रसास्वाद सिनेमाचा - एक नोंद

Submitted by रसप on 26 September, 2016 - 02:40

'रसास्वाद सिनेमाचा' ह्या National Film Archive of India' इथे झालेल्या शिबिराच्या निमित्ताने आठवडाभर चित्रपट, त्याविषयक व्याख्यानं, मुक्त चर्चा आणि खाजगी चर्चा/ गप्पा ह्या सगळ्यात गेला. 'गेला' असं खरं तर नाही म्हणता येणार. २४ तास चालू असलेलं हे ब्रेनस्टॉर्मिंग विचारप्रक्रियेत नक्कीच काही तरी बदल घडवून आणेल. त्यामुळे 'गेला' हा शब्द शब्दश: न लागू करता, त्यातून अपेक्षित असलेला रचनात्मक अर्थ समजून घ्यावा.
ह्या आठवड्याभरात मी काय नवीन शिकलो, हे शिबीर किती उपयोगी होतं, ह्याचा आढावा आत्ताच घेता येणार नाही. कारण मला खूप 'इनपुट्स' तर मिळाली आहेतच, त्यातून 'इनसाईट्स' किती मिळतात हे समजायला काही काळ जाईल. मात्र, हा आठवडा खूप महत्वाचा आणि अविस्मरणीय होता, ह्याविषयी तर मला अजिबातच संशय नाही.

इनसाईट्स जेव्हा मिळतील, तेव्हा मिळतीलच. पण जे दोन मुद्दे प्रकर्षाने खटकले, ते मात्र नेहमीच खटकत राहणार आहेत. त्यामुळे तेव्हढे मांडतो.

१. संगीत :

