वारी (पुर्वार्ध-भाग १)

Submitted by टवणे सर on 28 February, 2008 - 15:22

दिवाळी संपली. न फुटलेले, अर्धवट जळालेले फटाके, त्यांच्या सुरनळ्या, फटाक्याच्या पुडक्यांचे पुठ्ठे आणी जळु शकेल अशी कुठलीही गोष्ट मी ध्यान लावून जाळायला सुरुवात केली. आता हे सगळे जाळणे ही एक कलाच आहे. तश्या दिवाळीत अनेक कला दाखवायला मिळतात. म्हणजे करवंटी खाली सुतळी बॉंब ठेवून करवंटी उडवणे, वातीला वात पिरगाळुन एकदम दोन-तीन लक्ष्मी तोटे उडवणे, हातात लवंगी उडवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किल्ला बांधणे. आमच्या इथला प्रत्येक मुलगा चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावरच्या प्रतापगडासारखा बांधायचा असं ठरवून किल्ला बांधायला सुरुवात करायचा.

मी पण ह्यावेळी सहामाही संपल्या संपल्या किल्लाची तयारी सुरु केली होती. काकांची २६ इंची सायकल घेवून माळावर गेलो. आता ही सायकल म्हणजे उंटच होता. मला मधे पाय घालुन चालवायलासुद्धा अवघड जायचं. पण माझ्या बारक्या सायकलवरून पोतंभर माती आणायचं कठिणच होतं. बागेतलं पाटी आणि खोरं उचलुन आणी सायकल हातात धरून मी माळाकडं पायी निघालो. बरोबर एक पोतं पण घेतलं. मागच्या वर्षीपर्यंत माझ्याबरोबर भाउ यायचे आणि मग आम्ही दोघं मिळुन किल्ला बांधायचो. पण आता भाउ नव्हते.

माळावर पोचल्यावर, एक मातीचा बारका ढिगारा बघुन मी खणायला सुरुवात केली. बराच वेळ मातीत खोरं हाणल्यानंतर, मी माती पोत्यात सारायला सुरुवात केली. तसा मी बराच दमलो होतो. पण एव्हडा वेळ उकरलेली माती भरल्यावर पोतं पाव पण भरलं नाही. मग मी परत खणायला सुरुवात केली. आता उन चांगलच चढलं होतं. माळावरच्या तांबूस मातीच्या हातानं तोंडावरचा घाम पुसता पुसता माझं तोंड पण लालबूंद झालं. शेवटी खुब्यातनं हात दुखायला लागल्यावर मी म्हटलं बास! एव्हडी तांबडी माती खूप झाली. नाहीतरी तांबडी माती फक्त वरनं गिलावा करायला तर हवी होती. मोठी मोठी दगडं मधे घालुन किल्ल्याचा आकार करायचा. मग त्यावर बागेतल्या काळ्या मातीचा चिखल भरायचा. लाल माती शेवटी. फक्त गिलावा सारवायला. मग बारीक बारीक चिपट्या दगडांनी माचीच्या तटबंदीला नक्षी करायची. दोन छपरी कौलं सारुन गुहा करायच्या - एक वाघाची आणि एक सिंहाची. समोर एक खड्डा करुन त्यात पाणी सोडायचं - मगरी करता. पण माझ्याकडे मगर नव्हती. त्यामुळं मार्केटात फटाके आणायला गेलं की आठवणीनं मगर आणायचं मी मनाशी पक्कं केलं.

उन चांगलच तापलं होतं. माझ्या कानाच्या पाळ्या गरप होवून वाफा निघत होत्या. साधारण अर्ध भरलेलं ते पोतं मी बरीच कसरत-करामत करुन सायकलच्या त्रिकोणावर चढवलं. पण त्या सगळ्या कसरतीमध्ये बर्‍यापैकी माती खाली सांडली. खोरं-पाटी कॅरेजला लावुन मी घरी परत निघालो.

घरी पोचलो तेव्हा तांबड्या घामानं माझा चेहरा लालतोंड्या वानरासारखा झाला होता. सायकल बदामाच्या झाडाला टेकवून मी थेट बागेतल्या नळाकडं पळालो. थंडगार पाणी गटागटा पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं. पण असं उन्हातुन आल्यावर किंवा तालमीतुन आल्या आल्या एकदम थंडगार पाणी पिउ नये असं आई नेहेमी म्हणायची. त्यानं म्हणे पोटात दुखतं. पण एव्हड्या उन्हातुन आल्यावर पाणी न पिण्यापेक्षा पोट दुखलेलं परवडलं. तसं आई बरच काही म्हणायची. आणि मी सगळंच ऐकायचो असे नाही.

