रामन राघव टू ट्रॅप्डः व्हाया फियर स्टेशन्स

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

स्वतःमध्ये कायमस्वरूपी वस्ती करून असलेली भिती आणि दहशत संपवायची असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे ती भिती आणि दहशत कुठचाही मुलाहिजा न ठेवता दुसर्‍यांना दाखवणे- हे 'रामन राघव' मधल्या 'रामन'ने मांडून दाखवलं, तेव्हा अंगावर काटा आला. नंतर विचार केल्यावर लक्षात आलं- हे असंच असतं हे आपल्याला आधीच माहिती आहे. फारतर त्याच्या अनेक व्यत्यासांच्या आणि उपप्रमेयांच्या स्वरूपात माहिती होतं.

म्हणजे उदाहरणार्थ: दुसर्‍याला भिती दाखवायची नसेल, तर आयुष्यभर कुठच्या तरी अनामिक भितीच्या सावटात राहावे लागेल.
किंवा मग- स्वतःला वाटत असलेली भिती संपत नसेल तर ती किमान दाबून ठेवता येते- दुसर्‍याला दुसरीच कुठची तरी भिती दाखवून.
किंवा मग- भितीची स्वतःची एक हायरार्की असते, ती तुम्हाला एकेका पातळीवरून फरपटत नेते, आणि एकेक पातळीवरची भिती वाटणे संपवून पुढच्या पातळीला तोंड देण्याव्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही.
किंवा मग- सतत कसली तरी भिती वाटत राहणे फार फार आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला कधीतरी कुठेतरी सुरक्षित कसं वाटू शकेल?
किंवा मग -
***

प्रत्येकामध्ये एक सद्वर्तनी आणि एक दुर्वर्तनी- अशी दोन्ही व्यक्तिमत्वे वसत असतात- हे शाळेत शिकण्याच्या काळातली एक छोटीशी गोष्ट. जी मरेस्तोवर मी विसरू शकणार नाही. माझ्या दीडदोनपट आडवा आणि उभा असलेला एक मुलगा सतत दांडगाई करायचा. शाळेची सगळी वर्षे- जी माझ्या अभ्यासा-हस्ताक्षरा-निबंधा-लिखाणाच्या कौतुकाने काठोकाठ भरली होती- ती सारी व्यापून उरलेली गोष्ट म्हणजे या मुलाची मला मनोमन वाटणारी अनामिक भिती. त्याचं सॉफ्ट टार्गेट म्हणजे मी. वर्गात शिरलो की माझी नजर भिरभिरत त्याला शोधे. लालतांबड्या डोळ्यांनी मागल्या बाकावरून थेट माझ्याकडेच बघताना आढळला की मला धस्स होई. मी बाकावर बसलो, की मागून बाके ओलांडत पुढे येऊन बसे- थेट माझ्या शेजारी. शिक्षकांची पाठ वळली की बोटांची नांगी करून तो माझ्या पोटाला भयंकर दंश करे. तो जे काय करत असे त्याला चिमटा म्हणणे म्हणजे या मुलावरच अन्याय केल्यागत होईल. माझे डोळे काठोकाठ पाण्याने भरले की तो कुत्सित हसे. त्याचे साथीदारही मागून खुसखुसत.
मोकळा तास असला की मुलांना आनंद होई आणि माझ्या अंगावर काटा. कारण या पोराच्या दांडगाईला काही सीमाच राहत नसे.

दुसरा एक चंदू होता- शेतकर्याचा मुलगा. अंगापिंडाने थोराड. पण त्या दांडगेश्वराच्या दहशतीपुढे चंदूचे जाड बोलके ओठ आणि स्निग्ध डोळे म्हणजे माझा आसरा होते. शाळेची ती काही वर्षे या चंदूने मोठ्या भावाच्या किंवा वडिलकीच्या मायेने मला पंखांखाली घेतलं- हे खुद्द चंदूलाही आता आठवत नसेल.

