हॅमर कल्चर

Submitted by प्रकाश घाटपांडे on 16 September, 2016 - 00:10

हॅमर कल्चर
लेखक :- प्रभाकर नानावटी
बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद.
"पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?"
"त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे."
"पपा सांगा की ती गोष्ट मला"
"विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला. सर्व काही हातोडामय झाले.
मागणी तसा पुरवठा या तत्त्वाप्रमाणे काही चाणाक्ष उद्योजकं, लोकांची आवड ओळखून वेगवेगळया प्रकारचे हातोडे बाजारात आणू लागले. घडीचे, क्षणात उघडणारे, उघड-झाप, लांब, आखूड, नक्षीदार, बॅटरीवर चालणारे, रबराचे, प्लॅस्टिकचे, सोन्याचे, जोराने मार बसणारे, मार न बसणारे, पाळण्यातल्या व रांगणाऱ्या बाळासाठी, मुलींसाठी, बायकांसाठी, म्हाताऱ्यांसाठी, सुशिक्षितांसाठी, अशिक्षितांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी कोमल, असे विविध प्रकारचे, विविध प्रसंगासाठी, विविध वयोगटांसाठी, विविध मानसिकतेसाठी हातोडयांचे उत्पादन, वितरण व विक्री व्यवस्था रूढ झाली.
हातोडे बनवण्यासाठी लागणाऱ्या लोखंड, लाकूड, रबर, प्लॅस्टिक इत्यादी कच्च्यामालांचा पुरवठा करणाऱ्यात चढाओढ लागली. काही भूवैज्ञानिक व धातुशास्त्रज्ञ नवीन प्रकारच्या धातूसाठी संशोधन करू लागले. हातोडयांचे वर्गीकरण व प्रमाणीकरण करण्यात आले. इतर अनेक वैज्ञानिक हातोडा मारण्याच्या व मारून घेण्याच्या सिध्दांतावर मूलभूत संशोधन करू लागले. हातोडा कसा मारावा, कुठे मारावा, का मारावा, केव्हा मारावा याचे विश्लेषण करून एक सर्व मान्य आचारसंहिता बनवण्यात आली. अशा प्रकारच्या शोधनिबंधांची मागणी वाढली. प्रयोगशाळेत संशोधन होऊ लागले. लोकांच्या ज्ञानात भर पडू लागली. या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून हा विषय शाळेत शिकवू लागले. हातोडयासंबंधीचे टयूशन क्लासेस धंदा करू लागल्या. पाठयपुस्तकात याबद्दलची माहिती देण्यात आली. हातोडा-मारच्या परिणामांची गणीतीय समीकरणात मांडणी करण्यात आली. सूक्ष्मात सूक्ष्म व महाकाय हातोडयांच्या इष्ट परिणामासंबंधी चर्चा, शिबिरं, कार्यशाळा, संमेलनं भरविण्यात येवू लागल्या. संपूर्ण शिक्षण व संशोधन पध्दती हातोडयास केंद्रबिंदू समजून विकसित करण्यात आल्या.
याच सुमारास हातोडयापासून रक्षण करून घेण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे हेल्मेट्स पण बाजारात येऊ लागले. संरक्षक कवचांची मोठया प्रमाणात विक्री होऊ लागली. हेल्मेट्सचा आकार, वजन, बनवण्याची प्रक्रिया त्याचे प्रमाणीकरण इत्यादीवर संशोधन होऊ लागले. हेल्मेट्सची विक्री जोरदार होवू लागली. काही जण हातोडा मार संबंधीचे क्रीडा आयोजन करू लागले. खुल्या मैदानात, बंदिस्त हॉलमध्ये मुलं-मुली , तरुण-तरुणी, सराव करू लागले. फुटबॉल-क्रिकेट स्पर्धेप्रमाणे एक तास, एक दिवस, पाच दिवसाचे हातोडा-मारचे सामने होऊ लागले. प्रेक्षकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळू लागला. हातोडा-मार यासंबंधी कथा-कादंबऱ्या, कविता-चारोळया-गझल, वैचारिक-वैज्ञानिक लेखन, शब्दकोश, ज्ञानकोश, अशा साहित्याला प्रचंड मागणी होती. हातोडयाची चित्रकला, शिल्पकला विकसित झाली. हातोडयाचा सार्वजनिक उत्सव साजरा होऊ लागला. हातोडयांचे सवलतीच्या दरातील विक्री व प्रदर्शन भरविण्यात येऊ लागले. त्याच पैशातून ते हातोडयांची खरेदी करू लागले. व ही संस्कृती चांगलीच मूळ धरली.
