एका धर्मांतराची कथा

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 6 April, 2017 - 12:28

लग्न होऊन दोन दिवसही लोटले नव्हते तोवर बायको म्हणाली, "मुझे और एक शादी करनी है।"
"English please, " मी म्हणालो.
बायकोच्या बोलण्याचा न पटण्याजोगा अर्थ निघायला लागला कि मी तिला इंग्रजीत बोलायला सांगतो. मुद्दा असा होता कि दिल्लीतलं आमचं लग्न तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे नातं मान्य होतं, विधी मान्य नव्हते. तर अजून एकदा तिकडच्या पद्धतीने लग्न करावं लागणार होतं.
आपल्याकडे आंतरजातीय विवाहाला विरोध करायला लोकांना फार मजा येते. अजूनही अण्णा, माझं आणि बायकोचं भांड्याला भांडं लागलं कि लगेच म्हणतात, "पहा, तरीच मी म्हणालो होतो, हे मांस खाणारे लोक, डोकं गरम असतं त्यांचं, अगोदरच कळायला पाहिजे होतं तुला,..." त्यात आमचं लग्न आंतरजातीय, आंतरराज्यीय, आंतरभाषिक, आंतरवांशिक, आंतरवर्णीय, आंतराहारपद्धतीय, आणि काहींच्या मते आंतरराष्ट्रीय सुद्धा! विरोधकांना पर्वणीच !! वास्तविक मणिपूरी विवाहपद्धत जगातली सर्वात उत्तम पद्धत असावी. तिथे प्रेमविवाहच करावा लागतो. लग्नापूर्वी साधारणतः ५-१० वर्षे लोक प्रेम करतात. मग बायकोला विवाहापूर्वी पळवून नेऊन (बलाने नव्हे हो) बुक करावे लागते. अगदी लैंगिक पूरकता पण चेक करण्याची सोय!
असो. आपला विषय धर्मांतर आहे. आम्ही दोघे मजल दरमजल करत इम्फाळला पोहोचलो. (त्यावेळेस केवळ एअर इंडीयाचं १६०००/-- रु प्रतिमाणशी एकतर्फी तिकिट होतं. म्हणून रखडत भारतीय रेल्वेने गेलो. इंडिगो एअरलाइन नसती तर आमच्या लग्नाचं आजपर्यंत मातेरं झालं असतं. असो.)पहिल्या दिवशी 'जावई घरी आल्याचा आनंद' आणि 'सुदुरदेशातून मूल परत आल्याचा आनंद' पैकी दुसराच आनंद सर्वत्र दिसल्याने पहिल्यांदा मी थोडा खट्टू झालो होतो. आमच्या सासूबाईंचे 'मयांग लोकांशी लग्न केल्यावर मुलींचे जीवन बर्बाद होते' असे फार तीव्र मत होते. ते त्या सर्वांना सोदाहरण ऐकवत म्हणे. सुदैवाने त्यांच्यात आणि माझ्यात समाईक भाषा नसल्याने मी मात्र या श्रवणश्रमांतून वाचलो होतो.
लग्नाचा दिवस आला. बरेच विधी भोगावे लागले.
(सगळे विधी कमीत कमी करायचे (पैसे वाचवायचे, इ) म्हणून मुद्दाम आर्यसमाजी लग्न करण्याचे माझे सगळे कष्ट वाया गेले. आर्य समाजाच्या पंडिताला दिल्लीत मी बर्‍याच अटी टाकल्या होत्या -लग्न भयंकर अशुभ दिनी व्हायला हवे, मंजे माझ्याशिवाय दुसरा कष्टमर त्यादिवशी नको, जास्तीत जास्त १५ लोकच उपस्थित राहणार अशी अट सगळ्यांना सांगायची, मला फारतर एक तासाचा पेसंन्स आहे, इ इ. तो मला त्याचे credentials , आम्ही जशा आमच्या प्रोजेक्ट शीट्स प्रोपोजलला जोडतो, तशा दाखवू लागला. साला एकही साधा विवाह त्यात नव्हता. धर्मांतरे काय, पुनर्विवाह काय, आंतरजातीय विवाह काय, आंतरवयीन विवाह काय, नि अजून काय काय! आपला विवाह हटके सदरात होत आहे याचे वाईट वाटल्याने एक तरी सामान्य विवाहाची केस दाखव म्हणून मी त्याला म्हटले. त्याने बराच वेळ अशी केस त्याच्या जाडजूड आर्काइवजमधे शोधली , पण मिळाली नाही.)
मला पारंपारिक मणिपूरी ड्रेस चढवण्यात आला होता आणि अगदी मशिन प्रमाणे मी ब्राह्मण म्हणेल तसे करत होतो. लवकरच मी मी फार आज्ञाधारक आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले.
