यंदा १८ बाय २० ची दहीहंडी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 August, 2016 - 22:55

न्यायालयाच्या निकालानुसार यंदाच्या दहीहंडीमध्ये 18 वर्षाखालील बालगोपाळ सहभागी होऊ शकणार नाहीत.
तसेच हंडीची उंची 20 फूटांपेक्षा उंच असता कामा नये.
(नशीब समुद्रसपाटीपासून वीस फूट नाही म्हणाले)

अत्यंत अयोग्य आणि लोकांच्या उत्साहावर विरजन घालणारा निर्णय.

मी काही प्रखर हिंदुत्ववादी नाही जे हिंदूंच्याच सणांना का लक्ष केले जाते म्हणत ओरडा करत फिरतो.
तसेच मी उत्सवप्रिय माणूस असलो तरी दुष्काळात रंगपंचमीला केलेली पाण्याची नाशाडी तसेच गणपती नवरात्रीला उशीरापर्यंत चालणारे स्पीकर यांना विरोधच करतो.
पण या निर्बंधांना मात्र अर्थ नाही.

जर तुम्ही हंडीला खेळ म्हणून पाहिले तर त्याला कुठल्या आधारावर वीस फूटांची मर्यादा घालत आहात. कुठल्याही साहसी खेळाला असे काही निर्बंध आहेत का? फार तर तुम्ही सुरक्षिततेचे नियम कठोर करा आणि ते पाळायची सक्ती करा. ते योग्य राहील. याऊपरही ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी असतेच. कोणी मरायला म्हणून हंडी खेळत नाही. यापेक्षा जास्त धोका तर खचाखच गर्दीने भरलेल्या ट्रेनला लटकून प्रवास करण्यात असतो. आणि तसे रोज हजारो लोकं नाईलाजाने करतातही. कित्येक पडून मरतातही. तरी तिथे मात्र सरकार कोणताही कायदा करण्यास असमर्थ ठरतेय.

राहिला प्रश्न 18 वर्षाखालील हंडीचा. तर मी माझ्या आयुष्यात जी काही थोडीबहुत दहीहंडी खेळलोय ती अठरा वर्षांच्या आधीच खेळलोय. अरे लहान मुलांचाच तर हा खेळ आहे. कश्याला तो खराब करत आहात. आधी 20 फूटांची मर्यादा देत त्याला 18 वर्षांखालील मुलांचाच खेळ बनवून ठेवायचे. आणि मग त्यांनाच परवानगी नाकारायची. हास्यास्पद आहे हे.

ज्याने कोणी याचिका दाखल केली. ज्याने कोणी हा निकाल दिला. जो कोणी दहीहंडीच्या विरोधात उभा राहिला. त्या सर्वांचा निषेध!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अरे लहान मुलांचाच तर हा खेळ आहे. >> ऋन्मेष, बव्हंशी मी तुमच्या पोस्टशी सहमत असलो तरीही हजारो रुपयांचं अमिष [कांहीं ठीकाणीं तर कांही लाख रुपये] दाखवून मुलाना जीवावरचा अवास्तव धोका पत्करायला उद्युक्त करणारे महाभाग इथं अस्तित्वात असताना, हा 'लहान मुलांचाच तर खेळ आहे' , असंही म्हणणं धाडसाचं होईल. पण २० फूट कमाल उंची मात्र मलाही हास्यास्पद वाटते.

हा नुसता खेळ किंवा मजा राहिलेली नाही. पैसा आला की त्यातली निरागसता निघून जाते. होणारे अपघात पाहता निर्बंध हे हवेतच. उंचीची मर्यादा २० की २५ फूट हा मतभेदाचा भाग आहे. १८ वर्षे हे सज्ञान होण्याचे वय असल्यामुळे ते ठरवले असेल.

