वळण

Submitted by स्वप्ना_राज on 10 December, 2016 - 11:29

मृणालने घड्याळात पाहिलं. पावणेसहा वाजत आले होते. खरं तर शार्लोट लेकजवळच्या त्या बेंचवरून उठायची तिची अजिबात इच्छा नव्हती. जवळपास गेला एक तास ती इथे बसली होती. विकडे असल्याने पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती आणि असली असती तरी तिला फारसा फरक पडला नसता. ती आपल्याच जगात होती. मनातला सगळा गोंधळ निपटून काढायचा म्हणून तर ती माथेरानला आली होती ना. नेटवर रिसॉर्टची माहिती चेक करतानाच तो शार्लोट लेकच्या जवळ असल्याचं तिला कळलं होतं. दुपारचा चहा झाल्यावर रिसॉर्टच्या मागचा रस्ता धरून ती निघाली होती. अर्धा तास चालूनही लेक दिसेना तेव्हा थोडं धास्तावायला झालं होतं खरं पण धीर धरून पुढे चालत राहिल्यावर पाचच मिनिटांत चमकणारं पाणी दिसायला लागल्यावर तिच्या जीवात जीव आला होता.

तिने पुन्हा एकदा लेककडे नजर टाकली. त्याच्या पृष्ठभागावर हळुवार तरंग होते पण मृणालचं मन मात्र आता बर्यापैकी शांत झालं होतं. गेला एक आठवडा खूप मन:स्ताप झाला होता. मागच्या सोमवारची ती संध्याकाळ आठवली तरी डोळे अजून भरून येत होते. अविश्वास, दु:ख, निराशा, राग.......मनाने कसले कसले खेळ दाखवले होते. पण तिचा निश्चय झाला होता आणि तो तिने अवीला सांगूनही टाकला होता. तरी पण मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी 'काही चुकलंय का?' अशी टोचणी राहिली होती. मुंबईत राहून हा गुंता उकलला जाणार नाही हे लक्षात आल्यावर सरळ दोन दिवसांची रजा टाकून गाडी काढून ती माथेरानला निघून आली होती. एकटीच जातेय म्हणून आईने आधी तिला थांबवायचा प्रयत्न केला होता पण तिलाही कुठेतरी पटलं होतं की मृणालला एकटीने विचार करायची गरज आहे. मग दिवसातून चार वेळा फोन करायच्या बोलीवर तिने आईला पटवलं होतं.

आता मात्र उठायलाच हवं. अजून पाऊणेक तास संधीप्रकाश राहणार असला तरी अंधार पडायच्या आत रिसॉर्टवर पोचणं आवश्यक होतं. समोरच असलेल्या शंकराच्या देवळात कोणीतरी वाजवलेल्या घंटेचा आवाज आसमंतात घुमला आणि लेककडे एक शेवटचा दृष्टिक्षेप टाकून ती निघाली. पर्यटकांना घेऊन आलेले घोडेवाले जिथे उभे होते त्याच्या विरुद्ध दिशेने जाणारा रस्ता तिने पकडला. आता वाट पायाखालची होती त्यामुळे इथेतिथे पाहायची गरज नव्हती. मनाने पुन्हा विचारांची गाडी सुरु केली. कधी हे स्टेशन तर कधी ते.

'A penny for your thoughts'

त्या एकाकी वाटेवर अचानक पुरुषाचा आवाज ऐकल्यावर मृणाल ब्रेक लागल्यासारखी थांबली. तिने समोर पाहिलं. रस्त्याच्या वळणानंतर एक मोठं झाड होतं. त्याच्या बुंध्याला टेकून तो उभा होता. फिरंग होता हे उघड होतं. उच्चारांवरून इंग्लिश असणार हे तिच्या लक्षात आलं. साधारण सहा फुट उंची, गर्द निळेशार डोळे, दाट कुरळे केस, नाक थोडं नकट्यातच जमा. आजी म्हणायची तसं 'नाकाचं भज्जं'. तरी त्यामुळे त्याच्या चेहेऱ्याच्या देखणेपणात काही उणीव आलेली नव्हती. तिला गोंधळून थांबलेली बघून तो अनेक वर्षांची ओळख असावी तसं सहज हसला. दोन्ही गालांवर खळ्यांचे खोल भोवरे उमटले. 'खळ्या तर आपला विक पॉईंट' मृणालला त्याही क्षणी वाटून गेलं. अविच्या दोन्ही गालाला अश्याच खळ्या पडतात. त्या विचारासरशी पुन्हा डोळे भरून येतील की काय असं झालं आणि तिला ह्या आगंतुकाचा रागच आला.

