चोर

Submitted by स्वप्नाली on 26 May, 2017 - 16:40

"मॅटीनीला चल, सन्नीचा नवीन पिच्चर आलाय" - बबन्या
"व्हय" - मी बबन्याच्या मागं मागं गुमान चालू लागलो.

पिच्चर चालू झाला, सन्नी आली, लोकान्नी शिट्ट्यान्चा गजर केला, तसा बबन्याने माझा कान खसकन .ओढून बातमी दिली
"उद्या रात्री, गवाराककाच्या घरी १ वाजता...१० तोळे तरी आसलं..म्या सामान आणतो, तू तयार रहा.."
ही माझी पहीलीच "मिशन", काम जोखमीचं होतं आणि बबन्याने माझी निवड केली होती.. माझ्या अंगावर मूठ्भर मांस चढत होतं..माझ्या डोळ्यांसमोर सन्नीच्या आकारातली गवराक्का, गवराक्काच्या गळ्यातले चमचं करणारे दागीने घातलेली "बेबी डॉल मैं सोने दी" म्हणत नाचू लागली.

गवराक्काच्या भाचीचे लग्न तोन्डावर आले होते..लग्न ठरल्यापासून तीने संपतभौंच्या मागे लागून खास "म्हाळसा" स्टाईल्ची ठूशी आणि तोडेकरून आणले होते. संपतभौंनी पानाचा विडा तोन्डामध्ये कोम्बत पान-टपरीवाल्या गण्याला सांगीतले, "डोक्याचा पार भूगा करून टाकला होता, त्या ठूशी आन् तोड्यापायी...शीरेल-वाल्यांचे काय जातं हो आसले दागीणं त्या म्हाळसेच्या आंगावर घालायला? तुझ्या गवराक्काचा आकार पाहयलाय का? तिच्या मापाचं दागीणं कसं बसं १० तोळ्यात बसवलयं...पिच्च्याक्कं..." सम्प्तभौंननी टाकलेली पिंक कशी बसही चुकवत बबन्यानं नेमकी खबर "कॅच" केली होती.

मॅटीनी संपवून येतानाच जून्या बाजारातून माझ्यासाठी एक लाल माकड-टोपी अन् एक काळी-पांढरी चट्ट्या-पट्ट्याची विजार आणली होती, बबन्याची ओर्डरच होती तशी. "नेक काम मे देरी काय को..?" म्हणत मी घरी आल्या-आल्या कपडे घालून पाहीले. टोपी बरी होती, पण विजार जरा ढगळच होती. नाडीचा धागा पण कच्चा झाल्यासारखा वाटत होता.
लग्नातल्या वरातीत उधळलेल्या घोडीसारखा खींकाळत बबन्या म्हणाला, "आता २० रूपयात तूला शेरवानी पायाजेल काय? ह्या बारीला काम फत्ते कारू, मग पायजेल तेवढ्या पॅंटी घेऊ तुला..आन् सन्नीच्या पिच्चर जाऊ ...खी: खी: खी: "
बबन्याचं आन् सन्नीचं " जनम-जनम का रीश्ता" होतं आणि त्याला त्या "बेबी डॉल" ला सोन्यानं मढवायची ईच्छा होती. सन्नीला "वैनी " म्हणायची सक्त ताकीद मिळाली होती मला. बबन्या सन्नीवैनीच्या "गोरया गोरया पैरोन्विच" झन्डूबाम चोळत बसलेला दिसायचा मला नेहमी स्वप्नामध्ये. बबन्याची आज्जी त्याला लन्गोटीत असेपर्यंत "सोन्या" म्हणायची, त्याने ते फारच मनाला लावून घेतले होते..(पुढे तो जसा-जसा मोठा झाला तसे, "सोन्या" काय, तर "बबन्या" सुध्धा म्हणणे सोडून दिले होते तिने..)

