किल्ले भामेर आणि रायकोट

Submitted by योगेश आहिरराव on 11 April, 2017 - 06:29

किल्ले भामेर आणि रायकोट

अगदी चोख नियोजन करून सुध्दा काही कारणास्तव ठरलेली मोहिम फिस्कटली. सुट्ट्या आणि परवानगी सर्व काही मिळवून सुध्दा घरात बसायचे हे मात्र कुठतरी खटकत होतं, मग काय दिवसभरात शेवटच्या प्रहरी नवीन कट डोक्यात शिजला अचानक भयानक सर्व तयारीनिशी मी, आश्विनी, छोटी चार्वी आणि निखिल (माझा चुलत भाऊ) सायंकाळी नाशिकच्या दिशेने निघालो. रात्री नऊच्या सुमारास त्या दोघींना नाशकात आप्तांकडे सोडून आमची गाडी आग्रा रोड वर सुसाट निघाली. वाटेत सोग्रस फाट्या अलीकडे ‘माखनचोर’ नामक एका धाब्यात जेवणासाठी थांबलो. हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. त्या वातावरणात गरम गरम बाजरीची भाकरी आणि शेवभाजी खासच. अपेक्षेपेक्षा जेवण चांगले मिळाले. सोग्रस फाट्याहून डावीकडे वळालो सातमाळा रांगेतली भावड बारी ओलांडून देवळ्यात जाई पर्यंत पुर्ण रस्त्यात आमचीच गाडी बाकी कुणीही नाही. पुढे सटाणा ताहराबाद पार करून मध्यरात्री नंतर पिंपळनेर पोहचलो.
पिंपळनेर हे आमच्या वडीलांचे मुळ गाव. रात्री मुक्काम करून सकाळी लवकरच साक्री हून पुढे डावीकडे नंदुरबार रोड पकडून छोटी बारी चढून वर आलो तर पठारवर कोवळे उन खात भामेर उभा होता
A.JPG
डावीकडे वळून गावात एका घराजवळ गाडी उभी केली,भामेर गावात बरेच जुणे अवशेष नजरेस पडले. गावाच्या मुख्य जुण्या वाटेवरचा मोठा दरवाजा जसा चांदवड गावात आहे त्यापेक्षाही कमानयुक्त काही स्तंभ, विरगळी जुणे भंगलेले अस्ताव्यस्त पडलेले पाषाण शिल्प बरेच काही.
B.JPG
भामेर किल्ला आणि त्याच्या बाजूचा दुसरा डोंगर या दोंघानी गावाला अगदी कवेत घेतले आहे.
गावातून बाहेर पडताच किल्ल्याच्या दिशेने निघालो, सकाळची वेळ असल्यामुळे असेल कदाचित पण सुरूवातीच्या वाटेवर नाक दाबूनच चालावे लागले. वाट चढणीला लागून भग्न तटबंदीयुक्त दरवाज्यातून खिंडीत इथे साधारणपणे किल्ल्याचे दोन भाग पडतात खिंडीच्या उजवीकडच्या पहिल्या भागात आम्ही निघालो, कातळातल्या पायर्या पार करत छोट्या टेपाडावरील पीर वर आलो
C.JPG
इथून खाली भामेर गाव रोजच्या दिनक्रमात गुंतलेले मागे आम्ही आलो तो रस्ता तर समोरच किल्ल्याचा सर्वोच्च माथा आणि त्या खाली कातळात खोदलेल्या गुहा आणि टाक्यांची मालिका. सकाळच्या कोवळ्या उन्हातला गार वारा खाऊन खिंडीत येऊन समोरच्या टेकडीच्या बाजूला चढाई करत निघालो या भागात काही कोरडी पाण्याची टाकी तर काही स्वच्छ पाण्याने भरलेली इथेच एके ठिकाणी सोबत आणलेला नाश्ता आणि फळे फस्त केली सकाळच्या स्वच्छ सुंदर वातावरणात जरा जास्तच रेंगाळलो, मागे आम्ही आलो तो किल्ल्याचा भाग.
D.JPG
किल्ल्याच्या उंच भागात झेंडा फडकत होता. त्याच दिशेने निघालो वाटेत उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा तसेच पुढे काही अंतरावर लेणं या मधील सलग तीन लेण्यातले कोरीव खांब, दरवाज्यावरील नक्षीकाम सारे काही लाजवाब पण दुर्दैवाने यावरही काही महाभागांनी आपली नावे टाकण्याचा करंटेपणा पाहून चीड आली.
E.JPG
त्याच वाटेने पुढे जातोय तर मध्येच भली मोठी मुख्य उंच डोंगरापासून वेगळी केलेली खाच दिसली त्या पलीकडच्या भागात वरच्या बाजुला तटबंदी थोडक्यात मुख्य बालेकिल्ला अथवा किल्ल्याचा मुख्य भागाचे शत्रुपासून संरक्षण हेतू असावे. अगदी कातळकडा कापल्याचे उदाहरण सुतोंडा (भुयारी दरवाजा) आणि अंतुर किल्ल्याच्या दर्शनी बुरूजाच्या भागात पहायला मिळते. तिथुन पलीकडच्या बाजूचा साक्री निजामपुर रोड, पठारावरचा सौर उर्जा प्रकल्प तसेच छडवेल निजामपुर दिशेला अनेक पवनचक्क्या नजरेत आल्या. मुख्य वाटेवर सामोरा आला तो बुरूज आणि तटबंदी, काही कोरड्या गुहा मागे टाकत कातळकोरीव पायराने वर दाखल झालो. समोरच नव्याने बांधलेले मंदीर, मोठे कोरड टाके आणि भग्न मंदिर. F.JPG
माथ्यावरून आजुबाजूचा बराच मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. सध्याचा सुरत धुळे महामार्ग थोडक्यात पुर्वीच्या काळी सुरत बुर्हाणपूर मार्गावरचा अहीर राजांचा इतिहास सांगणारा असा हा भामेरचा किल्ला. माथ्यावर सावली देईल असे काहीच नाही. मंदिराजवळ जरा वेळ बसून वेळेचा अंदाज घेत. गड उतरायला सुरूवात केली अर्ध्या तासातच खाली गावात आलो, गप्पांच्या ओघात असे कळाले की उन्हाळ्याचे चार पाच महिने भामेर गावात पाण्याचे प्रचंड हाल त्यात सरतेशेवटी एकाच विहीरीत पाणी शिल्लक असते.

