एका ब्रॅण्डची हानी - कहानी २ (Movie Review - Kahaani 2)

Submitted by रसप on 3 December, 2016 - 05:22

~ ~ एका ब्रॅण्डची हानी - कहानी २ (Movie Review - Kahaani 2) ~ ~

सुजॉय घोषचा 'कहानी' आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट थरारक भारतीय सिनेमांपैकी एक असावा. त्याच्या नुसत्या आठवणींनीही रोमांच उठतात. त्यात विद्याने साकारलेली विद्या बागची असो की नवाझुद्दिन सिद्दीकीचा सीबीआय अधिकारी खान असो की परमब्रत चटर्जीचा 'सात्योकी', चार वर्षांनंतरसुद्धा अगदी आत्ताच पाहिल्यासारखे वाटावेत इतके प्रभावी होते. 'कहानी'त दाखवलेलं कोलकाता शहरही अगदी जसंच्या तसं आत्ताही डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या सिनेमातली प्रत्येक गोष्ट अगदी हवी तशी जुळून आलेली होती.
ह्या सगळ्यामुळे 'कहानी' हा एक ब्रॅण्ड बनला, एक 'बेंचमार्क' ठरला आहे. हे 'ब्रॅण्ड नेम' वापरून काही नवीन बनवायचं तर रिस्क ही आहे की तो 'बेंचमार्क'ही विसरला जाणार नाहीय. सुजॉय घोषसारखी व्यक्ती हा विचार करणार नाही, असं वाटत नाही. But, you never know ! सोन्याचं अंड देणारी कोंबडी सुज्ञ मनुष्याला सारासार विचार करण्यापासून परावृत्त करते, ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. 'कहानी २' चा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा की त्याचा 'कहानी १' शी काही एक संबंध नाही ! एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता. पण तरीही घोष साहेबांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या मनुष्याचाच कित्ता गिरवला आणि कोंबडीचा हकनाक बळी गेला !
वाईट वाटलं ?
मला तरी वाटलं. कारण मनाच्या अगदी जवळ असलेल्या काही सिनेमांपैकी एक 'कहानी' आहे. ह्या तथाकथित 'सीक्वल'ची मी आतुरपणे वाट पाहिली होती. पण महागड्या हॉटेलच्या मेन्यू कार्डवर एखाद्या डिशचं अलंकृत शब्दांनी अत्यंत रोचक वर्णन असावं आणि म्हणून ती मागवावी तर ते पिठलं असावं आणि तेही बिना-मिरचीचं, असं काहीसं झालं.

