परीकथा - भाग तेरा - फेसबूक स्टेटस २.७ - २.८ वर्षे

Submitted by तुमचा अभिषेक on 19 November, 2016 - 06:26

११ ऑक्टोबर २०१६

"पप्पा तू ईथे झोप, उठू नकोस", काल रात्री जेवल्यावर तिने मला सोफ्यावर आडवे केले. मग आतल्या खोलीतून मोबाईलचा चार्जर घेऊन आली. स्वत:च्या गळ्याभोवती लटकावला. माझी बनियान वर सरकवली. आणि त्या चार्जरच्या वायरचे टोक माझ्या उघड्या पोटावर टेकवून म्हणाली, "मी तुला तापवते"

मी हडबडलो.. तापवते !! चार्जरने??

पण तिच्या गळ्यात लटकावलेल्या चार्जर कम स्टेथोस्कोपवरून काय ते समजलो..
मी तुला तपासते Happy

मग मला बाऊ झालाय हे डिक्लेअर करून रीतसर औषध दिले गेले. पण सोबत आईसक्रीम सुद्धा दिले. हे कशाला विचारले, तर उत्तर आले, याने तुझा बाऊ बरा होऊन तू मोठा होशील.
आज मला समजले प्रत्येक लहान मुलाला मोठेपणी डॉक्टर व्हावे असे का वाटते. बहुधा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला सारखे असावा आईसक्रीम देणारा डॉक्टर अशी तिची फॅन्टसी असावी Happy

.
.

१५ ऑक्टोबर २०१६

तिला घेऊन सकाळी आपण कुठेतरी फिरायला जातो. तिथे ती कसलासा हट्ट करते. तिची समजूत काढायला आपण बोलतो, घरी गेल्यावर तुला चॉकलेट देईन..
मग दोन चार तास भटकंती करत संध्याकाळी आपण घरी परततो. आता जेवायला काय करायचे, कपड्यांना ईस्त्री करायची आहे, मोबाईलचे बिल भरायचे आहे, वगैरे आपल्याच क्षुल्लक चिंतांमध्ये आपण गुंतलो असतो. पण ती मात्र दरवाजाचे लॉक उघडत घरात पहिले पाऊल ठेवताच किंचाळते,
आताss चॉकलेटsss ...

आणि हे असे नेहमीच होते. आता काहीतरी प्रॉमिस करत वेळ मारून नेऊ, मग ती विसरेन हा पर्याय आमच्याकडे नसतो. एकदा एखादी गोष्ट तिच्या डोक्यात टाकली की ती योग्य वेळी अलार्म वाजल्यासारखी बाहेर येते.
पण याचा बरेचदा फायदाही होतो.

त्या दिवशी आजोबा तिला घेऊन नेहमीसारखे फिरायला गेले. अर्ध्या रस्त्यावरून त्यांना आठवले आपण मोबाईल घरीच विसरलो. पुन्हा मागे फिरावे लागले. म्हणून परीला सहजच गंमतीत म्हटले, काय परी तू मला फोन घ्यायची आठवण करून दिली नाहीस.
पुढच्या दिवशी पुन्हा आजोबा आणि नात फिरायला बाहेर पडले. लिफ्टमध्ये शिरताच, "अरे फोन घेतलास का?"
आजोबांना पटकन काही समजले नाही.
"अरे तू मला काल बोल्लेला ना, फोन घ्यायला सांग.. घेतलास का Happy
तर तिसरया दिवशी, स्वताच त्यांचा खिसा चेक करत.. हं, फोन घेतलाय Happy

पळवणारी का असेना, आजोबांना एक काठी भेटलीय हे नक्की Happy

.
.

१६ ऑक्टोबर २०१६

आज रविवार असल्याने सकाळचा आमचा दूध पिण्याचा कार्यक्रम पप्पांसोबत होता. पप्पांना बेडवर लोळत खायला आवडते, ही मस्तपैकी बेडवरच्या लोडवर बसून सिंहासनावर बसल्याच्या थाटात दूध पिऊ लागली. पिऊन झाल्यावर तोंड ओठ छान दूधाने रंगले. तसे मी चल परी तोंड धुवून येऊ असे म्हणत तिला उचलून घ्यायला हात पुढे केले.. आणि काय आश्चर्य!
पहिल्याच फटक्यात माझ्या खांद्याकडे झेपावली. एवढे गुणी बाळ बघून मला बस्स आनंदाचा झटका यायचा बाकी होता. पण माझ्या खांद्यावर झेपावलेल्या तिने माझ्या बनियानलाच तोंड पुसत म्हटले, झाले तोंड साफ Happy
बोक्याची जात आहे हो, बाकी काही नाही Happy

.
.

३० ऑक्टोबर २०१६

बीस साल बाद !