दांडगेश्वराची कथा न्यारीच. त्याचा मोठा काका म्हणजे अक्षरशः खवीस. त्याच्यापुढे अख्ख्या घरादाराचे काही चालेना. बाकीची पोरं कशी अभ्यास करतात म्हणून सतत माझे उदाहरण देऊन हा खवीस काका दांडगेश्वराला उभा आडवा चोपायचा. माझ्यावर दांडगेश्वराचा दात का होता- ही कथा जरा उशिराच कळली. पण कळली तेव्हा हा स्वतःही कुठच्या तरी दहशतीच्या सावटात असू शकतो, आणि होता- ही कल्पना आधी अशक्य, आणि मग गंमतीशीर वाटली.
***

या दांडगे सरांवरून पुन्हा आता 'रामन राघव'मधला 'राघव' आठवायला काहीच हरकत नाही. कारण खरं तर राघववरूनच मला दांडगेश्वराची मघाशी याद आलेली. राघव पोलिस इन्स्पेक्टर आहे आणि एका भयंकर सिरियल किलरचा शोध घेण्याचं काम त्याच्यावर आलं आहे. आता राघव पोलिस आहे म्हणून त्याचा लगेच सद्वर्तन, सद्सदविवेकबुद्धी इत्यादीशी संबंध लावण्याची गरज नाही- हे निराळं सांगायला नको. छोट्यामोठ्या बर्‍या वाईट गोष्टी- म्हणजे उदाहरणार्थ- दारू, ड्रग्ज, अनेकींशी बिनदिक्कत इश्कबाजी- अँड व्हॉट नॉट. एकदा एका ड्रग डीलरच्या बंदुकीशी सामना होतो तेव्हा काही सेकंदात वीज कोसळल्यागत त्याला कळतं- की तो स्वतःही घाबरू शकतो. इतकंच नव्हे तर हे घाबरणं, आणि भिती ही त्या एका सेकंदापुरती मर्यादित नव्हती. ती कायमस्वरूपी त्याच्यात वास्तव्य करून आहे. वेळ येताच ती अशी उग्ररूप धारण करून त्याचं आजवरचं सारं शौर्य, रूबाब सारं सारं मातीमोल करणार आहे.

हे आपल्यालाही तेव्हाच कळतं. आपण नकळत आपल्या स्वतःतच अनधिकृत भाडेकरू म्हणून कधीच्याच राहत असलेल्या कसल्यातरी कुठच्यातरी भितीचा शोध घ्यायला लागलो आहोत- हे आपल्याला कळतं तेव्हाही असाच विजेचा धक्का बसतो.

या भितीवर राघव मात करतो खरा. पण दरम्यान त्याला भितीच्या काही स्टेशनांतून रीतसर प्रवास करावा लागतोच. दुसर्‍याला दहशत दाखवून तो ही स्वतःतल्या भितीविरूद्धची लढाई तात्पुरती जिंकतो.
पण ती कथा नंतरची.
***

पाऊलो कोएलो एका ठिकाणी म्हणतो- सद्वर्तन, चांगुलपणा, सत्शील इ. इ. सारं झूठ.
म्हणजे असं की चांगलं वागणं; बींग गुड, जनरस, हेल्पफुल - हे सारं 'मूळ प्रवृत्ती' नाही. तर वाईट्पणा, दुष्टपणा हे मूळ आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. हेच इथले मूळ रहिवासी.

त्यापेक्षा 'आदिम' असं काय असेल तर ते म्हणजे भिती. यदाकदाचित माणूस चांगलं-छान वगैरे वागलाच तर ते या भितीपोटी. म्हणजे अभ्यास करायला हवा- मार पडेल. चोरी करूया नको- शिक्षा होईल. कायदा मोडू नये- दंड होईल. लग्नाच्या जोडीदाराव्यतिरिक्त कुठे तोंड घालू नये- लोक काय म्हणतील, आणि मग प्रतिष्ठेचं काय. राग आला तरी
रस्त्यात उगाच गोंधळ घालू नये- समोरचा आपल्यापेक्षा दांडगा निघाला तर?