बबन्याने खिडकीचे गज कापायची हत्यारे धार करून आणली होती. सोबत लागणारे सगळे सामान म्हणजे दरवाज्याचे कडी-कोयंडा काढायचे स्क्रू-ड्रायव्हर, पाणे, टॉर्च, बाटर्या, दोरी, घरातले कोणी मध्येच जागे झालंच तर गून्गी आणायचा स्प्रे, "ऐवज" ठेवायला त्याच्या आज्जीच्याच कूंच्या, असे बरेचसे सामान त्याने एका पिशवीत भरून ठेवले होते. पिशवी बर्यापैकी जड झाली, असे मला वाटले, पण बबन्यासामोर कोण बोला, म्हणून मी गप्प बसलो.
उन्हाळा असल्याने "भ्यो..भ्यो" आवाज करणारा कूलर नाहीतर "चूईक चूईक.." चूईकणारा फॅन तरी चालू असणारच आणि गवराक्का-संपतभौ एकदा ताला-सूरात घोरू लागले की, उन्हे वर आल्याशिवाय तरी उठत नाहीत, ही गल्लीतल्या बायकांकडून बबबन्याला पक्की बातमी मिळालेली होती.

प्लॅन सगळा फायनल झाला होता. किचनच्या खिडकीचे गज कापून बबन्या आत जाणार, आतून किचनचे मागचे दार उघडणार, मी पिशवी घेऊन आत येणार. बायका असला "ऐवज" कपाटामध्ये न ठेवता किचन मध्ये लपून ठेवतात म्हणे, त्यामूळे, एकेक डबा उघडून बघणार, "ऐवज" मिळाला की आम्ही सटकणार..हाय काय-नाय काय...कधी एकदा उद्याची रात्र होते, असे झाले होते मला..
"मिशन" च्या आधी आमची "मिटीन्ग" ठरली होती. थेटरच्या बाहेर बबन्या बसला होता. अश्या .ठिकाणी आपल्याकडे कोणाचे लक्ष नसते, असे त्याचेच मत होते.

हातातल्या विडीचा झूरका मारून तो म्हणाला, "आता मला ह्या प्लॅन मध्ये दोनच इश्श्यू दिसताय.."

मी "इश्श्यू" म्हणजे काय, ते विचारायला तोन्ड उघडणार, तेवढ्यात, तो पुढे म्हणाला,

"एक तर दहावीच्या परीक्षा जवळ आल्यात, त्यामुळे रात्र-रात्र जागून अभ्यास करणारी चष्मा-धारी टाळकी जागी असण्याची शक्यता आहे, त्यात गवराक्काची सूमी पण असू शकेल..."
ईयत्ता पाचवीच्या पुढे कधी शाळेचे नाव ही न काढणार्या बबन्याला दहावीच्या परीक्षांचे टाइम-टेबल माहीत आहे, हे ऐकून मला त्याचे खूप कौतूक वाटले.
"आणि दुसरे म्हणजे, गवराक्काचा सन्दीप्या. तो हल्ली कोणत्यातरी फिल्म पहात जागा असतो, असे कानावर आलेय माझ्या.." अनुभव-अनुभव म्हणतात तो यालाच !
"ह्यातले कोणी जर जागे असले तर, सरळ स्प्रे मारायचा...मग दुसर्या दिवशी दूपारपर्यंत उठत नाहीत बघ" म्हणत त्याने हातातली विडी सन्दीप्या, नाहीतर सूमी समजून चूरगाळली.
"आणि ध्यानात ठीव, रातच्याला जास्त खाऊ नकोस, नाहीतर तूच घरी घोरात पडशील..खी: खी: खी: " बबन्या- सन्नी वैनी च्या लग्नातली घोडी परत खींकाळली.

एकदाची रात्र झाली, मी जामा-निमा करून तयारच होतो, बबन्या आला त्याची काळी माकड-टोपी आणि विजार घालून.

"पिशवी नीट धर, आणि आवाज करू नकोस, मी आधी जातो. तू ये मागून..सोबत नको जायला.." -बबन्या.

"तुम आगे बढो, मैं पिशवी संभाळता है उस्ताद" - मी.

"____" -बबन्याचा फक्त एक जळ्जळीत कटाक्श माझे तोन्ड बंद करायला पूरेसा होता.

