पक्ष्यांची दुनिया.. ( कोंकणमय )

Submitted by रोहित ..एक मावळा on 3 April, 2017 - 10:59



२०१२ च्या सुमारास गणपतीला कोकणात मित्रांकडे गेलो होतो.तेव्हाच तिथल्या निसर्गसौंदर्यानी मनाला भुरळ घातली होती.हिरवेगार कोंकण डोळ्यात साठवुन घेतल होत.पान,फुल,वेली यांच्याबरोबरच वेगवेगळ्या पक्ष्यांचे दर्शन सुद्धा घडल होत.पण कॅमेराच्या तांत्रिक कमतरतेमुळे पक्षी टिपता आले नव्हते.२०१६ च्या अखेरीस कोकणभेटीचा योग पुन्हा जुळुन आला अन यावेळी जास्त ऑप्टिकल झुमवाला कॅमेरा पण सोबतीला होता.मायबोलीकर गिरिविहारच्या गावी वेरली(मसुरेजवळ) ला इंद्रा,विन्या,नवीन अशी आमची टोळी निघाली.गिरिच गाव म्हणजे पक्ष्यांच नंदनवन म्हंटल तर वावग ठरणार नाही.
पहाटे उठुन आम्ही घराबाहेर पडायचो.पहाटेचा गारवा अन धुक्याचा आस्वाद घेत कोवळी उन्ह प्यायला आम्ही आसुसलेले असायचो.कारण पक्ष्यांचा किलबिलाट सुर्व्याच्या कोवळ्या किरणांबरोबर सुरु व्हायचा.वेगवेगळ्या जातीची, आगळ्या रंगाची,अनोख्या ढंगाची अशी अनेक पाखर पहावयास मिळाली.
कुठे झाडाच्या फ़ांदीवर .. तर कुठे शेताच्या बांधावर .. कुठे तळ्यात... तर कुठे मळ्यात.. कुठे सड्यावर ...तर कुठे आडावर...
पक्ष्यांना पाहणे अन कॅमेरात टिपणे हा खरच वेगळा अनुभव होता.त्यांच्या हालचाली,लकबी, खासियत अशी नव्याने माहिती मिळाली.
सगळ्याच पक्ष्यांना काही कॅमेरात टिपता आले नाही.पण जेव्हढे काही दिसले ते प्रकाशचित्रातुन मांडण्याचा हा छोटा प्रयत्न...

तर चला मग पाखरांच्या या अनोख्या सफरीवर.....

१. खंड्या ,धीवर ( White-throated kingfisher )

- लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी
- छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य
- अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य
- याला धीवर असे पण म्हणतात .धीवर म्हणजे मासे पकडणारा.कोळी लोकांनाही धीवर म्हणतात.

२. रानभाई, जंगलभाई, जंगली सातबहिणी, केकाट्या (Jungle Babbler)

- हा मुख्यत्वे भारतीय उपखंडात आढळणारा पक्षी..
- हे पक्षी इथलेच रहिवासी अन स्थलांतर करत नाहीत.
- सात किंवा दहाच्या थव्याने एकत्र राहतात..
- हे खुप गोंगाट करतात.त्यांच्या डोळ्याकडे पाहिल्यास रागीट भासतात.


३. धान तिरचिमणी, पांथळ चरचरी (PADDY-FIELD PIPIT)

- हे पक्षी मुख्यतः शेतात , छोट्या गवताळ भागात आढळतात.
- यांची घरटी जमिनिलगत असणार्‍या झुडुपात असतात.
- चिप चिप चिप असा आवाज करतात.


४. वेडा राघू, बहिरा पोपट, रानपोपट ( GREEN BEE-EATER )

- हा किडे खाणारा पक्षी आहे.
- उष्ण कटीबंधातील बहुतेक सर्व देशात याचे वास्तव्य आहे.
- हिरव्या रंगाच्या या पक्षाची शेपटी एका सरळ रेषेत असते.
- याची चोच काळ्या रंगाची अन डोळ्याच्या बाजुला काळी लकेर असते.