डायरी वाचून उलगडणाऱ्या सिनेमाची ह्यापूर्वीची आठवण भयानक होती, मात्र इथे 'सुजॉय घोष' आणि 'कहानी' ब्रॅण्ड असल्याने ट्रेलरमध्ये डायरी असूनही मला तिकीट काढताना कुठलाही किंतु-परंतु वाटला नाही. सिनेमा सुरु होतो पश्चिम बंगालमधील चंदननगर ह्या छोट्या शहरात. विद्या सिन्हा (विद्या बालन) आणि तिची अपंग मुलगी मिनी (तुनिशा शर्मा) एक मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहेत. मिनीच्या वैद्यकीय उपचाराकरिता अमेरिकेस जाण्यासाठी विद्या तयारी करते आहे. मात्र अश्यातच राहत्या घरातून मिनीचं अपहरण होतं आणि तिच्या सुटका करवण्यासाठी जाताना विद्याचा अपघात होतो. एक नेहमीची 'हिट अ‍ॅण्ड रन केस' समजून इंदरजित सिंग (अर्जुन रामपाल) औपचारिकता पूर्ण करत असताना वेगळीच कहाणी उलगडते आणि विद्या, मिनी व इंदरजितचा भूतकाळ समोर येतो.
इथे सगळ्यात मोठा अपेक्षाभंग होतो तो हा की आपण एखादा सस्पेन्स ड्रामा अपेक्षित करून पाहायला आलो असतो आणि तसं काहीही न होता केवळ एका पेचातून सुटका कशी होईल, हाच एक सस्पेन्स विरहित ड्रामा घडतो. पात्रांचं सुरेख डिटेलिंग, एखाद्या प्रमुख वाटणाऱ्या पात्राची धक्कादायक एक्झिट (सास्वत चटर्जीने साकारलेला कॉण्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वास), अकल्पित क्ल्यू (हॉटेलातल्या लहान मुलाच्या शाळेच्या युनिफॉर्मवरील नाव) असं बरंच काही 'कहानी'त होतं. किंबहुना, थरारपटात हे असलंच पाहिजे. ह्यातलं काहीही नसून अनावश्यक जुळवाजुळव, ठिगळं जोडल्यासारखे योगायोग आणि उपरी पात्रं मिळमिळीतपणा आणतात. इंदरजित सिंग आणि विद्या सिन्हाची पूर्वीची काही ओळख, नातं वगैरे असण्याची काही एक आवश्यकता नसताना कथानकात ते बळंच घुसडलं आहे. ह्याचा परिणाम असा झाला आहे की पुढे काय घडणार आहे, खरं काय घडलेलं असणार आहे, अश्या सगळ्याचाच अंदाज आधीपासूनच येतो आणि 'सरप्राईज एलिमेंट' नामक फुग्याला बेमालूमपणे टाचणी लागते.

विद्या बालन आवडली नाही, असं आजपर्यंत तरी झालेलं नाही. अगदी टुकार 'हमारी अधुरी कहानी'मध्येही तिचं पात्र कितीही बंडल असलं तरी तिने काम चांगलंच केलं होतं. ती मुळातच एक 'नो नॉनसेन्स प्रोडक्ट' आहे. त्यामुळे तिला पाहत असताना कितीही ठिसूळ असलं, तरी 'विद्या सिन्हा'चं पात्रही पटत राहतं. विद्या सिन्हाचं एकटेपण, मुलीसाठीची तिची ममता, परिस्थितीपुढे असलेली असहाय्यता ती खूप सहजपणे साकार करते.
अर्जुन रामपालने एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून फक्त फिट्ट दिसण्याव्यतिरिक्त बाकी काही विशेष केलेलं नाही. त्याला स्कोप अगदीच नव्हता, असं काही नाही. बऱ्यापैकी होता, पण 'एफर्ट' जाणवला नाही.
नकारात्मक भूमिकेत जुगल हंसराज शोभला आहे. पण त्याला तर खूपच कमी काम आहे. त्याच्या भूमिकेची लांबी जराशी अजून असायला हवी होती, असंही वाटलं. त्याचे लुक्स नाकारात्मक भूमिकांसाठीच सुयोग्य आहेत, ही बाब इतरांना खूप आधीच कळली होती. त्याने हे स्वीकारायला खूप उशीर लावला. वेळीच स्वीकारलं असतं, तर कदाचित काही महत्वाच्या भूमिका त्याने स्वत:च्या नावावर करून घेतल्या असत्या. असो. देर आये, दुरुस्त आये !
सहाय्यक भूमिकांत विशेष उल्लेखनीय मानिनी चढ्ढा आहे. इंदरजितच्या बायकोची महत्वशून्य भूमिका साकारताना थोड्या वेळातही तिने बऱ्यापैकी कंटाळा आणला आहे. तिची बोलण्याची ढब विचित्र आहे, इतकी विचित्र की दुर्लक्ष करता येत नाही.
संवाद, छायाचित्रण, संगीत. तिन्हीतही प्रकर्षाने खटकावं असंही काही नाही आणि लक्षात ठेवावं असंही काही नाही.
समजले ना ती कधी येऊन गेली
पाहण्यातच वाट इतका दंगलो मी
अश्या बेमालूमपणे सगळं घडून जातं आणि सिनेमा संपल्यावर लक्षात येतं की काहीच लक्षात राहिलेलं नाहीय !