गवराक्काच्या घरी काही ना काही कामामुळे नेहमी जाणे असल्याने बबन्याने सराईतपणे मागच्या बोळातून सावंतांच्या गच्चीवरून डायरेक्ट गवराक्काच्या हौदावर उडी मारली आणि तिथून थेट किचन च्या खिडकीजवळ पोचला. मी पिशवी आणि विजारीची नाडी सांभाळत हळूच उडी मारली.

"बारक्या, पिशवीचा आवाज करू नगंस, खूळखूळा नाय तो" बबन्याने दटावले, तशी मी पिशवी नीट धरली.

ठरल्याप्रमाणे खिडकीचे गज काढले, बबन्या आत उडी मारून गेला, त्याने आतून कडी काढली, मी आत गेलो. अंधारात चाचपडत मी बबन्याच्या मागं मागं गेलो.

"तू बारके डबे बघ, मी मोठाले बघतो." -बबन्या

मी एक-एक डबा हळूच उघडून बघायला सुरूवात केली. बबन्या आपले काम सराईतपणे करत होता. काही मोठाल्या डब्यांमध्ये लहान डबे होते, ते पण तो हळूच उघडून नीट बघत होता आवाज न करता. तेवढ्यात कूठले तरी दार उघडल्याचा आवाज आला. माझे हात- पाय तर लट-लट कापू लागले. माकड-टॉपीमधून घाम फुटला.
बबन्या म्हणाला, "तू थांब इकडेच, मी बघतो, तो टॉर्च आण हीकडं"

तो ह्ळूच दाराच्या दिशेने निघाला. बराच वेळ इकडे-तिकडे पहील्यावर कोणी नसल्याची खात्री झाली. पण गप्प बसेल तर बबन्या कूठला. त्याला कूठून तरी हलकासा उजेड दिसत होता. एव्हाना तो बराच सरसावलेला होता. एका खोलीचे दार थोडेसे उघडे होते. मी किचनच्या दारामागे लपून तो नक्की काय करतोय, कुठे चाललाय बघत होतो. त्याने हळूच दार थोडेसे ढकलले.
नेमके घडू नये तेच घडले. समोरच्या कॉम्प्यूटरवर सन्नी-वैनीची "बेबी डॉल" हळू आवाजात ठूमकत होती. झाले, तिला पाहिले, अन् बबन्याचे भान हरपले. आपण इथे कशासाठी आलोय, काय करतोय, सगळे सगळे विसरला...त्या गाण्यामध्ये एक बाटली फूटल्याचा आवाज येतो, नेमका त्याच ठोक्याला त्याने हाताताला टॉर्च जमीनीवर फेकला आणि खळकन् आवाज आला. तसे कोणीतरी बाथरूम च्या बाजूने पळत आले. मी पटकन दारामागे लपलो.

"आता आपली शंभरी भरली.." मी मनात म्हटले. चोरी करताना नेमका कोणत्या देवाचा धावा करायचा असतो, तेही माहीत नव्हते, आणि आत्ता बबन्याला विचारायची सोयही नव्हती.
चूप-चाप लपून पुढे काय होतेय ते बघण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता.

"आईईईईईईईईईईई....................." सूमी जोरात किन्चाळली.

"आईईईईईईईईईईई.................आईईईईईईईईईईई.....................आण्णा....आण्णा...लौकर या... माझा पाय..." सूमी एक पाय हातात धरून लन्गडत लाईट लावायला पुढे सरकत होती.

ती बहूधा जागी असावी आणि बाथरूम ला गेली असावी. येताना बबन्याने फोडलेल्या टॉर्च च्या काचेवर तिचा पाय पडला होता.
तेवढ्या वेळात बबनराव भानावर आले असावेत...तो त्याच खोलीत दारामागे लपला.

गवराक्का आणि संपतभौच्या घोरण्याच्या गिरणीचा पट्टा थांबला, ते कसे बसे धडपडत उठून आले. सूमीचा आवाज ऐकून लाईट लावला, तर तिच्या पायातून चांगलेच रक्त येत होते. रक्त पाहून दोघांची झोप उडाली.

