चुकलेला निर्णय --भाग-१

Submitted by अनिल तापकीर on 22 March, 2012 - 07:54

सगळ्यांची नुसती धावपळ उडाली होती.जो तो एकमेकांवर ओरडून खेकसून उरकायला सांगत होता. साडे अकराचा साखरपुडा होता. आणि जागेवरच सव्वा अकरा झाल्यामुळे थोरले चुलते नि वडील अस्वस्थ झाले होते. साखरपुड्याच्या ठिकाणी पोहचायला पाऊन तास तरी लागणार होता. ४०७ टेम्पो दाराशी लागला नि सर्वांनी बसायला सुरुवात केली. नवरदेवासाठी त्याच्या मित्राची स्विफ्ट कार आणली होती. आम्ही म्हणजे मी नि माझे मित्र सगळेच टू व्हिलरवर जाणार होतो . नवरदेवाच्या कारमध्ये बसण्यासाठी कलावर्यांची स्पर्धा लागली होती....... काय करणार सख्या, सख्या चुलत, चुलत अश्या जवळ जवळ दहा बारा बहिणी होत्या आम्हाला, सगळ्यांशी चांगले सबंध असल्यामुळे नवरदेवाला कार मध्ये कोणाला घ्यावे हा प्रश्न मोठा गहन वाटू लागला लागला होता. त्यामुळे तो गाडीत न बसता तसाच उभा होता. दादा म्हणजे आमचे थोरले चुलते आले नि नवरदेवाला म्हणाले -काय झाले रे बाळू गाडीत का बसणा
दादा गाडीकडे जाऊन बघा गाडीच्या आजूबाजूला सुद्धा पाय ठेवायला जागा नाय, सगळ्या पोरी गाडीत यायचं म्हणून हटून बसल्यात, मी कुणाला काय बोलणार?
चल तू मी बघतो पोरींकडे एकतर आधीच उशीर झालाय.....असं म्हणून दादाने भाऊला म्हणजे नवरदेवाला हाताला धरूनच गाडीकडे नेले. त्यांनी पहिले सगळ्या पोरींना गाडीपासून दूर केले नि फक्त दोन लहान बहिणींना नवरदेवासोबत बसविले. आणि बाकीच्यांना टेम्पोकडे पिदाडले. त्या नाराजीने,रागाने पाय आपटत निघून गेल्या.
एकदाचे वर्हाड साखरपुड्याच्या ठिकाणी पोहचले. सगळे टेम्पोतून खाली उतरले. बायांनी खाली उतरल्या उतरल्या आपल्या नाकातील नथी सारख्या केल्या. केसांवरून तोंडावरून हात फिरवून आपला चेहरा चांगला आहे याची खात्री करून घेतली. नि आम्ही मुलाकडून वरमाया आहोत या थाटाने त्या वावरू लागल्या.
ताटांची मिरवणूक निघाली. भर उन्हाची वेळ असूनही आम्ही नाचायची हौस भागवून घेतली वर्हाड मंडपात गेले. मी आणि माझ्या मित्रांनी एका बाजूला जागा पकडली .
बाकी सर्व रीतीरीवाजाने चालले होते. नवरी मंडपात आली सगळ्या वर्हाडी मंडळींचे लक्ष्य नवरीकडे होते. ती कशी दिसायला कशी आहे, जोडा शोभतोय का ? या बाबत बायांच्यात कुजबुज चालली होती .
मी माझी होणारी वाहिनी कशी आहे हे पाहण्यासाठी तिकडे बघितले. परंतु वहिनीच्या चेहऱ्यापेक्षा माझे लक्ष वेधले ते दुसऱ्याच एका चेहऱ्याने,.....'पोर्णिमेच्या रात्री झाडामागून हळूच चंद्राने डोकवावे तसा तो चेहरा हळूच डोकावताना मला भासला'. माझे लक्ष्य वारंवार तिकडेच जात होते. माझ्या शेजारी बसलेल्या मित्रांच्या गप्पांकडे माझे लक्ष नव्हते. तेवढ्यात पद्याने मला डोसरले नि म्हणाला.
अज्या, काय एवढ बारकाईने बघतोय, आम्ही कव्हाचा आवाज देतोय .
काही नाही रे वाहिनी कशी आहे ते बघतोय.-मी