बंदी पूर्ण योग्य आहे.
बक्षिसांसाठी लहान मुलांना धोक्यात घालणं, ९ थरांच्या पैजा लावून शेवटी लोक कंटाळून निघून गेले की गुपचूप हंडी उंची कमी करणं, हे प्रकार अवास्तव प्रॉमिस आणि उगीच माझी जास्त उंच या स्पर्धे पायी होत आहेत.
हंड्या किती उंच पेक्षा किती लवकर उभ्या केल्या/किती सेफली उतरवल्या याला मार्क असावेत.
उगीच पब्लिक ला क्षणाचा श्वास रोखायला मिळावा म्हणून लहान मुलं अपंग्/ब्रेन इंज्युर्ड्/मृत करणे चाईल्ड लेबर इतकेच नीच आहे.

दहीहंडी मैदानातच खेळली जावी जिथे खाली किमान ५ इंच थराचे लॉन असावे.
किंवा एखाद्या उंच क्रिडागृहात जिथे खाली किमान ५ इंच थराच्या, किमान दहाफूट त्रिज्येच्या गाद्या असाव्यात.
खेळाडुंनी हेलमेट घालणे बंधनकारक.
वगैरे.

सहमत ऋम्न्या .
दुखापत टाळ्ण्यासाठी सुरक्षिततेची सगळी काळजी मात्र घेण्यात यावी.
मानव +१
दहीहंडी बघण्यात मजा असते ती हिरावुन घेण्यात काय अर्थ आहे.

हेल्मेट्/नीकॅप.
जवळपास किंवा बोलावली तर लवकर येईल अश्या अंतरावर अँब्युलन्स.
मला वाटते आहे आता पतंग उडवण्याच्या लोकेशन्स आणि मांजा यावर पण निर्बन्ध यावे.मांजामुळे दिल्लीत ३ आणि ४ वर्षाची मुलं गाडीच्या सनरुफ मधून उभी राहून पाहत असताना गळे चिरुन दगावली आहेत.मांजा पांढरा असतो.पटकन दिसत पण नाही.आपल्याला खेळाच्या मेमरी आणि थ्रिल पुढे जीव जाणे पण स्वस्त वाटतेय का? की 'दोन तीनच गेले, जास्त कुठे' म्हणून चालतेय?पूर्वीच्या काळी हे सर्व नव्हतं, सेफ्टी नव्हती त्यावेळी खेळ असेच व्हायचे म्हणून आता पण असेच करायचे आणि धोके वाढवत न्यायचे?

माझी रीक्षा.... http://www.maayboli.com/node/44938

{दर वर्षी दहीहंड्येच्या आधी-नंतर पेपर भरून जातत. हंड्येच्या थरापेक्षा बक्षिसाची रक्कम जास्त उंच होते. पोराबाळांच्या जीवावर राजकारणी स्वताची प्रसिद्धी करून घेतत. पण फक्त तेंका दोष देवून चालाचा नाय. मायझये राजकारणी नेते तर आयत्या बिळावरचे नागोबा. पण तेनी बक्षिसा नाय लावली तरीपण आदी दहीहंडी मंडळा होती आनी पुडेपण रवतली. रवतलो ६-७-८ थर लावचो थरार. या सपक अळणी आयुष्यामध्ये थोडो बदल होतलो. या हंडयेर चढणारे कोनी कुरिअर बॉय आसा तर कोनी हॉस्पिटल मधे वार्ड बॉय, कोनी शिपाई आसा तर कोनी रिक्षावालो. आंड कुटलेल्या बैलासारखे गप्-गुमान मान खाली घालून संसाराचो गाडो ओढणाऱ्या या लोकांका त्यांच्या जिवंतपणाची जाणीव फक्त अशा सणामधून तर व्हता. उच्चभ्रू समाज कितीपण टीका करांदे, ही लोका अशीच दहीहंडी चडतली}

