जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १६): बस्का (वडोदरा)- गुजरातमां स्वागत

Submitted by आशुचँप on 2 March, 2017 - 04:54

http://www.maayboli.com/node/61826 - (भाग १५): मोडासा - एक दिवस विश्रांतीचा
======================================================================

कालच्या झकास विश्रांतीनंतर सकाळी छान जाग आली. काल उन्हं चढायच्या आधीच बरेचसे अंतर कापून झाल्याचा फायदा झाला होता, त्यामुळे तीच स्ट्रॅटेजी आजही वापरायची ठरली.

त्यामुळे मस्त मिट्ट काळोख असतानाच निघालो. शिरशीरी यावी इतपत गार हवा होती. राजस्थानच्या कोरड्या धूळमिश्रीत हवेची सवय झाल्यामुळे हवेतला किंचित दमटपणाही जाणवत होता पण चालत होते. स्टेट हायवे असल्यामुळे शिस्तीत एका लाईनीत चालत, टेललँप सुरु ठेऊन एकसलग चालवत राहीलो.

आजचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे गँगचे उर्वरीत सदस्य आज भेटणार होते. जम्मु पुणे साठी ज्यांना २०-२२ दिवस कामाच्या व्यापातून काढणे अशक्य होते असे युडी उर्फ उमेश पवार, अतुल अतीतकर आणि आपटे काका हे आम्हाला बस्का पासून पुण्यापर्यंत साथ करणार होते. आणि त्यात मग नंतर शिरीषची भर पडली. आधीच्या प्लॅननुसार तो पूर्ण राईड करणार होता, पण निघायच्या आधीच त्याला सणसणून ताप सर्दी खोकला झाल्यामुळे त्याला ड्रॉप करावे लागले. मग दुधाची तहान ताकावर या न्यायाने तो युडी आणि आपटेकाकांसोबत येऊन मग पुण्यापर्यंत सायकल चालवेल असे ठरले.

पण या ऐनवेळेच्या बदलामुळे घोळ असा झाला की सायकली न्यायच्या कशा असा यक्षप्रश्न उभा राहीला. उपेंद्र मामांना सायकल चालवायला मनाई होती पण ते ड्राईव्ह करू शकत होते, त्यामुळे त्यांनी अगदी उमद्या मनाने पुणे ते अहमदाबाद अशी गाडी चालवत तिथे सगळ्यांना ड्रॉप करून परत उलट्या पावली पुण्याला यायचे मान्य केले. अंतरही थोडे नाही, जाऊन येऊन १३००-१४०० किमी. केवळ आणि केवळ सायकलिंगवर प्रेम असल्यामुळेच त्यांना हे शक्य झाले.

अर्थात नुसती गाडी असून नाही तर येणाऱ्या चौघांच्या सायकली मागे कॅरीअरवर बसल्या पाहिजे होत्या. आणि हा पेच पडणार हे शिरिषच्या अकाली माघारीनंतरच स्पष्ट झाले, त्यामुळे तातडीने निर्णय घेणे आ्वश्यक होते. त्यात मग तोडगा असा निघाला की सुह्द माघारी येईल. असेही त्याला राईड संपल्यावर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचे वेध लागले होते, त्याचा व्हीसा, डॉक्युमेंटसाठी तो राईड मधून ड्रॉप होणार होता, पण तारखा लांबणीवर पडल्या तसा त्याचा मार्ग मोकळा झाला, पण त्याला चार पाच दिवस स्पेअर झाले तर चालणार होते, त्यामुळे मग निघतानाच अतुलने त्याची नवी कोरी बर्गॅमॉँट सायकल सुह्दच्या हवाली केली. आणि मग अहमदाबादला आल्यावर त्याच सायकलवरून अतुल पुण्यापर्यंत येईल आणि सु्ह्द मामांना सोबत कारमधून जाईल असे सगळे ठरले, तर त्यानुसार आज सगळ्यांची गाठभेट होणार होती आणि इतक्या दिवसांनंतर आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद कशाही पलिकडचा होता.

