वीकेंड इन रायगड!!!

Submitted by वर्षू. on 10 March, 2017 - 02:41

तशी गेल्याच महिन्यात मांडवा ट्रिप झाली होती पण गेल्या आठवड्यात माझ्या आतेबहिणीला ब्रेक हवा होता , तिने अगदी गळच घातली म्हणा नं..
त्या निमित्ताने माझ्याही भारतातील भटकंती च्या अनुभवांत भर पडणार होती म्हणून मग आम्ही दोघीनीच ही कर्नाळा ट्रिप आखली. अर्थात काही माबोकरांनीच सुचवले होते हे स्थान..
त्याप्रमाणे आम्ही करनाळ्या च्या पॅनोरामिक रिझॉर्ट ला दोन दिवस राहायचे बुकिंग केले. नेट वर छानच दिसत होते हे रिझॉर्ट.
पार्ल्याहून , पनवेल रेल्वे स्टेशन पर्यन्त थेट उबर टॅक्सी बुक केली . तेथून ऑटो वाल्याने फक्त चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या रिझॉर्ट वर पोचवायचे साडेतीनशे रुपये उकळले.. हो उकळलेच Sad कारण नंतर रिझॉर्ट च्या कर्मचार्‍यांकडून कळलं कि आसपासच्या लहान अंतरावर जायला ६ सीटर्स वाले ऑटो (?) १० रुपये तर पनवेल वरुन माणशी २० रुपये आकारतात..( पण या ६ सीटर्स मधे १२ + लोक्स कोंबून बसलेली दिसल्यावर मन जरा डळमळीत झाले Happy
असो.. १७ एकर जमिनीवर डेव्हलप केलेले हे रिझॉर्ट चांगलं भलंमोठ्ठं होतं. नजर पोचेल तिथपर्यन्त चारी दिशांना फळा फुलांची झाडे लावलेली होती. आंबे, चिकू,जांब, केळी मुबलक प्रमाणात दिसत होती. एका बाजूला असलेल्या बर्‍यापैकी मोठ्या वॉटर पार्क मधे लहान थोर मंडळी निरनिराळ्या राईड्स एंजॉय करत होते तर दुसर्‍या बाजूला छत असलेल्या भल्यामोठ्या तबकडी च्या आकाराच्या जागेत रेन डांस ची सुविधा होती. इथे ढणाण म्युझिक च्या तालावर पुष्कळ लोकं ,मुलं पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आणी मन मानेल तसा नाच करण्याचा आनंद लुटत होते. मनात एकदम विचार आला कि माबो च्या वर्षाविहाराकरता ही जागा एकदम उपयुक्त आहे म्हणून.
एका जागी चेंजिंग रूम्स, टॉयलेट्स ची छानपैकी सुविधा होती. रविवार असल्याने डे पिकनिक ला आलेल्यांची भरपूर गर्दी होती . त्यांच्याकरता
नाश्ता आणी लंच ची उत्तम सोय दिसून आली.
इथून राहायच्या खोल्या लांब असल्याने हा गोंधळ, आवाज तिथपर्यन्त पोचत नव्हता. रूम मात्र भरपूर मोठी आणी मोकळी होती. आत शिरल्यावर किचन चा ओटा आणी सिंक होते. मायक्रोवेव आणी फ्रिज देखील हजर होते. मग एक पायरी चढून भला मोठा बेड होता. तेथून एक पायरी चढून एक मोठे टेबल , आरसा इ. सामान होते. रूम ला लागून प्रशस्त बाल्कनी होती. इथे केन च्या सुबक खुर्च्या टेबल दिसत होते.
बाल्कनी तून समोरच एक उंचच उंच डोगर मान उंचावून आमच्याकडेच पाहताना वाटला. खाली रिझॉर्ट च्या बागेतील चाफा अगदी भरभरून उमललेला होता. वाह!! एकदम छान वाटलं हे सर्व दृष्य पाहून.
सकाळचा चहा इथेच प्यायचा असे दोघीनी मनोमन ठरवून ही टाकले.
आम्ही सामान ठेवून ,आळस भरायच्या आत रिझॉर्ट बाहेर पडलो. लंचकरता कुणीतरी सुचविल्याप्रमाणे आम्हाला तेथून अगदी एखाद किलोमीटर अंतरावर असणार्‍या ,' क्षणभर विश्रांती' या रेस्टॉरेंट मधे जायचे होते. प्रायव्हेट ऑटो मिळण्याची अजिबात आशा न ठेवता दहा , दहा रुपयात एकमेकांच्या मांडीवर न बसता आरामात इकडे पोचलो. येथील जेवण मात्र खरोखरंच ताजं आणी अतिशय चविष्ट होतं. ताजी सुरमई आणी चिकन करी वर ताव मारून सुस्तवायला झालं होतं. पण निर्धार करून वाटेवरच असलेल्या कर्नाळा बर्ड सेंक्चुरी मधे चक्कर टाकली. दोन वाजताचे ऊन रणरणत असताना कोणते पक्षी आमची वाट पाहत थांबले असतील.. हम्म्म.. खूप आत गेल्यास सरपटणार्‍या प्राण्यांबरोबर एखाद्या बिबट्या शी गाठ पडायचीही शक्यता होती त्यामुळे तिथेच पिंजर्‍यात बंदिस्त केलेल्या काही पक्ष्यांचे दर्शन घेऊन , इतर सर्व पक्ष्यांबद्दलचे कौतुकोद्व्गार याच पक्ष्यांवर उधळून तिकडून बाहेर पडलो.
आतापर्यन्त झोप उडाली होती , त्यामुळे लगेहात जवळच असलेल्या युसुफ मेहेरअल्ली सेंटर बघून घ्यायचे ठरवले. अजिबात भपका वगैरे नसलेले अत्यंत साधे हे सेंटर इथे बनवल्या जाणार्‍या ग्रामोद्योगी उत्पादनांकरता फेमस आहे. तेथील तेलाची घाणी, माती पासून बनविलेल्या लहान सहान आकर्षक वस्तू, लाकूडकामा चा कारखाना बघितला. मग साबण, बदामाचे तेल अश्या सटर फटर वस्तूंची खरेदी ही झाली.
आता मात्र पाय दुखायला लागले होते त्यामुळे निमूट पणे खोलीवर परतून आराम केला.
संध्याकाळी रिझोर्ट शांत होते.मग तासभर आतच आरामात वॉक घेतला. रूम मधे टीवी पाहात गरमागरम चविष्ट जेवण घेत गप्पा मारत दिवस संपला.
दुसर्‍या दिवशी नाश्त्या मधे पोहे, उपमा, मिसळ पाव होते ..पण आम्ही साध्या टोस्ट आणी ऑम्लेट्स वर नाश्ता उरकला. परतण्याची घाई नसल्याने आल्या वाटेने तसेच रमत गमत मुंबईला पोचलो.