"अजून किती वेळ?" दोन तीन तासांनी अस्वस्थतेचे पहिले चिन्ह दाखवत मी विचारले.
"झालेच, फार तर एक तास" बायको म्हणाली.
तो एक तास झाला. मी पून्हा विचारले, "आता अजून किती वेळ?"
"आता फक्त तुझे धर्मांतर करायचे राहिले आहे. दहा मिनिटात होईल. मग आपली सुट्टी."
लॉजिस्टक्स आणि धर्म यांबाबत मणिपूरी लोक किती कडक शॉक देतात हे त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आल्याशिवाय कुणाला कळणार नाही. धर्मांतर म्हणल्याने मी पहिल्यांदा दचकलो. मग आपल्या बाजूला सगळे हिंदूच आहेत आणि आपणही हिंदूच आहोत हे पाहून थोडा सावरलो.
(माझी बायको जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती तेव्हा मी तिला बाईकवर नयनरम्य आणि शांत मोनास्टेरीत घेऊन गेलो होतो. "मी इथे नेहमी मॅगी सूप खातो. आज तुझ्या निमित्ताने पहिल्यांदाच बुद्धाच्या प्रतिमेचे दर्शन घेत आहे," मी म्हणालो.
"हो का? मी देखिल पहिल्यांदाच मोनास्टेरी पाहतेय," ती म्हणाली.
"अरे म्हणजे तुझा धर्म बुद्ध नाही? मला वाटलं तुमच्याकडचे सगळे लोक बुद्ध असतात," मी आश्चर्याने म्हणालो.
"आमच्या इम्फाळचे सारे लोक प्रॉपर हिंदू आहेत," ती म्हणाली.
तेव्हा प्रकरण मिटले होते. पण आता मी सॉलिड संभ्रमात पडलो होतो.)
"कोणत्या धर्मात धर्मांतर करायचे आहे? आणि १० मिनिटाच्या शॉर्ट नोटीसमधे धर्मांतर करायला भाग पाडणे चूक नाही का?" मी तक्रार केली.
"गपचिप बस आणि पंडित सांगतात तसे कर. जास्त डोके लावू नको." ती म्हणाली. दोन तीन मिनिटानी माझी चूळबूळ वाढली. बायकोचे भाषेचे ज्ञान यथातथाच असल्याने मी मागे उभे असलेल्या मेव्हण्याला विचारले, "Do you mean religious conversion?"
"हो. तेच ते. तू शांतपणे विधी कर. मग नंतर मी तुला सांगतो." तो थंडपणे (या लोकांनी आज माझा शर्ट पांढरा असावा कि पिवळा यावर गांभीर्याने सविस्तर चर्चा केली होती हे खरे वाटेना.) म्हणाला. आता जास्त तोंड वाजवू नको असे बहिणभावांना म्हणायचे होते. मग मी गुपचुप सगळे विधी केले. जेवणे झाली. धर्मांतर होऊन २ तास झाले आणि मला माझ्या नव्या धर्माचे नाव देखिल सांगितले गेले नाही. 'बोलूत सावकाश' असेच प्रत्येकजण म्हणत होता. त्यांच्यालेखी काहीच घडले नव्हते. बायकोने, इतरांनी माझ्या डोक्यात एक किडा सोडून दुपारची मस्त ताणून दिली. संध्याकाळी ते जागे व्हायची मी वाट पाहत होतो, आणि तोपर्यंत धर्मांतरित माणसाचे जीवन कसे असते याची कल्पना करायचा प्रयत्न करू लागलो, धर्माचे नाव माहित नसताना!
संध्याकाळी मेहुणा मला त्याच्या स्कूटरवर फिरायला घेऊन निघाला होता. आपल्या पिलियन रायडरचा आपण आजच धर्म बदलला आहे आणि त्याला एक सुजाण नातेवाईक म्हणून त्याबद्दल काही कल्पना द्यावी असा विचार त्याच्या गावीही नव्हता. "बाबा रे, तू मला कोणत्या धर्मात घातले आहेस, त्याचे काय नियम आहेत, इ इ मला केव्हा सांगशील?" मी कळवळून म्हणालो.
"अरे हां,..." लगेच त्याने स्कूटर वळवली आणि एका डोंगरावर घेतली. तिथे एक छोटेसे चिनी टाईपचे मंदिर होते. त्याच्या बाजूला एक मोठा सूचना(?) फलक लावला होता.
