मायबोलीकर भटक्यांचा ४था सह्यमेळावा.....भाग २रा

Submitted by गिरीविहार on 29 March, 2017 - 08:22

भाग १ला - http://www.maayboli.com/node/62059

पहाटे पाच वाजता गाडी खेड रेल्वे स्थानकात पोचली... पुढे....

गाडी खेड स्थानकावर पोचतच, सगळयांची उतरायची एकदम घाई झाली कारण गाडी फक्त दोन मिनीटे थांबणार होती.. सर्वजण सुखरुप गाडीतुन उतरले अन मग वेगवेगळ्या डब्यात बसलेले मायबोलीकर एकत्र आले. परत एकदा सर्व मुम्बैकर भटक्यांचा भेटीचा सोहळा पार पडला अन सगळे रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडले.. पावसाची संततधार सुरुच होती. त्या भर पावसातच आम्ही आता खेड बस स्थानकाकडे जाणारा पर्याय शोधु लागलो. खेड रेल्वे स्थानका पासुन खेड बस स्थानकाला जाणारी महामंडळाची गाडी आधीच भरलेली होती, त्यामुळे आम्हाला मग रिक्शाचा आधार घ्यावा लागला अन पाच-सहा रिक्शा करुन सगळे जण एकदाचे खेड बस स्थानकात पोचलो. सकाळचे साडेपाच वाजले होते अन खेड बस स्थानकातुन थेट रसाळगडाकडे जाणारी एस्टी सकाळी साडे अकरा वाजता होती. त्या मुळे आम्ही प्रथम रसाळगडाच्या रस्त्यावर असलेल्या मेळे या गावी पोचुन मग तिथुन एका टेंपोतुन रसाळगडाकडे जाण्याचा पर्याय निवडला होता. मनोजने टेंपो वाल्याशी आधीच बोलुन सर्व व्यवहार ठरवला होता. मेळे गावाकडे जाण्यारया एस्टी ला वेळ असल्याने, काहींची पावले मग जवळच्या चहाच्या टपरी कडे वळली अन काहींची पावले बाजुच्या पानाच्या गादीवर. भर सकाळ असल्याने चहावाल्या कडे चहा अन पार्ले जी याशिवाय काहीच पर्याय नव्हता. चहापान अन इत्तर सर्व पाने आवरुन मंडळी मग पुन्हा बस स्थानकाकडे वळली.

पाउस तुफान कोसळतच होता, साडेसहा वाजता मेळे गावात जाणारी एसटी फलाटाला लागली आणि सर्वजण त्या एसटीत स्थानापन्न झालो, थोड्याच वेळात बस डेपोतून बाहेर पडून मार्गाला लागली. दोन दिवस पडणार्या पावसाने सर्व प्रदेश जलमय झाला होता. चारी बाजूला फक्त पाणीच पाणी दिसात होते. वाटेतील सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते. भातखाचरे पाण्याने भरून गेलेती होती.

काही ठिकाणी भाताची लावणी चालू होती. थोड्याच वेळात बस मेळे गावात पोचली अन आम्ही सवर्जण तिथे उतरलो. इथून पुढचा प्रवास टेंपोतून करायचा होता. मनोजने टेंपो वाल्याला फोन केला अन थोड्याच वेळात टेंपो येऊन पोचला. टेम्पोत चढताना पुणे करांना फोन लावला तर ते अजून खेडच्या आधी कुठेतरी चहा प्यायला थांबले होते. त्यांना थेट रसाळगडाच्या पायथ्याला भेटायला सांगून प्रवास सुरु झाला. भरपूर पावसाने रस्ते खड्डेमय झाले होते अन त्यामुळे टेंपोत मागे बसलेले रोलर कोस्टर चा अनुभव घेत होते. पाउस अजूनही तुफान पडत होता अन मधेच रस्त्याच्या एका वळणावर एका पुलाआधी पूर्ण भरून वाहत असलेल्या जगबुडी नदीचे दर्शन झाले. जगबुडी नदीचे पात्र विस्तारले होते अन पाणी पूर्ण शक्तीनिशी वाटेत येणारे सर्वकाही बरोबर घेऊन वाहत होते. पाऊस जर असाच पडत राहिला असता तर पुलावर देखील पाणी आले असते. टेम्पोच्या चालकाने मोठ्या सफाईने तो पूल पार केला अन पुढे अर्ध्या एका तासात वाटेवरची देवघर, निवेची वाडी, घेरा रसाळगड हि गावे मागे टाकत आम्ही रसाळगडाच्या पायथ्याशी पोचलो. यापुढील रस्ता मातीचा असल्याने टेम्पोच्या चालकाने टेंपो पुढे नेण्यास नकार दिला अन आम्हाला तिथेच उतरावे लागले.