"अगं काय झाले हे...असं कसं लागले तुला?" - संपतभौ

"आन् ह्या वेळेला कुठं गेली होतीस तू धडपडायला अभ्यास सोडून ? " -गवराक्का

"अगं आई, मी बाथरूमला गेले होते, आणि येताना ह्या काचेवर पाय पडला.." -सूमी

"अगं हीच्या पायाला लावायला काहीतरी आण आधी." - संपतभौ

"पण मी म्हणते, इथं ह्या वेळेला काचा आल्याच कूठून ? " गवराक्काचे डोके आता जरा चालू लागले होते. तिचे तेवढ्यात चालू असलेल्या कॉम्प्यूटर कडे लक्ष गेले.

"कारटे, दहावीची परीक्षा तोन्डावर आली, आणि तू काय अभ्यासाच्या नावाखाली हे गाणे बघत बसलीस ह्या वेळेला? " गवराक्का तिच्या पायावर मलम-पट्टी करत डाफरली.

"नाही….मी...ते...ते…मी" - सूमीच्या तोन्डून आता शब्द फूटत नव्हते. "...ते बघ, दादा आला "

"मागचे दार उघडे कसे राहीले..मी तर जाताना लावून गेलो होतो.." असा विचार करत, सन्दीप्या आत येतच होता, तोच घरातले सगळे ह्या वेळेला जागे, आणि समोर उभे पाहून एकदम दचकला.

"सन्दीप्या, तू कुठं गेला होतास ह्या वेळेला..?" त्याला एवढ्या रात्री बाहेरून येताना पाहून आता संपतभौंची झोप पूर्ण उडाली होती.
सूमीवर डागलेली तोफ आता त्यांनी आपल्या हातात घेऊन तोफेचे तोंड सन्दीप्याच्या दिशेने केले होते.

गवराक्का आणि भौ प्रश्नान्चे एक-एक गोळे त्यात भरण्यासाठी तयार करत होते.

"अरे सांग ना, रात्रीच्या ह्या वेळी तू कुठं गेला होतास..? "

"मी...म...त...ते....बाहेर गेलो होतो..."

"ते कळलं...कुठं तेच विचारतोय.."

"सूमे, जा जरा लाईट लाव पुढच्या खोलीतला...आज ह्या घरात रात्रीच्या ह्या येळेला कारट्याचे काय काय चाललंय त्याचा उजेड पडू दे जरा.."

चर्चासत्र आता पुढच्या खोलीत रंगणार, ह्याचा अंदाज घेऊन सूमीने तत्परतेने लाईट लावण्यासाठी लन्गडत पळ काढला. सगळे पुढच्या खोलीत गेलेले पाहून, मी आणि बबन्याने काचेच्या तुकड्यांवर पाय न पडू देता पाय काढला. मी निघताना सामानाची पिशवी घ्यायला विसरलो नाही.
"पुरावा सोडायचा नाही" - बबनोपाध्यांची शिकवणी, दुसरे काय.
आणि ही "मिशन" तर फसली होती, न जाणो, पुढच्या वेळेस पिशवीची गरज पडली तर..
"ऊम्मीद्पेही तो दुनीया कायम है"

आम्ही घरी निघालो. आज थोडक्यात वाचलो होतो, नाहीतर संपतभौ आणि गवराक्काच्या तावडीत सापडलो असतो तर चांगलेच सोलून निघालो असतो, आणि माझे तर करीअर चालू ह्यायच्या आधीच संपले असते.
चूपचाप घरी जाऊन झोपावे, असा विचारच करत होतो, तोच बबन्या म्हणाला, "काय नक्की भानगड आहे, ते कळलेच पाहीजे. तू जा घरी, मी आलोच.."
तो लपत-छपत त्यांच्या पुढच्या खोलीच्या खिडकीच्या दिशेने निघाला. मी पण मागे हटणार्यातला नव्हतो, मी ही त्याच्या मागोमाग निघालो.
ऊन्हाळा असल्याने खिडकी उघडीच होती. आतले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. आम्ही खिडकीच्या खाली लपून ऐकू लागलो. अधून मधून बबन्या हळूच आत काय चालले आहे ते बघत होता.

