स्फुट १९ - प्लस मायनस काहीच नाही

Submitted by बेफ़िकीर on 12 July, 2016 - 11:19

स्फुट १९ -

तुझी मुले असतील प्रगत देशात
आठ तासांच्या इकॉनॉमी विमान प्रवासाच्या अंतरावर
ज्यांना सुट्टी मिळेलच असे नाही

तुझे आई, वडील तर बहुतेक नसतीलच

तुझा भाऊ असेल परगावी
'करिअरसाठी'
तुझी बहीण असेल सासरी
'तिला तिथे धाडले म्हणून'

तुझा नवरा किंवा बायको
अडकली असेल ट्रॅफिकमध्ये
डोळ्यांत प्राण, श्वासात अधीरता
हातात स्टिअरिंग, पायात अ‍ॅक्सिलरेटर
तोंडात शिव्या आणि नामःस्मरण
एकाचवेळी घेऊन,
अश्रूंची गदगद रोखत
रस्त्यात पोलिस नाही ना बघून
सुचतील ते नंबर्स डायल करत
'आपने डायल किया हुवा नंबर'
ह्या रेकॉर्डेड आवाजाला
सुचतील त्या शिव्या देत
श्वास रोखून
शक्य ते सिग्नल्स मोडत
आतल्याआत आक्रंदत
चेहरा कोरा ठेवत
बीपी हाय

तुझे मित्र असतील
आहेत त्या ठिकाणाहून निघालेले
सुसाट, जमेल त्या वाहनाने
आपापली कामे सोडून

तुझे देव असतील
त्याच देव्हार्‍यात, तसेच हासत

तुझे असिस्टन्ट्स असतील
वेगळे काहीतरी घडत आहे ह्या उत्सुकतेत

तुझे सहकारी असतील
'असे आपल्याला झाले तर' ह्या भयात

तुझा बॉस असेल
'ह्याला बरे व्हायला किती वेळ लागतो कोण जाणे'
ह्या चिंतेत

अनोळखी डॉक्टर्स असतील
'जवळच्यांना बोलावून घ्या' सांगणारे

कोर्‍या चेहर्‍याच्या नर्सेस असतील
'जो भी है डॉक्टर बतायेंगे' म्हणणार्‍या

तुझे भविष्य असेल
'सो फार' झालेल्या संशोधनाच्या हातात

तुझा वर्तमान असेल
तुझ्यासाठी प्रथमच अनाकलनीय

तुझे अतीत असेल
'तुझ्यापासून मगाशीच दुरावलेले'

तुझ्या सभोवती असतील
तुझ्याशी सुतराम संबंध नसलेले
निवासी डॉक्टर्स
रात्रपाळीच्या नर्सेस
गरजू मावश्या किंवा मामा

तुझ्या सगळ्या वस्तू
'आ' वासून बघत असतील
आता आपले काय होणार ह्याकडे

तुझा 'तू' असशील
असणे आणि नसणे च्या सीमारेषेवर

फक्त तेव्हा तुला हे स्फुट कळेल
जे मी केव्हाच रचलेले होते
आणि जे
मलाही तेव्हा अनुभवता आलेले नव्हते
आणि जे
मला जेव्हा अनुभवता आले होते
तेव्हा
ते मी कधी रचलेले होते
हे आठवण्याच्या अवस्थेतच मी नव्हतो

जा एकट्या
एकटाच आला होतास
प्लस मायनस काहीच नाही

======================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. टायटल वाचून "सुलतान प्लस मायनस सलमान" शी काही सम्बन्ध आहे की काय असे वाटले होते. Happy

विद्या

हे पण छान. पण नॅरेटिव्ह मधल्या माणसाला किती नातेवाईक व काँटॅक्ट्स आहेत. इतकेही नसणारे लोक्स असतात. धिस पर्सन इज लकी. असेच वाटले.