सकाळचे आठ-साडे आठ वाजले होते अन पाउस पण थोडा कमी झाला होता. वातावरणात एक प्रकारचा गारवा होता अन त्याच गारव्यात आम्ही त्या कच्च्या रत्याने पुढे चालायला सुरवात केली.

पुन्हा एकदा पुणेकर मंडळी कुठे आहेत ते विचारले पण अजून ते खेडच्या जवळपासच होते, त्यामुळे त्यांना थेट किल्ल्यावर भेटण्यास सांगून आम्ही पुढे निघालो. महाराष्ट्र शासनेच्या कृपेने आता थेट रसाळगडाच्या पायथ्याशी असलेया रसाळगडवाडी पर्यंत कच्चा रस्ता झाला असुन जिथे हा रस्ता संपतो तिथूनच रसाळगडाच्या पायरया चालू होतात. रसाळगडाचा माथा पूर्णपणे ढगात बुडून गेलेला होता अन त्यामुळे वरचे काहीच दिसत नव्हते. दहा एक मिनिटातच सर्वजण गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी पोचलो अन पुन्हा परत जोरदार पाउस सुरु झाला.

सर्वांकडे रेनकोट, छत्र्या असूनही सर्वजण भिजून ओलेचिंब झाले. त्याच भर पावसात गडाचा दुसरा दरवाजा ओलाडून आम्ही वरच्या पठारावरून आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे गडावरील वाघजाई-झोलाई मंदिराजवळ पोचलो.

गडावरील वाघजाई-झोलाई मंदिर म्हणजे आमच्या सारख्या डोंगरभटक्यांसाठी मुक्कामाचे हक्काचे ठिकाण. काळ्या पाषणात बांधलेले हे कौलारू मंदिर व आसपासचा पूर्ण परिसर धुक्यात बुडून देला होता. देवळाच्या बाजूलाच तुडूंब भरलेले नितळ पिण्याच्या पाण्याचे टाके होते. सुदैवाने देऊळ कोरडे होते अन देवळात चक्क विजेची अन पंख्याची सोय होती. देवळात शिरल्या शिरल्या सर्वांनी अंग पुसून, कोरडे कपडे चढवून, आपापल्या चटया पसरून आपल्या झोपण्याच्या जागा निश्चित केल्या. ते झाल्या वर सर्वजण गप्पा मारायला बसले. विषय तोच, ट्रेकच्या गप्पा अंन कोण एका मेंबरला बकरा बनवून त्याची खेचत राहणे. यावेळचा आमचा बकरा होता घारुअण्णा उर्फ संदीप खांबेटे.

मनोजने जवळच्या गडाच्या पायथ्याच्या रसाळगडवाडीतील एका घरात नाष्ट्याची अन जेवणाची व्यवस्था करून ठेवली होती. तो अन यो तिकडे नाश्ता घेऊन यायला गेले. बाहेर परत पावसाने जोर पकडला होता अन त्या भर पावसातच जोरदार गडबड गोंध़ळ करत सर्व पुणेकरांचे देवळात आगमन झाले आणि परत एकदा मुंबईकर-पुणेकर मायाबोलीकारांचा भरत भेटीचा कार्यक्रम जोरात पार पडला अन गप्पांना उत आला. त्याच वेळेस मनोज अन यो नाश्ता घेऊन आले. त्या गरमागरम कांदेपोहे अन उफळता चहा यांचा पोटभर आस्वाद घेऊन सर्वजण स्थानापन्न झाले. सुनटुन्याला नुकताच पुत्र रत्नाचा लाभ झाल्याने त्याने सर्वांसाठी पेढे आणले होते आणि त्या गडबड गोंधळातच सर्वानी त्या पेढ्यांचा स्वाद घेतला. काही जुन्या जाणत्या लोकांकडून त्याला चांगला बाप कसे व्हावे याचे अनाहूत सल्ले देण्यात आले.