सन्दीप्या एका कोपर्यात भिजलेल्या बोक्यासारखा पाठीला बाक काढून उभा होता. सूमी आपल्यावरचे संकट टळले, म्हणून 'दुधाच्या पातेल्यात तोंड घालणार, तेवढ्यात मालकीण आल्याने पळ काढलेल्या मांजरीसारखी' दिसत होती.
आपल्याला हवे ते उत्तर मिळत नाही म्हणून आपल्या गल्लीत दुसर्या गल्लीतले कुत्रे शिरल्यासारखे संपतभौ गुरकावत होते.
बबन्याला खिडकीतून संपतभौच्या टकलावर चमकणारा ट्यूब-लाइटचा प्रकाश आणि गवराक्काचा रागाने हालणारा केसांचा आम्बाडा दिसत होता.

"नक्की सांग तू कुठे गेला होतास, आणि इकडे बघ जरा…तुझ्या गालाला काय लागलंय हे लाल ?" - गवराक्का

"फ्फी...फ्फी...फ्फी..." -दूधावरची मांजर फिसफीसली.

"सूमे, तुला काय झाले आता दात काढायला? " आम्बाडा जोरात डाफरला.

"अगं आई, ते लिपस्टीक चे डाग आहेत...फ्फी...फ्फी...फ्फी.."

लिपस्टीक म्हटल्याबरोबर सन्दीप्याने हाताने डावा गाल झाकला.

"दादा, डावा गाल नाही, उजवा.." सूमी नेहमी सारखी जास्तीची माहीती पुरवण्यासाठी तत्पर होती.

एव्हाना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येऊन संपतभौची कानशीळं तापून त्या लिपस्टीक एवढीच लाल झाली होती.
लिपस्टीकचे नाव ऐकून मला पण आतले दृश्य बघण्याची इच्छा अनावर झाली.

"कोण...कोण आहे तरी कोण ती..?" भौ.

"आन् तिच्यावर उधळायला तुझ्याकडे पैसे तरी कूठून आले एवढे? " गवराक्का.

अश्या आणी-बाणीतही बायकांना कसे नेमके प्रश्न सुचतात ह्याचे भौन्ना कौतूक वाटले असावे.

"मी..ते..तुझे दागीने विकले..." सन्दीप्या.

"आरं देवा...कर्मा माझ्या.... तू स्वत:च्याच घरात चोरी केलीस? अहो, बघितलं का काय करून ठेवलयं ह्या कारट्यानं..इतके दिवस तुमच्या मागे लागून मी ते दागीने करून घेतले होते...देवा..देवा..." तो धक्का सहन न होऊन गवराक्का भोवळ येऊन खाली पडली.

"सूमे, पाणी आण लौकर.. " संपतभौ ओरडले, तशी सूमी आत लन्गडली.
माझ्या मनात विचार आला, बरे झाले, आपण तिथून सटकलो, नाहीतर सूमीनं नक्कीच आपल्याला पाहीलं असतं आणि आत्ता इथे सन्दीप्या ऐवजी मी आणि बबन्या उभे असतो.

आता खिडकीतून दिसणारा आम्बाडा नाहीसा झाला होता. सूमी बहुधा गवराक्काच्या चेहर्यावर पाणी मारत असावी.
सेनापती धारातीर्थी पडलेला पाहून संपतभौना अजूनच चेव चढला.
"कारट्या, स्वत:च्या घरात चोरी करताना लाज नाही वाटली तुला? आता एवढे तरी सांग कोण आहे ती?"
त्यांची गर्जना ऐकून, सन्दीप्या उत्तरला
"ती नाही....तो...."

आता एवढा वेळ खिडकीतून दिसणारा भौंच्या टकलावरचा लाईट दिसणे बंद झाले होते. आवाज ही येत नव्हता. आम्ही दोघांनी टाचा उंच करून आत डोकावून पाहीले.

सूमी आता संपतभौंच्या तोंडावर पाणी मारत होती. भोवळ येऊन पडायची पाळी आता भौन्ची होती.

समाप्त.

Group content visibility: 
Use group defaults

Dhanyawaad!