सदनिकेवरील नावे कमी करण्याबाबत सल्ला/माहिती हवी आहे

Submitted by एक मित्र on 10 January, 2017 - 15:09

काही वर्षांपूर्वी पुण्यात एक सदनिका (Flat) खरीदली आहे. त्यावर माझ्या बरोबर वडिलांचे व आईचे नाव पण आहे. पण आता वडील हयात नाहीत. आईचे वय झाले आहे. पुढील काळात सदनिके संदर्भात कोणताही व्यवहार करावयाचा झाल्यास मला ते सोपे जावे म्हणून त्यावरील आई-वडिलांचे नाव कमी करायचे आहे. वकिलांना सल्ला विचारला तर त्यांनी दोन मार्ग सुचवले:

१. वडिलांचे वारस म्हणून बहिण भावांकडून Release deed करावे लागेल मग त्यांचे नाव कमी होईल. आईच्या नावे Gift deed करावे मग तिचे नाव कमी होईल. पण याला खर्च खूप आहे. पण फायदा असा कि यामुळे सदनिकेचा नवीन इंडेक्स-२ मिळेल त्यावर फक्त माझे नाव असेल व दीर्घकालीन विचार करता हे जास्त सोयीचे होईल.

२. आम्ही हक्क सोडत आहोत अशा स्वरूपाचे पत्र आई व बहिण भावांकडून स्टाम्प पेपरवर लिहून घ्यायचे. यामुळे खर्च काही फार होणार नाही. पण यामुळे नवीन इंडेक्स २ मिळणार नाही. नावे तशीच राहतील. पण पुढील काळात समस्या येऊ शकतात (काय समस्या येऊ शकतात याला वकिलांकडे समाधान कारक उत्तर नव्हते. नावे तशीच राहिल्याने भावंडांची मुले भविष्यात हक्क सांगू शकतात असे काहीसे मोघम उत्तर मिळाले)

वरील पैकी #१ आणि #२ मध्ये खर्चात खूप तफावत असल्याने (#१ साठी खूपच खर्च आहे) मला #२ योग्य वाटतो. पण त्याचे पुढे नक्की consequence काय आहेत. तसे केल्यास सदनिका विकणे, त्यावर कर्ज घेणे इत्यादी गोष्टी केवळ माझ्या सहीने होतील का? #२ मुले भविष्यात समस्या येणार असतील #१ हाच खर्चिक पर्याय आहे का कि अन्य काही पर्याय आहेत?

याबाबत कुणाला माहिती असेल तर कृपया सल्ला द्यावा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदनिका विकत घेतानाचे दिलेले चेक्स,दिलेली रक्कम तुम्हीच तुमच्या अकाउंटमधून केली होती असे पुरावे ठेवले असतील तर काम सोपे होईल.केवळ आईवडिलांची नावे होती पण पेमेंटस मीच केले होते .यामध्ये असे होते की आता त्यांच्या नावाचा दोनतृतियांश हिस्सा मला मिळणार नसून तो तत्त्वत: माझाच होता. तरी भावा बहिणीच्या सह्या लागतील. ही मिळकत तुमचीच आहे आणि आमचा त्यात वाटा नाही असे.जर ते बँक अकाउंट तुमचे पहिले नाव असलेले असुल आणि वडिलांचे दुसरे जॅाइंट नाव असेल, पगाराची रक्कम तिथेच जमा होत असे तर पेमेंट तुम्हीच केले असे होते. म्हणजे आता नावं काढल्याने तुम्हाला नवीन आवक ( स्थावर) झाली नसून ती तुम्हीच पुर्वी खर्च करून घेतली होती व त्यावर टॅक्स नाही लागणार. सोसायटीच्या J आणि I रेजिस्टरमध्ये बदल करून शेअर सर्टिफिकेटवर फक्त तुमचेच नाव येण्यासाठी नवीन नोंद केलेला करार द्यावा लागतो.