याचाच दुसरा अर्थ असा, की एखादा माणूस चांगला वागला- तर त्याचं कारण 'तेव्हा तशी परिस्थिती होती' इतकंच. परिस्थिती बदलली तर तो कसा वागेल हे माहितीच नाही. किंवा खरं म्हणजे नीटच माहिती आहे. आणखी दुसर्‍या शब्दांत - त्याला खरं तर वाईटच वागायचं होतं, आणि आजवरच्या त्याच्या स्वतःच्या सार्‍या अपमानांचा, अपयशांचा, वाट्याला आलेल्या दुर्दैवांचा आणि खूप संधी हुकल्याचा बदला घ्यायचा होता, घाबरटपणा झटकून, दहशत भिरकाऊन देऊन बेमुर्वतखोर बनायचं होतं, आपणही सत्ता गाजवू शकतो असं दाखवून द्यायचं होतं. पण तसं जमलं नाही. तीच ती, वसती करून असलेली भिती आडवी आली..!

थोडक्यात काय तर भिती हीच मूळ भावना आणि मूळ प्रवृत्ती. बाकीचे सारे इमले याच पायावर.

म्हणजे कल्पना करू या की आपल्या दोन्ही बाजूंना दोघे चालत आहेत सतत. एक सैतान, एक देवदूत. तर अनेक वेळेला देवदूताचा विजय झाल्यागत वाटत असलं तरी सैतानाचा पराभव कधीही झालेला नसतो. याउलट जिथं सैतानाचा विजय होतो, तिथं देवदूताचा मागमुस सुद्धा नाही! इतकंच नव्हे, तर इतकी अमुक एक वर्षं हे देवदूतसाहेब आपला हात धरून वगैरे चालत होते- हे चक्क खोटं वाटायला लागतं. हे महाशय आपल्यासोबत इतका काळ होते की नव्हतेच? आणि मग यांचे अनेकदा विजय वगैरे झाल्यागत वाटत होते - त्याचं काय?

हे म्हणजे सरळ सरळ चीटिंग. गोष्ट सांगताना असल्या गोष्टी काय बर्‍या नि खर्‍या वाटत नाहीत. पण गोष्ट ही शेवटी कितीही झालं तरी गोष्टच. जरा बरं वाटावं आणि झोपबीप लागावी म्हणून सांगायची. खर्‍या गोष्टी झोप उडवणार्‍या असतात हे आपल्याला व्यवस्थित ठाऊकच असतं- तर त्यावर पांघरूण वगैरे घालायला या गोष्टी बर्‍या.
***

'ट्रॅप्ड' मधल्या नायकाने भितीच्या निरनिराळ्या पातळ्यांचं घेतलेलं दर्शन फार फार प्रातिनिधिक आहे. प्रपोज करायच्या आधी 'मी पाच आकडे मोजेस्तोवर मला काय खायला आवडते ते ओळखून दाखव, तरच-' या आव्हानासमोर नायकाला वाटलेली क्षुल्लक आणि क्षणिक पण आयुष्याला कलाटणी देणारी- हरण्याची भिती नंतर पातळ्या बदलते आणि वेगवेगळ्या रूपांत त्याच्यासमोर येते. भितीची पातळी कितीही छोटी किंवा मोठी असो, पण प्रत्येक वेळा ती आयुष्याला कलाटणी देण्याचं सामर्थ्य बाळगून असते, तेव्हा आधीच्या पातळीवरच्या भितीची लायकी नक्की किती होती- असे प्रश्न फोल ठरतात. तो क्षण, ती परिस्थिती, ती भिती आणि पातळी- इतकंच काय ते सत्य.