५. माळमुनिया ( INDIAN SILVERBILL)

- मध्य पुर्व आणि दक्षिण आशियामध्ये यांचे वास्तव्य आढळते.
- मुख्य अन्न शेतातील धान्य..
- हिवाळ्यात हे पक्षी घरटी बांधतात.


६. चीरक, काळोखी ( INDIAN ROBIN)

- याचे वास्तव्य मुख्यत्वे दक्षिण आशियात पसरलेले आहे.
- या पक्ष्याचा मुख्य आहार म्हणजे किडे ,कोळी इ.
- या पक्ष्यांची शेपटी उभारलेली असते
- नर काळा कुळकुळीत तर मादी तपकिरी रंगाची असते.नर उडाला की त्याच्या पंखावर पांढरा डाग दिसतो. मादीच्या पंखांवर आस डाग नसतो
- एप्रिल ते जून या दरम्यान विणीचा हंगाम असतो.

नर चीरक - Indian Robin Male


मादी चीरक -Indian robin Female


७. दयाळ, डोमिंगा (ORIENTAL MAGPIE ROBIN)

- चीराकाप्रमाणे हा पक्षी मनुष्यवस्तीच्या आसपास दिसतो.
- काळा-पांढरा रंगाच्या या पक्ष्याच्या पंखावर पांढरा पट्टा असतो.अन शेपटी लांब असते.
- घरटं करण्याचा काळात म्हणजे एप्रिल पासून जुलैपर्यंत दयाळाचं गोड गाणं ऐकू येतं.


८. तांबट,पुकपुक्या, जुकटुक, कोकरोच (आदिवासी भाग) ( COPPERSMITH BARBET )

- हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे.
- या पक्ष्याच्या कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग असतो.
- डोळ्यांच्या वर व खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात पिवळाधम्मक कंठ दिसून येतो तर हिरव्या-पांढऱ्या रंगाचा अंतर्भाग असतो.
- त्यातही वड-पिंपळाची फळे तो आवडीने खातो. त्याला रसयुक्त फळे आवडतात.
- फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तांबट पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो.


९. जंगल मैना (JUNGLE MYNA)

- यांचे वास्तव्य मुख्यत: दक्षिण आशियात आढळते.
- फळ,धान्य आणि किडे हे त्यांचे मुख्य अन्न.
- त्यांच्या कपाळी तुरा असतो. चोच आणि पाय गडद पिवळ्या रंगाचे असतात.
- बिळामधे ते घरटी बांधतात.


१० . नीलपंख, तास, टटास,चास ( INDIAN ROLLER)

- दक्षिण आशियात याचे वास्तव्य आढळते.
- स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो.
- उडतांना पंख व शेपटी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, चोच काळ्या रंगाची असते.
- याचे मुख्य खाद्य कीटक, बेडुक, पाली
- मार्च ते जुलै महिना हा काळ वीण हंगामाचा काळ
- गवत, काड्या वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो.


११. ठिपकेदार होला (SPOTTED DOVE)

- हा स्थानिक पक्षी असुन दक्षिण आशियात यांचे वास्तव्य आढळते.
- होला पक्षी धान्य, फळे व बिया खातो.
- मानेच्या दोन्ही काळ्या बाजूंवर पांढरे ठिपके, पंखांच्या बाहेरच्या कडा राख्या रंगाच्या, तर डोळ्याभोवतालची कातडी तांबूस रंगाची असते.
- झाडांवर, झुडपांवर, घराच्या वळचणीला हे घरटे बनवितात.


१२. पोपट ( Rose-ringed Parakeet )

- निरनिराळे धान्ये आणि सर्व प्रकारची लहानमोठी फळे हे त्यांचे खाद्य
- झाडाच्या ढोलीत , घरांच्या भिंतीमधील मोठ्या छिद्रात अथवा कधीकधी खडकांच्या कपारीत पोपट घरटी करतात.
- ते एकत्र गटाने राहतात.
- त्यांचा आवाज कर्कश, किंचाळल्यासारखा आणि कर्णकटू असतो.