अशी कोणती गोष्ट तुम्ही आईसाठी / आईच्या घरासाठी तुमचे कागदपत्रावर नाव आल्याशिवाय करू शकत नाही? उतारवयात आपलं घर नाही ही जाणीव खूप क्लेशकारक असू शकते. ते घर फक्त तुम्हालाच मिळावे अशी त्यांची इच्छा असेल तर,भविष्यकाळासाठी आई तुमच्या नावे नॉमिनेशन करू शकते. बहुतेक हा उपाय फुकट असतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@Srd: सदनिका विकत घेताना,दिलेली रक्कम मीच माझ्या अकाउंटमधून दिली होती. याची पूर्ण कल्पना भावंडांना व आईला आहे. त्याबद्दल वाद नाहीत. तसेच ते त्यांना सिद्ध करायची पण आवश्यकता नाही.

@राजसी: मला आईला बेघर वगैरे करायचे नाही. तिच्या नावे तिचे दुसरे घर सुद्धा आहे. कृपया तसा गैरसमज करू नका. (सदनिका घेताना केवळ भावनिक मुद्दा म्हणून मी स्वतःचे कौतुक दाखवण्यासाठी माझ्यासहित आई वडिलांचे नाव पण टाकले होते.पण पुढे त्यामुळे complications होतील अशी तेंव्हा कल्पना नव्हती.).

मुद्दा खूप तांत्रिक आहे. आम्ही सारी भावंडे वेगवेगळ्या शहरात राहतो. आई थोरल्या भावाकडे राहते. सदनिकेसंबंधात काहीही व्यवहार करायचा असेल (उदाहरणार्थ, टॉप अप लोन) तर पूर्वी फक्त आईवडिलांची सही चाले. आता आईची सही आणि वडील हयात नसल्याने त्यांचे वारस म्हणून इतर भावंडांच्या सह्या घ्याव्या लागतात. शिवाय, आज भावंडांना कल्पना आहे कि सदनिकेच्या खरेदीसाठी पैसे मीच दिले आहेत. पण भविष्यात त्यांची मुले वगैरे हक्क सांगून नाहक वाद निर्माण होऊ शकतात. या सर्वांचा विचार करून आईसह आम्हा भावंडानी पण असा निर्णय घेतला आहे कि या सदनिकेवर फक्त माझा हक्क रहावा व पुढील व्यवहार एकट्याच्या सहीने व्हावेत.

रजिस्ट्रार कडे हक्कसोड करून सरळ सिटीसर्वेमधे नोंद बदलते. नंतर काहीही प्रॉब्लेम्स येत नाहीत.
फ्लॅटची कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे का?

@आ.रा.रा.
म्हणजे मी #१ मध्ये जे लिहिले आहे तोच पर्याय म्हणताय का आपण?
हो फ्लॅटची कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे.

ओह!
Complete power of attorney केली तर.
फक्त release deed करून भावंडांचा सहीच प्रश्न सुटेल बहुतेक आणि मग आईकडून नॉमिनेशन.

होय, तुमचा धाग्यातला पर्याय नं २.

माझ्या स्व-अनुभवानुसार,

कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर अधिक सोपे व स्वस्त काम आहे. त्यात वकिलाची गरज नाही. सिटीसर्वे ऑफिसपाशी स्टँपवेंडर असतात, त्यांच्याशी एक शब्द बोला. हक्कसोडबद्दल तेच मार्गदर्शन करतील, स्टँपपेपर लिहूनही देतील. इथे सरकारला काही ड्यूटी द्यावी लागत नाही, कारण खरेदी/विक्री व्यवहार केलेला नाही.

रजिस्ट्रार ऑफिसात हक्कसोड झाल्यानंतर सोसायटीच्या सेक्रेटरी/अध्यक्ष यांचे सहीने, सोसायटी रजिस्टरवर मालकीहक्काची नोंद बदलायची असते. त्यासाठी सोसायटीच्या कार्यकारिणीचा ठराव, व त्यासोबत तुमच्या रजिस्ट्रार ऑफिस नोंदीच्या कॉपीज द्याव्या लागतात, कदाचित सोसायटी काही फी आकारू शकते.

त्यानंतर त्यांना(सेक्रेटरी/अध्यक्ष) सोबत घेऊन सिटीसर्वे ऑफिसात जावे लागेल. तिथली नोंद बदलली जाते. कोऑप सोसायटीत सोसायटीची मालक "सोसायटी" असते, अध्यक्ष तिचा प्रतिनिधी म्हणून ते मालक, व जमीनीच्या ७-१२वर इतर हक्कात तुमचे नांव लागते. तुम्हाला सदनिका प्रदान केली आहे अशी नोंद सोसायटीच्या दप्तरात असते.

