मर्लिन मुनरो-हो मला तुमचा पैसा हवाय

Submitted by रवींद्र दत्तात्... on 11 September, 2016 - 10:19

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी ं
चित्रपटामधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अाठवणीतला हॉलीवुड-पाच

‘हो...! मला तुमचा पैसा हवाय...! पण त्यांत गैर काय...तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला एखाद्या कंगाल, फाटक्या माणसाच्या पदरी घातलं असतं का...? नाही ना...मग मी स्वत:साठी तुमच्या पैसेवाल्या मुलाला पसंत केलं तर त्यांत गैर काय...?’

हा युक्तिवाद बॉलीवुडच्या चित्रपटांमधे कधीच बघायला मिळाला नाही.

चित्रपटांमधे एक दृश्य हमखास आढळतं की नायिका गरीब आणि नायक हा एका कोट्याधीशाचा मुलगा असतो. मुलाच्या प्रेमाबद्दल कळल्यावर बाप त्या मुलीकडे जाऊन किंवा सिचुएशन प्रमाणे तिला आपल्या पैशाचा धाक दाखवून धमकावतो-

‘माझ्या मुलावर प्रेम नसून तुझा डोळा माझ्या पैशांवर आहे...माझ्या मुलाचा नाद सोडण्याकरितां तुला किती पैसे हवेत...? वगैरे-वगैरे...

यावर नायिकेचं उत्तर ठरलेलं असतं-

‘माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे...मला तुमचा पैसा नको...’

चित्रपट इतिहासात असे बरेच चित्रपट आहे ज्यांत ‘सासरा व नायिके दरम्यान झालेल्या करारावर’ संपूर्ण चित्रपटाचा डोलारा उभा आहे...अगदी मीनाकुमारी पासून माला सिन्हा, रेखा पर्यंत...मोठी यादी आहे...आपल्या चित्रपटांमधे प्रसंगी नायिका-

‘मैं आपके बेटे की जिंदगी से दूर...बहुत दूर चली जाऊंगी जहां से मेरी छाया भी उन पर न पड सके...’

असं म्हणत नायकापासून दूर जाते...पण आपल्या भारतीय नायिकेने कधी चुकूनसुद्धा उलट प्रश्न विचारला नाही की-

‘हो...मला तुमचा पैसा हवाय, पण त्यांत गैर काय...!’

हा उलट प्रश्न 1953 साली आलेल्या ‘जेण्टलमेल प्रीफर ब्लाण्ड्स’ या चित्रपटांत मर्लिन मुनरो ने आपल्या होणारया सासरयाला विचारला होता...

‘जेण्टलमेल प्रीफर ब्लाण्ड्स’ पैसेवाला जोडीदार शोधत असलेल्या दोन मैत्रिणींची कहाणी होती. लोरालॉय ली (मर्लिन मुनरो) आणि डोरोथी शॉ (जेन रसेल) या दोघी मैत्रिणी अमेरिकन शो गर्ल्स आहेत. लोरालॉय ला हिरयांची आवड आहे. ती पैसेवाल्या गॅस एसमंड (टामी नूनॉन) च्या प्रेमात पडलीय. तर डोरोथी असा प्रियकर शोधतेय जो चार चौघांसारखा दिसणारा व प्रेमळ असेल.

दोघींचं एकमेकांवर जिवापाड प्रेम...इतकं की डोरोथी, लोरालॉय वर आपलं सर्वस्व ओवाळून टाकायला तयार असते. एकदा डोरोथीचा प्रियकर तिला लोरालॉयच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला देतो (फुकट...!) त्यावर ती (डोरोथी) त्यालाच कडक शब्दांत सुनावते-

‘खबरदार...माझ्या मैत्रिणीबद्दल पुन्हां असं काही बोललास तर...ती साधी भोळी मुलगी आहे...तिच्याबद्दल कुणी वाइट बाेललेलं मला बिलकुल चालणार नाही...’

