आधी लग्नरीत मोडा

Submitted by बेफ़िकीर on 3 October, 2015 - 03:27

माझ्या आईच्या पिढीची
बाई वेडगळ होती
सारा संसार झाला की
होत अडगळ होती

माझ्या बहिणीची पिढी
होती पुढारली थोडी
तिला शिक्षण मिळाले
केली नोकरीही थोडी

माझ्या बायकोची पिढी
करिअर करणारी
माझ्या आईच्या पिढीला
वेडगळ म्हणणारी

माझ्या मैत्रिणीची पिढी
माझ्या बहिणीला हसे
म्हणे उगाळा कितीही
तरी काळेच कोळसे

माझ्या मुलीच्या पिढीला
तिची आजी आवडते
माझी बायको मुलीला
सोड आजीला म्हणते

मात्र सार्‍याजणी जेव्हा
गप्पा मारायला येती
त्यांची प्रगती केवढी
झाली हेच दाखवती

दागदागिन्यांची चर्चा
साड्या बघणे पाहणे
आणि कष्ट संसाराचे
व्यक्त करत राहणे

आधी लग्नरीत मोडा
तिला एकटीला सोडा
कुंकवाचा लागलेला
एक शिक्का आधी खोडा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

आवडली...अगदी हेच असेच सांगायचे होते पण इतक्या सहज सोप्या रितीने मांडता आले नसते..

आधी लग्नरीत मोडा
तिला एकटीला सोडा
कुंकवाचा लागलेला
एक शिक्का आधी खोडा

का बरे, तसेहि एकट्या झाल्या तरी तेच करणार.

दागदागिन्यांची चर्चा
साड्या बघणे पाहणे
आणि कष्ट संसाराचे
व्यक्त करत राहणे

संसाराचे नाही तर एकटे रहाण्यात काही तरी तक्रार करण्यासारखे असेलच.

करू दे ना. लग्नच करू नका हा उपाय नाही, तेहि बर्‍याच लोकांना आवडते.