@आ.रा.रा. +१०००

माहितीबद्दल धन्यवाद. मलाही तसेच वाटते. माझ्या बाबतही मी तो पर्याय पूर्वी निवडला होता.

@आ.रा.रा... पण तसे केल्यास सदनिकेच्या Index 2 वरचे वडिलांचे नाव तसेच राहते. नवीन Index 2 मिळत नाही. त्यामुळे, जरी आज भावंडांनी ह्क्कसोड पत्र दिले असले तरी भविष्यात भावंडांची मुले हक्क सांगू शकतात असे मला सांगण्यात आले आहे. पण हे खरे आहे का?

वडिल मयत झाले आहेत ना? मग त्यांचे नांव कमी होईल. त्यानंतर वारसांपैकी इतरांनी तुमच्यासाठी घरावरील हक्क सोडला आहे. आमचे आपसात वाटेहिस्से झाल्याने आम्ही हक्क सोडला, असे इतर भावंडांनी लिहिल्यावर त्यांच्या मुलांनी हक्क सांगण्याचा काही संबंध कसा काय येईल?

>> सरकारला काही ड्यूटी द्यावी लागत नाही, कारण खरेदी/विक्री व्यवहार केलेला नाही.

माझ्या माहितीनुसार हक्कसोड पत्र (release deed) करण्यासाठी हक्क सोडणाऱ्याच्या हिश्श्याच्या किमतीच्या ५% इतकी stamp duty भरावी लागते. अर्थात अलीकडे काही नियम बदलला असल्यास माहित नाही.

बहिन भावांची ना हरकत पत्र लागते. ते तुम्ही स्टॅम्प पेपर वर अथवा साध्या कागदावर जरी घेतले तरी चालते.

त्याचा फॉरमॅट वकिलांकडुन घ्यावा. आणि त्याला नोटरी करून घ्यावी.

आणि वडिलांचे डेथ सर्टीफिकेट जोडावे. आईचे पण बहुदा ना हरकत पत्र लागते.

हे सगळे तुम्ही नाव बदल च्या फॉर्म बरोबर जोडावे.

बहिन भाऊ पैकी कोणी वारले असल्यास त्यांच्या नवरा/बायको आणि मुलं यांच्याकडून "ना हरकत" पत्र घेण्यात यावे आणि त्यांचे सुध्दा डेथ सर्टिफिकेट जोडावे.

कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर तुम्ही नॉमिनेशन दिले आहे का ?

जर तुम्ही नॉमिनेशन दिले असेल तर त्यात ज्याचे नाव आहे त्याचा नावावर वडलाचे हक्क जातिल. हा १९९० सालचा कायदा आहे मागच्या २५ वर्षात बदल झाले असले तर माहित नाही.

Gift deed karayache asel tr stamp duty bharavi lagate ka?

Aamhalahi karayache aahe. Sasryachya ani navaryachya navavar flat aahe.

माझ्या माहितीनुसार हक्कसोड पत्र (release deed) करण्यासाठी हक्क सोडणाऱ्याच्या हिश्श्याच्या किमतीच्या ५% इतकी stamp duty भरावी लागते. अर्थात अलीकडे काही नियम बदलला असल्यास माहित नाही.
<<
हे बरोबर आहे, परंतू जर त्यांचा हिस्सा ऑलरेडी तिथे असेल, तरच. इथे भावंडांचा हिस्सा / नांव मिळकतीवर लागलेले नाही. धागाकर्ते, वडील व आई इतकीच नांवे मालक म्हणून नोंदलेली आहेत बहुतेक.

माझ्या आईच्यावेळी आम्ही घरासाठी रजिस्ट्रारकडे हक्क्सोडपत्र लिहून दिले आणि सिटीसर्वेमधे त्याप्रमाणे नोंद झाली.अर्थात ह्या प्रकाराला बराच कालावधी लागला.आईने नंतर वुईल केले असून त्यात तिला जे हवे ते म्हटले आहे.त्यामुळे पुढचा प्रश्न येत नाही.