पण त्याच्या हे लक्षात आलं नसावं. 'Madam, I'm Adam' तो म्हणाला आणि पुन्हा हसला. देवा रे! पुन्हा त्या जीवघेण्या खळ्या.

मृणालला हसू आलं. 'God! Does that line even work today? By the way,I am Mrunal'.

ह्या नावावर त्याची विकेट पडल्यासारखी दिसली तेव्हा तीच म्हणाली 'You can call me Mru'.

त्याने मान डोलावली. 'Mru, I like that. And what were you thinking about, if you don't mind me asking?'

अरे, शेजारच्या भोचक कुलकर्णीकाकूंची इंग्लिश आवृत्ती दिसते ही. हे लोक तर प्रायव्हसी जपणारे ना. का भारतात आल्यावर 'ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या' तशी गत झालेय ह्या अ‍ॅडम साहेबाची.

'So he left you? Is that it?'

त्याचं हे वाक्य ऐकून मात्र ह्याला एक सणसणीत ठेवून द्यावी असा विचार तिच्या मनात आला. ती मोठ्याने ओरडली असती तर मघाचे घोडेवाले नक्की धावून आले असते. ह्या वाटेवरून कोणीच का येत जात नव्हतं आज?

'I have left him and I have left him for good.' रागाने त्याच्याकडे पहात ती म्हणाली आणि एकदम तिला जाणवलं की त्याच्या स्वरात थट्टा, कुत्सितपणा, तुच्छता ह्यापैकी काहीएक नव्हतं. होती ती फक्त काळजी. आणखीही काहीतरी होतं जे तिला आत कुठेतरी जाणवलं पण कळलं नाही. ह्याला कुठेतरी पाहिलंय का आपण? हा कोणासारखा दिसतो? दुपारी बाजारातून येताना कुठल्या दुकानात होता का हा? नाही, तिथे तर सगळे भारतीय लोकच दिसले होते. मग ह्याचा चेहेरा कोणासारखा दिसतो? तिने आपण बघत असलेल्या सगळ्या इंग्लिश मालिका आठवून पाहिल्या. पण उत्तर 'नाही' असंच आलं. पण ह्याचा आवाजसुध्दा ओळखीचा वाटतोय. का? हे काय चाललंय? इथून निघालेलंच बरं. तिने पुढे चालायला सुरुवात केली.

'You wouldn't mind if I walk with you for a while, would you?'

'Not at all.'

आपण हे असं का बोललो हे मृणालला कळत नव्हतं. 'Please leave me alone' असं म्हणायचं होतं तिला खरंतर. ते चालत राहिले. काही मिनिटं शांततेत गेली.

'I left him for good. I loved him more than life but he wasn't.....' ती न रहावून म्हणाली. का सांगत होती ती त्याला हे सगळं? तो अनोळखी होता म्हणून?

'Faithful?'

तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. ह्याला कसं कळलं? मनकवडा आहे का हा? का कोणीही आपल्याला असं सहज वाचू शकतो? Am I that transparent?

'That sounds so twentieth century when you put it like that. But yes, that's what happened' खूप प्रयत्न करूनही तिला हुंदका दाबता नाही आला.

'I am sorry' तो हळुवार आवाजात म्हणाला. का कोणास ठाऊक पण मृणालला असं वाटलं की आता ह्या वाटेवर आणखी कोणी येऊ नये. तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिलं. तो चालताना तिच्याकडे बघत होता. त्याचे डोळे भरून आल्याचा भास झाला तिला. पण त्याने लगेच आपला चेहेरा वळवला. तिच्या हृदयाचा एक ठोका चुकलाच.

'You know what, Adam? There is no such thing as love. It's an idea created by authors and poets. It's a myth. It's a mirage. You think it is there and you keep running to get it. But it all ends badly. There's only heartbreak and tears and grief and loneliness. No sir, I am done with love.'

अचानक तिच्या लक्षात आलं की अ‍ॅडम शेजारी नाहिये. तिने वळून पाहिलं. तो चालायचा थांबला होता. तीही थांबली.