पैसा कश्यात नाही आला.
आयपीएलमध्ये आला. क्रिकेट वाह्यात झाले. बंद झाले का.
वेश्याव्यवसाय देखील निव्वळ पैसा कमवायलाच चालतो. तिथे किती लहानग्यांची आयुष्ये त्यांच्या मर्जीविरुद्ध बरबाद होतात. तिथे बंदीची तलवार चालत नाही.
कोणता असा सार्वजनिकरीत्या साजरा होणारा सण उरला आहे ज्यात व्यावसायिकता येत त्याचे स्वरूप बदलले नाहीये. नवरात्र असो वा गणपती. सगळीकडे थिल्लरपणा घुसला आहेच. उगाच विषय भलतीकडे नको म्हणून ईतर धर्माच्या सणांची नावे घेत नाहीये.
जाओ पहले ऊस आदमी की साईन लेके आओ असे म्हणायचे नाहीये पण न्यायालयाच्या निर्णयामागे निकष जे लावतात ते सगळीक्डे समान नको का..
आणि रिस्कही कश्यात नाहीये, कुठल्या खेळात नाहीये, सुरक्षेची पुरेशी साधने वापरली तर कित्येक एडवेनचरस स्पोर्ट्सही बिनबोभाट खेळली जातात. बाकी सुरक्षिततेची साधनेही कुठे सगळीकडे असतात. मागे मी गोव्याला एकदा मरता मरता वाचलोय सो कॉलड वॉटरस्पोर्ट्समध्ये.
बाकी हलक्या प्रतीच्या दारूचे गुत्ते बंद न करणारया सरकारला आणि न्यायालयाला लोकांच्या जीवाची काळजी आहे हे ऐकून गहिवरून आले.
आणि हंडीतील रिस्क म्हणाल तर ती ईतक्या वर्षे आधीही जेव्हा माझगाव ताडवाडी, लालबाग, भायखळा वगैरे येथील गोविंदा पथके सात आठ थरांच्या हंड्या लावायच्या तेव्हाही होतीच. जेव्हा या सणाचे कुठलेही बाजारीकरण झाले नव्हते ना जीवघेणी स्पर्धेने यात शिरकाव केलेला तेव्हाही दर दुसरे गोविण्दा पथक सहज सहा सहा थर लावायचे. आणि आज त्या लोकांचे पाच थर लावायचेही वांधे.

बरे निर्बंध आणावेत तर ते चुकीच्या प्रकारांवर आळा बसावा असे आणावेत. ईथे तर सणाची शोभाच कमी करून टाकलीय.
वीस फूट म्हणजे नेमके किती? फूटांची भाषा खरे तर मलाही कळत नाही. पण जर एक थर म्हणजे खांद्यापर्यण्तचा किंचित वाकलेला माणूस साडेचार फूटांचा पकडला तर पाच थरांचेही हात वर न करता तेवीस फूट होतील. म्हणजे पाचव्याने चौथ्याच्या खाण्द्यावरून उठायचेच नाही किंवा गपगुमान फूटबिटाच्या भानगडीत न पडता चारच फूटांची हंडी फोडायची. आणि मग याला प्रोफेशनलही कश्याला हवेत. चार थराची हंडी आम्हीही कसलीही प्रॅक्टीस न करत थट्टामस्करी करत उभारतो. अर्थात यातही कमालीची मजा असतेच. पण मग बघण्यातील मजा संपलीच. संपवूनच टाकली. आता आम्हीच अठरावीस फूटांची हंडी बांधू आणि आम्हीच फोडू. अर्थात आतल्या गल्लीतल्या गल्लीत आम्ही अठरा वर्षांची मुले चढवतोय की चौदा वर्षांची हे बघायला पोलिस आले नाहीत म्हणजे मिळवले.

'लोकांचे डोके हात पाय तुटण्याचा धोका' एका बाजूला नि बघ्यांची 'बघण्याची मजा' नि सणाची शोभा ह्यात मी माझ्या तर्फे पहिल्याच गोष्टिला प्राधान्य देईन. भले मग शंभरातल्या फक्त एकाचाच पडून हात/पाय्/डोके फुटले असले तरी.