हातोडा-मार संस्कृतीचे काही उपदुष्परिणाम पण जाणवू लागले. हातोडयाचा मार बसल्यामुळे काही जणांना दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करणारे स्पेशालिटी हॉस्पिटल्स निघाले. उपचार करणाऱ्या विशेषज्ञांची फौज उभारली. रुग्ण डोकेदुखी, पाठदुखी, डोळयांची आग आग होणे, आपस्मार, रक्तस्राव, मेंदूज्वर, ताण तणाव इत्यादींच्या तक्रारीवर इलाज करून घेऊ लागले. काहींच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे, ते बरळू लागले. हातोडा-मार उपचारासाठी वेगवेगळया उपचार पध्दती रूढ झाल्या. काहींना पाला पाचोळा, काहींना ऊद भस्म, व इतर काहींना साबुदाण्याच्या गोळया घेतल्यामुळे बरे वाटू लागले. आपल्याकडेच जास्त रुग्ण यावेत यासाठी त्यांच्या आपापसात चढाओढ सुरु झाली. परंतु रुग्ण निमूटपणे उपचार घेत होते. पूर्ण बरे झाल्यानंतर हातात हातोडा घेवून मारत होते किंवा मारून घेत होते.
हातोडयाच्याविरोधात बोलायची हिंमत कुणातही नव्हती. बहुतांश लोकांना हातोडा मार संस्कृतीमुळे भरपूर त्रास होत आहे हे जाणवत होते. परंतु मूठभर लोकांच्या हातोडा-मार संस्कृतीच्या उदात्तीकरणाच्या जाहिरातबाजीमुळे, खरोखरच यात काहीतरी तथ्य असावे म्हणून सहन करत होते. हातोडा-मार संस्कृतीतून भरपूर काही मिळणार आहे यासाठी आपण दिलेली ही छोटी किंमत म्हणून त्रास सहन करत होते. नेमके काय मिळणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. याविषयी विचार करणेच लोकांनी सोडून दिले. शेजारचा करतोय ना मग आपण पण करावे हीच वृत्ती जोपासली जात होती.
समाजाच्या परिघाबाहेर असलेले काही सुज्ञ हताशपणे हे सर्व बघत होते. अधोगतीला चाललेल्या समाजाला सावध करावे या हेतूने हातोडा संस्कृती विरुद्ध ते आवाज उठवू लागले. परंतु गुंडागर्दी करून दडपशाही करून त्यांचा आवाज दडपला. त्यातील काही सुज्ञ चिवटपणाने ही हातोडा-संस्कृती समाजघातक व बेकायदेशीर आहे म्हणून आंदोलन करू लागले. समाजातील इतर त्यांना वेडे म्हणून हिणवू लागले. आमच्या मुलाबाळावर या वेडयांच्या वक्तव्याचा वाईट परिणाम होईल म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवावे किंवा तडीपार करावे ही मागणी जोर धरू लागली. व्यापारी व उत्पादक धंदा कमी होईल या भीतीने विरोध करु लागले. या मूठभर हातोडा-विरोधकाविरुध्द वैद्यकीय तज्ञ, संशोधक, वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ आरडा ओरडा करू लागले. हातोडा-मार अर्थव्यवस्थेला धक्का लावणाऱ्यांचा निषेध होऊ लागला. स्त्रियांना नोकऱ्या मिळणार नाहीत, राजकीय पुढऱ्यांना मतं मिळणार नाहीत, म्हणून हातोडा-मार विरोधकांची हकालपट्टी करावी या मागणीला जोरदार पाठिंबा मिळू लागला. लोकमतापुढे मान झुकवून विरोधक गप्प झाले. हातोडा-मार संस्कृती रक्षकांची सरशी झाली. आता तर हातोडा-मार संस्कृती शिवाय दुसरे कुठलेच विचार सुचेनासे झाले. यामुळे हळू हळू हा समाज विनाशाकडे जावू लागला व एके दिवशी पूर्ण अस्तंगत झाला.
उरलेल्या विरोधकांनी कुठे तरी लांब जावून एक नवा समाज निर्माण केला. व आपण त्या नव्या समाजाचे वंशज आहोत. हा समाज मात्र विचारपूर्वकपणे हातोडा मार संस्कृतीच्या अवशेषापासून दूर राहिला. हातोडयावर बंदी घालण्यात आली. म्हणून मी तुला हातोडयांना हात लावू देत नाही."
मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या क्रेझी कल्पनांचा बळी झालेला होता हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोडयापासून चार हात दूर राहणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली.
सुज्ञास सांगणे न लगे!

