मायबोली मास्टरशेफ - घोषणा

Submitted by संयोजक on 2 September, 2016 - 04:19

masterchef.jpg

आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!

या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड!!! म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.

चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.

स्पर्धेचे नियम -

१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.
२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.
४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.
९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.
१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.
११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.
___________________________________________________________________________

या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
खास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या Happy

'तिखट' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60250

'गोड' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60251

मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह !
या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत.
>>>> कल्पकता आवडली

पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत.
>>>>

कल्पकता छान आहे, फक्त जरा गणित चुकतंय, अक्षरे चार आहेत. Wink

अतरंगी - त्या चार पैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे - असे आहे, ४ नाही वापरायचे ३ वापराय्चे
हा मला समजलेला अर्थ

अक्षरांपैकी कुठलीही तीन अक्षरं घ्यायची आहेत. >>>>

हायला असा नियम आहे होय.

म्हणजे सगळे मुख्य पदार्थ कोणत्यातरी तीनच अक्षरांवरून हवेत होय. अभी समझ्या.

यष्टीमधु वापरा. म्हणजे ज्येष्ठमध.>>

अहो ३ अक्षरी पाहिजे म्हणे ना मुख्य घटक पदार्थाचे नांव जसे बटाटा, मटार लसून, इत्यादी ..

यीस्ट वनस्पतीच आहे कवक जातीतील.. अर्थात तज्ञ जास्त प्रकाश टाकू शकतील !

अहो ३ अक्षरी पाहिजे म्हणे ना मुख्य घटक पदार्थाचे नांव जसे बटाटा, मटार लसून, इत्यादी ..>>

कृष्णा, ३ अक्षरीच अशी अट नाही. चार अक्षरे दिलीत, त्यापैकी कुठल्याही तीन अक्षरांपासून सुरु होणारे... पदार्थ किती का अक्षरी असे ना.

पण मुख्य घटक हवेत हे बरोबर. म्हणजे यीस्ट, यष्टीमधु फाउल.

मानव, अगदी बरोबर!
जर मुख्य घटक विदेशी किंवा/आणि ज्याला मराठीत नावच नाही असा असेल तर विदेशी भाषेतील नाव चालेल.

चार अक्षरे दिलीत, त्यापैकी कुठल्याही तीन अक्षरांपासून सुरु होणारे...>>>म्हणजे नक्की काय? आपण जो पदार्थ बनवणार त्यात तीन मुख्य घटक असायला हवेत का?

संयोजक कृपया प्रकाश टाका

on सेकंड thoughts, यीस्ट नसले तर पाव होणारच नाही. मग पावातला यीस्ट हा मुख्य घटक ठरतो. हो ना संयोजक?

सोनाली, जो पदार्थ तयार करणार आहात त्यातले मुख्य घटक तीन हवे, वर सांगितल्याप्रमाणे. अर्थात तिन्ही घटक सारख्याच प्रमाणात नसले तरी चालतील.

साधना, हो पावासाठी यीस्ट मुख्य घटक ठरेल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.>>>>>

याचे सदस्यत्व कसे घ्यावे ? कृपया मला मदत करा....

ल वरून लाल टोमॉटो चालेल का ? नाय म्हणजे हिरवे पण असतात. हिरव्या टमाटोची चटणी केली तर रेसिपीत हिरवा असं लिहीतात. लाल टोमॉटोच्या अस्मितेचा प्रश्न आहे. (कधी लाल टोमॅटोचे सूप असं कोणी शेफ लिहीत नाही. Sad )

Pages