kahaani-2-et00041745-04-10-2016-05-19-22.jpg

कदाचित 'कहानी' ह्या 'ब्रॅण्ड' अंतर्गत काही स्त्री-प्रधान सिनेमे करायचा घोष आणि कंपनीचा विचार असावा म्हणून ते वापरलं असावं. अन्यथा लेखामध्ये आधीच म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता आणि खरं तर, तसंच असायला हवं होतं. ह्या सिनेमापासून 'कहानी' आणि 'सुजॉय घोष' ही दोन नावं जर वेगळी केली, तर तो नक्कीच सामान्य आणि असामान्य ह्या दोन्हींच्या मधला म्हणता आला असता. एकदाही असं अजिबात वाटत नाही की, 'आवरा आता !' मात्र जी काही रहस्यमयता आहे ती बाळबोध वाटते, धक्कातंत्र फसलेलं असल्यामुळे थरारातली हवाही निघून जाते.

जर सिनेमा वाईट नाही तर मग इतकी नाराजी का बरं ?
अरे ! तुम्ही जर मटन बिर्यानी सांगून कौआ बिर्यानी (कुछ याद आया ?) खायला देणार असाल, तर आम्हीसुद्धा ढेकर न देता काव-कावच करणार ना ?

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/12/movie-review-kahaani-2.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाट बघत होतो तूमच्या लेखाची. अपेक्षाभंग झाल्याचेच अनेकांनी लिहिले आहे. तरीही विद्यासाठी बघेनच... पण कहानी मधे सिक्वेल चं काहि मटेरियल तरी कुठे होतं ?

{{{ डायरी वाचून उलगडणाऱ्या सिनेमाची ह्यापूर्वीची आठवण भयानक होती }}}

हे गजिनी विषयी लिहिलंय का?

{{{ तुम्ही जर मटन बिर्यानी सांगून कौआ बिर्यानी (कुछ याद आया ?) खायला देणार असाल }}}

मायबोलीवर ऋन्मेष प्रभाव इतका वाढलाय का की त्याने रसप यांच्या मूव्हीरिव्ह्यूवरही आपलं सावट सोडावं?

म्हणजे त्याचा "यू कॅन लव हिम यू कॅन हेट हिम बट कान्ट इग्नोअर हिम" हा सिद्धान्त खरा ठरतोय की काय?

>> पण कहानी मधे सिक्वेल चं काहि मटेरियल तरी कुठे होतं ? <<

एक्झॅक्टली !

>> तरीही विद्यासाठी बघेनच <<

वर्थ इट !

>> {{{ डायरी वाचून उलगडणाऱ्या सिनेमाची ह्यापूर्वीची आठवण भयानक होती }}}

हे गजिनी विषयी लिहिलंय का? <<

नाही. 'जब तक हैं जान' विषयी. आता हायपरलिंकलंय.

>> {{{ तुम्ही जर मटन बिर्यानी सांगून कौआ बिर्यानी (कुछ याद आया ?) खायला देणार असाल }}}

मायबोलीवर ऋन्मेष प्रभाव इतका वाढलाय का की त्याने रसप यांच्या मूव्हीरिव्ह्यूवरही आपलं सावट सोडावं? <<

नथिंग अबाउट शारक्या. ह्याचा रेफरन्स 'रन' ह्या सुमारपटातील 'विजय राज'च्या पात्राशी आहे. त्या पात्राला एक कल्ट फॉलोईंग आहे ! Happy

मूळ कहाणी चांगला होता. मला आवडलेला. पण अगदी ईतकाही भारी वाटलेला नव्हता की त्याचा सिक्वेल येताच त्याबद्दल उत्सुकता वाटेल, तरी ट्रेलर आवर्जून पाहिलेला आणि तो काही खास न वाटल्याने पिक्चर बघायची अर्धी इच्छा तिथेच नाहीशी झालेली. उरलेली आपण केलीत Happy