वाहिनीलाच बघतोय का नक्की, कारण वाहिनीच्या बाजूलासुद्धा बघण्यासारखे बरंच काही आहे. -सुज्या म्हणाला .
नाही रे, मी भाऊ बरोबर मुलगी पाहायला आलो नव्हतो ना, म्हणून मी भावजय कशी आहे ते बघतोय. -मी सारवासारव करत म्हणालो
वाहिनीलाच बघ बरं नाहीतर पुन्हा एकदा वर्हाड इकडे आणायला लावशील -पद्या हसत म्हणाला .
पद्या नि सुज्या एकमेकात गप्पा मारायला लागले तसे माझं लक्ष पुन्हा त्या चेहऱ्याकडे गेले. आणि नवरी तेथून उठेपर्यंत ते जातंच राहिले.
नवरया मुलाचा, वरमाय वरबापाचा मानपान झाला. माझे लक्ष पुन्हा पुन्हा दरवाज्याकडे जात होते. कारण नवरी पुन्हा बाहेर येण्याची शक्यता होती. आणि नवरी बरोबर तो चेहराही..........अजून नवरा नवरीचा एकमेकाला अंगठी घालण्याचा कार्यक्रम व्हायचा होता.
तेवढ्यात सुज्या मला व पद्याला म्हणाला -ये चला आपण धार मारून येऊ तो पर्यंत ह्यांच उरकेल म्हणजे लगेच जेवायला बसता येईल. लय भूक लागलीय.
पद्याही उठत चला म्हणाला......................परंतु मला तेथून उठू वाटेना खरं तर मलाही खूप लघवीला लागली होती. पण मला तो चेहरा पुन्हा पाहायचा होता त्यामुळे मी त्यांना म्हणालो.-तुम्ही या जाऊन मला नाही धार मारायची.
चल नको नाटकं करू आम्हाला माहित आहे तू का येत नाही ते -सुज्या मला उठवत म्हणाला.
मी त्यांना म्हणालो खरच मला नाही लागली तुम्ही जाऊन या.
तसे पद्या सुज्याला म्हणाला चल रे गाडू ह्याला हिथच आपण जाऊन येऊ.
ते दोघे गेले तसे मला खूप बरं वाटलं कारण आता मला तो चेहरा बिना डिस्टर्ब पाहता येणार होता. मी दरवाज्याकडे पहिले नवरी बांधलेल्या मुंडावळ्या सोडून बाहेर येत होती. ह्या वेळेस ती एकटीच आल्यामुळे माझा मूड ऑफ झाला. त्या सुंदर चेहऱ्याला पाहण्यासाठी मी लघवीला खूप लागली असून सुद्धा मित्रांबरोबर गेलो नव्हतो, परंतु ती बाहेरच आली नव्हती म्हणून मी जाऊन यावे म्हणून उठलो. व बूट घालू लागलो तेवढ्यात ती आली. नवरीने नवरदेवाला घालायची अंगठी घेऊन ती आली होती.
नवरा नवरीचा अंगठी घालायचा कार्यक्रम उरकेपर्यंत मी तिला न्याहाळीत होतो. आतापर्यंत कुठल्याही मुलीकडे मी विशेष अस लक्ष दिले नव्हते. परंतु ह्या पहिल्यांदाच पाहिलेल्या चेहऱ्याने काय जादू केली होती कुणास ठाऊक परंतु मला नजर हटवू वाटत नव्हती.
वहिनी च्या नि तिच्या चेहऱ्यात बरंच साम्य होते. त्यामुळे ती वहिनीनचीच बहिण असावी असं वाटत होते. नि ती बहीणच निघावी असेहि वाटत होते.
साखरपुड्याचा सर्व कार्यक्रम उरकला. पद्या नि सुज्या मला जेवणासाठी ओढू लागले तसा मी त्यांना म्हणालो -तुम्ही घ्या बसून मला नाही लगीच बसता यायचं
आयला ह्याची कायम अशीच नाटकं असत्यात, आता जेवायला न यायला काय झालं -सुज्या वैतागून म्हणाला.
अरे, आमच्या घरातले कार्य आहे मला कसे लगेच पहिल्या पंगतीला बसता येईल मी सुज्याची नि पद्याची समझुत काढत म्हणालो.
ए चल मरूदे ह्याला तसाच उपाशी, आयला सकाळ धरून पोटात काय नाय.....आपण घेऊ खाऊन असे म्हणून ते दोघे निघून गेले.