आजही कालच्यासारखाच सुंदर सूर्योदयाचा नजारा बघायला मिळाला. आणि हे दृश्य सायकलवरून जितके सुरेख दिसते तितके अजून कशावरून नाही असे मला वाटते. गाडी चालवताना सगळे लक्ष रस्त्याकडे असते पण सावकाश सायकलवरून जात असताना एकेक क्षण डोळ्यात, डोक्यात, मनात असा छान मुरत जातो.

फार पहाटे निघण्याचा तोटा एकच की गुरुगुरु भूक लागलेली असायची आणि एकही दुकान उघडे मिळायचे नाही. एका दुकानापाशी थांबलो तिथे एक पोरगा नुकतेच सगळे सामान लावत होता. चहा बिस्किटे मिळतील म्हणून त्याची सगळी अन्हिके होईपर्यंत थांबलो. मिळालेल्या वेळाचा सगळ्यांनी सदुपयोग करून घेतला.

सुह्र्द उद्या मामांसोबत रवाना होईल तेव्हा वेळ मिळेल ना मिळेल म्हणून घाटपांडे काकांनी त्यांचे पित्याचे कर्तव्य करत साधकबाधक चर्चा केली तर बाकिच्यांनी पाण्याचे साठे भरून घेतले.

वाटेत बायाड गाव लागले. लढवय्या अदिवासींचे हे गाव. इथे पिढ्यान पिढ्या लोक युद्धावर जातात. बहुतांश लोक सुन्नी मुसलमान आणि फाळणीच्या वेळी कित्येक जणांनी पाकिस्तानचा रस्ता धरला. उरलेले अद्याप आपला लढाऊ बाणा टिकवून आहेत आणि लष्करात भरती होतात अशी माहीती आंतरजालावर मिळाली.

आता आम्हाला शोधायचा होता नकाशात नसलेला रस्ता, आणि त्यामुळे जिथे थांबू तिथे आमचा ठराविक प्रश्न..
कैसा जाने का आणि रस्ता अच्छा है क्या...

सगळ्यांनी एकजात बालासिनोर वरून जा सांगितले. असेही आता आम्ही गोध्राचा रस्ता मागे टाकल्यामुळे आमच्यापुढे असाही बालासिनोरवरून जाण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता पण लोकांना तिथून पुढे कसे याबाबत प्रचंड मतभिन्नता होती. काही जण म्हणे आहे रस्ता, काही म्हणे अजून सुरु नाहीच झाला, काही म्हणे रेल्वे लाईन वरून जावे लागेल पण जर रस्ता असेल तर अंतर वाचेल यावर सगळ्यांचे एकमत झाले.

मग जास्त विचार केला नाही, साधारण चाळीस एक किमीनंतर आम्ही स्टेट हायवे सोडला आणि बालासिनोरसाठी आतल्या दिशेने कूच केले. बालासिनोरला जाणारा रस्ता बऱ्याच ठिकाणी आडवा तिडवा जात होता आणि एकही पाटी दिसत नव्हती. त्यामुळे प्रत्येक चौक, तिठ्यावर चौकशी करत करत पुढे जावे लागत होते. आणि नुसती चौकशी करून भागत नव्हते तर प्रतिचौकशांचाही सामना करावा लागत होता.

किधर से आये, किधर जा रहे, बालासिनोरसे किधर जायेंगे. पंजाब्यानंतर इतकी सलगी करणारे गुज्जुभाईच.

नंतर नंतर तर रस्ता आणखी अरुंद होता गेला आणि आपण गुजरातेतून जात नसून पौड मुळशी साईडला चाललोय असे वाटायला लागले. तसाच बारका रस्ता, दोन्ही बाजूने तुरळक वाहतूक, एखादीच जोरात गाणी वाजवत चाललेली आणि खच्चून भरलेली टेंपोट्रॅक्स, रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती, बांधावर एकाच प्रकारच्या झाडांची लागवड आणि मध्ये मध्ये लागणारे कोरड्या नाल्यांवरचे बारके पूल आणि हजार किंवा शेकड्याच्या घरात लोकसंख्या असणारी पिटुकली गावे. डिट्टो.