>> जर त्यांचा हिस्सा ऑलरेडी तिथे असेल, तरच. इथे भावंडांचा हिस्सा / नांव मिळकतीवर लागलेले नाही. धागाकर्ते, वडील व आई इतकीच नांवे मालक म्हणून नोंदलेली आहेत बहुतेक.

ओके. केवळ माहितीकरिता म्हणून विचारत आहे... याचा अर्थ वारस म्हणून हक्कसोड पत्र करायचे असेल तर stamp duty भरावी लागणार नाही का? माझ्या माहिती नुसार वारस हे मृत व्यक्तीच्या सदनिकेमधील हिश्श्यात आपसूकच हिस्सेदार होतात (वारसा हक्काने). म्हणून थेट मालक नसले तरी वारस म्हणून जो हिस्सा येतो त्यावर stamp duty भरावी लागत असावी. पण कायद्यातील तरतूद मला नक्की माहित नाही म्हणून विचारत आहे.

माझ्या माहितीप्रमाणे, एक उदाहरण देतो. समजा, वडील गेल्यानंतर घरात सामोपचाराने वाटेहिस्से झाले, त्यात शेती भावाला मिळाली व घर दुसर्या भावाला. बहिणीला आईचे सर्व दागिने. यात दागिन्यावर हक्कसोड लिखापढ होत नाही. शेती गावी आहे, घर शहरात. घराची नोंद शहरात केली, तर तिथला रजिस्ट्रार फक्त इतकेच पाहणार, की बाकीच्यांच नांव आधी होते की नाही. शेतीवर हक्क सोडताना तलाठी/प्रांत तेच पाहणार.

वडिलांच्या निधनाला अनेक दिवस झालेले असले, तरीही हयात भावंडे/त्यांचे वारसदार, पूर्वीच आमचे हे ठरले होते, पण सरकारदरबारी नोंद करायचे राहून गेले असे म्हणू शकतात. अनेकदा सरकारी नोंदी करायच्या राहून जातात, वहिवाटेने व्यवहार होत राहतात.

माझ्या "लहान भावावरील प्रेमाखातर"ही मी वडिलार्जित मालमत्तेवरील हक्क सोडून देऊ शकतो. बक्षिसपत्र करताना सुद्दा अशीच काहीतरी वाक्यरचना स्टँपवर लिहिलेली असते.

इथे मिळकत यांच्या कमाईतून आलेली आहे. सदनिकेचे सर्व सरकारी कर, उदा, मालमत्ता कर, सोसायटीचा मेण्टेनन्स इ. यांच्याच खात्यातून खर्च होत आहे. सदनिकेत हेच राहत आहेत.

पझेशन इज ९० पॉईंट्स ऑफ लॉ. तेव्हा ते इन्डेक्स २ अन नंतर अमुक झालं तर...? इ. फक्त वकिलसाहेबांनी फीकरता घातलेला घोळ आहे असे म्हणायला वाव आहे.

@आ.रा.रा. आपल्या शेवटच्या प्रतिक्रियेमुळे माझा थोडा गोंधळ उडाला आहे. हो मिळकत माझ्या कमाईतून आली आहे हि गोष्ट खरी. पण सरकारी नियमानुसार बक्षिसपत्र किंवा हक्कसोडपत्र करायचे झाल्यास ठरविक टक्के स्टांप ड्युटी भरावीच लागते व ह्यास वकिलांचे पण सहमती आहे. पण मालमत्तेच्या हिश्श्याच्या एकूण किमतीच्या ठराविक टक्क्यांमध्ये हि रक्कम आहे त्यामुळे ती किरकोळ नाही.

याऐवजी भावंडानी स्टांप पेपरवर केवळ "मी वारस म्हणून हक्क सोडत आहे" अशा अर्थाचे लिहून नोटरी केल्यास ते कायद्याने ग्राह्य धरले जाऊ शकते असे आपणास म्हणायचे आहे का?

भावंडानी स्टांप पेपरवर केवळ "मी वारस म्हणून हक्क सोडत आहे" अशा अर्थाचे लिहून नोटरी केल्यास ते कायद्याने ग्राह्य धरले जाऊ शकते असे आपणास म्हणायचे आहे का?>>>>>>> त्याचे रजिस्ट्रेशन झाले पाहिजे.तसेच सिटीसर्व्हेकडे नोंद झाली पाहिजे.