@ कव्वा बिर्याणी, ह्याचा रेफरन्स 'रन' ह्या सुमारपटातील 'विजय राज'च्या पात्राशी आहे.>>> हो त्यातलेच आहे ते. मध्यंतरी मी एका धाग्यात, प्रतिसादात बाहेर चिकन मटणमध्ये कसे गंडवले जाते याबाबत उदाहरण देताना एका उदाहरणात कव्वा बिर्याणीचा सुद्धा उल्लेख केलेला त्यामुळे बिपीनचंद्रना तसे वाटले असावे Happy

अजिबातच पटला नाही रिव्ह्यू. हा सिक्वेल आहे असं काही नाही. यापूर्वी राज,१९२०, गोलमालाअसे मागच्या भागाशी संबंध नसलेले मूव्हीज येऊन गेले आहेत. पहिल्या भागात नायिकेने घेतलेला शोध हा हायपॉइंट होता. त्याला नायिकेची नेमकी ओळख आणि तिचा पास्ट असे गूढ पदर होते. हेच सूत्र इथेही आहे. या वेळी गूढाची उकल हा हायपॉइंट नसून एक महत्वाची समस्या त्या जागी आहे. नायिकेच्या बालपणात तिचा उल्लेख होतो. तिची ती तडफड संवेदनशील प्रेक्षकांना अपील होते. तिचं वागणं पटत जातं. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत रहस्य ताणून धरण्याचा मोह टाळलेला आहे हे स्पष्ट आहे. त्यासाठी मनातल्या मनात लेखक दिग्दर्शकांना १०० गुण देऊन टाकले. विद्या बालन ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या भूमिकेसाठी तिने अजिबात मेकअप केलेला नाही. उलट गबाळी राहणी आहे. त्यामुळे ती विद्या बालन न वाटता दुर्गा आणि विद्या सिन्हा वाटते.

कॅमेरा पुन्हा एकदा दाद घेऊन जातो. कोलकाता असो किंवा चंदनपूर, छायाचित्रण कहाणीच पात्र बनून जाते.

रहस्य आपल्याला लवकर कळतं, तरीपण उत्कंठां कायम राहते. रहस्य म्हणजे हेरकथा, रॉ, आयएसआय, कटकारस्थान असेच काही नाही. या समजाला होम्स कथा आणि बक्षीकथांनी छेद दिलेला आहे. पाहण्यासारखा आहे सिनेमा..

मुळात रिव्हयू म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. हा रिव्हयू नसून पहिल्या भागाशी तुलना करून यमक जुळवत गळे काढण्याचा हा प्रकार म्हणजे रिव्हयूच्या नावाने वाचकांवर केलेला अत्याचार आहे असे वाटते.

रसप,

मी "जब तक है जान" आणि "रन" पाहिला नसल्यामुळे (पण दुर्दैवाने ऋन्मेषचा जिनियस च्या धाग्यावरील प्रतिसाद वाचला असल्याने) माझे दोन्ही अंदाज चूकलेत.

असो. तुमच्या रिव्यू लिहिण्याच्या व्यवसाय / छंदामुळे कुठकुठले चित्रपट बघणं तुमच्या नशिबात आहे हे वाचून वाईट वाटलं.

सपना हरिनामे,

{{{ विद्या बालन ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या भूमिकेसाठी तिने अजिबात मेकअप केलेला नाही. उलट गबाळी राहणी आहे. }}}

मेकअप न केलेला चेहरा दिसावा याकरिता तिला चेहर्‍यावर जो मेकअप करावा लागायचा त्यात तब्बल तीन तास वेळ जायचा असे वाचनात आले आहे.

