार असत. Wink

छान!

उत्तम लेख.
<<<एनाराय’ ऐवजी ‘येणाराय, येणाराय’ असे म्हणत चला>>> हे आवडलं Happy

टीका व निंदा यात फरक केला पाहिजे. पण बर्‍याचदा यातील सीमा रेषा पुसट असते. टीकेमुळे तुम्ही जमीनीवर रहायला मदत होते. आपण सर्वज्ञ आहोत हा मॅनियाकपणा जरा डळमळीत होतो. अन्यथा तुम्ही छान आम्ही छान असे गुडी गुडी वातावरण होते व वस्तुस्थितीचे आकलनात आपण कमी पडण्याचा धोका निर्माण होतो. टीका केली की मग तुम्ही करा असा सल्ला दिला जातो. लोक‌प्र‌तिनिधींचे दोष वा त्रुटी दाख‌व‌ण्यापेक्शा तुम्हीच‌ का निव‌डून येउन लोक‌प्र‌तिनिधी होत‌ नाही?
गायनाच्या मैफिलित‌ ग‌व‌ईबुवांचे गाय‌न‌ हे 'त्या' उंचीला यावेळी पोहोच‌ल नाही असे म्ह‌ण‌णाऱ्या द‌र्दी श्रोत्याला ग‌व‌याने म्ह‌णावे म‌ग‌ तुम्हीच‌ का गात‌ नाही? असे प्रश्न चालू होतात. टीकाकारांना किरकरे म्हणुन संबोधले जाते पण ते समाजात आवश्यकही आहेत. तांदळात ला तुम्हाला खडाच बरा दिसतो एवढे सगळे तांदुळ आहेत हे दिसत नाही असे म्हणल्यासारखे आहे. असे छिद्रान्वेषी लोकांनी जर खडे काढले नाहीत तर भात खाताना खडा लागून जेवणाचा रसभंग होईल. टीकाकारांनी टीका करताना जमेच्या बाजूचाही विचार करावा. टीका हे अ‍ॅनॅलिसिस म्हणुन असावे. फक्त दोषच दाखवत राहिलात तर काम करणार्‍याचा उत्साह आटून जाईल हे पण खरे आहे. कौतुकाची थाप पडली तर काम करणार्‍या माणसा अजून कामाचा हुरुप येतो. म्हणुन शाब्बासकी ही हवीच.

टीका व निंदा यात फरक केला पाहिजे. पण बर्‍याचदा यातील सीमा रेषा पुसट असते. >>>> बस्स! हेच मलाही वाटते.
आता काही अवतरणे:
१. तुकाराम : निंदक तो पर उपकारी.
२. वपु : निंदकाचे घर असावे शेजारी, हे खरे आहे. पण, पहिला निंदक आपल्या घरातच असतो- तो म्हणजे आपली बायको !

.>>> आणि बऱ्याच जणांचा तो लाडका उद्योग असतो. त्यामुळेच समाजात दोष गाणारी तोंडे उदंड दिसतात, पण शाबासकीचा सूर मात्र शोधावा लागतो. <<< याकरता "समाजातच" जायला हवे असे नाही.... इकडे माबोवरही अशा तोंडांचे आयमीन, आयडींचे उदंड पीक येते Proud अशा रुदालिंची लिन्क मात्र कृपयाच मागु नका हं ! Wink

<<सक्रीय राजकारणापासून स्वतःला कायम दूर ठेवणारे पण येता जाता प्रत्येक राजकारणी व्यक्तीसंबंधी वाईट बोलणारे असंख्य लोक आपल्याला आढळतात. हे लोक राजकारणातील वाईट गोष्टी अथवा दोष दूर करण्यासाठी स्वतः काहीही करीत नाहीत. मात्र त्यावर सतत टीका करून गप्पांचे अड्डे फक्त रंगवतात. एकदा एक परिचित म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चांगले सर्वोच्च नेतृत्व हे मिळालेलेच नाही बघा”. मग त्यांनी आपल्या देशाच्या पहिल्या ते आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांवर सडकून टीका केली. मी त्यांना म्हणालो, “तुमच्या म्हणण्यात तथ्य असू शकेल; पण मला असे वाटते की कुठल्याही पंतप्रधानाला आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा राजकारणातले अधिक कळते, एवढे तर नक्की. म्हणून तर तो त्या उच्च पदावर पोचतो आणि आपण फक्त क्रियाहीन टीकाकार राहतो”>>
हा मुद्दा मायबोलीवर बर्‍याच जणांसाठी लागु होतो.. ज्यांना मी वाचतेय.. माझ्या मनातहि विचार येतो.. जर इतकं कुणाबद्दल बोलता/लिहिता येत मग काहिअंशी स्वतांच का नाहि राजकरणात उतरत अन खटकणार्‍या गोष्टींची वासलात लावत.

कुठल्याही पंतप्रधानाला आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा राजकारणातले अधिक कळते, एवढे तर नक्की. म्हणून तर तो त्या उच्च पदावर पोचतो आणि आपण फक्त क्रियाहीन टीकाकार राहतो

>>> व्वा! हाच न्याय राहुल गांधी पंतप्रधान झालेत तर लावता येइल असे वाटत नाही.

व्वा! हाच न्याय राहुल गांधी पंतप्रधान झालेत तर लावता येइल असे वाटत नाही. >>

लेखातील विधान पंतप्रधान झालेल्या व्यक्तींबद्दल आहे.
भविष्यातील 'जर-तर' बद्दल आताच बोलणे उचित वाटत नाही.

छान आहे लेख!! >>>> सुमुक्ता, अभिप्रायाबद्दल आभार ! तुमचे प्रतिसाद लेखकासाठी नेहमीच उत्साहवर्धक असतात.

छान लेख. पूर्णपणे पटला.
एनाराय चा किस्सा मस्त.
एकूणच काय, तर समाजात 'दुसर्‍याच्या डो ळ्यातील कुसळ दिसते पण......' असा प्रकार असतो.
एखादा सार्वजनिक कार्यक्रम बघा. जर तो चान्गला झाला तर त्यावर फारशी चर्चा होत नाही. प ण जर त्यात त्रुटी असतील तर मात्र दीर्घ काल त्यावर टीकेचा भडिमार चालतो.

साद, अभिप्रायाबद्दल आभार
प ण जर त्यात त्रुटी असतील तर मात्र दीर्घ काल त्यावर टीकेचा भडिमार चालतो. >> सहमत.