ईथे तर सणाची शोभाच कमी करून टाकलीय.
वीस फूट म्हणजे नेमके किती? फूटांची भाषा खरे तर मलाही कळत नाही >> आधी २० फूट म्हणजे किती ते नक्की समजून घे नि मग इथे तावातावाने लिहि ना भाऊ.

वीस फूट म्हणजे 240 ईंच.
एक ईंच म्हणजे साधारण अडीज सेंटीमीटर. (2.54 बहुतेक)
240 ईंच म्हणजे 600 सेंटीमीटर
म्हणजे फक्त सहा मीटर बस्स...
चार ऋन्मेष एकमेकांच्या खांद्यावर उभे राहिले तर डोके थेट हंडीत घालून दही खातील.

फूटाण्ची भाषा समजत नाही एवढ्यासाठीच म्हणालो की हंडी थरात मोजायची सवय. जिथे ट्रिपल एक्काच चौदा पंधरा फूटाचा होतो तिथे राज ठाकरे बरोबरच बोलले की आता स्टूलावर उभे राहून हंडी फोडायची का भाऊ ?

बाकी वीस फूटांवरून पडल्यावर लागत नाही हा शोध न्यायालयाने मस्त लावला. त्याऊपरही ज्याला लागेल त्याला सरकार नुकसान भरपाई देणार का की आम्ही कायदा आणखी कडक दहा फूटाण्चा करू शकलो नाही त्यामुळे तुन्हाला लागले..

"जाओ पहले ऊस आदमी की साईन लेके आओ असे म्हणायचे नाहीये पण न्यायालयाच्या निर्णयामागे निकष जे लावतात ते सगळीक्डे समान नको का.." - न्यायालयापुढे जी केस येते, त्याचा उपलब्द पुराव्यांनिशी सर्वंकष आढावा घेऊन निकाल देणं ईतक्याच मर्यादेत न्यायालयाचं काम चालतं. त्या केस च्या अनुशंगाने बाकीच्या समांतर (किंवा बाकीच्यांना समांतर वाटणार्या) गोष्टींवर टीप्पणी करणं न्यायालयाच्या अख्त्यारित येत नाही.

आता याला आधी हिंदू मुस्लिम रंग देणार. भाजप शिवसेना मनसे, कॉंग्रेस - राकॉ असे सगळे पक्ष काहीही करणार नाहीत. ना ठोस नियम करून कायदा करतील ना न्यायालयाला पटवून देतील. शेवटच्या दिवसा पर्यंत गोधळ घालतील. श्रेय प्रत्येकाला हवं म्हणून कोणीच कोणाला ते घेऊ देणार नाही.
शेवटी कितीही मोठी हंडी लागली तरी पोलीस कारवाई करणार नाहीत असा अलिखित समझोता होऊन उत्सव उत्साहात पार पडणार.
हे कोणा न्यायप्रिय नागरिकाला न आवडून त्याच्या विरोधात ती व्यक्ती न्यायालयात जाणार मग न्यायालय स्पष्ट शब्दांत कडक ताशेरे वगैरे ओढणार,आणि हे या पुढे खपवून घेतले जाणार नाही असं,सॉलिसिटर जनरल महाराष्ट्र राज्य यांना कडक शब्दांत बजावणार.
या सगळ्यात दुर्दैवाने काही दुर्घटना घडलीच तर आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थित हाताळायला कोणीही तयार नसणार, सरकार १० लाख नुकसान भरपाई देणार.
मग पुढचे ३६५ दिवस कोणीही काहीही कायदेशीर हालचाल करणार नाही जेणेकरून स्वच्छ नियम बनतील.
मग गणपती- नवरात्र - दिवाळी यात हाच वग अनुक्रमे विसर्जन मिरवणूक वेळ, स्पीकरचा आवाज आणि फटाक्याचा आवाज यावर होणार. हे वरचे महाशय धागे काढणार आणि आपण तेच तेच लिहिणार.

https://www.youtube.com/watch?v=-iSHfrmGdyo

हंडी फोडायलाच थर लावले पाहिजेत असा नियम केला आहे का सरकारने? हंडी फोडा चार थर लावून नंतर ह्या कॅस्टेलर लोकांसारखे सहा थर लावले तर कोणता नियम मोडणार आहे????