"आता हे सभ्यपणे कसं सांगावं हे मला कळत नाही, पण आमच्याकडे तुमच्यासारखं धर्माचं प्रस्थ नाही. तुमच्याकडे एका माणसाचा एकच धर्म असतो. आमच्या एक, दीड आणि दोन धर्म पण असतात." तो सांगू लागला.
"मंजे? आत्ता माझे किती धर्म आहेत?" मी कुतुहलाने विचारले.
"इनसायनिया काढ." तो म्हणाला. इम्फाळमधे अल्ट्रा माइल्ड सहज मिळत नसल्याने आम्हाला निष्कारण धूम्रपानाचा दर्जा अपग्रेड करायला लागायचा. दोघांनी त्या हिरव्या कंच रानात, शांत आणि रम्य जागी दोन झुरके घेतले. "३०० वर्षांपूर्वी बंगालमधल्या एका साधुच्या प्रभावाने आमचा गरीब नवाज नावाचा राजा प्रभावित झाला आणि आम्ही हिंदू झालो. काही लोक दोन्ही धर्म पाळू लागले, काही केवळ हिंदू आणि काही केवळ मैतेयी. मैतेयी हि हिंदूंची एक जात मानली जाते पण वास्तविक तो एक वेगळा धर्म आहे." तो म्हणाला.
मला आता बर्‍यापैकी रोमांचक वाटू लागले. मंजे त्रास काही नाही आणि नाव सरळ रानड्या आंबेडकरांच्या यादीत!
"या धर्माचे काही तत्त्वज्ञान? काही रीती?" मी उत्साहाने विचारले. पुढे "मला काही केस, इ इ वैगेरे कापायला/ठेवायला लागणार? माझ्याने हे होणार नाही." एक बंड करायची आलेली संधी का सोडा म्हणून मी लगेच म्हणून टाकले.
"फिलॉसॉफी? तो मोठा बोर्ड पहा" एक चांगला कश घेत मेहुणा म्हणाला.
मी त्या फलकाकडे पाहिले. बुलेट पॉइंट्स मधे ८-१० गोष्टी लिहिल्या होत्या. दोन्ही बाजूला ड्रॅगन होते. मी सरसावून एक खोल कश घेतला आणि तो फलक वाचण्यासाठी पुढे सरसावलो. जगातल्या एका महान देशाच्या महान धर्माच्या अग्रणी जातीच्या माणसाने, भारतीय हिंदु ब्राह्मणाने, जगाच्या कोण्या एका कोपर्‍यातल्या एका अज्ञात धर्मावर भाष्य करण्याची, टिंग्या टाकण्याची सुंदर वेळ आली होती. असला मौका क्वचितच आणि तोही भाग्यवंतांनाच मिळत असावा.
"जगातील सर्व मानव समान आहेत."
"प्रत्येक माणसाने इतर प्रत्येक माणसावर कोणताही भेदभाव न बाळगता प्रेम करावे."
"मानवता हाच धर्म आहे."
.
.
.
दहा बुलेट पॉइंट्स असावेत. संपले. मेहूण्याकडून खात्री करून घेतली कि बाबा हीच का धर्मतत्त्वे? कोणताही चित्रविचित्र नियम नाही. काही आडंबर नाही. अगदी आपला महान औपनिषदिक वारसा सांगायला गेलो तरी खुजा पडावा अशी ती वाक्ये! आपलंच ते सर्वात खरं नसतं, आपलंच ते सर्वात चांगलं नसतं असा शंभरवेळा अनुभव आलेला असुनही, आपण आपल्याला सर्वात चांगले समजत असताना आपल्यापेक्षा काही चांगले निघाले तर जे दु:ख होते ते झालं.
सिगारेट संपत आली होती आणि लवकरच चिरडली जाणार होती, माझ्या आत्मश्रेष्ठत्वाच्या माजाचे जे होत होते तेच पॅरलली तिच्याबाबत होत होते. मेव्हण्याने शेजारच्या झोपडीतून पिण्याचे पाणी मागवले. डोंगरावरचे स्वच्छ, शुद्ध, गोड पाणी तरतरी देऊन गेले. ईशान्य भारताच्या शुद्ध हवेचा एक मोठा श्वास फुप्फुसांत खोल घेतला. मावळत्या सूर्याच्या किरणांत, सायंकाळच्या गुलाबी थंडीत, कोठलीही तक्रार करायची संधी न देणार्‍या मोहक निसर्गराईमधून क्षणाक्षणाला प्रचंड भारी होत जाणारं ते नव्या धर्माचं पालडं सांभाळत सांभाळत घरी आलो.
(सत्यकथा)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख !
शीर्षक वाचून लेख उघडू कि नको झालेलं . (सध्यच्या बजबजपुरीत अजून एक भर ) पण लेख वाचला ते बरच झालं असं वाटतंय . सुखद शेवट वाचून छान वाटलं.