खरं तर मलाही चांगलीच भूक लागली होती. कसलं घरातले कार्य नि कसलं काय, पण माझ्या डोक्यात नवीन विचार शिवला होता तो म्हणजे साखरपुडा झाल्यावर आता नवरा नवरी फोटो काढतील. नि नवरीबरोबर तो चेहराही बाहेर येईल. म्हणून मी जेवायला जायचे टाळले होते.
'अजय'....म्हणून हाक ऐकु आली म्हणून मी वळून पहिले तर दादा मला बोलावत होते. मी तिकडे गेल्यावर दादा म्हणाले -हे बघ तू नवरानवरीला घेऊन त्या रायसोनी शेठच्या गार्डनमध्ये जा त्यांना फोटो काढायच्यात आणि परत लवकर आण.
मला आनंदाच्या जणू उकळ्या फुटत होत्या. पद्याला नि सुज्याला जेवायला नकार दिला ते बरं झालं. मी भाऊ कडून स्विफ्टची चावी घेऊन घडी घेऊन आलो. भाऊ वाहिनी व वाहिनीकडेच्या दोन कलावर्या मागे बसल्या. मी गाडी स्टार्ट केली तेवढ्यात वाहिनी म्हणाल्या वो थांबा जरा माझी बहिण येतीय.
माझे लक्ष्य पुन्हा दाराकडे गेले............आणि ती आली, मगाचा पोशाख बदललेला होता. आकाशी कलरची साडी नेसून ती आली होती. गाडीमध्ये नेमकी पुढचीच शिट रिकामी होती. माझ्या छातीत धडधडू लागले. एकतर तिला पाहून मी पार कामातून गेलो होतो. आणि आता तीच शेजारी बसण्याची श्यक्यता होती.
ती मागे बहिणीजवळ गेली आणि तिच्या शेजारी बसलेल्या एका छोट्या मुलीला म्हणाली- कोमल पुढे बस मी इथे बसते.
कोमल म्हणाली- नाही तूच बस पुढे मला ताईजवळच बसायचे आहे.
कोमल, आणि शीतल या दोघीही तिथून उठेना तेव्हा वाहिनीच म्हणाली- अवंती, तूच बस पुढे या काही ऐकायाच्या नाही, इथं जवळच तर जायचे आहे.
'अवंती' अवंती होतं तर तिचं नाव.
ती पुढे बसली परंतु माझ्या छातीतली वाढली.
कब्बडी खेळताना प्रतिस्पर्ध्यावर सहज मात करून डाव जिंकणारा मी, इथे मात्र आउट व्हायला आलो होतो.
गाडी घेऊन निघालो तेवढ्यात पद्या नि सुज्या जेऊन उठून हात धुवत होते त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. पद्या मोठ्याने म्हणाला-
जमलेरे आज्या, जाऊदे कर मज्या, येऊ परत इकडे आपण.
मी गालातल्या गालात हसत गाडी मेनरोडवर घेतली नि गाडीला स्पीड दिला.
फोटो काढण्याच्या त्या अर्धा पाऊन तासाच्या वेळात मी तिच्याकडे जेवढे पहिले असेल त्याच्या दहा टक्के देखील नवरा नवरीकडे वा अन्य इतरांकडे बघितले नसेल.
नवरा नवरी बागेत असलेल्या दुसर्या एका भागाकडे फोटो काढण्यासाठी गेले. मी गाडीजवळ थांबूनच त्यांच्याकडे बघत होतो. तेवढ्यात ती गाडीकडे येताना दिसली. तसा मी सरळ झालो. केसांवरून कंगवा फिरवला. हाताची घडी घालून गाडीला टेकून उभा राहिलो.
ती जवळ आली नि म्हणाली.- गाडीत असलेली पाण्याची बाटली दाजींनी मागितलीय.
मी गाडीतून पाण्याची बाटली काढून तिच्याकडे दिली व चेहऱ्यावर स्मित आणत काहीतरी बोलायचे म्हणून विचारले- तुंम्ही वाहिनीच्या कोण?
ती हसत म्हणाली
मी तिची बहिण आहे
मग त्या आलेल्या लहान मुली पण बहिणीच का?
हो पण चुलत्याच्या मुली आहेत त्या

