मनात घर करुन राहिलेले घर!

Submitted by mrsbarve on 2 March, 2017 - 21:24

जेंव्हापासून आठवतंय तेंव्हापासून घरातला 'लक्ष्मीचा कोनाडा ' अगदी नीट  आठवतोय.माजघरात टीव्ही च्या डाव्या बाजूला एक भिंतीतले कपाट  होते.त्यात एका सात वर्षे वयाच्या मुलाची जेव्हढी उंची असेल त्या उंचीची ,शाडूची लक्ष्मीची मूर्ती होती,त्या कपाटाला जाळीचे दोन दरवाजे होते,ते दरवाजे कायम बंद असायचे.लक्ष्मीची मूर्ती आमच्या घरी कशी आली ,त्याची एक कथा आहे,हि मूर्ती एका बड्या घरातली होती,पण तिचा एक हात मोडला म्हणुन ते ती मूर्ती विसर्जित करणार होते,मूर्ती कोणत्या कारागिराने केली होती माहित नाही पण खरीच  खूप सुबक होती,तिचे कमळासारखे डोळे ,घाटदार बांधा,चाफेकळी नाक अगदी सुंदर! तर त्यांना आजोबांनी विचारले कि मी मूर्ती दुरुस्त करून घेईन ,मला द्या ती विसर्जित करण्यापेक्षा !त्यांनी ती मूर्ती आजोबांना दिली ,त्यांनी सांभाळून ती घरी आणली . त्या दिवसापासून ती मूर्ती त्या कपाटात  विराजमान झाली . तिचा हात प्ल्यास्टर घालून नीट  केला.

त्या भिंतीतल्या कपाट्च्या  वर एक कोनाडा ,वेलाण्टिच्या आकाराचा होता म्हणजे अजुनी आहे तो.तर तो कोनाडा म्हणजे पुर्ण ब्रम्ह होता !काय काय ठेवलेले असायचे त्यामध्ये …यादि करायची झाली तर,पिना ,सुई दोरा,शाईची बाटली,मोडकी पेने ,पेन्सिली , कर्कटक ,कंपास मधल्या लहान पट्ट्या,डिंकाची  बाटली,,कुठल्या कुठल्या लग्न मुंजीच्या पत्रिका,नातेवाईकांची पोस्तकार्डे,एखादी सेंटची बाटली -जी स्त्रिया  पुरुष मुले बाळे सगळे वापरत!
जुनी मोडकी कानातली,गळ्यातली,कुठल्या तरी झाडाच्या बिया …काहीही काहीही ...

हे सगळ धन आपल्या डोक्यावर वागवत लक्ष्मीची मूर्ती कपाटात शांत उभी असे! दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या आधी कधीतरी तिचे नवे रंगकाम हि होई,माझ्या धाकट्या काकाने त्या कमळात उभ्या असलेल्या लक्ष्मीला दर वर्षी वेगवेगळ्या रंगाची साडी,वेगवेगळा मेक उप करून नेहमीच अप टू डेट  ठेवले होते!लक्ष्मी पूजनाच्या वेळी ती मूर्ती झळाळून उठे . काकाने एका अरुंद लाकडी पट्टीवर एकेक रुपयाची नाणी ओळीत चिकटवून लक्ष्मीच्या  हातात ठेवून दिली होती ,त्यामुळे तिच्या हातातून पैसे पडत आहेत असा देखावा तयार झाला,जो खर्च लक्षात राहण्यैतका साधा आणि सुंदर होता!

झेंडूची केशरी पिवळी फुले ,त्यांच्या माळा ,लक्ष्मीपूजन  ,मग अंगणात  लावलेले लक्ष्मी तोटे - फटाके,नव्या नव्या साड्या मध्ये ,दागीन्यामध्ये नटलेल्या घरातल्या लक्श्म्या…. !

दर ट्रिप मध्ये गावी गेलं कि घर बुटकं का वाटतं काय माहित? जुने झालेय … सगळ्या स्वयपाक घरात धुळ जमलिय… सगळी पाखरे कुठे  उडुन गेलित…  घराच्या आजू बाजूची बाग मात्र छान  आहे,कोणी भला माणुस त्याची काळजी घेतोय…

 माजघरातल्या जिन्याच्या बाजूच्या तुळीवर आज्जी आजोबांचे हार घातलेले फोटो आहेत…. असतीलच ते तसेच…
मागच्या अंगणातला मोठ्ठा पाण्याचा हौद ,आतून वाळून गेलाय ,कोणे एकेकाळी चवडे उंच करून त्यातल्या हिरव्या पाण्यात डोकावले कि यालाच "डोह' म्हणतात असे वाटायचे !

या ट्रिप मध्ये तिकडे गेलेच नाही …कुणिच नाही रहात तिथे...गजबजलेल घर अस रिकाम बघायला नको वाटत … कधी कधी वाटत कि घर सुद्धा माणसाना मिस करत असेल का?

मुलांना मागे घॆउन गेले होते तेंव्हा सगळेजण जमलो होतो ,आम्ही ज्या अंगणात खेळलो ,त्याच अंगणात आमची मुले एकत्र खेळत होती,त्यांनी विटांची घरे केली ,त्यात कुत्र्याच  पिल्लू रहाणार म्हणून त्याला पाणी प्यायला सोय केली ! माझ्या मुलीला अस कधी दगड मातीत खेळायलाच मिळाल नव्हत …
माझा मुलगा रस्त्यावरती भोवरा खेळला ,भोवर्याला साडी नेसवणे  हा कोन्सेप्ट शिकला ,मला अगदी धन्य धन्य झालं … त्यांनी इंडिया डर्टि आहे,खूप्पच डा स आहेत ,इत्यादी तक्रारी केल्या नाहीत … मग अंगत पंगत जेवायला बसलो तेंव्हा 'इज इट अ पिकनिक '? असे  विचारलं …

देव्हार्यातल्या देवानी कुठे कुठे प्रस्थाने केली होती पण देव्हारा तसाच होता,घुमटाकार लहानशी खोलीच जणु देवाची!

हे असे कधितरी नॉस्टल्जिक  व्हायला होते … आपआपली घरटी बांधून ,रहाणारे पक्षी सुद्धा मुले उडून गेली कि घरटी  तशीच सोडुन जातात … पुन्हा परतत नाहीत त्याच घरट्याकडे ,हवे तर पुन्हा नवीन  बांधतात माणसाच जरासे तसेच असले तरी आपल ,जिथे वाढलो,मोठे झालो ते घर मनात घर करून रहातच..अगदी नक्की …।

Group content visibility: 
Use group defaults

छान! आमच्याही घरात असा एक पंचकोनी कोनाडा आहे, ज्यात नेलकटर, सुईदोरा, शाईची बाटली अशा असंख्य विसंवादी वस्तू असायच्या.नंतर घरी फोन बसला तेव्हा या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या जागी गेल्या आणि फोन तिथे विराजमान झाला. Happy

छान लिहिलेय.
>>>मग अंगत पंगत जेवायला बसलो तेंव्हा 'इज इट अ पिकनिक '? असे विचारलं …
हे मस्तंच Happy