१३. कोतवाल (BLACK DRONGO)

- संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य.
- हा गोंगाट्या व भांडखोर आहे.हिंस्त्र पक्ष्यांपासून घरट्याचे किंवा पिल्लांचे रक्षण करतो.
- कावळा, गरुड, ससाणा किंवा शिकरा यांच्यावर हल्ला चढविण्यास तो मागेपुढे पहात नाही. त्यांना पळवून लावतात म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान-मोठे पक्षी आपले घरटे बांधतात.
- कोतवाल हा कीटकभक्षी आहे. कीटक, फुलातील मध आणि क्वचीत लहान पक्षी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.
- विणीचा हंगाम मुख्यत : एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत असतो.



राखाडी कोतवाल ( ASHY DRONGO )

- हा राखाडी रंगाचा असतो.
- इतर पक्ष्यांचे आवाज काढण्यात हा वाकबगार असतो.


१४. रानचिमणी (CHESTNUT-SHOULDERED PETRONIA)

- याची चोच थोडीफार चिमण्यांसारखीच असते.
- तपकीरी किंवा करड्या रंगाच्या पंखावरती पांढरा रंगाचा पट्टा असतो.
- त्यांच्या कंठाला पिवळ्या रंगाचा ठिपका असतो.
- मादी हि नरापेक्षा फिक्कट रंगाची असते.


१५. हुदहुद्या, हुप्प्या, बागलफणी, फणेर्‍या (COMMON HOOPOE)

- याची चोच काळ्या अन हलक्या पिवळ्या रंगाची लांबसडक पातळ असते.
- डोक्यावर तुरा असतो.
- हे पक्षी स्थलांतर करतात.
- किडे, सरपटणारे छोटे प्राणी, बीया हे त्यांचे खाद्य.


१६. हळद्या, आम्रपक्षी, पिलक, हळदुल्या, हळदोई (आदिवासी भाग) (INDIAN GOLDEN ORIOLE)

- नर जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते.
- मादी नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते
- फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य
- घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थीत विणलेले असते.


१७. बुरखा हळद्या, काळटोप हळद्या, पोक्काघो (कोकण भाग) ( BLACK-HOODED ORIOLE )

- हा हळद्याच्याच कुटुंबातला काळी टोपी घातलेला
- किडे आणी फळ हे मुख्य अन्न , फळांमधे त्याला अंजीर खुप आवडतो.


१८. निखार, छोटा गोमेट ( SMALL MINIVET )

- हा दक्षिण आशियात पसरलेला रहिवासी पक्षी आहे.
- २० से.मी. लांबीच्या या छोट्या पक्ष्याची चोच गडद काळी असते.
- नर पक्ष्याचे डोके करड्या-काळ्या रंगाचे ,पोटाकडचा भाग फिक्कट पिवळा आणि शेपटाकडच्या कडा भगव्या रंगाच्या असतात.
- मादीचा वरचा भाग करड्या रंगाचा आणि पोट ,शेपटी आणि पंखाचा रंग पिवळा असतो.


१९. टिटवी, ताम्रमुखी टिटवी (Red-wattled Lapwing)

- याची चोच लाल, डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, पोटाकडे पांढरा रंग तर पंखांचा भाग तपकिरी रंगाचा,पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात.
- मुख्य ओळख म्हणजे दोन्ही डोळ्यांजवळ लाल रंगाचे कल्ले.
- पाण्याच्याजवळ विशेषतः नदी, तलावांच्या किनाऱ्यांजवळ ताम्रमुखी टिटवी पक्षी दिसून येतो.
- लहान-मोठे कीटक शंख-शिंपल्यातील जीव हे मुख्य खाद्य

२०. लालबुडी भिंगरी (RED-RUMPED SWALLOW)