'भारतीय चित्रपटातील संगीत' (पार्श्वसंगीत नव्हे.) हा एक प्रचंड मोठा विषय शिबिरात पूर्णपणे दुर्लक्षित राहिला. मला मान्य आहे की हे शिबीर 'जागतिक चित्रपट' ह्या एका व्यापक विषयावर विचार करायला लावणारं होतं. जागतिक चित्रपट हा एक मोठ्ठा हत्ती असेल, तर त्याच्यासमोर भारतीय चित्रपट म्हणजे एक छोटंसं उंदराचं पिल्लू असेल. पण 'उंदराचं पिल्लू' म्हणूनही त्याचं स्वत:चं एक अस्तित्व आहे. भले ते कुणाला आवडो वा नावडो. ते अस्तित्व हीच भारतीय चित्रपटाची व पर्यायाने एक भारतीय म्हणून माझी व इतर सर्वांची ओळख आहे. ह्या अस्तित्वात एक अनन्यसाधारण महत्व सिनेसंगीताचं आहे. अख्ख्या जगात एक भारतीय चित्रपटच असा आहे, ज्यात 'गाणी' असतात. भारतीय चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे 'त्यातली गाणी' हेच आहे. शिबिरातच एक इस्रायली चित्रपट दाखवला होता. 'डेस्पराडो स्क्वेअर' नावाचा. तो सिनेमा म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून राज कपूरच्या 'संगम'ला दिलेली एक दादच होता. त्यांतल्या व्यक्तिरेखा भारतीय चित्रपटांनी भारावलेल्या दाखवल्या आहेत. एका बंद पडलेल्या चित्रपटगृहाला पुन्हा सुरु केलं जातं आणि पहिला चित्रपट म्हणून 'संगम' लावला जातो कारण गावातले लोक त्या चित्रपटाच्या प्रेमात असतात. 'संगम'मधली गाणी ते लोक एकत्र गातात, नाचतात, रडतातही. ह्यातून काय दिसतं ? जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटाची एक ओळख त्याच्या संगीतामुळे आहे. राज कपूरच्या 'आवारा'मुळे रशियात धूम मचवली होती आणि गल्लोगल्ली 'आवारा हूं..' वाजायचं, ते गाणं तिथल्या लोकांच्या ओठांवर बराच काळ रेंगाळत होतं.
दुसरं म्हणजे, खूप मोठमोठ्या लोकांनी भारतीय सिनेसंगीतात आपलं भरीव योगदान दिलं आहे. मला फार काही ज्ञान नाही, पण काही नावंच घ्यायची झाली तर सज्जाद हुसेनपासून ए आर रहमानपर्यंत, राजा मेहंदी अली खानपासून स्वानंद किरकिरेपर्यंत, नूर जहांपासून श्रेया घोशालपर्यंत, के एल सैगलपासून सोनू निगमपर्यंत असंख्य लोकांनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे व करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, स्वत:च्या कलेच्या जोरावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या पं. हरिप्रसाद चौरासिया, पं.रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अला रखा सारख्या मोठमोठ्या कलाकारांनी आपापल्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीत केलेली आहे किंवा सिनेसंगीतात प्रचंड काम केलेलं आहे. हे सगळं पूर्णपणे विसरुन चालणार नाही.
तिसरं असं की, आपण आपली ओळख, आपलं वेगळेपण जपायला कधी शिकणार आहोत ? स्वतंत्र झालो तरीही बौद्धिक गुलामगिरी कधी सोडणार आहोत ? जागतिक चित्रपट जे काही करतो, त्याचं अंधानुकरण आपण का करावं ? त्यांच्या चित्रपटांत संगीत नसतं, म्हणून आपण आपली एक संपन्न परंपरा सोडायची का ?
शिबिरादरम्यान मी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांना एक प्रश्न विचारला होता की, 'तुमच्या चित्रपटांतील संगीताविषयी तुम्ही किती आणि कसे आग्रही असता ?' खरं तर मला हा प्रश्न गाण्यांच्या दर्ज्याच्या बाबतीत विचारायचा होता कारण गोवारीकर आजच्या काळातले एक असे दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटांतील गाणी एका विशिष्ट दर्जा सांभाळणारी असतातच असतात. मात्र माझ्या विचारण्यात जराशी चूक झाली असावी आणि गोवारीकरांनी 'चित्रपटात गाणी असावीत की नाही' अश्या अनुषंगाने उत्तर दिलं. Nevertheless, ते उत्तरही मला खूप महत्वाचं वाटतं. त्यांचे शब्द होते की, 'कुठलीही कहाणी अशी नसते जिला संगीताची आवश्यकता नाही. एक चांगलं गाणं एखाद्या प्रसंगापेक्षा जास्त परिणामकारक असतं. ते भावनेचं extension असतं.' मला हे उत्तर खूप आवडलं आणि पटलंही. आपण आपली ओळख, वेगळेपण जपायला हवं. सिनेसंगीताचा एक अथांग ठेवा आपल्याकडे आहे, त्याची आपल्याला किंमत वाटेनाशी झाली आहे. हे खूप विदारक आहे.
'गाण्यांचं चित्रीकरण' हेसुद्धा एक वेगळं कसब आहे, असंही मला वाटतं. अगदी ताबडतोब डोळ्यांसमोर येणारं गाणं म्हणजे विजय आनंदच्या 'तेरे घर के सामने' मधलं 'दिल का भंवर करे पुकार..' ! कुतुब मिनारमध्ये चित्रित केलं गेलेलं हे गाणं जितकं श्रवणीय आहे तितकंच प्रेक्षणीयही ! गुरु दत्तनी तर किती तरी गाण्यांची अप्रतिम चित्रीकरणं केलेली आहेत. हीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची कलात्मकता आहे. चित्रपट ही जर एक कला आहे, तर त्या कलेच्या अंतर्गत असलेल्या अश्या कलात्मकतेला आपण कसे विसरू किंवा नाकारू शकतो ?

२. इतिहास :

