केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ४

Submitted by पद्मावति on 21 September, 2016 - 08:57

भाग 1 http://www.maayboli.com/node/59911
भाग २ http://www.maayboli.com/node/60016
भाग ३ http://www.maayboli.com/node/60087

मला ना लहानपणी काही विशिष्ठ गावे आणि जागा या निव्वळ दंतकथा वाटायच्या. उदाहरणार्थ - टिमबकटू , झुमरीतलैय्या किंवा केप ऑफ गुड होप. मला ही ठिकाणं म्हणजे अनुक्रमे- वाक्प्रचार म्हणून वापरायला, फिल्मी गाण्यांच्या फर्माईशी पाठवायला आणि वास्को डी गामाला शॉर्ट कट मारुन हिंदुस्तानात येता यावे म्हणून निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी वाटायच्या…….

पुढे वयोमानपरत्वे समजले की या जागा दंतकथेतल्या नसून खरोखरीच अस्तिवात आहेत. त्यापैकी केप ऑफ गुड होपला तर आज प्रत्यक्ष जाण्याचा आमचा बेत ठरला होता. सहाजीकच तीथे जाण्यासाठी आम्ही कमालीचे उत्सुक होतो.

ब्रेकफास्ट नंतर आम्हाला घ्यायला आमची टूर गाइड आली होती. तिचे नाव मर्टल. साधारणपणे आज काय काय बघायचे यावर मर्टलशी थोडी चर्चा केली. गाडी तिचीच होती. केप टाउन मधे असेपर्यंत आम्ही गाडी रेंट केली नव्हती, तशी गरजच वाटली नाही. एकतर आमचे राहण्याचे हॉटेल खूप मध्यवर्ती जागी होते आणि सगळीकडे फिरायला टॅक्सी आणि हॉप ऑन हॉप ऑफ बसेस खूप सोयीच्या आहेत. शहराच्या बाहेर जायचे म्हणजे मग मात्र रेंटल कार हवीच कारण या भागात ट्रेन्स्, बसेस जवळपास नाहीतच.

सुमारे साडे नऊ वाजता आम्ही हॉटेल मधून निघालो. आज आमचा या शहरातला शेवटचा दिवस होता त्यामुळे हवामानाला आज सुद्धा चांगले असण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. नाहीतर हा शेवटचा दिवस अगदी वाया गेला असता.

केपटाउन पासून साधारण दोन तासांच्या ड्राइविंगच्या अंतरावर केप पॉइण्ट / केप ऑफ गुड होप आहे. हा भाग म्हणजे साऊथ आफ्रिकेचे अगदी दक्षिण टोक. रस्ता जरी दोनच तासांचा असला तरीही तिथे जाऊन यायला पूर्ण एक दिवस राखून ठेवावा लागतो. याचे कारण असे की हा संपूर्ण मार्ग समुद्राच्या कडेकडेने जातो. अधेमधे सुंदर समुद्र किनारे आणि डोंगर रांगा....जातांना मधेच कुठेतरी थांबून निवांतपणे निसर्ग डोळ्यात भरून घ्यावा. डोंगराच्या कडेला गाडी उभी करावी आणि भान हरपून खाली उसळणार्या लाटांकडे बघत बसावे. हिरव्या- निळ्या रंगांच्या इतक्या अगणीत छटा त्या पाण्यात पाहतांना मन अगदी थक्क व्हायला होते. रस्ते अतिशय उत्तम आहेत. डोंगरांमधून बरेच वेळा रस्ता जातो पण तरीही तो मला कधी धोकादायक वाटला नाही. अप्रतिम हवा, अगदी बेताची रहदारी, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, ऐसपैस गाडी, आजूबाजूला वेड लागेल असा निसर्ग आणि गाडीत कटकट न करता शांत बसलेली मुलं......सुख, सुख काय म्हणतात ते हेच हो.....

road.jpgroad2.jpgroad 3.jpg

केपटाउनच्या दक्षिणेला चॅपमन'स पीक हा पर्वत आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्याला चॅपमन'स पीक ड्राइव म्हणतात. हा ड्राइव केप टाउन मधे आल्यास तुमच्या मस्ट विज़िट यादीमधे असावाच. सुदैवाने इथे जायला विशेष काही वेगळे करावे लागत नाही. केप पॉइण्ट कडे जातांना अनायसे इथूनच जावे लागते. या डोंगराचा पश्चिमेकडील भाग हा म्हणजे एक प्रचंड सरळसोट कडा आहे, जणू एखादी भिंत . ही भिंत उतरते ती थेट खाली अटलांटिक महासागरात.....आणि या सरळ सपाट भिंतीला जो आडवा, नागमोडी रस्ता छेदून जातो तो म्हणजे चॅपमन'स पीक ड्राइव. अत्यंत सुरेख मार्ग. अरुंद आहे पण तरीही व्यवस्थीत बांधला आहे त्यामुळे घाट वळणाचा असूनही कुठेच भीती वाटत नाही.