तब्बल वीस वर्षांनी आज फटाके फोडले. थॅन्क्स टू अर्थातच परी Happy
फुलबाजे स्वत: पेटवत होती. कोणी हात धरलेला नको होता. ऊलट दोन हातात दोन फुलबाजे धरायला हवे होते. चक्रपाऊसाची भिती चेपली तसे ते देखील स्वत: लावायला हवे होते. तिला लाऊ दिले नाहीत ती गोष्ट वेगळी. पण त्यांनी पेट घेतल्यावर कधी चेकाळल्यासारखे त्यांच्यापासून दूर पळत होती तर कधी आक्रमण केल्यासारखे त्यांच्या अंगावर धाऊन जात होती. पकडून तिला आवरावे लागत होते. मध्येच ते फुलबाजे हातात धरून आजोबांशी दांडिया खेळू लागली. म्हणजे त्या स्फोटक पदार्थांना काही ईज्जतच नव्हती. शेवटी अर्धे फटाके सुमडीत लपवून तिला घरी आणावे लागले.
गेल्या वर्षी फटाक्यांच्या आवाजाला घाबरणारी ही पोरं. यावेळी आगीशी खेळ एवढ्या आनंदाने करत होती जसे पाण्याशी करते. एण्ड ऑफ द शो तिच्या मम्माने पुन्हा एकदा हाच निष्कर्श काढला, की परी तिच्या पप्पांपेक्षा डेअरींगबाज आहे Happy

.
.

१ नोव्हेंबर २०१६

खिडकीतल्या गप्पा !

मुंबईच्या घरात खिडकी ही आमची एक फेव्हरेट जागा. तिथे बसून सकाळी ब्रश करता येतो. तिथूनच काऊ कब्बू बघता येतात. तिथे बसून चप्पा खाऊ शकतो. तिथून बेडवर दणादण ऊड्या मारू शकतो. काही नाही तर निवांत बसून गप्पा मारू शकतो.
हल्ली दिवाळीमध्ये कंदील आणि लायटींगने तिचा शो जरा वाढला आहे. त्यामुळे कंदीलाला टपल्या मारायचा खेळही एक वाढला आहे.

काल रात्री असेच खिडकीवर बसल्या बसल्या तिला लायटींगची माळ खेचायचा मूड झाला. मी तिला दम देत म्हणालो, "परी वायरला हात लावायचा नाही, शॉक लागतो".. तसे तिने खिडकीचा पडदा हाताभोवती ग्लोव्हज सारखा गुंडाळला. आणि म्हणाली., "यातून लावते Happy
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारत तिला खेचून जवळ घेतले. तसे तिचे लक्ष माझ्या गालाकडे गेली.
"तू दाढी काढली आहेस"
मी म्हणालो, हो त्यादिवशीच काढली ना.
तसे गाल निरखून म्हणाली, थोडी थोडी आली आहे.. आणि गालाला गाल चोळून चेकही करू लागली.
मग अचानक या दाढीच्या विषयावरून तिला काहीतरी आठवले,
"तू एकदा दाढी करायला गेला होता. पण दुकान बंद होते. म्हणून तू परत आला... मी तुला हनीबेल (केक) आणायला सांगितले होते. पण तू घेऊन नाही आला..."
विचार करता मला आठवले, खरेच आठवड्याभरापूर्वी वाशीला असताना असे घडलेले. सलून बंद बघून मी हात हलवत परत आलेलो आणि त्या नादात तिने सांगितलेला केकही आणायला विसरलेलो. त्यानंतर तिच्या शिव्या खात तो परत खाली जाऊन तिला आणूनही दिलेला, पण कधी काळचे नेमके आठवून तिने आज मला ते सुनावून दाखवले होते.
बायका कुठची गोष्ट कशी लक्षात ठेवून कधी काढतील याचा नेम नाही, असे ऐकले होते. पण हा गुण ईतक्या लहानपणापासूनच अंगी असतो, हे माहीत नव्हते Happy

.
.

४ नोव्हेंबर २०१६

पप्पापकड!
एकेकाळी पकडापकडी हा आमचा आवडीचा खेळ होता. खेळाचे सारे नियम धाब्यावर बसवून खेळला जायचा. आधी डोळे झाकून ती एक ते दहा आकडे मोजायची. कधी अकरा ते वीसही मोजायची, तर कधी एकवीस ते तीस. तिच्या मूडवर ते ठरायचे. मग स्वत:च पळायची. राज्य कायम पप्पांवरच. त्यानंतर तिचे पळणे म्हणजे कुठेतरी लपणे. आणि ती आपल्याला समोर दिसत असूनही आपण तिला न पकडणे हा खेळाचा एक नियमच. जेव्हा तिला स्वत:ला सरेंडर व्हायचा मूड यायचा तेव्हाच खेळ संपायचा.