गेले काही दिवस नॅशनल हायवेच्या भगभगाटानंतर हे असे गावातले रस्ते एकदमच दृश्यबदल करणारे होते. त्या क्रॉँकीटच्या रस्त्यांवर, बाजूने अवजड धुडे रोरावत जात असताना आपण गोगलगाईच्या स्पीडने चाललोय असे जे फिलिंग यायचे ते इथे नव्हते. मस्त आपला रस्ता आणि दोन्ही बाजूने हिरवे साथीदार, झाडे सळसळत टाटा करत मागे जायची, गावातली दोन चार नागडी पोरे थोडा वेळ सायकल सोबत धावत जायची, बाया बापड्या तोंडात पदर दाबून कुतुहलाने पाहत, असा सगळा जिवंतपणा होता.

त्यावेळी मग नॅशनल हायवे उपयुक्त खरे पण माणसाचे जीवन त्याने फार धावपळीचे केले, यांत्रिक केले असे काहीकाही फिलॉसॉफिकल विचार येत होते.

आणि तिथेच एक छोटुकला किस्सा झाला. झाले असे की मी माझ्या सायकलला अॅरोबार लावले होते, हँडलला धरून धरून कंटाळा आला की मस्त त्यावर कोपरे टेकवून रमत गमत जात असे. हेडविंडसचाही त्रास वाचे आणि पाठीला, खांद्याला आरामही मिळे. पण त्यात धोका होता की अॅरोबारला ब्रेक्स नव्हते, त्यामुळे ब्रेक लावण्यासाठी मला अॅरोबारवरुन हँडलबारवर येणे भाग पडत असे. हे माहीती असल्यामुळे मी अगदीच सरळसोट रस्ता असेल आणि कुणी अचानक मध्ये येण्याची शक्यता नसेल तरच अॅरोबार वापरत होतो.

पण आज नेमका मी सुह्दच्या मागे असाताना अॅरोबारवर जावे वाटले आणि सगळ्या पॅलोटोनच्या मागून मी निवांत इकडे तिकडे बघत कोपरावर रेलून जात असताना अचानक पुढचे थांबले म्हणून सुह्दने ब्रेक मारला. आता पेलेटॉनचा नियम असा की पुढे काही अडचण आली, थांबावे लागले, खड्डा आला, स्पीडब्रेकर आला तसा मागच्याला इशारा करायाचा म्हणजे तो तयारीत राहतो. पण सु्ह्दला हे करायला वेळ मिळाला नाही म्हणा किंवा विसरला म्हणा पण मी अगदीच बेसावध होतो आणि अचानक थांबल्यामुळे मी अॅरोबार टू हँडलबार असा शिफ्ट व्हायच्या आतच माझे चाक त्याच्या पॅनिअरवर अादळले आणि मी क्षणात धाडदिशी रस्त्यावर आपटलो.

वेगात नव्हतो, रस्ता अतिशय कमी वर्दळीचा होता म्हणून अर्धा मिनिट तसाच पडून राहीलो, तोपर्यंत बाकिच्यांनी सायकल बाजूला घेतली आणि मलाही. बघितले तर डांबरी खडबडीत रस्त्यावर हातांवर लँड झाल्यामुळे दोन्ही तळवे, कोपर सोलवटले आणि पोटाला, छातीलाही थोडे खरचटून रक्त आले. फार काय विशेष नव्हतं, पण सायकलच्या शिफ्टरची स्प्रींग मोडली आणि बार किंचित वाकडा झाला हे जास्त वाईट होतं.