chapmans peak 1.jpgchapman 3.jpg

डोंगराचा माथा म्हणजे चॅपमन'स पीक. इथे उभे राहून जो सृष्टीचा जो अप्रतिम नजारा दिसतो त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही……

peak 2.jpgpeak final.jpg

साऊथ आफ्रिकन नौदलाचा तळ आणि आफ्रिकन पेंग्विन्सची वस्ती या दोन गोष्टींसाठी सायमन्स टाउन हे शहर प्रसिद्ध आहे. केप टाउन आणि केप पॉइण्टच्या बरोबर मधे हे टूमदार गाव आहे. इथून हार्बरचा नजारा खूप छान दिसतो. गाडी थांबवून या गावात आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. डोंगर पायथ्याशी असलेले हे सुंदर गाव. रस्त्याच्या दुतर्फा छोटी, छोटी दुकाने, कॅफे आणि रेस्टोरेंट्स आहेत.

जवळच बोल्डर बीच आहे. आफ्रिकन पेंग्विन्स सहजासहजी भरवस्तीत बघायला मिळत नाहीत. हे पक्षी इतक्या जवळून पाहता येतील अशा अत्यंत कमी जागा आहेत जगभर. सायमन्स टाउन शहर आणि हा किनारा त्यापैकी एक.
बीच एखाद्या शांत सरोवरासारखा आहे. मुलांसाठी पाण्यात खेळायला अगदी सुरक्षित. हे बोल्डर्स करोडो वर्षे प्राचीन आहेत असे म्हणतात . पाण्यात पोहतांना आपल्याबरोबर पेंग्विन्सही मस्तं पोहत असतात. त्यांना लोकांची इतकी सवय आहे की ते बिनदिक्कतपणे आपल्या जवळ येतात. फोटोसाठी पोज़ वगैरे सुद्धा देतात......

penguine 3.jpg

या बीच पासून अगदी जवळच फॉक्सी बीच आहे. भरपुर पेंग्विन्स बघायचे असतील तर या फॉक्सी बीच वर जावे. पार्किंग लॉट मधे पार्किंग करून, बीच तिकीट काढून आम्ही आत गेलो. समुद्र किनारी किंचित उंचीवर लाकडी पायवाटा बनवल्या आहेत. इथे फक्त या प्लॅटफॉर्म वरुनच फिरता येते. पेंग्विन्सची सुरक्षितता आणि संवर्धन हा उद्देश. आपल्यासाठी सुद्धा हे पक्षी पाहण्याची ही उत्तम सोय आहे. या पायवाटेवरुन फिरत फिरत हजारो पेंग्विन्स आपल्याला अक्षरश: हाताच्या अंतरावरून पाहायला मिळतात. आरामात किनार्यावर पहुडलेले असतात, तुरुतुरू चालत असतात आणि मस्तं मासोळी सारखे पाण्यात पोहायला सूर मारत असतात. पंचवीस वर्षांपूर्वी पेंग्विनची नर आणि मादी अशी एक जोडी आणल्या गेली होती आज जवळपास तीन हजारांवर त्यांची संख्या गेलीय. या किनार्याजवळच्या पाण्यात पेंग्विन्स जे मासे खातात ते मासे मुबलक प्रमाणात आहेत याचबरोबर या पेंग्विन्सची काळजी देखिल अतिशय चांगल्या तर्हेने घेतली जाते.

penguine 1.jpgpenguin2.jpg

इकडे दिवसभर वेळ घालवला तरीही कमीच वाटेल पण आम्हाला रेंगाळण्याची ऐश परवडण्यासारखी नव्हती. जितका उशीर केप पॉइण्टला पोहोचायला होईल तितकी येतांना ट्रॅफिक मधे फसण्याची शक्यता जास्ती. वर पुन्हा इथल्या हवेचा काही भरवसा देता येत नाही त्यामुळे हवा चांगली आहे तोपर्यंत फिरून घ्यावे असा आमचा हिशोब.
आता आजच्या दिवसाच्या हायलाईटकडे म्हणजेच केप पॉइण्टकडे आम्ही निघालो होतो.
वाटेत यांचेही दर्शन झाले...

shahamrug_0.jpg

केप पॉइण्ट जसा जवळ येत चालला होता तशी आमची उत्सुकता अगदी उतू जायला लागली होती. साधारणपणे शेवटी दुपारी तीन ते चारच्या सुमारास आतापर्यंत जो फक्त इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकातच आम्हाला भेटला होता त्या केप ऑफ गुड होपच्या दाराशी आम्ही जाऊन पोहोचलो.........

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त लिहिते आहेस. लवकर लवकर पुढच लिही. मी ही trip plan करते आहे. जवल आल्या वर वि पु मधे संपर्क केला तर चालेल का?

अगा.. मस्त आहे ट्रिप.. आधीच्या भागांची लिंक ही दे ना इकडे.. सोयीचं पडेल सर्व एकत्र वाचायला../पाहायला.. Happy

शिरिन, श्री, माधव, वर्षू धन्यवाद.
वर्षू, लिंक्स अपडेट केल्या गं. थॅंक्स आठवण करून दिल्याबदद्ल Happy