'What if love isn't done with you? There is such a thing as love, believe me. And it is the most beautiful thing in this world. Sure, there is heartbreak, there are tears, but there is togetherness, there is caring, there is laughter...... and there is wait. But it's all worth it in the end. It's all worth it for just another glimpse. Another chance to speak. Another moment with your beloved when you think that you cannot wait any longer. Believe me, I know'.

आपले भरून आलेले डोळे लपवले नाहीत ह्या वेळेला त्याने. हा का रडतोय? आणि ह्या एकाकी रस्त्यावर सभोवती अंधार दाटून येत असताना ओळखीचं हसणाऱ्या ह्या अनोळखी तरुणाच्या डोळ्यांत पाणी आलेलं बघून आपल्या आत का तुटतंय? मृणालला काही कळेनासं झालं होतं. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती काही बोलणार एव्हढ्यात तोच पुन्हा म्हणाला 'Believe me, I know......

'ताई, ह्या बेकार रस्त्याने कशाला आलात सांजच्या वेळेला?' मृणालने दचकून वळून पाहिलं. धोतर नेसलेला एक माणूस समोरून येत होता.
'बेकार? म्हणजे काय?'
'ताई, आता काय सांगू? तुम्ही शहरातले लोक विश्वास नाही ठेवणार. भूतं दिसतात इथे. अंधार पडायच्या वेळेला बाईमाणसाने येऊ नये ह्या रस्त्याने एकट्याने.'

एकट्याने? झटका बसल्यासारखी मृणाल पुन्हा वळली. मागे कोणीच नव्हतं. गेला कुठे हा अ‍ॅडम? ती आधी गोंधळली. आणि मग क्षणभर आपल्या पायातली शक्तीच गेलेय असं वाटलं तिला. तो आता आपल्याला ह्या जन्मी कधीच दिसणार नाही, उद्या अगदी ह्याच वेळेला इथे आलो तरी दिसणार नाही, त्याला किती जीव तोडून बोलावलं तरी येणार नाही हे लक्षात आलं तिच्या. तो शेवटी जिथे उभा होता तिथे नजर खिळवून हुंदका बाहेर पडू नये म्हणून तिने आपला हात तोंडावर गच्च दाबून धरला. हृदय फाटून जाईल एव्हढं दु:ख आपल्याला देऊन त्याने काय मिळवलं?

नाही. हा धोतरवाला बोलायच्या आधी अ‍ॅडम काहीतरी म्हणाला होता. काय म्हणाला होता? जीवन-मृत्यूचा प्रश्न असल्यासारखं मृणाल आठवायचा प्रयत्न करायला लागली. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू घेऊन शेवटी काय म्हणाला होता तो? मला आठवलं पाहिजे, आठवलंच पाहिजे. नाहीतर मला पुन्हा श्वास नाही घेता येणार. पुन्हापुन्हा डोळे भरून येत असतानाही मृणाल आठवायचा प्रयत्न करायला लागली.

जेव्हा आठवलं तेव्हा मात्र तिची तगमग थांबली. आता रडायचं काही कारणच नव्हतं. तो म्हणाला होता.....

"Believe me, I know......Love always finds its way about. And I will always love you Chanda."
--------------------------------------------

वि.सू. - कथा आवडली नसल्यास प्रतिसादात बिनदिक्कत लिहा. फक्त अनुकूल प्रतिक्रियाच अपेक्षित नाहीत. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोक्स! नुकतेच माथेरानला जाऊन आलो तेव्हा रिसॉर्टच्या मागच्या रस्त्यावरून शार्लोट लेकला गेलो होतो. तिथून संध्याकाळी परतताना थोडा उशीर झाला. अगदी थोडा संधीप्रकाश उरला होता. पाऊण वाट चालून आलो आणि समोरून येणार्या एका माणसाने 'ह्या रस्त्याने ह्या वेळेला का आलात? हा रस्ता बेकार आहे.' असं म्ह्टलं. का म्हणून विचारलं तर म्हणाला इथे भुतांचा वावर आहे. त्यावरून ही गोष्ट सुचली.

प्राजक्ता_शिरीन, स्पष्टीकरण पुढे देत आहे.

मस्त जमलीये.

