मै कोन हूँ ?

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मै कोन हूँ ?

"मै कोन हूँ? " हां कधी कधी चित्रपटाच्या स्मृतीभंश झालेल्या नायकाला अथवा नाईकेला पडणारा प्रश्न मला पडतो आणि मग मी स्वत थोडासा गोन्धळतो मला हा प्रश्न का पडावा ह्या विचाराने आणि मग मी स्वताला शोधायला सुरूवात करतो. तसा मी सामान्य पापभिरू मध्यम वर्गीय गृहस्थ आहे. असणारच कारण " साखरदाण्डे " नावाचा इसम एखादा बुद्धीवादी, विद्वत्ता पूर्ण, अभ्यासू ईसम कुणी असू शकतो ह्या बद्दल माझ्या मनात संदेह नाही बर तो एखादा गुंड, राजकारणी, स्मगलर, भोंदू ( हे चारही शब्द तुम्हाला समानार्थी वाटू शकतात पण तो तुमचा दोष नाही इथे काही शेलकी विशेषण राहून गेली असल्यास पंक्ती भेद केल्या बद्दल मला क्षमा करा) असू शकत नाही. जास्तीत जास्त तो एक घाबरट सारस्वतीय गोयकार ब्राम्हण असू शकतो जो 'आपण आपले भोजन, निद्रा, माफक देवदर्शन हयात गुंतलेला असू शकतो. बर हा लेखन प्रपंच आत्म वृत्तात्मक लिहीण्याचा प्रपन्च अजिबात नाही कारण आत्मवृत्ताला मीपणा चिकटला तर ते आत्मगान किंवा आत्मप्रौढॆ होण्याचा धोका असतो तो मला नको आहे. जास्तीत जास्त ह्याला आत्म विश्लेषण असे अभ्यासू नाव आपण देवू शकतो.

मला खुपदा विचारणा होते की तुझ्या लेखात खुपदा चित्रपटाचा उल्लेख असतो असे का बरे? तर ह्याचे उत्तर माझ्या वडिलांचे चित्रपट नाट्यप्रेम हे कदाचित असू शकेल. हे थोडस आडातल पोहोर्यात येण्या सारख आहे. तशी शंका घ्यायला थोडासा वाव असायला माझी हरकत असण्याच काही कारण नाही. मला प्रत्येक क्षणात चित्रपटॆय नाट्यमयता ( ही द्वीरूक्ती झाली) दिसते. उदाहरण द्यायच झाल तर रस्त्यात एखादा डबा पडलेला दिसला तर मी तो तत्परतेने बाजूला काढतो कारण मी किंवा इतर कोणी चुकून लाथ मारली तर अचानक वय वाढले तर काय घ्या ( कारण माझ्या डोळ्या समोर अमर प्रेम चित्रपटातला तो प्रसंग तरळतो ज्यात लहानपणॆचा विजय महेरा केवळ डब्यावर लाथ मारूंन मोठे पणीचा विनोद महेरा होतो) उगाच आपले किंवा इतरांचे वय फुकटा फुकटी का वाढून द्यायचे)
कधी कधी मला वाटते मी लेखक आहे का?पण पुढच्याच क्षणी मनात विचार येतो ' वेड्या हां तर सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार झाला' तसेच केवळ एका पुस्तकाच्या पूंजीवर लेखक म्हणून मिरवणे हे म्हणजे अगदी ' लग्नात पहील्यांदा घोड्यावर बसणार्या नवर देवाने स्वताला घोडेस्वार म्हणून मिरवण्या सारखे होते'. कधी कधी मला विचारणा होते " काय लेखक महाशय आता पुढले पुस्तक कधी?" हां प्रश्न मला खुप म्हणजे खुपच घाबरवतो. पहील्यांदा बाळन्त झालेल्या स्त्रीस " काय तर मग आता पुढली खेप कधी? " असे विचारल्यावर ती जशी आरक्त होईल तसा मी आरक्त होतो.
कधी कधी मनात विचार येतो मी उत्तम स्वयंपाकी आहे का? बर मला स्वताला खाण्याची खुप आवड आहे. त्याच प्रमाणे मला इतराना काही पदार्थ करून खाऊ घालायला खुप आवडतात. ह्याला कदाचित माझ्या आईचा सुगरण पणा आणि वडिलांचा खवैय्यॆ पणा कारणीभूत असावा. आईच्या हाताच्या पदार्थांची चव आठवू अगदी " रीव्हर्स ईंजीनीयारींग च्या " क्लुप्ती प्रमाणे ह्या पदार्थात काय जिन्नस काय काय मात्रेने पडले असतील ह्याचा अंदाज बांधून मी तसे पदार्थ बनवॆण्याचा प्रयत्न करतो. त्याला आईच्या हाताची चव अजिबात येत नाही हे मुद्दाम सांगत नाही.
कधी कधी मला वाटत आपण चांगले व्यावसायीक आहोत का? पण ह्यातही माझ्या वडिलांचा अफाट स्मरण शक्तीचा वाटा आहे. एखादी केस एखादा खटला लढताना मी समोराच्याच्या दृष्टीने विचार करून त्याला नामोहरम करायचा प्रयत्न करतो . तो माझा स्वाभाव आहे त्यामॊळे मी उत्तम व्यावसायिक आहे का ह्याचे उत्तर माझ्या बुद्धीमत्तेशी न जोडता फार तर माझ्या स्वभावाशी जोड़ता येइल. हां कधी कधी माझ्या नशीबाचा भागही असू शकेल
संध्याकाळ झाली की मी माझ्या पालकाच्या भूमिकेत शिरतो. माझ्या पाच वर्षाच्या मुलीला आणायला मी शाळेत जातो. आजच एखादी केस जिंकल्या मॊळे मी फार खुशीत असतो. हवेत असतो म्हणा ना. मला बघून माझी गोडुली धावत येते तिच्या गालावर गुलाब, डोळ्यात चमक आणि ओठावर सुबकस हसू असत. ती येऊन माझ्या पोटावर दोन तीन ठोसे मारते आणि म्हणते " पप्पुली तू आलास?" मी स्वताला विसरतो. माझे मी पण गलूंन पडते आणि मला इतक्या वेळ पडलेल्या " मै कोन हूँ?" ह्या प्रश्नाचे उत्तर माझे
मलाच मिळून जाते

केदार अनंत साखरदांडे
दिनांक १८/०१/२०१७

विषय: 
प्रकार: 

पप्पुली ! >>> आम्ही कधितरी लाडाने बाबांना बाबुडी म्हणायचो त्याची आठवण झाली .
छ्हान आहे लेख .

हर्पेन, अगदी! मला पण परिपूर्ती आठवलं.. म्हणजे इरावती कर्व्यांचा लेख आठवला पण नाव आठवत नव्हतं!

खूप छान.
थोडक्यात आपण कोण याचा आढावा योग्य शब्दात घेतलास.
सेम हेच विचार अनेकांच्या मनात येत असतील हे नक्की.