घाटपांडे काकांनी तोपर्यंत फर्स्टएडचे सामान काढलेच. मलमपट्टी करावी इतपत लागले नव्हते त्यामुळे बँडेडची पट्टी आणि खरचटल्या ठिकाणी कैलासजीवन लाऊन काम भागले. कहर म्हणजे काल हेमची जिथे जर्सी फाटली होती, अगदी त्याच स्पॉटला माझीही जर्सी फाटली. च्यायला म्हणलं, काव्यात्मक न्याय असावा म्हणजे किती असावा. कालचा माज बाप्पांनी बरोबर उतरवला.

अर्थात हे इतक्याने भागले नाही, या अॅरोबारवरून मला बरेच ऐकून घ्यावे लागले आणि नंतर पार अगदी समरप्रसंग आला, त्याचा वृत्तांत येईलच पुढे.

३० एक किमीनंतर वाट विचारत विचारत असेललं बालासिनोर आले. मूळच्या प्लॅननुसार हे गाव आमच्या रस्त्यात नव्हतेच त्यामुळे आल्यावर जेव्हा याबद्दल आंतरजालावर माहीती घेतली तेव्हा अक्षरश हळहळ झाली. भारताचे ज्युरासिक पार्क म्हणून ओळखले जाणारे हे गाव. संशोधकांना इथे १३ जातीच्या डायनासॉरसच्या अंड्यांचे फॉसिल्स मिळाले आहेत. कित्येक गावकऱ्यांकडे डायनॉसॉरसची फॉसिल्स अंडी आहेत आणि ते भक्तीभावाने त्यांना देवघरात ठेऊन पूजतात. हायला, हे अधी माहीती असते तर हे गाव प्रायोरिटी बेसिसवर जास्त वेळ द्यायला ठेवले असते. इतकी चिडचिड झाली ते वाचल्यावर.

याखेरीज अजून मनोरंजक माहीती म्हणजे अभिनेत्री परवीन बाबी हिचे पूर्वज या गावचे. बाबी हे पश्तुनी राजकर्त्यांचे घराणे आणि आजही त्यांचे वंशज इथे आहेत. परवीनच्या मृत्यूनंतर याच गावातून तिचे विधी करायाला लोक गेले होते म्हणे. खखोदेजा.

बालासिनोर गावात न जाताच आम्ही बायपास घेऊन पुन्हा एकदा नॅशनल हायवेला लागलो. गुजरात नागपूर जोडणारा हायवे क्र ४७ आम्हाला दहा एक किमी भगभगाटातून घेऊन गेला आणि आम्ही आधीच्या प्लॅननुसार सेवालियाच्या दिशेने वळलो. याच हायवेवरून पुढे गेलो असतो तर गोध्राला पोचलो असतो. त्यामुळे २० किमी अंतर वाढले असते आणि त्या मामूमियांने अचूक रस्ता सांगितला याची खात्री पटली.

आता आम्हाला नर्मदा कॅनॉलचा रस्ता शोधून त्यावरून सायकली दामटायच्या होत्या. आणि वाटेत एकाने सांगितल्याप्रमाणे खरेच एक रेल्वेलाईन आडवी गेली. रस्ता अजून खुला न झाल्याने दोन्ही बाजूला कंबरेएवढ्या उंचीचे लोखंडी गर्डर्स होते. त्यावरन् सायकल उचलून नेणे एक दिव्य होते. कारण कॅरियरला १५-१६ किलोचा बोजा असल्याने सायकल एकट्याला उचलून पलिकडे ठेवणे अशक्य होते, त्यातून ते वेट सगळे मागच्या बाजूलाच असल्याने मज्जा होती. पण टीमवर्क करत कसेतरी ती धुडे पलिकडे नेली.

आता बाजूलाच मस्त फेसाळता, दुथडी भरून वाहणारा निळाशार नर्मदा कॅनॉल आणि त्याला खेटून असलेला दहा-बारा फुटी अतिशय उत्तम असा रस्ता, पलिकडे दाट झाडी. एकही गाडी नाही काही नाही. फक्त सायकल ट्रॅक.