म्हणजे आता गोष्टच सांगायची झाली, तर डिनरला घेऊन गेल्यानंतर काही दिवसांतच गर्लफ्रेंडचं लग्न ठरल्याने तिला गमावून बसण्याची भिती उत्पन्न होते. त्यापोटी अगतिक होऊन आपला नायक लिटिगेशनमुळे स्मशानवत झालेल्या भल्यामोठ्या इमारतीतल्या पस्तिसाव्या मजल्यावरच्या अपार्टमेंटमध्ये आसरा घेतो. दुसर्‍या दिवशी या एकाकी अपार्टमेंटमध्ये राजाराणीचा संसार सुरू होणारच होता की बाहेर पडण्याचा दरवाजा लॉक होऊन नायक पस्तिसाव्याच काय पण अख्ख्या इमारतीतच एकटा अडकतो. वीज आणि अन्न-पाणी नसलेल्या त्या घरात त्यानंतर त्याला आयुष्यच गमावून बसण्याची भिती विश्वरूप दर्शन देते, आणि बर्‍यावाईट गोष्टी करत नायक संघर्ष चालू ठेवतो. तो करत असलेल्या गोष्टी बर्‍यावाईट किंवा मोठ्या-छोट्या नसतात, तर एकाकी अवस्थेत हाल होऊन मरण्याच्या भितीवर विजय मिळवण्याचे प्रयत्न- इतक्या महान पातळीवरच्या त्या असतात. साध्या उंदराची भिती वाटणार्‍या नायकाला नंतर त्याच उंदराचा नंतर आधार वाटू लागतो. आयुष्य गमावण्याच्या भितीच्या सावटाखाली असलेला नायक काही दिवसांनी या सापळ्यातून बाहेर पडतो, तेव्हा आधुनिक गगनचुंबी इमारतीतून बाहेर येणारा माणूस पाषाणयुगातला आदिमानव झालेला असतो.
***

'ट्रॅप्ड'मधल्या भिती आणि दहशतीची विविध प्रतलं ही आपल्यातुपल्या आयुष्यांना सहज सामावून घेऊ शकतील, आपल्याचं छोट्यामोठ्या संघर्षांचं आणि सतत असलेल्या धास्तीच्या छायांचं प्रतिनिधित्व करू शकतील- इतकी सर्वसामान्य आहेत. प्रत्येकाच्या ठायी ही धास्ती, भिती आणि घाबरवून हादरवून टाकणार्‍या शक्यतांचं वास्तव्य असतंच असतं. त्याशिवाय आपल्याला कितीही वर्षांनंतर, सुखवस्तू झाल्यानंतर, सुरक्षित जीवन जगत असतानाही, अगदी म्हातारे झाल्यानंतरही घाबरवून टाकणारी छोटी मोठी स्वप्ने पडणारच कशी? जागे असताना आपण कितीही सुखी आनंदी सुखरूप आणि सुरक्षित असेनाका. स्वप्नांत आणि नेणीवांत आपली सतत बस-ट्रेन चुकत असते, अपघात होत असतात, जीवलग मरून जातात, परीक्षा उद्यावर आल्यावरही अभ्यास झालेला नसतो किंवा मग एका पेपरला दुसर्‍याचाच अभ्यास आपण करून जात असतो, कुठून तरी उंचावरून (उदाहरणार्थ पस्तिसाव्या मजल्यावरून) तोल जाऊन पडत असतो, इतकंच काय, पण साधं जमिनीवर चालत असतानाही अचानक खड्डा निर्माण होऊन त्यात आपण गाडले जातो.
***

रामनलाही फार पुर्वी कधी तरी भिती-धास्ती वाटली असणारच. त्याने त्याच्या परीने तीवर मात करायचे उपाय शोधून काढले आहेत. कुठचंही कारण नसताना समोरच्याला समोरच्याच्या आयुष्यातल्या भिती-दहशतीसकट संपवून टाकणे- हा तो उपाय. समोर आलेल्या अश्राप जीवाला शेवटची मृत्यूची भिती दाखवून तो थंड डोक्याने संपवून टाकतो. त्या जीवाच्या चेहर्‍यावर उमटलेली शेवटची गडद भिती आणि दहशत तो त्रयस्थ शांतपणे आणि तरीही एखाद्या कुशल कलाकाराच्या बारीक आणि निष्णात नजरेने तो न्याहाळतो. या अशा दहशतीशी त्याचं अतुट असं नातं जुळलं आहे. ते शब्दात वर्णन करता येणार नाही, कुणाला पटवून देता येणार नाही आणि त्याची रामनला गरजही वाटत नाही. लोकांनी त्यला वेडा, सायको किंवा सिरियल किलर अशी नावं ठेवली आहेत, पण त्याला त्याची पर्वा नाही. अन्नपाणी शोधण्यापेक्षाही जास्त असोशीने खून करण्याची निरनिराळी शस्त्रं, आयुधं, मार्ग आणि ठिकाणं शोधत तो अश्वत्थाम्यासारखा फिरतो आहे.