एवढं बोलून ती निघून गेली. थोडी दूर जाताच तिने हळूच मागे वळून पहिले. आणि माझी मनातील आशा पल्लवित झाल्या. माझे मन सारखे तिचाच विचार करू लागले.
फोटो काढून घरी आल्यानंतर जेवायला बसले त्यांच्या बरोबर नवरीच्या कलावर्या बसल्या मला काय तिथे जागा मिळायची श्यक्यता दिसेना म्हणून मी बाजूला झालो तोच पद्या नि सुज्या मला परत चिकटले त्यांच्या चेष्टेला तोंड देत मी दुसरीकडे जेवायला बसलो.

कितीतरी दिवसांनी आज माझ्या झोपेचे खोबरे झाले होते. एखाद्या मुलीमुळे झोप न लागण्याची माझी हि पहिलीच वेळ, ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत विचार करत होतो.
' अवंती' किती सुंदर नाव आणि रूपही तिच्याजवळ प्रेम व्यक्त करायला कधी मिळेल,? ती होकार देईल का? मी तिला आवडेल का? हे सगळे जमल्यानंतर माझ्या व तिच्या घराचे लग्नाला तयार होतील का?
अश्या नाना विचारांनी माझी जवळ जवळ सारी रात्रच झोपेविना गेली.

भाऊच्या लग्नाच्या दिवशी मी जरा वेगळ्याच विश्वात वावरत होतो. आमची म्हणजे अवंतीचीनि माझी सारखी नजरा नजर होत होती. अधून मधून ती छानसं स्मितही देत होती . त्यामुळे मी जाम खुश होतो.
मित्र मंडळी तिच्या वरूनच चिडवत होते. त्यांच्या चिडवण्याने मी आतून सुखावत होतो.
सर्व लग्न यथासांग पार पडल्यानंतर वर्हाड निघते वेळी मला एक आशा लागून राहिली होती. ती म्हणजे 'अवंती' नवरी बरोबर येईल याची. आणि ती आली. मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या कारण आता ती कमीत कमी पाच दिवस आमच्या घरी राहणार, आणि त्या दिवसात माझ्या भावना तिच्याजवळ व्यक्त करण्यासाठी नक्कीच संधी मिळणार.
या अश्या विचारातच मित्रांबरोबर वरातीत बेफाम नाचलो.