हायला म्हणलं, कसलं भारी काम झालंय हे. आणि झापझूप पॅडल मारायला सुरुवात केली. बराच वेळ मी लान्स-वेदांगची पाठ धरून होतो, पण ते राक्षस काय हळू होत नव्हते आणि अगदीच धपापू लागल्यावर मी त्यांना दिले सोडून आणि मागच्यांसोबत हळूहळू येऊ लागलो.

दरम्यान, आज मी सायकलवरून आपटलो, लाऊन घेतले इतके पुरेसे वाटले नाही म्हणून का काय मला प्रचंड ढवळून यायला लागले. झाले असे की मी बाटलीत कॉन्सट्रेडेड ग्लुकॉनडी भरायचो, एक घोट त्याचा आणि नंतर दोन तीन घोट पाठीवरच्या कॅमलबॅगमधून. क्रँप येऊ नये म्हणून मी ही पद्धत अवलंबली होती आणि आत्तापर्यंत ती खूप उपयुक्त ठरली होती. पण नेमके पाठपिशवीतले पाणी संपले म्हणून मी दोन चार घोट ग्लुकॉनडीचे प्यालो. तोपर्यत कडक उन्हाने ते कोमट झाले होते, आणि आंबुस वास यायला लागला होता, पण घसा इतका कोरडा पडला होता की तसेच दामटून प्यालो.

आणि थोड्याच वेळात त्याचा परिणाम जाणवू लागला. आली अाली म्हणेस्तोवर एकदम उबळ आली... पोटाचा तळ खरवडून समस्त घटक रस्त्याच्या बाजूला.... ओबीने त्याच्याकडचे पाणी दिले पण मला बर्यापैकी गळून गेल्यासारखे झाले, त्यामुळे पुढे त्याची सायकल पंक्चर झाली तेव्हा मी चक्क रस्त्यावर झोपून विश्रांती घेणे पसंत केले.

आता हा फोटो हेमला काढायचे काय नडले होते का, पण भाईने काढलाच अाणि ग्रुपवर टाकला. त्यावरून उपेंद्र मामांनी इतकी शाळा घेतली माझी की वयानी इतके मोठे काका पंक्चर काढतायत आणि तुम्ही तरणीताठी लोकं झोपून राहता वगैरे वगैरे. पार अगदी पुण्याला येईपर्यंत. असो. होतं असं कधीकधी.

असेही रस्ता मस्त होता आणि त्यावरून निवांत मजा मजा करत नाही जायची तर कधी असे म्हणत मी आणि हेम मागून सावकाश येत राहीलो. सायकलींचे, आमचे मस्त पोर्टेट काढले, पुढे गेलेल्या लान्स आणि वेदांगची चिडचिड झाली असणे स्वाभाविक होते पण असेही त्यांचे समाधान करणे हमारे बस की बात नही थी, म्हणून मग आपल्या चालीने जात राहीलो.

--

नर्मदेच्या कॅनालच्या कडेने गेलेले हे २५ किमी फार भारी ठरले. अगदी कायम स्मरणात राहील असे. अर्थात उन्हाचा कडाका इतका होता की बाजूला इतके प्रचंड पाणी असूनही गार वाटत नव्हतेच उलट त्याच्या बाष्पीभवनामुळे असा हवेत अमर्याद दमटपणा साचला होता. तो दमटपणचा वास अात्ताही हे लिहीताना आठवून गेला.

पुढे कलोलपाशी आम्ही कॅनॉलची साथसंगत सोडली तोपर्यंत शतकी आकडा पार झाला होता. अजून चाळीस एक किमी अंतर जाणे बाकी होते आणि आता कंटाळा यायला लागला होता. पुन्हा एकदा हायवेचा कंटाळवाणा रस्ता आणि मी अक्षरश जीवावर येऊन येऊन पॅडल मारत होतो.