बादवे , तुमचा नवीन धर्म सगळ्या जगाने स्वीकारला तर जगाचंच कल्याण होईल Happy

मस्तं.
हा लेख कितीही वेळा वाचला तरी मला पुन्हपुन्हा वाचावासा वाटतो.
सगळेच या धर्मात कन्वर्ट होवोत आणि तो पाळोतही ही सदिच्छा!

अजो,

तिकडे आधी लिहिलेलं इथे डकवून आयडी एस्टॅब्लिश करून मग नंतर हळू हळू आपलं तेच सुरू करणे हा प्रयोग मनःपूर्वक आवडला.

बाकी चालू द्या. तुम्हाला सेकंड विंड मिळालाय. मला कंटाळा मिळालाय.

रच्याकने,

इथे तुम्हाला भरपूर ब्याकिंग मिळेल. आय कॅन लिस्ट द आयडीज राईट नाऊ. Wink

Great!

धर्मांतर तुम्ही इतक्या लाईटली कसं काय घेतलंत? नीटसा समजलाच नाही. मैतेयी काय?
तसं ते धर्म अ‍ॅडवणं झालं टेक्निकली. आणि मोठा गोड धर्म आहे. काही मला तरी पाळावं लागत नाही. बायको घरात दोन्ही धर्मांचं करत असते.
=====================
जन्मावेळी धर्म लाइटली घेतला होता ना? आणि बायकोचा धर्म तो आपला धर्म.

धन्यवाद जाई, साती, आ रा रा, अंकू, मंजूतई, कावेरी, आनंदयात्री, आगाऊ, विद्या, हर्शल, फेर्फटका, तैमूर, अमितव, अदिती, नताशा.
======================
जाई आणि साती, दुर्दैवानं जगातले असे अनेक लघुधर्म मोठ्या बांडगूळ धर्मांनी गिळंकृत केलेले आहेत.