पुढे एका घटनेत मदत बंद झाल्यावर त्यांचे पैसे संपतात. पर्समधील पैसे बघून डोरोथी एक कॉफीचा आर्डर देते. ऑर्डर सर्व झाल्यावर डोरोथी तो कप लोरालॉय कडे सरकवते...तर ती तो कप परत डोरोथी कडे ढकलते...डोरोथी एक सिप घेते नंतर लोरालॉय सिप करते...
हे सगळं नाट्य ‘वेन लव गोज रांग नथिंग गोज राइट...’ या गाण्या दरम्यान घडतं...या वेळेस दोघींच्या चेहेरयावरचे रिफ्लेक्सेस अप्रतिम असेच आहेत...अशी असते त्यांची मैत्री

ही लिंक बघा-

https://youtube/9HwGzNnVrWw

भवितव्य सफरीवर अवलंबून

लोरालॉय, गॅस सोबत फ्रांस मधे लग्न करायचा बेत ठरवते. पण गॅसचे वडील सीनियर एसमंड मुलाला तिच्या सोबत जाऊ देत नाही. दोघी मैत्रिणी नायका शिवाय फ्रांसच्या सफरीवर निघतात. बोट सुटण्या आधी नायक गॅस, लोरालॉय ला लेटर ऑफ क्रेडिट देतो, त्याप्रमाणे वाटेतील सगळा खर्च त्याचे वडील करणार आहेत. तो तिला बजावतो देखील की सफरी दरम्यान वागणूक नीट ठेव. कारण तुझ्या या सफरीवर आपलं भवितव्य अवलंबून आहे. (त्याच्या वडिलांना शंका असते की लोरालॉय ची लायकी आपली सून होण्याची नाही) म्हणून या सफरी दरम्यान हेर, अर्नी मेलोनी (इलियट रीड) कडून तिच्याबद्दल माहिती मिळवून मग ते आपला अभिप्राय देणार असतांत. म्हणून दोघी मैत्रिणी, लोरालॉय व डोराेथी सफरीवर निघतांत. आणि एक हेर (नायकाच्या वडिलांनी नेमलेला) त्यांच्यावर ‘नजर’ ठेवतो.

हिरे लोरालॉय चा वीक पाइंट...

त्यांचा सहयात्री सर फ्रांसिस ‘पिगी’ बिकमेन (चार्ल्स कोबर्न) हिरयांच्या खाणीचा (डायमंड माइन्सचा) मालक आहे. त्याची बायको लेडी बिकमेन (नार्मा वर्डन) जवळ ‘डायमंड टियारा’ (हिरयांचा मुकुट) आहे. यात्रे दरम्यान ते मुकुट कुणीतरी चोरतं...या चोरीचा आळ मनरोवर येतो. या घटनेनंतर दोघा मैत्रिणींना, नायकाच्या वडिलांद्वारे मिळणारी मदत बंद होते. पण त्या दोघी या प्रसंगाने विचलित न होता पॅरिसच्या क्लबांमधे नाइट शो करुन-

‘वेन लव गोज रांग नथिंग गोज राइट...’

आणि

‘डायमंड्स आर दि गर्ल्स बेस्ट फ्रेंड्स...’

हे गीत गाऊन प्रेमभंगाचं दुख पचविण्याचा प्रयत्न करतात. कोर्टात सगळ्या गोष्टींचा खुलासा होऊन शेवट गोड होतो...

या चित्रपटांत ‘डायमंड्स आर दि गर्ल्स बेस्ट फ्रेंड्स...’ या गीतानंतर लोरालॉय ली व नायकाच्या वडिलांची भेट होते...या भेटीचा प्रसंग, त्यातील सवाल-जवाब अप्रतिम असेच आहेत...