पुढे सगळेजण एका फ्लायओव्हरच्या बाजूला खायला थांबले, मी किती मागे आहे याचा अंदाज घ्यायला काकांनी फोन केला. आता हायवेला काय सांगणार कुठे आहे. थोडे डोळे ताणून पाहिले तर एक बोर्ड दिसला. त्यावर અમદાવાદ असे गुजराती लिपीत लिहीले होते. मी काकांना सांगितले म्हणलं मी खमहावाह च्या पाटीपाशी आहे. ते तिकडे बुचकळ्यात, त्यांना असे काय पाटी वाचल्याचे आठवेना. मला म्हणे नीट वाच. नशिबाने तिथून एक दुचाकी चालली होती त्याला थांबवले म्हणले भाईसाब वो बोर्डपे क्या लिखा है पढके बताएंगे क्या...

त्याने अाधी मला आपदामस्तक न्याहाळले आणि सुशिक्षीत वाटणारी लोकं कशी अडाणी असतात असा चेहरा करत म्हणला अहमदाबाद लिखा है.

हायला, हे अहमदाबाद होते होय आणि मला जे काही जोरात हसायला आले, त्यावरून तर माझे डोके अगदीच बाद झाले अाहे असा समज करून तो माणूस गेला. नंतरही मी बराच वेळ एकट्याने हसत राहीलो होतो. Happy
कलोल वरून एक रस्ता थेट चंपानेर पावागढच्या ऐतिहासिक ठिकाणाकडे जातो. पण ते खूपच आमच्या रस्त्याच्या बाहेर होतं त्यामुळे कलोलच्या र्हाईममध्ये असलेले हलोल पार केले तेव्हा पार उन्हे उतरून भास्करराव घरी चालले होते. मधल्या कॅनॉलने आमचे अंतर वाचवले होते पण आधीच्या गावातल्या रस्त्याने खूप वेळ खाल्ला होता त्यामुळे वेदांग वैतागला होताच. पण काय करणार आता.

तिकडे पुणेकर आमची वाट बघत होतेच. हॉटेलही अगदी राजेशाही थाटाचे निवडले होते.

--

सगळ्यांची गळाभेट झाली आणि अतुलने नव्या सायकलची पार्टी म्हणून तिथेच झकासमधले जेवण दिले. खूप दिवसांनी सगळयांची भेट आणि उत्तम गुजराती जेवण यामुळे दिवसभरच्या थकव्यानंतरही मस्त चार्ज झालो. एकूणातच प्रचंड दंगा केला आणि रात्री उशीरा डोळा लागेपर्यंत गप्पा हाणत राहीलो.

ओव्हरऑल एक अतिशय हँपनींग दिवस गेला आणि पोतंभर आठवणींचे आम्ही धनी झालो.

---

मेहसाणामार्गे आलो असतो तर अहमदाबाद आणि आणंदची अमूल फॅक्टरी बघता आली असती. पण ते खूप लांब पडले असते.

==================================================================
http://www.maayboli.com/node/61860 - (भाग १७): अंकलेश्वर - नवे साथीदार, नवा उत्साह

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त, रंजक लिहितोस तू Happy परफेक्ट ट्रॅव्हलॉग
छान झालाय हा भाग. अर्थात नेहमीप्रमाणेच.
अहमदाबाद, डोके बाद वाचून खळखळून हसायला आलं Happy

मस्त चालू आहे सिरीज पण आता पटापट येऊ देत पुढचे भाग. मागचा भाग अनेक वर्षांनी आल्यासारखं वाटलं. Wink

लै वाट पहायला लावता राव आशुभाऊ

(किरकिर समाप्त)