तर आता तो खेळ खेळून बोर झाल्याने आम्ही पप्पापकड नावाचा नवीन खेळ सुरू केलाय.
आधी आम्ही घरातली एखादी खुर्ची, टेबल किंवा कपड्यांचे कपाट धाडकन जमिनीवर पाडतो. हे पाडणे शब्दशा धाडकनच असते. अजून खालच्या मजल्यावरच्या लोकांची तक्रार कशी आली नाही हेच नवल. आतापर्यंत कपाटाची हाडे खिळखिळी झाली आहेत, खुर्चीचा आकारऊकार बदलत तिची पाठपोट एक झालेय, फक्त स्वत:च्या पायावर अजून काही पाडून घेतले नाहीये हेच आमचे नशीब!
तर मग त्या पाडलेल्या फर्निचरमध्ये ती स्वत:ला वेड्यावाकड्या पद्धतीने गुंतवून घेते, असे की बस्स आता हात सटकून पडायलाच आलीय आणि तसेच संकटात सापडल्यासारखी ओरडायला लागते.. पप्पापकड, पप्पापकड..
अभिनयात तर ती बाप असल्याने तिची हाक ऐकताच आपल्याला हातातली सारी कामे टाकून धाव घ्यावीच लागते. एकदा का मी तिथे जाऊन तिला पकडले की एकदम तिच्या चेहरयावर सुटकेचे गोड हास्य पसरते.. आणि स्वत:शीच म्हणते, "पप्पांनी पकडले Happy
हल्ली तिचे हे पप्पापकड समजू लागलेय, तरीही नेहमीच धाव घ्यावीच लागते. कारण आपल्याच पोरीशी 'लांडगा आला रे आला' व्हावे याची वाट तर बघू शकत नाही ना Happy

.
.

११ नोव्हेंबर २०१६

कोणाचे काय तर कोणाचे काय..!
सरकारने परवापासून पाचशे हजारच्या नोटांवर बंदी आणल्याने आपला ब्लॅक मनी कसा संपवावा याचे काही लोकांना टेंशन आले आहे..
तर काल रात्री आमच्याकडे परीने ओरीओचे दोन पुडे फक्त व्हाईट क्रीम खाऊन फस्त केल्याने उरलेली वीस ब्लॅक बिस्कीटे कशी संपवावीत याचे मला टेंशन आले आहे Proud

.
.

१३ नोव्हेंबर २०१६

लहानपणी बरीच मुले जीभ बाहेर काढून नाकाच्या शेंड्याला लावायचे प्रयोग करायचे. मला ते कधीच जमायचे नाही. मग आम्ही असे न जमणारे असंतुष्ट जीव ज्यांना हे जमायचे त्यांना गेल्या जन्मी तू कुत्रा होतास काय म्हणून चिडवायचो.
आज परीसोबत बेडवर मस्ती करत पडलो होतो. सहजच तिने जीभ बाहेर काढली आणि तितक्याच सहजपणे खाली छातीला चिकटवली. हे नक्की कुठल्या प्राण्यांना जमते याची कल्पना नाही. पण आपल्याला निदान हे तरी जमतेय का म्हणून मी लगेच ट्राय करून बघितले. छाती तर दूरच राहिली. हनुवटीवरची दाढी उगाचच्या उगाच चाटली गेली Proud

.
.

१६ नोव्हेंबर २०१६

हल्ली परीला शाळेत काय शिकवतात आणि टीचर तिच्याशी काय करतात माहीत नाही, पण बहुधा तेच घरी ती माझ्याशी ट्राय करते.
माझा आरडाओरडा वाढताच मला राग देते, "कोई बात नही, स्टॅण्ड अप देअर!"
अर्थातच मला गपगुमान भिंतीला टेकून उभे राहावेच लागते.
पण जर मला ईंग्लिशमध्ये बोललेले समजले नाही, तर ती मराठीत समजवते, "सांगितलं ना तुला, ईथे उभी राहा .. आईकत नाही Happy

.
.

१८ नोव्हेंबर २०१६

ओहss माssय गॉssड ..

आईssशप्पथ! ..

अरे देवाss ...

अडीच पावणेतीन वर्षे पोरीच्या तोंडचे हे शब्द ऐकून असे वाटते आपण उगाच टेंशन घेतो पोरांचे.. टेंशन कसे घ्यायचे हे त्यांचे ते शिकतात Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'परी' ला मोठी नको ना होऊ देऊस / करूस.
चिंटू सारखी लहानच राहू दे तिला!

शिवाय मग तुलाही लहानच रहायला मिळेल Wink

रमा धन्यवाद Happy
आधीच्या काही भागांत द्यायचो लिंक्स, पण बघता बघता बरेच भाग झाल्याने लिंक देणे थांबवले.

तरी माझ्या लेखनात ते सर्व वरवरच सापडतील, ईथे त्याची लिंक
http://www.maayboli.com/user/38324/created

या निमित्ताने आठवले, ब्लॉगवरही याचे बरेच भाग अपडेटायचे राहिलेत, आज उद्यामध्ये ते देखील करायला हवे. या आठवणीबद्दलही धन्यवाद.