दुसऱ्या दिवशी नवरा नवरी यांना गावात सर्व देवांच्या पाया पडायला जायचे होते. दादा माझ्याजवळ आले नि म्हणाले अजय तू नवरा नवरी बरोबर जा मोटार सायकलवरच जा तुम्ही म्हणजे शेतातल्या देवांना सुद्द्धा जाता येईल. मी आणि भाऊनी गाड्या काढल्या. भाऊच्या गाडीवर वाहिनी बसली आणि ती माझ्या गाडीवर,.... माझ्या हृदयात नुसते आनंदाचे कारंजे उसळत होते. गाडी चालू करणार तेवढ्यात धाकटी चुलती माझी सात वर्ष्याच्या भाचीला घेऊन आली व म्हणाली -अजय सोनीला घेऊन जा मधी बसवून मामाबरोबर जायचं म्हणून रडायला लागलीय. असं म्हणून तिला आमच्या मध्ये बसवले.माझा थोडा विरस झाला पण ठीक आहे म्हटलं न गाडी चालू करून भाऊला गाठले. व त्याच्या मागे थोडे अंतर ठेऊन चालवू लागलो.
गावातल्या सगळ्या देवांच्या पाया पडून झाल्यावर आम्ही शेतात गेलो. ओढ्या पलीकडच्या शेतातल्या
मुंजाबाच्या पाया पडायला जायचे होते. परंतु तेथे जाग्यापर्यंत गाड्या जात नव्हत्या म्हणून मी भाऊला म्हणालो भाऊ मी थांबतो हिथच तुम्ही या जाऊन
थांब, आणि अवंती तुला हि थांबायचे असेल तर थांब आम्ही येतो पटकन जाऊन.-भाऊ म्हणाला
तिने वहिनीकडे पहिले वहिनीने थांब म्हणून मान हलवली.
ते दोघे निघाले तसे थांब मामा,.....मामा थांब मला तुमच्या बरोबर यायचं म्हणून सोनी त्यांच्याकडे धावत गेली

ओढ्या पलीकडे च्या शेतातील मुंजाबाचे मी शतश:आभार मानले कारण मला स्वप्नात देखील वाटले नव्हते कि इतक्या लवकर आम्हाला भावना व्यक्त करायची संधी मिळेल.
ते सगळे दूर जाताच आम्ही दोघेच तिथे उरलो. माझ्या छातीत धडधड वाढू लागली होती. बोलायला कशी सुरुवात करावी हेच समजत नव्हते. तरीपण मी संधी सोडणार नव्हतो. मनावर थोडेसे नियंत्रण आणले नि म्हणालो -अवंती, छान नाव आहे तुझं.
तिच्या चेहऱ्यावर स्मित दिसले. परंतु काही बोलली नाही. मी पुन्हा म्हणालो - आवडलं का आमचे गाव, घर ?
हो छान आहे ती हळू आवाजात बोलली.
हळू का होईना परंतु बोलली याचा आनंद होता.
म्हणून काहीही होवो मी आजच विचारायचा फैसला केला. थोडा थांबलो नि एखादा पाठ केलेला धडा म्हणावा तसा म्हणालो.
अवंती तू म्हणशील यांना वेड लागलेय परंतु नंतर पुन्हा कधी वेळ मिळेल ते सांगता येणार नाही म्हणूनच मी आता बोलायचे ठरवले आहे. पटले तर हो म्हण, नाही पटले तर ना म्हण माझी जबरदस्ती नाही.
तुला पहिल्यापासून मी अक्षरश:वेडा झालो आहे. तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम बसले आहे. .........आपली अजून जास्त ओळख नसताना मी तुला प्रपोज करतोय, हा तुला वेडेपणा वाटेल, परंतु तुला खरोखर सांगतो. भाऊच्या साखरपुड्याच्या दिवशी तुला पहिली आणि तेव्हापासून माझ्या मनात, हृदयात फक्त तूच व्यापून राहिली आहेस. पुन्हा संधी केव्हा येईल याचा भरवसा नाही म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करायला घाई केली. तू तुझे उत्तर सावकाश विचार करून दे. ........तुझ्यासारखी जीवन साथी मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल.
एवढं बोलूनच मला दम लागल्यासारखे झाले होते. कारण मनात खूप भीती होती, हिला मी बोललेलो आवडले नाही आणि हिने हे भाऊला किंवा घरच्यांना सांगितले तर अवघड होते. दादा तर चाबकानेच फोडून काढतील. ........परंतु बाण सुटला होता. काय होईल याचा विचार करण्यापेक्ष्या अवंतिला काय वाटले हे महत्वाचे होते. म्हणून मी तिच्याकडे पहिले.
ती शांत पणे खाली मान घालून झाडाच्या खोडाला टेकून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कसलीही प्रतिक्रिया नव्हती. मी जरा अस्वस्थ झालो. माझे बोलणे तिला पटले कि नाही हे कळायला काही मार्ग नव्हता.
तिला राग आला का? विचारावे म्हणून बोलणार तोच ........मामा, आम्ही आलो म्हणत सोनी मला बिलगली. माझे शब्द तोंडातच राहिले.