गुजरात भारी आहे, तुम्ही म्हणता तसा दमटपणा गुजरातेत सर्वत्र आढळतो, बिल्डिंगबाहेर प्लास्टर टिकत नाहीत, पोपडे सुटतात लगेच. त्याला कारणीभूत भूगोल आहे इथला. मुख्यभूमी दोन ठिकाणी फाडून दर्या आत शिरलेला आहे, त्यामुळे थोड्याफार कमीजास्त अंतराने पूर्ण गुजरातेत दमटपणा जाणवतोच. गुजराती जेवणात ताक, शेंगदाणा, बेसन अन शुद्ध शेंगतेल ह्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे, दूध तूप (अमूल मुळे) न बोलालेलेच उत्तम. आपल्याकडे लेमन ऑरेंज वगैरे सोडा मिळतो तसा गुजरातेत सौराष्ट्रात 'छास सोडा' म्हणजे चाट मसाला वगैरे घालून अर्धा सोडा अर्धे ताक असे पेय मिळते, 'सिंग सोडा' म्हणले की कुठलाही सोडा असो त्यात एक मूठ खारे दाणे घालून पेश होईल. इतकी ही जनता ताक अन शेंगदाण्याला क्रेझी आहे.

तुम्ही खरेच अहमदाबाद मेहसणा रोड घेऊन खास अमूलचा प्लांट पाहायला हवा होता, खरे तर आणंदचा प्लांट सर्वोत्तम आहे तरी मेहसाणा सुद्धा कमी नाही. कोट्यवधीची उलाढाल अन डेअरी सारख्या काही कडक आंतरराष्ट्रीय मानकांनी चालणाऱ्या उद्योगाला ह्या काही लाख शेतकऱ्यांनी अक्षरशः खूप मेहनतीने उभे केले आहे, प्रचंड सिस्टिमॅटिक काम , जागतिक स्टॅंडर्डच्या डेअरी अन पार्लिंग सुविधा, पशुपालन सुद्धा फ्रँचाईजी मॉडेल नुसार होतात. गाय/म्हैस दुभते जनावर अमूलच्या मालकीचे असते, काही शुल्क भरून गुजरात कॉऑप्रेटिव्ह मिल्क फेडरेशन (जीसीएमएफ) चे सभासद झाले की ते लोक जनावर आणून तुमच्या गोठ्यात बांधणार, त्याचा चार्ट असतो, वय वजन वगैरे नुसार त्याचा आहार ठरवलेला असतो, आठवड्यातून एकदा/गरजेनुसार पशुवैद्य भेट देतो, अन ह्या गाई/म्हशींचे दूध विकत पण अमूल घेते, त्यामुळे कुठल्या भागातून किती फॅट टक्केवारी असलेलं दूध येणार, ते फिक्स असते ह्यामुळे वापर सोपा होतो, कुठले दूध पाश्चराईज करायचे, कुठले बटर करायला, ताक दही कुठल्या भागातून येणाऱ्या दुधाचे हे फिक्स होते. मस्त प्रकार आहे, व्यापार खरेच इथल्या हवेत आहे.

पुढेमागे गुजरातेत लोथल अन ढोलावीरा नक्की पाहाल, हरप्पाकालीन बंदर आहे लोथल, आजही बांधकामाच्या विटा शाबूत आहेत, एकेक विटेवर हात फिरवताना जाणवते की हि वीट किमान ५००० वर्षे जुनी आहे , सरसरून काटा येतो अंगावर सगळे पाहून.

सायकलींग मुळे तुम्हाला काय मिळाले. असे जर कोणी तुम्हाला विचारले तर तुमच्यकडे अनेक उत्तरे असतील, पण सायकलींगमुळे तुम्ही लोकांना काय दिले असा प्रश्न कधी पडला तर तुमचे कन्याकुमारी, जम्मुचे हे लेख आणि ते वाचणारे आमच्या सारखे अनेकजण, त्यांना मिळणारा आनंद... हेच उत्तर असेल.
तुमच्या लेखांची आतुरतने वाट बघणारे चाहते, ही सुध्दा सायकलींगचीच एक देणगी आहे आणि फार थोड्या सायकलीस्टच्या नशिबात ती येते.

