ती भूतं कुठेशी गेली?

Submitted by सखा on 13 July, 2016 - 10:10

भुतांच्या गोष्टी सांगा कुणाला आवडत नाहीत? चांदणी रात्र. मस्त पैकी जेवण झालेलं असावं.जराशी शेकोटी. मग बघा कळतच नाही कशा गप्पा सुरु होतात. आमचं लहानपण तर भूताखेतांच्या गोष्टी मुळेच समृध्द झालं म्हणायला हरकत नाही. संध्याकाळी अंधार पडला कि क्रिकेट थांबायचं मग आम्ही सारी पोरं कोंडाळ करून ग्राउंड वर बसायचो. कुणी मग सिनेमाची स्टोरी फुल्टू ढी-श-क्या-व टेन-टे-ढेन करून सांगायचं. कधी कधी कळायचंच नाही कशी गोष्टीतून भूतं उगवायची. आमच्या पैकी मोठी पोरं जोडून जोडून फेकायची पण आम्हाला ते आवडायचं. सोबत मुली असतील त्या अद्भुत किंचाळायच्या तशी मोठी पोरं अजूनच चेकळायची मग कथा फार रंगायच्या. त्या काळी मग रात्री घरी जाताना भीती वाटायची मग एखाद्या मोठ्या मित्राला किवा मैत्रिणीला म्हणायचं मी जर अंधारा जिना चढून जाई पर्यंत इथे खाली उभा राहा. मग जीव मुठीत घेवून धूम जिना चढायचा आणि मग वरून पोहोचलो सांगायचं. त्या काळात कुणाच्या बाबांना भूत दिसले असायचे कुणाच्या काकांना अगदी आई शप्पथ खर म्हणून लोकं कथा सांगायची. घोळसलं हा मराठी शब्द तर केवळ भूता साठीच निर्माण झाला आहे. भूतं पुष्कळदा त्या काळी माणसाना घोळसत. अमावस्येची रात्र, काळी मांजर, उलटी पावलं, वडाच झाड, पिंपळाचा पार वगैरे सिम्पट्म्स पाठ झालेले होते. त्या काळी प्लांचेट नावाचा प्रकार फार लोकप्रिय झाला होता. आम्ही पण चार पाच पोरं कोंडाळ करून मध्ये वाटी उपडी ठेवून भूत वगैरे बोलवून प्रश्न विचारायचो. सगळं अगदी खरं वाटायचं. आम्ही पाणचक्कीपाशी राहायचो बीस साल बाद या सिनेमाचं शूटिंग तिथे खाली पडक्या दालना मध्ये झालं होतं. आम्ही नंतर मित्र मित्र बर्याचदा डेरिंग करून ती जागा पाहून यायचो. कोलेजात असताना पोल्टर गाईस्त नावाच्या सिनेमाने पहिल्यांदा खऱ्या अर्थाने घाबरवले होते. बाकी त्या काळी आलेले रामसेचे सिनेमे तर टर उडवण्या साठीच पाहायला जायचो. त्यातला जिन्या पासच्या मोठ्या तसबिरीतील माणसाचे डोळे पोझिशन चेंज करायचे हा माझा फार आवडीचा सीन. वादळी पावसात करकरणारा दरवाजा उघडणारा कंदीलवाला नौकर तर अजरामर करेक्टर आहे. आमच्या घरी कधी अंगत पंगत असली कि आम्ही माझ्या आजोबाना गोष्ट सांगायला सांगत असू. ते महाभारत रामायणा पासून ते भूत खेता पर्यंत साऱ्या गोष्टी सांगायचे. त्यांची एक मालन नावाच्या हडळीची गोष्ट आम्हाला फार आवडत असे. ती काहीशी अशी होती. एका गावात म्हणे एक नवीन इन्सपेक्टर राहायला आला लोकानी नको म्हणून सांगितले तरी त्याने मुद्दाम तेच घर घेतले जिथे लोक म्हणत हडळ राहत असे. पहिले दोन तीन दिवस काही घडेल नाही मग एका रात्री त्याला जाग आली तर त्याच्या लक्षात आले कि त्याचा पलंग छताला टेकला आहे पण तो अजिबात घाबरला नाही काही दिवसांनी त्याची आणि त्या हडळीची मैत्री झाली. त्याच्या साहेब लोकांचा त्याच्या वर विश्वास नव्हता म्हणून त्याने एकदा त्या सगळ्यांना आपल्या गच्ची वर बोलावले. घरा भोवती पहारे बसवले. गच्चीच्या चारी बाजूने विजेच्या तर लावल्या जेणे करून कोणीही आत येवू नये.
असा कडे कोट बंदोबस्त झाल्या वर त्याने बरोबर बाराच्या ठोक्याला "मालन" अशी हाक मारली आणि काय आश्चर्य "आले आले" म्हणत ती हडळ प्रगट झाली. आम्हाला हि गोष्ट फार आवडायची सगळे प्रसंग डोळ्या समोर दिसायचे. हडळी वरून आठवले आम्ही इंजिनीरिंगला असताना आशूच्या आई एक बाल नाट्य बसवीत होत्या मावशीनी आम्हाला रंगीत तालीम आणि चर्चेला बोलावले. हडळीचा एक रोल होता. तिच्या गेटअप बद्दल मावशी म्हणाल्या कि मी हिला काळा रंग फासून पांढरे दात असे बाहेर काढणार आहे म्हणजे ती खूपच भयंकर दिसेल त्या वर आशू अगदी सिरिअसलि म्हणाला "मी तर म्हणतो उलट काहीच गरज नाही, हिला मेकअप शिवायचं ठेव". सम्या, मी आणि अजून एक दोन एका मागे एक पटा पटा उठून बाहेर पोट फुटेस्तोवर हसलो आणि मग पुन्हा सिरिअस तोंडे करून आत आलो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहलयं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

भुताच्या गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडतात, ज्यांना भिती वाटते त्यांना तर जास्तच Proud

आमच्या लहानपणी माझे बाबा आम्हाला भुताच्या गोष्टी सांगत. बाबांची सेकंड शिफ्ट असे तेव्हा बाबा रात्री १२.३० ला घरी यायचे त्यावेळेस बहुतेक सर्व झोपलेले असायचे. मग बाबांना कुण्याच्यातरी ओट्यावर लहान मुलाला घेऊन बसलेली पांढर्‍या साडीतली बाई दिसायची तर कधी विडी मागणारा माणुस Proud कितीतरी वर्षे मला बाबांच्या या गोष्टी खर्‍या वाटायच्या कारण बाबांची गोष्टी रंगवून सांगायची स्टाईलच तशी होती.
चाळीतल्या आमच्या अंगणात रात्रीची जेवणे झाल्यावर आम्ही सगळे चिल्लीपिल्ली, मशेरी घासत बसलेल्या बायका, मोठी माणसे जमत असु. मग होत असे एक एक गोष्टीला सुरवात. आधी इकडतिकडच्या गप्पा, नंतर एखादी साधी गोष्ट असे करता करता मग गाडी भुतांच्या गोष्टीकडे वळत असे. सोबत आणलेल्या गोधडीने संपुर्ण चेहरा झाकुन का होईना मी त्या गोष्टी ऐकत बसे (तेव्हढच सुरक्षित असल्यासारखे वाटते Lol )

मस्तय