चित्रपटक्षेत्रातील किंवा असं म्हणू की चित्रपट रसास्वादक्षेत्रातील जाणकार लोकांचं घड्याळ एका विशिष्ट कालखंडानंतर बंद पडलेलं आहे, असं मला वाटलं. अनेक व्याख्यानांमधून चित्रपट इतिहासातील तीच ती पानं पुन्हा पुन्हा उलगडून दाखवली जाणं म्हणजे हे सगळे जण वर्षानुवर्षं त्याच त्या सहाणेवर तेच ते ते चंदन उगाळत आहेत की काय, असं वाटलं. भारतीय चित्रपटाचा इतिहास तर म्हणे 'सत्यजित राय' ह्या एकाच नावाभोवती घुटमळत राहतो ! मला मान्य आहे की सत्यजित राय महान होते. नव्हे, ते महत्तम होते ! त्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणू. आपल्या देशाला एक राष्ट्रपिता आहेत, तसे हे 'चित्रपिता' मानू. पण देशाला स्वातंत्र मिळालं, ते काही फक्त राष्ट्रपित्यामुळे नाही ना ? जो काही आपला स्वातंत्र्यलढा होता त्यात इतर अनेक लोकांचं असलेलं योगदान आपण विसरतो का ? मग भारतीय चित्रपटाच्या प्रवासातील इतर महान नावं आपण का विसरता ?
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटाला सत्यजित राय ह्यांच्या 'पथेर पांचाली'ने ओळख मिळवून दिली हे जरी खरं असलं, तरी खऱ्याखुऱ्या भारतीय चित्रपटाचं चांगलं प्रतिनिधित्व तो चित्रपट करतो ? माझ्या मते तरी नाही. मला विचाराल, तर खऱ्याखुऱ्या भारतीय चित्रपटाचं प्रतिनिधित्व बिमल रॉयचा 'दो बिघा जमीन', व्ही. शांतारामांचा 'दो आंखें बारा हाथ', राज कपूरचा 'आवारा', हृषीकेश मुखर्जीचा 'आनंद', गुलजारचा 'इजाजत', रामगोपाल वर्माचा 'सत्या' असे काही चित्रपट करतात. असे चित्रपट ज्यांत संगीत आणि मेलोड्रामा ह्या दोन्हीचं परफेक्ट मिश्रण आलं आहे आणि ज्याला वास्तवाची बऱ्यापैकी जोडही आहे. 'पथेर पांचाली' हा काही भारतीय चित्रपटाचा चेहरा, त्याची ओळख होत नाही. पण वर उल्लेखलेल्या सगळ्या चित्रपटांची 'चांगले' चित्रपट म्हणून नोंद घेतली जात नाही व जाणार नाही कारण ते तथाकथित 'समांतर चित्रपट' म्हणवले जाऊ शकत नाहीत.
माझ्यासाठी चित्रपट म्हटला की, 'हृषीकेश मुखर्जी' आणि 'गुलजार' ह्या दोन नावांशिवाय तो पूर्ण होतच नाही. माझ्यासाठी ही दोन दैवतंच आहेत. संपूर्ण आठवड्याभराच्या शिबिरात एकाही सेशनमध्ये ह्या दोन नावांचा साधा उल्लेखसुद्धा होऊ नये, ही बाब मला खूप दु:खी करणारी वाटली. शिबारार्थी लोकांना 'भुवन सोम' हा एक अतिसामान्य चित्रपट दर्जेदार, आयडियल म्हणून दाखवला जाणं, म्हणजे धक्कादायक होतं ! एका अनोळखी शहरी इसमास स्वत:च्या घरी बोलवून त्याचा पाहुणचार करणं, इतपत ठीक आहे. पण त्यानंतर घरी आपल्या मुलीला एकटं सोडून स्वत: बापाने कामासाठी बाहेर निघून जाणं, नंतर त्या मुलीने त्या अनोळखी इसमासोबत बिनधास्तपणे गावभर हुंदडणं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवणं वगैरे शुद्ध आचरटपणा ह्या चित्रपटात आहे. हे कथानक १९६० वगैरेच्या काळातलं आहे. त्या काळात सोडा, आजच्याही काळात ग्रामीण भारतात असं कुठलीही स्त्री व तिचा बाप वागणं केवळ अशक्य आहे. ह्याशिवायही अनेक बाष्कळ गोष्टी ह्या चित्रपटात आहेत.
बिमल रॉय, व्ही शांताराम, राज कपूर, हृषीकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी, विजय आनंद, सई परांजपे, शेखर कपूर अश्या लोकांना तथाकथित जाणकार लोकांनी पूर्णपणे दुर्लक्षित करावं, इतकंही त्यांचं काम सुमार दर्ज्याचं नाहीच. शिबिरात उल्लेख केलेल्या व दाखवलेल्या काही चित्रपटांपेक्षा किंवा त्या चित्रपटांइतकंच ह्या लोकांनीही दर्जेदार काम केलेलं आहे. मात्र 'घर की मुर्गी दाल बराबर' असते, असंच दिसून आलं.
आजकालचे चित्रपट तर अदखलपात्रच असावेत. I am sure, व्याख्यानं देणाऱ्या बहुतांश लोकांनी इम्तियाझ अलीचे चित्रपट पाहिलेले नसतीलच. इम्तियाझ अली हा एक असा दिग्दर्शक आहे, जो त्याच्या चित्रपटांत, कथाकथनात गाण्यांचा अप्रतिम खुबीने वापर करत असतो. आजच्या चित्रपटांचा विचार केला तर माझ्या मते मणी रत्नम, रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप, इम्तियाझ अली असे अनेक लोक सांगता येतील, जे खूप चांगलं काम करत आहेत. केवळ ते आजच्या काळात आहेत, म्हणजे ते दखलपात्र नाहीत की काय ?
'समांतर सिनेमा' असं काहीही सध्या राहिलेलं नाही आहे. एकंदरीतच सिनेमा परिपक्व होत आहे. आजच्या बहुतांश सिनेमांत (चांगल्या) व्यावसायिक व समांतर ह्यांचा समन्वय साधलेला मला तरी जाणवतो. एक उदाहरण द्यायचं तर 'नीरज घायवान'चा 'मसान' पाहू शकता.