गल्लीत रबरी बॉलने क्रिकेट खेळताना हेल्मेट, पॅड्स वगैरे न घालता खेळणे आणि एखाद्या टूर्नामेंटमधे खेळताना ही सगळी काळजी घेणे अशाच प्रकारचा फरक आहे हा.

हंडी हा सण म्हणुन साजरा करायला हवा. बक्षिसांवर बंदी घालायला हवी. मोठमोठी बक्षिसे ठेऊन चिमुकल्यांना एवढ्या उंचावर चढवणे हे क्रुरतेचे आहे.बक्षिसे बंद केली तर हंड्या आपोआप खाली येतील. सण हा अध्यात्मिक कारणांसाठी आणि आनंदासाठी केला जातो तो पैसे मिळवण्यासाठी वा स्वताचा जिव घालवण्यासाठी वा अपंग होण्यासाठी केला जात नाही.

सीमंतिनी कसला क्रूर प्रकार आहे.
लिंकबद्दल धन्यवाद. यंदा मटक्यातील दह्याची तहान बाटलीतील दूधावरच भागवावी लागणार.

केस च्या अनुशंगाने बाकीच्या समांतर (किंवा बाकीच्यांना समांतर वाटणार्या) गोष्टींवर टीप्पणी करणं न्यायालयाच्या अख्त्यारित येत नाही.
>>>>
एका केसच्या निकालाचा संदर्भ दुसर्‍या एखाद्या सिमिलर केसमध्ये वापरता येतो.
बहुधा
जाणकारच प्रकाश टाकतील.

हे वरचे महाशय धागे काढणार आणि आपण तेच तेच लिहिणार.
>>>
कुठतरी सिरीयामध्ये दंगे होतात, एखाद्या काश्मीरमध्ये परीस्थिती चिघळते. मुंबईकर सोफ्यावर बसून पेपर न्यूजमध्ये बातमी वाचतात. एक मत बनवतात आणि भाष्य करतात. अर्थात यात काही गैर नाही. सगळेच स्वता अनुभवून बोलायचे म्हटल्यास बोलायला मोजकेच विषय उरतील.
पण माझे बालपण दक्षिण मुंबईत गेलेय. दहीहंडी जिच्या संस्कृतीचा एक भाग आहे अश्या वातावरणात वाढलोय. त्यामुळे मला हे निर्बंध आणि हे २० फूट १८ वर्षांचे निकष हास्यास्पद वाटणे स्वाभाविक आहे.
यात जिवाला धोका आहे वगैरे बोलण्यात काही चुकीचे नाही. मुद्दा रास्त आहे. पण तो धोका जे पत्करायला तयार आहेत त्यांच्यावर सरकार बंदी का घालत आहे हे अनालकनीय. त्यातही जर १८ वर्षांचा कायदा केल्यास तो धोका पत्करणारे सज्ञान आहेत असे म्हणू शकतो. मग त्यावर फक्त वीस फूटांची बंदी का?

बारमध्ये दोन (६० मिली) पेगच्या वर / एका बीअरपेक्षा जास्त दारू मिळणार नाही, कारण त्यानंतर चढते.
असा नियम काढण्यासाठी आता मलाच कोर्टात याचिका दाखल करावी लागेल.

कोणी ईथला वकील / कायद्याचा जाणकार मला मार्गदर्शन करेन का?

ऋ दादा
तुझ्या अनेक धाग्यांवर स्वजो, सता, शाखा यांना ओढून ताणून आणतोस.
आता या दारुला का बरे आणतोस? ते ही दहीहंडी या अापल्या उच्च संस्कृतीतल्या सात्विक सणाच्या धाग्यावर?