दोन दिवसांच्या भटकंती मधे आराम करणे हेच उद्दिष्ट्य असल्याने कर्नाळा किल्ल्या चा चढ चढायचा विचार ही मनात आला नाही.. Happy

या पद्धतीने दिसत असल्यास एक एक टाकते नंतर

कि या पद्धतीने दिसत आहेत आता ?

https://goo.gl/photos/HbTaxMsWWJNkQucH6

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

,

मस्त वर्णन.
लिंकवर क्लिक केलं की एरर येतेय.

मस्त ग वर्षू . मजा चाललेय . पण एक शंका डायरेकट रिझॉर्ट लाच का नाही उबर घेऊन गेलात ?
म्हणजे मग त्या साडेतीनशे रुपयांची फोडणी नसती पडली Wink
या वेळी फोटो दिसतोय Happy

The requested URL was not found on this server. That’s all we know.
असा मेसेज येतोय.

अरे वा, मस्त एन्जॉय केलंस कि !

एके काळि माझा हा आवडता स्पॉट होता. खुपदा अगदी वरपर्यंत चढाई केलीय ( आणि माझ्या आईनेपण ती केलीय बरं का ! ) दादा आणि वहिनीने तर थेट त्या सुळक्यावरच चढाई केली आहे.
हे रिसॉर्ट्स वगैरे आता झाले, पुर्वी तिथे फक्त एक टपरी होती. वनखात्याची काही घरे होती, तिच्यातही मी राहिलो आहे. पुर्वी तिथे अनेक पक्षी होते पिंजर्‍यात. हरणे पण होती. त्याशिवाय मला पक्षी नाही दिसले पण काही ऑर्किड्स आणि रानफुले नक्की दिसली.
मागच्यावेळी गेलो होतो, तेव्हा वरुन खाली यायला खुप अंधार झाला होता. तिथला अधिकारी काळजीत पडला होता. तिथे खुप मोठे अजगर आहेत, असे सांगत होता.
त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे युसुफ सेंटर मधेच जेवणाची सोय होती.