- वरील बाजूचा रंग चकचकीत निळा, काळा असतो. खालचा भाग पिवळट पांढरा असून, त्यावर गर्द तपकिरी रंगाच्या रेखीव रेषा असतात.
- पार्श्‍वभाग लाल असतो, पक्षी जेव्हा उडत असतो तेव्हा हा पार्श्‍वभाग स्पष्ट दिसतो.
- या पक्ष्यांची एप्रिल ते ऑगस्ट या काळात वीण होते.
- हे पक्षी मोठ्या प्रमाणात कीटक खाऊन पिकांचे संरक्षण करतात.
- मानवी वस्तीजवळ व कालव्यासारख्या पाणथळ जागी आढळतात.


२१. पिंगळा, पिंजरा ( JUNGLE OWLET )

- याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात.
- याचे डोके गोल-वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढर्‍या रेषा असतात.याची चोच बाकदार अन डोळे पिवळे असतात.
- हा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो.
- पिंगळा हा निशाचर पक्षी असल्याने तो रात्रीच्या वेळी बेडूक, लहान पक्षी, पाली, उंदीर खातो.


२२. कापशी घार ( BLACK-SHOULDERED KITE )

- याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो.
- काळ्या पंखांमुळे माळरानावर सहजपणे ओळखता येतो.
- याचे मुख्य खाद्य लहान उंदीर, पक्षी व किडे आहेत.
- आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत तो शिकार करतो.


२३. ब्राह्मणी घार (BRAHMINY KITE)

- पतंगाप्रमाणे उडणार्‍या या घारीचे पंख उडताना थोडे कोनात झुकलेले असतात.
- शेपटाकडचा भाग गोलाकार असतो. डोके आणि छातीचा भाग पांढरा ,पंख तपकिरी रंगाचे असतात.
- पानथळ जागेजवळ आढळणारी हि घार मेलेले मासे,खेकडे हे अन्न खाते.


२४. घार, घोण (BLACK KITE )

- रंग तपकीरी असून अंगावर भरपुर पीसे असतात.डोळे अतिशय तीक्ष्ण असतात.
- घारीची शेपटी दुभंगलेली असते.
- बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले हे खाद्य.


२५. सागरी गरुड, शेषारी (WHITE-BELLIED SEA EAGLE)

- याचा डोके, पोटाचा भाग पांढरा आणि पंखाचा रंग काळा-पांढरा असतो.
- शेपटी आकाराने लहान असते.
- मासे हे त्यांचे मुख्य अन्न


२६. मलबारचा कवड्या धनेश ( MALABAR PIED HORNBILL )

- कोकणात याला गरुड किंवा माडगरुड असे म्हणतात.
- या पक्ष्यांची चोच फार मोठी व सिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे.
- मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करुन ते राहतात
- फळे हा जरी यांचा मुख्य आहार असला, तर ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे त्यांना सर्वभक्षी म्हणता येईल.
- प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासुन एप्रिलपर्यंत असतो


या कोकणवारीत अजुनही बरेच पक्षी दिसले पण कॅमेरात टिपता आले नाहीत. यातले विशेष म्हणजे कैकर ( OSPREY ) मालवणच्या समुद्रात दिसलेला पण खुपच लांब होता अन चिपीच्या (मालवण) विमानतळ जेथे होतय तेथे फक्त नजरेत कैद झालेला शबल पत्री ससाणा, पांढूरका भोवत्या (PALLID HARRIER)

पक्ष्यांची दुनिया ही खरच रोमांचक अन विस्मयकारक आहे ना...
आजच्या धकाधकीच्या जिवनात शातंता अनुभवयाची असेल तर पक्षी निरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे.

पक्ष्यांचा किलबिलाट ऐका....


त्यांच्यात रममाण व्हा...
मुकसंवाद साधा

मग जग सुंदर भासेल.

पुन्हा भेटुया..

पक्षी जगवा.... निसर्ग वाचवा.