(लेखक निवृत्त वैज्ञानिक असून thought and action या विवेकवादी नियतकालिकाचे संपाद्क आहेत॒. तसेच उपक्रम, ऐसी अक्षरे या आंतर जालावरील संकेतस्थळावर विपुल लेखन केले आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखक मायबोलीचे सभासद नाहीत.परंतु लेख अर्थातच त्यांच्या अनुमतीने टाकला आहे.

>>> या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, <<<<
कैच्याकैच आचरट युक्तिवाद वा मनोराज्य म्हणा हव तर ......
याच नावांच्या/विषयांच्या जोडीने, विविध/आपल्या देशाची घटना, विविध कायदे/नियम, संसदा इत्यादींचाही समावेश करा की..... कारण तसेही "राष्ट्रवाद" घेतलाच आहे.... Wink

हातोड्यात आपल्याला मान्य नसलेली विचारश्रेणी टाकता येते.अतिरेक टाळावा अशा अर्थाने आपण रुपककथेकडे पाहू शकतो.

>>> हातोड्यात आपल्याला मान्य नसलेली विचारश्रेणी टाकता येते. <<< हो का?
मग तर पहिल्यांदा "विळा-हातोडा" चिन्ह असलेली "कम्युनिस्ट" विचारसरणी इथे टाकावी लागेल. कारण त्यांनाच हे राष्ट्रवाद/धर्म वगैरे नको असते. किंबहुना "कम्युनिस्ट" सोडून बाकी सारे त्याज्य असते. अन हे सगळे ते मांडतात ते "अमेरिकन व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाही" चा आधार घेत घेत.... हा एक मोठ्ठा विनोद... Lol
असो. चालुद्यात...

>>किंबहुना "कम्युनिस्ट" सोडून बाकी सारे त्याज्य असते. अन हे सगळे ते मांडतात ते <<
येस्स म्हणुनच म्हटले की प्रत्येक जण आपल्याला मान्य नसलेली विचार श्रेणी हातोड्याच्या जागी टाकून रुपककथे कडे पाहू शकतो. प्रत्येकाला असे वाटते की आपलीच विचारश्रेणी योग्य आहे व तीच समाजाला तारु शकते. या गोष्टी अनादि कालापासून चालत आल्या आहेत अनंत काळापर्यंत चालत रहाणार आहेत.

>>>> या गोष्टी अनादि कालापासून चालत आल्या आहेत अनंत काळापर्यंत चालत रहाणार आहेत. <<<
बरोबर, बळी तो कान पिळी.....
फक्त तुमच्या त्या रुपककथेत शेवटी फक्त इश्वर/धर्म/ध्यान योग इत्यादीच आले, म्हणून भर घातली, इतकेच...! Proud
असो.

परवा कौशल इनामदार यांचा गणपतीला नैवेद्य गोंगाटाचा हा मटा मधील लेख वाचला आणी मला या नानावटींच्या हॆमर कल्चरची आठवण झाली.
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/ganapati-viarja...

पण जेव्हा मानव रानटी अवस्थेमधुन (हंटर + गॅदरर) या अवस्थेमधुन प्रगत झाला (फार्मर) तेव्हा संस्कृतीने जन्म घेतला आणि संस्कृतीबरोबरच, सामुदायिक संकेत, रुढी, बंधने, परंपरा, यम-नियम येत गेले. तेव्हा समाजाने एक सुघड अथवा विघड रुप घेणे अपरिहार्यच होते. काही गोष्टी या जशा त्याज्य ठरविल्या गेफिरणे)उदा - कितीही सुखद हवा असो परंतु, नग्न फिरणे) त्याच्प्रमाणे काही गोष्टी वरिष्ठ ठरल्या ज्याला धर्मसंमत्/मूल्याधारीत आचरण म्हणु. तेव्हा कोणतीतरी संस्कृती ही अपरिहार्यच आहे.
पण प्रघांचे हे म्हणणे बरोबर आहे की आपल्याला त्याज्य वाचणार्‍या गोष्टी आपण 'हातोडा' या शब्दाच्या जागी घालू शकतो. उदा - जातपात भेदभाव.