छान लिहिलय्सं वर्षू..
फोटो नाही दिसताय आतापन.. खरतर ते दिसणार नाही हा विचार करुनच आली होती... त्यातही एकच फोटो टाकलाय वाटतं तू त्यामुळे आणखी बरं वाटल कि चलो एकच मिसला Wink

छान माहिती. गावी जाताना कर्नाळ्याचा सुळका नेहमीच लक्ष वेधून घेत असतो पण आजपर्यंत ना किल्ल्यावर जाणे झाले आहे ना अभयाराण्यात. पण तुमच्या या लेखाने आणि लिंकमधील फोटो पाहून आता तिथे नक्कीच जाणे होणार.

दिनेश जेवणाची व्यवस्था बर्ड सेंक्चुरी च्या आतच दोन ठिकाणी आहे. या घरगुती खानावळी गावातील महिला बचत संगठना चालवतात. शिवाय मेहेरेअल्ली मधे तर मोठे कँटीनच आहे, दोन वाजेपर्यन्त जेवण मिळते तिकडे. रस्त्यांवरच्या टपर्‍यांवर चहा खारी व इतर काहीबाही मिळतं.

वर्षू, त्या डोंगराची चढाई फार कठीण नाही. बर्‍र्‍यापैकी रुळलेली वाट आहे. पावसाळ्यात छान वाटते तिथे. ( उन्हाळ्यात आम्हाला मधमाश्या चावल्या होत्या ) पावसाळ्यात त्या नसतात. त्या सुळक्याच्या पोटात पाण्याची कुंडे आहेत. माझी शेवटची भेट १५ वर्षांपुर्वी !!!

छान वर्णन.
>>दुसर्‍या दिवशी नाश्त्या मधे पोहे, उपमा, मिसळ पाव होते ..पण आम्ही साध्या टोस्ट आणी ऑम्लेट्स वर नाश्ता उरकला. ----
हे वाचुन गंमत वाटली. आमच्याकडे पोहे, उपमा म्हणजे साधे असते Happy

मस्त वर्णन. फोटो नाही दिसत.

कर्नाळयाला दोनदा गेलेय पण वरती चढले नाही. एकदा खूपच लहान होते तेव्हा शिरढोणला आजोळी गेलो होतो तिथून बैलगाडीने गेलो होतो, खूप लहान होते पण तो प्रवास, कर्नाळा अजूनही आठवतं, मज्जा आली होती. दुसऱ्यांदा बारावीत असताना क्लासची ट्रीप गेली होती.

मस्त वर्णन , लहानपणीची आठवण आली.
लहानपणी शाळेची, चाळीची किंवा कॉलेजची सहल म्हणजे कर्नाळा. किल्यावर पण दोन तीन वेळा गेलो होतो. वनखात्याचा घरात पण एकदा राहिलो आहे..
एकदा तर कर्नाळया हुन पनवेल बस स्थानका पर्यन्त चालत आलो होतो . त्या काळात रिक्षा न्हवत्या. जाताना पनवेल वरुन बस सुटत असल्याने २५ जण बस मध्ये गेलो पण परत घरी येताना एकही बस थांबत न्हवती किंवा त्यात २५ जणाना आत शिरायला जागा न्हवती म्हणुन चालत निघालो. नंतर NH-4 लागल्यावर बस मिळाली असती पण निम्माहुन जास्त आंतर पार केल्याने आम्ही सगळे चालतच पनवेल ला आलो. .

छान. Happy
साहिल म्हणताहेत तशी शाळेची सहल गेलेली. नंतर पण एकदा गेलेलो मला वाटतं. फोटो मस्त.

मस्त वर्णन वर्षु. मी जात असते तीथे अधूनमधून.

पक्षी पाहायचे असतील तर सक्काळी लवकर जावे लागते आणि त्यासाठी पूर्ण कर्नाळा पायथा घालायची गरज नाही.

कर्नाळा गेट सोडून आत गेले की एक फाटा उजवीकडे जातो, हरियाल ट्रेल नाव दिलेय. त्या ट्रेलने आत जायचे. खूप लांब पण अजिबात चढाव नसलेला ट्रेल आहे. आणि खूप पक्षी दिसतात. अर्थात आपल्याला कसे आणि कुठे पाहायचे हे माहित हवे. मागे मी एकदा गेले असता त्या ट्रेलवर आदेश शिवकर ह्या पक्षीतज्ञांशी भेट झाली. त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातुन दोन तीन पक्षी दाखवलेले. नंतरच्या फेरीत मी शोधू शकले त्यातले दोन पक्षी.

त्या ट्रेलवर सक्काळी सक्काळी खूप पक्षीप्रेमी असतात. आपण त्यांच्या आजूबाजूलाच राहायचे. त्यांना फटाफट दिसतात पक्षी. आपल्यालाही लाभ होतो मग. Happy