फक्त मृणालची तगमग का थांबली ते नाही स्पष्ट झालय. अवी दूर गेलाच होता आता अ‍ॅडमही अनरिचेबल झाला ना? (मी जो अर्थ लावला त्यावरून - तो मुक्त जगात आणि ही अमुक्त जगात). बरं अवी down the line भेटेल म्हणावे तर ते प्रेम खरे नाही कारण त्यात विश्वासघात आहे आणि त्यामुळे तिला अवी नकोच आहे.

दिनेशदा, राया, माधव धन्यवाद Happy

माधव, अ‍ॅडम हा मृणालच्या अनेक वर्षांपूर्वीच्या जन्मीचा (ज्यात तिचं नाव चंदा होतं) प्रियकर आहे. त्या जन्मी काही कारणाने ताटातुट झाल्याने त्याचा आत्मा तिची अजून वाट पहात होता. तिचं आताचं रुप वेगळं असलं तरी त्याने तिला ओळखलं. तिला भेटल्यामुळे त्याला त्या अवस्थेतून मुक्ती मिळाली. तिला त्याची ओळख खूप उशीरा पटते. जेव्हा पटते तेव्हा तिला तो कोण आहे हे लक्षात येऊन खूप दु:ख होतं. पण त्याच्या शेवटच्या वाक्यावरून तो पुन्हा कुठल्यातरी जन्मी परत भेटणारच हे तिच्या लक्षात येतं म्हणून तिची तगमग थांबते. अशी कल्पना होती. बहुधा बर्‍यापैकी फसली Happy

ओह! ह्या पोस्टनंतर अधिक चांगली कळली कथा! मस्त कल्पना आहे (पण माझी मला नव्हती उमगली!) Happy चंदा ऐवजी इव्ह (some cliché couple names) असती तर संदर्भ पटकन लागला असता कदाचित (just a thought)..

बहुधा बर्‍यापैकी फसली स्मित >>
नाही स्वप्ना.,. कळतेय कथा. मस्त लिहितेस तू. लिहीत रहा.
चंदा नावपण योग्य आहे. ब्रिटिशकालीन भारतातलं Happy

बहुधा बर्‍यापैकी फसली >>> फसली अजीबात नाहीये. तू सांगितलेला अर्थच मला समजला होता. फक्त मला म्हणायचे होते की अ‍ॅडम आत्तापर्यंत अडकून पडला होता म्हणून मॄणालला दिसला. पण आता तो मुक्त झालाय मग कसा भेटणार तिला कोणत्याही जन्मी ?

मला पण समजली नव्हती. प्राजक्ता_शिरीन यांची विपु पाहिली तेव्हा समजली. छान आहे गोष्ट. समजल्यावर खूप आवडली Happy

>>फक्त मला म्हणायचे होते की अ‍ॅडम आत्तापर्यंत अडकून पडला होता म्हणून मॄणालला दिसला. पण आता तो मुक्त झालाय मग कसा भेटणार तिला कोणत्याही जन्मी ?

माधव, हे माझ्याही लक्षात आलं होतं. ख्रिश्चॅनिटी मध्ये पुनर्जन्म हा प्रकार नसतो. आणि हिंदू धर्मात पुनर्जन्म असला तरी आपण भूतयोनीत एकदा गेलेली व्यक्ती त्यातून पुन्हा बाहेर येऊ शकत नाही असंच मानतो. अर्थात खरं काय आहे ते आपल्या कोणालाच माहित नाही म्हणा. पण माझी कल्पना अशी होती की अ‍ॅडमची चंदाला भेटायची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे त्याचा आत्मा तिची वाट पहात होता. ती भेटल्यावर तो त्यातून मुक्त झाला पण मुक्त म्हणजे अगदी निर्वाणाप्रत गेला नाही तर पुढला जन्म घ्यायला मुक्त झाला. म्हणून तो तिला पुढे कधी तरी भेटेल.

थोडी चायनीज भेळ झालेय कळतंय मला. पण हिरो हिरॉईनला कधीच भेटणार नाही ये आपुनको मंजूर नही Happy

>>चंदा ऐवजी इव्ह (some cliché couple names) असती तर संदर्भ पटकन लागला असता कदाचित

खरंय. पण तुम्ही म्हणताय तसा cliché झाला असता.:-)

>>चंदा नावपण योग्य आहे. ब्रिटिशकालीन भारतातलं

अगदी अगदी. ब्रिटिशकालीन भारतातलं नाव म्हणून चंदाच आठवलं Happy