- रोहित निकम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडक, कातिल, एक से एक जबरदस्त फोटो.
कित्येक पक्षी इतके लाजाळू आहेत की त्यांचे इतके अप्रतिम फोटो काढणे खरेच कसब आहे.

ते पण डायरेक्त फोटोखाली दुसऱ्या पक्षाचे नाव येतंय त्यात जर गॅप दे ना.

ज ब र द स्त !!!

फोटो आणि त्यासोबतची माहिती मस्तच!!!

कित्येक पक्षी इतके लाजाळू आहेत की त्यांचे इतके अप्रतिम फोटो काढणे खरेच कसब आहे. >>>>>>+१०००० Happy

ऑसम.. किती किती सुर्रेख पोझेस दिलेल्या आहेत..अगदी तुमच्याच कॅमेर्‍याकरता खास!!!
मुनिया सकट सगळ्या पक्ष्यांनी मोहून टाकलं .. काही पक्षी इतक्या जवळून पहिल्यांदाच बघायला मिळाले.. नाईस ट्रीट!!

सर्व फोटो झकास!;!

पक्षांचे आवाज विशेषत: कांचन,कालशीर्ष कांचन,हॅानबिलचे आवाज रेकॅार्ड करा.

माझे एक रेकॅार्डिंग
Brown headed barbet -
कुटुरुचा आवाज

जबरी फोटो!!! आणि सुंदर माहिती!

शेवटच्या फोटोतील पक्षी जाळ्याच्या तुकड्यात किंवा प्लास्टिकच्या रस्सीमध्ये गुरफटल्यासारखा वाटतोय.

सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद...

कित्येक पक्षी इतके लाजाळू आहेत की त्यांचे इतके अप्रतिम फोटो काढणे खरेच कसब आहे. >> खर सांगु नशीबाने बरेच पक्षी खुप जवळुन भेटले आणि बाकी कॅमेराची कमाल.पक्ष्यांचे फोटो काढायला खुप संयम लागतो अन हळुहळु तो शिकतोय.

माझे एक रेकॅार्डिंग Brown headed barbet ->> व्वा srd

शेवटच्या फोटोतील पक्षी जाळ्याच्या तुकड्यात किंवा प्लास्टिकच्या रस्सीमध्ये गुरफटल्यासारखा वाटतोय. >> हो .. मानवी चुकांमुळेच बरेचदा पक्ष्यांना जीव गमवावा लागतो.

हरियाल- आपला राज्य पक्षी नाही सापडला का कुठे ? >> नाही .. हा फार दुर्मिळ झालाय अस ऐकलय.
Some places missing eye catchlight...it adds life in picture. >> प्रयत्न राहील नेहमी.

खुप सुंदर टिपलेत...काही तर खुपच आवडले..
आता अन्न, वस्त्र, निवार्‍यामधे कॅमेरापन येउन बसलाय माझ्या..लवकर काहीतरी सोय करावी म्हणते..

हरियाल- आपला राज्य पक्षी नाही सापडला का कुठे ? >>

एकदा माणगाव डेपोत सकाळी हरेश्वराच्या बसची वाट पाहात होतो. सहज पिंपळाच्या झाडाकडे पाहिलं तर शंभरेक हरियल बसलेले!!

तुम्हाला इमराल्ड डव दिसला असेल मसुरेला. मालगुंडला पाहिला आहे.

वा रोमा. मस्त सुरुवात. Happy

क्ष्यांचे फोटो काढायला खुप संयम लागतो अन हळुहळु तो शिकतोय.>>Welcome to the reality!! Happy एकदा सोबत जाऊया रे Wink

सुंदर.... अप्रतिम ... प्रदर्शनासाठी ... चे फोटू ... अप्रतिम लेखन ... व्वा ...

यातले बरेच पक्षी पाहिले आहेत, त्यामुळे फारच आवडले. तुम्ही किती छान मुद्देसूद माहिती लिहिली आहे.
छायाचित्रही छान !

पक्षीनिरी़क्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

Pages