मित्र असावा

Submitted by निशिकांत on 7 August, 2016 - 10:06

मित्र असावा---( मैत्री दिनाचे औचित्य साधून एक रचना. जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, )

गूज मनीचे सांगायाला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

लाख येवू दे दु:ख, संकटे भय ना त्यांचे
धुंद होउनी सदैव असते जगावयाचे
वादळातही साथ द्यायला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

परक्यांच्या नगरीत कुणी ना कुणा बोलती
व्यक्त व्हावया कुणीच नाही, खांद्यावरती
डोके टेकुन रडावयाला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

भणंग आहे, उनाड आहे, पुन्हा बेवडा !
बदनामीचा डाग कपाळी छळे केवढा !
योग्य दिशेने मला न्यायला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

मायबाप दोघांचे असते स्थान वेगळे
दरी तरीही, धाकदपटशा, अपेक्षांमुळे
त्यांच्यामध्ये बघावयाला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

मंदिरातल्या मूर्तींना मी कधी न पुजले
"ब्रह्म सत्त्य अन् मिथ्या जग" हे मना न पटले
देव नको, मदतीस यायला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users