राघवशी आमनेसामने झाल्यानंतर त्याला रामनचीच दुसरी बाजू सापडल्याचा आनंद होतो. 'किल फॉर अ कॉज' हे किती निरर्थक आहे- हे तो राघवला समजाऊन सांगतो. भितीशी मैत्री करून तिला संपवण्याचे मार्ग सांगतो. रामनची शिकार करायला आलेला राघव स्वतःच शिकार होतो, रामनचाच दुसरा चेहरा बनतो तो निव्वळ आयुष्यात अवचित येऊन ठेपलेल्या धास्ती आणि भितीला संपवण्याच्या ईर्षेपायी.
***

कुणी सांगावं- रामनला अजूनही आत कुठेतरी भिती वाटत असेल. दुसर्‍याला घाबरवून हादरवून आणि मग मारून टाकणे बंद केलं, तर स्वतःच्याच जगण्यातली भिती पुन्हा कुठच्या तरी रूपात डोकं वर काढेल- अशी. अशी भिती रामनला वाटत असेल तर तिच्यापासून राघवचीही सुटका नाहीच. स्वतःच्या भितीवर मिळालेले विजय तात्पुरते असण्याची बरीच शक्यता आहे. कारण मुळातच भिती ही जगातली पहिली गोष्ट असल्याने, आदिम आणि अंत असल्याने तीशिवाय माझं जगणं शक्य नसेल. ती नसेल तर मीही नसेन.

रामन, राघव आणि ट्रॅप्ड नायक- धास्ती आणि दहशतीच्या अजब दुनियेचे तीन कॅलिडोस्कोप की काय ते. हे असे माझ्यासमोर जमिनीवर मांडून मांडी घालून रामन मरणार्‍या चेहेर्‍यांकडे बघतो तसा चौकस, आसक्त पण तरी त्रयस्थ नजरेने मी किती तरी दिवस बघत बसलो आहे. रोज नवं काहीतरी सापडतं. आणखी काहीतरी सापडतं की काय- अशी आता भिती मात्र वाटत नाही.

आता माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी दहशत काय, तर एक दिवस एक रामन माझ्यासमोर अचानक उभा ठाकेल. पण तरी मला अजूनही अचानक चटका बसण्याची, खूप उंचावरून तोल गेल्याची, अपघात होऊन हातपाय गमावल्याची, परीक्षेला फार उशीर झाल्याची, खड्ड्यात पडल्याची स्वप्ने पडतातच.
***
***

विषय: 
प्रकार: 

नेहमीप्रमाणेच क्लास लिहीलंयस! <<हे म्हणजे सरळ सरळ चीटिंग... >> पॅरा फार आवडलाय.
हे दोन्ही सिनेमे पाहिले नाहीत म्हणून संदर्भ लागले नाहीत पण स्वप्नं आणि आदिम भीतीचा सिद्धांत पटलाच.

र.रा. कश्यप पेक्षा तुम्हालाच अधिक कळला म्हणायचं.
फार अपेक्षेने पहिला होता पिक्चर पण फोल गेलं सगळं. मात्र हे सही लिहिलंय. आवडलं.

छान लेख नेहमी प्रमाणेच. मी कायम अश्या भीती खाली राहुन स्वतःचे अस्तित्व शोधून जगत आल्यामुळे मला हे पटतं इतरांच्या व्यक्ती व प्राणी ह्यांच्या बाबतीतही पटतं. वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम्स बनवते मी.