पाणी पिउन निवल्यावर मी दगडं गोळा करायला सुरुवात केली. मध्ये भरायला मोठाली दगडं-विटा, मावळे उभे करायला चपट्या फरश्यांचे तुकडे, गुहेसाठी कौलं असं सगळं जमवलं. तसे माझ्याकडे बरेच मावळे होते. तानाजी, बाजीप्रभु, घोड्यावरचा सैनिक, औरंगजेब, इंग्लिश शिपाई - पण हा शिपाई प्लास्टिकचा होता, आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई. पण तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांपेक्षा आकारने खुपच मोठा होता. म्हणुन मी काकुला ह्यावेळी माझ्यासाठी वाडीहून सिंहासनावर बसलेले मोठे शिवाजी महाराज आणायला सांगितले होते.

पोर्चच्या खांबाला किल्ला बांधून मी हात-पाय धुवायला बागेतल्या नळावर गेलो. तसं बदामाच्या झाडाला किल्ला बांधला असता तर नंतरची घाण साफ करायला सोप्पं गेलं असतं. पण समोरचा सत्या त्यांच्या कांपाउंडच्या भिंतीला, सगळ्यांना दिसेल असा किल्ला बांधायचा. त्याच्या किल्ल्यावर अळीव पण मस्त उगवायचे दरवर्षी. माझ्या किल्ल्यावर नेहेमीच खुरटं. पण ह्यावर्षी मी बरोबर एक आठवडा आधी किल्ला बांधला होता. म्हणजे दिवाळीच्या दिवशी एकदम अळवाचं जंगल माजणार होतं. बदामाच्या झाडाला बांधला असता तर एव्हडा चांगला होणार असलेला किल्ला कुणालाच दिसला नसता. खरं तर सत्यासारखे एकदम बाहेर कांपाउंडलाच किल्ला बांधायला पाह्यजे होता. पण त्यांच्या कांपाउंडला भिंतं होती आणि आमचं कांपाउंड फक्त तारेचं होतं.

किल्ला बरा झाला होता. म्हणजे अगदी प्रतापगड नाही. कारण बांधता बांधता अंदाज चुकुन माची फारच लहान झाली होती. पण बहुतेक विशाळगड आणि बाजीप्रभुची खिंड अशीच असावी. म्हणजे मी तरी असेच सांगणार होतो. कारण आजपर्यंत मी कुठलीच खिंड पाहिली नव्हती. पण आमच्या इथल्या आणखी कुठल्या मुलाने पण पाहिली नव्हती. भाउ असते तर त्यांनी किल्ल्याला बरोबर आकार करुन दिला असता. पण आता भाउ नव्हते.

दुपारचे साडेचार झाले होते. उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. मी हात्-पाय धुवुन किल्ल्यासमोरच्या मगरीच्या तळ्यात पाणी टिकतय का नाही ते बघत होतो. तळ्याच्या बुडाशी लावलेली प्लास्टिकची पिशवी बर्‍यापैकी घट्ट बसली होती. आजी बहुतेक भजनाला निघाली होती. कारण मला तिच्या काचेच्या बांगड्यांचा किण-किण आवाज दाराशी आत ऐकु आला. आजीच्या भजनात सगळ्या बोळक्या म्हातार्‍या होत्या. आणि एक-दोघीना तर पांढर्‍या मिश्या पण होत्या. गोंदवलेकर महाराजांची आरती म्हणताना सगळ्यांची बोळकी दिसायची. आजीचे दात मात्र एकदम घट्ट होते. एका हातानं वाटी झाकुन कुडुम कुडुम करत ती फरसाण खायची. पण आजकाल ती प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवरून रडायला लागायची. भाउ गेल्यापासुन, अगदी टीव्हीवरच्या बातम्यात जरी कुणी गेलं तरी आजी रडायची. कोणी बाहेरचं जर तेव्हा समोर असेल तर थोडं जास्तच रडायची. पण भाउ गेल्यानंतर मी एकदा तिच्याशेजारी झोपलो असताना, ती रात्री स्वतःशीच बडबडत होती की 'देवा मला पण घेवून जा'. मग मी कुशीवर वळुन तिच्या गळ्यात हात टाकुन झोपलो.