पण कुठे तरी संपूर्ण शिबिरातून असं एक जाणवलं की जाणकार लोकांना सरसकट परदेशी चित्रपटच जास्त सरस वाटतो. 'डेस्पराडो स्क्वेअर' जर भारतात बनला असता, तर त्याला १००% खात्रीने सांगतो, त्याला रीडीक्युल केलं गेलं असतं, पण तो इस्रायली असल्याने त्याचं गुणगान होतं. (मला तो आवडला आहेच.) 'आपल्या मनात आपल्या परंपरेविषयी, संस्कृतीविषयी एक प्रकारची अढी आहे', असं मी म्हटलं की मला 'अंध राष्ट्रवादी' वगैरे संबोधलं जाईल. पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. 'काय चांगलं, काय वाईट', हे जरी व्यक्तीसापेक्ष असलं, तरी हा निवाडा आपणच आपला करत असताना पूर्वग्रहविरहीत असणं आवश्यक आहे. 'आनंद'चं गुणगान केलं की कुणी तरी म्हणतं, हा तर 'इकिरू' वरून उचलला आहे ! असं बिनधास्त ठोकून देण्यापूर्वी दोन्ही चित्रपट कोऱ्या मनाने पाहिले पाहिजेत. ते आपण पाहत नाही.

अर्थात, असं सगळं खटकूनही मी शेवटी हेच म्हणीन की हा आठवडा खूप महत्वाचा होताच. ह्या सात दिवसांत १०-१२ चांगले चित्रपट (एक अपवाद) आणि किमान २०-२२ चांगल्या शॉर्ट फिल्म्स मी पाहिल्या. उमेश कुलकर्णी, गणेश मतकरी, अनिल झणकर, विकास देसाई ह्यांच्या सेशन्समधून बरंच काही नवीन व नव्याने समजलं, उमगलं.
हेही नसे थोडके !

टीप -
१. ही माझी मतं मी आयोजकांसमोर व शिबिरात सहभागी सर्व व्यक्तींसमोर व्यासपीठावरूनही मांडली आहेतच. पण ते संक्षिप्त व उत्स्फूर्त होतं, हे जरा अधिक विस्ताराने व विचारपूर्वक आहे.
२. मला अन्यभाषीय चित्रपटांची फारशी माहिती नसल्याने सगळा फोकस 'हिंदी'वर आहे, ते प्रातिनिधिक समजावं.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/09/blog-post_26.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! तुमचे दोन्ही मुद्दे पटले. जागतिक चित्रपट पटलावर भारतीय सिनेमाचे स्थान उंदराच्या आकारापेक्षा बरेच मोठे आहे असे मला वाटते (माझ्याकडे काही विदा नाही).

Next review will tell whether you learnt anything or not. In my opinion, your reviews are alm9st always disgustingly oversimplified and biased by your own preferred ideology. Exactly same attitude in this post, too. Only marathi media can tolerate such mediocrity.

माफ करा, पण शिबिरानंतरही तुम्ही 'खरा भारतीय चित्रपट कुठला?' यातच अडकून पडला आहात, हे जरा मजेशीर वाटतं. Happy

बाकी, रसास्वाद शिबिरासाठी प्रातिनिधिक चित्रपट निवडलेले असतात. उमेश कुलकर्णी, अनिल झणकर, सुषमा दातार, नखातेसर हे प्रचंड सिनेमे पाहतात, राय हेच सर्वश्रेष्ठ असं त्यांचं मत कधी मला जाणवलं नाही. कदाचित मुद्दे समजवून सांगताना उदाहरणं कायम सत्यजित रायांच्याच चित्रपटांची आली असावीत.

दरवर्षी 'आशय'तर्फे आयोजित होणार्‍या आणि एनएफएआयच्या अशा दोन्हीतिन्ही शिबिरांना संगीत हा विषय नक्की असतो. यंदा काही कारणांमुळे तो घेता आला नसावा.

शिबिराची सुरुवात 'मोहेंजो दडो'ने झाल्याचं कळलं. आपण हल्ली पुरेसे राष्ट्रवादी राहिलो नसून चित्रपटात राष्ट्रवाद दिसत नसल्याची त्यांनी बोलून दाखवलेली खंत रोचक होती. Proud

पुण्यात असाल तर आता युरोपीय चित्रपटमहोत्सव सुरू होतोय, तेही सिनेमे पाहून जा. Happy

एक आठवडा नाही पण मी सुद्धा नखाते सरांचा चित्रपट रसास्वादचा कोर्स केलेला होता. चिनुक्स म्हणतो तसे राय हेच सर्वश्रेष्ठ त्यांचे मत काही जाणवले नव्हते. आमच्या कोर्स मध्ये तरी त्यांनी अगदी मराठी शेजारी पासून सुरूवात करून लख लख चंदेरी गाणेही दाखवले होते. तुमच्या कोर्स मध्ये तुम्हाला हे दाखवले नसेल / संगिताविषयी चर्चा घडली नसेल तर वाईट वाटते. भारतीय चित्रपटांचा संगित हा महत्त्वाचा अंग असल्याने त्याची दखल घेणे गरजेचे होते.

