जुळ्यांचा जन्म

Submitted by पूजा जोशी on 16 September, 2016 - 13:42

माझ्या पहिल्या लिखाणाला मायबोलीकरांनी मनापासून दाद दिली म्हणून ठरवले नीलचे आणखीन काही किस्से इथे लिहावे. किस्से लिहीण्याचा मुख्य हेतू नीलला मोठेपणी ही लक्षात रहावे आणि आपण कसे होतो हे काही अंशी आपल्या मित्र परिवाराला, बायको मुलांना सांगता यावे.आपण नाही का मुलांचे लहानपणीचे फोटो काढून ठेवतो आणि मोठेपणी ते बघून भूतकाळात फेरफटका मारून येतो तसा काहीसा प्रकार आहे हा.

तर किस्सा क्रमांक 3

जुळ्यांचा जन्म

नील मोठा होतो आहे तस त्याचे तर्कवितर्क सुद्धा. आज काल तो हळदीकुंकू, डोहाळे जेवण, बारसे अशा कार्यक्रमात इतर मुलांन बरोबर खेळतो पण एक कान आणि डोळा विधिंकडे असतो.

प्रत्येक वेळी नवीन प्रश्न पत्रिका तयार असते. हळद आधी का कुंकू? अत्तर का लावतात? वाण का लुटतात?  फुलांची वाडी का भरतात?  वगैरे वगैरे. .

तर अशाच एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात नीलला शोध लागला. वाटीतून रुपया निघतो  की अंगठी हे सर्वजण उत्सुकतेने पहात होते. नीलला रुपया निघाला ह्याचा अर्थ काय ते कळला नाही. मग काय प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

मी त्याला समजले की ही एक प्रकारची गंमत असते. पोटातल बाळ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्याची उत्सुकता असते म्हणून ही प्रथा.

पुढचा प्रश्न तयार. तु रुपया काढला होतास की अंगठी? आरती, भारती, संध्या अशा सगळ्या मावश्यांची चौकशी करून झाली. मग तो आणखीनच  खोलात जाऊन आजूबाजूला असलेल्या इतर बायकांनी त्यांच्या डोहाळे जेवणात काय काढले आणि ते बरोबर आले का?  ह्याची खात्री करून घेवू लागला. 

आता मी मात्र जरा डोळे वटारून बघितले. दोन मिनिटे काय ती शांततेत गेली.  पुन्हा एकदा प्रश्न "आजीने दोन रुपयांचे नाणे काढले होते का? "

तुम्हाला कळल असेलच नीलच्या आजीला जुळी मुले आहेत ते?

काल पेपरात बातमी वाचली एका बाईला सहा मुले झाली. बर झाल अशात कुठल्याही डोहाळे जेवणाचे  आमंत्रण नाही ते. .....

किस्सा क्रमांक //www.maayboli.com/node/58891
क्रमांक 2
http://www.maayboli.com/node/58921

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users