नायकाचे वडील गैरसमजातून प्रथम लोरालॉय ला, डोरोथी (लोरालॉयची मैत्रीण) समजून आपली पसंती दर्शवितात. पण हीच लोरालाॅय, त्यांच्या मुलाची प्रेयसी आहे, हे कळल्यावर ते तिला म्हणतात-

‘तू एक माडर्न, पैशाच्या मागे धावणारी लबाड मुलगी आहेस...पैशांकरितां तू वाट्टेल ते करायला तयार असतेस...’

यावर लोरालॉय उत्तर देते-

‘माझं हे रूप जगांकरितां आहे...या दुनियेत साध्या भोळयां मुलींचा वाली कुणीच नाही. पण मॉडर्न, फैशनेबल मुलींच्या पायावर जग लोटांगण घालतं...म्हणून जगापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी मला हे सोंग करावं लागतं...’

हे ऐकून ते प्रभावित होतात, तरी म्हणतात-

‘मला तर तुझ्याबद्दल काहीतरी वेगळंच सांगितल्या गेलं होतं...तू तर खूप चलाख, तेज दिसतेस. मला वाटतं की तुझं माझ्या मुलावर प्रेम नसून तुला माझा पैसा हवाय...’

यावर लोरालॉय स्पष्टपणे स्वीकारते-

‘यस मिस्टर एसमंड...,मला तुमचा पैसा हवाय...’

पुढे ती खुलासा करते-

‘पण त्यात गैर काय...! तुम्हाला जर एखादी मुलगी असती तर तुम्ही तिला एखाद्या कंगाल, फाटक्या माणसाच्या पदरी घातलं असतं कां...! नाही ना...तिच्या करितां तुम्ही एखादा पैसेवाला मुलगाच शोधला असतां...मग मी स्वत:साठी तुमच्या पैसेवाल्या मुलाला पसंत केलं तर त्यांत गैर काय...!’

ते निरुत्तर होतात...

लोरालॉय पुढे म्हणते-‘डैडी...मला तुमच्या मुलाचं कौतुक वाटतं...त्याने माझ्या त्या रुपात देखील माझ्यावर विश्वास ठेवला...प्रेम केलं...म्हणूनच मला तो आवडतो, त्याच्यावर प्रेम आहे माझं...’

ही लिंक बघा-

https://youtube/0Hp3000Dale

शेवट गोड होतो...

‘जेण्टलमेल प्रीफर ब्लाण्ड्स’ मधील लोरालॉय ली च्या रुपात वावरतांना मर्लिन मुनरोने एका मॉडर्न, चंचल, पैशांकरितां वाट्टेल ते करणारया मुलीची प्रतिमा पडद्यावर साकार केली होती.

पण सासरया समोर प्रांजळपणे ‘हो...! मला तुमचा पैसा हवाय...!’ म्हणणारी मुनरो विसरतां येत नाही...

भारतीय चित्रपटांमधे हा युक्तिवाद, हा विचार कधीच सापडला नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहे.. Happy

लेखातला जो मुख्य मुद्दा आहे, तो अगदीच पटला आहे. लौकरच असं स्पष्ट बोलणारी एखादी व्यक्तिरेखा आपल्याकडच्या सिनेमात येईलच, अशी आशा वाटते.

शीर्षक एकाच वेळी मिसलीडिंग वाटलं आणि उत्सुकता चाळवणारंही !

लौकरच असं स्पष्ट बोलणारी एखादी व्यक्तिरेखा आपल्याकडच्या सिनेमात येईलच, अशी आशा वाटते.>>> सहमत

उत्स्फूर्त प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे...

मला हेच अपेक्षित आहे...

काय आहे, 1935 ते 1970 दरम्यानचे हॉलीवूडचे क्लासिक मला बघता आले...

काही अंडर रेटेड चित्रपट देखील होते...पण मला त्यांत जे वैशिष्टय दिसलं, जे सांगावसं वाटलं ते मी इथे मांडण्याच्या प्रयत्न करतोय...

मला कल्पना आहे की हे इतके जुने चित्रपट कोणी बघणार नाही म्हणून त्या चित्रपटाची सविस्तर कहाणी, कलाकारांबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करतो...