गेल्या वर्षीही हेच झालेलं. दुष्काळाच्या निमित्ताने काही मोठ्या हंड्या रद्द झालेल्या.
गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागलेच आहेत.

ऋन्मेष, ह्या धाग्यात लिहिलेयस ते खरे की तिरकस हे माहित नसल्याने कमेंट करू शकत नाही.

मात्र मला न्यायालयाचा हा निर्णय आवडला आहे हे खरे.

कोणी ईथला वकील / कायद्याचा जाणकार मला मार्गदर्शन करेन का?>>>>
कायद्याचे नाही करु शकत, पण हा मुद्दा कोर्टात व्यवस्थित मांडण्यास नक्कीच मदत करु शकतो. वकील भेटले की कळव.

पीआयएल नावाचा प्रकार आहे
तु ऑनलाईन हा प्रकार करू शकतो. लॅब रिपोर्ट काढ ज्यात लिहिले असेल की दारू चे (अल्कोहोल) चे २ पेग घेतल्यानंतरच ३ र्‍या पेगला दारूचा अमंल सुरु होतो. आणि २ पेग किती एमएलचे ते सुध्दा स्पष्ट लिहिले पाहिजे. ३०, ६० कि ९० चा पटियाला पेग हे सगळे स्पष्ट लॅब रिपोर्ट मधे लिहिले पाहिजे. त्यानंतर दारू कोणती हे पण लिहून काढ. उदा. देशी थर्रा याचे किती पेग घेतलेले चालतील, नारंगी मोसंबीचे किती, व्हिस्कीचे किती पेग, स्कॉच चे किती पेग, इ. दारूच्या प्रकाराचे सुध्दा तुला रिपोर्ट लागतील. त्यानंतर वाईन, व्होडका, जीन, बिअर, इ. सगळे प्र्कार यांचा सुध्दा लॅब रिपोर्ट हवा जेणे करुन कोर्टासमोर तुला तुझी २ पेग वाली भुमिका स्पष्ट करता येईल किती पेग घेतल्यावर किति लोक मरण पावले, किती स्प्रिरिटचे प्रमाण हानिकारक असते, किती पेग घेतल्यावर व्यक्तीला गाडी चालवता येत नाही, कुठली दारू शरिराला हानिकारक आहे, लिवर किती दारू पिल्यानंतर नष्ट होते इ. हे सगळे रिपोर्ट आनि त्यांचा तज्ञांकडून चा अनॅलिसिस करून तुला "पीआयएल" टाकावी लागणार. त्यावरून कोर्ट हे प्रकरण तपासून घेईल. आणि जर तुझे रिपोर्ट अ‍ॅनलिसिस योग्य वाटले तर तुझी केस कोर्टात चालवतील. अन्यथा तुझ्यावर कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल दंड सुध्दा करतील..

बघ आता तु निर्णय घे Wink

तिरकस नाही. याला खेळ म्हणून बघता आले पाहिजे.

अबाऊट दारू, उदय छान माहिती.
माहिती गोळा करा वगैरे तसे सोपे नाही पण अशक्यही नाही. दारू पिऊन झालेल्या अपघातांत दारूचे कमीत कमी किती प्रमाण होते याचीही माहिती मिळवून यात जोडल्यास फायद्याचे ठरेल असे वाटतेय.
बघूया जमेल का ते .. फार तर दोनाच्या जागी चार पेगचे निर्बंध टाकावे लागेल, पण हे असे घडायला हवेच.

सगळी माहीती काढ आणि इथे सांग मग मी तुला सांगतो कोण कोणते पोईंट घेऊन पीआयएल दाखल कर.

बघू तु किती हिंमत दाखवतोस कि नुसते धागेच काढतो मायबोलीवर सोक्षमोक्ष लागू दे Biggrin

Pages