चूक काढायची ठरवले तर (सध्या जय मल्हार आणि जय गणेश मालिका बघून) देवाच्या देवत्वातसुद्धा काढता येऊ शकेल.
माझे दोन तास मस्त गेले. नंतर याहू रिव्ह्यूमध्ये त्यांनी शंका उपस्थित केली खलनायक ७ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात का परत आला... पहिल्यांदा वाटले "अरे हो!!" पण मग वाटले का नाही? सैराटमध्ये प्रिन्स नाही का ५-६ वर्षांनी आला? स्वत:च्या अहं ला कुणीतरी आव्हान दिलेले पचले नसावे.

ह्याला मी सस्पेन्स नाही म्हणणार. थ्रिलर म्हणता येऊ शकेल. ज्या कुठल्या पठडीत टाकायचा असो, पण पैसा वसूल आहे. मला पण काही गोष्टी गोष्टीत तश्या काहीही भर न टाकण्याऱ्या होत्या असे वाटले. पण म्हणून उगाच चित्रपटाची लांबी का बुआ वाढवली अशा स्वरूपाच्या काही नव्हत्या.

कहानी म्हणजे गोष्ट. ही एक तशीच गोष्ट. subtitle म्हणून "दुर्गा रानी सिंग" होते, पण खरतर त्या नावालापण काही अर्थ नाही. ह्या गोष्टीला काय नाव देता आले असते कोण जाणे? आणि द्यायलाच पाहिजे का?

एक विद्वान मेक अप बद्दल वाचन करून प्रतिसाद लिहीत आहेत. (माझा प्रतिसाद अर्थातच रिव्ह्यू बद्दल आहे, त्यांना आवडलेला दिसत नाही ). मी आपली साधी सुधी गृहिणी आहे. मेक अप नसलेला चेहरा दाखवायला ३ तास मेक अप करावा लागत असेल ही माहितीच नवीन आहे मला. काही का असेना त्या मेहनतीला दाद नको का द्यायला ?

त्या विद्वान गृहस्थांनी काय वाचलं ठाऊक नाही, पण माझ्या अल्पबुद्धीला जे काही समजलं त्यावरून या सिनेमात विद्या जखमी झाल्याने चेह-यावरचे घाव, डोळ्याला आलेली सूज (या अवतारात ती बराच काळ आहे) या मेक अप साठी वेळ लागू शकतो... अर्थात, मी तर फक्त सिनेमा पाहूनच लिहीतेय. असं चौफेर आणि दांडगं वाचन नाही हो माझं !

मूव्ही पाहिला. अजिबात खुर्च्रिला खिळ्वुन ठेवत नाहि. सलगता नाहिच आहे मूव्ही मधे. बाहेर पडल्यावर अजिबात डोक्यात रहत नाहि.

इंदरजित सिंग आणि विद्या सिन्हाची पूर्वीची काही ओळख, नातं वगैरे असण्याची काही एक आवश्यकता नसताना कथानकात ते बळंच घुसडलं आहे.>>> १++
हे समजले आणि शेवटचा अदांज आला आणि मूव्ही बघितला गेला.

*** star माझ्याकडुन.

कालच बघीतला. माझ्यासारख्या सामान्य बुद्धीला तरी आवडला. मध्यंतरापर्यंतच्या घडामोडींनी डोक्याला मुंग्या आल्या. विद्या बालन ने मस्त काम केले आहे. अर्जुन रामपालचे काम पण चांगले झाले आहे. एकदा पहायला काहीच हरकत नाही. कहानीशी संबंध नसला ब्रँडची पर्वा न करणारा एक स्वतंत्र चित्रपट म्हणुन आवडला.

इंदरजित सिंग आणि विद्या सिन्हाची पूर्वीची काही ओळख, नातं वगैरे असण्याची काही एक आवश्यकता नसताना कथानकात ते बळंच घुसडलं आहे>> या करता +१

आवडला. कहानी अर्थातच जास्त छान होता पण हाही आवडला.