आता इतिहास या बाबतीत मात्र तुमचे स्वतःचे मत काही पटत नाही. भारतीय चित्रपटांचा इतिहास हा काही फक्त बॉलिवूड मसाला पटांचा इतिहास नाहीये तर तो इतरही काय प्रयत्न झाले आणि जागतीक दृष्टीकोनात कोणते चित्रपट यशस्वी झाले आणि त्यांच्यात नक्की काय दाखवायचे होते याचा इतिहास आहे. आता तुमच्या बर्‍याच रिव्ह्युज मधून असे वाटते की तुमची जी मतं असतात त्याच्या विरोधात काही असेल आणि ते जरी बरोबर असेल तरी तुम्हाला ते आवडत नाही त्यामुळे या मुद्द्याबद्दल अजून काही म्हणत नाही.

चुकीचा समज आहे तुमचा. राग "तुमचा" नाही. राग "वृत्तीचा" आहे. थोडं आत्मपरिक्षण करायला काय हरकत आहे?

रसप इग्नोर करा :-). परिक्षण हे नेहमीच त्या व्यक्तीचे वैयक्तीक मतच असते. त्यामुळे ते थोडेफार बायस्ड असणारच. आता सैराट आवडला नाही म्हणुन काही लोकं माझ्यावर उगाच चिडत होती. बाकी पिंक बघितलात का? तुमच्या परिक्षणाची वाट बघत होतो.

Again personal!! Here people give comments about ehat you write and not about the person. Is it too difficult to understand? You may be an excellent person, i am not denying that.

mandard | 29 September, 2016 - 09:47 नवीन
रसप इग्नोर करा स्मित. परिक्षण हे नेहमीच त्या व्यक्तीचे वैयक्तीक मतच असते. त्यामुळे ते थोडेफार बायस्ड असणारच. आता सैराट आवडला नाही म्हणुन काही लोकं माझ्यावर उगाच चिडत होती. बाकी पिंक बघितलात का? तुमच्या परिक्षणाची वाट बघत होतो.

>>
ऑफ कोर्स, मी मनावर घेत नाही. Happy

'पिंक' पाहिला. अगदी आवर्जून पाहिला. रसास्वाद शिबिरात दिवसभरात तीन सिनेमे पाहून झाल्यावर रात्री उशीराचा शो पाहिला कारण लोक खूपच स्तुती करत होते.
चांगला वाटला, महान नाही. बच्चनची ओव्हरअ‍ॅक्टिंग असह्य झाली पहिल्यांदाच. बऱ्याचदा आपण लोक सिनेमाच्या विषयावर आपलं मत बनवतो. आता 'पिंक'चा विषय असा आहे की तो आवडणारच आणि आवडला पाहिजेच. पण सादरीकरण ? तो कोर्टरूम ड्रामा 'तारीख पे तारीख' पर्यंत गेला नाही, हेच नशीब. काही चांगल्या गोष्टी होत्याच. पण ओव्हरऑल जितका डोक्यावर घेतला आहे, तितकाही महान नाही वाटला. सविस्तर लिहायचा प्रयत्न करतो.

रसप,

तूमच्या इतक्या सातत्याने मी हिंदी चित्रपट बघू शकत नाही, पण तूमची संगीताबाबतची तगमग खुप पटते आणि जाणवतेही.

परवाचीच घटना, टॅक्सीत एफ एम वर अन्नु कपूर, अजय देवगण आणि नलिनी जयवंत यांचे नाते सांगत होता,
अजय देवगणचे कुठले तरी गाणे ऐकवले ते त्याने पूर्ण ऐकले. मग नलिनी जयवंतचे म्हणून जीवन के सफर में राही.... नुसते सुरु केले तर त्याने चॅनेल बदलून टाकला... क्या पुराने गाने सुनाते है. म्हणत !!

{{{ बच्चनची ओव्हरअ‍ॅक्टिंग असह्य झाली पहिल्यांदाच. }}}

बूम नावाचा अतिमहान चित्रपट पाहण्याचे सद्भाग्य आपणांस लाभलेले दिसत नाही.