आता आमचे लक्ष्य होते महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या सह्याद्रीतला उत्तरेकडचा सर्वात पहिला दुर्ग, किल्ले रायकोट.

निजामपुरहून डावीकडे कोंडाईबारी साठी वळालो. नागझिरी गावाच्या पुढे नवागाव लागडव्हाळ करत कच्चा पक्का रस्त्याने रायकोट गावात पोहचलो G.jpg
समोरच मारूती मंदिर तिथेच किल्ल्यापर्यंतच्या रस्त्याची चौकशी केली भर उन्हात त्या माळरानात जितकी गाडी पुढे नेता येईल तेवढाच त्रास कमी. शेतातल्या कच्च्या रस्त्यावरून दहा मिनिटात दोन घरांच्या वस्तीजवळ आलो. इथुनच पुढे किल्ल्याची पायवाट सुरू. गायकवाड कुटुंबियांचे हि शेतमळ्यातली घरे. चौकशी करून आम्ही किल्ला पहायला इतक्या दुरून आलोय हे कळताच त्यांच्यातले एक जण आत्माराम गायकवाड स्वत:हून आमच्या सोबत निघाले. दोन हजार फूटांपेक्षाही कमी उंची लाभलेला हा किल्ला अगदीच घाटमाथ्याचा पठाराला बिलगूनच आहे. पण पूर्वीच्या देशावरून गुजरातच्या दिशेला जाणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी निश्चितच उपयुक्त. पठारावर गावकरींनी मका बाजरीची बरीचशी शेती केली आहे. मुख्य पठारावरून वाट थोडी खाली उतरत समोर चढते इथेच पडीक तटबंदी तसेच पुढे डावीकडे गेल्यावर भग्न बुरूज दिसतो
H.JPG
वाटेत दोन मोठे तलाव लक्ष वेधून घेतात एक कोरडा आणि दुसरा थोडाफार पाणीसाठा असलेला अर्थातच इथल्या स्थानिकांची गुरांची पाण्याची सोय त्यामुळे भागते. बुरूजाकडून पुढे उजवीकडच्या वाटेने उतरणीला लागलो चक्क कड्याला बिलगून पायरा खोदलेल्या पुढे उजवीकडे झाडी भरलेली गुहा जर स्वच्छ केली तर अगदी कण्हेरगडाच्या गुहेसारखीच I.JPG
हिच वाट खाली मोरकरंज गावात उतरते. पुन्हा वर येऊन उजवीकडच्या माकडदरीचे काही फोटो घेतले.
आत्माराम गायकवाड आम्हाला म्हणाले, "सर तुम्ही एवढ्या दुरून आमचा किल्ला पहायला आलात, मला खऱच आनंद झालाय. तुम्ही पावसाळ्यात परत या, हे छोटी आगळी वेगळी फुलं येतात, सगळ खुपच भारी दिसतं तेव्हा." खऱच या पठारावर श्रावण महिन्यातले वातावरण सुंदर असणार यात शंकाच नाही. पुढे काही पडके अवशेष आणि एक पीर बाकी पठारावर पवनचक्क्या आपल्या कामात गुंतल्या होत्या.
तासदिडतासात आटोपशीर गडफेरी करून शेतातल्या गायकवाडांच्या वस्तीवर आलो. निरोप घेऊन पुन्हा कच्च्या वाटेने रायकोट गावात दाखल होत असताना एका शुष्क झाडावर हा निलपंख दिसला.
K.JPG
कोंडाईबारी अलीकडे दहिवेल गावातून पिंपळनेर रस्ता पकडला. वाटेत सामोडे गावात चुलत आजोंबाकडे दुपारचे जेवण केले. नंतर पांझरा नदीकिनारचे पुरातन गांगेश्वर शिवालय पहायला निघालो. पाण्यात असलेल्या मुख्य शिवलिंगाचे दर्शन गाभार्यात पायरा उतरून दर्शन घेतले.
मंदिर परीसर शांत आणि रमणीय, समोरच पाण्याचे कुंड. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
सायंकाळ पिंपळनेरमध्ये आप्त नातेवाईकांच्या भेटीत, रात्री मस्तपैकी धरणातल्या गोड्या पाण्याच्या माशांवर ताव मारला. मनासारखी भटकंती घडून एकंदरीत दिवस चांगलाच सत्कारणी लागला. आता वेध लागले होते ते दुसर्या दिवशीच्या मोहिमेचे.....

अधिक फोटो साठी हे पहा : http://ahireyogesh.blogspot.com/2017/03/bhamer-raikot.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन अन फोटो, इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
असे आडबाजुचे अपरिचित किल्ल्यांचे वर्णन आले की हल्ली मी गुगल मॅप उघडुन बसतो. Happy

हा सगळा भाग बघायचा राहिला आहे... >>>>खान्देश भागातले हे नितांत सुंदर किल्ले भामेर, रायकोट, सोनगीर, गाळणा, कंक्राळा, डेरमाळ आणि पिसोळ