पहिला कार्यक्रम झाला तो सर्वांच्या ओळख परेडचा ज्यात काही नवीन जसे मध्यलोक उर्फ विराग रोकडे अन काही जुन्या पण सध्या कार्यरत नसलेल्या जसे फदी उर्फ प्रशांत दीक्षित या डोंगरभटक्यांची ओळख करून घेण्यात आली आणि त्यांना सह्यमेळाव्याशी संबंधित काही अनाहूत, आगाऊ सल्ले देण्यात आले. बऱ्याच दिवसांनी सर्व डोंगरभटके एकत्र आल्याने गप्पांना ऊत आला होता अन त्या गप्पांतच दुपारच्या जेवणाची वेळ कधी झाली ते नाही. मनोजने दुपारच्या जेवणाचा मेनू भरभक्कम ठरवला होता.

झुणका, भाकरी, भात, आमटी, लोणचं यांना साथ होती तो आकाने आणलेल्या श्रीखंडाची. त्या भरभक्कम जेवणामुळे अन रात्री झालेल्या जागरणामुळे लवकरच सर्वांच्या डोळ्यावर झापड येऊ लागली अन थोड्याच वेळात त्या देवळाच्या प्रांगणात वेगवेगळया लयीत घोरण्याचे आवाज येऊ लागले.

दोन तास चांगली झोप झाल्यावर डोळे उघडले तेव्हा सर्वजण उठले होते अन कार्यक्रम पत्रिकेवर असलेल्या दुसया विविध गुणदर्शन कार्यक्रमाची सुरवात झाली होती. दुसरा कार्यक्रम होता आमच्या प्रमुख तांत्रिक डोंगरचढाई करणाऱ्या सुनटुन्या उर्फ सतीश याचा डोंगरचढाईत वापरण्यात येवणारा दोर अन त्याच्या मारण्यात येण्याऱ्या विविध गाठी. त्याने विराग, कुशल अन सुन्याला साथीला घेत डोंगरचढाई करताना दोर कसा वापरावा अन त्याच्या वेगवेगळ्या गाठी कश्या माराव्यात यांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक घडवले. त्या प्रात्यक्षिकातच आकाराने बारीक असलेल्या मल्ल्याला दोरीवर लटकावून पण झाले.

तो पर्यंत पाऊस थोडा कमी झाला होता अन सर्वजण उत्साहात गडफेरीला निघाले. रसाळगडाचा आकार तसा लहानच आहे अन गडावर काही बुरुज, एक पडके धान्यकोठार व एक तळे सोडल्यास पाहण्यासारखे काही नाही. गडावरच्या झोलाई-वाघजाई मंदिराकडूनच पायऱ्या चढून वाट पुढे थोड्या उंचवट्यावर असलेल्या बालेकिल्ल्याकडे जाते.

आता पाऊस जवळपास थांबला असल्याने गडावरून धुक्याचा पडदा आड झाल्यावर आजू बाजूच्या गावांचे, डोंगरांचे अन तुडुंब भरून वाहत असलेल्या जगबुडी नदीचे दर्शन झाले.

गडफेरी संपल्यावर सर्वजण फोटो अन सेल्फी काढण्याच्या मागे लागले. त्या धुक्यातील धुंदमय वातावरणातच फोटो व सेल्फीचे वेगवेगळे प्रयॊग करण्यात आले अन सर्वजण लवकरच गडफेरी आटपून देवळात डेरे दाखल झाले.

सर्व प्रचि मेळव्याला उपस्थित असलेल्या भटक्यांच्या विविध कॅमेरॅतील आहेत.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त....झकास वर्णन....ती गावातली मंडळी आली होती, आणि सीएम ने बरोबर त्यांना कसे वाटेला लावले ते राहीले. पवन्याचा गोरे फोटो काढणारा कॅमेरा, भिंडेचे टायमर लाऊन ग्रुपात घुसण्याचे कसब असे बरेच काय काय लिहायचे राहीले

.ती गावातली मंडळी आली होती, आणि सीएम ने बरोबर त्यांना कसे वाटेला लावले ते राहीले.
अजून तिथवर पोहोचलेला नाहीये लेख. ते रात्री झालं. घारुच्या मॉडेलिंगचे एवढे फोटो काढलेले, त्यांतला एकच दिलाय. अन्याय आहे हा!
बाकी झकास वर्णन गिरी.. जियो!