आजी व्हरांड्यातल्या चपला पायात सारुन बाहेर पडली. जाता जाता तिनं मला ओट्यावर दूध तापवून ठेवलं आहे ते प्यायला सांगितलं. पण किल्ल्याबद्दल ती काहीच बोलली नाही. तसंही तिला किल्ला बांधणे वगैरेतले काही कळायचे नाही. उगाच विचारले असते तर, ती शाळेत शिक्षीका असताना कशी मुलांची ट्रिप घेवून कुठल्यातरी किल्ल्यावर गेली होती, आणि मग कसे कुठलेतरी पाटील सर कुठे गायब झाले, आणि येताना बसला कसा अक्सिडेंटच झाला वगैरे वगैरे लांबड लावत बसली असती. ती म्हणायची की ती सबंध आयुष्यात कधीही, म्हणजे कधीही खोटं बोलली नव्हती. पण आजकाल मला याबद्दल शंका यायला लागली होती.

ऑफिसमधून परतल्यावर आई मात्र माझ्या किल्ल्याचे कौतुक नक्की करेल ह्याची मला खात्री होती.

गुलमोहर: 

सुरूवात छान वाटतेय फक्त दगडं न म्हणता दगड म्हणालास तर बरं होईल. मधेच दाताखाली खडा आल्यासारखं होतंय. बाकीचं वातावरण दगडं शी सुसंगत वाटत नाहीये म्हणूनच केवळ.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

छान झालीय सुरूवात. फाफे किंवा चंदू सारखे वाटतेय मस्त. आता लिही पटापट.

नीरजा, आमच्या (सांगली मिरजेकडे) तोंडात दगडं हा शब्दच जास्ती बसलेला आहे. "मी दगड गोळा करायला सुरुवात केली" हे खुप पुणे-मुंबई वालं वाटतं (कुठल्या शहराची हेटाळणी नाही करायची आहे).. "किल्ल्यासाठी दगडं गोळा केली" हे कसं आपलं वाटतं..

नेहेमीप्रमाणेच नेमकं शब्दचित्र.
मला विशेषत: ते 'पण आता भाऊ नव्हते' हे दोन वेळा परिच्छेदाच्या शेवटी एखाद्या पालुपदासारखं आलंय ते फार आवडलं.
जे सांगायचं आहे ते उगाच मेलोड्रॅमॅटिक न होता फार छान व्यक्त होतंय त्यातून.

पुढच्या भागांची वाट पहात आहे.

शन्तनु, फारच छान लिहीत आहेस. पण ग्यानबा तुकाराम करीत वारी कधी पोचणार? आता वारी पुढे जाउ दे.

टण्या, दोन्ही भाग वाचले. अप्रतिम लिहितोयस!

(आता किल्ल्याचं एवढं वाचल्यावर मला अजिबात राहवत नाहीय, लिहायला - आम्ही किल्ल्यावर जंगलासाठी खपली गहू टोकायचो. जोपर्यंत त्यांना कोंब फुटत नाहीत तोवर ओळीत टोकलेल्या पिवळ्या चकाकत्या खपल्यांमुळे किल्ल्याला एक निराळी शोभा यायची. आणि कारंजी, तसेच तळ्यात पाणी सोडण्यासाठी आजीच्या वापरून झालेल्या आणि आम्ही लपवून ठेवलेल्या सलाईनच्या बाटल्या-सुया वापरायचो. दिवाळीनंतर किल्ल्याला हळुहळू उतरती कळा लागायची...)

खुप दिवसांनी मायबोलीवर आलेय.... तु वारी पोस्ट केल्याचे माहित नव्हत. मराठीत जास्त छान वाटतयं वाचायला...

टण्या, दोन्ही भाग वाचले मीही. आधी कोणी तरी लिहिल्याप्रमाणे खरोखरच त्या वयाच्या मुलाने लिहिल्यासारखे जमले आहे. (मला "शाळा" आठवले). दोन्ही भागातील मुख्य कथाभाग वेगळे आहेत त्यामुळे पुढे काय होते वाचायची उत्सुकता आहे.

मस्त!

शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................

वारी वरी काढतेय Happy
खूप प्रांजळ आहे लिखाण. ...
या अडनिड्या वयातील मुलाचे भावविश्व हुबेहुब उतरले आहे.