अफाट अनुभव आहेत, सुंदर रितीने लिहितोयस आशू

योकु , मस्त भाग चाललेत हर्पेन! या आता पुण्यात परत लवकर Happy
मला खूप आवडलं असतं जायला पण मी कुठेच गेलो नव्हतो. मी पुण्यातच आहे. Proud

बाप्पू पुन्हा एकदा झकास पोस्ट....
आता कायपण करा आणि एक तुमच्यासोबत राजस्थान, गुजरात भटकंतीचा योग जमवून आणाच. तुमच्या डोळ्यांनी ते प्रदेश पाहणे ही एक वेगळी ट्रीट असेल....

सलाम घ्यावा....

कोकणी पुणेकर - खूप खूप धन्यवाद, तुम्हा सर्वांना आवडतयं हेच खूप मोठे मोटीव्हेशन आहे, अजून राईड्स करायला आणि त्यावर लिहायला....

हर्पेन - Happy Happy

योकूंची काहीतरी गडबड झालेली दिसतीये, ठिकाय होतं असं कधीकधी

योकूंची काहीतरी गडबड झालेली दिसतीये, ठिकाय होतं असं कधीकधी

माझी अजीबात तक्रार नाहीये. उलट त्यांना मी असा इतका सायकल चालवू शकणारा वाटतोय हे पाहून लईच भारी वाटलं Proud

मस्तच हा भाग सुद्धा!!
असेच पटपट टाकत रहा भाग>>>१११११
खमहावाह Lol

तुमच्या खमहावाह वरून मला एक किस्सा आठवला, कॉलेजात असताना मी आणि मैत्रीण बस ची वाट बघत होतो, तिथे एक आगरी/ कोळी मावशी आल्या त्यांनी विचारलं माजुऱ्याची बस हायसूनच जायला ना गो पोरींनु, आम्ही म्हटलं नाही हो मावशी, हा माजुरा नाहीच अख्या ठाण्यात, तर त्यांनी असंकाही बघितलं कि आम्ही घाबरलोच.
घरी गेल्यावर दादाला माजुरा कुठे आहे विचारलं आणि सांगितलं आम्ही त्या मावशीला असं सांगितलं, तर दादा म्हणाला तुला एवढं माहित नाही तो माजिवडा Lol , तेव्हा डोक्यात प्रकाश पडला.

आऊ भारीये किस्सा Happy

माझी अजीबात तक्रार नाहीये. उलट त्यांना मी असा इतका सायकल चालवू शकणारा वाटतोय हे पाहून लईच भारी वाटलं

बास का राव, तु एवढा एन्डुरन्स स्पोर्टवाला असे म्हणायला लागल्यावर आम्ही काय करायचे

जबरी. पुर्वी थोडे भाग वाचलेले. आज एकदम बघितल्यावर उरलेले भाग पण वाचून काढले. आशुचँप कसल भारी लिहिता तुम्ही. एक्दम असं सहजासहजी ट्रिप केल्यासारख. उठून एकदम सायकल चालवायला पाहिजे अस फिलिंग येत. Happy
पुर्वीच्या तुमच्या ट्रिप मध्ये आणि आत्ताच्या ट्रिप मध्ये बराच फरक वाटतो. पण जेन्युअईनली आनंद घेण्याचा अ‍ॅटिट्युड तोच. मस्त वाटत त्यामुळ वाचायला.

अरे वा ! वेगळाच रस्ता निवडल्याने रंजक माहिती मिळाली या भागात. भारताचे ज्युरासिक पार्क ही अगदीच नवीन माहिती मिळाली या भागात.
काव्यगत न्याय वगैरे किस्से भारी लिहीलेत. त्यामुळेच उत्सुकता टिकून राहते. हा प्रवास किती खडतर असेल याची कल्पना आहे. पण लिखाणाच्या शैलीमुळे उत्कंठावर्धक झालीय मालिका..