सपना हरिनामे + १११

मेक अप नसलेला चेहरा दाखवायला ३ तास मेक अप करावा लागत असेल >>> असे मी पण वाचले आहे

इंदरजित सिंग आणि विद्या सिन्हाची पूर्वीची काही ओळख, नातं वगैरे असण्याची काही एक आवश्यकता नसताना कथानकात ते बळंच घुसडलं आहे - ते नात असत आणि त्या वेळेला तिच्या भूतकाळाची माहिती नसल्यामुळे ते दोघ वेगळे होतात. डायरी वाचल्यावर त्याला ते सर्व कळते. त्यामुळे त्याला अपराधी वाटते न्हानुव\च तो तिला मदत करतो. अस मला तरी वाटले.
मलाही ठीक वाटला.

स्पॉयलर
(आता ४-५ दिवस होऊन गेले असल्याने सांगायला हरकत नसावी.)
--------------------------

@मृणाल१,

तिचं निर्दोषत्व आणि एका निष्पाप जीवाचं आयुष्य पणाला लागलेलं असणं, हा दोन जाणीवा इंदरजित जे काही करतो, ते करवण्यासाठी पुरेश्या आहेत. ते तसं दाखवलं असतं, तर प्रेडिक्टेबलिटी खूप कमी झाली असती. त्यासाठी तो तिचा पूर्वीचा नवरा वगैरे असल्याचं दाखवणं फिल्मी आहे. ती कॅलिम्पाँग सोडून चंदननगरला येते काय, हा कोलकात्यातून चंदननगरलाच बदली होऊन येतो काय, हिची अ‍ॅक्सिडंट केस ह्याच्याचकडे येते काय.. असे सगळे योगायोग खूप ठिसूळपणा आणतात. सगळं इतकं प्रेडिक्टेबल होतं की तिला पिस्तुल कुणी दिली, ह्याला फोन कुणाचा आला, ती मागच्या दरवाज्याने पळाली असेल, हे सगळं दाखवण्याच्या आधीच समजत होतं. अगदी म्हणजे अगदीच बाळबोधपणा झाला सगळा. Sad

चित्रपट आवडला असे कळवणारे प्रतिसादक हे लेखकाचे किंवा त्यांच्या कंपूतील ड्युआयडी नाहीत हे खात्रीने म्हणता येईल.

विद्यासाठी पहाणार.
रसप, बहुतेक कहानी१ चा पुढचा भाग म्हणुन न पहाता 'अजुन एक दुसरी कहानी' या नजरेने सिनेमाकडे पहावे लागेल.

पण रामपालला उगीच घेतले. बिचार्‍याच्या चेहर्‍यावरची माशीपण हलत नाही.

{{{ पण रामपालला उगीच घेतले. बिचार्‍याच्या चेहर्‍यावरची माशीपण हलत नाही. }}}

चूक. मुळात असल्या चेहर्‍यावर माशी बसतदेखील नाही (सौ. शिरीष कणेकर)

अतिशय फसलेला मूवी वाटला.

स्टोरी तर एकदमच नेहमीच्या योगायोगने भरलेली.

अर्जुन रामफळ( आम्ही असेच म्हणतो) चुकीची निवड.
त्याची बायको म्हणून दाखवलेले पात्र इतकं भयानक... अरेरे.

बाकी उगाच्च्च ते चाईल्ड अभ्युज ठिगळ जोडलेले मुल पळपळवी जस्टीफाय करायला.....

आधीचा कहाणी मस्त होता.... मी परत पाहिन पण हा नो वे.

अतिशय फसलेला मूवी वाटला. >> अतिशय सहमत.
कशाला बघितला असे वाटले.
रसपचे परीक्षण अगदी पटले.
एकूणच चित्रपटाच्या नावापुढे २, ३ असे आकडे असलेले चित्रपट मला आवडत नाहीत. केवळ बालनसाठी पाहिला व निराशा झाली.
चला, थेटरात नाही गेलो ते किती बरे झाले!

Pages