घरी आल्यानंतर मी खूप अस्वस्थ होतो. मी बोललेलो अवंतिला आवडले नसले तर ती भाऊला, वाहिनीला किंवा अजून कोणा मोठ्या माणसाला सांगण्याची शक्यता होती. तिने ते सांगितले तर माझं काय खरं नव्हतं. म्हणून मी अस्वस्थ होतो. मी घरात थांबलोच नाही घरी आल्या आल्या मी मित्रांकडे गेलो. तिकडेच पद्याकडे दुपारचे खाल्ले नि रात्री उशिरा घरी गेलो. गेल्यागेल्या आई ओरडली. कुठं गावभर हिंडतोस रे
ते दादा सारखे विचारत होते अजय कुठे आहे म्हणून .
माझ्या काळजात लख्ख झाले छाती धडधडू लागली मी तसेच आईला म्हणालो काय काम होतं का?
आरे उद्या पूजा आहे मार्केटला जायचंय सकाळी लवकर
माझ्या जीवात जीव आला.
ठीक आहे मी उठण लवकर असे म्हणून मी झोपायला पळालो.

त्यानंतरचा दिवस मार्केट, स्वयंपाक, पूजा , या सर्व धावपळीतच गेला त्यामुळे दिवस कसा गेला ते कळलेच नाही. पूजेच्या अगोदर नवरा नवरी जेजुरीला जाऊन आली होती. अवंती गेली होती कि नाही हे मला कळले नव्हते. आणि दिवस भराच्या धावपळीत ती दिसलीच नव्हती. .........नंतर मला कळले कि उद्या नवरी जाणार आहे. मी थोडा अस्वस्थ झालो. कारण अजून अवन्तीकडून मला काहीच उत्तर मिळाले नव्हते.
रात्री बाहेर भजनाचा कार्यक्रम होता. पखवाज वाजवणारा केरबा तात्यानि मला पाणी आणायला सांगितले. मी इकडे तिकडे पहिले कोणीच दिसेना म्हणून मीच उठलो.
घरात दाटीवाटी झोपलेल्या सगळ्याना ओलांडत मी स्वयंपाक घरात गेलो पाण्याची कळशी घेऊन निघणार तोच शेजारच्या खोलीतून अवंती झटकन पुढे आली मला व इतरांना काही कळायच्या आत माझ्या खिशात काहीतरी कोंबले नि झटकन परत त्या खोलीत गेली.
क्षणभर मी अवाक झालो. भजनकर्यांच्या मध्ये कळशी ठेवली नि झटकन देवळाच्या बाजूला गेलो.
कोणी नाही असे बघून खिशातील चिठी काढली नि वाचू लागलो.

प्रिय अजय, आता प्रिय म्हणायला काही हरकत नाही. कारण मी तुम्हाला होकार देतेय. तुमच्या सारखीच माझी स्थिती होती परंतु मुलींना बोलून दाखवता येत नाही. तुम्हाला मी पहिले तेव्हापासून तुम्ही मला आवडत होता. मी तुमच्या प्रेमाला होकार देते परंतु माझी फक्त एकच अट असेल. ती म्हणजे मला तुम्ही कधीच अंतर देऊ नका.
तुमची ,अवंती

क्रमश:

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चातक राव कथा मोठी आहे म्हणून क्रमश; करावी लागते, तरीही कथा एकावेळी टाकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल.

अजुन कथा पुर्ण
नाहि केलित मार्च २०१२ पासुन अपुर्न